22 May 2022

बंगलोर-म्हैसूर डायरी - २

हिरवाईत...
-------------



सकाळी साडेसहा-पावणेसातच्या सुमारास बंगलोर विमानतळावरून निघालेली आमची कार साधारण एकच्या सुमारास म्हैसूर शहरात शिरली, तेव्हाच त्या शहराच्या सौंदर्यानं माझी नजर खेचून घेतली. म्हैसूर शहर भारतातील स्वच्छ शहरांमधील एक अव्वल शहर आहे. गेल्या काही वर्षांत इंदूर व म्हैसूर या दोन्ही शहरांनी ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत बाजी मारली आहे. म्हैसूरमध्ये प्रवेश केल्या केल्या चटकन जाणवणारी गोष्ट म्हणजे तिथली हिरवाई आणि शांतता...
म्हैसूरची लोकसंख्या साधारण १२ लाख आहे. म्हणजे १९९० च्या आसपास पुणे शहर जसं होतं तसं आत्ताचं म्हैसूर आहे. गर्द दाट झाडीने झाकलेले रस्ते, टुमदार बंगले, आखीवरेखीव कॉलन्या, ब्रिटिशकालीन वास्तू आणि फुलझाडांची कुंपणं... म्हैसूरच्या अनेक भागांत फिरताना कोरेगाव पार्क, औंध, प्रभात रोड, भांडारकर रोड या आणि अशा परिसराची सतत आठवण येत होती. शिवाय सर्वत्र लक्षात येणारी स्वच्छता होती. प्रथमदर्शनीच मला हे शहर आवडलं आणि इथं आपण आधीच यायला हवं होतं, असंही नेहमीप्रमाणं वाटून गेलं.
म्हैसूर शहराच्या मध्यभागात असलेल्या आमच्या हॉटेलमध्ये आम्ही साधारण एक वाजता पोचलो. थोडं फ्रेश होऊन हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्येच जेवलो. त्यानंतर जरा विश्रांती घेतली. आदल्या दिवशी झोप अशी झालीच नव्हती. त्यात मला चालत्या वाहनात अजिबात झोप येत नाही - मग ती बैलगाडी असो वा विमान! त्यामुळं आता झोपेची नितांत आवश्यकता होती. दोन तास झोप मिळाली. साडेतीन वाजता वृंदावन गार्डनकडे जायला निघू, असं रामूनं आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळं झोप आवरती घेत आम्ही बरोबर वेळेवर तयार झालो. जाताना मस्त ढगाळ वातावरण होतं. चहाची तल्लफ आली. रामूला तसं सांगितलं. त्यानं शहराबाहेर पडल्यावर एका तिठ्यावर छोट्याशा टी-स्टॉलवर गाडी थांबविली. मला अशी ही टपरीवजा हॉटेलं फार आवडतात. नंदिनी टी स्टॉलवर आम्ही झकास चहा घेतला. आम्ही तिथे फोटो काढत होतो, तर रामूनं स्वत:हून ‘मी तुमचे फोटो काढतो’ असं सांगून आमचे फोटो काढले. थोड्या वेळानं लगेच पुढं निघालो. वृंदावन गार्डनकडं जाणारा हा रस्ताही भन्नाट आहे. दोन्ही बाजूंनी हिरवीगार भातशेती, नारळाची झाडं आणि छोटी छोटी घरं... 

वृंदावन गार्डनविषयी मी फार लहानपणापासून ऐकत आलो होतो. सत्तरच्या दशकात बहुतेक हिंदी फिल्म्समधलं एक तरी ड्रीम साँग या लोकेशनवर चित्रित झालेलं असायचं. विशेषत: साउथचा निर्माता असेल तर नक्कीच! पूर्वी मध्यमवर्गीयांत काश्मीरप्रमाणेच म्हैसूर-उटी हाही एक लोकप्रिय स्पॉट होताच. विशेषत: हनीमूनसाठी! आता  वृंदावन गार्डनसारखी बरीच उद्यानं देशभर झाली असल्यानं त्याचं फार आकर्षण राहिलेलं नाही; हे उद्यानही पूर्वीसारखं राहिलेलं नाही, हेही मी ऐकून होतो. तरी मी पहिल्यांदाच ते बघणार होतो त्यामुळं उत्सुकता होतीच. कावेरी नदीवर कृष्णराजसागर हे एक मोठं व जुनं धरण आहे. या धरणाच्या भिंतीलगत हे विस्तीर्ण उद्यान वसवण्यात आलं आहे. (ही सर्वांत महत्त्वाची माहिती नेहमीप्रमाणे तिथं जाऊन आलेल्या कुणीही, कधीही यापूर्वी मला दिली नव्हती, हे सांगायला नकोच!) म्हैसूरच्या वडियार राजघराण्यातील कृष्णराजांचे नाव या धरणाला देण्यात आलं आहं. या महाराजांचा अर्धपुतळाही उद्यानात आहे. उद्यान फार ग्रेट नसलं, तरी अगदी टाकाऊही नाही. तिथं त्या पाण्यामुळं, सुंदर फुलांमुळं, हिरवाईमुळं आणि जिकडं-तिकडं सुरू असलेल्या कारंज्यांमुळं प्रसन्न वाटत होतं. गर्दीही भरपूर होती. आम्ही तिथं भरपूर फोटो काढले. वर धरणाच्या भिंतीपर्यंत गेलो. तिथं कावेरीदेवीची मूर्ती धरणाच्या दगडी भिंतीत कोरली होती. समोर एक सुंदर कारंजं होतं. समोरच एक मोठं हॉटेलही होतं. या उद्यानाचे दोन भाग आहेत. दुसऱ्या भागात सायंकाळी सातनंतर (किंवा अंधार पडल्यावर) म्युझिकल फाउंटन सुरू होतं, असं ऐकलं. मध्ये धरणाच्या सांडव्याचं पाणी आहे. तिथे बोटिंग होतं. सहापर्यंत राउंड ट्रिप आणि नंतर फक्त पलीकडच्या उद्यानापर्यंत सोडणार, अशी व्यवस्था होती. आम्ही राउंड ट्रिप घेतली आणि नंतर चालत त्या दुसऱ्या भागात गेलो. थोड्या वेळानं अंधार झाल्यावर धरणाची भिंत विविधरंगी दिव्यांनी उजळली. समोरचं उद्यानही झगमगू लागलं. अचानक लोकांचा लोंढा वाढला. संगीत कारंज्याचं बरंच आकर्षण दिसत होतं. आम्हीही बरंच चालत त्या कारंज्यापर्यंत गेलो. सातला पाच कमी असतानाच ते सुरू झालं. सभोवताली प्रचंड गर्दी होती. कुठल्याशा कन्नड गाण्यावर ते कारंजं सुरू झालं. ते काही फार ग्रेट नव्हतं. आपल्याकडं पुण्यात गणपतीसमोरही अनेकदा अशी कारंजी करतात. मात्र, लोकांना भलताच उत्साह होता. गर्दीचे लोटच्या लोट त्या कारंज्याकडं येत होते. आम्हाला उलटं परत जाताना त्रास झाला एवढे लोंढे त्या रस्त्यानं कारंज्याच्या बाजूला निघाले होते. आम्ही लवकर निघालो, ते बरंच झालं, कारण पावसाचे थेंब यायला सुरुवात झाली होती. रामूला शोधून काढलं आणि आम्ही पुन्हा म्हैसूरकडं निघालो. कावेरीचं विस्तीर्ण पात्र ओलांडून आमची गाडी म्हैसूरकडं निघाली तेव्हा रामूनं आमचं आधीचं बोलणं ऐकून, मसाले घ्यायला एके ठिकाणी गाडी थांबविली. मात्र, आम्हाला अजिबात खाली उतरून खरेदी करायचा उत्साह नव्हता. त्यामुळं तसं सांगताच रामूनं नाइलाजानं गाडी पुढं काढली. तो जरा नाराज झाल्याचं आम्हाला जाणवलंच. आमच्या हॉटेलच्या शेजारीच एक आशीर्वाद नावाचं रेस्टॉरंट होतं. तिथं डिनर केलं. रामूनं पुन्हा हॉटेलवर सोडलं. खरं तर तिथून आमचं हॉटेल चालत पाच मिनिटांवर होतं; पण पाऊस येईल व आम्ही भिजू, म्हणून तो आमचं जेवण होईपर्यंत तिथं थांबला. आम्हाला हॉटेलमध्ये सोडून मगच घरी गेला.

दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये काँटिनेंटल ब्रेकफास्ट करून आम्ही सकाळी चामुंडी हिल्सवरील चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनाला गेलो. म्हैसूरच्या थोडं बाहेर पडल्यावर एका डोंगरावर हे मंदिर आहे. सिंहगडावर किंवा पन्हाळ्यावर जात असल्याचा भास झाला. अर्थात हा डोंगर एवढा उंच नव्हता. इथं मात्र रामूनं आम्हाला वेगळीकडंच उतरवून जरा लांबून मंदिराकडं जायला लावलं. नेहमीच्या पार्किंगमध्ये फारशी गर्दी नव्हती. तरी त्यानं खाली एका ठिकाणी गाडी उभी करून तिथून पायऱ्या चढून वर जा, असं सांगितलं. सकाळची वेळ होती आणि आम्हालाही उत्साह होता. म्हणून आम्ही त्या पायऱ्या चढून त्या गावातून मंदिराकडं गेलो. योगायोगानं देवीची पालखी त्याच वेळी बाहेर मिरवत आली होती व तिचं दर्शन घ्यायला एकच झुंबड उडाली होती. आम्हालाही अगदी विनासायास व आयतं दर्शन झालं. त्यामुळं आम्ही रांगेतून मंदिराच्या आत गेलो नाही. त्या परिसरात थोडं फिरलो. इथंच तो महिषासुराचा पुतळा आहे, हे माहिती होतं. मग जरा शोधल्यावर तो सापडला. तिथला एका मोठा नंदीही प्रसिद्ध आहे. मात्र, तिकडं जायचा रस्ता बंद होता. त्यामुळं तो नंदी काही बघता आला नाही. चामुंडेश्वरीनं महिषासुराचा वध इथं केला, म्हणूनच या ठिकाणाला म्हैसूर असं नाव पडल्याची आख्यायिका आहे. ही चामुंडेश्वरी म्हणजे म्हैसूरचं ग्रामदैवत अशीच आहे. दसऱ्याला इथं जी शाही मिरवणूक निघते, त्यात हत्तीवरील अंबारीत पूर्वी राजे बसायचे. आता चामुंडेश्वरीची मूर्ती ठेवून मिरवणूक निघते, असं सांगण्यात आलं. (नंतर पॅलेसमध्ये ती अंबारी व देवीची मूर्ती बघायला मिळालीच.)
चामुंडी हिल्सवरून निघाल्यावर खाली पायथ्याशी आल्यावर कॉफीसाठी सँड म्युझियमजवळ थांबलो. इथं एका आर्किटेक्ट मुलीनं वाळूत अनेक शिल्पं कोरून हे संग्रहालय तयार केलंय. तिथं शेजारच्या टपरीवर एका काकूंकडं झकास कॉफी घेतली. तिथंच शेजारी रामूच्या ओळखीनं साड्यांची खरेदी झाली. तिथला मुस्लिम विक्रेता तरुण अतिशय हुशार व चतुर होता. आम्ही त्याच्या संयमाचा अंत बघत होतो; पण त्यानं न कंटाळता आम्हाला भरपूर साड्या दाखवल्या. परिणामी दोनच्या जागी तीन साड्यांची खरेदी झाली व आम्ही ते दुकान सोडलं.
जेवणाची वेळ झाली होती आणि आम्हाला म्हैसूरमधला फेमस ‘मायलारी’ डोसा खायचा होता. रामूनं अगदी जुन्या गावभागात असलेल्या एका छोट्याशा हॉटेलसमोर गाडी थांबविली. ‘हेच ओरिजनल मायलारी डोशाचं हॉटेल आहे,’ असं त्यानं सांगितल्यावर आम्ही त्या कळकट हॉटेलात शिरलो. तिथं एकही ग्राहक नव्हता. दोन मध्यमवयीन पुरुष व एक-दोन महिला ग्राहकांसाठीच्या बाकावर बसले होते. आम्ही जरा बुचकळ्यातच पडलो होतो. आपल्याकडं अशी रिकामी हॉटेलं बघायची सवय नाही. शेवटी आम्ही तिघांना तीन डोशांची ऑर्डर दिली. एक डोसा ४० रुपयांना! डोसा व चटणी समोर आली आणि तो डोसा बघूनच तोंडाला पाणी सुटलं. अतिशय कुरकुरीत, पण तरी मऊ लागणारा तो डोसा केव्हा घशाखाली उतरला हे कळलंही नाही. दुसऱ्या डोशाची ऑर्डर देणं भागच होतं. पहिल्यांदा साधा डोसा मागवला होता, म्हणून दुसऱ्या वेळी मसाला डोसा मागवला. आपल्याकडं जशी बटाट्याची भाजी भरून देतात, तसं तिथं नाही. मसाला डोसा म्हणजे आत एक वेगळी, जरा तिखट चटणी असते. दोन-दोन डोसे खाऊन आम्ही उठलो, तेव्हा मन तृप्त झालं होतं. 

इथून आता म्हैसूरच्या जगप्रसिद्ध झूमध्ये आम्ही जाणार होतो. ‘श्री चामराजेंद्र बोटॅनिकल गार्डन अँड झू’ हे त्याचं अधिकृत नाव. इथंही भरपूर गर्दी होती. पायी चालणं शक्य नव्हतं, कारण झू खूप मोठं होतं. अखेर आम्ही बॅटरी ऑपरेटेड गाड्यांना नंबर लावला व अशा एका गाडीतून फिरलो. वाघ, सिंह दुपारचे झोपले होते, त्यामुळं जरा निराशा झाली. पण पाणघोडा, आफ्रिकन हत्ती, जिराफ आणि गेंडे बघून मजा आली. इथं गार्डनच्या समोरच चारचाकी गाड्यांना पार्किंगसाठी जरा मोकळी जागा दिली आहे. हा शहराचा जुना व मध्यवर्ती भाग वाटला. त्यामुळं जरा धूळ व अस्वच्छताही जाणवली. पण एक चांगली गोष्ट केली होती, ती म्हणजे बाहेर पडण्यासाठी अंडरग्राउंड बोगदा केला होता व तो रस्त्याच्या पलीकडं थेट पार्किंगमध्ये निघत होता. त्यामुळं मुख्य रस्त्यावर होणारी गर्दी आपोआप टळली होती. हैदराबादचं राजीव गांधी झू यापूर्वी बघितलं होतं. ते मला अधिक आवडलं. तिथं एक छोटी ट्रेनही आहे. 

झू बघून झाल्यावर आता शेवटचा टप्पा रॉयल म्हैसूर पॅलेस हाच होता. म्हैसूरमधील सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे हा पॅलेस. वडियार राजांच्या या पॅलेसविषयी, इथल्या दसरा महोत्सवाविषयी, काही वर्षांपूर्वी इथल्या तरुण राजाच्या लग्नसोहळ्याविषयी भरपूर वाचलं होतं. त्यामुळं उत्सुकता होती. संध्याकाळो रोषणाई केल्यानंतर हा पॅलेस अप्रतिम दिसतो. आम्हाला मात्र तो दुपारीच बघायचा होता. पॅलेसचं रूपांतर सध्या संग्रहालयात झालेलं आहे. तिथं भरपूर गर्दी होती. चपला, बूट काढूनच आत जावं लागत होतं. कारण विचारलं, तर आत देवीचं मंदिर आहे, असं तिथल्या सुरक्षारक्षकानं सांगितलं. पॅलेस सगळा फिरून बघायला एक तास लागला. हा राजमहाल केवळ अद्वितीय असाच आहे, यात वाद नाही. तिथंच ती राजाची अंबारी व चामुंडेश्वरीची मूर्तीही बघायला मिळाली. दुसऱ्या मजल्यावरचे कोरीव खांब व छतावरची कारागिरी स्तिमित करणारी होती. हे सगळं बघून बाहेर आलो, तेव्हा भरपूर दमायला झालं होतं. पॅलेसच्या मागील बाजूसच राजांचे आत्ताचे कुटुंबीय राहतात. शेजारी परत येताना वाटेत आइस्क्रीमची व इतर भेटवस्तू आदी विक्रीची दुकानं लागली. आम्हाला मात्र चहा प्यायचा होता. शेवटी बाहेर आलो आणि रामूला तसं सांगितलं. रामूला आम्हाला मसाले खरेदीसाठी पुन्हा कालच्याच ठिकाणी न्यायचं होतं. (त्याचं तिथं कमिशन असणार हे दिसतच होतं.) शेवटी गावातल्या एका छोट्या हॉटेलपाशी आम्ही थांबलो. खूप भूकही लागली होती, मग गरमागरम तट्टे इडली खाल्ली आणि चहा घेतला. त्यामुळं एकदम तरतरी आली. म्हैसूरमधली ही जागोजागी असलेली छोटी हॉटेलं मला जास्त भावली. अर्थात आमच्याकडं लोकल ड्रायव्हर कम् गाइड रामूच्या रूपानं होता हेही खरं. एरवी कुठल्या हॉटेलात जायचं हे पटकन काही आपल्याला ठरवता येत नाही. 
रामूनं पुन्हा वृंदावन गार्डनच्या दिशेनं गाडी हाणली. मला म्हैसूर विद्यापीठ बघायची इच्छा होती, असं मी एकदा बोलून गेलो होतो. त्यामुळं त्यानं आत्ता आवर्जून गाडी तिकडून घेतली आणि म्हैसूर विद्यापीठ बाहेरून का होईना, दाखवलं. मला वाटलं होतं, तशी म्हैसूरमधल्या इतर इमारतींसाठी ही दगडी, जुनी, झाडीत लपलेली ब्रिटिशकालीन इमारत नव्हती, तर रस्त्याच्या अगदी कडेला असलेली आधुनिक चार-पाच मजली पण लांबलचक इमारत होती. ती बघून माझा थोडा अपेक्षाभंगच झाला. याचं कारण तिथल्या पोलिस कमिशनरचं कार्यालय आम्ही सकाळीच बघितलं होतं, ते याच्यापेक्षा किती तरी शैलीदार व भव्य होतं. मसाल्याच्या दुकानामागं एक आयुर्वेदिक झाडांचं उद्यान होतं. आम्ही तिथल्या गाइड मुलीसोबत चक्कर मारली. पण एकूण प्रकार लक्षात आला. अत्यंत महागाची आयुर्वेदिक औषधं तिनं आम्हाला दाखवायला सुरुवात केली. आम्ही शेवटी आम्हाला जे मसाले घ्यायचे होते, ते घेऊनच बाहेर पडलो. रामूनं आम्हाला हॉटेलवर सोडलं. थोडं आवरून कालच्याच रेस्टॉरंटमध्ये जायचा आमचा विचार होता. पण खाली आलो तर चांगलाच पाऊस सुरू झाला होता. मग हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये जेवलो. रात्री बराच वेळ पावसाचा आवाज येत राहिला...
म्हैसूरमधला दुसरा दिवस असा धावपळीत संपला. तरी तिथलं प्रसिद्ध फिलोमिना चर्च बघायचं राहिलं होतं. तसं रामूला सांगताच उद्या बंगलोरकडं जाताना ते दाखवतो, असं प्रॉमिस त्यानं केलं. तिसऱ्या दिवशी म्हणजे १२ मे रोजी, गुरुवारी सकाळी आम्ही हॉटेल सोडलं आणि बाहेर पडलो. रामूनं प्रॉमिस केल्याप्रमाणं फिलोमिना चर्च दाखवलं. हे चर्च खरोखर भव्य आहे. न्यूयॉर्क येथील सेंट पॅट्रिक चर्च या जगातल्या एका सर्वांत भव्य चर्चप्रमाणे फिलोमिना चर्च बांधलं आहे. फिकट निळसर रंगात रंगवलेलं हे चर्च अत्यंत स्वच्छ आणि देखणं आहे. आम्ही आत गेलो. अगदी तळघरात जाऊन फिलोमिनाचं ‘दर्शन’ही घेतलं. तिथं अजिबात फार गर्दी नव्हती. एकूणच शांत आणि प्रसन्न वाटलं. अर्थात आम्हाला फार वेळ नव्हता, म्हणून फोटोसेशन झालं की लगेच आम्ही बाहेर पडलो. ब्रेकफास्ट हॉटेलमध्येच झाला होता. त्यामुळं आता सुसाट बंगलोरकडं निघालो. म्हैसूर सोडलं आणि पाऊस सुरू झाला. कालही आमचं साइट सीइंग झाल्यावरच पाऊस सुरू झाला होता आणि आत्ताही गाडीत बसल्यावर पाऊस लागला होता. येताना फारसं कुठं थांबलो नाही. रामनगरमध्ये मोठी हनुमानाची मूर्ती दिसली. ती येताना दिसली नव्हती. 
आम्ही बरोबर एक वाजता बंगलोरमध्ये पोचलो. अगदी शहराच्या मध्यवस्तीत एम. जी. रोडच्या जवळ मणिपाल सेंटरमध्ये आमचं हॉटेल होतं. त्या दिवशी आम्हाला लंच किंवा डिनर यापैकी एक काही तरी हॉटेलमध्ये घेता येणार होतं. आम्ही लंच करायचं ठरवलं. तिथं पाणीपुरीचा स्टॉल होता. भर दुपारच्या जेवणात आम्ही ती झकास पाणीपुरीची प्लेट हाणली. बाकी जेवण उत्तमच होतं. 

जेवल्यानंतर दुपारी विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल म्युझियम पाहायला गेलो. हे म्युझियम चांगलंच आहे. पण लहान मुलांना तिथं जास्त मजा येत असावी, असं वाटलं. शहराच्या अगदी मध्यवस्तीत हे म्युझियम आहे. बाहेर रेल्वे इंजिन व विमानाच्या प्रतिकृती होत्या. शेजारीच लाल रंगाची शासकीय संग्रहालयाची आकर्षक इमारत होती. पण ते बघण्याएवढा वेळ नव्हता. तिथून आम्ही गेलो ते थेट विधानसौध इमारतीकडं... ही भव्य इमारत पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. ‘गव्हर्न्मेंट वर्क इज गॉड्स वर्क’ असं त्या इमारतीवर लिहिलेलं बघून डोळ्यांत पाणीही आलं. या इमारतीच्या समोरच कर्नाटक उच्च न्यायालयाची इमारत आहे. संध्याकाळची वेळ होती. गार वारा सुटला होता. त्या भल्यामोठ्या फूटपाथवर रेंगाळायला छान वाटत होतं. बरेच फोटो काढून झाले. नंतर रामूनं आम्हाला कब्बन पार्कमधून चक्कर मारली. लालबाग पूर्वी एकदा पाहिली होती. त्यामुळं तिकडं गेलो नाही. संध्याकाळी लवकरच हॉटेलला परतलो. रात्री बंगलोरमध्ये स्थायिक झालेल्या मित्रासोबत डिनरचा बेत होता. ती फॅमिली आली आणि नेमका पावसाचा धिंगाणा सुरू झाला. त्यांच्या कारमध्ये बसून एके ठिकाणी गेलो. गार्डन रेस्टॉरंटचा पर्याय बादच होता. पण ते हॉटेल चांगलं, कोझी होतं. तिथं झकास जेवण व गप्पा झाल्या. तिथून निघताना मला ‘एमटीआर’ची आठवण आली. सहज जाऊन बघू या म्हणून मित्रानं तिकडं गाडी घेतली. पण ते बंद झालं होतं. त्यामुळं तिथली फेमस कॉफी घ्यायची राहून गेली. नंतर त्यानं आम्हाला हॉटेलला सोडलं.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे आमच्या ट्रिपच्या शेवटच्या दिवशी सकाळी आम्ही कुठलाही कार्यक्रम ठेवला नव्हता. आम्हाला तीन वाजता एअरपोर्ट गाठायचं होतं. म्हणून सकाळी आम्ही (आधी ठरवल्याप्रमाणे) तिथली मैत्रीण मानसी होळेहुन्नूरच्या घरी गेलो. तिनं मस्त स्थानिक फ्लेवर असलेला रुचकर बेत केला होता. पोटभर जेवण व गावभर गप्पा झाल्या. तिचा मुलगा लहान असला, तरी नीलची व त्याची लगेच गट्टी जमली. अर्थात फ्लाइटची वेळ होत आल्यानं आम्हाला गप्पा आवरत्या घेणं भाग होतं. एक फोटोसेशन पार पडलं व आम्ही बंगलोरचा निरोप घेतला. रामूनं आम्हाला बरोबर अडीच वाजता एअरपोर्टला सोडलं. बंगलोरचं ट्रॅफिक गृहीत धरून आम्ही लवकर निघालो होतो. त्या मानानं फार ट्रॅफिक न लागल्यानं आम्ही लवकर पोचलो. त्या दिवशी संध्याकाळी वादळी वारे व पावसाचा अंदाज होता, म्हणूनही मला जरा चिंता होती. मात्र, तसं काही झालं नाही. छान सूर्यप्रकाश होता. फ्लाइटही वेळेत निघाली. बरोबर साडेसहाला पुण्यात लँड झालो. नेहमीप्रमाणे ‘ओला’ मिळायला मारामार झाली. अखेर मिळाली. बंगलोरहून पुण्याला यायला जेवढा वेळ लागला, तेवढाच वेळ एअरपोर्टवरून घरी जायला लागला. साडेआठला घराला पाय लागले आणि हुश्श केलं...
चार दिवसांची छोटीशी ट्रिप सुफळ संपूर्ण झाली होती. आम्हाला अगदी हवा असणारा ‘ब्रेक’ या ट्रिपनं मिळवून दिला होता. त्यामुळं आम्ही रिचार्ज होऊन पुन्हा रुटीनला जुंपून घेण्यासाठी सज्ज झालो होतो... चार दिवसांत तिथं काढलेले भरपूर फोटो मात्र कायम रिचार्ज करत राहतील हे नक्की... आणि या आठवणी ब्लॉगरूपात शब्दबद्ध झाल्यानं ही ट्रिपही कायमची मनात कोरली गेली तो फायदा वेगळाच! इति!!

(उत्तरार्ध)

---

20 May 2022

बंगलोर-म्हैसूर डायरी - १

दक्षिणेकडे स्वारी
---------------------


नीलची बारावी परीक्षा संपल्यावर आम्हाला कुठे तरी छोटीशी ट्रिप करायची होती. अखेर बंगलोर-म्हैसूरला जायचं ठरलं आणि १० ते १३ मे अशी चार दिवसांची ही ट्रिप गेल्या आठवड्यात झालीही. या ट्रिपची थोडी पार्श्वभूमी सांगायची तर करोनाचा उल्लेख अपरिहार्य आहे. नीलची दहावी संपल्यावर, अर्थात एप्रिल २०२० मध्ये परदेशात (म्हणजे लंडन व पॅरिस या दोन आवडत्या शहरांत) ट्रिप काढायचा महत्त्वांकाक्षी प्लॅन आम्ही आखला होता. टिपिकल नोकरदार, मध्यमवर्गीय माणसासाठी युरोपची सहल हे एक स्वप्न असतेच. बऱ्याचदा ती पंचवार्षिक योजनाही असते. बरीच आधीपासून तयारी वगैरे. हे सगळं करून आम्ही पुण्यातल्या एका पर्यटन संस्थेत पैसेही भरले. पुढे लॉकडाउन सुरू झाला आणि सगळंच राहिलं. आमची ही महत्त्वाकांक्षी ट्रिप अर्थात बारगळली. पैसे वाया गेले. सुदैवानं सगळे पैसे भरले नव्हते. पण जे भरले होते, तेही मध्यमवर्गीयांसाठी जास्तच होते. व्हिसा वगैरे झालेले असल्यानं त्यातलेही निम्मे पैसे वाया गेले आणि निम्म्या रकमेची क्रेडिट नोट मिळाली. ती २०२१ अखेर वापरता येणार होती. मात्र, नीलची बारावी असल्यानं आम्ही ती २०२२ च्या अखेरपर्यंत वाढवून घेतली आणि अखेर त्याची परीक्षा संपल्यावर ही ट्रिप आखली. त्यातही जनरीतीप्रमाणं मे महिन्यात सगळे उत्तरेकडे जातात, तसं आम्हीही नैनिताल, मसुरी वगैरे ठरवत होतो. मात्र, नेहमी आमच्यासोबत येणारा माझा आत्येभाऊ व त्याच्या कुटुंबाला यायला जमणार नाही, असं कळलं. मग सात-आठ दिवसांची मोठी ट्रिप कॅन्सल करून छोटी ट्रिप करावी, असं ठरलं. धनश्री पूर्वी म्हैसूरला गेली होती. बंगलोरला मीही यापूर्वी गेलो होतो. मात्र, सर्व शक्यता लक्षात घेऊन चार दिवसांत याच दोन शहरांत फिरणं सहजशक्य आहे, असं लक्षात आलं. त्यामुळं एकेका पर्यायावर फुली मारत अखेर इथं जायचं ठरवलं. संबंधित पर्यटन कंपनीनं विमान तिकिटांपासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित करून दिल्यानं काही प्रश्न नव्हता. विमानानंच जायचं व यायचं हे (फार वेळ हाती नसल्यानं) पक्कं होतं. मग सीझनची महाग तिकिटं काढून शेवटी मंगळवारी पहाटे बंगलोरच्या फ्लाइटमध्ये पाय ठेवला. 
आमची फ्लाइट पहाटे ४.३५ वाजता होती. मला उशिरापर्यंत जागायची सवय असल्यानं मी झोपलोच नाही. पुण्यातून मध्यरात्री कॅब मिळेल, याची खातरी होती. तरीही एक पर्याय म्हणून चुलतभावाला सांगून ठेवलं. पण तशी वेळ आली नाही आणि आम्ही वेळेत म्हणजे अडीच वाजताच विमानतळावर येऊन पोचलो. सुट्ट्यांचा सीझन असल्यानं विमानतळावर गर्दी बरीच होती. पुण्याहून सर्वाधिक फ्लाइट दिल्लीला व त्यापाठोपाठ बंगलोरला असाव्यात. मला तर पूर्वी स्टेशनवरून सुटणाऱ्या पुणे-दादर एशियाड गाड्यांची आठवण आली. अगदी तितक्या फ्रिक्वेंटली नसल्या, तरी बऱ्याच फ्लाइट या दोन शहरांसाठी सुटत असतात. त्यात पुणे व बंगलोर ही दोन आयटी शहरं असल्यानं त्या क्षेत्रांतील लोकांची बरीच ये-जा असते. हे लोक लगेच ओळखू येतात. अर्थात आम्ही निघालो त्या वेळी इतर प्रवासीही भरपूर होते. पुणे-बंगलोर फ्लाइटची अधिकृत वेळ दीड तासांची असली, तरी एक तास पाच मिनिटांतच आपण बंगलोरला पोचतो. तिथला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मुख्य शहरापासून ४० किलोमीटर दूर आहे. आम्ही २००६ मध्ये प्रथम बंगलोरला गेलो होतो, तेव्हा त्या, शहरातल्या जुन्या विमानतळावर उतरलो होतो. नंतर २०१३ मध्ये ऑफिसच्या एका कार्यक्रमासाठी जाणं झालं, तेव्हा हा नवा विमानतळ बघायला मिळाला होता. आत्ताचा विमानतळ अवाढव्य आहेच; शिवाय आता तिथं दुसऱ्या टर्मिनलचं कामही जोरात सुरू असलेलं दिसलं. बरोबर साडेसहाला आम्ही तिथं लँड झालो. विमानातच होतो तोवर आम्हाला न्यायला आलेल्या ड्रायव्हरचा फोन आला. (त्याच्या व्यावसायिकतेची पहिली झलक मिळाली.) एअरपोर्टवर जरा आन्हिकं उरकली आणि बाहेर येऊन आमच्या या ड्रायव्हरला फोनाफोनी करून शोधलं. रामू असं त्याचं नाव. तो मूळ म्हैसूरचाच होता. बहुतेक ट्रॅव्हल्स कार ‘टोयोटा इटियॉस’च्या आहेत. आमची कार पण तीच होती. एसी होताच. आम्ही लगेच म्हैसूरकडं निघालो. बाहेर आल्या आल्या जाणवलं ते ढगाळ हवामान. अगदी सकाळची वेळ असली, तरी भरून आल्यासारखं वातावरण होतं. हे वातावरण आम्ही परत निघेपर्यंत कायम राहिलं. उन्हाचा त्रास होईल ही उरलीसुरली शंकाही दूर झाली. (पुढचे चार दिवस या दोन्ही शहरांत २० ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान तापमान होतं आणि पावसाचाही अनुभव आला...)
बंगलोर शहराला अर्थातच मोठे बायपास रस्ते आहेत. त्यामुळे म्हैसूरकडे जाताना आम्हाला अगदी शहरात जावं लागलं नाही. थोड्या अंतरावरच उजवीकडं तुमकूरकडं जाणारा रस्ता लागला. अर्थात बंगलोर शहर प्रचंड विस्तारलं असल्यानं या बायपास रोडवरही गर्दी होती. पुढं बरेच सिग्नल आणि ट्रॅफिकही लागलं. सकाळी सात-साडेसातला ते तुफान ट्रॅफिक बघून हायसं वाटलं. (पुण्यात असल्यासारखंच वाटलं अगदी... आणि हे फीलिंग पुढचे चार दिवस वेगवेगळ्या कारणांनी कायम राहणार होतं...) थोड्या वेळानं रामूनं आमच्या सांगण्यावरून एका हॉटेलला गाडी थांबविली. तिथं फार रिस्क न घेता, टिपिकल इडली-सांबार आणि चहा असा नाश्ता करून निघालो.
बंगलोर ते म्हैसूर हे अंतर साधारण १५० किलोमीटर आहे. या दोन्ही शहरांदरम्यान पुण्या-मुंबईसारखा एक्स्प्रेस-वे आहे, अशी माझी समजूत होती. फार पूर्वी तसं वाचल्याचं आठवत होतं. प्रत्यक्षात हा नेहमीचा चार-पदरी, वर्दळीचा रस्ता होता. एक्स्प्रेस-वेविषयी गुगल केलं असता, या रस्त्याचं काम सुरू आहे आणि ते ऑक्टोबर २२ पर्यंत पूर्ण होणार आहे, अशा बातम्या बघायला मिळाल्या. पुढं या रस्त्यानं जाताना अनेक ठिकाणी या एक्स्प्रेस-वेचं काम सुरू असल्याचं दिसलं. ते पूर्ण झाल्यावर या दोन शहरांमधलं अंतर दोन तासांवर येईल. सध्या किमान चार तास लागतात. मात्र, कामाची एकूण स्थिती बघता ऑक्टोबर २२ पर्यंत काय, ऑक्टोबर २३ पर्यंत तरी हे काम पूर्ण होईल की नाही, असं वाटलं. 

बंगलोर ते म्हैसूर हा रस्ता मात्र आल्हाददायक आहे. एक तर हवा ढगाळ होती. दोन्ही बाजूंनी भाताची हिरवीकच्च शेती तरारली होती. कौलारू घरं, छोटी गावं आणि बांधांवर हमखास असणारी नारळाची झाडं हे टिपिकल कोकणात किंवा गोव्यात दिसणारं दृश्य इथं सतत दिसत होतं. इथल्या फेमस ‘हळ्ळी मने’ची हॉटेलंही दिसली. (हळ्ळी- गाव, मने - घर, थोडक्यात गावातलं घर... या ब्रँडची हॉटेलं इथं बरीच लोकप्रिय आहेत. पण आम्ही काही तिथं थांबलो नाही.) पहिलं शहर लागलं ते रामनगर. हे शहर दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक तर सिल्क आणि दुसरं म्हणजे ‘शोले’चं शूटिंग इथंच झालं. उजव्या बाजूला ते डोंगर दाखवत रामूनं आम्हाला ती सगळी स्टोरी सांगितली. त्या डोंगरांच्या परिसरातच सिप्पींचं रामगढ साकारलं होतं. आता हे एक मध्यम जिल्ह्याच्या ठिकाणासारखं शहर झालं आहे. पुढचं शहर होतं चन्नपट्टण. हे आपल्या सावंतवाडीसारखं खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथंही थांबण्याची इच्छा असूनही वेळ नसल्यानं थांबता आलं नाही. जाणवलेली ठळक गोष्ट म्हणजे या सर्व शहरांच्या सुरुवातीलाच त्या शहराचं वैशिष्ट्य सांगणारी मोठी कमान उभारण्यात आली आहे. उदा. वेलकम टु सिल्क सिटी रामनगर किंवा वेलकम टु टॉइज सिटी चन्नपट्टणा इ. त्यामुळं आमच्यासारख्या बाहेरच्या पर्यटकांनाही त्या शहराचं वैशिष्ट्य सहज समजत होतं.
पुढचं शहर होतं मंड्या. या गावाचं नाव फार पूर्वीपासून बातम्या भाषांतरित करताना, लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या वेळी हाताखालून गेलं होतं. प्रसिद्ध कन्नड अभिनेते अंबरीष या मतदारसंघातून उभे राहायचे. त्यामुळं सर्व देशातील ठळक लोकसभा जागांमध्ये मंड्याचा कायम उल्लेख यायचा. हा सगळा भाग आपल्या नगरसारखा साखरेचं उत्पादन घेणारा! ‘वेलकम टु शुगर सिटी मंड्या’ हा बोर्ड तिथं होता, हे सांगायला नकोच.
मंड्यानंतर आलं श्रीरंगपट्टण. टिपू सुलतानच्या राजधानीचं हे ऐतिहासिक शहर. आमच्या ‘टूर प्रोग्राम’मध्ये इथलं ‘साइट सीइंग’ होतं, त्यामुळं रामूनं इमानदारीत तिथली सगळी ठिकाणं दाखवली. पहिल्यांदा पाहिला तो टिपूचा महाल. इथं क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पैसे भरून तेच गेटवर दाखवायचं अशी पद्धत होती. ते सगळे सोपस्कार करून आत गेलो. आत ताजमहाल किंवा बिवी का मकबरा इथल्यासारखं लांबलचक गार्डन कम् कॉरिडॉर होता. सकाळचे साडेअकरा वाजले होते, पण ढगाळ हवा असल्यानं चालायला काही वाटत नव्हतं. आत छोटंसं संग्रहालय होतं आणि त्यात टिपूसंबंधी सगळी माहिती होती. ती फार बारकाईनं वाचण्याएवढा वेळ नव्हता. हे संग्रहालय बघायला मुस्लिम मंडळी बहुसंख्येनं येत होती, हे सहज लक्षात येत होतं. तिथून रामूनं आम्हाला रस्त्यातूनच एक मशीद, टिपूचं मृत्यूस्थळ, ब्रिटिश जिथून हल्ला करायला आत आले ते वॉटरगेट आणि टिपूचा आणखी एक जुना पडका महाल (खरं तर तिथं आता काहीच नाही) हे सगळं कारमधूनच दाखवलं आणि रंगनाथस्वामी मंदिराकडं नेलं. 

हे श्रीरंगपट्टणचं अतिशय प्राचीन मंदिर. गोपुरं होती. आत शेषशायी विष्णूच्या अध्यक्षतेखाली तमाम देवमंडळींचं संमेलनच भरलं होतं. इथं टिपिकल ग्रामीण कर्नाटकमधलं पब्लिक दिसलं. भरघोस गजरे लेवून वावरणाऱ्या बायका, कपाळाला गंध लावणारे पुरुष असा सगळा भाविकवर्ग दिसत होता. इथंही थांबायला फार वेळ नव्हता. त्यामुळं लगेच निघालो. साधारण अर्ध्या तासात म्हैसूर दृष्टिपथात आलं...
मी फार पूर्वीपासून या शहरात यायची मनीषा बाळगून होतो. अखेर तो योग आला. मला एकूणच एके काळी राजे-महाराजांची असलेली शहरं आवडतात. बडोदा, इंदूर ही शहरं यापूर्वी बघून झाली होती... आता दक्षिणेकडचं हे पहिलं राजेशाही शहर मी बघणार होतो... म्हैसूरविषयी पुष्कळ ऐकलं होतं. मुळात कर्नाटक हेच एके काळी म्हैसूर स्टेट म्हणून ओळखलं जात होतं. महाराष्ट्रात जे स्थान पुण्याचं तेच कर्नाटकात म्हैसूरचं; इथली कन्नड भाषा ही कशी प्रमाण कन्नड म्हणून ओळखली जाते इ. इ. ऐकलं होतं. अनेक कथा-कादंबऱ्यांतून मराठी लेखकांनीही म्हैसूरचं रोमँटिक वर्णन केलेले वाचलं होतं... त्यामुळं मी या ‘चंदननगरी’कडं एका वेगळ्या ओढीनं निघालो होतो... पुढचे पूर्ण दोन दिवस म्हैसूरचं थोडंफार दर्शन घडायचं होतं...  कन्नड भाषेचा गंधही नसताना मन म्हणू लागलं...

म्हैसुरिगे स्वागता!

(पूर्वार्ध)

----

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...