30 Nov 2023

हंपी डायरी - भाग १

पाषाणशिल्पांच्या दुनियेत...
----------------------------------


हंपीला जायचं माझं स्वप्न अखेर पूर्ण झालं. साधारण २०१९ मध्ये आपल्याकडचे अनेक जण हंपीला जाऊन तिथले फोटो टाकताना पाहिले, तेव्हा मी फेसबुकवर ‘मी हंपीला अजून गेलेलो नाही, हा समाज मला माफ करणार का?’ अशा आशयाची पोस्टही टाकल्याचं आठवतं. त्यानंतरची दोन-तीन वर्षं ‘कोव्हिड’मध्येच गेली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हंपीला जायचं नक्की झालं. मी, धनश्री आणि सोबत माझा धाकटा आतेभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली असणार होती. अगदी तिकडचं बुकिंगही झालं. मात्र, तेव्हा बेळगावला सीमाप्रश्न पेटल्यानं वातावरण बिघडलं. आम्हाला आमची कार घेऊन जायचं असल्यानं आम्ही जरा घाबरून तिकडं जायचं रद्दच करून टाकलं आणि बरोबर उलट्या दिशेला म्हणजे, दमणला जाऊन आलो. मात्र, तेव्हाच पुढच्या वर्षी हंपी नक्की करायचं, हे ठरवून टाकलं. यंदा भावानं नवी नेक्सॉन कारही घेतली होती. त्यामुळं जाताना त्या कारनंच जायचं हेही आम्ही पक्कं ठरवलं होतं. त्यानुसार २५ ते २८ नोव्हेंबर असे चार दिवस ही ट्रिप केली. ट्रिप खूप छान झाली. मजा आली. हंपीत दोन दिवस कमीच पडले, असं वाटलं. शिवाय आम्हाला वेळेअभावी बदामी व पट्टदकल वगैरे काही बघता आलं नाही. त्यासाठी हंपीची आणखी एक ट्रिप नक्की करणार!
आम्ही शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्याहून निघालो. आम्हाला ‘गुगल मॅप’वर सोलापूर, विजापूर (आता विजयपुरा) मार्गे रस्ता सुचवण्यात आला होता. मात्र, बेळगाववरूनच जायचं हे आम्ही ठरवलं होतं. मी बेळगावला शेवटचा १९९९ मध्ये साहित्य संमेलनाच्या कव्हरेजसाठी गेलो होतो. त्यानंतर अगदी याच वर्षी एप्रिलमध्ये गोव्याहून ट्रेननं येताना संध्याकाळी थोडा वेळ ट्रेनच्या दारातून बेळगावचं ओझरतं दर्शन झालं होतं. यंदाही आम्ही बेळगावात थांबणार नव्हतोच; पण तरी जाताना बेळगाव, हुबळी-धारवाडवरूनच जायचं हे आम्ही ठरवलं होतं. सकाळी दहा वाजता कऱ्हाडला पोचलो. ‘संगम’ला ब्रेकफास्ट केला. कऱ्हाडमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथं सध्या ट्रॅफिक जॅम होत असतो. मात्र, आम्ही सुदैवानं न अडकता बाहेर पडलो. कोल्हापूर, कागल ओलांडून आम्ही बाराच्या आसपास कर्नाटकात प्रवेश केला. कोगनोळी नाका ही दोन्ही राज्यांची सीमा. (खरं तर बेळगाव, निपाणी, संकेश्वर ही सगळी गावं आपलीच. त्यामुळं ही सीमा असं म्हणवत नाही. पण असो.) साधारण दीडच्या सुमारास आम्ही बेळगावात पोचलो. त्याआधी वंटमुरी हे गाव लागलं. मला एकदम ‘वंटमुरीकर देसाई त्यांचा बोका’ आठवून हसायला आलं. बेळगावचं सगळं असोसिएशन ‘लंपन’मुळं आहे. इंदिरा संत हे आणखी एक कारण. शिवाय पुलंचे ‘रावसाहेब’ आहेतच. बेळगावात पोचताना आम्ही ‘रावसाहेब’ ऐकणार नाही, हे शक्यच नव्हतं. मनसोक्त हसतच आम्ही बेळगावात प्रवेश केला. खरं तर बायपासवरून आम्ही पुढं गेलो. हल्ली सर्व महामार्गांवर बायपास झाले आहेत. ते गर्दी टाळण्याच्या दृष्टीनं सोयीचे असले, तरी त्यामुळं त्या त्या गावाचा फील घेता येत नाही. आमचंही तेच झालं. या वेळी बेळगावमध्ये कर्नाटक सरकारनं बांधलेलं उंच टेकाडावरचं ते विधान सौध मात्र बघता आलं. मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून बांधलेलं असलं तरी आहे मात्र भव्य व देखणं! असो.
बेळगाव ओलांडलं. या भागात रस्त्याने मी प्रथमच जात होतो. हुबळी-धारवाडकडे निघालो होतो. हा एके काळी सगळा मुंबई इलाख्यातला भाग. तिकडं अजूनही याला ‘बॉम्बे कर्नाटक’ असंच म्हणतात. खरं तर माझं कुणीही नातेवाइक तिकडं नाही, ना माझा कुठला सांस्कृतिक-भावनिक धागा तिकडं जोडलेला आहे! पण का कोण जाणे, या भागाविषयी आपुलकी वाटते. आम्ही थोडं पुढं गेल्यावर रस्त्यातच एका हॉटेलमध्ये जेवलो. साधंसं हॉटेल, पण स्वच्छ. जेवणही चांगलं होतं. भूक लागलीच होती. जेवून पुढं निघाल्यावर आता गाडी मी चालवायला घेतली. सकाळपासून साईनाथच ड्राइव्ह करत होता. आता त्याला जरा विश्रांती द्यायला हवी होती. आता आम्ही पुढं धारवाडकडं निघालो. या सगळ्या परिसराविषयी कितीदा काय काय वाचलेलं... धारवाडविषयीची आपुलकी जी. ए. कुलकर्णींमुळं असणार. बाकी पुलंच्या लेखनात इकडचे बरेच उल्लेख येतात. मग ते मल्लिकार्जुन मन्सूर असतील, भीमसेन जोशी असतील, गंगूबाई हनगल असतील... ही सर्व मंडळी याच भागातील. उत्तर कर्नाटक हा नैसर्गिकरीत्या तसा दुष्काळी भाग. मात्र, गुणवान कलाकार मंडळींचीही खाणच. धारवाड आधी लागलं. पण पुन्हा तेच. बायपासनं पुढं निघालो. गावाचा फील नाहीच लाभला. डावीकडं लांबवर दिसणाऱ्या त्या छोटेखानी शहराकडं बघत, मनातल्या मनात जीएंच्या स्मृतींना वंदन केलं. त्यात मी अलीकडं गिरीश कार्नाडांचं आत्मचरित्र वाचलं, त्यात धारवाडच्या फार सुंदर आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. सारस्वतांच्या त्या कॉलनीचं ते टेकाड बघायची फार इच्छा होती, पण नाइलाज होता. धारवाड ते हुबळी हा रस्ता अजूनही दोन लेनचाच आहे. आता तो चौपदरी करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथं सतत कोंडी होत होती. आम्ही थोड्याच वेळात हुबळीला पोचलो. धारवाड-हुबळी ही तशी जोड-शहरंच. आपल्या पुणे व पिंपरी-चिंचवडसारखी. ही उत्तर कर्नाटकातील प्रमुख सांस्कृतिक केंद्रं. मला एकदा तिथं नीट राहून, शांतपणे चालत हिंडून ती गावं बघायची आहेत. पण या वेळेला निदान त्या गावांवरून जाता आलं, हेही नसे थोडके. हुबळी शहर डावीकडं ठेवून आम्ही पुढं निघालो. इथं आपण पुणे-बेंगळुरू महामार्ग सोडतो आणि डावीकडे गदग, कोप्पलकडे वळतो. हाच रस्ता पुढं होस्पेट, रायचूरकडे जातो. (पुढं आंध्रात...) इथं आमची थोडी गडबड झाली. आम्ही थोडं पुढं गेलो. मात्र, लगेच रस्ता सापडला आणि वळून आम्ही योग्य मार्गाला लागलो. हा रस्ता आता सिमेंटचा आणि चार पदरी, सुंदर झाला आहे. कर्नाटकातले बहुतेक महामार्ग, मोठे रस्ते आता चांगले, प्रशस्त आहेत. आम्ही थोड्याच वेळात गदगला पोचलो. इथेच भीमसेन जोशी जन्मले. गाव डावीकडे आणि आम्ही बायपासवरून पुढे. पुन्हा एकदा मनातल्या मनातच अण्णांच्या स्मृतींना वंदन केलं.
आता संध्याकाळ व्हायला लागली होती. आम्ही सकाळपासून प्रवास करत होतो. कोप्पल ओलांडलं. खरं तर मी हंपीला निघालोय म्हटल्यावर आमचे मित्रवर्य किरण यज्ञोपवीत यांचा फोन आलाच होता. मागच्या वर्षीही आम्ही निघणार म्हटल्यावर किरणनं बऱ्याच टिप्स दिल्या होत्या. आताही त्यानं फोन करून कोप्पलला चांगली मंदिरं आहेत अशी माहिती दिली. मात्र, आमच्या वेळेत ते बसणार नव्हतं. कोप्पल सोडून आम्ही पुढं निघालो.आता होस्पेट जवळ आलं होतं. मात्र, पाच वाजल्यामुळं चहाचा ब्रेक गरजेचा होता. एक टपरी बघून थांबलो. तिथं एक जोडपं ते छोटेखानी हॉटेल चालवत होतं. त्यातल्या बाईला हिंदी कळत नव्हतं. मात्र, ती सफाईदार इंग्लिश बोलत होती. तिनं आम्हाला तिथली स्पेशालिटी असलेली ढोबळी मिरची घातलेली मसाला भजी घेण्याचा आग्रह केला. आम्ही एक प्लेट घेतली. ती गरमागरम आणि तिखट भजी भलतीच चवीष्ट, झणझणीत होती. मजा आली. नंतर मोठा कप भरून चहा घेणं आवश्यकच होतं. तिथून निघालो. पुढं एक फ्लायओव्हर लागला. डावीकडं जाणारा रस्ता विजापूरकडून येत असावा, असं मी साईनाथला म्हटलं. (नंतर परतीच्या प्रवासात माझा अंदाज बरोबर ठरला.) तिथं एक टोलनाका होता. तो पार केल्यावर होस्पेट आलंच. तोवर अंधार पडला होता. होस्पेट हे एक मध्यम आकाराचं शहर असल्याचं दिसलं. साधारण आपल्याकडच्या साताऱ्यासारखं! गुगल मॅप लावून दहा मिनिटांत आमचं हॉटेल शोधलं. हे हॉटेल साईनाथनं बुक केलं होतं. ते कसं असेल याची धाकधूक होती. मात्र, गावाच्या मध्यवर्ती रस्त्यावर आणि चार-पाच मजली हे प्रशस्त हॉटेल, खाली गजबजलेलं रेस्टॉरंट, पार्किंगमधल्या कारची विपुल संख्या (त्यात भरपूर ‘एमएच-१२’ होत्या, हे सांगणे न लगे...) बघून ‘हुश्श’ वाटलं. एखाद्या गावातलं, जुनं, प्रतिष्ठित असं एखादं हॉटेल असतं, तसं हे ‘प्रियदर्शिनी पार्क’ वाटलं. रिसेप्शनला बुकिंग दाखवून लगेच रूम ताब्यात घेतल्या. अत्याधुनिक सोयी असलेल्या, स्वच्छ रूम बघूनच फार बरं वाटलं. चौथ्या मजल्यावरच्या आमच्या रूमला गावाच्या दिशेनं उघडणारी बाल्कनी होती. तिथून सर्व शहराचा नजारा छान दिसत होता. लांबवर छोटेखानी टेकड्या दिसत होत्या. तेच हंपी असावं, असं मनातल्या मनात नोंदवून ठेवलं.
मागच्या वर्षी आमचं हंपीला जायचं ठरलं, तेव्हा गौरी लागूंच्या कन्येनं - मेघानं - मला तिथल्या मंजू नावाच्या गाइडचा नंबर दिला होता. तो माझ्याकडं होता. किरणनं आमच्यासाठी ज्या गाइडला फोन केला होता, तो बिझी होता. मग आमचं रात्रीचं जेवण झाल्यावर मी या मंजूला फोन केला. सुदैवानं तो दुसऱ्या दिवशी उपलब्ध होता. ‘आपण गाइड नसून, रिक्षाची सेवा देतो,’ हेही त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता भेटायचं ठरवलं. तो आमच्या हॉटेलवर येणार होता. आम्हीही दिवसभराच्या प्रवासानं दमलो होतोच.

विजयनगरच्या साम्राज्यात...

सकाळी आवरून खाली असलेल्या ‘नैवेद्यम्’ या आमच्या हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला गेलो. रविवार असल्यानं भरपूर गर्दी होती. निम्मे-अर्धे लोक मराठी होते. पहिल्या दिवशी टिपिकल इडली-वडा, उत्तप्पा, डोसा असा ठरलेला नाश्ता झाला. साडेसाठ वाजता मंजूबाबा आला. त्याच्याशी डील केलं. दोन दिवसांचे चौघांना रिक्षाने फिरवण्याचे पाच हजार रुपये ठरले. आम्ही लगेच बाहेर पडलो. त्यानं आधी कमलापूर गाव ओलांडून अनेगुंदीच्या दिशेनं नेलं. जाताना उजव्या बाजूला कमलापूरचा सुंदर, मोठा तलाव दिसतो. डावीकडं थोडं खालच्या बाजूला केळीची शेती, नारळाची झाडं असं सुंदर दृश्य दिसतं. मंजू आम्हाला कमलापूरच्याही पुढं घेऊन गेला. तिथं माल्यवंत रघुनाथाचं मंदिर आहे. ते आधी पाहिलं. पहिल्याच मंदिराच्या दर्शनानं आम्ही अवाक झालो. छोट्याशा टेकडीवर असलेल्या त्या परिसरात सर्वत्र प्रचंड मोठ्या शिळा पडल्या होत्या. त्यातले काही महापाषाण तर कधीही पडतील, अशा बेतात एकमेकांवर रेलून बसले होते. गुरुत्वाकर्षणाला पराजित करणारं असं कोणतं आकर्षण त्या शिळांना एकमेकांशी धरून ठेवत असेल, असं वाटून फारच आश्चर्यचकित व्हायला झालं. त्या मंदिराच्या शेजारी असलेल्या एका मंडपात नाच-गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. तिथल्या खांबा-खांबांवर नृत्याच्या विविध पोझेस असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या होत्या. सध्या इथं अगदी मोठा समारंभ न परवडणाऱ्या लोकांचे विवाह समारंभही होतात, अशी माहिती मंजूबाबानं दिली. नंतर तो आम्हाला मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिथं एक प्रचंड पाषाण आडवा पडला होता. आम्ही तिथं भरपूर फोटो काढले. ‘या ठिकाणी मी फक्त माझे ग्राहकच घेऊन येतो,’ असं मंजूबाबा अभिमानानं सांगत होता. त्या परिसरात पडलेल्या प्रचंड शिळा, त्यांचे वेगवेगळे आकार पाहून आपण वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होत होता. 

विजयनगरचं साम्राज्य आणि हंपीतलं त्यांचं वैभव याविषयी भरपूर लिहिलं, बोललं गेलं आहे. ते आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे. मलाही ही सगळी ऐकीव माहिती होती. मात्र, प्रत्यक्ष तिथं जाऊन हे सगळं अनुभवणं ही फारच निराळी गोष्ट होती. त्या हवेचा परिमळ, तिथल्या पाषाणाचा थंडगार स्पर्श, तिथल्या पाण्याची चव आणि तिथल्या आसमंतात ऐकू येत असलेल्या कित्येक थक्क करणाऱ्या लोककथा, दंतकथा यांच्या अजब मिश्रणातून जे अनुभवायला येतं, ते हंपी विलक्षण आहे. माल्यवंत रघुनाथाच्या मंदिरातून पूजापाठाचा घोष ऐकू येत होता. मंजूबाबानं सांगितलं, की १७-१८ वर्षांपासून काही साधूमंडळी इथं अखंड पूजापाठ करत आहेत. अजूनही त्यांचा तो कार्यक्रम संपलेला नाही. आपण सहस्रावर्तन करतो किंवा हरिनाम सप्ताहात जशी ती वीणा खाली न ठेवता अखंड वाजविली जाते, तसंच इथं काही साधू आलटून-पालटून हे मंत्रघोष सतत करत असतात. त्या तिथे जाण्यापूर्वी वर आणखी एक शिवाचं छोटंसं मंदिर होतं. तिथला तरुण पुजारी मला दोन-दोनदा हाक मारून बोलवत होता. कुणी तरी खेचून नेल्याप्रमाणं मी एकटाच तिथं गेलो. आपल्या शंकर या देवाला असंच कुठं कुठं उंचावर, कडेकपाऱ्यांत, दरीखोऱ्यात राहायला फार आवडतं. मला शान्ताबाईंचं ‘भस्मविलेपित रूप साजिरे’ हे अप्रतिम गाणं आठवायला लागलं. मी त्या छोटेखानी मंदिरात गेलो. त्या तरुण पुजारी पोरानं माझ्या हातून अभिषेक करविला, कपाळी भस्म लावलं. मीही मंत्रभारित झाल्यागत सगळं आपोआप केलं. पूजा झाल्यावर भानावर आलो. पुजारी मुलगा मोठ्या अपेक्षेनं पाहत होता. मलाही ते लक्षात आलं. मी अगदी सहज ‘जी-पे’ आहे का विचारलं. खरं तर तिथं जी-पेचा स्कॅनर होताही; पण तो बंद होता. त्यामुळं मी रोख पैसेच दक्षिणा म्हणून द्यावेत असं त्याचं म्हणणं पडलं. हल्ली माझ्या खिशात फार रोकड नसते. लागत नाही. खिशात एक पन्नासची नोट होती. बाकी पाचशेच्या होत्या. त्यामुळं नाइलाजानं मला शंभर रुपये द्यायचे असूनही मी ते पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले आणि निघालो. तरुण पुजारी मुलगा तेवढ्यावरही समाधानी दिसला. ‘आम्हाला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, लोक जे देतील ते’ असं काहीसं तो पुटपुटत होता. मला तेव्हा नक्की काय वाटलं ते सांगता येत नाही. मात्र, आपण निदान शंभर रुपये द्यायला हवे होते, असं वाटून गेलं. (हा असा अनुभव हंपीत एकदाच आला. पहिला आणि शेवटचा.)
धनश्री, साईनाथ व वृषाली केव्हाच खालच्या रघुनाथ मंदिरात गेले होते. मी जरा गडबडीतच ते टेकाड उतरून त्या मंदिरात गेलो. तिथंही शेजारी एक लक्ष्मीचं मंदिर होतं. तिथलाही पुजारी बोलवत होता. मात्र, आता मी तिकडं दुर्लक्ष करून मुख्य मंदिरात शिरलो. हे चांगलं, जितंजागतं, नांदतं मंदिर होतं. इथंच त्या सभामंडपात ते दोन साधू पूजापाठ करत होते. मी आपला तिथं जाऊन एक नमस्कार ठोकला. मला त्या बाबानं हातावर तीर्थ दिलं. ताटलीतल्या दक्षिणेच्या पैशांकडं हात दाखवला. मात्र, तो तोंडानं मंत्रजप करत असल्याचा फायदा घेऊन मी पुन्हा एक नमस्कार ठोकला आणि तिथून निघालो. या तिघांनीही तिथं पैसे आधीच दिले होते. बाहेर येऊन फोटो काढले. मंदिराच्या बाहेर दोन कार लागल्या होत्या. त्यातली एक महाराष्ट्रातील होती. आजूबाजूला माकडं उड्या मारत होती. हंपीत सर्वत्र विपुल संख्येनं माकडं आहेत. त्यांना सतत खायला लागतं. हातात खाण्याची कुठलीही वस्तू घेऊन तुम्ही मोकळेपणाने फिरू शकत नाही. माकडांनी त्यावर डल्ला मारलाच म्हणून समजा. 
इथून आता मंजूनं त्याची रिक्षा हंपीतल्या दोन प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या विठ्ठल मंदिराच्या दिशेनं घेतली. इथं मुख्य मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंतच वाहनं नेता येतात. तिथं पार्किंगचा प्रशस्त तळ आहे. तिथून एक तर तुम्ही चालत जाऊ शकता किंवा बॅटरी ऑपरेटेड वाहनांतून जाऊ शकता. आम्हाला उन्हात चालायचं नव्हतं म्हणून आम्ही त्या बॅटरी गाड्यांसाठीची रांग धरली. वीस रुपये तिकीट होतं. त्या रांगेत शिरण्याआधी वॉशरूमकडे धाव घेतली. तिथं पाणीच नव्हतं. बाहेर पिण्याच्या पाण्याचे नळ होते. तिथेही खडखडाट. बाहेर ज्यूस, फळं, उसाचा रस विकणाऱ्या गाड्या होत्या. आम्हाला तहान तहान होत होती. मग उसाचा रस प्यायलो. नंतर रांगेत उभे असतानाही सतत कलिंगडाच्या फोडी, अननसाच्या फोडी, ताक विकायला पोरं येत होती. त्या फोडी एवढ्या रसरशीत होत्या, की त्या घेऊन खायचा मोह आवरला नाही. साधारण २०-२५ मिनिटांनी आमचा नंबर लागला. या बॅटरी गाड्या कॉलेजमधल्या मुलींना चालवायला दिल्या आहेत. इथून पुढचा सगळा रस्ता मातीचा होता. त्यामुळं असेल, पण त्या मुलीनं तोंडाला रुमाल लावला होता. आम्ही दहा मिनिटांत विठ्ठल मंदिराच्या दारात पोचलो. इथं पुन्हा तिकिटांची रांग होती. इथं घेतलेलं तिकीट आणखी दोन-तीन ठिकाणी चालतं. त्यामुळं ते जपून ठेवावं. साठ रुपये तिकीट आहे. इथं गाइड घ्यावा, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मंजूच्या मते, गाइड विठ्ठल मंदिराचा संपूर्ण परिसर दाखवण्यास २०० ते ३०० रुपये घेतो. आम्ही ४०० रुपयेही द्यायला तयार होतो. मात्र, इथले गाइड ८०० रुपयांच्या खाली यायला तयार होईनात. गर्दीही प्रचंड होती. फारसे गाइड मुळात उपलब्धच नव्हते. आमच्याकडे अश्विनीनं (मित्र मंदार कुलकर्णीची पत्नी) दिलेलं आशुतोष बापट यांचं ‘सफर हंपी बदामीची’ हे उत्कृष्ट पुस्तक होतं. मग तेच गाइड म्हणून वापरायचं ठरवून आम्ही आत शिरलो. समोर विलक्षण, अद्भुत आणि थक्क करून टाकणारं, असामान्य असं काही तरी आमची वाट बघत होतं....



(क्रमश:)

----------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------

23 Nov 2023

पासवर्ड दिवाळी २३ - कुमारकथा

सेल्फी... सेल्फी(श)... सेल्फी...
----------------------------------

एक होतं जंगल... जंगलात नव्हतं काहीच मंगल...
झाडं दु:खी, प्राणी दु:खी, नदी दु:खी, नद्यांमधले मासेही दु:खी....
खरं तर एके काळी हे जंगल किती आनंदात असायचं! झाडं खूश असायची, प्राणी आनंदात उड्या मारत असायचे, नदी हसत-खळाळत वाहत असायची... मासेही मजेत पोहत असायचे. पाऊस पडला, की जंगल कसं हिरवंगार होऊन जायचं. उंचच उंच गवत उगवून यायचं. त्यातून हत्तीदादांचं कुटुंब मोठ्या डौलानं, दमदार पावलं टाकीत पाण्याकडं चालत जायचे. हरणांचे कळप उड्या मारत इकडून तिकडं हुंदडत असायचे... कोल्होबा, लांडगेभाऊ, तरसतात्या, अस्वलमामा, गेंडेदादा सगळेच एकदम मस्त खेळायचे अन् लोळायचेही.
पण अलीकडं काही वर्षांत हे चित्र बदललं की हो! जंगल पूर्वीसारखं राहिलं नाही. उदास उदास राहू लागलं. मनातल्या मनात कुढू लागलं. सगळेच झाले दु:खी... सगळेच झाले कष्टी...
का विचारा... अहो, या जंगलात माणसं येत असत रोज... भटकत असत इतस्तत: सतत... त्यांना ना काळ ना वेळ... सतत हसणं अन् खिदळणं... सोबत त्यांची ती रंगीत चौकोनी डबी... तो फोन... स्मार्टफोन म्हणे... प्रत्येकाच्या हातात फोन आणि प्रत्येकाचा वेगळाच टोन... सतत माणसं आपली सेल्फी काढताहेत... धबधबा म्हणू नका, पायवाटा म्हणू नका, दगड म्हणू नका की धोंडा म्हणू नका...! प्रत्येकावर यांच्या नावाचा शिक्का उमटलाच पाहिजे, प्रत्येक ठिकाणावर यांची सेल्फी निघालीच पाहिजे... जंगलातलं एक झाड यांनी सोडलं नाही, की एक वेल सोडली नाही! सगळीकडं सेल्फीचाच पूर आला... हल्ली तर कहरच झाला... माणसांच्या टोळ्या झाल्या... टोळ्यांमागून टोळ्या... सगळेच हातात बाटल्या घेऊन नाचत आहेत, सगळेच कसल्याशा धुंदीत लहरत आहेत... त्यांच्या त्या कर्णकर्कश आवाजांतील गाण्यांनी आणि धांगडधिंगाण्याने जंगलाचे कान किटले. अति झाले...

सारे जंगल वैतागले. प्राणी सगळे वैतागले.... हत्तीदादाकडे गेले... झाडे सगळी त्रस्त झाली... वडआजोबांकडे गेली. प्राणी म्हणाले, ‘हत्तीदादा, हत्तीदादा... या माणसांच्या टोळीचा बंदोबस्त करा. यांच्या फोटोंचा धुमाकूळ थांबवा.’ झाडे म्हणाली, ‘वडआजोबा, वडआजोबा... या माणसांच्या टोळ्या आवरा. तुमच्या पारंब्यांची बेडी अडकवून सगळ्यांना धरून बांधून टाका...’
हत्तीदादा विचारात पडले. वडआजोबांकडे गेले. दोघांनी मिळून विचार केला. माणसांच्या फोटोच्या कटकटीला कसे दूर करावे? कसे बरे? माणसांची गर्दी कशी हटवावी? कशी बरं कशी? त्यांनी प्राण्यांची आणि झाडांची बोलावली सभा... पौर्णिमेच्या रात्री सगळं जंगल सभेला जमलं. वडआजोबा अध्यक्षस्थानी होते, तर हत्तीदादा प्रमुख वक्ते. हत्तीदादा म्हणाले, ‘मित्र हो, आपलं हे जंगल, आता नाही राहिलं मंगल... याचं कारण माणूस आणि त्याच्या हातातली ती चौकोनी चमकती डबी. त्या डबड्यापायी आपल्या जंगलाची लागली वाट... आता करावाच लागेल उपाय खास!’
सगळे म्हणाले, ‘हो, हो... करा, करा. आम्हाला पण खूप त्रास होतो. माणसं घोळक्यानं येतात. आवाज करतात... त्यांच्या त्या चौकोनी डब्यातून सतत खटखट करत बसतात... नुसती कटकट! माणसांच्या या गोंधळाचा वैताग आलाय आम्हाला...’
सगळे वडआजोबांकडे बघायला लागले. त्यांच्या पारंब्या शालीसारख्या त्यांनी अंगावर लपेटून घेतल्या आणि जरासं खाकरून ते बोलू लागले, ‘तुमचं म्हणणं खरं आहे. मी गेली शंभर वर्षं तरी या जंगलात राहतोय. आधी इथं असं नव्हतं. माणसं फार कमी यायची इकडं... उलट सगळे प्राणी मस्त खेळायचे आजूबाजूला... झाडंही पावसात हिरवीगार होऊन छान डोलत असायची... पण गेल्या २०-२५ वर्षांत सगळं बदललं. माणसं एकाएकी मोठ्या संख्येनं जंगलात यायला लागली. त्यांच्या गाड्यांचे आवाज होऊ लागले. त्या गाड्या धूर सोडू लागल्या. काही माणसं तर बंदुका घेऊन यायला लागली. त्यांनी आपले प्राणी मारायला सुरुवात केली. अलीकडं तर ते सगळे ती चौकोनी चमकदार रंगीत डबी घेऊन येतात आणि त्यातच बघत बसतात... आपल्याला होणारा त्रास असह्य झाला आहे. यावर आता एकच उपाय - माणसं आपल्याकडं जातात, तसं आपण माणसांकडं फिरायला जायला सुरुवात करायची... मान्य आहे?’
सभेत एकच गदारोळ उडाला. हा उपाय आहे? असं कसं शक्य आहे? माणसं आपल्याला जिवंत सोडतील? किती भयानक, क्रूर असतात माणसं! कसं जमणार हे? सगळे प्राणी, झाडं एकदम गलका करू लागले. माणसांकडे जाण्याची कल्पना अनेकांना फार भारी वाटत होती, तर काहींना त्यात अतोनात धोका जाणवत होता. काय करावं? कसं करावं? सगळ्यांचा एकच गोंधळ सुरू झाला. तितक्याच बिबटेराव पुढे झाले. म्हणाले, ‘वडआजोबा, तुमचं म्हणणं आम्हाला एकदम मान्य आहे. आम्ही जाऊ आधी माणसांच्या शहरांत फिरायला...’ यावर वानरकाका पुढं झाले आणि प्रौढपणानं म्हणाले, ‘तुमचं काय कौतुक हो? आम्ही तर आधीपासून जातोय माणसांकडं... त्यातली काही लोकं आमच्याहून अधिक आचरटपणा करतात ते सोडा...’
सगळे हसले. कोल्होबा पुढं आले. शहाजोगपणे म्हणाले, ‘मी या तरसतात्याला घेऊन जातो कसा माणसांच्या वस्तीत...’ हरणांचे टोळीप्रमुख आले आणि म्हणाले, ‘आम्ही सगळे एकदम जाऊ आणि त्यांच्या शेतात घुसू...’ हे ऐकून झाडांनी आपल्या फांद्या एकमेकांवर आपटून जोरजोरात टाळ्या वाजवल्या... ससोबा उड्या मारू लागले, अस्वलमामांनी जोरजोरात छाती पिटायला सुरुवात केली, हरणं कळपासह टणाटण उड्या मारू लागली.... सगळीकडं एकदम आनंदीआनंद झाला. अवघं जंगल खूश झालं!
वडआजोबांनी सगळा प्लॅन नीट समजावून सांगितला. सगळं ठरलं. माणसांच्या वस्तीवर हल्लाबोल करायचा...
माणसांनी आपल्याला आत्तापर्यंत बराच त्रास दिला. सगळ्या जंगलात येऊन ऊतमात केला. वाट्टेल तसं वागले. सगळ्यांची शांतता घालवून टाकली. झाडांना दु:ख दिलं, नदीला रडायला लावलं, प्राण्यांना वेदना दिल्या, पक्ष्यांना छळलं... आता या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याची वेळ आली होती. आता जंगल माणसांना मुळीच माफ करणार नव्हतं. त्यांना चांगलाच धडा शिकवणार होतं... आता फार गंमत येणार होती!
सुरुवातीला आपले बिबटेराव आणि त्यांचे मित्र चालून गेले. आधी गावांबाहेरच्या वस्तीत, मग उसाच्या शेतात... मग गावातल्या घरांत, मग एकदम मोठ्या शहरांत, त्यांच्या सोसासट्यांत, बंगल्यांत... बिबटे सगळीकडं शिरले... मग हळूहळू धिप्पाड बांध्याचे गवेही त्यांच्यामागोमाग गेले. गव्यांना अडवणार कोण? ते सुखेनैव शहरांच्या रस्त्यांवरून फिरू लागले. मग हरणांचा कळप घुसला... टणाटण उड्या मारत गावागावांमधून फिरू लागला. शेतात घुसू लागला, वस्त्तीत शिरू लागला. सगळीकडं गोंधळ उडाला.... एकदम हलकल्लोळ उडाला. माणसं बावचळून गेली. घाबरून गेली. त्यांना काय करावं ते सुचेना. जंगल कसं आवरावं, ते कळेना. जंगलातील वडआजोबा लांबून हे सगळं बघत होते... आता माणसं चांगलाच धडा शिकतील, असं त्यांना वाटू लागलं. माणसांना बरी अद्दल घडली, असं सगळ्यांना वाटू लागलं...
तेवढ्यात एक अजब दृश्य त्यांना दिसलं... त्या चौकोनी डब्या घेऊन शेकडो माणसं पिंजऱ्यात बंद केलेल्या  बिबट्यांच्या मागे धावत होती. माणसं मोठी चतुर! त्यांनी कसल्याशा बंदुकीतून डार्ट मारून बिबटेमंडळींना पाडलं बेशुद्ध... आणि घातलं एका मोठ्या गाडीत! ती गाडी निघाली कुठं तरी... मग काय, सगळी माणसं आता त्या बिबट्यांच्या मागं मागं धावू लागली. सगळ्यांना त्या बिबट्यांसोबत सेल्फी काढायचा होता... ते बघून वडआजोबांनी कपाळाला हात लावला. करायला गेलो काय आणि झालं काय हे भलतंच, असं त्यांना होऊन गेलं.
तेवढ्यात एक कोल्होबा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘आजोबा, हे बघा, मी काय आणलंय?’ वडआजोबांनी बघितलं, तर ती चमकदार चौकोनी डबी... ससोबा म्हणाले, ‘आजोबा, हा स्मार्टफोन आहे. मी माणसांकडून पळवून आणला आहे.... आता तुमच्याबरोबर मला सेल्फी काढायचा आहे...’ वडआजोबांना काय बोलेना, हेच समजेना. त्यांनी रागारागाने आपल्या पारंब्या आपटल्या. कोल्होबांना त्याचे काही नव्हते. त्यांनी ऐटीत सेल्फी काढला आणि ते तिथून निघाले.
हळूहळू सगळ्या जंगलात कोल्होबांनी सेल्फी काढायचा सपाटा लावला. तिकडं माणसं शहरांत बिबट्यांसोबत सेल्फी काढू लागली आणि कोल्होबा जंगलात झाडांसोबत सेल्फी काढू लागले... जंगल मंगल झाले! सेल्फीत दंग दंग झाले...

---

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड दिवाळी अंक (युनिक फीचर्स), २०२३)

---

मनशक्ती दिवाळी २३ लेख

‘आमच्या वेळी असं नव्हतं...’
----------------------------------

दोन पिढ्यांमधलं अंतर स्पष्ट करणारं आणि नेहमी ऐकू येणारं वाक्य म्हणजे - ‘आमच्या वेळी असं नव्हतं’... सतत हे वाक्य उच्चारणाऱ्यांना आपली पिढी काळाच्या स्पर्धेत मागं पडत चालल्याचा एक विचित्र अपराधगंड असतो बहुतेक! वास्तविक दोन पिढ्यांमध्ये काळाचं जसं स्वाभाविक अंतर असतं, तसंच ते इतर सर्व बाबतींत असणार, हे उघड आहे. तरीही आमच्या वेळी असं नव्हतं, हे सांगण्याचा अट्टाहास बहुतेक मंडळी का करतात देव जाणे. खरं तर नव्या पिढीशी दोस्ती करणं अवघड नाही. त्यासाठी मनाचा मोठेपणा मात्र हवा. मुलाला पित्याच्या चपला यायला लागल्या, की त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होतं किंवा व्हायला पाहिजे, असं एका संस्कृत श्लोकात सांगितलं आहे. मात्र, आपल्यापैकी किती जणांना आपल्याच मुलांशी असं मैत्रीचं नातं प्रस्थापित करता येतं?
यातही गंमत अशी असते, की आपण दर वेळी आपली दोन्ही पिढ्यांशी सतत तुलना करत असतो. एक आपल्या आई-वडिलांची पिढी आणि एक आपल्या मुलांची पिढी. दोन्ही पिढ्यांकडून आपल्यावर अन्याय झाला; आपलं ‘सँडविच’ झालं, असं आत्ताच्या पिढीला मनोमन वाटत असतं. विशेष म्हणजे, प्रत्येक पिढीमध्ये ही भावना दिसते. म्हणजे आपल्या आई-वडिलांनाही त्यांच्या आई-वडिलांविषयी व आपल्याविषयी असंच वाटत असतं. आपल्या मुलांनाही नंतर आपल्याबद्दल आणि त्यांच्या अपत्यांबद्दल असंच वाटणार, हेही नक्की.
आपल्याला कायम आपल्या स्वत:विषयी सहानुभूती वाटत असते. हे अगदी स्वाभाविक आहे. आपलं इतर कुणाहीपेक्षा आपल्या स्वत:वरच प्रेम अधिक असतं. आपण स्वत:ला फार जपत असतो. त्यामुळं आपलं प्रेम, विरह, दु:ख, वेदना, उद्वेग हे जे काही असेल ते इतरांपेक्षा कांकणभर अधिक सरस असतं, असं आपल्याला कायम वाटत असतं. लग्न झालेल्या प्रत्येक बाईला ‘मी होते म्हणून टिकले, दुसरी कुणी असती तर...’ हे जसं वाटत असतं, तसंच आपल्याला ‘मी जो त्याग केला, ते केवळ मी होतो म्हणून; बाकी कुणी असतं तर...’ असंच वाटत असतं. आपण चांगल्या घरात जन्माला आलो, आई-वडील इतर चार लोकांसारखेच होते, आपलं बालपण तसं सुखात गेलं, आयुष्यात फार कटकटी किंवा त्रास न होता, आतापर्यंतचा प्रवास झाला, लग्न वेळेवर झालं, मुलं-बाळं वेळेवर झाली, नोकरीत फार काही जाच नव्हता, मुलंही नीट शिकली, पैसे खर्च होत असले तरी आवकही बऱ्यापैकी होती, कष्टाने पैसे कमावले व चार गाठीलाही बांधले... हे सहसा पटकन कबूल करायला कुणी तयार होत नाही. खरं म्हणजे आपल्याकडे शंभरातील ८० ते ९० लोकांचं जीवन असंच गेलेलं असतं. मात्र, त्या आयुष्याला आपल्या कथित कष्टांचा, त्यागाचा तडका लावल्याशिवाय जीवनाची इतिकर्तव्यता झाली, असं आपल्याला वाटतच नाही. तसं बघायला गेलं, तर प्रत्येक पिढी त्या त्या काळानुसार जगत असते. त्या काळात जे जे उपलब्ध आहे, त्याचा आनंद घेत असते. जे नाही त्याचा त्या पिढीला खेद वा खंत असं काही नसतं. माणसाला साधारणपणे ८० वर्षांचं सरासरी आयुष्य मिळतं. म्हटलं तर हा काळ मोठा आहे. या काळात बरेच बदल घडून येऊ शकतात. अगदी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं उदाहरण घेतलं, तर यंदा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षं पूर्ण झाली. आपल्यापैकी अनेकांनी तो काळ बघितलेला नाही. मात्र, देशाला मिळालेलं स्वातंत्र्य बघितलेले लोकही आज आहेत. तेव्हा ते अगदी लहान असतील, पण ती घटना त्यांना स्पष्ट आठवते आहे. आज साधारण ८५ ते ९० वय असलेले अनेक लोक आपल्यामध्ये आहेत. या सर्वांना देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन नीट आठवत असणार. त्यानंतरच्या सर्व घटना-घडामोडीही आठवत असणार. आपल्याकडे एखाद्याच्या वयाचा उल्लेख करायचा, तर ‘मी अमुक पावसाळे पाहिले आहेत,’ असं म्हणण्याचा प्रघात आहे. याचा अर्थ तेवढे ऋतू पाहिले; तेवढी वर्षं पाहिली. काळाशी निगडित या सगळ्या आठवणी सापेक्ष असतात. कुणाला ६० वर्षं म्हणजे खूप जुना काळ वाटतो, तर कुणाला २० वर्षं म्हणजेही खूप पूर्वीची गोष्ट झाली, असं वाटू शकतं.
मध्यंतरी माझ्याच बाबतीत झालेली एक गंमत सांगायला हवी. दुपारी जेवत असताना, सहज चॅनेल सर्फिंग करत होतो. ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘तराने पुराने’  कार्यक्रम सुरू होणार असल्याची पाटी दिसली. ‘व्वा’ असं म्हणून मी एखादं जुन्या काळचं कृष्णधवल गीत सुरू व्हायची वाट बघू लागलो. तर गाणं लागलं - अजनबी मुझ को इतना बता... हे तर ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातलं (१९९८) काजोल व अजय देवगण यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. मनात विचार आला, अरेच्चा! हा तर आपल्या डोळ्यांसमोर रीलीज झालेला आणि थिएटरला जाऊन पाहिलेला सिनेमा आहे राव! पण मग विचार केला, त्यांचंही बरोबरच आहे. झाली की २५ वर्षं आता! हे ‘तराने’ आता ‘पुराने’च म्हणायचे. तर काळाचं हे असं असतं. आपलं वय होत जातं; पण आपल्याला अनेकदा ते स्वीकारायचं नसतं. सगळं आपल्या काळात जसं चाललं होतं, तसंच पुढच्या सर्व काळात चालायला पाहिजे, असं आपल्याला वाटत असतं. यातली गंमत अशी, की काळानुरूप झालेले सर्व आधुनिक बदल, तंत्रज्ञानादी सोयी, सुखासीनता यांच्याबाबत आपल्याला काही आक्षेप नसतो. ते सगळं आपल्याला हवंच असतं. म्हणजे उदाहरणार्थ, आज चाळिशीत असलेल्या व्यक्तीच्या विशीत स्मार्टफोन नव्हते, म्हणून वीस वर्षांपूर्वीचा काळच कसा चांगला होता, म्हणत उसासे टाकणाऱ्या त्याच व्यक्तीला स्मार्टफोनचा विरह मात्र वीस सेकंदही सहन होत नाही.
‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्या मनात नक्की कोणती भावना असते? खूप प्रामाणिकपणे उत्तर देता येईल का आपल्याला? आपल्याला आपल्या काळात नसलेल्या व आता उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा उपभोग आता वयपरत्वे घेता येत नाही, याची काहीशी असूया तर वाटत नसते ना? मागच्या पिढीत आणि पुढच्या पिढीत आपलं ‘सँडविच’ झालं असं म्हणताना, खरं तर आपल्याला ‘आम्हाला दोन्ही पिढ्यांचे फायदे मिळाले नाहीत,’ असं काहीसं विषादानं वाटत असतं. आधीच्या पिढ्यांमधला कौटुंबिक जिव्हाळा, सामाजिक सौहार्द, व्यक्तिगत जिव्हाळा, शांत-संथ ग्रामीण जीवन किंवा चाळीतलं वा वाड्यातलं आपुलकीचं जीवन आपल्याला हवं असतं, तर नव्या पिढीच्या वाट्याला आलेली भौतिक संपन्नता, तंत्रज्ञानातील प्रगती, सढळ हाताने पैसे खर्च करण्याची ताकद, एसी घरांपासून ते विमानप्रवासापर्यंतच्या सर्व गोष्टी याही आपल्याला हव्या असतात. दोन्ही गोष्टी अर्थात एकाच वेळी मिळू शकत नाहीत. मग हा संघर्ष उभा राहतो आणि आपण काहीसं खंतावून, काहीसं वैतागून म्हणतो - ‘आमच्या वेळी असं नव्हतं...!’
खरं तर प्रत्येक पिढीसमोर काही ना काही तरी आव्हानं उभी असतातच. ती बरीचशी त्या काळानं उभी केलेली असतात. काही गोष्टी चांगल्या असणार, तर काही वाईट हे अगदी गृहीत आहे. आजच्या तरुणांबाबत, म्हणजे पुढच्या पिढीबाबत बोलायचं झालं, तर त्यांच्यासमोरही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेतच. काळ वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाची प्रगती अतिशय वेगाने होत असल्यानं या बदलांचाही वेग प्रचंड आहे. नव्या पिढीला या वेगाशी जमवून घेण्याचं मोठं आव्हान आहे. हल्ली ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप बोलबाला आहे. या ‘एआय’चं मोठं आव्हान आजच्या तरुण पिढीसमोर आहेच. स्मार्टफोनमुळं आपलं जगणंच कसं पूर्ण बदलून गेलं, हे आपल्या पिढीनं गेल्या १२-१५ वर्षांत नीट अनुभवलं आहे. आता कदाचित त्याहून अधिक वेगवान आणि स्तिमित करणारे बदल ‘एआय’मुळे घडू शकतील. किंबहुना आत्ताच घडत आहेत. यंत्र मानवाची जागा घेऊ शकत नाही, असे आपल्याला आतापर्यंत वाटत होते. मात्र, आता तसे काही प्रमाणात का होईना, घडण्याची चिन्हे दिसत आहे. त्यातून निराळेच सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक प्रश्न उपस्थित होणार आहेत. नव्या पिढीलाच त्यांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणात प्रतिकूल बदल घडताना दिसत आहेत. त्यामुळेच वादळे, महापूर, भूस्खलन आदी भौगोलिक संकटे वाढताना दिसत आहेत. या संकटांचा सामना पुढच्या पिढीलाच करायचा आहे. याशिवाय वाढती लोकसंख्या, वाढती धार्मिकता, वाढता कट्टरतावाद, वाढता उन्माद, वाढता हिंसाचार या सगळ्यांना तोंड देण्याची तयारी तरुण पिढीला करावी लागणार आहे.
अर्थात या तरुण पिढीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीही कमी नाहीत. एक तर ही तरुण पिढी अतिशय स्मार्ट आहे. हुशार आहे. हे सगळे तरुण अतिशय ‘सॉर्टेड’ आहेत. त्यांना आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही, याचं नेमकं भानही आहे. त्या जोरावर ते ही नवी आव्हानं नक्कीच पार पाडतील. त्या तुलनेत आपल्या आधीची पिढी आणि अगदी आपली म्हणजे आत्ता चाळिशीत किंवा पन्नाशीत असलेली पिढी यांना खरोखरच याहून कमी आव्हानांना तोंड द्यावं लागलं आहे, हे मान्य करायला हवं. करोनाकाळ हा एक अपवाद. मात्र, ते संकट अवघ्या मानवजातीनंच पेललं. त्यात ही पिढी, पुढची पिढी असा काही भेद मुळातच नव्हता. त्या तुलनेत आता टीनएजमध्ये किंवा विशीत असलेल्या तरुणाईला अधिक व्यापक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, हे निश्चित. मात्र, ही तरुण पिढी या सर्व आव्हानांना पुरून उरेल आणि एक आदर्श, सुखवस्तू आणि समाधानी असा देश घडवू शकेल, यात अजिबात शंका बाळगायला नको. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजीमहाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई ते स्वामी विवेकानंद अशा अनेक शूर स्त्री-पुरुषांनी अगदी कमी वयात फार मोठे पराक्रम गाजवले आणि काळाच्या पटावर आपली लखलखीत नाममुद्रा कोरून ठेवली. भारतातील तरुणांपुढे असे उत्तुंग आदर्श असल्याने त्यांनाही ही उंची गाठण्याची आस असणारच.
तेव्हा ‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ हे रडगाणं गायचं बंद करून, नव्या पिढीसाठी ‘कुठल्याच काळात कधीच नव्हतं, असं भव्य काही तरी निर्माण करा’ असा आशीर्वादाचा उद्गार आपल्या मुखातून बाहेर यावा, हीच सदिच्छा!


---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती दिवाळी अंक २०२३)

---