पल्याडचं दाखवणारी...
----------------------------
सुमित्रा भावेंचा ‘दिठी’ हा नवा मराठी सिनेमा म्हणजे साध्या डोळ्यांना दिसतं, त्याही पल्याडचं दाखवणारी ‘दिठी’ (दृष्टी) देणारा सिनेमा आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर असं जोडीनं नाव नसलेला आणि दिग्दर्शक म्हणून सुमित्रा भावे यांचं एकटीचंच नाव असलेला हा पहिला (आणि दुर्दैवानं शेवटचा) चित्रपट. हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) कोथरूडच्या सिटीप्राइडमध्ये एक नंबरच्या स्क्रीनमध्ये पाहिला होता. माझे आवडते लेखक दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासिं आले...’ या कथेवर हा सिनेमा आधारित आहे, हे कळल्यामुळं तेव्हा आवर्जून रांगेत उभं राहून सिनेमा पाहिला होता. पाहिल्यानंतरच ते रांगेत उभे राहण्याचे कष्ट भरून पावले, हे कळलं होतं. तेव्हापासून तो कधी प्रदर्शित होतोय, याची वाट पाहत होतो. सध्या थिएटर्स बंदच असल्यानं अखेर ‘दिठी’ आता ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित झाला आहे. मी पाहिला त्याला बरेच दिवस झाले होते. म्हणून आज परत एकदा पाहिला आणि मग लिहायचं ठरवलं. सिनेमा संपल्यावर दोन गोष्टींसाठी डोळ्यांत पाणी जमा झालं. एक तर त्यातल्या आशयामुळं सिनेमाला मिळालेली डोळ्यांची ती खास दाद होती. दृष्टीपलीकडचं दाखविणाऱ्या या सिनेमाला नेहमी अलीकडचं दाखवणाऱ्या डोळ्यांनी अशी दाद द्यावी, हे मला विलक्षण वाटलं. दुसरं कारण म्हणजे हे असं दृष्टीपलीकडचं दाखविणाऱ्या सुमित्रा भावे आपल्यात नाहीत, याची अचानक झालेली ऐहिक जाणीव. आपण काय गमावलंय हे लक्षात येऊन पोटात खड्डाच पडला. पण परत मनाला समजवायला हा सिनेमाच धावून आला. आपल्याकडं डोळे आहेत, पण ‘दृष्टी’ सुमित्रामावशीच्या ‘दिठी’नं दिली आहे की...
आपल्या साध्या-सरळ जगण्यातले तितकेच साधे-सरळ पेच सोडवण्यासाठी संतसाहित्याने फार मोठा आधार दिला आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या ‘अमृतानुभवा’तील नवव्या प्रकरणातील...
आतां आमोद सुनांस जाले। श्रुतीसि श्रवण रिघाले।
आरिसे उठिले। लोचनेंसी।।
आपलेंनि समीरपणे। वेल्हावती विंजणे।
कीं माथेंचि चांफेपणें। बहकताती।।
जिव्हा लोधली रासे। कमळ सूर्यपणे विकासे।
चकोरचि जैसे। चंद्रमा जालें ।।
फुलेंचि जालीं भ्रमर। तरुणीची जाली नर।
जाले आपुलें शेजार। निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ। आंगचि जाले मलयनिळ।
रस जाले सकळ। रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता। दिसे आणि देखता ।
हे सारले अद्वैता। अफुटामाजी ।।
यातील पहिल्या ओळीचा आधार घेऊन मोकाशींनी कथा लिहिली आहे. आमोद म्हणजे सुवास आणि सुनांस म्हणजे नाक. जेव्हा सुवासच नाक होतो आणि स्वत:ला भोगू शकतो, तेव्हाची अद्वैताची अवस्था म्हणजे अमृतानुभव. पुढीस सर्व दृष्टान्त याच धर्तीवरचे आहेत. मोकाशींच्या कथेतील केंबळं गावातील रामजी लोहाराचा तरुण मुलगा भोवऱ्यात बुडून मरण पावला आहे. पाच-सहा दिवस झाले, पाऊस हटायला तयार नाही. रामजी गेली तीस वर्षं पंढरीची नियमित वारी करणारा वारकरी आहे. विठ्ठलाचा भक्त आहे. विठ्ठलाची एवढी भक्ती करूनही तरुण मुलगा अचानक देवानं का ओढून नेला, या असीम दु:खात रामजी बुडाला आहे. गावात संतू वाण्याकडे रोज होणाऱ्या पोथीवाचनालाही जाण्याचा उत्साह त्याला नाही. सून बाळंत झाली आणि तिला मुलगी झाली, म्हणून तो तिच्यावरही राग धरून आहे. गावातल्या शिवा नेमाणेची गाय सगुणा व्यायला झाली आहे. शिवा आणि त्याची बायको तुळसा यांना सगुणेची तगमग पाहवत नाहीय. अशा अडल्या गाईला मोकळं करणारी एकच व्यक्ती गावात असते - ती म्हणजे रामजी. मात्र, मुलगा गेल्याच्या दु:खात बुडालेल्या रामजीला कसं बोलवणार? अखेर तुळसा धीर धरून रामजीला बोलावायला जाते... गाय अडली आहे, म्हटल्यावर रामजी सगळं दु:ख विसरून शिवाच्या घरी धाव घेतो... वि-सर्जनाच्या क्षणापासून ते सर्जनाच्या क्षणापर्यंतचा प्रवास पूर्ण होतो आणि रामजीला आपल्या दु:खावर एकदम उतारा सापडतो... त्याच्या या प्रवासाची कथा म्हणजे हा चित्रपट.
मोकाशींची कथाच मुळात खूप चित्रदर्शी आहे. सुमित्रा भावेंना त्या कथेचा आत्मा गवसला आहे. त्यांनाही या कथेत जे दिसतं, त्याच्यापलीकडचं दिसलं आहे. माणसाचं आयुष्य, त्याची सुख-दु:खं, त्यातलं आपलं अडकत जाणं आणि एका दिव्य साक्षात्काराच्या क्षणी त्या सर्व मोहमायेतून सुटका करणारं पल्याडचं काही तरी गवसणं हे सर्व त्यांनी फार नेमकेपणानं या सिनेमात आणलं आहे. या सिनेमातला धुवाँधार पाऊस, फुसांडत वाहणारी नदी आणि ओलागच्च आसमंत ही एक मिती आहे. यात वावरणारी गावातली साध्या पांढऱ्या कपड्यांतली, देवभोळी माणसं, चिखलात फसणारी चप्पल नदीत फेकून देणारी माणसं, टपरीवर विडी ओढत पावसाच्या गप्पा मारणारी माणसं, घरांत कंदिलाच्या प्रकाशात नित्यकर्मं करत राहणारी माणसं ही दुसरी मिती आहे. तिसरी मिती आहे ती शिवाच्या बायकोला दिसणाऱ्या शंकर-पार्वतीच्या व सुग्रास अन्नाच्या स्वप्नाची, गाईच्या पोटात ढुशा देणाऱ्या वासराची अमूर्त आणि रामजीचं मन व्यापून काळ्याभोर आभाळागत उरणाऱ्या ऐहिक दु:खाची अगोचर मिती! कॅमेरा पॅन होत होत मुख्य वस्तूवर स्थिर व्हावा, तसं सुमित्रा भावे आपल्याला पहिल्या मितीकडून तिसऱ्या मितीकडून नेतात. या मितीत आपल्याला रामजीप्रमाणेच ‘आमोद सुनांस जाले’ या अद्वैताचा अमृतानुभव येतो. सपाट पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांतून असा त्रिमिती अनुभव द्यायला सुमित्रा भावेंसारखे ‘ज्ञात्याचे पाहणे’ असावे लागते. आपल्या क्षणभंगुर आयुष्यातल्या तितक्याच क्षणभंगुर दु:खांचा आपण किती सोस करतो! कितीही देव देव केला तरी पोटच्या मुलाच्या मरणाचं दु:ख कसं पेलणार? मग मोकाशी आणि सुमित्रा भावे आपल्या कथेतून व कलाकृतीतून याचं उत्तर देतात - ते म्हणजे विसर्जनाला, विलयाला उत्तर असतं ते फक्त नव्या सर्जनाचं... कुठल्याही परिस्थितीत माणसाच्या हातांनी हे सर्जन सोडता कामा नये. रामजी जेव्हा त्याला येत असलेलं सर्वोत्कृष्ट काम पुन्हा करतो, त्याच क्षणी त्याच्यातल्या अपार दु:खाचा विलय होतो. तिथं सर्जन जन्माला येतं... माणूस फारच लेचापेचा, स्खलनशील प्राणी खरा; मात्र त्याच्या ठायी असलेल्या बुद्धीचं सामर्थ्यही तेवढंच अचाट, अफाट! माउलींनी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा व जे जाणायचे आहे ती गोष्ट) यातल्या अद्वैतासाठी जशी रूपकं वापरली, तशीच रूपकं मोकाशींनी आपल्या कथेत वापरली. सुमित्रा भावे यांनीही आपल्या कलाकृतीत ही रूपकं वापरली. वर म्हटल्याप्रमाणे तिन्ही मितींत त्यांनी ही कथा फिरविली आणि प्रेक्षकांनाही हा ‘आमोद सुनांस जाले’ अनुभव दिला. अगदी पोथी वाचण्याचा प्रसंग संतू वाण्याच्या घरात वरच्या माळ्यावर घडतो, या छोट्या प्रसंगातूनही या रूपकांचं दर्शन होतं.
धनंजय कुलकर्णी यांच्या छायाचित्रणाचा यात मोठा वाटा आहे. यातलं केंबळं गाव त्यांनी अगदी जिवंत केलं आहे. सासवड व आळंदीची वारीची सर्व दृश्यं उच्च आध्यात्मिक अनुभूती देणारी. पार्थ उमराणी यांचं संगीत नेमकं व अपेक्षित परिणाम साधणारं. या कलाकृतीच्या यशात महत्त्वाचा वाटा अर्थातच कलाकारांचा. किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, अंजली पाटील या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट कामं केली आहेत. मात्र, खास उल्लेख करावा लागेल तो रामजी झालेल्या किशोर कदम यांचा. केवळ डोळ्यांतून त्यांनी रामजीचं आभाळाएवढं दु:ख उभं केलं आहे. पोथी म्हणताना, सुनेशी बोलताना, गाईला धीर देताना अशा सर्व प्रसंगांत हा माणूस त्या पात्राशी कमालीचा तादात्म्य पावतो. या भूमिकेत ते अगदी चपखल बसले आहेत. उत्तरा बावकर छोट्या भूमिकेतही छाप पाडतात. शेवटचा अभंग खासच!
‘दिठी’ का बघायचा तर आपल्याला साध्या डोळ्यांनी जे दिसतं, त्यापेक्षा वेगळं काही जाणवतं का हे चाचपून बघण्यासाठी! त्यासाठी आपण आणि इतर यातला भेद नष्ट व्हायला पाहिजे. आपल्या आत डोकावून बघता आलं पाहिजे. आपलं दु:ख मोठं असं म्हणत बसण्यापेक्षा ते दु:ख निवारण करणारं काही सर्जन आपल्या हातून होतंय का हे तपासता आलं पाहिजे. जेव्हा आपले डोळेच आपली ‘दृष्टी’ होतील, तेव्हा हे सगळं दिसेल. मग ‘मीपण’ गळून पडेल आणि त्या अफाट, अथांग, उत्तुंग अशा गोष्टीशी अद्वैत साधता येईल.
---
ओटीटी - सोनी लिव्ह
दर्जा - चार स्टार
----