30 Mar 2026

रूपेरी मुकुटाचे मानकरी- अडूर गोपालकृष्णन

समांतर सिनेमाचे अध्वर्यू
-----------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

अडूर गोपालकृष्णन म्हणजे भारतीय चित्रसृष्टीच्या नभांगणातील एक लखलखतं नक्षत्र. अत्यंत प्रतिभावंत दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते असलेले अडूर गोपालकृष्णन यांना मल्याळम चित्रपटसृष्टीत 'न्यू वेव्ह’ची सुरुवात करण्याचं श्रेय दिलं जातं. केरळी समाजाचे संवेदनशील आणि अतिशय प्रगल्भ चित्रण करणारे  त्यांचे चित्रपट पाहिले, की त्यांच्या प्रतिभेची कल्पना येते.
मौटात्तू गोपालकृष्णन उन्नितन हे त्यांचं मूळ नाव. पुढं त्यांनी त्यांच्या गावाचं नाव घेतलं. त्यांचा जन्म ३ जुलै १९४१ रोजी केरळमधील अडूरजवळ पल्लिकल इथं झाला. त्यांचं कुटुंब कलेची आवड असणारं होतं. त्यांचे वडील स्वयंवंमदत्त माधवन उन्नितन आणि आई गौरी कुंजम्मा यांच्याकडून त्यांना सांस्कृतिक वारसा मिळाला. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.  त्यांनी लहानपणीच अनेक नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं गोष्ट सांगण्याची कला त्यांच्या अंगी विकसित झाली. त्यांचं बालपण केरळमधील पारंपरिक 'कथकली' आणि स्थानिक कलांच्या वातावरणात गेलं. त्यांच्या अनेक चित्रपटांत दिसणारी संथ लय आणि दृश्यात्मकता यावर या बालपणीच्या संस्कारांचा मोठा प्रभाव आहे. अडूर यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्थानिक शाळांमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूटमधून पदवी मिळवली आणि काही काळ सरकारी नोकरीही केली.  मात्र, कलेच्या ओढीमुळं ते सिनेमाकडं वळले. केरळच्या मातीतील कला आणि नाटकांची ओढ यामुळंच ते जागतिक दर्जाचे दिग्दर्शक होऊ शकले, असं म्हणावं लागेल.
पुढं चित्रपट कलेचं औपचारिक शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. अडूर गोपालकृष्णन आणि ‘एफटीआयआय’ यांचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. एका अर्थानं गोपालकृष्णन यांच्या भविष्यातील झळाळत्या कारकिर्दीचा पाया आपल्या पुण्यातच रचला गेला. १९६२ मध्ये अडूर यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या विषयांत विशेष प्रावीण्य मिळवलं. पुण्यात शिक्षण घेत असतानाच त्यांनी जागतिक दर्जाचे सिनेमे पाहिले. श्रेष्ठ दिग्दर्शक सत्यजित राय यांनी जेव्हा ‘एफटीआयआय’ला भेट दिली होती, तेव्हा अडूर त्यांच्या कामामुळे प्रचंड प्रभावित झाले होते. पुण्यात शिकत असतानाच त्यांना सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते एक प्रभावी कलात्मक माध्यम असल्याचं उमजलं. त्यांनी १९६५ मध्ये आपली पदवी पूर्ण केली.
गोपालकृष्णन अतिशय तब्येतीत सिनेमे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पाच दशकांहून दीर्घ अशा कारकिर्दीत त्यांनी केवळ १२ पूर्ण लांबीचे चित्रपट तयार केले. त्यांच्या ‘स्वयंवरम’ या १९७२ मध्ये आलेल्या पहिल्याच चित्रपटानं मल्याळी चित्रपटसृष्टीत अक्षरश: क्रांती घडवली. समांतर सिनेमाची ‘नवी लाट’ याच सिनेमापासून मल्याळी चित्रपटसृष्टीत सुरू झाली असं मानलं जातं. यानंतर ‘कोडिअट्टम’, ‘एलिप्पाथायम’, ‘मुखामुखम’, ‘अनंतराम’, ‘मथिलुकल’, ‘विधेयन’,  ‘कथापुरुषन’, ‘निजालुकुथू’, ‘नानू पेन्नुंगल’, ‘ओरू पेन्नुम रंदानम’ आणि ‘पिन्नेयुम’ हे त्यांचे आणखी ११ चित्रपट आले.

‘स्वयंवरम’विषयी बोलायचं तर १९७२ मध्ये आलेला हा चित्रपट 'विस्वम' आणि 'सीता' या प्रेमी युगुलाची कथा आहे. अभिनेता मधू व अभिनेत्री शारदा यांनी यात नायक-नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातील नायक-नायिका आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करून एका नवीन शहरात, म्हणजे तिरुअनंतपुरम इथं आपलं नवं आयुष्य सुरू करण्यासाठी येतात. सुरुवातीला स्वप्नवत वाटणारं त्यांचं आयुष्य हळूहळू गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळं कठीण होत जातं. आदर्शवाद आणि कठोर वास्तव यांच्यातील हा संघर्ष अडूर गोपालकृष्णन यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या चित्रपटाची वैशिष्ट्यं अनेक आहेत. यात अडूर यांनी बरेच तांत्रिक प्रयोग केले. हा 'सिंक साउंड’, म्हणजे' थेट चित्रीकरणाच्या वेळी ध्वनिमुद्रण करणं, या तंत्राचा आणि बाह्य लोकेशन्सचा वापर करणारा पहिला मल्याळी चित्रपट होता. यात व्यावसायिक चित्रपटांप्रमाणे गाणी, नृत्य किंवा उगाच घातलेला विनोद नव्हता. चित्रपटाची सुरुवात एका बस प्रवासाच्या पाच मिनिटांच्या दीर्घ शॉटनं होते. हे दृश्य त्या काळातील चित्रपट निर्मितीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. सुरुवातीला या चित्रपटाला चित्रपटगृहांत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, परंतु राष्ट्रीय पुरस्कारांनंतर तो प्रचंड गाजला. १९७३ च्या विसाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटानं चार प्रमुख पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अडूर गोपालकृष्णन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शारदा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण मंकडा रविवर्मा असे हे चार पुरस्कार होते. हा चित्रपट आजही त्याची कथनशैली आणि मानवी भावभावनांच्या वास्तववादी चित्रणामुळं जगभरातील सिनेप्रेमींच्या अभ्यासाचा विषय आहे.
अडूर यांचा १९८१ मध्ये आलेला ‘एलिप्पथायम’ हा चित्रपट अडूर यांच्या कारकिर्दीतील मास्टरपीस मानला जातो. या शीर्षकाचा शब्दश: अर्थ आहे उंदराचा पिंजरा. केरळमधील तत्कालीन सरंजामशाही व्यवस्थेचा अंत होत असताना, बदलत्या काळाशी जुळवून न घेऊ शकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. या चित्रपटाला लंडन चित्रपट महोत्सवात सर्वांत कल्पक चित्रपट' म्हणून पुरस्कार मिळाला होता. यानंतर अडूर यांनी १९८४ मध्ये ‘मुखामुखम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हा चित्रपट राजकीय विचारसरणी आणि कम्युनिस्ट चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका क्रांतिकारक नेत्याचं एकाकीपण आणि त्याच्याबद्दल समाजात असणाऱ्या प्रतिमांचा संघर्ष यात पाहायला मिळतो. यापुढचा त्यांचा चित्रपट होता १९८७ मध्ये आलेला ‘अनंतराम’. हा चित्रपट मानवी मानसशास्त्र आणि कथानक मांडण्याच्या शैलीवर आधारित आहे. 'सत्य' आणि 'कल्पना' यातील पुसट रेषा यात एका तरुणाच्या दृष्टिकोनातून यात दाखविण्यात आली आहे. यानंतर अडूर यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे १९९० मध्ये आलेला ‘मथिलुकल’. या शीर्षकाचा अर्थ आहे भिंती. प्रसिद्ध लेखक वैकोम महंमद बशीर यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. यात मल्याळी सुपरस्टार मामुट्टी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तुरुंगातील एका कैद्याचं एका अदृश्य महिला कैद्याशी जडलेलं नातं यात अतिशय हळुवारपणे दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यात त्या महिला कैद्याचा फक्त आवाज ऐकू येतो.
अडूर यांचा पुढचा चित्रपट म्हणजे १९९३ मध्ये आलेला ‘विधेयन’. याचा शब्दश: अर्थ आहे चापलूस. हा चित्रपट सत्ता, अत्याचार आणि गुलामगिरी यांचे चित्रण करतो. एका क्रूर जमीनदाराचा त्याच्या नोकरावर असणारा मानसिक आणि शारीरिक प्रभाव या सिनेमात अंगावर येणाऱ्या वास्तववादाने मांडला आहे. यातही मामुट्टी यांनी साकारलेली खलनायकी भूमिका संस्मरणीय ठरली आहे.
अडूर यांनी २००२ मध्ये ‘निजालुकुथू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. फाशी देणाऱ्या एका जल्लादाची मानसिकता आणि त्याला वाटणारी अपराधीपणाची भावना या चित्रपटात केंद्रस्थानी आहे. अडूर यांचे चित्रपट केवळ कथा सांगत नाहीत, तर ते प्रेक्षकांना त्या काळातील सामाजिक आणि मानसिक स्थितीचा विचार करायला भाग पाडतात. यामुळंच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अडूर गोपालकृष्णन यांचं स्थान केवळ एक दिग्दर्शक एवढंच नसून ते समांतर चित्रपट चळवळीचे एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. जागतिक स्तरावर सत्यजित राय यांच्यानंतर भारतीय सिनेमाची ओळख ज्या मोजक्या दिग्दर्शकांमुळं टिकून आहे, त्यांत अडूर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
अडूर यांच्या योगदानाचा आढावा घेताना, 'न्यू वेव्ह' सिनेमाची मुहूर्तमेढ ही त्यांची कामगिरी अगदी ठळक म्हणावी लागेल. 'स्वयंवरम'द्वारे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत एका नव्या पर्वाची सुरुवात केली, हे पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं. गाणी, मारामारी आणि अतिरंजित नाटकीपणाला फाटा देऊन, साधेपणा आणि वास्तववादाचा स्वीकार करणारा हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांसाठी नवा होता. अडूर यांच्या चित्रपटांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 'दृकश्राव्य भाषा'. ते संवादांपेक्षा दृश्ये आणि ध्वनी यांच्या माध्यमातून कथा सांगण्यावर भर देतात. पात्रांची शांतता, निसर्गाचे आवाज आणि मानवी हालचालींतून ते चित्रपटाचा आशय समृद्ध करतात. याखेरीज त्यांचे चित्रपट केवळ वरवरची गोष्ट सांगत नाहीत, तर ते मानवी मनाचा आणि सामाजिक व्यवस्थेचा सखोल वेध घेतात. विशेषत: 'एलिप्पथायम'मध्ये त्यांनी सरंजामशाही मानसिकतेचा ऱ्हास कसा होतो, हे प्रभावीपणे दाखवलं आहे. 'विधेयन’मधून सत्ता आणि गुलामगिरीच्या मानसिकतेवर अडूर यांनी भाष्य केलं. त्यांच्या कथांमध्ये केरळचा समाज, तिथलं राजकारण आणि मानवी नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे पदर उलगडतात.
याशिवाय अडूर यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे केरळमधील फिल्म सोसायटी चळवळीचे ते जनक आहेत. चित्रलेखा फिल्म सोसायटीची स्थापना करून, त्यांनी जागतिक सिनेमा सामान्य मल्याळी प्रेक्षकांपर्यंत पोचवला. चित्रपट निर्मितीसोबतच चित्रपट साक्षरता वाढवण्यात त्यांचं योगदान मोलाचे आहे. एफटीआयआयमधून प्रक्षिक्षण घेतल्यामुळं चित्रपटांच्या तांत्रिक बाबींतही ते जागरूक असतात. तांत्रिक शिस्तीबरोबरच छायाचित्रण, संपादन आणि ध्वनिमुद्रण या प्रत्येक बाबतीत ते अत्यंत चोखंदळ असतात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक 'फ्रेम' एखाद्या चित्रासारखी रेखीव असते. थोडक्यात सांगायचं तर अडूर गोपालकृष्णन यांनी भारतीय सिनेमाला केवळ मनोरंजन न मानता 'एक गंभीर कलाप्रकार' म्हणून जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटांनी अनेक पिढ्यांच्या दिग्दर्शकांना प्रेरणा दिली असून, 'कलात्मक सिनेमा' कसा असावा, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
अडूर यांच्या चित्रपट निर्मितीची शैली अतिशय शिस्तबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक असते. त्यांच्या तंत्राची काही महत्त्वाची वैशिष्ट्यं सांगायची, तर संथ गती आणि 'दीर्घ शॉट’ हे एक ठळक वैशिष्ट्य जाणवतं. त्यांच्या चित्रपटांची गती मुद्दाम संथ ठेवली जाते. प्रेक्षकांना पात्राच्या मानसिक अवस्थेत शिरता यावं, यासाठी ते लांब शॉट वापरतात. घाईघाईनं दृश्यं बदलण्याऐवजी, ते कॅमेरा एका जागी स्थिर ठेवून त्या दृश्यातील नैसर्गिक हालचाली टिपण्यावर भर देतात. त्यांच्या सिनेमांत ध्वनीचा कल्पक वापर दिसून येतो. म्हणून त्यांच्या सिनेमात पार्श्वसंगीत  खूप कमी असतं. त्याऐवजी ते नैसर्गिक ध्वनींचा वापर करतात. उदाहरण द्यायचं तर दारं उघडण्याचा आवाज, पावलांचा आवाज किंवा पक्ष्यांचा चिवचिवाट असे आवाज टिपण्यावर ते भर देतात. 'एलिप्पथायम'मध्ये उंदराचा पिंजरा पडण्याचा आवाज किंवा पात्रांची शांतता ही संवादांपेक्षा जास्त प्रभावी ठरते, हे अनेक प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. 'फ्रेमिंग' आणि रचना याबाबतही अडूर गोपालकृष्णन आपलं वेगळेपण राखून आहेत. अडूर यांचे प्रत्येक दृश्य एखाद्या चित्रासारखं असतं. ते पात्रांना खिडक्या, दारं किंवा खांबांच्या मागे अशा प्रकारे उभे करतात, की त्यातून पात्राची मानसिक कोंडी किंवा एकाकीपण स्पष्टपणे दिसतं. 'क्लोज-अप' शॉट्सचा वापर ते खूप मर्यादित आणि फक्त महत्त्वाच्या क्षणीच करतात. कमीत कमी साधनांतून जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्यावर ते विश्वास ठेवतात. त्यांच्या चित्रपटात भपकेबाज सेट्स नसतात, तर केरळमधील जुनी घरं आणि निसर्गाचा नैसर्गिक वापर केला जातो. पात्रांचे संवादही मोजके आणि अर्थपूर्ण असतात. अडूर स्वतः त्यांच्या चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत पूर्णपणे गुंतलेले असतात. त्यांच्या मते, संकलन म्हणजे केवळ दृश्यं जोडणे नव्हे, तर चित्रपटाला एक लय देणं होय. कथेचा प्रवाह संथ असला तरी तो कधीही कंटाळवाणा होणार नाही, याची काळजी ते संकलनाद्वारे घेतात. त्यांच्या या तांत्रिक शिस्तीमुळंच त्यांचे चित्रपट हे केवळ 'सिनेमा' न राहता एक ‘दृश्य अनुभव’ ठरतात.
अडूर गोपालकृष्णन यांच्या चित्रपटांच्या दृश्यात्मक सौंदर्यामध्ये दिग्गज छायाचित्रकार मंकडा रविवर्मा यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. या दोघांच्या जोडीने मल्याळम सिनेमाला एक जागतिक ओळख मिळवून दिली. मंकडा रविवर्मा आणि अदूर यांचा नैसर्गिक प्रकाशावर खूप विश्वास आहे. त्यांच्या चित्रपटात कृत्रिम प्रकाशाचा वापर कमीत कमी असायचा. घरातील खिडकीतून येणारा उजेड किंवा झाडांच्या सावलीतून पडणारा प्रकाश यांचा वापर करून ते पात्रांच्या मनातील भावना पडद्यावर उतरवत असत. केरळमधील जुन्या वास्तू, हिरवागार निसर्ग आणि पावसाळी वातावरण मंकडा रविवर्मा यांनी अतिशय जिवंतपणे टिपलंय.
'स्वयंवरम' आणि 'एलिप्पथायम'मधील दृश्यं पाहताना प्रेक्षकांना आपण स्वतः त्या वातावरणात आहोत, असा भास होतो. मंकडा यांनी केवळ सुंदर दृश्यं टिपली नाहीत, तर कॅमेरा अँगलच्या माध्यमातून पात्रांचं अंतर्मन मांडलं. उदाहरण द्यायचं तर 'एलिप्पथायम' मध्ये मुख्य पात्राची हतबलता दाखवण्यासाठी ते अनेकदा पात्राला दाराच्या चौकटीत किंवा खांबांच्या अडथळ्यात चित्रित करत, त्यामुळं त्या पात्राचा कोंडमारा प्रेक्षकांना जाणवतो. अडूर यांच्याप्रमाणेच मंकडा यांची शैलीही 'मिनिमलिस्टिक' होती. अनावश्यक कॅमेरा हालचाली करण्याऐवजी ते एका स्थिर शॉटमध्ये जास्तीत जास्त अर्थ भरण्यावर भर देत. यामुळे चित्रपटात एक प्रकारची शांतता आणि गांभीर्य निर्माण होत असे. अडूर गोपालकृष्णन यांनी आपल्या कारकिर्दीतील बहुतांश महत्त्वाचे चित्रपट मंकडा रविवर्मा यांच्यासोबतच केले. या दोघांमधील सामंजस्य इतकं होतं, की अडूर यांना काय अपेक्षित आहे हे मंकडा शब्दांशिवाय ओळखून कॅमेऱ्यात कैद करत असत. मंकडा रविवर्मा यांच्या कॅमेऱ्याने अडूर यांच्या कथांना 'काव्यात्मक वास्तववाद' दिला. त्यांच्या छायाचित्रणामुळंच हे चित्रपट आजही तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य वाटत नाहीत.
अडूर यांनी भारतीय सिनेमाला ‘सिनेमाची भाषा’ शिकवली. त्यांच्या प्रभावामुळं अनेक तरुण दिग्दर्शकांनी व्यावसायिक गणितं सोडून कलात्मक चित्रपट तयार करण्याचं धाडस केलं. अडूर यांची शिस्त आणि त्यांचं सौंदर्यशास्त्र यांचा प्रभाव कन्नड सिनेमांत गिरीश कासारवल्ली, मल्याळी सिनेमांत शाजी एन. करुण आणि जागतिक स्तरावरील अनेक दिग्दर्शकांवर पडलेला दिसतो. मराठीतील तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्याही कलाकृतींवर अडूर यांच्या शैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आपली संस्कृती आणि मातीतील कथा प्रामाणिकपणे मांडल्या, तर त्या जागतिक स्तरावर कशा पोहोचवता येतात, याचा वस्तुपाठ अडूर यांनी नव्या पिढीला घालून दिला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महागडे सेट्स नसतानाही केवळ उत्कृष्ट पटकथा आणि तांत्रिक अचूकतेच्या जोरावर दर्जेदार चित्रपट कसे तयार करता येतात, हे अडूर यांनी सिद्ध केलंय.
अडूर गोपालकृष्णन हे केवळ दिग्दर्शक नाहीत, तर ते एक प्रगल्भ लेखक आणि विचारवंतही आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सर्व चित्रपटांच्या पटकथा त्यांनी स्वतः लिहिल्या आहेत. त्या केवळ संवादरूपी नसून, त्यात दृश्यांचं सविस्तर वर्णन असतं. शिवाय त्यांनी चित्रपट या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील 'सिनेमायुडे लोकं' (अर्थ : चित्रपटाचे जग) या पुस्तकाला १९८३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाच्या व्याकरणानुसार त्यांनी लिहिलेलं 'दी एक्सपीरियन्स ऑफ सिनेमा' हे पुस्तक चित्रपट अभ्यासाच्या विद्यार्थ्यांसाठी आजही मार्गदर्शक मानलं जातं.
अडूर यांनी सुरू केलेल्या  चित्रलेखा फिल्म सोसायटीमुळं केरळमधील सर्वसामान्य प्रेक्षकांना जागतिक सिनेमा, उदाहरणार्थ कुरोसावा, बर्गमन, गोदार्द यांचे चित्रपट, पाहण्याची संधी मिळाली. आज केरळमध्ये जो सिनेप्रेमी वर्ग आहे, त्याचं मोठं श्रेय अडूर यांच्या या उपक्रमाला जातं. थोडक्यात सांगायचं, तर अडूर गोपालकृष्णन यांनी भारतीय सिनेमाला 'मनोरंजन' या चौकटीतून बाहेर काढून, त्याला 'तात्त्विक आणि राजकीय अधिष्ठान' प्राप्त करून दिलं.
अडूर यांचं व्यक्तिमत्त्व शिस्तप्रिय आहे. चित्रपटाच्या सेटवर शांतता राखणं आणि प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म नियोजन करणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी त्यांच्या कलात्मक प्रवासात त्यांना मोठी साथ दिली. २०१५ मध्ये त्यांच्या निधनानंतर अडूर यांनी काही काळ चित्रपट निर्मितीपासून विश्रांती घेतली होती. इतके मोठे जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक असूनही, अडूर आजही अतिशय साधे आयुष्य जगतात. त्यांना अनावश्यक प्रसिद्धी किंवा झगमगाटात राहणे आवडत नाही. अगदी अलीकडं म्हणजे २०१६ मध्ये त्यांनी 'पिन्नेयुम' हा चित्रपट दिग्दर्शित केला. यात दिलीप आणि काव्या माधवन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट गुन्हेगारी आणि मानवी लोभावर आधारित होता. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही ते स्थानिक चित्रपट महोत्सवांमध्ये सक्रिय असतात. ते आजही नवीन पिढीच्या चित्रपटांचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्यावर परखड मते मांडतात. ते एका चित्रपटासाठी खूप वेळ घेतात. त्यांच्या दोन चित्रपटांमध्ये अनेकदा ४ ते ५ वर्षांचं अंतर असतं; कारण ते पटकथेवर खूप सखोल काम करतात. त्यांच्या चित्रपटांप्रमाणंच त्यांना खऱ्या आयुष्यातही केरळच्या निसर्गाची आणि तिथल्या पारंपरिक वास्तुकलेची खूप ओढ आहे.
अडूर गोपालकृष्णन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘इमेजेस/रिफ्लेक्शन्स', अर्थात बिंब-प्रतिबिंब या शीर्षकाचा एक अप्रतिम माहितीपट प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी ‘एनएफडीसी’साठी तयार केला आहे. हा माहितीपट केवळ अडूर यांच्या आयुष्याचा प्रवास नाही, तर त्यांच्या सिनेमाच्या भाषेचा शोध आहे. कासारवल्लींनी तो अतिशय संथ आणि लयबद्ध पद्धतीने मांडला आहे. या माहितीपटाची रचना पाच भागांत करण्यात आली आहे. कासारवल्लींनी अडूर यांच्या कामाची विभागणी त्यांच्या सिनेमातील प्रतिमांनुसार केली आहे. यात अडूर यांच्या चित्रपटांमधील ध्वनी, शांतता आणि प्रतिमा  यांचा वापर कसा केला जातो, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. अडूर गोपालकृष्णन हे केवळ कथा सांगत नाहीत, तर ते माणसाच्या अस्तित्वाचा, सत्तेचा आणि मानवी स्वभावातील गुंतागुंतीचा शोध घेतात. 'स्वयंवरम'पासून ते त्यांच्या नंतरच्या चित्रपटांपर्यंतचा हा प्रवास यात उलगडतो. अडूर यांच्यावर सत्यजित राय यांच्या सिनेमाचा असलेला प्रभाव आणि त्यातून त्यांनी स्वतःची एक वेगळी, स्वतंत्र 'मल्याळम' सिनेसृष्टी कशी उभी केली, याचं चित्रण या माहितीपटात आहे. केरळची भूमी, तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्या सिनेमात कशी अविभाज्य भाग असते, हे कासारवल्लींनी बारकाईनं टिपलं आहे. अडूर स्वतः त्यांच्या सेटवरचे अनुभव, त्यांची शिस्त आणि कॅमेऱ्यामागचा त्यांचा दृष्टिकोन यावर बोलतात. अस्पष्ट शेवट किंवा ज्याला आपण 'ओपन एंडेड' सिनेमे म्हणतो, तो अडूर यांच्या सिनेमाचा आत्मा आहे. प्रेक्षकांना सगळंच ताटात वाढून न देता, त्यांना विचार करायला लावणं आणि सिनेमा संपल्यावरही तो डोक्यात तसाच चालू राहणं, हे त्यांच्या शैलीचं वैशिष्ट्य. एक दिग्दर्शक प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा कसा आदर करतो, हे कासारवल्लींनी या माहितीपटात खूप प्रभावीपणे मांडलंय. या दोन्ही दिग्दर्शकांनी या माहितीपटात मारलेल्या गप्पा अनेक सिनेमाप्रेमींना पर्वणीसारख्याच वाटतील, यात शंका नाही.
अडूर गोपालकृष्णन यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तयार केलेले माहितीपट. चित्रपटांप्रमाणेच माहितीपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि कलेचं महत्त्वपूर्ण दस्तऐवजीकरण त्यांनी केलं आहे. अडूर यांनी प्रामुख्याने केरळच्या समृद्ध कलापरंपरांवर आधारित दर्जेदार माहितीपट तयार केले आहेत. यात कथकली, कुडियाट्टम आणि मोहिनीअट्टम यांसारख्या शास्त्रीय नृत्य आणि नाट्य प्रकारांचा सखोल अभ्यास पाहायला मिळतो. याशिवाय त्यांनी कथकली कलाकार 'गुरू चेंगन्नूर' आणि 'कलामंडलम गोपी' यांसारख्या थोर कलाकारांच्या जीवनावर आणि कलेवर आधारित माहितीपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या ५४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३० लघुपट आणि माहितीपट तयार केले आहेत. त्यांचे माहितीपट केवळ माहिती देणारे नसून, ते कलात्मक आणि सौंदर्यानुभव देणारे असतात. त्यांनी या माध्यमाचा वापर करून पारंपरिक कलांचे बारकावे जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. सन २००० मध्ये आलेला 'कलामंडलम गोपी' आणि २००२ मध्ये आलेला 'कुडियाट्टम' हे त्यांचे काही गाजलेले माहितीपट आहेत.
एवढी उत्तुंग कामगिरी करणारे अडूर गोपालकृष्णन यांना भरपूर पुरस्कार लाभले, यात आश्चर्य नाही. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पुरस्कार विजेत्यांपैकी एक आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकूण १६ वेळा मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना स्वयंवरम, मुखामुखम, अनंतराम, मथिलुकल आणि आणि विधेयन या चित्रपटांसाठी, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून स्वयंवरम, एलिप्पथायम, कथपुरुषन आणि निजालुकुथू या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. केंद्र सरकारतर्फे १९८४ मध्ये ‘पद्मश्री’ आणि २००६ मध्ये ‘पद्मविभूषण’ हे नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटचा पुरस्कार आणि फ्रेंच सरकारचा 'लिजन ऑफ ऑनर' हा अत्यंत मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना सन २००४ चा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अशा या श्रेष्ठ दिग्दर्शकाला मानाचा मुजरा…

----

हा भाग यू-ट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

सोहराब मोदी यांच्यावरील भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

9 Mar 2026

रूपेरी मुकुटाचे मानकरी – आशा भोसले

रूपेरी मुकुटाचे मानकरी – आशा भोसले
-------------------------------------------------


(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी आशा भोसले यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)


(नोंद - संहिता बरीच दीर्घ झाल्यामुळे कार्यक्रमात सर्वच गोष्टी समाविष्ट झाल्या नाहीत. खाली कार्यक्रमाची लिंक दिली आहे. मूळ अर्ध्या तासाचा कार्यक्रम वाढवून ४० मिनिटांचा करण्यात आला. तरीही या संहितेतील काही गोष्टी वगळाव्या लागल्या. त्यामुळे ही मूळ संहिता जरूर वाचावी.)

------

श्रोते हो, नमस्कार!

आशा भोसले… भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुरेल स्वप्न… आवाजाच्या दुनियेतील एक महान व्यक्तिमत्त्व… कमालीची वैविध्यपूर्ण गाणी गाणारी ज्येष्ठ गायिका…. अतिशय खडतर अशा संघर्षातून तावून-सुलाखून बावनकशी सोन्यासारखी लखलखणारी एक खंबीर स्त्री… स्वयंपाकाच्या आवडीपासून ते गायकांच्या नकला करण्यापर्यंत अनेकविध कलागुणा जोपासणाऱ्या आणि वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात वावरणाऱ्या जणू एखाद्या मोहक आजीबाई… आशाताईंचं नाव घेतलं, की त्यांच्या एवढ्या प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर सहज उभ्या राहतात. अर्थात या सर्व प्रतिमांना दशांगुळे पुरून उरणारी दैवी सुरांची त्यांची प्रतिभा आणि तिला कठोर मेहनतीची जोड देऊन घडलेली एक असामान्य गायिका ही प्रतिमा सर्वांत लखलखीतपणे कायमच समोर येते. भारतीय चित्रपट संगीत विश्वातली जणू ‘फर्स्ट फॅमिली’ म्हणावी, अशा मंगेशकर कुटुंबात जन्म, मात्र त्या आडनावाचं कोंदण फार लहान वयातच त्यागण्याचं प्राक्तन, त्यानंतर वाट्याला आलेला प्रचंड मोठा संघर्ष आणि अतोनात अडचणींना तोंड देत फक्त गाण्यावर लक्ष केंद्रित करणारी अफाट ताकदीची गायिका… आशा भोसले म्हणजे हे सर्वच….
भारतीय बोलपटांचा इतिहास अद्याप शंभर वर्षांचाही नाही. किंबहुना ‘आलमआरा’ हा पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला १९३२ मध्ये आणि पुढच्याच वर्षी आशाताईंचा जन्म झाला. याचाच अर्थ ९४ वर्षांच्या बोलपटांच्या इतिहासात आशाताईंची कारकीर्द जवळपास आठ दशकांची आहे. ही नुसती आकडेवारीच थक्क करून टाकणारी आहे. आशाताईंनी या आठ दशकांतील तब्बल ५० वर्षं तरी नक्कीच आपल्या खणखणीत आवाजानं दणाणून टाकली आहेत. केवळ हिंदीच नव्हे, तर जवळपास सर्व भारतीय भाषा, एवढेच नव्हे तर काही जागतिक भाषांतही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीएवढं वैविध्य अन्य कोणत्याही गायिकेला आतापर्यंत दाखविता आलेलं नाही. मोठ्या वृक्षाखाली दुसरी झाडं वाढत नाहीत, हा निसर्गनियम आहे. असं असलं तरी लता मंगेशकर या आपल्याच मोठ्या बहिणीच्या आकाशाहून विशाल अशा प्रतिभाप्रभावापासून जाणीवपूर्वक दूर राहून आशाताईंनी आपली स्वतंत्र कारकीर्द घडवली. एवढंच नव्हे, तर लताशी सतत तुलना होण्याचा अटळ धोका पत्करून गायलेल्या प्रत्येक गाण्यावर स्वत:ची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली.
नावाप्रमाणेच आशा भोसले यांचं सगळं जीवन म्हणजे आशेचा, विजिगीषू जीवनेच्छेचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास आहे. त्यांचा जन्म आठ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत झाला. वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांची बलवंत नाटक कंपनी तेव्हा जोरात होती. त्या कंपनीतर्फे गावोगावी नाटकांचे खेळ होत. कंपनीत दोनशे माणसं कामाला होती. या सर्वांचे पालनपोषण पं. दीनानाथ करत असत. लता आणि मीना यांच्या पाठीवर आशाचा जन्म झाला. आशा जन्मापासूनच तब्येतीनं सुदृढ आणि खोडकर होती. कंपनीत सर्वांच्या चहापाण्यासाठी भलंमोठं दुधाचं भांडं असे. त्यावर येणारी सगळी साय लहानगी आशा गट्टम करत असे. मी या सायीवरच वाढले, म्हणून नव्वदीपार जगले, असं स्वत: आशाताईंनी एका मुलाखतीत मिश्कीलपणे सांगितलं आहे. लता आणि मीना यांना वडील गाणं शिकवत. आशा मात्र हुंदडत खेळत असे. असं असलं तरी तिचा कान तयार होता. वडील तिला लहापणी पठाण, हब्ब अशा टोपणनावांनी हाका मारत असत. लता लहानग्या आशाला कडेवर घेऊन तिचे भरपूर लाड करी. एकदा शाळेत शिक्षक आशाला कशावरून तरी ओरडले. झालं. लताला राग आला. ती आशाला कडेवर घेऊन तडक घरी निघून आली. यापुढं त्या शिक्षकाच्या शाळेत जाणार नाही, असा निश्चय तिनं बोलून दाखवला. या बहिणींचं औपचारिक शिक्षण तिथंच थांबलं. मात्र, जीवनाच्या शाळेत त्या जे काही शिकल्या, त्यातून अनेकांना भरपूर काही शिकायला मिळालं. अतिशय विपरीत परिस्थिती असताना, दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत असताना आपण केवळ गाण्यामुळं जिवंत राहिलो, असं आशाताई सांगतात तेव्हा त्यांच्या कठोर तपश्चर्येची थोडीशी कल्पना येते.
आशाताईंचा स्वभाव लहानपणापासूनच बंडखोर होता. वृत्ती स्वाभिमानी होती. वडील दीनानाथ मंगेशकर यांचं १९४२ मध्ये निधन झालं तेव्हा आशाताई केवळ नऊ वर्षांच्या होत्या. आई व लता या सर्व लहान भावंडांना घेऊन मुंबईत आल्या. तिथं चर्नीरोडला पं. नवरंग नागपूरकर यांच्याकडं महिना पाच रुपये फी देऊन आशाचं संगीत शिक्षण सुरू झालं. तिची परीक्षा घ्यायला शंकरराव व्यास हे तेव्हाचे नामवंत गायक आले होते. आशानं त्यांच्यासमोर परीक्षा म्हणून गाणं म्हणायला सुरुवात केली असताना, त्यांनी तिला थांबवलं आणि सांगितलं, की तुझा पहिला नंबर आला आहे. तुला इथं शिकायची गरज नाही. त्यानंतर त्यांच्याच ओळखीनं वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आशाला गाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून स्टुडिओतला माइक आणि आशाताई यांचं अद्वैत झालं. या माइकला देव मानून त्यांनी हजारो गाणी गायली. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जावं, एवढ्या प्रचंड संख्येनं गाणी गायली. माइक समोर असताना दुसरा कुठलाही विचार करायचा नाही; तहानभूक विसरून जायची, फक्त गाणं उत्तम होईल कसं एवढाच ध्यास घ्यायचा अशा तडफेनं आशाताईंनी आपली झळाळती कारकीर्द उभी केली. अर्थात त्या कधीही आपले ते संघर्षाचे दिवस विसरल्या नाहीत.
आशाताईंच्या कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस कष्टाचे होते. दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘माझं बाळ’ या १९४३ मध्ये आलेल्या चित्रपटात ‘चला चला नवबाला’ हे आशाताईंनी गायलेलं पहिलं चित्रपट गीत. तेव्हा त्या अवघ्या ९ वर्षांच्या होत्या. हिंदीत त्यांना पहिली संधी मिळाली ती ‘चुनरिया’ या चित्रपटात. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी ‘सावन आजा’ हे पहिलं गीत गायलं. याच वर्षी त्यांची गाणी असलेला ‘अंधों की दुनिया’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यांनी पहिलं सोलो हिंदी गाणं गायलं ते ‘रात की रानी’ या चित्रपटात. असं असलं तरी खूप मोठं यश आशाताईंना अद्याप मिळालं नव्हतं. त्यातच त्यांनी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या गणपतराव भोसले यांच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं आणि त्यांच्या आयुष्यानं एक फार खडतर वळण घेतलं. पुढची सात-आठ वर्षं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होती. त्यांना तीन मुलं झाली. शिवाय उत्पन्न फार नव्हतं. या काळात अक्षरश: एक वेळ जेवून दिवस काढल्याचे अनुभव आशाताई सांगतात. गणपत भोसले तसे लवकरच निवर्तले. त्यानंतर आशाताई आणि उर्वरित मंगेशकर कुटुंब पुन्हा एकत्र आलं. अर्थात ते भविष्यात… पन्नासच्या दशकात आशाताईंचा संघर्ष सुरूच होता. त्या काळात शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी, गीता रॉय या गायिकांचा दबदबा होता. लता मंगेशकरांनीही ‘महल’पासून स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं आणि पुढं हे साम्राज्य वाढतच जाणार होतं. त्यामुळं मुख्य नायिकेची गाणी याच गायिकांना मिळायची. या काळात आशाताईंनी पोटापाण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारलं. कमी बजेटच्या, दुय्यम चित्रपटांसाठी त्या पार्श्वगायन करू लागल्या. ए. आर. कुरेशी, सज्जाद हुसैन, एस. मोहिंदर, सरदार मलिक, गुलाम महंमद या संगीतकारांनी त्यांना प्रामुख्यानं गायची संधी दिली. ‘संगदिल’ या सज्जाद हुसैन यांचं संगीत असलेल्या, १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात गाणं गायल्यामुळं आशाताईंचं थोडं नाव झालं. याच वर्षी ओ. पी. नय्यर यांनी त्यांना ‘छम छमा छम’ या चित्रपटासाठी फार मोठी संधी दिली. या चित्रपटाच्या एकूण ११ पैकी १० गाणी आशाताईंना गायला मिळाली. त्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५३ मध्ये त्यांच्या ‘परिणीता’ या चित्रपटासाठी आशाताईंना संधी दिली. राज कपूरने १९५४ मध्ये आलेल्या ‘बूट पॉलिश’ या त्याच्या चित्रपटातील गाणी आशाताईंकडून गाऊन घेतली. या चित्रपटातील गाणी गाजली. आशाताईंचं नाव होऊ लागलं. याच काळात संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी आशाताईंचे सूर जुळले. १९५२ ते १९५७ या काळात नय्यर यांनी आशाताईंकडून भरपूर गाणी गाऊन घेतली. त्यातही ‘नया दौर’ या बी. आर. चोपडांच्या चित्रपटातील गाण्यांमुळं आशाताई अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘माँग के साथ तुम्हारा‘ किंवा ‘साथी हाथ बढाना’, किंवा ‘उडे जब जब झुल्फें तेरी’ ही गाणी तर आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मुख्य नायिकेची सर्वच्या सर्व गाणी आशाताईंनी पहिल्यांदा या चित्रपटासाठी गायली. ओ. पी. नय्यर यांचा आशाताईंच्या कारकिर्दीत आणि यशात फार मोठा वाटा आहे. यापुढेही जवळपास दहा वर्षं नय्यर-आशा जोडीनं अनेक लोकप्रिय गीतं दिली. आशाताईंच्या आवाजाची ताकद ओपींना कळली होती. त्यांनी या आवाजाच्या अफाट रेंजचा पुरेपूर वापर करून घेतला. ‘आईए मेहेरबाँ’ हे मधुबालावर चित्रित झालेलं गाणं असेल किंवा ’ये हे रेशमी जुल्फों का अंधेरा’सारखं गाणं घ्या, किंवा ‘आँखों से जो उतरी है दिल में’ घ्या, ‘आओ हुजूर तुम को’मधली ती प्रसिद्ध उचकी घ्या; ‘वो हसीन दर्द दे दो’सारखं गाणं घ्या; आशाताईंच्या आवाजाचा पुरेपूर कस लागलेला दिसतो. आशाताईंनीही ही गाणी अशी गायली आहेत, की त्यांच्यासारखी अन्य कुणी गाऊ शकेल असं वाटतही नाही. दुर्दैवानं कालांतरानं आशाताई व नय्यर यांचे मतभेद झाले आणि त्यांनी एकत्र काम करणं बंद केलं. ‘चैन से हम को कभी’ या आशाताईंनी गायलेल्या अप्रतिम गीताला नय्यर यांचंच संगीत होतं. अनेक रसिकांना ते या जोडीचं ‘स्वान साँग’ किंवा भैरवी आहे, असं वाटतं. याच दशकात नय्यर यांच्याबरोबरीने एस. डी. बर्मन आणि रवी या संगीतकारांनीही आशाताईंना भरपूर संधी दिली. त्यांच्याकडून अनेक लोकप्रिय गाणी या काळात या दोन्ही संगीतकारांनी गाऊन घेतली.

पुढं १९६६ मध्ये आलेल्या ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटानं आशाताईंच्या जीवनात आणखी एक वळण आणलं. संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा त्यांच्या आयुष्यात आले. पंचमदांसोबत आशाताईंचे सूर सर्वार्थानं जुळले. अनेक उत्तमोत्तम आणि अवघड गाणी पंचम यांनी आशाताईंकडून गाऊन घेतली. ‘तिसरी मंजिल’मधल्याच ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे’ या गाण्यापासून ते ‘इजाजत’मधल्या ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’पर्यंत किती गाणी सांगावीत!
‘तिसरी मंजिल’मधलं ‘आ आ आजा’ हे गाणं ऐकलं तेव्हा आशाताईंना आपण हे गाऊच शकणार नाही, असं वाटलं होतं. त्यांनी पंचमदांना तसं सांगितलं. त्यावर पंचमदांनी आपण ही चाल बदलू या, असं त्यांना सांगितलं. मात्र, नंतर आशाताईंनी हे एक आव्हान म्हणून घेतलं. त्यांचा स्वभाव तसाच होता आणि आहे. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणजे काय, या विचारानं त्यांनी या गाण्याचा आठ दिवस सराव केला. एकदा तर त्या त्यांच्या गाडीत सराव करत असताना त्यांचा ड्रायव्हर म्हणाला, ‘ताई, काय होतंय तुम्हाला? श्वास लागतोय बहुतेक… गाडी ‘जसलोक’ला घेऊ का?’ आशाताईंचा ‘आ आ आ आ आ जा’ ऐकून ड्रायव्हर घाबरला होता. आशाताईंनीच एका मुलाखतीत त्यांच्या मिश्कील शैलीत हा किस्सा सांगितला आहे. पुढं पंचम आणि आशा यांनी त्यांच्या गाण्यांत अचाट प्रयोग केले. विशेषत: हेलन यांचं नृत्य आणि आशाताईंचा आवाज व पंचमचं दणकेबाज संगीत ही त्रयी चांगलीच लोकप्रिय झाली. मग ते ‘कारवाँ’मधलं ‘मोनिका ओ माय डार्लिंग, पिया तू अब तू आजा’ असो किंवा ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ असो. आशाताईंनी सगळी कॅब्रे गाणी जोरदार गायिली आणि ती तुफान लोकप्रिय ठरली. असं म्हणतात, की हेलन स्वत: आशाताईंच्या रेकॉर्डिंगला उपस्थित राहायच्या आणि त्या कसं गात आहेत, याचं निरीक्षण करायच्या. त्यानुसार त्या त्यांच्यी नृत्याची रचना करायच्या. त्यामुळंच ती सगळी गाणी चांगलीच हिट झाली. ‘कटी पतंग’ या चित्रपटातलं ‘मेरा नाम है शब्बो’ हे गाणं म्हणजे तर कमाल आहे. या गाण्यात आशाताई रूढ अर्थानं गायलेल्या नाहीत. त्या केवळ गुणगुणल्यासारख्या गद्य ओळीच म्हणतात. त्याला पंचमची ‘हा हा हा हा हा’ची जोड…. यातून त्या प्रासंगिक गाण्यानं कमाल परिणाम साधला आहे. पंचम-आशा जोडीचीही अशी अनेक गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. ‘चुरा लिया है दिल को जो तुमने’, ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’, ‘एक मैं और एक तू’, ‘दम मारो दम’ अशी किती गाणी सांगावीत!
आशाताईंच्या आयुष्यात एक सुवर्णपर्व आलं ते ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या निमित्तानं… या वेळी संगीतकार होते खय्याम. ‘उमराव जान’ची आशाताईंनी गायलेली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय ठरली आणि त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही याच चित्रपटानं मिळवून दिला. या गाण्यांसाठी खय्याम यांनी आशाताईंना अर्धा नोट खाली गायला सांगितलं होतं. आशाताईंना स्वत:लाही विश्वास नव्हता, की त्या हाफ नोट खाली गाऊ शकतील का, म्हणून. मात्र, अखेर त्यांनी खय्याम यांचं ऐकलं आणि पुढचा सगळा इतिहास आहे. मूळ उमराव जान हिचा आवाज त्या पट्टीतला होता हे खय्याम यांना माहिती होतं. त्यामुळंच त्यांनी आशाताईंच्या गायनात हा बदल केला. ‘दिल चीज क्या है’, ’ये क्या जगह है दोस्तों’, ‘इन आँखो की मस्ती’, ‘जुस्तजू जिस की की…’ या सर्वच गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटामुळं आशा भोसले यांचं स्थान ‘एक चांगली, मेहनती गायिका’ यापासून ‘एक सर्वश्रेष्ठ, अभिजात गायिका’ या स्थानावर जे गेलं ते कायमचं. स्वत: आशाताईंनाही जणू त्या नव्यानं सापडल्या. ‘उमराव जान’ आला तेव्हा आशाताईंचं वय ४८ होतं. त्यांच्या आवाजातील परिपक्वता सर्वोच्च पातळीवर पोचली होती. इथून पुढची दोन दशकं आशाताईंनी त्यांच्या आवाजाचे विपुल प्रयोग करून रसिकांना अक्षरश: वेड लावलं. ‘उमराव जान’नंतर पाचच वर्षांत आला तो गुलजार यांचा ‘इज़ाज़त’! या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ आणि ‘कतरा कतरा मिलती है’ या दोन गाण्यांनी आशा-पंचम यांची जादू आपल्याला परत एकदा अनुभवता आली. आदल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जीवा’ या तुलनेत दुर्लक्षित चित्रपटातही ‘रोज रोज आँखो तले’ हे अप्रतिम गाणं आशाताई-पंचम जोडीनं दिलं होतं. यात आशाताईंचे सहगायक होते किशोरकुमार यांचे पुत्र अमितकुमार.
नव्वदच्या दशकातही आशाताईंनी आपला प्रभाव कायम ठेवला. १९९५ मध्ये आलेल्या ‘रंगीला’त त्यांनी ए. आर. रेहमानच्या संगीत दिग्दर्शनात निम्म्याहून कमी वयाच्या ऊर्मिला मातोंडकरला आवाज दिला. ‘याई रे याई रे जोर लगा के नाचे रे’ या आशाताईंच्या गाण्यानं तरुणाईला थिरकायला लावलं. ‘कंबख्त इश्क है ये’, ’जरा सा झूम लू मैं’, ‘किताबें बहुत सी पढी होंगी तुमने’ अशा किती तरी लोकप्रिय गाण्यांनी तेव्हा रसिकांना वेड लावलं. एकविसावं शतक उजाडल्यावरही चिरतरुण आशाताई वयानं किती तरी लहान नायिकांना पडद्यावर खणखणीत आवाज देत होत्या. ‘लगान’मध्ये ‘राधा कैसे ना जले’ गाण्यात आशाताईंनी बहार उडवून दिली होती. अगदी अलीकडं आलेल्या ‘बेगम जान’ चित्रपटातही त्यांनी ‘प्रेम में तोहरे’ हे गाणं गाऊन रसिकांना सुखद धक्का दिला होता. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनव्या गोष्टी शिकण्याची हौस, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदासतेज व्यक्तिमत्त्वाची सहज जाणवणारी वैशिष्ट्यं.
ओ. पी. नय्यर, खय्याम आणि आर. डी. बर्मन या संगीतकारांचं आशाताईंच्या कलाजीवनात अनन्यसाधारण स्थान असलं, तरी इतर संगीतकारांसोबतही त्यांनी भरपूर काम केलं आणि अनेक अजरामर गाणी दिली. मदनमोहन आणि लता यांची जोडी प्रसिद्ध असली, तरी ‘मेरा साया’मधलं ‘झुमका गिरा रे बरेली की बजार में’ हे अतिशय लोकप्रिय गाणं मदनमोहन यांनी आशाताईंकडून गाऊन घेतलं. ‘शोख नजर की बिजलियाँ’, ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’, ‘जमीं से हमें आसमाँ पर…’, ‘आप को प्यार छुपाने की बुरी आदत है’ ही या जोडीची आणखी काही प्रसिद्ध गाणी. हेमंतकुमार यांनी ‘भँवरा बडा नादान हाय’सारखं अप्रतिम गाणं आशाताईंकडून गाऊन घेतलं.
शंकर-जयकिशन यांनीही आशाताईंकडून उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली. ‘परदे में रहने दो परदा ना हटाओ’ हे ‘शिकार’मधलं गाणं आजही लोकप्रिय आहे. याच गाण्यानं आशाताईंना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. ‘अंदाज’मधलं ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे किशोरसोबतचं, तर ‘रात के हमसफर’ हे ‘ॲन इव्हिनिंग इन पॅरिस’मधलं रफीसोबतचं गाणं हीही शंकर-जयकिशन जोडीचीच गाणी. ‘आवाज दे के हमें तुम बुलाओ’, ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’ ही अशीच आणखी काही लोकप्रिय गीतं या जोडीनं दिली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीकडंही आशाताईंनी विपुल गाणी म्हटली, ‘लोफर’मधलं ‘कोई शहरी बाबू’, ‘अनहोनी’मधलं ‘हंगामा हो गया’, ‘हमजोली’मधलं ‘ढल गया दिन’ अशी किती तरी गाणी सांगता येतील. कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे आशाताईंनी ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’, ‘विधाता’मधलं ‘उडीबाबा’ अशी उडत्या चालीची अनेक गाणी गायली. संगीतकार रवी यांच्याकडेही आशाताईंनी अनेक गाणी गायली. ‘दो बदन’मधलं ‘जब चली ठंडी हवा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘आगे भी जाने ना तू’, ‘तोरा मन दर्पण कहलाए’, ‘मुझे गले से लगा लो’ अशी किती तरी गाणी या जोडीच्या नावावर जमा आहेत. बप्पी लाहिरी आणि आशाताई या जोडीने तर ‘डिस्को युगा’त आपल्या झिंगाट गाण्यांनी एकच धमाल उडवून दिली होती. ‘हिंमतवाला’मधलं ‘ताकी ओ ताकी’, ‘नमक हलाल’मधलं ‘आज रपट जाए’, ‘जवाने जानेमन’, ‘रात बाकी’ अशी किती तरी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. अजित वर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘विजेता’ या चित्रपटासाठी आशाताईंनी सत्यशील देशपांडे यांच्यासह गायलेलं ‘मन आनंद आनंद छायो’ हे अप्रतिम गाणं आजही रसिकांच्या लक्षात आहे.
आशाताईंनी बहुतेक सर्व मोठ्या पुरुष सहगायकांबरोबर गाणी गायली. मात्र, त्यांची विशेष जोडी जमली ती किशोरकुमारसोबत. किशोरच्या अवलिया व्यक्तिमत्त्वाला तोडीस तोड अशा आशाताई होत्या. त्यामुळे त्यांची गाणीही तशीच खुलून यायची. ‘सीएटी कॅट, कॅट माने बिल्ली’ किंवा ‘हाल कैसा है जनाब का…’, ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘भली भली सी इक सुरत’, ‘एक मैं और एक तू’ अशी किती तरी अवखळ, नटखट गाणी त्यांनी अगदी धमाल पद्धतीनं गायली. किशोरच्या यॉडलिंगला किंवा रेकॉर्डिंगच्या वेळी चालणाऱ्या दंग्याला आशाताई पुरून उरायच्या. त्यामुळं दोघांची केमिस्ट्रीही चांगली जुळली होती.
किशोरप्रमाणेच महंमद रफी यांच्यासह आशाताईंनी अनेक अजरामर गाणी दिली. ‘दिवाना हुआ बादल’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘इशारों इशारों में’, ‘अच्छा जी मैं हारी चलो’, ‘ढल गया दिन’, ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’, ‘आजा पंछी अकेला है’, ‘ये परदा हटा दो’, ‘गुनगुना रहे है भंवरे’, ‘हम तेरा इंतजार करेंगे कयामत तक’…. किती गाणी सांगावीत! मुकेश यांच्याबरोबरही अगदी सुरुवातीच्या काळात ‘पतली कमर है तिरछी नजर है’, ‘छोड गये बालम’, ‘जाने न नजर पहचाने जिगर’ अशी चांगली गाणी आशाताईंनी दिली.
मन्ना डे यांच्यासह आशाताईंनी अनेक गाणी गायली. सध्या पुन्हा गाजत असलेलं ‘ना तो कारवाँ की तलाश है’ हे मन्नादा आणि आशाताईंचंच ओरिजनल गाणं. ‘श्री ४२०’मधलं ‘मुड मुड के ना देख’ हेही आशा-मन्नादा जोडीचं सुपरहिट गाणं. याशिवाय ‘तू छुपी है कहाँ’, ‘दुख भरे दिन बीते रे भय्या’, ‘ये हवा, ये नदी, ये किनारा’, ‘धीरे धीरे चलना’ अशी अनेक लोकप्रिय गाणी या जोडीनं दिली. महेंद्र कपूर यांच्यासह आशाताईंनी ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘अरे जा रे नटखट’, ‘आजा आजा रे तुझको मेरा प्यार पुकारे’, ‘धडकने लगी दिल की तारों की दुनिया’, ‘चलो बुलावा आया है’ अशी किती तरी चांगली गाणी दिली आहेत. ही सर्व गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
पुरुष सहगायकांप्रमाणेच काही गायिकांबरोबरही आशाताईंनी सहगायन केलंय. त्यात अर्थातच लतादीदींबरोबर गायलेलं ‘उत्सव’मधलं ‘मन क्यूं बहका रे बहका’, शमशाद बेगम यांच्याबरोबरचं ‘लेके पहला पहला प्यार’, उषा मंगेशकरांसह गायलेलं ‘काहे तरसाये’ ही चटकन आठवणारी काही गाणी. 

आशाताईंनी हिंदीबरोबरच मराठीतही विपुल गाणी गायिली. मराठी चित्रपटसंगीतातलं एक लखलखतं दालन आशाताईंच्या नावानं आहे. त्यांची विशेष जोडी जमली ती संगीतकार सुधीर फडके यांच्यासह. ‘जगाच्या पाठीवर’ या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या १९६० मधल्या मराठी चित्रपटात बाबूजी, गदिमा आणि आशा या त्रयीनं कमाल केली. यातली सगळीच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘नाचनाचुनी अति मी दमले’, ‘तुला पाहते रे तुला पाहते’ ही आशाताईंची गाणी आजही तितकीच आवडीनं ऐकली जातात. ‘सुवासिनी’ या चित्रपटासाठी बाबूजींनी आशाताईंकडून गाऊन घेतलेलं ‘दिवसांमागुनी दिवस चालले, ऋतूमागुनी ऋतू’ हे गाणं म्हणजे तर एक चमत्कारच आहे. या दीर्घ गाण्यात प्रत्येक अंतऱ्यात बाबूजींनी वेगवेगळ्या रागात चाल बांधली आहे. हे गाणं म्हणणं आव्हानात्मक होतं. मात्र, आशाताईंनी ते सहज पेललं. बाबूजींकडून गाण्यातले शब्द, त्यांचे नेमके उच्चार, शिस्त या सगळ्या गोष्टी आशाताईंनी आत्मसात केल्या. या जोडीनं अनेक अवीट गोडीची युगुलगीतं दिली. ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ हे तर त्यातलं मेरुमणी म्हणावं असं जगदीश खेबूडकरांचं गाणं. ‘चंद्र आहे साक्षीला’ हेही असंच अप्रतिम गाणं. ‘मुंबईचा जावई’मधलं ‘का रे दुरावा का रे अबोला’ हेही बाबूजी-आशा जोडीचं असंच एक प्रचंड लोकप्रिय गाणं. जरा नंतरच्या काळात, म्हणजे १९८५ मध्ये आलेल्या ‘शापित’मधलं ‘दिस जातील दिस येतील’ हे सुरेश वाडकरांसह गायलेलं गाणंही खूप गाजलं. नंतर १९८७ मध्ये आलेल्या ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटातलं ‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी’ गाणं म्हणजे बाबूजी-आशाताई यांच्या गाण्यांतलं आणखी एक मानाचं पान. या गाण्याचं ऑर्केस्ट्रेशनही जबरदस्त आहे. बाबूजींच्या गाण्यांत सहसा पाहायला न मिळणारा मोठा वाद्यवृंद, व्हायोलिन्सचा ताफा यात दिसतो. आशाताईंनीही या गाण्याचं सोनं केलंय.
बाबूजींप्रमाणेच भाऊ पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह आशाताईंनी मराठीत अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. यात चित्रपटगीतांबरोबरच भावगीतांचा समावेश होता. ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी आशाताईंकडून गाऊन घेतलेले गाणे आशाताईंच्या गायनकौशल्याची कसोटी पाहणारे होते. यात फारशी वाद्ये नाहीत. चालही अवघड. पं. हृदयनाथांच्या चाली ऐकायला सोप्या, पण गायला अतिशय अवघड, असं आशाताई आणि लतादीदी नेहमी म्हणत. ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपुन बसले गं’ ही सुरेश भटांची, ‘गेले द्यायचे राहुनी’, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ही आरती प्रभूंची, ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे राजा बढेंचं आणि ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ ही संत ज्ञानेश्वर माउलींची अशा वैविध्यपूर्ण रचना पंडितजींनी आपल्या मोठ्या बहिणीकडून गाऊन घेतल्या. चित्रपट संगीतात ‘जैत रे जैत’मधली गाणी कोण विसरू शकेल? ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ हे तर अगदी भरपूर लोकप्रिय झालेलं गाणं आशाताईंनी अत्यंत ठसक्यात म्हटलंय. याशिवाय ‘नभ उतरू आलं… चिंब थर्थर वल्लं’ हे गाणंही आशाताईंच्या अफाट गायकीचा प्रत्यय देणारं आहे. याच चित्रपटात ‘कोण्या राजानं राजानं’ हे गाणं आशाताईंनी त्यांची कन्या वर्षा हिच्यासह म्हटलं आहे. या दोघींना एकत्र ऐकण्याचा दुर्मीळ अनुभव हे गाणं आपल्याला देतं.
आशाताईंनी १९७० मध्ये आलेल्या ‘घरकुल’ या चित्रपटात सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ हे सुरेश भटांचं अफाट रोमँटिक गाणं गायलं आहे. हे गाणं आजही तितकंच टवटवीत आणि कमाल वाटतं. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताईंनी अनेक लावण्या गायल्या. अर्थात आशाताई आणि लावण्या या प्रवासाची सुरुवात १९५९ मध्ये आलेल्या ‘सांगत्ये ऐका’मधल्या वसंत पवार यांच्या संगीतातल्या ‘हाय, बुगडी माझी सांडली गं’पासून झाली होती. आशाताईंच्या त्या ‘हाय’वर अनेक जीव आजही फिदा आहेत. आनंदघन अर्थात लतादीदींनीही आशाताईंकडून ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ ही लावणी गाऊन घेतली होती. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनात आशाताईंनी ‘सुगंधी कट्टा’ या चित्रपटात गायलेली अनेक गाणी गाजली. ‘नाचू किती नाचू किती कंबर लचकली’, ‘तीळगूळ घ्या हो गोड गोड बोला’ ही गाणी आजही रसिकांना प्रिय आहेत. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताई आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं ‘गंध फुलांचा गेला सांगून’ हे ‘भालू’मधलं सुंदर गाणं कोण विसरू शकेल?
आशाताईंच्या मराठीतल्या गाण्यांची रेंज खरोखरच थक्क करणारी आहे. पुलंनी संगीत दिलेल्या ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ या गाण्यापासून ते ‘गोरी गोरी पान फुलांसारखी छान’ किंवा ‘तुझ्या गळ्या माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ ही गाणी ते ‘बाई मी पतंग उडवीत होते’ किंवा ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’पर्यंत अनेक वैविध्यपूर्ण गाणी आशाताईंनी गायिली आहेत. पिढ्यांमागून पिढ्यांचे कान तृप्त केले आहेत. बाबूजींचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्यासह केलेला ‘ऋतू हिरवा’ हा नव्वदच्या दशकात आलेला भावगीतांचा अल्बमही रसिकांनी डोक्यावर घेतला. यातलं ‘सांज ये गोकुळी’ हे गाणं पुढं ‘वजीर’ चित्रपटात घेण्यात आलं. याच अल्बममधलं ‘भोगले जे दु:ख त्याला’ ही भटांची गज़ल म्हणजे तर आशाताईंचं स्वगत म्हणावं असंच आहे. अगदी हीच भावना ‘हम दोनो’मधलं ’जहाँ में ऐसा कौन है जिस को गम मिला नहीं‘ हे आशाताईंचं गाणं ऐकताना मनात येते.
मराठीप्रमाणेच हिंदीतही आशाताईंच्या गैरफिल्मी गाण्यांचं प्रमाण आणि त्याची लोकप्रियता थक्क करणारी आहे. गुलाम अलींसोबत त्यांनी केलेला ‘मिराज-ए-गज़ल’ हा अल्बम खूप गाजला. यातलं ‘सलोना सा सजन है और मैं हूँ’ हे गाणं आजही अतिशय लोकप्रिय आहे. आशाताईंना खूप लहानपणापासून चांगल्या नकला करता यायच्या. त्यांना अगदी लहान वयात काही पाश्चात्त्य गायक आणि गायिकांची गाणी ऐकायला मिळाली. आशाताईंनी तो ढंग आपल्या गायकीत आणला. पुढं आर. डी. बर्मन यांनी तर त्यांच्या या गुणाचा खूपच उपयोग करून घेतला आणि अतिशय वेगळ्या चालीची, ढंगाची गाणी दिली. ‘अलिबाबा और चालिस चोर’मधलं ‘खतूबा खतूबा’ हे आशाताईंनी अरबी ढंगात गायलेलं गाणं याचं एक उदाहरण म्हणून सांगता येईल.
आशाताई आज ९२ वर्षांच्या आहेत. आयुष्य भरभरून जगल्या आहेत. अगदी अलीकडं ‘माई’ या चित्रपटात त्यांनी अल्झायमर असलेल्या वयस्कर स्त्रीची भूमिका केली होती. पाश्चात्त्य गायकांसोबत गाण्यांचे वेगवेगळे प्रयोग त्या करत असतात. क्रिकेटपटू ब्रेट लीबरोबर २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आदी त्यांनी ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणंही गायलं होतं.
खरं तर त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्व गाण्यांचा वा त्यांच्या आयुष्यातल्या सर्व घटनांचा आढावा या कार्यक्रमात घेणं अशक्यच आहे. आशाताईंना अनेक पुरस्कार मिळाले. दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ही त्यांना मिळालेला आहे आणि अर्थातच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अजोड योगदानाबद्दल त्यांना २००१ मध्ये सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या, ‘मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे. मीही भाजी आणायला जाते, मुलांचा डबा करते. स्वयंपाक करायला मला फार आवडतं. सणवार करायला आवडतात. खरेदी करायला आवडते, साड्या विकत घ्यायला आवडतात. फक्त हा जो गळा आहे तिथं देवानं जे काही ठेवलं आहे, तेवढाच आपल्यात फरक आहे. बाकी मला तुमच्यातलीच समजा…’
आशा भोसले हे काय रसायन आहे हे यावरून कळतं. व्यक्ती म्हणून तर त्या श्रेष्ठ आहेतच; पण त्यांच्या अद्भुत, अलौकिक सूरांचं गारूड या सर्वांपलीकडं आहे. आशाताई, तुमच्या संपूर्ण जीवनाकडं पाहूनच बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुमच्या अलौकिक आवाजाला, जिद्दीला, मेहनतीला, विनोदबुद्धीला आणि झुंजार वृत्तीला आमचा मानाचा मुजरा!

----

हा कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

----

रूपेरी पडद्याचे मानकरी - लता मंगेशकर हा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----