31 Oct 2022

दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २२ - लेख

कुछ खोया, कुछ पाया...
-----------------------------

आपल्या आयुष्यात हव्याशा वाटणाऱ्या गोष्टींची कायमच चुकामूक होत असते. जे हवं ते मिळालंय अशा गोष्टींची संख्या कायमच कमी भरते. एवढंसं आयुष्य आणि काय काय करायचंय रे देवा, असं सतत वाटत राहतं. वय लहान असतं, तेव्हा स्वप्नाळूपणा अर्थात अधिक असतो. आपल्याला जे जे वाटतं ते ते सगळं आपण करू शकू, असा एक विलक्षण आत्मविश्वास तेव्हा वाटत असतो. प्रत्यक्षात आयुष्य बरंच क्रूर असतं, हे हळूहळू कळत जातं. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, हे कळायलाही वयाची एक मॅच्युरिटी यावी लागते.
आयुष्यात आत्तापर्यंत आलेली वळणं आणि झालेल्या चुकामुकी बघितल्या, तर गंमत वाटते. काही गोष्टी निसटून गेल्या, याची खंतही वाटते. मात्र, सतत त्याचं दु:ख उगाळत बसावं, एवढंही नंतरच जगणं वाईट झालं नाही. उलट अनपेक्षितपणे काही अशा गोष्टी मिळाल्या की जगणं समृद्ध झाल्याचं समाधान वाटत राहिलं. 

दहावीपर्यंतचं जन्मगावातलं जगणं अगदीच निरागस म्हणावं असं होतं. सातवीनंतर गाव सोडून शहरात आलो, हे आयुष्यातलं पहिलं मोठं स्थलांतर. दहावीला बरे मार्क पडले. अशा मुलांनी (तेव्हा) एक तर मेडिकलला जायचं असतं किंवा इंजिनीअरिंगला. डिप्लोमा इंजिनीअरिंग हा आणखी एक तुलनेनं सुलभ पर्याय होता. मीही तोच निवडला. खरं तर मी निवडला, असं म्हणवत नाही. सगळे डिप्लोमाला जा म्हणाले, म्हणून मीही ‘बरं’ म्हटलं. करिअर कौन्सेलिंग, कल चाचणी वगैरे प्रकार तेव्हा नव्हतेच. आपल्याला काय आवडतंय, आपला ओढा कुठं आहे हे काहीही कळत नव्हतं. तसं तपासायची कुठलीही औपचारिक-अनौपचारिक यंत्रणा आजूबाजूला नव्हती. मग ठरल्याप्रमाणे पुण्याला गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकला आलो. तोवर लहान शहरात राहिलेला मी, पुण्यासारख्या मोठ्या शहरात येऊन पूर्ण बावरून गेलो. वयही लहानच होतं. जेमतेम सोळावं वर्षही पूर्ण व्हायचं होतं. अशा वेळी एकदम घर तुटणं हा अनुभव वेगळा, नवा होता. त्याची सवय नव्हती. शिवाय तोवरचं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं होतं. इथं इंग्लिश मीडियममधून थेट इंजिनीअरिंगचे विषय शिकायचे हे काही झेपेना. बाकीची बरीच मुलं माझ्यासारखीच होती. पण ती घासून अभ्यास करायची. माझा तो पिंड नव्हता. (हे आता लक्षात येतंय.) एकदा पुस्तक वाचलं, की थेट परीक्षेत जाऊन उत्तरं द्यायची आणि चांगले गुण मिळायचे, अशी तोवर सवय होती. इथं ती जाड जाड पुस्तकं उघडली की झोप यायला लागली. अखेर जे व्हायचं तेच झालं. सपशेल अपयश! एकदा नाही, दोनदा नापास झालो. पहिली दोन वर्षं पूर्ण करायला चार वर्षं लागली. तुटलेल्या पतंगासारखं आयुष्य भिरभिरत होतं. पुढं अशा काही गोष्टी घडल्या, की मी ‘थर्ड इयर’ला धाडकन इंजिनीअरिंग सोडून घरी परत आलो. पुन्हा परत कधीही तिथं न जाण्यासाठी! घरच्यांना हा धक्काच होता. मात्र, त्यांनी मला समजून घेतलं. कसंबसं रेटून तिसरं वर्षही पूर्ण केलं असतं, तर मी इंजिनीअर झालोही असतो. मात्र, माझ्या निर्णयामुळं इंजिनीअरिंगशी चुकामूक झाली ती झालीच.
आज विचार करतो, की मी इंजिनीअर झालो असतो आणि ‘लोकसत्ता’तली ती नोकरी अपघाताने मला मिळाली नसती तर मी कोण झालो असतो? मला आयुष्यभर कदाचित हे कळलं नसतंं, की माझ्यात पत्रकार-लेखक होण्यासारखे गुण आहेत. मी नगरच्या एमआयडीसीत कुठल्याशा कारखान्यात शिफ्टमध्ये नोकरी करत राहिलो असतो. कधी कधी माझी लेखनाची उबळ वर आली असती. मग मी स्थानिक वृत्तपत्रांना पत्रं पाठवत राहिलो असतो किंवा लेख पाठवत राहिलो असतो. त्यातलं एखादं प्रसिद्ध झालं असतं, तरी मिरवत राहिलो असतो. (या विचारानंही आज काटा येतो.) पत्रकारितेच्या जगानं मला जगाची जी विशाल खिडकी उघडून दिली आणि माझं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध केलं त्यातलं काहीच कदाचित झालं नसतं. या पेशामुळं मला अनेक मान्यवर, मोठ्या लोकांशी सहज संपर्क साधता आला; त्यातल्या काहींशी मैत्री करता आली, त्यांच्या सहवासातून अनेक गोष्टी शिकता आल्या यातलं काही म्हणता काहीही झालं नसतं. सोशल मीडिया आल्यावर मी कदाचित त्यावरही माझं लिखाण शेअर केलंच असतं. मात्र, माझी आतापर्यंत जी सहा-सात पुस्तकं प्रकाशित झाली, ती कदाचित कधीच झाली नसती. पत्रकारितेमुळं वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या घटनांचं वार्तांकन करण्यासाठी जायला मिळालं, ते कधीच मिळालं नसतं. त्या जगण्याची कल्पना करूनही धसकायला होतं. थोडक्यात, इंजिनीअरिंगची वाट चुकली तरी फारसा खेद कधी वाटला नाही. उलट आपण चुकीच्याच मार्गाला गेलो होतो, असंच वाटत राहिलं.
खरं तर माझं गणित चांगलं होतं. तशी चित्रकलाही चांगली होती. आयुष्यात पहिलं बक्षीस दुसरी असताना मिळालं ते चित्राबद्दलच. मला नववीत असताना एलिमेंटरी परीक्षेत ए ग्रेड मिळाली होती. मात्र, दहावीचं वर्ष म्हणून मी इंटरमीजिएट परीक्षा दिली नाही. ती परीक्षा दिली असती, तर? लहानपणी मला हत्ती चांगला काढता यायचा. घरी भोंडल्याच्या वेळी पाटावर रांगोळीनं हत्ती काढायचं काम माझ्याकडं असे. जीवशास्त्राच्या अनेक आकृत्या मी वहीत चांगल्या काढत असे. त्याचा उपयोग इंजिनीअरिंगला झाला. मिनी ड्राफ्टरनं मशिन डिझाइन काढायचं असे, ते मला चांगलं जमत असे. बाकी पोरं ट्रेसिंग वगैरे मारत बसायची. मी मात्र तल्लीनतेनं ते डिझाइन काढत बसायचो. मात्र, पुढं चित्रकलेचा हात सोडला तो सोडलाच. मात्र, चित्रं बघायला आजही आवडतात. अगदी मुलाला मुंबईला नेऊन तिथली मोठी चित्रकला प्रदर्शनं दाखविली आहेत. कुठल्याही म्युझियममध्ये चित्रांच्या दालनात मी अधिक रमतो. अमूर्त शैलीतली चित्रं बघताना कधी कधी वाटतं, चित्रकलेचा हात सोडला नसता, तर समोरचं हे चित्र जरा अधिक लवकर आणि नीट कळलं असतं. पण चित्रकलेची चुकामूक झाली ती झालीच!
सॉम (स्ट्रक्चर ऑफ मशिन), टॉम (थिअरी ऑफ मशिन), मशिन डिझाइन आदी विषय इंजिनीअरिंगमुळंच समजले. (किंवा खरं तर नाही समजले!) पुन्हा आयुष्यात हे विषय आणि त्याचा अभ्यास यांचा काहीही संबंध आला नाही. मात्र, त्या दिवसांनी काहीच दिलं नाही असं कसं म्हणू? इंजिनीअर लोकांचं डोकं एका विशिष्ट पद्धतीनं विचार करतं. गणिती पद्धतीनं मेंदूत काही गोष्टींचं विश्लेषण केलं जातं. सहसा भावनिक प्रतिसाद कमी आणि व्यावहारिक प्रतिसाद जास्त असतो. त्याचा त्या लोकांना अतिशय अभिमान वाटतो. मला मी कधी कधी तसा विचार करतो असं वाटतं आणि ते इंजिनीअरिंगच्या चार-पाच वर्षांचं देणं असावं. चुकामूक झाली असली, तरी त्या रस्त्यावरून थोडा प्रवास केला असल्यानं पुढील प्रवासाचा अंदाज नक्कीच करू शकतो.
इंजिनीअरिंगला येण्याचा सर्वांत मोठा फायदा असा झाला, की मी फार लहान वयात पुण्यात आलो आणि एकटा राहायला शिकलो. आयुष्यात हे स्वावलंबी होणं माझ्यासाठी पुढं फार महत्त्वाचं ठरलं. स्वत:चे कपडे धुण्यापासून ते सगळी कामं स्वत: करणं, सिनेमापासून ते बस प्रवासापर्यंत कुठलीही गोष्ट एकट्यानं एंजॉय करणं, जगात शेवटी आपले आपणच असतो याचा साक्षात्कार होणं हे सगळं माझ्याबाबत फार लहान वयात झालं आणि त्याचा पुढच्या जगण्यात निश्चितच उपयोग झाला. 

लहानपणी चुकामूक झालेली आणखी एक गोष्ट म्हणजे वाद्यवादन. माझ्या आईला फार वाटे, की मला एखादं तरी वाद्य वाजवता यावं. त्यातही शक्यतो तबला! मात्र, आमच्या लहान गावात असे कुठलेही वाद्यवादनाचे क्लास वगैरे नव्हते. नंतर शहरात आलो, तरी मी स्वत:हून काही त्या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही. माझ्या धाकट्या आत्याचे यजमान पेटी वाजवत. सुट्टीत त्यांच्याकडं गेलो, की मी त्या पेटीवर सुरांशी झटापट करू पाही. अगदी बेसिक ‘सा रे ग म’ मला वाजवता यायचं. उलट आणि सुलट तेही शिकलो. मात्र, त्यापुढं माझी मजल जाईना. नंतर इंजिनीअरिंगच्या गर्तेत अडकल्यानंतर तर या गोष्टींच्या मागे लागणं राहूनच गेलं. गॅदरिंगला अनेक मुलं वेगवेगळी वाद्यं वाजवत. आम्ही पहिल्या वर्षाला असताना (आताचा प्रसिद्ध कवी) संदीप खरे तिसऱ्या वर्षाला होता. त्या गॅदरिंगला त्यानं स्वत: पेटी वाजवून स्वरचित कविता (मन तळ्यात मळ्यात) म्हणून दाखवली होती, तेव्हा फारच भारी वाटलं होतं. कुणी बँजो वाजवी, तर कुणी गिटार! त्या पोरांना शिट्ट्या वाजवून दाद देणाऱ्या पोरी बघून मनस्वी हेवा वाटायचा. मला तर शिट्टीही वाजवता यायची नाही. वाद्यवादन ही आपल्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे, हे शेवटी मी मनोमन मान्य केलं. नंतर ‘सकाळ’मध्ये काम करायला लागल्यावर अप्पा बळवंत चौकात मेहेंदळेंचं वाद्यांचं दुकान दिसायचं. तिथली पेटी, तबला-डग्गा वगैरे वाद्यं बघितली की मला आईच्या इच्छेची आठवण यायची. अजूनही येते. कदाचित यापुढं फारच नेटानं प्रयत्न केला तर एखादं वाद्य वाजवायला जमेलही. पण तोवर तरी चुकामूक झाली आहे, असंच म्हणावं लागेल. आता मला गाणं आवडतं, लय समजते, ताल कळतो; मात्र त्यातल्या शास्त्रीय संगीताचं व्याकरण समजत नाही. एखादा राग ओळखता येत नाही. मात्र, तरीही गेली कित्येक वर्षं ‘सवाई’ला वारकऱ्यांसारखा जातो आहे. का कोण जाणे, पण ते सूर सतत खेचून घेतात. वाद्यं वाजवता आली नाहीत, तरी मला गाणं चालीत व्यवस्थित म्हणता यायचं आणि आवाजही (फुटेपर्यंत) बरा असावा. पण मी गाणंही शिकलो नाही किंवा शिकू शकलो नाही. त्याही गोष्टीची चुकामूक झालीच. मला चांगल्या नकला करता येतात. वेगवेगळे आवाज काढता येतात. तेव्हा अनेक मित्र किंवा नातेवाइक म्हणायचे, की तू नाटकात जा, मुंबईला जा... या क्षेत्रात तुला नक्की नाव मिळेल. पण तो माझा इंजिनीअरिंगचा संघर्षाचा काळ होता. कुठलंही गोष्ट आपल्याला जमेल याचा आत्मविश्वासच नाहीसा झाला होता. त्यामुळं मुंबईला जायचं धाडस अंगात अजिबात नव्हतं. मी त्या महानगरात सर्वप्रथम गेलो ते माझ्या वयाच्या २१ व्या वर्षी! पहिल्याच भेटीत मी मुंबईच्या प्रेमात पडलो. (ते अजूनही कायम आहे.) या महानगरात आपण राहायला हवं, इथंच काम-धंदा शोधायला हवा, असं वाटायचं. मात्र, मनाच्या तळात, अगदी खोलवर मी ही इच्छा दाबून टाकली. असं का, याचं उत्तर आता सांगता येत नाही. कदाचित आत्मविश्वासाचा अभाव हेच कारण असावं. खरं तर संधी मिळाली तर मी केव्हाही या शहरात जाऊ शकतो. मात्र, तिथंच स्थायिक होणं, मुंबईकर होणं या गोष्टीची चुकामूकच झाली असं वाटतं. 

तीच गोष्ट एम. ए.च्या पदवीची. जर्नालिझमची पदवी मिळाल्यानंतर मी फर्ग्युसन महाविद्यालयात एम. ए. मराठीला प्रवेश घेतला होता. मात्र, घरात अचानक उद्भवलेल्या एका मोठ्या अडचणीमुळं मी तो कोर्स अर्धवटच सोडला. परीक्षाच दिली नाही. तेव्हा ते जे राहिलं ते राहिलंच. नंतर जर्नालिझममध्येही एम. ए. करण्याची संधी आली होती. मात्र, तेव्हाही काही तरी थातुरमातुर कारणांमुळं मी ते केलं नाहीच.
मला फिरायचीही अतोनात आवड. एखादी फिरतीची नोकरी मिळावी आणि त्यानिमित्ताने सगळा देश पालथा घालता यावा, असंही वाटायचं. पण ‘सकाळ’मध्ये नोकरी मिळाली आणि आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटल्या. त्यामुळं पुन्हा वेगळी नोकरी शोधायच्या फंदात (पुढची १३ वर्षं) पडलोच नाही. नोकरीतही डेस्कची जबाबदारी मिळाली. रिपोर्टिंगची मिळती, तर जरा तरी फिरता आलं असतं. अर्थात असा फिरण्याचा जॉब स्वत: न शोधणं हा माझा आळस आहेच. (आयुष्यात नक्की कोणत्या गोष्टी खरंच मिस झाल्या आणि कोणत्या आपल्या आळसापायी चुकल्या, याचा प्रामाणिक आढावा घेणं कठीण आहे.)
स्वयंपाक करायला शिकणं, एम. ए. पूर्ण करणं किंवा वाद्य वाजवता येणं या गोष्टी खरं तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर पूर्ण करता येऊ शकतील. मात्र, जेव्हा त्या कराव्याशा वाटत होत्या किंवा करायला हव्या होत्या त्या वयात आणि त्या काळात त्यांची चुकामूक झाली हे नक्की! मला वाटतं, आयुष्य यालाच म्हणत असावेत. आपण कुठल्या गाडीचं तिकीट काढलं आहे, यापेक्षा आपल्याला कुठल्या गाडीत बसायची संधी मिळते, हेच शेवटी वास्तव उरतं. ती गाडी आपली म्हणायची आणि प्रवासाचा आनंद लुटायचा, एवढी शिकवण आजवरच्या आयुष्यानं नक्कीच दिली आहे. त्यासाठी मी माझ्या आयुष्याशी कृतज्ञ आहे.

---

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२२)

---


No comments:

Post a Comment