21 Sept 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १३

पुस्तकांच्या गावा जावे...
----------------------------

आम्ही स्वतःला एक किंचित लेखकू म्हणवून घेत असल्यानं त्याच्यासंबंधानं आमची अशी काही कर्तव्ये आहेत. साहित्यविषयक कुठेही काही घडत असल्यास तिथं जाऊन हजेरी नोंदवून येणं हेही त्यापैकीच एक कर्तव्य होय. आमच्या या आग्रहामुळं एकदा 'येथे अंत्यविधीचे साहित्य मिळेल' या पाटीतील केवळ 'साहित्य' शब्द पाहून आम्ही आत जाऊन पुस्तकांची चौकशी केली होती आणि तो शेवटला विधी तिथेच आमच्यावर शेकण्याची वेळ आली होती. एकदा स्त्री-साहित्य संमेलनातही केवळ 'साहित्य' शब्दाच्या आधारे घुसण्याचा आमचा प्रयत्न असाच अंगलट आला होता आणि पुढील कित्येक दिवस घरच्या स्त्रीकडून अस्मादिकांची यथेच्छ धुलाई झाली होती. तेव्हा आमचे साहित्यप्रेम हे तसे धोकादायक आहे. अनेकदा ते आमच्या जीवावर बेतते. तरीही साहित्यसेवा करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, अशी आमची नम्र धारणा असल्यानं आम्ही ते प्रसंग कसेबसे निभावून नेतो आणि पुढल्या सेवेला उभे राहतो. तर ते असो. मुद्दा आमच्या अविचल साहित्यनिष्ठेचा आहे आणि यंदाही आम्ही तो निभावून नेला आहे. त्याचे झाले असे...
महाराष्ट्रदेशी सत्तापालट होऊन काहीच्या काही थोर साहित्यिक नेते सत्तेवर आल्याचे चित्र आम्ही गेली दोन-तीन वर्षे पाहत आहोत. यातील मराठी भाषेच्या मंत्र्यांचे नावच 'विनोद' असल्याने आम्ही पहिल्यापासून त्यांच्या एकतर्फी प्रेमातच पडलो आहो. विनोद हा आमचा स्थायीभाव आहे, विनोद हा आमच्या लेखनाचा प्राणवायू आहे, विनोद हाच आमच्या साहित्याचा स्वभाव आहे. तेव्हा मराठी भाषेचे मंत्रिपदच 'विनोदा'कडे गेले, तेव्हा आम्हास अत्यंत हर्ष होऊन गुदगुल्या इ. झाल्या. वास्तविक मराठी साहित्यात मुख्यमंत्रिपदाचा मान विनोदाला मिळायला हवा. मात्र, विनोदाला कोणीही गंभीरपणे घेत नसल्याने त्याचा हा मान हुकला आहे, हे आमचे पहिल्यापासूनचे मत्त आहे. गंभीर, जडबंबाळ कादंबऱ्या किंवा आत्मलेखनाला गृह, महसूल आदी खाती मिळत असताना विनोदाला मात्र शालेय शिक्षण किंवा भाषा आदी दुय्यम खाती दिली जातात, हे चित्र साहित्य मंत्रिमंडळाला अगदीच शोभत नाही. तरीही आम्ही विनोदप्रिय असल्यानं केवळ हसून या गोष्टी दुर्लक्षित केल्या आहेत, हे इतरांनी समजून असलेले बरे. तरी मराठी भाषेच्या प्रेमात पडलेल्या आमच्या विनोदनामे मंत्र्यांनी महाराष्ट्रदेशी पुस्तकांचा गाव उभारण्याची घोषणा केली, हे वाचून तर आम्ही आनंदाने वेडेपिसे झालो. त्याच रात्री आम्ही पुस्तकांच्या गावाचे स्वप्न आम्हास पाडून घेतले. कुठल्याही गोष्टीत विलंब आम्हाला खपत नाही. त्याच दिवशी दुपारी आम्ही 'हे ऑन वे' या ब्रिटनमधल्या पुस्तकांच्या गावाविषयी वाचले होते. तिथं प्रत्यक्षात जाण्याएवढे आम्ही 'हे' नसल्यानं स्वप्नातच जाणे इष्ट होते. शिवाय ते 'हे' 'ऑन द वे'च असल्याचेही कळले होते. तेव्हा जाता जाता तिथे जाणे सहजशक्य होते. स्वप्नात ते भारी गाव पाहिल्यानंतर आता महाराष्ट्रातही तसेच गाव उभे राहणार, या कल्पनेनं जीव फारच आनंदित झाला.
अखेर तो दिवस उजाडला. महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन स्वर्गीय ठिकाणांच्या मधोमध असलेल्या भिलार या गावी पुस्तकांचे गाव उभे राहणार असल्याची मंत्रिमहोदयांची घोषणा आम्ही ऐकली आणि आम्हाला आनंदाने गगन ठेंगणे झाले. महाबळेश्वर हा आमचा सुरुवातीपासून वीक पॉइंट. (आम्ही आमच्या एका मित्राला हे सांगितल्यानंतर तो पहिल्यांदा महाबळेश्वरास गेला, तेव्हा हा पॉइंट शोधत फिरला होता म्हणे. नंतर तो शासकीय कोशात गेला, हे सांगणे न लगे!) महाबळेश्वर म्हणजे मध्यमवर्गीय हनीमूनीयांची काशी! खऱ्या काशीच्या मोक्षाला पोचण्यासाठीचे 'काम' या पर्यटनस्थळापासून सुरू होते. महाबळेश्वर रंभा असेल, तर पाचगणी ऊर्वशी आहे; महाबळेश्वर नरेंद्र असेल, तर पाचगणी देवेंद्र आहे. (आणि भिलार अर्थातच विनोद!) महाबळेश्वर स्वित्झर्लंड असेल, तर पाचगणी माँटे कार्लो आहे. महाबळेश्वर 'हे' असेल तर पाचगणी 'ते' आहे. (आणि भिलार हे ते 'हे ऑन (द) वे' आहे!) असो. अत्यंत आनंदित झालेला आणि काही विशिष्ट पेये प्राशून उंचीवर गेलेला माणूस साधारण असेच बाष्कळ बडबडतो. भिलारला पुस्तकांचे गाव होणार, या कल्पनेनंच आम्हाला एवढा आनंद होत असेल, तर प्रत्यक्ष तिथं गेल्यावर काय होईल या विचारानं आम्ही लगेचच त्या गावाला जायचं टाळलं. पण साहित्यविषयक कर्तव्य अपूर्ण राहिल्याची बोच मनाला लागून राहिली होती.
अखेर तो योग आला. भिलारला पुस्तकांचं गाव सुरू झाल्या झाल्या तेथे जाऊ नये, असे आमचे मत होते. त्यामुळं आम्ही काही दिवस कळ सोसली. पण फार दिवस दम धरवेना. अखेर एके दिवशी आम्ही पुस्तकांच्या गावाकडं निघालो. पुस्तकांच्या गावी गेल्यावर होणारा अतीव आनंद आपल्याला सोसवेल का, अशा शंकेनं आम्ही बीपीच्या गोळ्या जवळ ठेवल्या. वाई फाट्याला 'पुस्तकांच्या गावात स्वागत' वगैरे बोर्ड वाचून मन आनंदाच्या अंतराळात तरंगू लागले. मराठी सारस्वताच्या दरबारातील एक फार मोठी उणीव आता दूर झाली आहे, या कल्पनेनं मन वाईच हरखून गेलं. वाईला गणपतीला नमस्कार करून आणि तिथल्या विश्वकोश कार्यालयाला अन् प्राज्ञपाठशाळेला दुरूनच वंदन करून आम्ही पसरणीचा घाट चढायला सुरुवात केली. मराठी साहित्यविश्वात पसरलेल्या अगणित थोर्थोर साहित्यिकांची याद येऊन आमचे मन हळवे झाले. त्यात महाबळेश्वरच्या बिनअध्यक्षांच्या संमेलनाची आठवण येऊन मन घाबरे झाले. गाभाऱ्यात देव नसताना पुजाऱ्यांनी बडवलेल्या घंटा ऐकू आल्या. अत्रे-फडके वादापासूनचे सगळे वाद-प्रतिवाद आठवले. आणीबाणीतली मुस्कटदाबी आणि त्यानंतरचा 'दुर्गावतार' आठवला. उधळलेली संमेलनं, पडद्याआडची कारस्थानं, मंडपातली उणी-दुणी, साहित्यघाटावरची बेशरम धुणी... सगळं सगळं आठवलं. विद्रोहाची वेगळी चूल आठवली, ग्रामीण हुंकाराची भूल आठवली, स्त्री-साहित्याची वेदना आठवली, बालांसाठीची संवेदना आठवली... केशवसुतांची 'तुतारी' आठवली, कोलटकरांची 'भिजकी वही' आठवली... पाडगावकरांची बोलगाणी आठवली... ढसाळांची XX वाणी आठवली... दया पवारांचं बलुतं आठवलं अन् बोकिलांची 'शाळा'ही मनात हुरहुरती घंटा वाजवून गेली.
या सगळ्या साहित्याला आता कायमचं, हक्काचं छप्पर मिळालंय या जाणिवेनं मन भरून आलं. आमची गाडी पाचगणीतली गर्दी सोडून पुढं निघाली. आम्ही आता एका वेगळ्याच उंचीवर पोचल्याची जाणीव भर्रार वाहणारा वारा कानाला करून देत होता. डाव्या बाजूला टेबललँडचं पठार आणि उजव्या बाजूच्या खोल खोल दऱ्या पाहून आम्ही पुन्हा साहित्यस्मरणरंजनात शिरलो. टेबललँडचं पठार म्हणजे लोकप्रिय कथा-कादंबऱ्याच जणू! टेबललँडच्या पठारावर पर्यटकांची गर्दी असते, तशीच या कथा-कादंबऱ्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी सर्वत्र असते. या कथा-कादंबऱ्या लिहिणारे लेखक अर्थातच लोकप्रिय असतात. त्यांचं जवळपास दैवतीकरण झालेलं असतं. त्या टेबललँडच्या पठारावर माणसं फक्त मजा करायला येतात. तिथं असलेल्या मज्जेच्या साधनांचा कुणी भाव करत बसत नाही. 'मूँह माँगी' किंमत मिळते. तसंच या लोकप्रिय कथा-कादंबऱ्यांचं असतं. दुसरीकडं उजव्या बाजूला असलेल्या खोल खोल दऱ्यांसारखं सखोल अर्थ वगैरे सामावणारं, पण गूढगर्भ साहित्य त्या दऱ्यांइतकंच निर्जन राहतं. त्या अवघड वाटेनं खाली उतरायचं धैर्य फारच कमी जणांकडं असतं. पण या दऱ्यांच्या पाठीवरच पठारं वसलेली असतात, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही.
आम्ही पाचगणीच्या उंचीवर आल्यानं आणि तिथला उंची वारा कानात शिरल्यानं सैराटलो होतो आणि काहीच्या काही विचार मनात येऊ लागले होते, हे एकदम आमच्या लक्षात आलं. आमच्या बौद्धिक वकुबाच्या हिशेबानं हा डोस जास्त झाला होता. अजून तर आख्खं पुस्तकांचं गाव पाहायचं होतं. त्यामुळं आम्ही हे पठारी चिंतन तत्काळ आवरतं घेतलं आणि आजूबाजूच्या मौजेच्या चिजा न्याहाळू लागलो. घटकेत आमची गाडी भिलार फाट्याला आली. डाव्या बाजूला गेलं, की एक-दीड किलोमीटरवर लगेच आमचं पुस्तकांचं गाव येणार होतं. पाचच मिनिटांत आम्ही तिथं पोचलो. वास्तविक इतर चार गावांसारखंच हे गाव दिसत होतं. मग त्याला 'पुस्तकांचं गाव' का म्हणायचं, हा प्रश्न आम्हाला पडला. पण पुढं गेल्यावर लगेच उत्तर मिळालं. रस्त्याच्या दुतर्फा 'कथा', 'स्त्री-साहित्य', 'बाल-साहित्य' अशा पाट्या होत्या. इथल्या लोकांच्या घरातच सरकारनं पुस्तकं वाचायची सोय केली होती. बाहेरून त्या खोलीत जाता यावं, अशी रचना केली होती. पुस्तकांच्या नावाखाली कुणीही कुठल्याही घरात शिरू नये, यासाठी सगळीकडं पाट्या लावल्या होत्या, याचा आम्हाला आनंद झाला. शिवाय पुस्तकं तिथं बसूनच वाचायची होती. पुस्तक वाचत वाचत रस्त्यानं फिरायला परवानगी नव्हती. नाही तर स्त्री-साहित्यवाले आणि पुरुष साहित्यवाले कधी बाल-साहित्याच्या घरात घुसले असते, सांगता आलं नसतं. थोडक्यात, सगळीकडं बसून वाचण्याची नीटच व्यवस्था होती. आम्ही स्वतः सरपंच म्याडमच्या घरात बसून एक कथा व्यवस्थित वाचली. (त्यांच्याकडं 'कथा' विभाग होता.) ती कथा वाचल्यावर कुठं आम्हाला 'पुस्तकांच्या गावी' आल्याचा फील आला.
आता आम्हाला गावची सहल करायचा उत्साह आला. शाळेत गेलो. लहान लहान लेकरं गोष्टींची पुस्तकं घेऊन वाचत बसलेली बघून ऊर भरून आला. समोरच सानेगुरुजींचा फोटो दिसला. आता रडूच फुटणार होतं. तेवढ्यात एका सरांनी हाक मारली आणि आम्ही भानावर आलो. मग मुलांसमोर कथाकथनाचा कार्यक्रम करून झाला. आमच्यापेक्षा मुलांनीच छान गोष्टी वाचल्या, हे सांगायला नकोच. मात्र, 'मुलांमध्ये मूल' इ. होता आल्यानं एक बालिश आनंद झाला. फळ्यावर साहित्यिकांची नावं लिहिली होती. त्यात 'पांडुरंग सदाशिव साने'मधला 'सदाशिव' हा शब्द 'सदाशीव' असा लिहिलेला बघून 'शीव शीव' म्हणावंसं वाटलं. 'केशवसुतां'मधला 'सु' दीर्घ लिहिल्यानं मराठीच्या नाकासमोरच सूत धरायची वेळ येते की काय, असं वाटून गेलं. तिथल्या गुर्जींना कानात योग्य तो संदेश दिला आणि निघालो.
तिथून मग साहित्यप्रकारांतली अन्य दालने बघितली. आमच्यासारखेच काही उत्साही पर्यटक इकडं-तिकडं हिंडत होते. सगळे काही मराठी नव्हते. काही परप्रांतीयही होते. त्यांच्या आवडीची पुस्तकं तिथं नव्हती आणि स्ट्रॉबेरीचा सीझनही संपला होता. त्यामुळं त्यांना भिलभिलारल्यासारखं झालं. आम्ही भिलारे गुरुजींची भेट घ्यायला गेलो, पण ते नव्हते. मग इतर काही दालनं बघून आलो. सगळीकडं बसायला उत्तम व्यवस्था, पुस्तकांच्या भरपूर रॅक आणि नवीकोरी पुस्तकं सरकारनं स्वतः विकत घेऊन इथं आणून ठेवलेली दिसली. नंतर प्रकल्प कार्यालयाला भेट दिली. तिथल्या मंडळींचा उत्साह पाहून बरं वाटलं.
एकूणच भिलारच्या त्या उंचीवर थंडगार वाऱ्यात प्रसन्न वाटत होतं. आपल्या आवडीचं पुस्तक घेऊन, तंगड्या पसरून जगाच्या अंतापर्यंत आपण इथं वाचत बसू शकतो, असं वाटलं. पुस्तकांच्या गावात जाऊन यापेक्षा दुसरं काय वाटायला हवं? ज्यांनी आयुष्यात कधी हाती पुस्तकच धरलं नाही, ते लोक पर्यटक म्हणून आले आणि यानिमित्तानं त्यांना हा गोड छंद जडला, तर त्याहून चांगली गोष्ट काय असेल?
भिलारहून परतताना मन आत्मिक आनंदानं भरून आलं. पुस्तकांच्या गावाचा हा प्रयोग अद्याप बाल्यावस्थेतच असला, तरी त्याला अजून सरकारीपणाची तुसडी किनार नाही, हे बघून बरंच वाटलं. आपल्याकडं कुठल्याही सरकारी प्रयोगाला, यंत्रणेला नावं ठेवायची फॅशन आहे. आम्हाला तरी लगेच तसं काही करावंसं वाटलं नाही. कारण यातून झालं, तर काही तरी चांगलंच होईल; नाही तर सध्या आहे ते आहेच...
घाट उतरताना मन नव्या कोऱ्या पुस्तकांच्या त्या वेडावून टाकणाऱ्या वासात अडकलं होतं... आणि हा खरंच 'विनोद' नव्हता!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जुलै २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

No comments:

Post a Comment