----------------------
राघवच्या वर्गात होता रघू. तो नुकताच, म्हणजे गेल्या वर्षी त्याच्या वर्गात आला होता. मात्र, वर्ष-सव्वा वर्षात राघवची व रघूची चांगली गट्टी जमली होती. रघूचा मामा आयआयटीतून इंजिनीअर झाला होता; मात्र नोकरी न करता त्यानं पुण्याजवळ एक फार्म हाऊस, म्हणजेच शेतघर बांधलं होतं आणि तिथंच थोडी शेतजमीन घेऊन तो त्यात नवनवे शेतीचे प्रयोग करीत होता. त्याचं नाव आनंदमामा. मुळशी तालुक्यात सांदणवाडी नावाच्या छोट्या गावात तो राहायचा. रघूला हा मामा फार आवडायचा. त्यात राघवला सख्खा मामा नसल्यानं त्याला रघूचा फार हेवा वाटायला लागला. रघू यंदाची दिवाळी मामाकडं जाऊन शेतावर साजरी करणार आहे, हे कळल्यावर राघवला तर फारच ‘जेलस’ वाटायला लागलं. शेवटी त्यानं हिय्या करून रघूला विचारलंच - मलाही येता येईल का रे तुझ्या मामाकडे? रघूनं हे ऐकताच आनंदानं उडीच मारली. ‘अरे, मीच तुला विचारणार होतो, की तू येतोस का माझ्यासोबत?’ असं म्हणून त्यानं राघवला टाळी मागितली. राघवचे डोळे आनंदानं लकाकले आणि त्यानं रघूला टाळी तर दिलीच, वर मित्राला एक घट्ट मिठीही मारली.
दोघांनी एकत्रच सांदणवाडीला जायचं, असं ठरलं होतं. मात्र, राघवचे बाबा नेमके त्याच दिवशी परदेशात जाणार असल्यानं रघू मामासोबत पुढं निघून गेला. बाबांना ‘बाय’ करण्यासाठी राघवनं घरीच थांबावं, अशी त्याच्या आईची इच्छा होती. राघवलाही बाबासाठी थांबावंसं वाटू लागलं. पण त्यानं एकट्यानं एसटी बसनं सांदणवाडीला जायची परवानगी मागितली. बाबाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आई बसमध्ये बसवून द्यायला येणार होती आणि तिकडं आनंदमामा रघूसोबत उतरवून घ्यायला येणार होता. मग काही प्रश्नच येणार नव्हता! सगळं ठरलं. ठरल्याप्रमाणे बाबा त्या दिवशी संध्याकाळी कॅब करून मुंबईला फ्लाइट पकडायला निघून गेला. बाबा गेल्यामुळं राघव आणि त्याच्या आईला फारच बोअर व्हायला लागलं. मग ते दोघं आईच्या टू-व्हीलरवरून जवळच राहणाऱ्या त्याच्या आजी-आजोबांकडं गेलं. त्या सोसायटीत राघव नेहमीच जात असल्यानं तिथंही त्याचे काही मित्र होतेच. त्यांच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. रात्री झोपतानाही राघवच्या डोळ्यांसमोर ती कधीही न बघितलेली सांदणवाडी आणि तिथं जाण्यासाठी होणारा एसटीचा पहिलावहिला एकट्यानं करायचा प्रवास याचीच स्वप्नं पडत राहिली.
सकाळ झाल्यावर कुठलीही सबब न सांगता, राघवनं स्वत:हून सगळं भराभर आवरलं. सॅक भरली. नवा टी-शर्ट आणि जीन्स, नवे शूज घालून तो अगदी सज्ज झाला. ब्रेकफास्ट करून झाला. आईनं कॅब बुक केली आणि ते दोघं स्वारगेटला निघाले. आईनं त्याला वडगावच्या बसमध्ये बसवून दिलं. कंडक्टरलाही सांगितलं. सांदणवाडी फाट्यावर आनंदमामा येणार होताच. तसं तिनं मोबाइलवरून मामाला कळवलं. राघवकडेही बटणांचा मोबाइल फोन होता. त्याच्या आई-बाबांनी नुकताच त्याला तो घेऊन दिला होता. स्मार्टफोन मात्र त्याला दहावी झाल्यावरच मिळणार होता. राघव खूश होता. गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती. मात्र, खूप खचाखच भरलेलीही नव्हती. त्याला व्यवस्थित खिडकीची सीट मिळाली होती. एसटीचा हा एकट्यानं केलेला त्याचा पहिलाच प्रवास पुढं अविस्मरणीय ठरणार आहे, याची त्याला तरी कुठं कल्पना होती!
गाडी सुरू झाली. पौड रोडवरून चांदणी चौकात आली. नव्यानं झालेल्या फ्लायओव्हरच्या भुलभुलय्यातून ड्रायव्हरदादांनी बरोबर गाडी पौडच्या दिशेनं काढली. राघव बाहेर बघत होता. त्यांच्या कारपेक्षा बसची उंची जास्त असल्यानं इथून बाहेरचं सगळं दृश्य वेगळंच दिसत होतं. राघव बऱ्याच दिवसांनी एसटीत बसला होता. यापूर्वी आपण एसटीत कधीच बसलो नव्हतो, असंच त्याला वाटत होतं. तो सगळ्या प्रवाशांचं निरीक्षण करत होता. काही जण शर्ट-पँट घातलेले, तर काही धोतर नेसलेले. काही पायजमा घालणारे, तर एखाद-दुसरा तरुण बर्मुड्यावर. बायका बहुतेक साडीत. दिवाळीचा सीझन असल्यानं जरा जास्तच नट्टा-पट्टा केलेल्या. त्यातल्या काही मावशा नऊवारी साडी नेसलेल्या, मोठ्ठं कुंकू लावलेल्या. लहान मुलंही होती त्या गाडीत. त्यांची एक तर रडारड सुरू होती, नाही तर आरडाओरडा. या सगळ्या गोंधळात ड्रायव्हरकाका एकदम शांतपणे समोर बघून गाडी चालवत होते, तर कंडक्टरकाका सगळ्यांना सांभाळत, तिकीटवाटपाच्या कामात मग्न होते. राघवला फार मजा वाटत होती. त्यानं हळूच त्याच्या सॅकमधून आईनं दिलेला खाऊ काढला. त्यात एक बेसनाचा लाडू होता, तर काही कडबोळी! राघवनं शेजारी बसलेल्या मुलाला कडबोळी द्यायचा प्रयत्न केला, पण तो छोटासा मुलगा नुसताच हसायचा आणि पलीकडं बसलेल्या त्याच्या आईकडं बघायचा. आई बहुतेक मानेनंच त्याला ‘काही घ्यायचं नाही दुसऱ्याचं’ असं सुचवीत असावी. कारण ते पोरगं नुसतंच हसत होतं. अर्धा तास प्रवास केल्यावर गाडी थांबली. कुठला तरी स्टॉप आला असेल, असं आधी सगळ्यांना वाटलं. पण तसं नव्हतं. कारण गाडीच्या आजूबाजूला तसं काहीच नव्हतं. ड्रायव्हरनं गाडी थोडी रस्त्याच्या कडेला लावली होती. तो खाली उतरला. काही तुरळक प्रवासीही लगेचच खाली उतरले. थोड्या वेळानं कंडक्टरकाका बातमी घेऊन आले, की गाडी बंद पडली आहे. राघवला ते ऐकून जरा भीती वाटली. म्हणजे आपण इथं कुठं फसलो, यापेक्षा आनंदमामा व रघू त्याची वाट बघत फाट्यावर थांबलेले असतील या कल्पनेनं त्याला जरा काळजी वाटली. राघवने पटकन मोबाइल काढला. फोन करून आनंदमामाला उशिराचं कळवावं, असा विचार त्याने केला. मात्र, त्यांची बस जिथं थांबली होती तिथं मुळीच रेंज नव्हती. त्यामुळं राघवचा तो प्रयत्नही फोल ठरला.
हळूहळू बसमधले सगळेच प्रवासी खाली उतरले. हवा थंडगार होती. आजूबाजूला डोंगर होते, झाडी होती. नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यामुळं धरणी सगळी हिरवीगार झाली होती. राघवला ते दृश्य बघून मनोमन आनंद झाला. रघूच्या गावी किती मजा येईल, याचा विचार तो करू लागला. एसटीतले बहुतेक सगळे लोक खाली उतरले होते. त्यातले काही जण नक्कीच वैतागले होते, मात्र बरेच जण आनंदात होते. कुणी एकमेकांशी गप्पा मारत होते, कुणी नुसतेच फिरत होते, कुणी आपल्याजवळच्या खाण्याच्या जिनसा काढून खात होते, तर काही जण ड्रायव्हर-कंडक्टरशी बोलत होते. दुरुस्तीला बराच वेळ लागणार, असं कळलं. राघव आता जरा काळजीत पडलाच. आनंदमामाचा फोन लागणं महत्त्वाचं होतं. त्यानं गाडीतल्या काही लोकांना विचारून त्यांच्या फोनला रेंज आहे का हे विचारलं. मात्र, तिथं कुठल्याच फोनला रेंज नव्हती. थोड्या अंतरावर जरा चढावर काही घरं दिसत होती. तिथपर्यंत गेलं, तर रेंज येईल, असं कुणी तरी म्हणालं. काही लोक तिकडं निघालेही. राघवला काय वाटलं कुणास ठाऊक; तोही त्या लोकांसोबत चालू लागला. पाच-दहा मिनिटांची उभी चढण चढल्यावर ती छोटी वाडी आली. तिथली घरं अगदी नवी बांधलेली दिसत होती. मोजून आठ-दहा घरं असावीत. तिथं पोचल्यावर राघवच्या सोबत आलेल्या माणसांनी तिथल्या पहिल्या घरात डोकावून, एसटी बंद पडल्याचं सांगितलं. त्या घरातल्या कारभाऱ्यानं तातडीनं पाण्याचा गडू आणून त्यांच्यासमोर ठेवला. माठातलं ते गार पाणी पिऊन सगळ्यांनाच छान वाटलं. त्या घरातून एक मावशी बाहेर आल्या. त्यांनी पण पुन्हा सगळी चौकशी केली. त्यांच्या मागून हळूच एक छोटी मुलगी डोकावली. असेल सहा-सात वर्षांची! राघवला ती मुलगी फार आवडली. तीही राघवकडं बघून हसली. त्या घरातही दिवाळीचं वातावरण होतं. समोर एक आकाशकंदील टांगला होता. घरासमोर चांगली रांगोळी काढली होती. पणत्या ठेवल्या होत्या. दुपारची वेळ झाली होती. एसटी दुरुस्त व्हायची काही चिन्हं नव्हती. त्या घरापासून खाली रस्त्यावर उभी असलेली गाडी स्पष्ट दिसत होती. थोड्या वेळात अजून एक एसटी तिथं आलेली दिसली. ती पुण्याच्या दिशेनंच निघाली होती. राघवच्या गाडीचा ड्रायव्हर त्या एसटीच्या ड्रायव्हरशी काही तरी बोलला. राघव हे सगळं वरून बघत होता. त्याला एकदम आनंदमामाची आठवण आली. त्यानं मोबाइल काढला, तर अगदी थोडीशी रेंज आली होती. त्यानं लगेच मामाला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजली, पण कुणी फोन उचलला नाही. राघवनं हताश होऊन फोन बंद केला.
ती लहान मुलगी मगापासून राघवकडंच बघत होती आणि नुसतीच हसत होती. तिचा गालगुच्चा घ्यावा, असं राघवला फार वाटलं. अर्थात त्यानं लगेच तसं काही केलं नाही. त्याच्याबरोबर आलेले माणसं आणि त्या घरातले काका आता गप्पा मारायला लागले. राघवचा एक कान तिकडं होताच. त्याला त्या गप्पांमधून कळलं, की चार-पाच वर्षांपूर्वी त्या गावावर दरड कोसळली होती आणि इथल्या वस्तीतील बरीच घरं त्या दरडीखाली दबून जमीनदोस्त झाली होती. त्या गावातील अनेक लोकांचा जीव त्या भयंकर दुर्घटनेत गेला होता. त्या घरातील एक मुलगाही त्या दुर्घटनेत गेला होता. हे सांगताना त्या काकांना आणि त्या मावशींना हुंदका आवरेना. वातावरण अचानक गंभीर झालं. राघवला आता राहवेना. तो अचानक पुढं झाला आणि त्या मुलीला म्हणाला, तुझं नाव काय गं? त्यावर ती मुलगी ‘माझं नाव ऊर्मी’ असं म्हणून आत पळून गेली. राघवनं तिला परत हाक मारली, तशी ती आतून एक वस्तू घेऊन बाहेर आली. तिच्या हातात एक घड्याळ होतं. ते घड्याळ अर्थातच बंद होतं. तिच्या भावाचं ते घड्याळ होतं. जेव्हा दरड पडली, तेव्हाची - पहाटे पावणेचारची - वेळ अजूनही ते घड्याळ दाखवत होतं. तिचा भाऊ तेव्हा वरच्या बाजूला असलेल्या त्याच्या मित्राच्या घरी झोपायला गेला होता. दुर्दैवानं तेच घर सर्वांत आधी दरडीखाली सापडलं आणि त्यातच तिच्या भावाचा प्राण गेला होता.
ऊर्मीनं ते घड्याळ राघवला दाखवलं. ती काहीच बोलली नाही. तिची आईच बोलत होती. एकीकडं हुंदके देत होती. बोलता बोलता अचानक म्हणाली, पोरा, तुझ्याएवढाच होता रे आमचा कृष्णा... राघवच्या पोटात एकदम गलबललं. त्याच्या हातात त्याच्या बाबांनी परदेशातून आणलेलं भारीतलं घड्याळ होतं. त्याला काय वाटलं, कुणास ठाऊक! त्यानं एकदम ते घड्याळ काढलं आणि ऊर्मीला दिलं. तो एकदम म्हणाला - ऊर्मी, मलाच तू कृष्णा समज. मीच आता तुझा भाऊ...
त्याचं हे बोलणं ऐकून ऊर्मी तर आनंदानं उड्याच मारायला लागली. तिच्या आईला तर अश्रूच आवरेनात. तिनं राघवला पोटाशी धरलं. राघवसोबत आलेली एसटीतील माणसं चकित होऊन हे सगळं बघत होती. ऊर्मीचे बाबाही भारावले होते. त्या मुलीच्या आईनं आतून एक तबक आणलं आणि त्या मुलीच्या हातात दिलं. तिनं तिला राघवला ओवाळायला सांगितलं. राघवला काहीच समजेना. तो आश्चर्यचकित होऊन त्या मावशींकडं बघत होता. त्या म्हणाल्या, ‘अरे बाळा, आता दोन-तीन दिवसांत भाऊबीज येईलच. आमच्या ऊर्मीला ओवाळण्यासाठी आता कुणीच नव्हतं ना... आता तू तिचा भाऊ झालास... म्हणून ही ओवाळणी. आता दर वर्षी इथं यायचं...’
अवघ्या काही मिनिटांत तयार झालेल्या त्या विलक्षण नात्याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतंय हे राघवला ठरवता येईना. आजूबाजूचे सगळेच तसे विस्मयचकित होऊन हा सोहळा पाहत होते.
अचानक खाली एसटीजवळ गलका ऐकू आला. ती एक जीप होती. त्यातून एक उंचापुरा, हॅट घातलेला माणूस आणि एक मुलगा उतरले. अरेच्चा! हा तर रघू आणि तो बहुतेक त्याचा आनंदमामा असणार... राघवनं वरून, लांबून बघूनच त्यांना ओळखलं. तो उड्या मारतच खालच्या रस्त्याला आला. रघूला बघताच त्यानं त्याला जोरदार मिठी मारली. आनंदमामानं त्याला एक टप्पल मारली आणि म्हणाला, चला राघवशेठ! आम्ही आलो आहोत तुला न्यायला... तुझी एसटीची सफर इथंच पुरे आता...
राघवला कळेचना, की आनंदमामाला कसं कळलं की आपली गाडी बंद पडलीय ते... मामानं सांगितलं, की त्याचा एक मित्र बाइकवरून पुण्याहून त्याच्या गावी येत होता. वाटेत एक एसटी बंद पडल्याचं त्यानं सहज मामाला सांगितलं. राघवचा फोन लागेना तशी मामाला काळजी वाटू लागली आणि एका क्षणी त्यानं आपली जीप काढून उलट पुण्याच्या दिशेनं जायचा निर्णय घेतला. त्या ठिकाणाहून मामाचं फार्म हाऊस फार लांब नव्हतं. जेमतेम १०-१२ किलोमीटर अंतरावर पुढं ते होतं.
आता राघवनं एसटीतली त्याची बॅग काढली आणि तो मामाच्या जीपमध्ये बसला. एसटीतल्या लोकांना टाटा, बाय बाय करून ते तिघं मामाच्या फार्म हाऊसकडं निघाले. मामा म्हणाला, आता मजा येईल. तिकडं दिवाळी जोरात साजरी करू.
राघव मनात म्हणाला, माझी दिवाळी तर आधीच सुरू झाली आहे. भाऊबीज झाली पण...
मागून लाइट चमकले म्हणून त्यानं मागं बघितलं, तर तो ज्या एसटीतून येत होता, ती दुरुस्त होऊन अगदी त्यांच्या गाडीच्या मागे मागेच पळत येत होती... संध्याकाळ व्हायला लागली होती... राघवनं परत मागं बघितलं... दूर डोंगरावर एका घरावरचा आकाशकंदीलही आज जरा लवकरच प्रकाशमान झाला होता!
---