मराठी मातीचा ‘डीएनए’
------------------------------
महाराष्ट्र म्हणजे काय, मराठी माती म्हणजे काय, मराठी माणसाचा ‘डीएनए’ नक्की कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा नवा मराठी चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने बघायलाच हवा. शाहीर कृष्णराव साबळे यांच्या आयुष्यावरील हा ‘बायोपिक’ शाहिरांच्या आयुष्याची कथा तर सांगतोच; पण त्याहून अधिक तो विसाव्या शतकातील महाराष्ट्राचं चित्र आपल्यासमोर मांडतो. आज जातीपातींच्या विद्वेषाने सगळे वातावरण दूषित झालेले असताना तर हा चित्रपट बघणे विशेष गरजेचे आहे, याचे कारण ‘कोण होतास तू, काय झालास तू’ अशी अवस्था मराठी माणसाची झाली आहे. अशा परिस्थितीत आपलं राज्य कसं होतं, इथं काय उंचीची माणसं होऊन गेली, त्यांनी या भूमीसाठी - मराठी मातीसाठी - काय काय केलं हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळं ‘महाराष्ट्र शाहीर’मधला शाहीर साबळेंच्या जगण्याचा प्रवास पाहताना आपल्या राज्याविषयीचा अभिमान दाटून येतो.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून छोट्या किस्नाचा प्रवास दिग्दर्शक दाखवतो. वाईजवळच्या पसरणी गावचे हे साबळे कुटुंब. छोट्या किस्नाला लहानपणापासून गाण्याची आवड असते. वडील शेतकरी. सोबत देवळात कीर्तन करणारे. आईला वाटतं, मुलानं केवळ गाणं म्हणत बसू नये. त्यानं काही पोट भरणार आहे का? भाबडी माउली मुलाला हर प्रकारे गाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असते. मुलगा जरा मोठा झाल्यावर त्याच्या मामाकडं व आजीकडं खानदेशात अंमळनेरला पाठवते. तिथं लहानगा कृष्णा सानेगुरुजींच्या आणि संत गाडगेबाबांच्या सहवासात येतो. तेव्हाचे सगळेच प्रसंग अतिशय हृद्य आहेत. या दोन महापुरुषांच्या सान्निध्यामुळे कृष्णाच्या जगण्याला एक दिशा मिळते आणि तो पुन्हा गावाकडं परततो. तारुण्यात पदार्पण केल्यावर आई कृष्णाला त्याच्या काकासोबत मुंबईला धाडते. काका पुतण्याला गिरणी कामगार म्हणून एका सूतगिरणीत चिकटवतो. कृष्णा गाणं विसरून एक सर्वसामान्य कामगार म्हणून मुंबईत दिवस कंठू लागतो. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असतं. मुंबईत त्याला पुन्हा एकदा सानेगुरुजी भेटतात. गुरुजी कृष्णाला त्याच्या जगण्याचं प्रयोजन सांगतात. त्यानंतर मात्र कृष्णा एक दृढनिश्चय करून संपूर्ण आयुष्य शाहिरीला, गाण्याला वाहून घेण्याचं ठरवतो.
त्याच प्रवासात फलटणला एका कॉलेजातील कार्यक्रमात त्याला भेटते भानुमती. भानुमतीला कृष्णाबाबत ‘प्रथमदर्शनीच प्रेमात’ असं होतं. तिच्या आयुष्यात प्रीतीचा मधुमास फुलतो. त्या काळात, १९४२ मध्ये ही मुलगी कृष्णासोबत पळून येते. पसरणीच्या ग्रामदैवताच्या उत्सवात सगळ्या गावकऱ्यांसमोर कृष्णा भानुमतीशी लग्न करतो. ‘बामणाची पोरगी पळवून आणली,’ म्हणून सगळं गाव तोंडात बोट घालतं. नानीची (आई) प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच विरोधाची असते. समजूतदार वडील मात्र आशीर्वाद देतात आणि वेगळं बिऱ्हाड करायला सांगतात.
‘माझं काव्य आणि तुमचा आवाज’ मिळून आपण कला क्षेत्र गाजवू, असं भानुमती कृष्णाला सतत सांगत असते. कृष्णालाही तिच्या कलेची कदर असते. मात्र, पुढं गोष्टी बिनसत जातात आणि भानुमती कृष्णापासून दुरावते. कृष्णाचा पुढचा सगळा प्रवास म्हणजे एका साध्या-सुध्या माणसाचं रूपांतर ‘महाराष्ट्र शाहिरा’त होण्याचा प्रवास आहे. केदार शिंदे अत्यंत आत्मीयतेनं आणि कौशल्यानं हा सगळा प्रवास आपल्याला दाखवतात.
शाहीर साबळे एका कार्यक्रमासाठी रशियाला जातात. तिथं पत्रकार त्यांची मुलाखत घेतात आणि फ्लॅशबॅकमधून आपल्याला सगळी कथा उलगडत जाते. चित्रपटाची सुरुवातच ‘आकाशवाणी’वर अय्यर नावाच्या अमराठी अधिकाऱ्याकडून शाहिरांना ‘महाराष्ट्र’ शब्द वारंवार उच्चारू नका, अशा दरडावण्याने होते. त्यानंतर शाहीर रेकॉर्डिंगच्या वेळी काय करतात, हे चित्रपटातच बघायला हवं.
महाराष्ट्राच्या लोकसंगीतात एक मोठा काळ गाजविणाऱ्या शाहिराचा जीवनपट अडीच तासांत दाखवणं कठीण आहे. मात्र, केदार शिंदे हे आव्हान अतिशय कौशल्यानं पेलताना दिसतात. त्यांच्या आजोबांचाच हा चरित्रपट असल्यानं त्यांची यातली भावनिक गुंतवणूक जाणवते. जोडीला अजय-अतुल यांचं बहारदार संगीत असल्याने चित्रपट बघताना कुठे क्षणभरही कंटाळा येत नाही.
चित्रपटात काही त्रुटी आहेत. झेंड्याबाबतच्या, तसेच कला दिग्दर्शनातला (त्या काळात नसलेल्या वस्तू दिसणे वगैरे) काही चुका जाणवतात. मात्र, सिनेमाचा वेग चांगला असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करून कथेत गुंतून राहतो. कास्टिंगबाबत काही त्रुटी जाणवतात. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका छोटी असली, तरी तो कलाकार बाळासाहेब म्हणून अजिबातच शोभत नाही. तसंच सानेगुरुजींच्या पात्राचं. तुलनेत गाडगेबाबा जमले आहेत.
शाहीर साबळे चरित्रनायक असले, तरी त्यांची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा चितारण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे आणि त्यांना हाडामांसाचा, आपल्यासारखाच एक माणूस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे अभिनंदनीय! नाही तर एरवी चरित्रनायक हा इतरांपेक्षा महान दाखवण्याच्या नादात लॉजिकचं भान अनेकदा सुटतं. तसं इथं झालेलं नाही. शाहिरांच्या आयुष्यात आलेल्या आई, भानुमती, मालती कदम आणि मुली चारुशीला व वसुंधरा या सर्व स्त्री-व्यक्तिरेखा विशेष लक्षात राहणाऱ्या झाल्या आहेत. विशेषत: आईची भूमिका करणाऱ्या शुभांगी सदावर्ते यांनी कमाल केली आहे. त्यांना यापूर्वी ‘देवबाभळी’ नाटकात पाहिलं होतं. यात त्यांनी मुलाच्या गाण्याला विरोध करणारी, मात्र त्याचं भलं व्हावं म्हणून सतत झटणारी आणि मुलगा मोठ्ठा शाहीर झाल्यावर आपली चूक सहज कबूल करणारी नानी फार लोभस साकारली आहे.
दुसरं कौतुक करायचं ते सना शिंदेचं. केदार शिंदेंच्या या लेकीनं भानुमतीची तुलनेनं अवघड अशी भूमिका ताकदीनं पेलली आहे. भानुमती यांच्याविषयी मला आधी काहीच माहिती नव्हतं. बहुसंख्य प्रेक्षकांचं तसंच असणार. अशा परिस्थितीत ही भूमिका नकारात्मकतेकडं झुकू न देता, उलट तिच्याविषयी सहानुभूती वाटावी, अशा संतुलित पद्धतीनं रंगवणं हे सोपं काम नव्हतं. मात्र, केदार शिंदेंनी आपल्या लेकीकडून चांगलं काम करवून घेतलं आहे. आजीच्या छोट्याशा भूमिकेत निर्मिती सावंत आपला ठसकेबाज ठसा उमटवून जातात. अंकुश चौधरीनं शाहीर साबळेंची भूमिका अतिशय उत्तमरीत्या साकारली आहे. तरुण वयातल्या कृष्णापासून ते वयोवृद्ध शाहिरांपर्यंतचा या व्यक्तिरेखेचा प्रवास त्याने अभ्यासपूर्ण सहजतेनं उभा केला आहे. अंकुशच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका ठरावी.
सिनेमाचं संगीत अप्रतिम आहे. मला ‘मधुमास’सोबतच ‘गाऊ नको रे किस्ना’ विशेष आवडलं. बाकी सर्व शाहिरी ढंगाची आणि शाहीर साबळेंनी लोकप्रिय केलेली ‘या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’, ‘मला दादला नको गं बाई’, ‘विंचू चावला,’ ‘हे पावलंय देव माझा मल्हारी’, ‘अंबाबाई गोंधळाला ये’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या’, ‘मी तर होईन चांदणी’, ‘या गो दांड्यावरनं’ आदी सगळीच गाणी एक से एक झाली आहेत. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे तर कळसाध्यायाचं गाणं. त्यात मध्येच शाहीर साबळेंचा ओरिजनल ट्रॅक वापरण्याची कल्पना दाद देण्यासारखी! एकूणच या चित्रपटाचं ध्वनिआरेखन आमचे मित्र मंदार कमलापूरकर यांनी भन्नाट केलं आहे.
या चित्रपटात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ आहे. यशवंतराव चव्हाणांसोबतचा एक प्रसंग शाहिरांच्या राजकीय जाणिवेचं दर्शन घडवणारा आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर बाळासाहेब ठाकरेंची व शाहिरांची भेट व त्यातून ‘आंधळं दळतंय’ या तेव्हा अतिशय गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या नाटकाची निर्मिती हा सगळा प्रवास उत्तरार्धात येतो. रुमादेवी यांच्याकडून कलकत्त्यातील महोत्सवाला आलेलं आमंत्रण आणि तिथं मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर मुली वसुंधरा व चारुशीला यांनी केलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या अजरामर व तुफान लोकप्रिय कार्यक्रमाची निर्मिती हा सगळा भाग आपल्याला उत्तरार्धात दिसतो.
शाहिरांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असलेल्या राजा मयेकरांचा ट्रॅकही व्यवस्थित येतो. राजा बढे व श्रीनिवास खळे यांच्यासोबत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गाण्याच्या ध्वनिमुद्रणाचा प्रसंगही यात आहे. त्यात शाहीर साबळे हे गाणं शाहीर अमर शेखांच्या आवाजात ध्वनिमुद्रित व्हायला हवं, असं आग्रहानं सांगतात. अर्थात गाणं शेवटी शाहीर साबळेंकडूनच गाऊन घेतलं जातं. अशा अनेक लहान-मोठ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगांची गुंफण या चित्रपटात आहे. हे संदर्भ ज्यांना ठाऊक आहेत, त्यांना ते बघताना विशेष आनंद होतो. ज्यांना ते माहिती नाहीत, त्यांना त्याविषयी कुतूहल वाटून, त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास अधिक नेमकेपणानं जाणून घेतला तर ते या सिनेमाचं यश असेल.
आज महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात अधोगती होताना दिसतेय. राजकीय क्षेत्राचं तर विचारायलाच नको. अशा वेळी सर्व जाती, धर्म, प्रादेशिक वाद या सर्वांपलीकडे जाऊन मराठी मातृभाषा असणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाला हात घालण्याची ताकद असणारा एक मोठा लोकशाहीर आपल्या भूमीत होऊन गेला, हे सर्वांना माहिती असायला हवं. त्या जोडीला आपलं हे राज्य नक्की कोणत्या मुशीतून घडलंय, आपला वारसा नक्की कोणता आहे, आपल्या मराठी मातीचा ‘डीएनए’ काय आहे याचा थोडा फार अंदाज या कलाकृतीतून येतो. त्यामुळे सर्व मराठी माणसांनी, विशेषत: आपल्या पुढच्या पिढीला घेऊन हा चित्रपट नक्की बघायला हवा.
----
दर्जा - साडेतीन स्टार
---
No comments:
Post a Comment