17 Mar 2023

रॉकेट बॉइज-२ - रिव्ह्यू

देशप्रेमाचं उत्तुंग यान
-----------------------



भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत देशाची जी वैज्ञानिक प्रगती झाली आहे, तीत डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. भाभा यांना ‘भारतीय अणुबॉम्बचे जनक’, तर डॉ. साराभाई यांना ‘भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचे जनक’ असंच सार्थपणे म्हटलं जातं. आपल्याला एखाद्या राजकारण्याची किंवा प्रसिद्ध नटाची जेवढी माहिती असते, तेवढी दुर्दैवाने आपल्या शास्त्रज्ञांची नसते. शाळेत एखाद्या धड्यात एखादा परिच्छेद उल्लेख असेल तर तेवढाच. बाकी त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण व्हावं, त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं असं वाटण्याजोगी परिस्थिती माझ्या बालपणी तरी सभोवती नव्हती. चित्रपट माध्यम ताकदवान असलं, तरी मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या विषयांना अंगभूत मर्यादा आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या आयुष्यावर चित्रपट तयार होतील, असं गेल्या दोन दशकांपूर्वी तरी नक्कीच वाटत नव्हतं. एकविसाव्या शतकानंतर परिस्थिती काहीशी बदलली असली, तरी ‘ओटीटी’चं आगमन झाल्यापासून ती विशेष पालटली आहे, असं म्हणता येईल. त्यामुळेच डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांचं जीवन उलगडून दाखविणारी ‘रॉकेट बॉइज’ ही वेबसीरीज आपल्याकडे तयार होऊ शकली. ‘सोनी लिव्ह’वर गेल्या वर्षी या सीरीजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला. खरं सांगायचं तर सुरुवातीचे एक-दोन भाग बघून मला ती सीरीज चक्क बोअर झाली व मी ती बघायची बंद केली. मग कुठे तरी पुन्हा या सीरीजची चर्चा कानी पडली तेव्हा मग पुन्हा बघायला घेतली आणि निग्रहानं पूर्ण केली.
सुमारे दीड वर्षानं या सीरीजचा दुसरा सीझन आला आहे. काल मी तो बघायला सुरुवात केली आणि त्यात एवढा गुंतून गेलो, की सलग आठ भाग बघूनच (बिंज वॉच) थांबलो. मी फार क्वचित सीरीज अशा ‘बिंज वॉच’ केल्या आहेत. त्यातली ही एक. साधारण ४० ते ५० मिनिटांचा एक भाग असे हे आठ भाग आपल्याला खिळवून ठेवतात, याचं कारण स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वांत महत्त्वाच्या कालखंडाचं चित्रण डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्या जीवनकथेच्या रूपानं आपल्यासमोर येतं. यात १९६४ ते १९७४ असा दहा वर्षांचा कालखंड दाखविण्यात आला आहे. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे, की पहिला सीझन पूर्ण बघितल्याशिवाय हा सीझन बघायला सुरुवात करू नये. पहिल्या सीझनमधले अनेक संदर्भ या दुसऱ्या सीझनमध्ये येतात. पहिला सीझन जरा निग्रहानं बघायला लागतो. मात्र, डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांची जडणघडण कशी झाली, याचं ते चित्रीकरण आहे. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अर्थात १९६४ पर्यंतचा काळ आहे. 

दुसऱ्या सीझनमध्ये मात्र वेगवान घटनांची ‘तुफान मेल’च आहे. कॅथरिन फ्रँक यांचं ‘इंदिरा - ए लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी’ हे माझं आवडतं पुस्तक आहे. त्यात फ्रँक यांनी इंदिराजींच्या आयुष्यातल्या व त्यासोबतच भारताच्या इतिहासातल्या अनेक गोष्टींचं दस्तावेजीकरण करून ठेवलंय. ज्यांना त्या घटना, त्यांचा क्रम, राजकीय महत्त्व, सामाजिक महत्त्व माहिती आहे त्यांना ‘रॉकेट बॉइज’चा दुसरा सीझन बघायला मजा येईल. त्यामुळे माझी अशी शिफारस आहे, की या कालखंडातील महत्त्वाच्या घटना जाणून घेऊन मगच ही मालिका बघायला घ्यावी. सत्तरचं दशक नवभारतातलं ‘नवनिर्माणाचं दशक’ म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्य मिळून दीड दशक झालं होतं. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत भारतात नवनिर्माण सुरू होतं. नवी धरणं बांधली जात होती, नवे वैज्ञानिक प्रकल्प उभे राहत होते, उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या, चांगले चित्रपट येत होते, वेगळं संगीत तयार होत होतं... याच काळात डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्यासारखे द्रष्टे शास्त्रज्ञ ५० वर्षांनंतर भारत कुठे असेल, याची स्वप्नं बघत होते. (त्यांच्या जोडीला तेव्हा कलाम नावाचा एक भरपूर केस वाढवलेला, उत्साही तरुणही सोबत असायचा.) 
भारत १९६२ च्या चीन युद्धानंतर बॅकफूटला गेला होता. दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई, भूकबळी या समस्या सार्वत्रिक होत्या. ‘रॉकेट उडवून काय करायचं? गरीब देशाला परवडणार आहे का ते?’ या आणि अशा मतांची केवळ जनतेत नव्हे, तर सरकारमध्येही चलती होती. अणुबॉम्बचं तर नावही काढायची चोरी होती. भारत हा बुद्धांचा देश होता, महात्मा गांधींचा देश होता. या देशाला अणुबॉम्ब कशाला पाहिजे? अमेरिकादी पाच नकाराधिकारप्राप्त देश अणुचाचण्या करून बसले होते आणि आता त्यांना जगात कुणीही अणुबॉम्ब बनवायला नको होता. अमेरिकेच्या ‘अरे’ला ‘का रे’ म्हणण्याची राजनैतिक हिंमत भारताच्या नेतृत्वाकडे नव्हती, याचं कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळीच होती. शीतयुद्धाचा काळ जोरात होता. शस्त्रस्पर्धा ऐन भरात होती. सीआयए, केजीबी, मोसाद यांच्या आंतरराष्ट्रीय कारवायांना ऊत आला होता. त्यांच्या कारवायांच्या दंतकथा आणि बाँडपट यांच्यात फारसा फरक उरला नव्हता. 
‘रॉकेट बॉइज’च्या दुसऱ्या सीझनला या सगळ्या आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचा विस्तृत पट लाभला आहे. त्या भव्य पटावर ही कथा बघताना डॉ. भाभा, पं. नेहरू, डॉ. साराभाई, इंदिरा गांधी या सगळ्यांचं मोठेपण ठसल्याशिवाय राहत नाही. डॉ. भाभा व डॉ. साराभाई यांच्यातही मतभेद होतेच. डॉ. साराभाई थोडेसे मवाळ स्वभावाचे होते, तर डॉ. भाभा म्हणजे आयुष्य पूर्णपणे एंजॉय करणारे, मस्तमौला व्यक्तिमत्त्व! दोघांच्या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांच्या कामगिरीतही दिसतं. या जोडीला दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातले चढ-उतारही आपल्याला दिसत राहतात. विशेषत: डॉ. साराभाई आणि कमला चौधरी यांच्या नात्यामुळं मृणालिनी व साराभाई यांच्यात निर्माण झालेले मतभेद आणि पुढं त्यांचं मनोमिलन हा सगळा भाग दिग्दर्शकानं फार प्रगल्भतेनं हाताळलाय. छोट्या मल्लीचंही (मल्लिका साराभाई) दर्शन यात घडतं. 
या सर्व घटनाक्रमात नाट्य निर्माण करणारे दोन फितुर म्हणजे माथूर आणि प्रसन्नजित डे हे दोघे जण. हे या कथानाट्यातले व्हिलन आहेत. मेहदी रझा या शास्त्रज्ञाचे होमी भाभांशी असलेले मतभेद व वाद पहिल्या सीझनमध्ये आले आहेत. य वादाचे पडसाद या सीझनमध्ये भयानक पद्धतीने पडतात. नेहरूंचं निधन, लालबहादूर शास्त्री पंतप्रधानपदी येणं, त्यांचा ताश्कंदमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू, इंदिरा गांधींची पंतप्रधानपदी झालेली निवड, कामराज व मोरारजी यांचं राजकारण, होमी भाभांचं नेहरूंना ‘भाई’ व इंदिराजींना ‘इंदू’ असं जवळिकीनं संबोधणं, साराभाईंच्या नियुक्तीवरून केंद्रीय मंत्रीमंडळात इंदिराजींना झालेला विरोध, सीआयएची कारस्थानं, माथूर व डे यांचे देशविरोधी उद्योग, डॉ. भाभा यांचं ‘विमान अपघाता’त झालेलं धक्कादायक निधन, इंदिराजींना बसलेला धक्का, पुढं काही विशिष्ट घटनाक्रमानंतर डॉ. साराभाईंना अणुबॉम्ब बनविण्याची जाणवलेली निकड, इंदिराजींच्या पुढाकारानं सुरू झालेला भारताचा अणुबॉम्ब तयार करण्याचा गुप्त कार्यक्रम, ‘दूरदर्शन’चे कार्यक्रम सॅटेलाइटद्वारे देशभर प्रसारित करण्याची डॉ. साराभाईंची धडपड, रॉकेटची अयशस्वी उड्डाणं, नंतर आलेलं यश, विक्रम-मृणालिनी यांचं एकत्र येणं, साराभाईंचा थुंबा येथे अचानक झालेला मृत्यू, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. कलाम, डॉ. राजा रामण्णा, अय्यंगार व इतर शास्त्रज्ञांनी जीवतोड मेहनत घेणं, अणुबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम अमेरिकेपासून गुप्त ठेवण्यासाठी केलेल्या नाना क्लृप्त्या-युक्त्या असा सगळा घटनाक्रम या सीझनमध्ये आपल्यासमोर धबधब्यासारखा आदळत राहतो. या सर्वांचा कळसाध्याय म्हणजे १९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये केलेली पहिली यशस्वी अणुचाचणी! ती चाचणी आणि ती पूर्ण करण्याआधी आलेल्या अडचणी हे सगळं प्रत्यक्षच बघायला हवं!
ही सगळी केवळ या दोन शास्त्रज्ञांची कहाणी न राहता, ही आपल्या देशाच्या प्रगतीच्या विलक्षण धडपडीची कहाणी झाली आहे, हे दिग्दर्शक अभय पन्नूचं सर्वांत मोठं यश आहे. म्हणूनच हा सीझन देशप्रेम, स्वाभिमान, जिद्द अशा अनेक भावनांवर स्वार होऊन, एका विलक्षण उंचीवर जाऊन पोचला आहे. अभय कोरान्ने यांनी या मालिकेचं लेखन केलं आहे. त्यांचं श्रेय महत्त्वाचं आहे. यातील सर्वच कलाकारांची कामं उत्कृष्ट झाली आहेत. डॉ. भाभांच्या भूमिकेत जिम सरभ या अभिनेत्यानं कमाल केली आहे. इश्वाकसिंह या अभिनेत्याने डॉ. साराभाई उत्तम उभे केले आहेत. मृणालिनी साराभाईंच्या भूमिकेत रेजिना कॅसँड्रा ही अभिनेत्री अप्रतिम शोभली आहे. विशेषत: तिचे नृत्य व मुद्राभिनय खास! नेहरूंच्या भूमिकेत रजित कपूर एकदम फिट! (एका प्रसंगात ते मद्यपान करताना व सिगारेट ओढताना दाखवले आहेत. नेहरू या दोन्ही गोष्टी करत होतेच; त्यामुळं त्यात काही गैर नाही. मात्र, वेबसीरीज नसती तर असे दृश्य कुणी दाखवू शकले असते काय, असे वाटून गेले!) रझाच्या भूमिकेत दिव्येंदू भट्टाचार्य या अभिनेत्याने अक्षरश: जीव ओतला आहे. शेवटी या व्यक्तिरेखेसाठी आपल्याला अतिशय वाईट वाटतं, त्याचं श्रेय या अभिनेत्याला नक्कीच आहे. अर्जुन राधाकृष्णन या तरुणाने डॉ. कलाम छान साकारले आहेत. (ही मालिका संपली असली, तरी डॉ. कलाम व त्यांचे सहकारी यांच्या कामगिरीवर पुढचा सीझन यावा असं वाटण्याइतपत या दुसऱ्या सीझनमध्ये डॉ. कलाम यांचा प्रेझेन्स आहे.) चारू शंकर यांनी साकारलेल्या इंदिराजी ठीकठाक. त्यांचा प्रोस्थेटिक मेकअप अगदी जाणवतो. सर्वांत खटकले ते यशवंतराव चव्हाण. यशवंतराव हे काळे-सावळे असले, तरी तेजस्वी व राजबिंडे व्यक्तिमत्त्व होते. या मालिकेत यशवंतरावांची व्यक्तिरेखा मात्र अजिबात नीट ठसली नाही. कामराज व मोरारजी मात्र जमले आहेत.
आपल्या देशात गेल्या ७०-७५ वर्षांत काहीच झालं नाही, वगैरे प्रचार हल्ली सुरू असतो. तो मनावर ठसविण्यापूर्वी ही मालिका नक्की बघावी. आपलं देशप्रेमाचं रॉकेट आकाशात उत्तुंग झेपावल्याशिवाय राहणार नाही!

---

दर्जा - चार स्टार

---

4 comments: