‘सचोटीनं जगणं फार गरजेचं’
सुमीत राघवन हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत माहिती झालं ते ‘फास्टर फेणे’ या दूरदर्शन मालिकेपासून. अगदी लहान वयात अभिनयाची कारकीर्द सुरू केलेल्या सुमीतचं अष्टपैलुत्व गेल्या चार दशकांत विविध क्षेत्रांत सिद्ध झालेलं आहे. हिंदी दूरचित्रवाणीवरील सर्वांत लोकप्रिय कलाकार ते सामाजिक जाणीव जपणारा अस्सल मुंबईकर मराठी माणूस असा सुमीतनं सर्वत्र ठसा उमटवला आहे. या वर्षी ‘एकदा काय झालं...!’ या मराठी चित्रपटातील सुमीतचं अप्रतिम काम वाखाणलं गेलं. याशिवाय ‘वागले की दुनिया’ या मालिकेतील त्याचा ‘राजेश वागळे’ घरोघरी लोकप्रिय झाला आहेच. अशा या हरहुन्नरी आणि उत्तम अभिनेत्याशी खास दिवाळीनिमित्त झालेला हा संवाद...
१. सुमीत, सध्या तुझा 'एकदा काय झालं...!!' चित्रपट गाजतो आहे. यातल्या तुझ्या भूमिकेविषयी सांग. त्या जोडीनेच असं विचारतो, की संवाद साधण्याचं, आपलं म्हणणं दुसऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचं महत्त्व या कलाकृतीतून अधोरेखित केलंय. सध्याचा विसंवादाचा काळ बघता या गोष्टीचं महत्त्व तुला किती वाटतं?
सुमीत - आधी ही भूमिका माझ्यापर्यंत कशी आली ते सांगतो. प्रत्येक गोष्टीला एक पार्श्वभूमी असते, तसंच झालं. सलीलची (संगीतकार - दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी) आणि माझी मैत्री २००७ पासूनची. ‘सारेगमप’चं एक सेलिब्रिटी पर्व आलं होतं. त्यात चार मेंटॉर होते, त्यात एक सलील होता. सलील मला मेंटॉर करत नव्हता, पण तिकडं आमच्या भेटीगाठी व्हायच्या. मग दोस्ती झाली. त्यात आमच्या कॉमन आवडीचा विषय म्हणजे ‘गोलमाल.’ पालेकरांचा चित्रपट. हृषीदा, लतादीदी असे खूप कॉमन आवडीचे विषय निघाले. सलीलशी मग नियमित बोलणं सुरू झालं. अधूनमधून भेटी व्हायच्या. त्यानं ‘वेडिंगचा शिनेमा’ हा सिनेमा दिग्दर्शित केलाय, हेही समजलं. दरम्यान, नोव्हेंबर २०१९ मध्ये मी माझ्या स्वत:च्या सिनेमाचा घाट घातला होता. सप्टेंबरपासून त्याची तयारी सुरू होती. तेव्हा आमचा कॉमन मित्र, जो आमचा कार्यकारी निर्माताही आहे, नितीन वैद्य - तो म्हणाला, की सलीलला तुला एक गोष्ट ऐकवायची आहे. सलील सिनेमा करणार म्हणजे काही प्रश्नच नाही. त्याच्या गाण्यात त्यात किती दर्जा त्यानं राखला आहे! मग केवळ औपचारिकता म्हणून मी ती स्क्रिप्ट ऐकली आणि त्या कथेच्या प्रेमात पडलो नसतो तरच नवल! माझ्या रेझ्युमेमधील मराठीतला हा पहिल्या क्रमांकाचा चित्रपट असेल, हे नक्की. आज ३७ वर्षं मी अभिनय करतोय. १९८५ पासून बालकलाकार म्हणून काम करायला मी सुरुवात केली. मी ज्या पद्धतीची कामं निवडतो, त्यात मी नेहमी आपल्याला काही तरी ‘ड्राइव्ह’ करणारं, आपल्या चौकटीतून, चाकोरीतून जरा बाहेर आणेल असं काही तरी काम करावं अशी माझी इच्छा असते. मग ती ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मधील डॉ. श्रीराम लागूंची भूमिका असेल, किंवा ‘हॅम्लेट’सारखं नाटक असेल... तसा हा चित्रपट मिळाला. पहिल्यापासूनच त्या भूमिकेचा कुठे तरी सूर मिळाला. नट नेहमीच म्हणतात, की मी असा दिसेन, जरा वजन कमी करीन किंवा वाढवीन, जरा केस असे करीन वगैरे. हे सगळं बरोबर आहे. पण मला असं वाटतं, की सुरुवात आतून होते. आतून तो सूर मिळणं महत्त्वाचं असतं. मी १९९१ मध्ये चंद्रकांत कुलकर्णींचं ‘ज्वालामुखी’ नावाचं नाटक करत होतो. प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ हे तेव्हा ३१ वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र आले होते. तिकडेच चिन्मयी आणि माझी पहिली भेट झाली. त्यामुळं माझ्यासाठी हे नाटक ‘स्पेशल’ आहे. (हसतो.) तेव्हा एक मित्र म्हणाला, की सुमीत, त्या भूमिकेचा सूर फार मस्त होता रे! तेव्हा मला पहिल्यांदा असं जाणवलं, की हा सूर गवसणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला गाण्याचं अंग असणं हा भाग अलाहिदा; पण कुठल्याही भूमिकेचा एक अंतर्गत सूर असतो, तो सापडणं फार महत्त्वाचं आहे. या सिनेमाच्या बाबतीत सगळ्याच गोष्टींत हा एकजिनसीपणा होता. त्यामुळं खरं तर मला काही फार वेगळं करावं लागलं नाही किंवा ‘आता या भूमिकेचा विचार करतो’ वगैरे असं काही करावं लागलं नाही. सलीलनं जे मुळात लिहिलं होतं ते ओघवतं होतं. कुठंही ते ‘संवाद’ असे वाटत नव्हते. आपण रोज घरी बोलतो तशीच साधी-सोपी भाषा होती.
यातल्या संवादाबाबतच्या दुसऱ्या प्रश्नाविषयी सांगावंसं वाटतं, की यातल्या प्रभावी संवादाचा जो संदेश आहे, तो फारच महत्त्वाचा आहे. आता घरोघरी अगदी डायनिंग टेबलवरही आपण सगळे - मुलांसकट - हातात मोबाइल घेऊनच बसलेले असतो. कुठे तरी तो संवाद खुंटला आहे. हा तर झाला नेहमीच्या संवादाचा मुद्दा. मला असंही वाटतं, की गृहीत धरणंही वाढलं आहे. मग ते राजकीय पातळीवर असेल, धार्मिक पातळीवर असेल. आपण सतत मतं देऊन मोकळे होतो. दुसऱ्याची बाजू समजून घेणं याला खीळ बसलीय. म्हणूनच आज सगळीकडं तुम्हाला एक प्रक्षोभ जाणवतो. एक अस्वस्थता जाणवते. मला एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायची असेल, तर ती मी शांतपणे, एका जागी बसून सांगितली पाहिजे. घराघरांत हे होणं फार गरजेचं आहे. आज आपल्या कुटुंबाचेही व्हॉट्सअपचे ग्रुप झाले आहेत. त्यात काहीच गैर नाही. शुभेच्छाही आपण समाजमाध्यमांवरच देतो. आपण फोन उचलून एखाद्याला मनमोकळेपणाने शुभेच्छा नाही देत! या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. या सिनेमातून हेच सांगितलं आहे, की संवाद महत्त्वाचा आहे. मनं जपणं फार महत्त्वाचं आहे. संवाद साधत राहिलं पाहिजे. वाद होतातच, वाद होणारच. ‘अरे’ला ‘कारे’ होणारच. पण मार्ग निघू शकतो. माझे बाबा नेहमी म्हणतात, की जिकडे तुम्हाला वाटतं ना, की ठिणगी पडणार आहे, तर तिथून दोन पावलं मागेच राहा. नमतं घेण्यामध्ये तुमचं काहीही जात नाही. आपल्यामध्ये ना, एकूणच ॲप्रिसिएशन कमी झालेलं आहे. आपण कौतुक नाही करत पटकन! का हा आडमुठेपणा असतो, का इगो असतो, का माहिती नाही. पण कौतुक नाही केलं जात लवकर. आपल्यात इगो फार असतो. आपला इगो लहान हवा आणि विचार मोठा हवा. आपल्याकडे नेमकं उलटं असतं.
२. तू टीव्हीवरचा एक अतिशय लोकप्रिय कलाकार आहेस. अनेक वर्षं आहेस. तुझी सध्या सुरू असलेली 'वागले की दुनिया' मी नियमित पाहतो. ती बघताना मला असं वाटतं किंवा जाणवतं, की यातला राजेश वागळे आणि तू यांच्यात बरंच साम्य असावं. तर त्याविषयी काय म्हणशील? मराठी घरांतली मध्यमवर्गीय मूल्यं जपण्याचा या मालिकेतून एक प्रयत्न जाणवतो. तो सुखद वाटतो. तुझं त्यात किती योगदान आहे?
सुमीत - केवळ मराठीच नाही, तर जिकडं मध्यमवर्ग आहे त्या सगळ्यांचीच गी गोष्ट आहे. या वर्गाची जी मूल्यं आहेत, ती कुठं तरी लयास चालली आहेत, असं मला वाटतं. तर त्या मूल्यांची एकदा उजळणी व्हावी, त्यावर कुठं धूळ बसली असेल, तर ती झटकावी. आजी आणि आजोबांचं किती महत्त्व आहे, ते लोकांपर्यंत पोचावं. मान्य आहे की आज आपण एकत्र कुटुंबात नाही राहत, सगळ्या न्युक्लिअर फॅमिली आहेत; पण घरात कुठं मोठं माणूस आलं, तर त्याच्या पाया पडावं, त्यांना मिठी मारणं, त्यांची विचारपूस करणं हे सगळंच गरजेचं आहे. हा राजेश वागळे आहे माझ्यासारखा! थोडा साहिल साराभाईसुद्धा आहे माझ्यामध्ये (हसतो); पण ‘राजेश वागळे’ खूप आहे माझ्यामध्ये. याचं कारण मी एक नागरिक म्हणून खूप सजग आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांपासून ते वाहतूक कोंडीपर्यंत सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो. त्यामुळं तो एक ‘कॉमन मॅन’ प्रतिबिंबित करणारा मी एक नट आहे, असं मला वाटतं. मी माझ्या बाजूने सतत काही मुद्दे देत असतो मालिकेच्या लेखकांना. एखादं साधं वाक्य असेल, तर मला वाटतं, की नाही, आपण याला जरा धार आणू या. मध्यंतरी मासिक पाळीबद्दल आम्ही एक एपिसोड केला किंवा ‘गुड टच बॅड टच’बद्दल एक भाग केला. तर मला वाटतं, की त्यात मग उगाचच हातचं राखून नको काही करायला. करतोय ना, तर आपण बिनधास्त करू या. जास्तीत जास्त काय होईल? काही नकारात्मक प्रतिक्रिया येईल. पण खरं सांगायचं तर तसं काहीच होत नाही. उदाहरणार्थ, आम्ही एक ‘ॲडल्ट डायपर’वर एक भाग केला. तो एक ज्वलंत विषय आहे ज्येष्ठ नागरिकांचा. अशा वेळी कधी कधी त्यात संवाद अगदी बाळबोध येतात. मी लेखकांना दोष देत नाही, कारण त्यांना महिन्याकाठी २५-२५ एपिसोड लिहायचे असतात. उलट मी नेहमी म्हणतो, की टेलिव्हिजन असेल किंवा सिनेमा असेल, यात खरा सुपरस्टार कोण असतो तर ज्याच्या हातात पेन असतं ना, तो खरा सुपरस्टार असतो. आम्ही डॉ. लागू म्हणाले, तसं केवळ ‘लमाण’ आहोत. आम्ही त्यांचे शब्द फक्त प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. ते आमचं कसब आहेच, पण तरी ‘शब्द’ महत्त्वाचे आहेत. पण कधी कधी असं होतं, की नाही एखाद्या संवादात मजा येत! मग मी तिथं मदत करतो. अशा वेळी तुमचा अनुभव महत्त्वाचा ठरतो. माझ्याकडं आज एक अवलंबून राहता येणारा कलाकार म्हणून बघितलं जातं. तर ते का बघितलं जातं? मी आमच्या निर्मात्याला विचारलंही, की नेहमी माझं पात्रच का ‘ग्यान’ देत असतं रे? मीच का सदैव ‘प्रभू रामा’च्या भूमिकेत असतो? तर तो म्हणाला, की सुमीत, तू जे बोलतोस ना, ते लोक ऐकतात. मी त्यावर एक पॉज दिला. तो म्हणाला, की फार कमी अभिनेते असे आहेत, की ते जे सांगतात ते लोक ऐकतात. तू त्यापैकी एक आहेस.
३. मूल्यांचा विषय निघाला आहे, तर विचारतो, की तू स्वतः काहीएक मूल्यं मानणारा, जोपासणारा, त्याविषयी आग्रह धरणारा कलाकार आहेस. समाजात सध्या अनेक पातळ्यांवर या मूल्यांचा ऱ्हास होताना दिसतोय. तू या बदलांकडे कसं बघतोस? अस्वस्थ होतोस का? समाज म्हणून त्यावर काय उपाय केले पाहिजेत असं तुला वाटतं?
सुमीत - मूल्यांचा ऱ्हास होतोय आणि तो थांबवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण सतत शॉर्ट टर्म विचार करतोय. आपल्याला आपल्या नात्यांचा टिकाऊपणा टिकवून ठेवला पाहिजे. पैसा कमावणं गरजेचंच आहे. ईएमआय हे आपल्या नशिबाचे भोग आहेत. पण तरी आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणं, तो सत्कारणी लावणं या खूप छोट्या गोष्टी आहेत. सहज करता येण्यासारख्या आहेत. आजूबाजूला परिस्थिती कशीही असली, तरी जर घर चांगलं असेल ना, तर त्याचे पडसाद नक्कीच आजूबाजूला, समाजात उमटतात. आपण जेव्हा घरातून बाहेर पाऊल ठेवतो, तेव्हा हे विचार, संस्कार घेऊनच बाहेर पडत असतो. सतत उलट विचार करण्याची गरज नाही. बाहेर आपल्यावर आक्रमणं होतच असतात वेगवेगळ्या गोष्टींची, विचारांची; त्यातलं काय घ्यायचं, काय नाही हे आपले विचार ठरवत असतात. आयुष्य खडतरच आहे, मुंबईतल्या रस्त्यांसारखं; पण सचोटीनं जगणं फार गरजेचं आहे. फार बेसिक आहे हे. कितीही उशीर झाला, तरी मी सिग्नल नाही म्हणजे नाही तोडत. हॉर्न नाही म्हणजे नाही वाजवत. मी कुणालाही लाच नाही म्हणजे नाहीच देत. कुठे पकडला गेलो, तरी मी सांगतो, की मला माफ करा. हे माझं लायसन्स आहे ते जप्त करा. मग मी जो काही दंड आहे तो भरतो. समाज असा आहे, तसा आहे असं म्हणून उपयोग नाही. तुम्ही स्वत:पासून सुरुवात करा. तुम्ही याच समाजाचे घटक नाही आहात का? तुम्हाला कशाला सतत ट्रॅफिक हवालदार लागतो शिस्त लावायला? आपण शिस्त पाळू शकत नाही का? महापालिकेवर मी टीका करतो, सरकारवर टीका करतो. पण टाळी दोन हातांनी वाजते. आम्ही रस्त्यावर कचरा टाकतो. मी रस्त्यावर कचरा टाकलाच नाही, तर किती फरक पडेल! आपण हा विचार का नाही करत?
४. तुझ्या करिअरची सुरुवात 'रंग उमलत्या मनाचे'सारख्या नाटकातून झाली. मध्यंतरी तू 'हॅम्लेट' साकारलास. तो एकूणच फार भव्य प्रयोग होता. त्या अनुभवाविषयी सांग...
सुमीत - हो नक्कीच. माझं पहिलं नाटक ‘मला भेट हवी हो’ आधी आलं. ‘रंग उमलत्या मनाचे’ हे नंतर आलं. चंदूचं (दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी) ते पहिलं नाटक. त्याच्यानंतर लागोपाठ ‘ज्वालामुखी’ केलं १९९१ मध्ये. त्याच्यानंतर २८ वर्षं गेली मध्ये, आणि २०१८ मध्ये अचानक ‘हॅम्लेट’ झालं. चंदूचा फोन आला, की सुमीत, ‘हॅम्लेट’ करू या का? मी म्हटलं, अरे बापरे! नाही रे. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी नाही वाचलं काही शेक्सपिअरचं! मी शेक्सपिअर जो माहिती आहे तो विशाल भारद्वाजने सांगितलेला (हसतो) - ‘मकबूल’, ‘ओंकारा’ आणि ‘हैदर’मधून... तो हसला जोरात! मी म्हणालो, की मी तुझं बोट धरून चालणार. त्यावर तो म्हणाला, काहीच अडचण नाही. मी तुला सगळी माहिती पुरवत जाईन आणि आपण करू या. आणि ते झालं नाटक! चंद्रकांत कुलकर्णी हा एक असा दिग्दर्शक आहे, की ज्याला नाटक कळलंय! ज्याला रंगभूमी कळलेली आहे! तुम्ही हे प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून म्हणा, संहितेच्या दृष्टीने म्हणा, कोरिओग्राफी-मूव्हमेंट-कंपोझिशनच्या दृष्टीने म्हणा... त्याला ते सगळं इतर सुंदर कळलेलं आहे! त्यामुळे इतकी मजा आली ते करताना. आमचा ग्रुप होता त्यात इतकं काही शिकलो खरंच. काय तो होता शेक्सपिअर नावाचा जादूगार! कसं त्यानं लिहिलं असेल... ती हॅम्लेटची सद्सद्विवेकबुद्धी, ती विचार करायची वृत्ती, त्याच्यातलं कविमन, त्याच्यातला आईवर वेड्यासारखा प्रेम करणारा मुलगा, प्रजेच्या गळ्यातला ताईत... अशा इतक्या वेगवेगळ्या भूमिका ‘हॅम्लेट’च्या होत्या, ‘हॅम्लेट’ची रूपं होती. साडेचारशे वर्षांपूर्वी हे लिहिलेलं आहे. त्यात एक नाटकातलं नाटक असतं. त्यात शेक्सपिअर म्हणतो, की अतिरेक करू नका हं काम करताना; जरा नैसर्गिक ठेवा. पाहा हं, साडेचारशे वर्षांपूर्वी अभिनयाबाबत तो हे लिहून गेला आहे. टाळ्यांसाठी अतिरंजित करू नका काही! कमाल आहे. हे एक झालं. पण त्याचे सामाजिक विचार नीट तपासून बघितलेत तर ते आजही कुठे तरी लागू पडतात. हे खरे दूरदृष्टीचे लेखक. प्रशांत दळवी मला सतत लेखनाची सामग्री पुरवत होते. त्यातला एक सीन मी जरा इमोशनल करत होतो. दिग्दर्शकानंही मला तसं सांगितलं. तेव्हा मला डॉ. लागूंचं वाक्य आठवलं. रडणं फार सोपं आहे. उलट तुम्ही ते जेवढं आत ठेवाल, तेवढं ते प्रेक्षकांपर्यंत पोचतं. मला फार तथ्य वाटलं त्यात. जेवढं तुम्ही धुमसत ठेवाल आतमध्ये, तेवढं ते शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोचतं.
६. तू मराठी चित्रपट फार मोजके केलेस. पण त्यात तू 'द माधुरी दीक्षित'चा नायक होतास 'बकेट लिस्ट'मधे... तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? सोबतच, तू 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'मधे डॉ. लागूंची भूमिका फार प्रभावी साकारली होतीस. त्याही अनुभवाविषयी सांग...
सुमीत - मला जेव्हा तेजस देऊस्कर म्हणाला, की मी ‘बकेट लिस्ट’ ही फिल्म करतोय आणि माधुरी करणार आहे. तिच्यासोबत तुला काम करायचंय. मग मी त्याला म्हणालो, की अर्थातच! म्हणजे काय? करणारच. (खळखळून हसतो.) हे काय विचारतोयस फालतू? (खूप हसतो..) जेव्हा माधुरी तिचं आत्मचरित्र लिहील, तेव्हा ती लिहिणार नाही का, की हा माझा हिरो, मराठीतला माझा पहिला हिरो. मग संपलंच! हा झाला गमतीचा भाग. पण खरंच सांगायचं तर नक्कीच अंगावरून मोरपीस फिरवल्यासारखं झालं. हुरळूनच गेलो मी! उगाच असं नाही सांगणार, की छे! छे! त्यात काय... असं अजिबात नाही. माधुरीसोबत काम करताना मला खरंच काय सर्वांत आकर्षक वाटलं माहितीय का? तिची शिकण्याची वृत्ती. आज माधुरी हे फार मोठं नाव आहे. पण दिग्दर्शक सांगत असे, तेव्हा ती मान खाली घालून ऐकत असे. तीच गोष्ट शंकर महादेवनची. या लोकांकडून हे शिकण्यासारखं. माधुरीला मीही अनेक सूचना करायचो. आपण हे असं करू या, तसं करू या. त्यावर ‘हो हो करू या’ अशीच तिची प्रतिक्रिया असायची.
‘घाणेकर’बद्दल काय सांगू! जेव्हा मला कळलं, की मला डॉ. लागूंची भूमिका करायची आहे आणि स्क्रीनटाइम फारच कमी, म्हणजे दहा-पंधरा मिनिटांचा आहे. तरी मी म्हटलं, की मी ही भूमिका करतो, याचं कारण मी ‘बायोपिक’ कधी केला नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे डॉ. लागू होते तेव्हा. मला त्याही गोष्टीचा मोह पडला, की आपली ही भूमिका ते स्वत: बघतील. मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांना तेव्हा स्मृतिभ्रंशाचा त्रास होत होता. काही आठवत नव्हतं. मात्र, मी ‘१९७०’ हे आकडे त्यांच्यासमोर उच्चारले आणि ते ५० वर्षं मागं गेले.त्यांना सगळं खाडखाड आठवायला लागलं. स्मृतींचे काही कप्पे हे श्रावणातल्या झाडाप्रमाणे टवटवीत असतात ना, तसे त्यांचा कप्पा वाटला मला! तेव्हाच्या सगळ्या नाटकांबद्दल - ‘काचेचा चंद्र’पासून ‘गिधाडे’पर्यंत - ते अगदी भरभरून बोलले. सुरुवातीला तर त्यांनी ‘मी कुठला रोल करणं अपेक्षित आहे?’ असंच विचारलं. मला तेव्हा ते अगदी लहान मुलासारखे निरागस भासले. तेव्हा दीपाताईंनी सांगितलं, की मी त्यांचीच भूमिका करणार आहे म्हणून. त्यानंतर ते ‘हॅम्लेट’ बघायलाही आले आणि मला आशीर्वादही दिला. तीन तास ते त्या नाटकाला बसले, हीच माझ्यासाठी केवढी मोठी गोष्ट झाली. ‘घाणेकर’मध्ये ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ गाण्यात माझी एंट्री आहे तेव्हा मी मुद्दाम डॉ. लागूंची प्रतिक्रिया काय असेल, हे बघता येईल अशा सीटवर बसलो होतो. एंट्री झाली, आणि ते एकदम म्हणाले, ‘अगं दीपा, हा तर मीच आहे!’ आता याच्यापेक्षा काय मोठा पुरस्कार असू शकेल!
७. तू अभिनयाव्यतिरिक्त गायनातही करिअर करू शकला असतास. तू 'सारेगमप'चा फायनलिस्ट होतास. शिवाय अनेक हिंदी 'रिॲलिटी शों'मधेही तू गाताना दिसतोस. 'वागले..'मधेही प्रसंगी पेटी पुढं ओढून गाताना दिसतोस. गाणं ही तुझी पॅशन आहे ना? त्याविषयी सांग...
सुमीत - मी काही उत्तम गायक नव्हतो. माझ्यासाठी तरी मी हौशीच गायक आहे. तसं गाण्याचं शिक्षण मी घेत होतो. सुरुवातीला वसंतराव कुलकर्णी आणि नंतर सुरेश वाडकरांकडे शिकलो. पण १९९०-९० मध्ये अभिनयातच भरपूर संधी मिळत गेल्या आणि गाणं जरा बाजूला राहिलं. गाणं की अभिनय, हा निर्णय मला घेणं गरजेचं होतं. दोन्ही डगरींवर पाय ठेवणं कठीण होतं. गाण्याला एक बैठक लागते. एक विचार लागतो. तो अभिनयालाही लागतो; पण अभिनयाला रियाझ लागत नाही. तो गाण्याला अगदी आवश्यक असतो. अभिनयात तुमचे बाकीचे जे सेन्सेस आहेत, ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. अनुभव गाठीशी असणं गरजेचं आहे. एखादी घटना पुन्हा सादर करण्याची शक्ती असणं हे गरजेचं आहे. अभिनयात अनेक इंटरप्रिटेशन्स असतात. मला ते कायम आव्हानात्मक वाटत आलेलं आहे. मी तुलना करत नाही. कदाचित मी थोडा आळशी आहे आणि रियाझ करावा लागू नये म्हणूनही मी अभिनयाकडे वळतो (हसतो...) पण हे खरंय, की मी गाणं मिस करतो आणि म्हणूनच माझ्याकडं सदैव पेटी असते माझ्या मेकअप रूममध्ये. मी वेळ मिळेल तसा गात असतो आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतही असतो.
८. तुझी वाचनाची आवड सर्वांना माहिती आहे. तू 'अक्षरधारा'चा ब्रॅंड ॲंबेसिडरही होतास. तू सध्या काय वाचतोस? आवडते लेखक कोण?
सुमीत - खरं सांगायचं तर मला वेळ नाही मिळत वाचायला. इतकी धावपळ सुरू असते. चिन्मयी मात्र भरपूर वाचत असते. माझ्यामध्ये तेवढा पेशन्स नाही. मात्र, लिहावंसं वाटतं अनेकदा. पण त्यालाही एक बैठक लागते. असं धावत-पळत नाही लिहिता येत. काही तरी चमकदार येतं डोक्यात, पण ते तेवढ्यापुरतंच राहतं. एकदा मालिकेचं शूटिंग सुरू झालं, की माझे २७-२८ दिवस त्यातच जातात. माझ्या वेबसाइटवर मी ‘मनोगत’ असं जे लिहिलंय ना, त्याबद्दल सांगतो. मला फिल्म करायची आहे. दिग्दर्शन करायचं आहे. सीरियल किंवा ओटीटीमध्ये माझा पिंड नाहीय. मला एक सलग अशी कहाणी सांगायची आहे - ही सुरुवात, हा मध्यंतर आणि हा शेवट, अशी! मसा असं वाटतं, की मी एक बरा दिग्दर्शक होईन (हसतो). खरं तर २०१९ मध्ये सगळं जुळूनही आलं होतं, पण ते काही कारणानं बारगळलं. त्यामुळं मी सध्या गोष्ट शोधतोय. ती मिळाली, की लगेच फिल्म करणार. दिग्दर्शन मला करायचंय हे नक्की!
९. तू अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी डबिंगमधे voice over दिला आहेस. हा अनुभव कसा वाटतो?
सुमीत - हे काम कौशल्याचं आहेच; शिवाय ते तुम्हाला पैसेही मिळवून देतं. करिअरच्या अगदी सुरुवातीला, १९९--९२ मध्ये माझ्याकडे फार काम नसायचं, तेव्हा १९९२ ते ९६ अशी चार वर्षं मी हे काम केलं. पण ते तेवढ्यापुरतंच होतं. पैसे मिळायचे चांगले, हे मात्र खरं! आजही कधी कधी विचारणा होते, पण आता डबिंग करणं होत नाही.
१०. तुझ्या फिटनेसचं रहस्य काय?
सुमीत - मी माझ्या खाण्यावर जागरूकपणे लक्ष ठेवून असतो. आपल्या सिस्टीममध्ये काय जातं, हे नीट बघतो. आणि व्यायाम. दररोज अर्ध्या तासाचा व्यायाम करतो. विष्णुसहस्रनाम लावतो आणि त्याबरोबर माझा एक तीस मिनिटांचा व्यायाम असतो. जिमला जायला वेळ होत नाही, तरी घरी हे मी करतोच. महत्त्वाचं म्हणजे गोड खाणं सध्या बंद केलंय. हे मी असं टप्प्याटप्प्याने ठरवतो. म्हणजे आता पुढचे दोन महिने गोड नाही म्हणजे नाहीच. चहातून जेवढी साखर जाते तेवढीच. एरवी नाही तर मी मिठाईप्रेमी आहे. बसल्या बसल्या अर्धा किलो काजूकतली खाऊ शकतो (हसतो...) जिलेबी वगैरे तर... वेड लागतं मला! बासुंदी, खीर, आमरस हे सगळे जीवघेणे प्रकार आहेत. (खळाळून हसतो...) पणहे सध्या मी सगळं टाळतो. आणि रोज संध्याकाळी सात वाजता जेवतो. त्यापुढे १३ तास काहीही खात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच थेट नाश्ता करतो. त्यामुळं वजनही आटोक्यात राहतं.
११. तू व चिन्मयीनं मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत आवर्जून घातलंत. त्याविषयीची तुमची मतं अतिशय मननीय आहेत. त्याविषयी सांग.
सुमीत - या निर्णयात खरं तर चिन्मयीचा वाटा जास्त आहे. मी फक्त ‘मम’ म्हणायचं काम केलंय. चिन्मयीच्या घरचं वातावरण भाषेला महत्त्व देणारं आहे. तिचे बाबा आयएएस होते. ते स्वत: कवी. वाचनाची अतिशय आवड, कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायचे. ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्गत होती. उर्दूवरही त्यांची तितकीच पकड. गालिब, कबीर सगळे आवडते. तिची आई मानसशास्त्रज्ञ. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या. त्याही लेखिका. बहीण शिवप्रिया सुर्वे कवयित्री. त्यामुळे तिचं ठरलंच होतं, की आमची मुलं मराठी माध्यमात शिकणार. आमच्या घरी हा जरा शॉक होता. कारण माझं कुटुंब अगदीच वेगळं. त्यांना वाटत होतं, की मराठीत कशाला? इंग्लिश मीडियममध्ये शिकायला हवं. पण शेवटी चिन्मयीनं ते त्यांच्या गळी उतरवलंच. ती म्हणाली, की नाही. घरातली जी भाषा आहे त्याच भाषेत जर मूल शिकलं तर ते चांगलं शिकतं. हा कदाचित बाळबोध विचार आहे, पण तसा सिद्ध झालेला विचार आहे. इंग्लिश भाषेला ना नाही. पुढं इंग्लिश येणारच आहे त्यांना. तेच झालं आणि. माझा मुलगा इंग्लिश गाणी कंपोझ करतो, इंग्लिश गाणी लिहितो. भाषा ही मुळात कधीच अडथळा असता कामा नये. विंबल्डनच्या कोर्टवर रफाएल नदाल जेव्हा स्पॅनिशमध्ये बोलतो, तेव्हा आपल्याला त्रास होत नाही. तेच जर आपण मराठीत बोललो तर लगेच - ‘शी! किती गावठी आहे हा!’ अशी प्रतिक्रिया कशाला? मीदेखील चिन्मयीच्या मताचाच आहे. नंतर माझीही मतं त्याविषयी आग्रही झाली. मला वाटतं, मराठी भाषा यायलाच हवी. माझा मराठीत बोलण्याचा आग्रह असतो. मी कुठेही गेलो, तरी आधी मराठीतच बोलायला सुरुवात करतो. समोरच्याला समजलं नाही तर इतर भाषा वापरतो. पण सुरुवात मराठीतूनच करतो. मला वाटतं, हा आपल्यासाठी नियम असायला हवा. महाराष्ट्रात महाराष्ट्राचीच भाषा बोलली जायला हवी. चिन्मयीच्या या विचारांना, मराठीबाबत ती जे काही काम करीत आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. या कामाबाबत समाजातही कुठे कुठे थोडे तरी तरंग आम्हाला दिसत आहेत. कुणी फोन करून सांगतं, की आम्हीही आमच्या मुलांना मराठी माध्यमात घातलं आहे. ती ज्योत कुठे तरी पेटली आहे, असं वाटतं.
---
(पूर्वप्रसिद्धी : अक्षरधारा दिवाळी अंक २०२२)
----
No comments:
Post a Comment