कणसुराची सुरेल मैफल
-----------------------------
चैतन्य ताम्हाणे या तरुण दिग्दर्शकाचा ‘कोर्ट’नंतर आलेला ‘द डिसायपल’ हा नवा चित्रपट म्हणजे एका कणसुराची सुरेल मैफल आहे. आयुष्यात सगळ्यांचेच तंबोरे सुरेल लागतात, असं नाही. प्रत्येकाला आपल्या जगण्याची मैफल रंगवता येतेच असं नाही. किंबहुना असं रंगलेल्या मैफलीसारखं जीवन लाभणारे फार थोडे. बाकीच्यांच्या आयुष्यात कमअस्सलतेचे, कमकुवतपणाचे, कचखाऊपणाचे कणसूरच अधिक! या कणसुरांना सुरेल जगात स्थान नाही. त्यांचं गाणं कोणी गात नाही. चैतन्यचं कौतुक अशासाठी, की त्यानं या कणसुराचं गाणं गायलं. त्याला भरल्या मैफलीत स्थान दिलं. शास्त्रीय संगीत हा तसा मोठा विषय. या विषयाची पार्श्वभूमी असलेला एकही मराठी चित्रपट अद्यापपर्यंत आलेला मला तरी आठवत नाही. चैतन्यनं हे आव्हान पेललंय. अर्थात त्याचा हा चित्रपट केवळ शास्त्रीय संगीतापुरता मर्यादित राहत नाही, तर कोणत्याही कलेला किंवा जगण्यातल्या कुठल्याही प्रांताला लागू होईल, अशा व्यापक अर्थापर्यंत पोचतो. कला, साधना, गुरु-शिष्य परंपरा, माणसाची स्खलनशील वृत्ती या सर्वांवर नेमकेपणानं बोट ठेवतो आणि प्रत्येक प्रेक्षकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो.
शरद नेरुळकर (आदित्य मोडक) या तरुणाची कथा ‘द डिसायपल’ आपल्याला सांगतो. शरद आपले गुरू पं. विनायक प्रधान (पं. अरुण द्रविड) यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवतो आहे. त्यालाही मोठा गायक व्हायचंय, मैफली गाजवायच्या आहेत. त्याचे वडील शास्त्रीय गायक होते. मात्र, त्यांना त्यांच्या आयुष्यात फार यश मिळवता आलेलं नाही. शरद जेव्हा या प्रवासाला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू त्यालाही त्याची मर्यादा समजत जाते. एका अर्थानं त्याला झालेला हा साक्षात्कार आहे. त्याला निराळ्या अर्थाने आलेली ही ‘उपज’ आहे. आपल्याला काय येत नाही, हेही अनेकदा लोकांना कळत नाही. आपल्याला काय जमत नाही आणि आपण आयुष्यात काय होऊ शकत नाही, याचं वेळेवर भान येणं हेही एका अर्थानं यशस्वी आयुष्याचं गमक आहे.याचं कारण हे भान आल्यानंतर माणूस आपल्याला ज्या गोष्टी येतात, जमतात त्या करण्याच्या मागे लागतो. लौकिकार्थाने यशस्वी होतो. तरीही आयुष्यभर एक टोचणी लागून राहतेच. पुलंच्या लेखात एक प्रख्यात गायक वृद्धापकाळी गाताना म्हणतात - मला ती जागा दिसते आहे; पण आता तिच्यापर्यंत पोचता येत नाही. या सिनेमातल्या नायकाला कधीच त्या जागेपर्यंत जाता येत नाही, हाच काय तो फरक! आपण तिथं जाऊ शकत नाही, हे समजण्यापर्यंतचा त्याचा एका तपाचा प्रवास म्हणजे हा चित्रपट!
या चित्रपटाची मांडणी मोठी वेधक आहे. चैतन्यला चित्रभाषेची केवळ उत्तम जाणच नाही, तर त्याची तिच्यावर मांड आहे. ‘कोर्ट’मध्येही त्यानं वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरावर्क दाखवलं होतं. ‘द डिसायपल’ त्या तुलनेत एवढा गुंतागुंतीचा नसला, तरी यातल्या नायकाचे पेच आहेतच. पहिल्या सिनेमात समाजविषयक भाष्य होतं, तर ते इथं एका व्यक्तीपुरतं मर्यादित आहे. अर्थात, गोष्ट एका व्यक्तीची असली, तरी त्यातला आशय वैश्विकच असेल, याची काळजी दिग्दर्शक घेतो. यातलं त्याचं कॅमेरावर्कही पाहण्यासारखं आहे. इथेही ‘कोर्ट’सारखे लाँग शॉट आहेत. पण ते प्रामुख्यानं मैफलीच्या दृश्यांचे आहेत. इतर वेळी चौकटीतले तपशील अधोरेखित करण्यावर त्याचा भर आहे. त्याच्या गुरूंचं चाळीतलं घर, नायकाचं घर, नाट्यगृहं किंवा सार्वजनिक संस्थांची छोटी सभागृहं, हॉटेल्स, दुकानं हे सगळं कथेच्या ओघात दिसत राहतं. त्याहून सर्वांत महत्त्वाचं पात्र आहे ते मुंबई शहर व इथले रात्रीतले एकांडे रस्ते! नायक आपल्या मोटारसायकलवरून हे शहर हिंडत असतो आणि त्याच वेळी त्याच्या गुरूंच्या गुरू माई उर्फ सिंधूताई जाधव यांनी दिलेली व्याख्यानं तो इअरफोनवरून ऐकत असतो. माईंचे हे संगीतविषयक विचार हा या सगळ्या चित्रपटाचा गाभा आहे. सुमित्रा भावे यांच्या आवाजात आपल्याला ती ऐकायला येतात. या आवाजासाठी सुमित्रा भावेंचा आवाज वापरणं हा दिग्दर्शकाचा ‘मास्टरस्ट्रोक’ आहे. आयुष्यभर एखाद्या विषयाला वाहून घेतलेल्या, साधना केलेल्या व्यक्तीचा आवाज याहून निराळा असणार नाही, असं आपल्याला तो आवाज ऐकताना जाणवतं. सुमित्रा भावेंच्या किंचित कातर आवाजात समजावणीचा समंजस सूर आहे. तो आवाज या चित्रपटाचा मध्यवर्ती टोन सेट करतो.
कथानकाच्या दृष्टीने चित्रपटाचे सरळ दोन भाग आहेत. साधारण २००६ च्या आसपास, जेव्हा नायक २४ वर्षांचा असतो, तेव्हा घडणाऱ्या घटना आणि मग थेट २०१८ मध्ये नायक ३६ वर्षांचा झाला असतानाचा दुसरा काळ समोर येतो. या बारा वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात भौतिक बदल खूप झाले. बटनवाल्या मोबाइलपासून ते स्मार्टफोनपर्यंत आणि छोट्या सभागृहातील मैफलींपासून ते रिअॅलिटी शोपर्यंतचे हे सगळे बदल दिग्दर्शकानं फार चाणाक्षपणे टिपले आहेत. अगदी शरद रात्री मुंबईत रस्त्याने फिरत असताना पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या इमारतीही उत्तुंग व चकचकीत झाल्या आहेत. निऑन साइन्समधून आवाहन करणाऱ्या जाहिरातीही बदलल्या आहेत. रिअॅलिटी शोमधून देशभर लोकप्रिय झालेल्या एका बंगाली गायिकेची यशोगाथाही नायकाला व आपल्याला समांतर दिसते आहे. क्लासमध्ये मुलाला कॉलेजच्या बँडमध्ये गायला परवानगी मागायला येणाऱ्या गुजराती बाईचा प्रसंगही उत्तरार्धात येतो. या सगळ्यांत शरदही बदलतो. अगदी स्वत:चं फोटोशूट करून वेबसाइट तयार करतो. त्याची मैफल ऐकायला येणाऱ्या आणि पहिल्या रांगेत बसून स्मार्टफोनवर मेसेज चेक करणारे ‘शो अॅरेंजर’ही दिसतात. शरदही आता यू-ट्यूबवर आपल्या मित्र-मैत्रिणींचे व्हिडिओ बघतो. ते लौकिकार्थाने यशस्वी झालेले दिसतात. अगदी परदेशातही मैत्रिणीच्या मैफली झालेल्या दिसतात. हा सर्व बदल एकाच दृश्यात आपल्याला सहज दिसतो. या सर्व काळात होत चाललेलं संगीत क्षेत्राचं बाजारीकरण, श्रोत्यांची विशिष्ट अपेक्षा, ‘सगळ्यांना भावगीतंच ऐकायची असतात,’ हा सीडी विकतानाचा संवाद, पूर्वी चांगलं वाजविणाऱ्या आणि आता ‘प्लेइंग टु द गॅलरी’ वाजविणाऱ्या सतारवादकाची मैफल (‘कानातून रक्त येईल!’ ही शरदच्या मित्राची प्रतिक्रिया धमाल आहे!) असे सगळे प्रसंग येत राहतात. पूर्वार्धात शरदचे वडील त्यांच्या दोन मित्रांसह ‘तीन तासांवर असलेल्या’ एका शहरात रेल्वेने एक मैफल ऐकायला चालले आहेत. तेव्हाचे त्यांचे संवाद भारी आहेत. मुंबईहून पुण्याला सवाई गंधर्व महोत्सव ऐकायला येणारे हे श्रोते असणार, यात शंका नाही. चित्रपटात हे सरोदवादन एका धरणाच्या काठी निसर्गरम्य ठिकाणी होतं, हा भाग वेगळा. पण श्रोत्यांची सर्व चर्चा ‘सवाई’च्या श्रोत्यांची आठवण करून देते. अशा सर्व गोष्टींवर हा चित्रपट जाता जाता प्रभावी भाष्य करतो. शरदच्या तरुणपणी घडलेला, पण चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारा एका अतरंगी समीक्षकासोबतचा प्रसंग पण असाच प्रभावी आहे. या सर्व बदलांत एकच गोष्ट बदललेली नसते, ती म्हणजे त्याच्या गुरुजींचं घर. हे फारच सूचक व प्रतीकात्मक आहे. बाकी शरदच्या धारणांना हादरा देणारे असे प्रसंग किंवा घटना घडत असतात, त्यावर शरद त्याच्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. बारा वर्षांनंतर त्याला ‘हे आपल्याला जमणे नाही,’ याचा साक्षात्कार होतो. त्यानंतर तो काय निर्णय घेतो, हे चित्रपटातच पाहायला हवे.
यात आदित्य मोडक या तरुणानं नायक शरद नेरुळकरची भूमिका समजून केली आहे. सीए असलेला आदित्य स्वत: शास्त्रीय गायक आहे. त्याचा रूपेरी पडद्यावरचा हा पहिलाच वावर असावा. या भूमिकेत अनुस्यूत असलेलं एक अवघडलेपण, वैफल्य ही भावना दाखवण्यासाठी आदित्यच्या नवखेपणाचाही उपयोग झाला असावा. त्याचे गुरू पं. विनायक प्रधान यांची भूमिका ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अरुण द्रविड यांनी केली आहे. तेही स्वत: गायक असल्यानं गाण्याच्या मैफलींचे सर्व प्रसंग जिवंत झाले आहेत. शरदच्या वडिलांच्या छोट्याशा भूमिकेत किरण यज्ञोपवित आणि राजन जोशी या समीक्षकाच्या भूमिकेत प्रसाद वनारसे लक्षात राहतात. अन्य कास्टिंगही उत्तम. चित्रपटातली लोकेशन्स अभ्यासण्यासारखी आहेत. सर्व मैफलींचं चित्रिकरण अगदी ऑथेंटिक आहे.
गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात वैयक्तिक सुख-समृद्धी खूप आली. पण आपण त्यासाठी कशाची किंमत मोजली, हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. आता सगळं काही झटपट हवंय आपल्याला! एका प्रसंगात शरदचे गुरुजी त्याला म्हणतात, ‘कसली घाई आहे? कुठे पोचायचं आहे?’ हे ऐकताना हे आपल्यालाच उद्देशून म्हटलंय की काय, असं वाटत राहतं. आपण फार जीव तोडून कशाच्या तरी मागे लागलो आहोत आणि त्यासाठी फार महत्त्वाचं, शाश्वत असं काही तरी गमावत चाललो आहोत, असं चित्र आहे. सध्याच्या करोनाकाळात तर या वेगवान व कथित भौतिक प्रगतीचं वैयर्थ पदोपदी जाणवतं आहे. अशा वेळी शाश्वत, दीर्घकाळ टिकणारं काय आहे हे सांगणारा आणि त्याच वेळी तिथं पोचण्यापर्यंतची आपली मर्यादा जाणवून देणारा असा हा चित्रपट आहे. चुकवू नका!
----
ओटीटी : नेटफ्लिक्स
दर्जा : चार स्टार
----
हे वाचल्यावर बऱ्याच जणांना नीट उमजून येईल, की चैतन्यने नेमक्या कुठल्या जागा घेतल्या आहेत, काय बेसूर होऊ दिलंय आणि कुठे भाता धपापू दिलाय. 🙏🏼
ReplyDeleteमन:पूर्वक धन्यवाद!
Deleteफार मनोवेधक मांडणी केलीत समिक्षेची. आणि चित्रपट मी पाहीला व माझी शास्त्रीय संगीतातील रुचि असल्याने मला चित्रपट अगदी पटला भावला.
ReplyDeleteमनापासून आभार!
Deleteकिती सुरेल लिहिलं आहेस!
ReplyDeleteकिती सुरेल लिहिलं आहेस!
ReplyDeleteThank you 💖
Deleteनगरी लालित्यपूर्ण लेखनशैलीस्खलनातून अंतर्यामी मिलनाचा अनुभव दिलास मित्रा बा अदब सलाम
ReplyDeleteधन्यवाद मित्रा!
Deleteकित्येक चित्रपट अगदी पाहावेसे वाटतात, केवळ तुमचं परीक्षण वाचून.👍🙏👌
ReplyDeleteThank you... Pl write ur name...
DeleteSunder!!!
ReplyDeleteSunder likhan!!
ReplyDeleteThank you... Pl write ur name...
Deleteछान पकडली आहेस चित्रपटाची. त्याच्याविषयी जितकं मिळेल तितकं वाचण्याची ओढ निर्माण करणारा हा चित्रपट आहे.
ReplyDeleteThank you Ma'am!
Delete*चित्रपटाची नस
ReplyDeleteखूप छान समीक्षण, मी चित्रपट पाहिला, पण तुमच्या समीक्षणामुळे तो अधिक समजला. Thank you
ReplyDeleteमन:पूर्वक धन्यवाद!
DeleteGood review Shripad
ReplyDeleteधन्यवाद, सुहास!
Deleteतुमचे समीक्षण वाचल्यावर चित्रपट समजल्यासारखे वाटू लागले आहे.
ReplyDeleteचैतन्य ताम्हाणे हा नव्या पिढीतील श्रेष्ठ दिग्दर्शक आहे यात शंकाच नाही. त्याच्या चित्रपटात बोलली जाणारी भाषा मराठी असली तरी चित्र चौकटीतून मांडली जाणारी भाषा आंतरराष्ट्रीय चित्रपटाची आहे. कणसुराची सुरेल मैफल या शिर्षकातच संपूर्ण समीक्षा सामावली आहे. कोर्ट असो की डिसायपल, एखादी मैफल रंगली की त्यातील गायकाने घेतलेल्या जागांना ज्याप्रमाणे आपण दाद देतो त्याप्रमाणे या चित्रपटातील चित्रचौकटी पाहताना सहज मनात दाद येते. आसपासच्या अनेक कणसूर शिष्यांच्या कथा दिसू लागतात.श्रीपादने या लेखाद्वारे चैतन्यच्या मैफिलीला दिलेली ही दाद म्हणूनच भावते!
ReplyDelete