बाळ(साहित्य)लीला...
--------------------------
लहानपणी या सगळ्या आठवणींसोबतच असायचा तो गोष्टींच्या पुस्तकांचा वास. माडीवरच्या खोलीत एका कोपऱ्यात बसून, वाटीत कुठला ना कुठला खाऊ घेऊन खात खात; अधूनमधून सांडगे, पापड, कुरडया इ. उन्हाळी वाळवणं तोंडात टाकत केलेली पुस्तकांची पारायणं आठवतात. या पुस्तकांतून एक वेगळीच प्रतिसृष्टी भेटायला यायची. अगदी लहानपणी परिराज्याची सफर घडली. 'पोपटात जीव असणारा राक्षस' नंतर बऱ्याच वेगवेगळ्या रूपात भेटला. (ते एक असो.) 'सिंड्रेला'पासून ते 'सिंदबाद'पर्यंत सगळ्यांच्या अद्भुत जगात फेरफटका मारता आला. आमच्या लहानपणी टीव्ही होता, पण कार्टूनच्या वाहिन्यांची रेलचेल नव्हती. त्यामुळं 'दूरदर्शन'वर लागणारा मिकी माउस आणि ही-मॅन, स्पायडरमॅन सोडल्यास टीव्हीवरच्या कार्टूनची फार नवलाई नव्हती. त्याउलट पुस्तकांतून भेटणाऱ्या कित्येक अद्भुत व्यक्तिरेखांनी कायमचं मनावर गारूड केलं. मनातल्या पडद्यावर वेगळंच कार्टून नेटवर्क सुरू व्हायचं. मग सुरस अन् चमत्कारिक अरेबियन नाइट्सच्या कथा असोत, किंवा 'चांदोबा'मधले विक्रम-वेताळ असोत... हे सगळे आमच्या चिमुकल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनले होते. नंतर भा. रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' भेटला... त्याच्याशी अगदी 'ट्टॉक' जमून गेलं. सुधाकर प्रभूंचा 'डिटेक्टिव्ह डीटी' आणि त्याची गँग पण फार आवडायची... ना. धों. ताम्हनकरांचा 'गोट्या', सानेगुरुजींची 'श्यामची आई' ही पुस्तकं वाचली नाहीत असा आमच्या पिढीतला एकही विद्यार्थी नसेल... याशिवाय थोरा-मोठ्यांची चरित्रं (विशेषतः राजा मंगळवेढेकरांनी लिहिलेली), शान्ताबाई शेळक्यांच्या सुंदर परदेशी अनुवादित कथा, नीलम प्रभूंची (दिल्लीतल्या) 'मांजराची गोष्ट' आणि अशाच किती तरी सुंदर पुस्तकांच्या आठवणी... या सगळ्या पुस्तकांनी आमचं बालपण समृद्ध केलं. ओल्या मडक्याला सुंदर घाट दिला, हे जग फार चांगल्या गोष्टींनी भरलेलं आहे आणि त्या सगळ्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे अशी उत्तम जगण्यासाठी आवश्यक असणारी मूलमंत्रासारखी गोष्ट या बालसाहित्यानं दिली...
पण पुढं जरा गडबड झाली... आम्ही मोठे झालो! लहानपणीचा निरागसपणा हरवला अन् हिशेबीपणा, बनचुकेपणा अंगी आला. वयानं वाढल्याची जाणीव ठायी ठायी त्रास देऊ लागली. मग आमच्या आयुष्यातून बालसाहित्य हद्दपार झालं. नीलम प्रभूंकडून विठ्ठल प्रभूंकडं प्रवास सुरू झाला. त्याचा इष्ट तो परिणाम झाला अन् विवाहोत्तर पराक्रमाचं फळ म्हणून आमचे चिरंजीव जन्मास आले. ('करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' या वाक्यामागचं इंगित अचानक आम्हाला कळलं!) हा बाळजीव जरासा मोठा होताच बालसाहित्य आमच्या आयुष्यात पुन्हा परतुनी आले. पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आणि तेव्हाचं साहित्य आमच्या डोक्यात अजूनही फिट्ट बसलं होतं. पण आता मुलासाठी म्हणून पुस्तकं घ्यायला गेलो अन् ती नवी-नवेली, रंगबिरंगी पुस्तकांची दुनिया बघून हरखून अन् हरवून जायला झालं. अप्रतिम छपाई, रंगीत-गुळगुळीत कागद आणि त्यावर साकारलेली ती आंग्लभाषी परिकथा पाहून मला पुन्हा बाळपणात शिरलं. पण आता चिरंजीवांचा मान होता. आम्हाला पुन्हा लहान होण्याची परवानगी नव्हती. तरीही त्याच्या जोडीनं जेवढं लहान होता येईल तेवढं होऊन बघितलं. त्याच्या नजरेनं ही सगळी दुनिया पुन्हा अनुभवली. आता कार्टून नेटवर्कचा खजिना होता, जिंगल टून होतं, हॅरी पॉटर होता, वेगवेगळ्या सीडी-डीव्हीडी होत्या, नंतर तर यू-ट्यूब अन् इंटरनेट नावाची 'अलिबाबाची गुहा'च उघडली... हल्ली तर स्मार्टफोनमुळं सगळं काही खरोखर हाताच्या मुठीत आलंय... बालसाहित्य सोडून! त्यामुळं सगळं काही आहे, पण तरीही लहानपणच्या काही गोष्टी आपण मिस करतोय, असं सारखं वाटत होतं...
हल्लीच्या मुलांना पूर्वीसारखं दर्जेदार बालसाहित्य वाचायला मिळत नाही, याची अपार खंत मनात दाटून आली होती. यावर उपाय म्हणून आपणच बालसाहित्य प्रसवायचं, असा निर्णय आम्ही ऐन होळीच्या दिवशी घेऊन टाकला. (पुढं हाताची मूठ अनेकदा तोंडावर पालथी करायचा प्रसंग येणार आहे, याची तेव्हा कल्पना नव्हती.) प्रसवणे हा शब्द साहित्यनिर्मितीसाठी का वापरतात, याची कायमची आठवण करून देणाऱ्या वेदना पुढं सोसायच्या होत्या, ते वेगळंच!
आपला पहिला वाचक आपले चिरंजीवच असणार आहेत, हे आम्ही ठरवून टाकलं. त्यानुसार आम्ही सोप्यातली सोपी गोष्ट म्हणून कृष्णजन्माची कथा चिरंजीवांना सांगायला सुरुवात केली. देवकी आणि वसुदेवाचं आठवं अपत्य आपला नाश करणार आहे, वगैरे कथाभाग सांगून झाल्यावर चिरंजीव (वय वर्ष आठ) उद्गारले, 'बाबा, कंस वेडाबिडा होता का रे?' चिरंजीवांना कथेत रुची निर्माण झालीय हे पाहून आम्हाला स्फुरण चढले. 'अरे, वेडा नाही काही... दुष्ट होता अतिशय...' असं सांगून आम्ही कंसाच्या दुष्टपणाची वर्णनं करू लागलो. चिरंजीवांनी खास पुणेरी तुच्छतादर्शक हसू एवढ्या बालवयातही कमावलं होतं. ते चेहऱ्यावर आणून त्यांनी पुन्हा ठाम स्वरात सांगितलं, 'नाही बाबा. कंस वेडाच!' आता मात्र आम्ही खचलो आणि हताश होत म्हटलं, 'अरे बाबा, कसा काय वेडा?' तर चिरंजीव चिरंतन सत्य सांगत असल्याच्या आविर्भावात उद्गारले, 'अरे, देवकी आणि वसुदेवाचा मुलगा आपल्याला मारणार आहे, हे त्याला माहिती होतं, तर त्यानं त्या दोघांना वेगवेगळ्या तुरुंगांत का नाही ठेवलं?'....
आम्ही जागेवरच खल्लास... वारलो... दीर्घ शांतता...
मग बराच काळ आम्ही बालसाहित्याचं नाव काढलंच नाही. बालसाहित्य लिहिण्याचं सोडा, पण वाचण्याचंही आपलं वय अद्याप झालेलं नाही, याची खात्रीच पटली होती. मग आम्ही हळूहळू बालजगतातल्या लेटेस्ट घडामोडी जाणून घेण्यासाठी चिरंजीवांकडं शिकवणीच लावली. बाल आणि प्रौढ या दोन्ही जगांतलं चिरंजीवांचं ज्ञान पाहून दिसामाजी माझी बालबुद्धी प्रगल्भ होत चालली होती. चिरंजीव आता टीनएजमध्ये प्रविष्ट करते झाले होते. त्यामुळं इंटरनेटवरचा त्यांचा व्यासंग अगदी व्यासाच्या नसला, तरी त्रिज्येच्या कक्षेएवढा नक्कीच विस्तारला होता. आम्ही अद्याप परिघावरच होतो आणि ही 'जीव-भौतिक' 'रसायना'ची नवी 'भूमिती' समजावून घेत होतो. ती जाणून घेतल्यानंतर बालसाहित्य लिहिण्याएवढे आपण अजून मोठे झालो नसल्याची खात्री पटली. मग आम्ही पुन्हा शिशुगटाकडे आमचा मोर्चा वळवला. तीन-चार वर्षांच्या मुलांसाठी परीची आणि राक्षसाची गोष्ट लिहिणं हा आमच्या डाव्या हातचा मळ होता. झर्रकन एक गोष्ट उतरवून काढली. ती गोष्ट अगदीच 'चिमखडी, ऑच्ची ऑच्ची, काहीच्च्या काहीच्च गोडुली' वगैरे झाली होती, असं आमचं स्वतःचंच मत झालं. याचं कारण आमच्या गोष्टीतला 'लाक्षस'ही 'पली'शी 'बोबले' बोलच बोलत होता. पण ही चिमुकली बालकथुली प्रसिद्ध करण्यापूर्वी कुणाला तरी दाखवावी, म्हणून शेजारच्याच इमारतीत राहणाऱ्या आमच्या कौटुंबिक मैत्रिणीकडं गेलो. तिची कन्युकली तीन ते चार वर्षांचीच आहे. तर गेल्या गेल्या तिनं आपल्या लेकुकलीचं आजचं महत्त्वाचं वक्तव्य ऐकवलं... टीव्हीवरील एक थोर मराठी मालिका बघून लेकीनं तातडीनं तिच्या आईकडं काळजीनं चौकशी केली होती - 'आई, तू अन् बाबा एकमेकांवर नीट प्रेम करता ना?'
हे ऐकून मी बसल्या जागी कोलमडलो. मैत्रिणीनं दिलेली कॉफी अंगावर सांडली. तिची ती थोर विदुषी लेकुकली शेजारी उभी राहून आपल्या वेड्या काकाला खो खो हसत होती. आता काही वेळानं माझी ही अवस्था पाहून ती कन्या काही तरी मानसशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी एखादी प्रश्नावली सादर करील, या भीतीनं मी तिथून पळ काढला.
एवढं झालं, तरी बालसाहित्य प्रसवण्याची आणि त्यानिमित्तानं 'बालसाहित्यिक' होण्याची आमची हौस काही कमी होत नव्हती. कुठला वयोगट धरावा, हे काही निश्चित होत नव्हतं. अखेर काही तरी सर्व्हे करावा म्हणून एका ग्रंथप्रदर्शनात गेलो. तिथं एक काकूसदृश महिला बालसाहित्याच्या विभागात बरीच खरेदी करीत होत्या. आनंदाचा भाग म्हणजे त्या बऱ्याच मराठी पुस्तकांची खरेदी करीत होत्या. अगदी पाच-दहा, पंधरा रुपयांच्या परिकथांची पुस्तकं त्यांनी मोठ्या संख्येनं उचललेली पाहून आम्हाला बालआनंद झाला. बिल वगैरे करून त्या बाहेर आल्याबरोबर आम्ही त्यांना गाठलं. तुमची मुलं केवढी आहेत, ती मराठी गोष्टीची पुस्तकं वाचतात हे किती छान वगैरे प्रश्न विचारल्यानंतर बाईंनी त्रासिक चेहरा करून सांगितलं, 'नाही हो... आमची मुलं त्या अमुक-तमुक पब्लिक स्कूलमध्ये आहेत. ती नाही वाचत असलं काही... आमच्या भिशी मंडळातर्फे एका अनाथालयातल्या मुलांना पुस्तकं देणगी द्यायचा कार्यक्रम आहे. त्यासाठी नेतेय ही पुस्तकं...' असं म्हणून म्याडम त्यांच्या शोफर-ड्रिव्हन 'स्कोडा'त शिरल्या. आमचा चेहरा अगदी 'स्कोडा-मोरा' झाला. आता काय करावं कळेना. (या बाईंवर एक ललित कथा तर नक्की झाली, पण बालसाहित्य कसं लिहिणार!) एके काळी गोष्टी लिहिणाऱ्या काही बालसाहित्यकारांचे पत्ते घेतले, तर ते अमेरिकेत त्यांच्या नातवांचे लंगोट बदलायच्या कामगिरीवर रवाना झाल्याचं कळलं. काही का असेना, अजूनही 'शिशु'संबंधी गोष्टीच ते करीत आहेत, याचा एक फुसकट आनंद आम्हाला झाला!
याखेरीज आम्ही बालसाहित्य संमेलनाला कधी हजेरी लावली नव्हती. पण ज्या काही बातम्या वाचल्या/ऐकल्या, त्यावरून तिथंही काही बालिश वा बालसुलभ गोष्टीच घडत असल्याची खात्री पटली. वृत्तपत्रांत लहान मुलांच्या पानावर येणारं साहित्य आम्हीच काय, पण आमच्या घरच्या बालांनीही कधीच वाचलं नव्हतं. एकूणच बालसाहित्याची निर्मिती करण्यास आपण अगदीच नालायक आहोत, अशी खात्री दिवसेंदिवस पटत चालली होती. मोठ्यांच्या साहित्य संमेलनात एकदा बालसाहित्यावरचा परिसंवाद ऐकला होता. शेजारीच प्रौढांसाठीचा गंभीर परिसंवाद होता. पण वक्त्यांचं बोलणं ऐकून वक्त्यांची आणि विषयांची उलटापालट झाली की काय, असा दाट संशय मनी आला होता.
...अखेर आम्ही बालसाहित्यनिर्मितीचा नाद सोडला. पुन्हा प्रौढांच्या लिखाणाकडं वळलो. आमच्या वकुबानुसार एक अत्यंत रोमँटिक अशी प्रेमकथा लिहून काढली. ती लिहिताना दोन दिवस आम्ही आमच्या आंघोळीच्या पाण्यात गुलाबपाकळ्या सोडल्या होत्या. शिवाय रोज गुलकंद खात होतो. तिखट-खारट पूर्ण वर्ज्य केलं. (आंबट चालूच ठेवलं... ते लागतं...) खेरीज हाताला गजरा बांधूनच ऑफिसला जायचं मनात होतं; पण तो मोह आवरला. एवढं सगळं करून अत्यंत कष्टानं लिहिलेली, 'साखरांबा' ही आमची प्रेमकथा तयार झाली. आमच्या नेहमीच्या प्रकाशकांकडं पाठविली. अत्यंत उत्सुकतेनं उत्तराची वाट पाहत राहिलो. एक दिवस त्यांचा मेसेज आला - 'कथा आवडली. आपला पुढील महिन्याचा बालकथा विशेषांकच आहे... त्यात वापरू... मुलं खूश होतील!'
...अन् आम्हाला बालसाहित्यिक होण्याचं कोडं एकदम उलगडलं. त्या दिवसापासूनच आम्हाला 'ठोंब्या बालसाहित्यिक' म्हणून साहित्यशारदेच्या चरणी रुजू करून घेण्यात आलं!
---
(ता. क. : काही लोकप्रिय किस्से स्वतःचेच आहेत, असं दाखवून आपल्या लिखाणात घुसडण्याचं आमचं कौशल्य जाणकार वाचकांच्या लक्षात आलं असेलच. आम्ही लेखक म्हणून हळूहळू 'उत्क्रांत' होत असल्याची ती खूण धरून चालावी! इति विज्ञापना...)
---
(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, एप्रिल २०१७)
---