स्वीकाराची समंजस गोष्ट
-----------------------------
आपण वेगवेगळ्या भावनांवर आरूढ होऊन जगणारी माणसं आहोत. जग दिवसेंदिवस अधिकाधिक क्रूर, रुक्ष आणि संवेदनाहीन होत चाललं आहे, असं म्हणताना अगदी भाबडी, देवभोळी, साधी आणि संवेदनशील माणसंही आपल्याला भरपूर दिसतात. अशा माणसांमुळंच जग चाललं आहे, असंही वाटून जातं. दुसऱ्याच्या दु:खामुळं आपल्या डोळ्यांत पाणी येणं, खरोखर दु:ख होणं ही एक विशेष प्रकारची संवेदनशीलता आहे. अशा या संवेदनशीलतेची परीक्षा हल्ली हरघडी होत असते. आपल्या सभोवती एवढं काय काय आव्हानात्मक सगळं सुरू असताना, वेदना-दु:ख-त्रास यांनी मन घायाळ होत असताना तर या संवेदनशीलतेची कसोटीच असते. अशा वेळी आपण जे काही जगलोय, अनुभवलंय, सोसलंय, जाणलंय आणि या मिश्रणातून आपलं जे काही व्यक्तिमत्त्व तयार झालंय, त्यातून आपला प्रतिसाद ठरत असतो. आपल्या जडणघडणीचा, संस्कारांचा एक अंदाजही त्यातून येत असतो.
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं!!’ हा नवा सिनेमा आपली अशी सगळ्या पातळ्यांवर परीक्षा घेतो. आपल्यात माणूसपण कितपत शिल्लक आहे, संवेदनांची मुळं जिवंत आहेत की थिजून गेलीयत, संस्कारांची बाळगुटी पेशींत रुजली आहे की नाही या सगळ्यांची कसून परीक्षा होते आणि शेवटी डोळ्यांतून वाहणारे अश्रू व नि:शब्द झालेलं मन आपण या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची ग्वाही देतात. आपला आपल्यावरच पुन्हा विश्वास बसतो. आपल्या आयुष्यात, आपल्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या माणसांचं मोल आपल्याला कळतं. बहिणाबाईंच्या ‘...एका श्वासाचं अंतर’ या ओळींचा अर्थ आतून उलगडतो आणि पोटात खड्डाही पडतो. त्याच वेळी आपल्या प्रियजनांना त्या एका समंजस स्वीकारासाठी तयार करण्यासाठी आपल्या जगण्याची गोष्ट पुन:पुन्हा सांगत राहिली पाहिजे, ही असोशीही वाटू लागते.
‘एकदा काय झालं!!’ ही सलीलच्या आतापर्यंतच्या जगण्यातील सर्व अनुभवांतून तयार झालेली कलाकृती आहे. आपण जे काही जगतो, ज्या धारणांसह जगतो, ज्या संवेदनांसह जगतो, ते सगळं आपल्या अभिव्यक्तीतून उतरत असतं. त्यामुळं ‘एकदा काय झालं!!’ हा सिनेमा दिग्दर्शकाला जगण्याविषयी काय आकलन झालं आहे, यावरही भाष्य करतो. एका सृजनशील कलावंताला झालेलं हे आकलन असल्यानं त्यानं ते कविता, गाणी, संवाद आणि अर्थातच गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. हे सांगणं ‘ये हृदयीचे ते हृदयी’ असं असल्यानं प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोचतंच. (अर्थात देणाऱ्याप्रमाणे ते स्वीकारणाऱ्याची - म्हणजेच बघणाऱ्यांचीही - संवेदनांची पातळीही समान असणं आवश्यक आहे.)
सलीलसारखा कलावंत जेव्हा एखादी कलाकृती तयार करतो, तेव्हा त्याला एकच एक गोष्ट सांगायची नसते. त्या गोष्टीच्या माध्यमातून तो अव्यक्तपणेही अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडत असतो, सांगत असतो. सलीलच्या या कलाकृतीतही हे सांगणं आहे. ते आपल्या कुटुंबव्यवस्थेविषयी आहे, त्यातल्या आजी-आजोबा, आई-बाबा या महत्त्वाच्या घटकांविषयी आहे, ते लहानपणी आजी-आजोबा आपल्याला ज्या गोष्टी सांगतात त्याविषयी आहे, कुटुंब आपल्याला काय संस्कार आणि ऊब देतं त्याविषयी आहे, आपल्या सामाजिक भानाविषयी आहे आणि आयुष्यात आकस्मिक येऊन आदळणाऱ्या कुठल्या तरी कठोर गोष्टीच्या समंजस स्वीकाराविषयीही आहे. त्यासाठी त्यानं मुलगा आणि त्याचे वडील या नात्याचा प्रमुख आधार घेतला आहे. मराठी सिनेमांत फार कमी वेळा या नात्याचं इतकं उत्कट दर्शन झालंय. इथं रूढार्थानं नायक-नायिका किंवा हिरो असं कुणी नाही. इथं येणारी विपरीत परिस्थिती, कठीण काळ आणि त्यानुसार आपापल्या कुवतीनुसार त्याला प्रतिसाद देणारी साधी माणसं आहेत. मात्र, या माणसांकडं शिदोरी आहे ती आपल्या आजी-आजोबांनी किंवा आई-बाबांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टींची. या गोष्टींतून आपल्या अबोध मनावर तेव्हा जे काही संस्कार झालेले असतात, तेच शेवटी आपल्याला कठीण प्रसंगांत उभं करतात. एका अर्थानं ही कलाकृती म्हणजे त्या गोष्टी सांगणाऱ्या पिढीला केलेला सलाम आहे.
चिंतन (अर्जुन पूर्णपात्रे) आणि त्याचे बाबा किरण (सुमीत राघवन) या दोघांची ही गोष्ट आहे. किरणची ‘नंदनवन’ ही वेगळ्या धर्तीवरची शाळा आहे. मुलांना रूढ पद्धतीने शिकविण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकवण्यावर त्याचा भर आहे. चिंतन आणि बाबा यांचं एक घट्ट बाँडिंग आहे. लहानग्या चिंतनसाठी बाबाच त्याचा सर्व काही आहे. तोच त्याचा ‘हिरो’ आहे. चिंतनच्या घरात त्याची आई (ऊर्मिला कोठारे) आणि आजी-आजोबाही (सुहास जोशी व डॉ. मोहन आगाशे) आहेत. या घरात अचानक एक भयंकर वादळ येतं आणि सगळ्यांच्याच भावनांची कसोटी लागते. चिंतन या सगळ्या परिस्थितीला कसं तोंड देतो, त्याचे बाबा काय करतात, घरातली मंडळी कशी प्रतिसाद देतात आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे चिंतनने ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्याचा कसा उपयोग होतो या सगळ्यांची ही गोष्ट आहे.
सिनेमा पाहिल्यानंतर पहिल्यांदा तर मला वाटलं, आपण खरोखर यावर काही लिहू शकत नाही. इमोशनली हा खूप जास्त डोस झाला, असंही मला प्रथम वाटलं. माझ्यासोबत सिनेमा पाहणारे सगळेच नि:शब्द झाले होते. भिजलेले डोळे हीच खरी दाद होती. अर्थात नंतर तो भर ओसरल्यावर सिनेमाबद्दल लिहायलाच हवं असंही वाटलं. सलीलची सर्जक दृष्टी, सुमीत राघवननं साकारलेली अप्रतिम भूमिका, शंकर महादेवन यांचं गायन, सलीलचं संगीत, संदीप खरे-समीर सामंत यांचे शब्द या सगळ्यांच्या मेहनतीतून ही कलाकृती आकाराला आली आहे. (मी कोव्हिडपूर्व काळात या सिनेमाचं चित्रीकरण बघायला एक दिवस गेलो होतो. शूटिंग हे एकूणच किती कंटाळवाणं आणि सर्वांच्या संयमाची परीक्षा बघणारं काम आहे, हे माझं मत त्यानंतर आणखी घट्ट झालं.)
या सिनेमातल्या गाण्यांचा खास उल्लेख केला पाहिजे. शंकर महादेवन यांच्या आवाजातलं ‘रे क्षणा’ हे गाणं आणि सुनिधी चौहाननं गायलेली अंगाई अगदी जमून आली आहे. ‘भीमरूपी महारुद्रा’ या गाण्यानं सिनेमाची सुरुवात होते आणि ‘मी आहे श्याम, मित्र माझा राम’ हे आणखी एक गाणं यात आहे. ही दोन्ही गाणी सलीलनं आधीच तयार केली होती. त्याचा या सिनेमात चपखल वापर करण्यात आला आहे. रस्त्यावरच्या गरीब मुलाचा आणि पुष्कर श्रोत्रीचा असे दोन छोटे ट्रॅक सिनेमात आहेत. सिनेमा पूर्वार्धात काही ठिकाणी थोडा रेंगाळतो. मात्र, एकूण तो आपली पकड फारशी सोडत नाही. संदीप यादव यांच्या छायांकनाला दाद द्यायला हवी. लहान मुलांच्या नजरेचा ‘अँगल’ त्यांनी अजूक पकडला आहे.
सुमीतसोबतच ऊर्मिला, सुहास जोशी, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री यांच्या भूमिका आहेत आणि त्यांनी त्या व्यावसायिक सफाईनं केल्या आहेत. छोट्या, पण महत्त्वाच्या भूमिकेत मुक्ता बर्वेचं दर्शन सुखकर आहे. चिंतन झालेला अर्जुन पूर्णपात्रे हा मुलगा गोड आहे. त्याची भूमिका अवघड होती. विशेषत: शेवटचा प्रसंग. मात्र, तो त्यानं उत्तम केला आहे. (चाळीसगावची पूर्णपात्रे फॅमिली आपल्याला ‘सोनाली’ सिंहिणीमुळं माहिती आहे. अर्जुन याच घरातला!)
काही सिनेमे आपल्याला रडायला लावणारे म्हणून अजिबात आवडत नाहीत. ‘एकदा काय झालं!!’ हा याला अपवाद ठरावा. दुसरं म्हणजे हा काही लहान मुलांचा चित्रपट नाही. लहान मुलं असलेला हा मोठ्यांचाच चित्रपट आहे. आपल्यातल्या लहान मुलाची आणि निरागस संवेदनशीलतेची समंजस गोष्ट सांगणारी ही कलाकृती एकदा तरी अनुभवावीच.
---
वा! 👌👍नक्कीच पाहाणार!
ReplyDeleteYess... Thank you...
Deleteसुंदर परीक्षण...👌❤️
ReplyDeleteधन्यवाद जी...
ReplyDeleteचित्रपटाची उत्सुकता वाढवणारं परीक्षण. छान.
ReplyDeleteधन्यवाद मित्रा 🙂
Deleteअप्रतिम लेख 💐
ReplyDeleteदोनदा पाहिला धो धो रडले.
पण नेमका संदेश देणारा चित्रपट.
मनापासून धन्यवाद!
Deleteछानच...अगदी उत्तम समीक्षण
ReplyDeleteधन्यवाद.
ReplyDeleteखूप छान व हळुवारपणे लिहिलेले आहे हे परीक्षण ...हा चित्रपट पाहावा का कसे असा विचार करत असतानाच तुमचा हा सुंदर लेख वाचनात आला ...त्यामुळे चित्रपट लवकरात लवकर पाहण्याची इच्छा जागृत झाली आहे ...धन्यवाद !👌👍👏🌹
ReplyDeleteधन्यवाद वीणाताई 🙂🙏
Delete💯
ReplyDeleteखूप छान चित्रपट असणार,वाटलंच होतं, तुमच्या परिक्षणाने शिक्कामोर्तब झाले..🙏❤️
ReplyDeleteमन:पूर्वक धन्यवाद!
Deleteअप्रतिम परीक्षण सिनेमा पाहण्याची उत्सुकता .
ReplyDeleteधन्यवाद सर....
Delete