मराठी विनोदाचे कथेकरीबुवा
-----------------------------------
मिरासदार पेशानं शिक्षक होते. त्यांचं बालपण पंढरपुरातल्या गल्ली-बोळांत गेलं. स्वातंत्र्यपूर्व काळातला भारत तो! ग्रामीण संस्कृती आजूबाजूला नांदत होती. देवदेवस्की, रुढी-परंपरा, अंधश्रद्धा, धर्मशास्त्राचा पगडा जबर होता. शिक्षणाचा आणि एकूणच सोयीसुविधांचा बऱ्यापैकी अभाव होता. गरिबी उदंड होती. एकीकडं गांधीजींच्या नेतृ्त्वाखाली देश स्वातंत्र्यासाठी लढत होता, तर दुसरीकडं आपली गावखेडी हजारो वर्षांच्या गावगाड्याच्या, जुलमी जोखडाच्या बेड्या पायी जखडवून तशीच नांदत होती. मिरासदार हे सर्व पाहत होते. ते वीस वर्षांचे असताना देश स्वतंत्र झाला. सर्वांनीच मोकळा श्वास घेतला. शिक्षणाचं वारं वाहू लागलं. अगदी हळूहळू का होईना, पण बदल होऊ लागले. एकीकडं गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे आणि अरविंद गोखले यांच्या कथांनी साहित्यातल्या कथाप्रवाहाला नवकथा या बिरुदाखाली नवा साज चढवला होता, तर त्याच वेळी शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या शिलेदारांच्या जोडीनं द. मां.नी ग्रामीण कथालेखनाच्या क्षेत्रात मुशाफिरी सुरू केली. त्यातही द. मां.नी वाट चोखाळली ती विनोदाची. 'सत्यकथे'ने या नवलेखकांच्या नव्या, ताज्या झुळुकीसारख्या कथांना उदार आश्रय दिला आणि मराठी वाचकांनीही या वेगळ्या, दर्जेदार विनोदी कथांना जोरदार दाद दिली. तिथून द. मा. मिरासदारांची घोडदौड सुरू झाली ती झालीच. 'माझ्या बापाची पेंड'सारख्या कथेनं मराठी वाचकांना तुफान हसवलं. वास्तविक, ग्रामीण जीवनात या गमतीजमती आधीपासून घडतच होत्या. ग्रामीण भागातल्या एक से एक इरसाल, बेरकी नमुन्यांची कमतरता त्याआधीही मुळीच नव्हती. फक्त त्यांना शब्दरूपात बद्ध करून साहित्यात आणण्याचा मान मिळविला तो द. मां.नीच.
पंढरपुरातल्या कथेकरीबुवांचा, कीर्तनकार मंडळींचा प्रभाव द. मां.वर होता. ग्रामीण भागातील देवभोळ्या जनतेला तासन् तास देवादिकांच्या गोष्टींमध्ये रमवून, त्यांची चार घटका करमणूक करण्याची विलक्षण हातोटी या मंडळींमध्ये होती. द. मां.नी त्यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं होतं. त्यामुळं कथा लिहिताना ती कथाकथनाच्या दृष्टीने कशी रंजक असेल, याची खात्री ते करत असत. किंबहुना आपोआपच तशी रंजक गोष्ट त्यांच्याकडून लिहिली जात असे. पूर्वी गावांकडं करमणुकीचं एकमेव साधन म्हणजे गावातला पार. सांजच्याला या पारावर गावातली अठरापगड लोक जमत आणि तंबाखूच्या चंचीची किंवा विड्यांच्या बंडलांची देवाणघेवाण करीत त्यांच्यात गावगप्पा रंगत. यात एक कुणी तरी गमतीच्या गोष्टी सांगणारा तरबेज गडी असे आणि बाकी सगळे त्याच्या मज्जेमज्जेच्या कहाण्या ऐकत असत आणि दोन घटका जिवाची करमणूक करत असत. मराठी साहित्याच्या पारावर द. मा. अशा मज्जेमज्जेच्या कहाण्या सांगणारे तरबेज गडी झाले आणि समस्त मराठी जनता आपापल्या टोप्या-पागोटी सावरत, त्यांच्या गोष्टी ऐकून ऐकून हसत-खिदळत बसली. द. मां.चं मोठेपण हे, की त्यांनी केवळ चहाटळ किंवा उगाच चावटपणाच्या गोष्टी सांगून लोकांना हसवलं नाही. 'नव्व्याण्णवबादची एक सफर'मधल्या नाना घोडकेसारख्या अतिरंजित कथा त्यांनी स्वतः कधीच सांगितल्या नाहीत. उलट नानाच्या कहाणीतला करुण झरा त्यांच्याच हृदयातून पाझरत होता, याची जाण मराठी रसिकांनाही होती.
मराठी माणसाच्या स्वभावाची नेमकी नस द. मां. ना ठाऊक होती. शिक्षक म्हणून काम करताना ते बारकाईने समाज न्याहाळत होते. त्यामुळंच त्यांच्या गोष्टींत शिक्षक, शाळा, विद्यार्थी भरपूर येतात. 'व्यंकूची शिकवणी'सारखी धमाल विनोदी कथा त्यांना सुचली यामागं त्यांचा हा पेशाच असणार, यात नवल नाही. शिवाजीचे हस्ताक्षर, ड्रॉइंग मास्तरांचा तास, शाळेतील समारंभ अशा अनेक गोष्टी शाळेतील गमतीजमती सांगणाऱ्या होत्या. याशिवाय द. मां.नी भोकरवाडी नावाच्या काल्पनिक गावाची निर्मिती करून विनोदाचा मोठा मळाच फुलविला. पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यासारखं हे छोटं गाव. तिथले गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, नाना चेंगट, सुताराची आनशी ही आणि अशी कित्येक काल्पनिक पात्रं द. मां.नी केवळ जन्माला घातली नाहीत, तर त्यांच्या विविध कथांमधून ती अजरामर केली. मराठी विनोदी साहित्याचा इतिहास लिहिताना द. मां.च्या भोकरवाडीच्या गोष्टींचा उल्लेख अगदी अपरिहार्य असेल. गावाकडचे एक से एक इरसाल नग, एकेक नमुने त्यांनी अशा काही अस्सल आणि धमाल शैलीत उभे केले, की आजूबाजूला रोजच अशी माणसं पाहणाऱ्यांना आपल्यासारख्या वाचकांना ती वर्णनं वाचून हसून हसून पुरेवाट होत असे. नदीकाठचा प्रकार, निरोप किंवा साक्षीदार या कथांतून तर त्यांनी अगदी साध्या, नित्य व्यवहारातल्या घटनांतील दंभ उलगडून हास्याचे असे फवारे उडविले आहेत, की चकित व्हायला होते. ग्रामीण महाराष्ट्राचं त्यांचं निरीक्षण, आकलन आणि समज केवढी होती, याचा प्रत्यय या कथांमधून येत राहतो.
द. मां.चे महाराष्ट्रावर सर्वांत मोठे उपकार हे, की ते केवळ या कथा लिहून थांबले नाहीत. त्यांनी या कथा महाराष्ट्राला वाचून, सादर करून दाखवल्या. शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकरांबरोबर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि सर्वत्र हास्याचं सदासतेज सिंचन केलं. मी स्वतः लहानपणी त्यांच्या या कथाकथनाचा आस्वाद घेतला आहे. संपूर्ण सभागृह कसं हास्यकल्लोळात बुडून जात असे, हे मीही अनुभवलं आहे. ब्रिटिश समाजाबाबत असं म्हटलं जातं, की स्वतःवर विनोद करून हसायला त्या समाजाला चांगलं जमतं. अशा समाजाचं मानसिक आरोग्य उत्तम आहे, असं मानलं जातं. महाराष्ट्राबाबत विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तरी असंच निश्चितपणे म्हणता येतं. गडकरी-कोल्हटकर-चिं. वि. जोशी यांच्यापासून सुरू झालेली विनोदाची परंपरा अत्रे-पु. लं.नी पुढं नेली. त्याच विनोदाच्या दिंडीचे द. मा. हे महत्त्वाचे मानकरी होते. आपल्याच जगण्याचा आरसा दाखवणाऱ्या कथांवर हसण्याइतका, त्यातलं व्यंग्य समजण्याइतका आणि विसंगती जाणण्याइतका तेव्हाचा समाजही समंजस आणि पोक्त होता, हे द. मां.सारख्या लेखकांचं भाग्यच म्हणावं लागेल. त्यांच्या निर्मळ, निखळ विनोदानं मराठी समाजाची विनोदबुद्धी तजेलदार आणि टवटवीत ठेवली. आपल्यावरच हसण्याचं गमतीदार व शहाणं सुख द. मां.च्या कथांनी आपल्याला मिळवून दिलं, याबद्दल मराठी समाजानं द. मा. व सर्वच विनोदी लेखकांप्रति कायमचं कृतज्ञ असलं पाहिजे.
द. मा. मिरासदारांनी चित्रपट क्षेत्रातही कर्तृत्व गाजवलं. अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवाद त्यांनी लिहिले. 'एक डाव भुताचा' हा त्यातला सर्वांत लोकप्रिय व गाजलेला चित्रपट. त्यातल्या हेडमास्तराची भूमिकाही द. मां.नी ठसक्यात केली होती. द. मा. राजकीय विचारसरणीने पक्के उजवे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. युती सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारानं त्यांच्या परळी वैजनाथ या गावी १९९८ या वर्षी भरलेल्या ७१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. याच सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेलं एक पदही देण्यात आलं होतं. असं असलं, तरी द. मा. राजकीयदृष्ट्या अतिआक्रमक नव्हते. आपली राजकीय विचारसरणी त्यांनी कधी लपविलीही नाही आणि किळस वाटेल अशा पद्धतीनं मिरवलीही नाही. त्यांचं कथेकरी बुवांचं रूपच मराठी साहित्यरसिकाला भावलं आणि त्यांनाही तेच अधिक आवडत असणार, यात शंका नाही. पंढरपूरचा रहिवास असलेल्या द. मां.ना मराठी विनोदाचे कथेकरीबुवा म्हणायला हरकत नाही. त्यांचं हे सोज्वळ रूप आता पुन्हा कधीच दिसणार नाही, याची खंतही वाटते आणि दुसरीकडं त्यांची ही विनोदी पुस्तकं कायम आपल्या सोबत असतील या विचारानं हलकेच हसूही येतं. मराठी माणूस हसलेला द. मां.ना आवडत असे. तेव्हा हे हसू चेहऱ्यावर ठेवूनच द. मां.चं सतत स्मरण करायला हवं.
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, १० ऑक्टोबर २०२१)
---
मस्तच..🙏👌
ReplyDeleteधन्यवाद! कृपया आपले नाव लिहा...
Deleteखुप छान...
ReplyDeleteधन्यवाद... कृपया आपले नाव लिहा...
Deleteखूप छान झालाय लेख.
ReplyDeleteद.मां.ना 🙏
-गौरी शेटे
धन्यवाद गौरी 🙂
Deleteव्यापक पट डोळ्यासमोर उभा केलास लेखाच्या निमित्ताने....
ReplyDeleteकथेकरी बुवा ही उपाधी अगदी तंतोतंत!!
छान...
धन्यवाद. कृपया आपले नाव लिहा...
Deleteजयश्री
ReplyDeleteपूर्वी कुठलाही ताण आला व द.मा यांच्या कथा वाचल्या की मूड एकदम मस्त व्हायचा ..त्यांच्याबद्दल व त्यांच्या कथांबद्दल किती योग्य शब्दात तुम्ही छान वर्णन केलयत ..त्यांची पुस्तके परत एकदा त्यामुळे वाचवीशी वाटू लागली आहेत ..तुमच्या लेखणीत कमालीची जादू आहे ..अभिनंदन व खूप खुप धन्यवाद ...👌👌💐👍😊
ReplyDelete