29 May 2026

रोहन मैफल लेख - मोहनलाल भास्कर पुस्तक

स्पाय स्टोरीज - मी पाकिस्तानातील भारताचा हेर
---------------------------------------------------

थरारक अन् भयावह...
-------------------------

सध्या ‘धुरंधर’ हा नवा हिंदी सिनेमा गाजतो आहे. दोन भागांत प्रदर्शित झालेल्या या सिनेमात पाकिस्तानात जाऊन देशासाठी कामगिरी बजावणाऱ्या गुप्तहेराची कथा सांगण्यात आली आहे. हेरकथा फार पूर्वीपासून वाचकप्रिय आहेत. जगभरातल्या गुप्तहेरांचे नानाविध किस्से, अनुभव. त्यांचे चित्तथरारक जीवन यांचे आकर्षण सर्वसामान्य वाचकांना असते. एरवी जी गोष्ट आपण कल्पनेतही करू शकणार नाही, अशा गोष्टी ही हेरमंडळी लीलया करत असतात. तीही शत्रुदेशांच्या गोटात जाऊन! अतिशय हुशार मेंदू, ताकदवान शरीर, लवचीक अन् पाण्यासारखा स्वभाव, प्रचंड धैर्य, कष्ट वा जाच सोसण्याची शारीरिक व मानसिक तयारी अशा अनेक गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तीलाच हेर म्हणून नेमलं जातं. त्यामुळं या हेरांच्या जीवनाचं, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चित्तचक्षुचमत्कारिक घटनांचं स्वाभाविक आकर्षण सर्वांनाच असतं. वाचकांची हीच भूक भागविण्यासाठी रोहन प्रकाशनानं ‘स्पाय स्टोरीज’ या मालिकेअंतर्गत जगभरातील नामवंत हेरकथा मराठीत अनुवादित करून वाचकांसमोर आणल्या आहेत. मोहनलाल भास्कर यांचं ‘मी पाकिस्तानातील भारताचा हेर’ हे पुस्तक याच मालिकेतील. मोहनलाल भास्कर यांच्या विलक्षण अनुभवांमुळे हे पुस्तक रंजक, वाचनीय आणि तितकेच थरारक झाले आहे. ऋजुता कर्णिक-गुप्ते यांनी मूळ पुस्तकाचा मराठीत प्रवाही अनुवाद केला आहे.
मोहनलाल भास्कर यांचा जन्म पंजाबमध्ये १९४२ मध्ये झाला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर ते पाकिस्तानात गेले. तेथे त्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली. लाहोरच्या प्रसिद्ध कोट लखपत कारागृहापासून ते मुलतान, मियांवाली अशा वेगवेगळ्या शहरांतील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलं. या काळात त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले, क्रूर असा छळ झाला. शत्रुदेशात हे अपेक्षितच. मात्र, त्यांना काही सहृदय पाकिस्तानी कैदी, अधिकारी, वॉर्डनही भेटले. या सर्व अनुभवांचे संचित त्यांनी या पुस्तकाद्वारे मांडले आहे. हे एकाच वेळी भयावह, थरारक, कारुण्यजनक अन् क्वचित कधी तरी ओठांवर हलकेसे हसू आणणारे असे झाले आहे. सिमला करारानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान झालेल्या करारानुसार, दोन्ही देशांतील कैद्यांची देवाणघेवाण करण्यात आली. त्यात मोहनलाल यांची सुटका झाली आणि त्यांना सुदैवानं पुन्हा आपल्या मातृभूमीचं दर्शन घेता आलं. त्या अर्थानं ते सुदैवी ठरले, कारण हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानात बहुतांश वेळा मृत्युदंडाचीच शिक्षा झालेली आहे. ती शिक्षा ठोठावली की प्रत्यक्ष शिक्षेची अंमलबजावणी जरी झाली नाही, तरी तेथील तुरुंगात खितपत पडणे हेच नशिबी येते. ते जगणे एवढे खडतर असते, की त्याऐवजी लवकर फाशी झालेली बरी, असेच कैद्यांना वाटू लागते. काही कैद्यांना अटक येथील किल्ल्यात नेऊन ठेवतात. तिथून तर सुटका अशक्यच मानली जाते. मोहनलाल यांनी सुटकेनंतर भारतात कुटुंबीयांसमवेत चांगले जीवन व्यतीत केले. शिक्षकाची नोकरी केली. सन २००४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अर्थात हे पुस्तक वाचताना मोहनलाल यांचे हे अनुभव १९६५ ते १९७४ या काळातील, म्हणजे पन्नास वर्षांहून अधिक जुने आहेत, हे लक्षात घ्यावे लागते. दोन्ही देशांची तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थितीही लक्षात घ्यावी लागते. तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून केवळ १८ वर्षे झाली होती. दोन्ही देशांतील अनेक लोकांना स्वातंत्र्यपूर्व काळातील एकच असलेला देश चांगलाच स्मरणात होता किंवा तो काळ पाहिलेले अनेक लोक हयात होते. त्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांत एकमेकांबाबत जशी कट्टर विरोधाची भावना होती, तशीच ‘आपण एकच आहोत, फाळणीमुळं वेगळे झालेले भाऊ आहोत,’ अशीही भावना अनेक नागरिकांत, विशेषत: दोन भाग झालेल्या पंजाब प्रांतातील नागरिकांत तीव्रतेनं होती. मोहनलाल यांना जे काही चांगले अनुभव आले ते अशा लोकांकडून. बाकी पाकिस्तानातील तत्कालीन लष्करशाही, याह्या खान यांंची क्रूर राजवट, झुल्फिकार अली भुट्टो यांचा उदय, बांगलादेशचे युद्ध आदी सर्व गोष्टी मोहनलाल यांच्या पाकिस्तानी तुरुंगांतील वास्तव्यात घडल्या. या सर्व घटनांकडे ते अतिशय जागरूकपणे पाहत होते आणि त्या घटनांचा आपल्या परीने अन्वयार्थही लावत होते.
भास्कर ज्या कामासाठी पाकिस्तानात गेले होते, त्याविषयी त्यांनी या पुस्तकात काहीही लिहिलेले नाही आणि ते अपेक्षितच आहे. मात्र, पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाविषयीची माहिती काढायला ते आले होते, असा पाकिस्तानी यंत्रणांचा त्यांना अटक केल्यापासून संशय होता. मोहनलाल यांना अटक झाली तीही अमरिकसिंह नावाच्या भारतीय माणसाच्या डबल एजंटगिरीमुळंच. या अमरिकसिंहचे पाकिस्तानी तुरुंगात पुढं काय हाल झाले हेही मोहनलाल यांनी लिहिलं आहे.
तेथील तुरुंगांत मोहनलाल यांना आलेले अनुभव हाच या पुस्तकाचा गाभा आहे. या अनुभवांविषयी मोहनलाल यांनी सविस्तर आणि तब्येतीत लिहिलं आहे. हे अनुभव वाचताना अनेकदा त्रास होतो. एवढा छळ होत असताना, मोहनलाल यांनी तो कसा काय सहन केला असेल, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. अशा देशभक्ताला आपण मनोमन सलाम करतो.  हे सर्व अनुभव मुळातूनच वाचले पाहिजेत. त्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.
ऋजुता कर्णिक-गुप्ते यांनी या पुस्तकाचा उत्तम व सुलभ अनुवाद केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना एक प्रवाहीपणा जाणवतो.
‘धुरंधर’ चित्रपटानंतर आपल्याकडं पाकिस्तानात जाऊन देशसेवा करणाऱ्या गुप्तहेरांविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वत:ही पाकिस्तानात काही वर्षे हेर म्हणून काम करत होते. पुण्याचे माजी पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर हेही पाकिस्तानात काही वर्षे होते. या सर्वांविषयीचा आपला आदर वाढवणारं असं हे पुस्तक चुकवू नये असंच आहे. 

---

(लेखक : मोहनलाल भास्कर, अनुवाद : ऋजुता कर्णिक-गुप्ते, रोहन प्रकाशन)

---

18 May 2026

रोहन मैफल लेख - दवणे यांची दोन पुस्तके

आठवणींचा सुरेल अल्बम
------------------------------

ज्येष्ठ कवी, लेखक प्रवीण दवणे यांची ‘शब्द जिवलग’ आणि ‘गाण्यामागच्या गोष्टी’ ही दोन पुस्तके रोहन प्रकाशनातर्फे नुकतीच प्रसिद्ध झाली आहेत. या पुस्तकांविषयी...

-----

शब्द जिवलग - प्रतिभावंत साहित्यिकांच्या सहवासात...
-------------------------------------------------------------

थोरांचा सहवास ही तशी दुर्मीळ आणि अप्राप्य गोष्ट आहे. त्यामुळेच ती ज्यांना भरपूर लाभते त्यांना नशीबवान मानलं जातं. प्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे हे अशाच नशीबवान व्यक्तींपैकी एक म्हणायला हवेत. त्यांना आयुष्यात अनेक थोरमोठ्या साहित्यिकांचा सहवास लाभला. आज जे लेखक वा कवी केवळ आठवणींत उरले आहेत, त्यांच्या सान्निध्यात दवणेंना वावरायला मिळालं. त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्याशी पत्रव्यवहार करता आला आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकताही आलं. अशा एकूण २४ दिग्गज साहित्यिकांबद्दल २० लेख दवणे यांनी लिहिले आहेत. त्यात कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर, पु. भा. भावे, दत्तो वामन पोतदार व लक्ष्मणशास्त्री जोशी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दुर्गा भागवत, बा. भ. बोरकर, गंगाधर गाडगीळ, द. मा. मिरासदार, माधव मनोहर, प्राचार्य राम शेवाळकर, शं. ना. नवरे, सुरेश भट, यशवंत देव, शान्ता शेळके, मंगेश पाडगावकर, कविवर्य शंकर वैद्य, व. पु. काळे आणि अमृता प्रीतम, नारायण सुर्वे, रवींद्र पिंगे व अटलबिहारी वाजपेयी या थोरांचा समावेश आहे. ही सर्व व्यक्तिचित्रे दवणे यांनी अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावाने रेखाटली आहेत. त्यामुळे त्यांची शीर्षकेही तशीच आहेत. पु. ल. देशपांडे यांच्यावरील लेखाला त्यांनी ‘माझं ‘पुलदैवत’’ असं म्हटलं आहे, तर शंकर वैद्य यांच्यावरील लेखाचं शीर्षक ‘मायेची शाल’ असं आहे. प्राचार्य राम शेवाळकर यांना लेखकाने ‘सरस्वती विद्यापीठाचे कुलगुरू’ म्हटलं आहे, तर दुर्गा भागवत यांच्यावरील लेखाला ‘साहित्ययोगिनी’ असं शीर्षक दिलं आहे.
हे लेख लिहिण्यामागची आपली प्रांजळ भूमिकाही दवणे यांनी मनोगतात मांडली आहे. ते लिहितात, ‘या साहित्यिकांची वाङ्मयीन थोरवी वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ती आहेच; पुन्हा पुन्हा त्यावर लिहिलं गेलं आहे. मात्र, ‘शब्द जिवलग’मध्ये त्यांच्या-माझ्या वैयक्तिक संवादाचा, सहवासातील वेगळ्या घटनांचा, त्यांच्या थोर असण्याच्या कारणांचा प्रवास आहे. ह्या दिग्गजांच्या भेटीतले हे क्षण केवळ व्यासपीठावरील कुणाच्या साक्षीने घडले नाहीत; तर कधी पत्रलेखन, कधी घरगुती भेटी, कधी साहित्यिक कार्यक्रमांचे निमित्त यातून अनेक दीपक्षण अवचित हाती आले. साहित्य रसिकांना तर ते वाचताना अनोखा आनंद मिळेलच; पण नव्या पिढीतील लेखकांना, अध्यापकांनाही त्यातून आता प्रत्यक्ष न भेटता येणाऱ्या ह्या वाङ्मयीन दीपस्तंभांची भेट होणार आहे.’
यातून दवणे यांची या थोर साहित्यिकांकडे पाहण्याची भक्तिभावाची दृष्टी अधोरेखित होते. हे लेख वाचताना या थोर मंडळींच्या आयुष्यातले लेखकाने अनुभवलेले मोजके क्षण व किस्सेवजा आठवणी पाहून आपणही त्या काळात जातो. पु. भा. भावे यांच्या सान्निध्यातल्या दवणे यांच्या आठवणी रंजक व रोचक आहेत. दत्तो वामन पोतदार यांना केवळच एकदाच भेटूनही त्यांचा कसा प्रभाव लहानग्या वयात पडला, हेही दवणे यांनी प्रभावीपणे मांडले आहे. विंदांसारख्या ज्येष्ठ कवीने दवणे यांच्या निवेदनातील चूक जाहीररीत्या कशी सांगितली होती, हेही लेखकाने आडपडदा न ठेवता मोकळेपणाने लिहिले आहे. एका दिवाळी अंकासाठी साहित्य देण्यास नकार देण्यासाठी दुर्गा भागवतांनी पोस्टकार्डवर केवळ ‘ना दु’ एवढंच लिहिल्याची गमतीशीर आठवणही त्यांच्यावरील लेखात आहे. ‘चांदण्याची मधुशाला’ हा बा. भ. बोरकरांवरचा रसाळ लेख तर मुळातूनच वाचण्यासारखा. माधव मनोहर यांचे लेखनिक म्हणून काम करताना दवणे यांना आलेले अनुभवही असेच वाचनीय आणि गमतीशीर आहेत.
सुमारे १७२ पानांच्या या पुस्तकात इतरही सर्व ज्येष्ठ साहित्यिकांच्या आठवणी दवणे यांनी आत्मीयतेनं सांगितल्या आहेत. त्या वाचताना महाराष्ट्राचा साहित्यसमृद्ध असा काळ डोळ्यांसमोरून झरझर जातो. त्यामुळे हे पुस्तक निश्चितच वाचनीय व रंजक झाले आहे.


-----


गाण्यामागच्या गोष्टी - माझ्या गाजलेल्या गाण्यांच्या सुरेल कहाण्या...
--------------------------------------------------------------------

प्रवीण दवणे यांनी या पुस्तकात शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या गाजलेल्या गाण्यांविषयीचे किस्से लिहिले आहेत. हे पुस्तक त्यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना अर्पण केले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची आहे. दवणे यांनी मनोगतात या पुस्तकाच्या लेखनामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘गाणी प्रसारित होतात; मात्र साडेतीन-चार मिनिटांच्या गाण्यामागे दडलेल्या गोष्टी केवळ आठवणींच्या अल्बममध्येच उरतात, पुढे त्या विरतात. गीतरचना करताना सोबत कवीच्या तरलता आणि ललित लेखकाच्या संवेदनांचा टिपकागद मनात होता. म्हणूनच गाण्यामागच्या त्या अदृश्य गोष्टींना दृश्य रूप आलं. अर्थात, शब्दरूप! रसिकाला अशा कधी रंजक, तर कधी त्यातील अनवट वाटा जाणताना अंतर्मुख करणारा प्रयासही जाणवेल अशा ह्या खुद्द गीतकारानेच सांगितलेल्या घटना आहेत.’
एकूण सुमारे १५ प्रकरणांत लेखकाने या पुस्तकाची रचना केली आहे. दवणे १९८५ पासून चित्रपटांसाठी गीतलेखन करत आहेत. ‘ठकास महाठक’ हा त्यांचा पहिला चित्रपट. अगदी लहानपणापासून त्यांना कविता आणि गीतलेखनाचं वेड कसं लागलं आणि मराठी व हिंदी चित्रपट पाहून, त्यातील लोकप्रिय गीते ऐकून आपणही असं गीतकार व्हावं, हे स्वप्न कसं रुजलं आणि फुललं हे लेखक अगदी रंजकतेनं सांगतात. अगदी उमेदवारीच्या काळात शान्ता शेळके, शंकर वैद्य, श्रीनिवास खळे किंवा यशवंत देव यांच्यासारख्या दिग्गजांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलं. चित्रपटातील गाणी लिहिणं हे एक वेगळंच कौशल्य आहे. चित्रपटातील प्रसंगानुसार, कथेच्या मागणीनुसार गीत लिहावं लागतं. अशा वेळी गीत म्हणून असलेला दर्जा टिकवणं आणि त्या प्रसंगालाही न्याय देणं ही दुहेरी कसरत गीतकाराला करावी लागते. त्यातून अनेकदा मजेशीर किस्से घडतात. अशा अनेक गमतीशीर गोष्टी, किस्से दवणे यांनी या पुस्तकात लिहिल्या आहेत. पहिल्या चित्रपट गीताची संधी कशी मिळाली, विश्वनाथ मोरेंसारख्या मनस्वी संगीतकाराने कशी परीक्षा पाहिली, लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्याच्या वेळीच निरोप न मिळाल्यानं फोटोची संधी कशी चुकली, उषा मंगेशकरांनी पहिल्यांदा गाणं का नाकारलं या आणि अशा अनेक किस्सेवजा हकीकतींनी दवणे यांनी या पुस्तकात रंगत आणली आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या यशाच्या प्रसंगांबरोबरच अपयशाच्या, संघर्षाच्या, फसवणुकीच्या, अन्यायाच्या, गैरवागणुकीच्याही गोष्टी त्यांनी निर्मळपणे वाचकांसमोर ठेवल्या आहेत. चित्रपटसृष्टीसारख्या मोहमयी दुनियेत, डोंबिवलीसारख्या गावात, निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात राहून कविता व गीतलेखनाचे वेड अंगात भिनवणारा तरुण केवढी मोठी मजल मारू शकतो, हे दवणे यांच्या या प्रांजळ कथनातून आपल्यासमोर येते. याशिवाय गेल्या ४० वर्षांत मराठी सिनेमांत आपण ऐकलेल्या अनेक लोकप्रिय, गाजलेल्या गीतांचे गीतकार प्रवीण दवणे आहेत, याचा सुखद साक्षात्कारही होतो. त्यासाठी तरी हे रंजक पुस्तक वाचायलाच हवे.

---