21 Sept 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १४

पुस्तकांचं नकादु...
---------------------

पुस्तकांच्या दुकानात जायचे म्हटल्यावर आम्हाला भारी हसू येते. मनमज्जेच्या अनेक गोष्टी तिथं बघायला मिळतात. पुस्तकांव्यतिरिक्त किती तरी ज्ञानदायी प्रकार अनुभवता येतात. आम्ही किंचित लेखकू असल्यानं ग्रंथ आणि ग्रंथविक्रेते यांच्याशी आमचा ऋणानुबंध भलताच जुळला आहे. पुण्यनगरीत पुस्तकांच्या दुकानात जायचे म्हटले, की ते साधेसुधे काम नसते. त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते. साधारणतः कर्जाचे तीन हप्ते चुकल्यानंतर देणेकऱ्याला सामोरे जात आहोत, असा भाव मनी आणावा लागतो. (विवाहित पुरुषांना हे फारसे कठीण जात नाही, एवढे बरीक खरे!) त्यातही ही खरेदी पुण्यनगरीत आणि अप्पा बळवंत चौक नामक इतिहासप्रसिद्ध जागेच्या भवताली करायची असल्यास चिकाटी, नम्रता, संयम, धैर्य आदी गुणांची कसोटीच लागते.
मागे एकदा असेच पुस्तक खरेदीच्या भयानक अनुभवावरून परतल्यानंतर अस्मादिकांनी त्याचे एक टिपण करून ठेविले होते. ते आज ऐतिहासिक दस्तावेज म्हणून प्रसिद्ध पावले आहे. या टिपणात दस्तुरखुद्दांनी म्हटले आहे, 'शेतकरी, कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार, पेपरवाले म्हणजे पत्रकार आणि पुस्तकविक्रेता यांच्यात काय साम्य आहे? तर या लोकांना कुणी सुखी पाहिलं आहे काय? म्हणजे लोकांना जरी ते वरकरणी सुखी दिसत असले, तरी ते लोक स्वतःला सुखी मानतात काय? कधीही नाही! यातला पुस्तकविक्रेता नामक घटक आहे तो तर कायम दुःखाच्या गर्तेत तरंगत असतो. (आणि हे त्याचं स्वतःचंच मत असतं.) पुस्तकं खपत नाहीत, पैसे मिळत नाहीत, लोक उधारी देत नाहीत, फुकट पुस्तकं नेतात, या आणि अशा अनेक कारणांमुळं पुस्तकविक्रेत्याच्या चेहऱ्यावर कायम प्रूफरीडिंग न झालेल्या पानाची कळा असते. आपल्या दुकानातल्या वरच्या शेल्फांवर वर्षानुवर्षं धूळ खात पडलेली पुस्तकं आणि आपण स्वतः यांत बरंचसं साम्य आहे, अशी पुस्तक विक्रेते महोदयांची प्रामाणिक समजूत असते. समाजरूपी दुकानात आपणही असेच धूळ खात पडलेले आहोत आणि उपेक्षेशिवाय अन्य काहीही (क)मिशन वाट्याला आलेलं नाही, अशा धारणेचं घट्ट बाइंडिंग त्यांच्या मनावर असतं. फार पुस्तकं खपली, तर समाज अचानक ज्ञानी वगैरे होईल आणि आपला कायमचा बाजार उठेल, अशा (निरर्थक) भीतीची एक तळटीप त्याच्या मनाच्या पानावर कायमची कोरून ठेवलेली असते. त्यामुळं होता होईल तो निरिच्छ आणि वैराग्य वृत्ती अंगी बाणवून, पुस्तक विकत घ्यायला आलेल्या ग्राहकरूपी देवाला या मोहमायेपासून वंचित करणं हे आपलं आद्य कर्तव्य असल्यासारखाच त्याचा दुकानातील वावर असतो. ग्राहक वेळी-अवेळी कधीही दुकानात येऊन पुस्तकं मागतात; तरीही आपण हा त्रास सहन करून त्यांची मोठीच सेवा करतो, असे भाव चेहऱ्यावर नसतील, तर पुस्तकाच्या दुकानाचा परवाना सरकार देणारच नाही, अशी या 'गब्बरग्रंथी' मंडळींची खात्रीच असावी... '
हे वाचल्यावर एवढ्या जीवावरच्या प्रसंगावर बेतून घ्यायला आम्ही कशाला त्या चौकात तडमडलो होतो, याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. पण हा लेखनाचा किडाच भयंकर! तो चावल्यावर माणूस वेड्यासारखा वागू लागतो. आम्हीही त्यास अपवाद नाही. एवढं सगळं होऊनही पुस्तकांच्या दुकानांची पायरी चढतोच चढतो. फक्त यंदा स्पॉट बदलला. कोथरूडमध्ये पुस्तकांचं दुकान सुरू झाल्याची खबर लागली. वास्तविक कोथरूड हे पुण्याचं नाक. समस्त कोथरूडकर म्हणजे 'जरा अधिक पुणेकर'... असं असूनही कोथरूडमध्ये पुस्तकाचं दुकान नव्हतं, हे काही झेपत नाही. हे म्हणजे पैठणी आहे, पण नथ नाही किंवा कोट आहे, पण टाय नाही किंवा मसापचा मेंबर आहे, पण मतदानाचा अधिकार नाही असला काही तरी प्रकार झाला. पण अखेर वाचन धर्म वाचविण्यासाठी मराठीतल्या 'साहित्यसंभां'नी स्वतः पुस्तकाचं दुकान सुरू केलं आणि आम्ही कोथरूडवासीयांसोबत त्यांचा जयजयकार करून टाकला. वास्तविक कोथरूड ही पुस्तकांसाठीची 'आयडियल' जागा; पण तिथं असं पुस्तकांचं दुकान सुरू करावं ही 'आयडिया' फक्त साहित्यसंभांनाच सुचली. शिवाय कोथरूडच्या प्रतिष्ठेला साजेसं असं त्यांनी या दुकानाचं नावही ठेवलं - पुस्तक पेठ. (भले ते एका इमारतीच्या गाळ्यातलं दुकान का असेना, पण नाव 'पेठ'! पुण्यातल्या गल्लीबोळातली संस्थाही जशी 'अखिल भारतीय' असते, तसंच हेही!) साहित्यसंभांच्या जोडीला इथं माधवरावही आहेत. 'तोच पार्टनर साक्षात मानावा, भांडवल देतो निमित्त केवळ' असं गाणंही साहित्यसंभा आपल्या माधव'स्वामीं'साठी गुणगुणत असतात म्हणे.

अशा या दुकानी जाण्याचा योग अखेर आला. साक्षात साहित्यसंभांनी गळामिठी घालून आमचं स्वागत केलं. (या अनोख्या दृश्याचं छायाचित्र कुणीच न टिपल्यानं पुढं इतिहासात अजरामर होण्याचा आमचा चान्स हुकला आहे.) दुकानी आलेल्या प्रत्येकाचं स्वागत मालक असंच करतात काय, या विचारानं मागोमाग आलेल्या दोन मैत्रिणी सचिंत झाल्या; पण तसं काही घडलं नाही. त्यांनी हुश्श केलं आणि आम्हीही! बाकी 'पुस्तक पेठ' होती झक्कास बरं का! त्या छोट्याशाच दुकानाचं, नीटनेटकं, गोंडस रूपडं पाहून आम्ही हरखून गेलो. प्रत्येक लेखकाचा वेगळा कप्पा, सुबक अक्षरात लिहिलेली नावं, नामवंत लेखकांचे कोट्स वर दोन्ही बाजूंना अतिसुंदर अक्षरांत लावलेले, समोर मध्यभागी मराठी सारस्वतातल्या नक्षत्रांच्या चित्रांचा करून लावलेला कोलाज... हे पाहून छानच वाटलं. आम्ही पुस्तकं पाहू लागलो तो साक्षात मालक आमच्यासोबत येऊ लागले. 'हे बघितलं का, ते घेतलं का, हे वाच, हे असूच दे' अशी धावती कॉमेंटरी करीत ते आमचा शब्दशः पिच्छा पुरवू लागले. दुसरे मालक गल्ला सांभाळत होते, तर हे उत्साही मालक पेठेच्या आतल्या गल्ल्या सांभाळत होते. दोन पुस्तकांच्या रॅकमध्ये मालकांनी आम्हाला खिंडीत गाठावे तसे गाठले होते. 'हे वाचलं का, ते वाचलं का,' या त्यांच्या साध्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच येत गेली, तशी आमची पुस्तकवेडाची वस्त्रं गळून पडायला लागली. आपण वाचनाच्या बाबतीत अगदीच 'हे' आहोत, असा फील आला. मालकांनी मग आम्हाला आतल्या इंग्रजी दालनात खेचलं, तेव्हा हारुकी मुराकामी वगैरे शब्द ऐकल्यावर आपण ही 'हाराकिरी'च केल्याचं आमचं मत पक्कं झालं. मालकांचं वाचन त्यांच्यासारखंच दांडगं होतं, हे आम्हाला ठाऊक होतं. पण ते एवढ्या जातीनं आमच्या पुस्तकखरेदीत लक्ष घालतील ही अपेक्षा नव्हती. खऱ्या पेठेतल्या ग्रंथविक्रेत्यांच्या तुसडेपणाचा अनुभव घेतलेल्या आम्हाला पेठकर मालकांनी अक्षरशः गहिवर आणला. पुढं हळूच त्यांनी त्यांच्या वाचक सभासद योजना, वार्षिक वर्गणी वगैरे स्किमा पुढं सरकावल्यावर त्यांच्यातल्या चाणाक्ष विक्रेत्याचीही गाठ पडली. अखेर होय-नाही करता करता चार आकडी रकमेची खरेदी झालीच. वाचकाला हवी ती पुस्तकं आणून देणारा, सुवाच्य अक्षरात स्वतः बिलं फाडणारा, वर भरघोस सवलत देणारा हा मालक म्हणजे पुण्यातल्या ग्रंथविक्रेता जगतास कलंक आहे, असं क्षणभर वाटून गेलं. यानंतर 'जिस का मुझे था इंतजार, वो घडी आ गयी...' मालकांनी आम्हाला पुस्तक पेठेच्या कॉर्नरला खेचलं आणि दणादणा फोटो काढून घेतले. मग सेल्फ्यांचीही आवर्तनं झाली. आता हे फोटो फेसबुकवर पेठेच्या पानावर अपलोड होणार आणि साहित्यसंभांच्या विशाल वर्तुळात आपण झळकणार याचा आम्हास पेठभर, आपलं, पोटभर आनंद जाहला. आता आम्हीही काही काळ त्यांच्या सहवासात काढल्यानंतर बाहेर पडताना आम्हालाही पुस्तकविक्रीच्या काहीबाही योजना सुचू लागल्या. मालक आमच्या मैत्रिणीचे प्रेमानं फोटो काढू लागल्यावर आम्हाला मंगळागौरीची स्कीम सुचली. संक्रांतीच्या वा चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाचं आणि काही विशिष्ट कवितासंग्रहांच्या खपाचं नातं आम्हाला अचानक उलगडलं. बाकी काही असो, साहित्यसंभांनी कोथरूडमध्ये उभारलेली ही पुस्तकपेठ आमच्या मनाला उभारी देऊन गेली, हे नक्की. आनंदात तरंगतच आम्ही घरी आलो...
माणूस कुठल्याही कारणानं आनंदी झाला, की त्याचा सारासार विवेक गहाण पडतो. एखाद्या अनुभवानंतर सगळं जगच चांगलं आहे, असा गैरसमज तो करून घेतो. आमचंही तसंच झालं. कुठल्या तरी अस्फुट, निसटत्या क्षणी आम्ही अन्य पुस्तक दुकानांत जाण्याचा निर्धार केला. मग आम्ही पुनश्च पारंपरिक वळणाच्या एका दुकानात आणि किती तरी वर्षांची परंपरा इ. असलेल्या दुकानी शिरलो. तेथे आम्ही एक विविक्षित पुस्तक मागताच, त्यांनी आत्ता ते नाही, असं सांगितलं. मग ते तुमच्याच प्रकाशनाचं आहे, असं सांगितल्यावर 'होय का, असं सांगा की' म्हणत तो स्थितप्रज्ञ इसम आत गेला. आता पुस्तक लगेच सापडलं. या पुस्तकावर सवलतही मिळाली. पुढे आणखी एका दुकानी गेलो असता, काउंटरवरल्या महिलेशी एन्काउंटर होण्याचा प्रसंग आला. आम्ही मागितलेले एक विविक्षित पुस्तक पाहिल्यावर तिने आम्ही तिची इस्टेट लिहून मागत असल्यासारखा चेहरा केला. नंतर तिला एकूणच काही न झेपल्यामुळं आतून एक ज्येष्ठ काका आले. त्यांनी ते पुस्तक 'औट ऑफ प्रिंट' असल्याचे सांगून आम्हाला एक वही देऊ केली. त्या वहीत आम्हीच पुस्तकाचे नाव, प्रकाशन, मोबाइल नंबर इ. तपशील भरून दिला. पुस्तक आलं, की लगेच फोन करू, हे त्या काउंटरसुंदरीनं सांगितलं. आजतागायत काही फोन आलेला नाही. त्यानंतर 'औट ऑफ प्रिंट' म्हणजे आपल्या दुकानात नसलेले पुस्तक अशी एक नवी व्याख्या आम्ही मनात तयार केली आहे.
बाकी जिमखान्यावरचे आमचे आणखी एक आवडते दुकान म्हणजे 'इंटरनॅशनल'! आमचेच कशाला, पुण्यातल्या तमाम जाणत्या वाचकांचं एके काळचं हे हक्काचं पुस्तक दुकान होतं. आता दीक्षितांच्या 'इंटरनॅशनल'चं जोगळेकरांचं 'बुकगंगा इंटरनॅशनल' झालंय. पण खरं सांगायचं, तर या बदलामुळं मूळचं दुकान अजूनच गोजिरं-साजिरं झालंय. शांत-निवांतपणे पुस्तकं घेण्याचा, न्याहाळण्याचा, हाताळण्याचा आनंद इथं मिळतो. इथला स्टाफही चांगला आहे. तो आपल्याला कुठल्याही सूचना किंवा 'हे घ्या, ते ठेवा' करीत नाही आणि मागं-मागंही येत नाही. शिवाय इथं वर बसून पुस्तकं वाचायचीही सोय आहे. अडचण एकच. इथं समोर पार्किंगची सोय नाही. त्यामुळं मागच्या गल्लीत गाडी लावून पुढं दुकानात यावं लागतं. तेव्हा अक्षरशः 'रस्त्यावर आल्याचा' फील येतो. अर्थात इथं तशीही भरपूर खरेदी केली जाते. त्यामुळं खिसा रिकामा झाल्यानं आपण त्याही अर्थानं 'रस्त्यावर' येतोच! या पुस्तकाच्या दुकानाचे मालक भलतेच मितभाषी, सुस्वभावी इ. आहेत. ते दुकानात कधीही भेटत नाहीत. त्यांना भेटायचं तर खास अपॉइंटमेंट वगैरे घेऊन जावं लागतं. त्यांच्या गोड बोलण्यामुळं त्यांच्याशी बोलताना पुणेरी फटकळपणा बाजूला ठेवून नम्रतेनं बोलणं अंमळ कठीणच जातं. (अर्थात असं असलं, तरी बाकी व्यवहारात मालक चोख आणि अस्सल कोकणी बाण्याचे आहेत, याची नोंद घ्यावी.) त्यांना भेटून आम्हाला कायमच अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं वाटतं. म्हणून डाएटवर असताना आम्ही 'बुकगंगा' भेट टाळतोच. पुस्तकप्रेमींच्या डोक्यावर यांनी धरलेली ही प्रेमाची गंगा अविरत वाहती राहावी, असं मात्र वाटून जातं.
पुण्याच्या अस्सल पुणेरी बाणा जपणाऱ्या ग्रंथविक्रेत्यांच्या लौकिकाला ही दोन दुकानं कलंक फासताहेत, असं आमचं स्पष्ट मत झालं आहे. आता आणखी काही 'रसिक' दुकानांत जाऊन, 'अक्षरधारां'मध्ये न्हाऊन, हा लौकिक राहिलाय की नाही, हे आम्हाला बघावंच लागणार आहे.... लेखकास तिकडंही जाऊन यावे लागेल... तो वृत्तांत लगोलग येईलच...!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, ऑगस्ट २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

No comments:

Post a Comment