21 Sept 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ११

लेख : एक बनविणे
-----------------------

गेल्या महिन्यात बालसाहित्याच्या प्रांतात लुडबूड केल्यानं आम्ही स्वतःस अंमळ निरागस समजू लागलो होतो. नव्हे, आम्ही स्वतःचे मतच तसे बनवून घेतले होते. पण आमच्यातला हा कथित निरागसपणा अवघा महिनाभर टिकला. त्याला कारणही तसंच घडलं. मराठी साहित्यविश्वात काही तरी नव्यानं ‘बनत’ होतं... काही तरी बिघडत होतं... सगळं सविस्तरच सांगायला हवं...
साधारणतः साहित्य संमेलन संपलं, की आमच्या चिमुकल्या मराठी साहित्यविश्वाला गाढ झोप येते. अगदी मे महिन्यातल्या करकरीत दुपारी हापूसचा रस ओरपल्यावर येते तश्शीच! मग आम्ही लेखकमंडळी पुढील संमेलन येईपर्यंत बेडकासारखे शीतनिद्रेत जातो. रसपानानंतर एसी फुल्ल सोडून जी काही निद्रा येते ना, तिची तुलना फक्त एकाच गोष्टीशी करता येईल. ती गोष्ट अथवा क्रिया येथे सांगणे बरे नव्हे. परंतु जाणकार सुज्ञांस त्याचा अवश्य उलगडा होईल. तर मुद्दा साहित्यविश्वाच्या गाढ निद्रेचा होता. दुपारच्या वेळी गाढ झोपल्यानंतर अचानक कोणी येऊन आपल्याला गदागदा हलवू लागले, तर संबंधित व्यक्तीच्या मातृकुलाची आठवण त्वरेने येणे अगदी साहजिकच असते. तशाच पद्धतीनं गेल्या महिन्यात मराठीतल्या एका विदुषीनं आपल्या भाषेविषयीची खंत प्रकट करून गाढ झोपलेल्या साहित्यविश्वाच्या अंगावर शुद्ध भाषेच्या पाण्याचे चार सपकारे मारण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषा नव्यानं 'बनविण्याचा' प्रयत्न सांप्रतकाळी जोमानं सुरू असल्याचं त्यावरून आमच्या ध्यानीमनी आलं. साहित्यविश्व गाढ निद्रेत असताना बाईंनी त्याच्या पार्श्वभागी हे चार रट्टे मारल्यानं त्या आता 'चावू आनंदे' किंवा 'द्यावे फटके' नावाचे नवे पुस्तक लिहिण्याच्या, नव्हे, बनविण्याच्या बेतात असाव्यात अशी दाट शंका आम्हास आली. वास्तविक मराठी साहित्याच्या त्या हेडबाईच असल्यामुळं आम्हाला त्यांच्याविषयी परमआदर आहे. किंबहुना त्यांनीच आम्हाला नेटके कसे लिहावे आणि आनंदाने कसे वाचावे हे शिकविले. मधल्या काळात आम्ही नसलो, तरी आमची भाषा मात्र नव्याने 'बनत' चालली आहे, याची आम्हाला खबरबात नव्हती. मात्र, बाईंनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले. त्यामुळे चिमुकल्या मराठी साहित्यविश्वात एकच खळबळ 'बनून' राहिली. बनविण्यावरून खूप काही बनले-बिनसले. पत्रकारांनी अग्रलेख लिहिले, फेसबुक्यांनी पोस्टी टाकल्या, भाषाप्रेमींनी संताप व्यक्त केला आणि बाकीच्यांनी नुसतेच सुतकी चेहरे 'बनविले'. आम्ही इतरांपेक्षा वेगळे असल्याने चार लोक करतील तेच करण्यात अर्थ नव्हता. पण आपण होतकरू का होईना लेखकू आहोत, याची विनम्र जाणीव आमच्या मनात ‘बनून’ राहिली होती. तेव्हा 'बनेल'पणा करून काही तरी बनवायला हवे होते; अन्यथा बात 'बनली' नसती! बाकी काही का असेना, बिघडविण्यापेक्षा बनविण्याला महत्त्व आहे. त्यामुळे या विषयावर एक लेखच 'बनवून' टाकावा, असे आमच्या मनाने घेतले.
एकदा आम्ही मनावर घेतले, की मग आमचे सगळे छान 'बनून' येते. वास्तविक लेख लिहिणे हे आमच्यासारख्या लेखकूला अगदी सहज जमते. पण लेख लिहिणे वेगळे आणि लेख ‘बनविणे’ वेगळे. हा जरा नवा प्रयोग होता. म्हणून सुरुवातीला कुतूहल म्हणून आम्ही 'बनविणे' या क्रियापदाचाच अभ्यास सुरू केला. 'बन' हे त्याचे मूळ रूप असावे, अशी आम्हास शंका आली. आता हे शेवंतीचे 'बन' आहे की 'बन'मस्क्यातले 'बन', हे काही लक्षात येईना. पण एकाच वेळी हा शब्द मराठी आणि इंग्रजीतले नाम असू शकतो, एवढे उमगले. 'माझ्या मना बन दगड' असं विंदांनी सांगून ठेवल्याचं तेवढ्यात ध्यानीबनी, आपलं, ध्यानीमनी आलं. मग 'बन' हे आज्ञार्थी क्रियापदही होऊ शकते, असा विचार आम्ही मनाच्या बनात ठेवून दिला. काही काळापूर्वी मराठी साहित्यात 'बनी' नावाच्या आगाऊ मुलीने धुमाकूळ घातला होता. या बनीचा या क्रियापदाशी काही संबंध आहे का, हे आम्ही चाचपू लागलो. ही बनी एक नंबरची बावळट मुलगी असावी; कारण प्रत्येक लेखात संबंधित लेखक तिला 'बने, बने, अगं असं काय करतेस? इकडं बघ, तिकडं लक्ष दे, वेडी आहेस का, कसं समजत नाही तुला,' अशाच प्रकारे संबोधताना आम्ही वाचले आहे. तेव्हा काही साहित्यिकांनी या गरीब मुलीला ठरवून 'बनविले' असावे, अशी रास्त शंका आमच्या मनीबनी वस्तीला येऊन राहिली आहे. अर्थात बनीचा बनविण्याशी संबंध असला, तरी त्यात तिलाच 'बनविण्यात' आले असेल, तर सोडून दिले पाहिजे, असे म्हणून आम्ही बनीचा नाद सोडला.
खुद्द 'बनविणे' या क्रियापदाने आम्हाला किती बनविले आहे, याचा हळूहळू अंदाज येऊ लागला. हिंदीत लग्न करण्याला 'शादी बनाना' असे का म्हणतात, हे मराठीत लग्न 'बनविल्यास' तातडीने कळून येते. किंबहुना एकमेकांना 'बनविण्या'चीच ती स्पर्धा असते, असंही म्हणायला हरकत नाही. हिंदीतलं हे 'बनाना' क्रियापद इंग्रजीत एक निसरडं फळ देऊन जातं. त्याचा मराठी अर्थ सांगायलाच हवा का? तेव्हा कुणी आपल्याला बनविले आहे, याचा अर्थच त्याने आपल्याला हे फळ दिले आहे, असे समजून चालायचे. तेव्हा 'बनविणे' या क्रियापदाचा वापर मराठीत नाही नाही त्या ठिकाणी होऊ लागला, याचा अर्थ ही फसवणूकही व्यापक होत चालली आहे, असे समजायचे का? 'मी स्वयंपाक करते,' असे म्हणण्याऐवजी आमचे खटले 'मी स्वयंपाक बनविते' असे म्हणत असेल, तर ते वास्तवाच्या अधिक जवळ जाणारेच ठरत नाही काय! स्वयंपाक या नावाखाली ती त्या सर्व पदार्थांना आणि नंतर आम्हाला 'बनवत'च नसते काय! टीव्हीवर कार्यक्रम 'सादर करतो' याऐवजी 'कार्यक्रम बनवतो' असे कुणी म्हणत असेल, तर तोही अधिक प्रामाणिकच म्हणायला हवा. याचे कारण तो केवळ कार्यक्रमच नव्हे, तर प्रेक्षकांनाही 'बनवत' असतोच की... सिनेमा ‘बनवतो’, म्हणणारा तरी काय वेगळं करतो? तोही 'बनवतो'च...! आणि असे करताना अनावधानाने का होईना, पण प्रामाणिक वाक्यरचना केल्याबद्दल आपण त्यांचे 'धन्यवाद करायला' नकोत का? खरं तर धन्यवादसुद्धा 'बनवायला' काही हरकत नसावी. या कामी कुणी 'आमची' मदत करू शकेल काय? करणार असाल तर नक्की बघा. आम्ही त्यांचेही धन्यवाद 'करू'...
'बनविणे' या एका क्रियापदावर एक छानसा बनेल लेख कम् कथा होऊ शकते, हे एव्हाना आमच्या बनचुक्या मनाने नीटच हेरले होते. या कथेसाठी काय काय मुद्दे बनवता येतील, याचा आम्ही अंदाज घेऊ लागलो. शाब्दिक कोट्या बनविणे हा आमचा हातचा मळ होता. तेव्हा 'बनविणे' या शब्दावर जास्तीत जास्त कोट्या करण्याचे काम निश्चितच 'बनणार' होते. 'बनवारीलाल'पासून ते 'बनहट्टी'पर्यंत आणि 'बन का पंछी'पासून ते 'बनावट'पर्यंत एकही 'बन'शब्द आम्ही सोडला नाही. प्रत्येक वाक्यात आम्ही या 'बन'च्या लाद्या पसरल्या. त्या वाक्यांचा एकमेकांशी खरं तर काहीच संबंध नव्हता. पण आम्हाला काहीही करून लेख 'बनवायचा’च असल्यानं आम्ही शब्दांच्या या दाट 'बना'त शिरलो. त्यातून पुढीलप्रमाणे काही वाक्ये तयार झाली : 'बनगरवाडीत राहणाऱ्या बनकरांच्या बनवारीलालने बनसोडेंच्या बनीला काहीही करून आज बनमस्का खाऊ घालण्याची अत्यंत बनचुकी आणि बनावट योजना बनविली होती. त्याच्या कल्पनेप्रमाणे सर्व योजना बनवून झाली. बनशंकरीच्या मंदिरामागच्या बनात भेटून तिला बनमस्का द्यायचा होता. पण बनीच्या बापानं त्या दिवशी तिला कामावर जाऊच दिलं नाही. मग बनवारीनं मोठ्या मिनतवारीनं बनीला काही-बाही सांगून घराबाहेर काढलं. बनशंकरीच्या बनात गेल्यावर बनमस्काच काय, पण साधा पावही न मिळाल्यानं आपण बनवलो गेल्याचं बनीच्या लक्षात आलं...'
पुढं वाचवेना. डोकं अगदी ‘बनबनून’ - आपलं - भणभणून गेलं! हे असे लेख बनविणे म्हणजे बनमस्का खाण्याइतकी सोपी गोष्ट नव्हे, हे आमच्या लक्षात आले. तेव्हा या बनावट लेखाला आम्ही सत्वर काडी लावली. मन मात्र उदासच बनून राह्यलं मग...! शून्यातच गेलो...
...या एका ‘बनविणे’नं आमच्या साहित्यविश्वात केवढी खळबळ उडविली आहे, याची आता कुठं अंधुकशी कल्पना येऊ लागली. मग आम्ही आमच्या आजूबाजूला मराठी बोलणाऱ्या विविध माध्यमांकडं सहज पाहिलं. टीव्हीवरचे कार्यक्रम, वर्तमानपत्रं, मासिकं, नियतकालिकं, फेसबुक, व्हॉट्सअप सगळी-सगळीकडं अशी अनेक ‘बनावटगिरी’ भरून राहिली होती. शब्दांनी ताळतंत्र सोडला होता. महानगरांत सिग्नल बंद पडल्यावर चौकात जशी अवस्था होते, तशी बिचाऱ्या शब्दांची झाली होती. लिहिणाऱ्या किंवा तसा दावा करणाऱ्या बहुतेक सगळ्यांनी नियमांचं बोट सोडलं होतं. त्यामुळं शब्द बिचारे लज्जित होऊन, खालमानेनं रस्त्यावर उभे होते. त्यांना वापरून घेणारे बेदरकारपणे त्यांच्या अंगावरची वसनं फेडत होते. त्यांचे दागिने ओरबाडत होते. उच्चारांचे, लेखनाचे सगळे नियम कोपऱ्यात लोळागोळा होऊन पडले होते... शब्द मार खात होते, धक्के सोसत होते, शब्द बिचारे मुके मुके सगळं सोसत होते... शब्दांच्या अब्रूची किंमत नसणारे त्यांना ‘बनवून’ वापरत होते. अशा वेळी आपण मूकपणानेच शब्दांचे सांत्वन करायचे असते... कारण शब्दांचे सांत्वन करायला अजून कुठलेच शब्द नाहीत... 


मग शब्दांना भरून आले... ते उसासू लागले... मूकपणानेच काही सांगू लागले! त्यांना काय म्हणायचंय ते नीटच ऐकू येऊ लागलं. मग आम्हाला हवेतून अचानक तुकोबांची गाथा ऐकू येऊ लागली... त्या गाथेतले साधे-सोपे शब्द कानी पडताच मन आनंदले. शब्दांनाही आपले सगेसोबती भेटल्याचा आनंद झाला. तिथं मग आमच्या मायबोलीच्या शब्दांचं संमेलनच भरलं. अवघा रंग एक झाला! ज्ञानियांचा राजा आला, नाथांचं भारूड आलं, जनीचे अभंग आले, रामदासांचा दासबोध आला, बहिणाबाईंची कविता आली... अत्र्यांची चौफेर टोलेबाजी आली, शान्ताबाईंचे सालस-सहज शब्द आले, इंदिरा संतांचे शब्द बेळगावचा ‘मृद्-गंध’ घेऊन आले... दि. बा. मोकाशी आणि प्रकाश नारायण संतांचे साधी-सोपे शब्द आले, पुलं नावाचं शब्दांचं गारूड आलं, राम गणेश गडकरी नावाचा लखलखता रत्नहार दिसला, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते चिं. विं. जोशींपर्यंत गडगडाटी हास्य करीत शब्द आले... ढसाळ-दया पवार वेदनेचा शब्द घेऊन आले... किती नावं घ्यावीत... पुढं पुढं तर सगळे शब्द एकमेकांत मिसळून गेले... पंढरपुरात आषाढीच्या यात्रेत चंद्रभागेच्या वाळवंटात अबीर-बुक्का उधळावा तसे सगळे शब्द आमच्या भोवतीच्या आसमंतात उधळले गेले... ‘मराठी मराठी’चा गगनभेदी गजर कानी पडला... आमच्या वऱ्हाडी, माणदेशी, कोकणी, मराठवाडी, खानदेशी, अहिराणी, मावळी, कोल्हापुरी अशा सगळ्या बोली पालखीला आल्या... शब्द तर नाचूननाचून बेभान झाले.... एवढे सुंदर दिसत होते नाचताना... प्रत्येकाचा वेष वेगळा, प्रत्येकाचा तोरा वेगळा, प्रत्येकाचा नाद वेगळा, प्रत्येकाचा साज वेगळा... तरीही सगळे आमच्या ‘माय’च्या मायेच्या बंधनानं बांधलेले... धन्य धन्य झालो... अन् अचानक उद्गार बाहेर पडला - काय सुंदर ‘शोभायात्रा’ ‘बनवलीये’ रे तुम्ही सगळ्यांनी!
...अन् रप्पकन पाठीवर रट्टा बसला. आम्ही खाडकन डोळे उघडले. समोर विदुषी हेडबाई हातात छडी घेऊन उभ्या होत्या... त्यांच्या भेदक नजरेमुळं आमचे सगळे बनचुके शब्द एकदम आटले... लेख ‘बनवायचा’ होता, तो राहूनच गेला!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मे २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

No comments:

Post a Comment