21 Sept 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १७

निरोप 
--------


हाय, हाय! आम्ही आत्ता कुठं लेखकू म्हणून काहीसे प्रस्थापित होत होतो, तोच आमच्या या पेशाची भ्रूणहत्या व्हायची वेळ आली. 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' ही म्हण आपल्याच बाबतीत कधी लागू होईल, याचा आम्ही विचारही केला नव्हता. पण नेमके तेच झाले. आमचे 'ठोंब्या'पण पुनश्च सिद्ध झाले. आमच्या एका निर्णयानंच आमच्यातल्या लेखकाला नख लावलं. आता कुठल्याशा एखाद्या छापखान्यात प्रूफरीडर म्हणून नोकरी धरणं किंवा पीआरचा धंदा टाकणं एवढंच आमच्या हाती उरलं आहे.
लेखक म्हणून आमचा अपमृत्यू कसा झाला, याची ती हृदयद्रावक कहाणी आता सांगितलीच पाहिजे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड हा मराठी सारस्वताचा वार्षिक पोळा, आपलं, मेळा होय. अर्थात 'पोळा' शब्द आमच्या मुखातून चुकून गेला असला, तरी तो अगदीच काही अयोग्य नव्हे. महाराष्ट्रदेशीच्या हृदयसम्राटाने साहित्यिकांस 'बैल' म्हटल्याच्या आठवणींचे जू अजूनही आमच्या मानेवर काचत्ये आहे. शिवाय साहित्यिक असो वा नसो, प्रत्येक संसारी मनुष्य विवाहोत्तर आयुष्यात ओझ्याचा बैलच असतो, या वास्तवाचा कासरा आम्ही कधीच सोडलेला नाही. त्यामुळं आम्ही किंचित लेखकू व्हायच्या आधीच लग्न करून बसल्यानं चांगले क्वालिफाइड 'बैल' झालोच आहोत. तर ते असो. मूळ मुद्दा आमच्यातला लेखक कसा मृत्यू पावला, याचा आहे. तर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आणि आम्ही वयात आलेल्या खोंडाप्रमाणं जागच्या जागी फुरफुरू लागलो. काहीही कारण नसताना आपण ही निवडणूक लढवावी, असा दुष्ट विचार आमच्या मनात झळकला. आमच्या डोईवरची (नसलेली) डौलदार शिंगं आम्ही उगाचच साहित्याच्या हेडक्वार्टराकडं बघत रोखून धरली. आता समोर येईल तो साहित्यिक आडवा करायचा हे एकच स्वप्न आमच्या मनात 'बुल्स आय'प्रमाणं कोरलं गेलं. आम्ही भावनेच्या भरात अर्ज करून बसलो. आता निवडणूक लढवणं अटळ झालं. आमच्या विरोधात बडे बडे साहित्यिक उभे होते. कुणी आयएएस ऑफिसर होते, तर कुणी प्राध्यापक होते. कुणी अनुवादक होते, तर कुणी समीक्षक होते. एक जण तर बरेच वयस्कर होते. ते स्वतःचं वय चार लाख वर्षं वगैरे सांगत होते. त्यांच्या आधार कार्डावरची जन्मतारीख आणि ते सांगत असलेलं वय न जुळल्यानं त्यांचा अर्ज तांत्रिक मुद्द्यावरच बाद होणार, यात आम्हाला काही शंका उरली नव्हती. पण तरी आम्ही बैलबुद्धीनं ही निवडणूक लढवणार नव्हतो. आमची होती नव्हती तेवढी तैलबुद्धी आम्ही पणाला लावली आणि घटक संस्थांमध्ये प्रचार करावयास सुरुवात केली. अनुभव विपरीत आले. 'या बैलाला काय कळतंय?' अशा काही प्रतिक्रिया आम्ही गौरवार्थ घेतल्या, तरी अन्य काही प्रतिक्रिया छापण्याजोग्या नव्हत्या. त्या वाचून छापखान्यानं स्वतःचंच खच्चीकरण करून घेतलं असतं हे नक्की. तर ते असो. आम्ही मतदारांच्या लिस्टा काढून बसलो आणि एकेका मतदाराला देव मानून फोन करावयास सुरुवात केली. त्यातल्या काही लोकांकडं फोन केला असता, संबंधित मतदार काही वर्षांपूर्वीच मयत झाल्याचं समजलं. तरीही साहित्य महामंडळाच्या निवडणूक मतदारयादीत नाव असणं ही विलक्षण प्रतिष्ठेची बाब असल्यानं या मतदारांच्या नातेवाइकांनी त्यांचं नाव त्या यादीतून वगळा, हे सांगण्याचे कष्ट केले नव्हते. एका ठिकाणी फोन केला, तर तो एका ब्यूटी पार्लरमध्ये लागला आणि त्यांनी माझ्याकडं हेअरकटची पाच हजार रुपये थकबाकी असल्याचं सांगितलं. हे ऐकून आमचे होते नव्हते तेवढे 'हेअर' जागीच उभे राहिले आणि आम्ही त्वरित फोन 'कट' केला. आणखी एका ठिकाणी फोन केला असता, तो पोलिस अधिकाऱ्यास लागला. घाबरून फोन ठेवू लागलो, तर ते साहेब मिशीतल्या मिशीत हसत (म्हणजे हा एक अंदाज हं...) 'काळजी करू नका, आमचं मत तुम्हालाच,' असं म्हणाले चक्क! म्हणजे ते खरोखर मतदार होते. बरेच फोन केले, पण 'ओरिजिनल' साहित्यिक काही कुणी भेटले नाहीत. एक वकील होते, एक बिल्डर होते आणि एक बँकवाले होते. या प्रकाराचा धसका घेऊन आम्ही फोन करणं सोडलं.
यानंतर हाय-टेक प्रचार करण्याच्या दृष्टीनं आम्ही आमची स्वतःची वेबसाइट लाँच करून टाकली. पण त्या साइटवर काय ठेवावं, ते कळेना. मग वृत्तपत्रांत आम्ही वेळोवेळी पाठविलेल्या 'वाचकांच्या पत्रव्यवहारा'ची व उपनगरीय पुरवण्यांमध्ये (त्यांच्या मजकुराची गरज म्हणून) छापून आलेल्या अत्यंत प्रासंगिक लेखांची कात्रणंच स्कॅन करून अपलोड करून टाकली. एवढ्या 'साहित्या'वर आम्ही संमेलनाध्यक्षपदाची आस धरली होती. हे म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत डिपॉझिट गेलेल्यानं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघण्याइतकंच 'हे' होतं. पण लेखकू म्हणजे कल्पनेच्या जगात रमणारा यक्ष... आम्ही तरी दुसरे कोण होतो? आम्ही निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून जणू संमेलनाध्यक्ष झाल्यासारखेच वागत होतो. प्रत्यक्ष निवडणूक अद्याप व्हायची होती. पण आम्ही चौखूर उधळलो होतो. यानंतर आम्ही घटक संस्थांच्या मुख्यालयी दौरे काढले. हा प्रवास खर्च झेपणारा नव्हता. त्यासाठी आमच्या हिनं फार कष्टानं करून ठेवलेली एक 'एफडी' मोडावी लागली. पण त्याला इलाज नव्हता. बडोदा ते भोपाळ, गोवा ते हैदराबाद असा आमचा सर्वत्र संचार सुरू झाला. घटक संस्थांचे पदाधिकारी आमच्याशी फारच प्रेमानं वागले. पुण्या-मुंबईच्या प्रकाशकांची ओळख करून द्या, या माफक अटीवर अनेकांनी आमचे पान वाढले. अनेक लोकांनी आपापले कवितासंग्रह आम्हाला भेट म्हणून दिले, तेवढं वगळलं तर बाकी प्रवासात फार त्रास झाला नाही. लेखकांना 'टोल'माफी नाही, हा एक अन्याय लक्षात आला. पण टोलवरच्या माणसानं 'आयकार्ड' दाखवा म्हटलं तर काय दाखवायचं हा एक प्रश्नच आहे. शिवाय अशी टोलमाफी मिळू लागली, तर आपला संपूर्ण देश एका रात्रीत साहित्यिक होईल यात आमच्या मनात शंका नव्हती. त्यामुळं आम्ही या अन्यायाविरुद्ध उठवायचा आवाज मनातच ठेवला आणि पुढल्या संस्थेकडं कूच केलं. अशा पद्धतीनं अनेक मतदारांना भेटी देऊन, घटक संस्थांना भेटी देऊन आपल्या प्रचाराचं बरंच 'कुकूचकू' केल्यानंतर, आता आपला अध्यक्षपदाचा सूर्य उगवायला हरकत नाही, असं आम्हाला वाटून गेलं. तरी अजून बरीच आव्हानं राहिली होती.
साहित्य महामंडळाचं हेडक्वार्टर नागपुरात गेल्यापासून आम्ही नागपूरकर होण्याचा प्रयत्न आरंभिला होता. 'बे'चा पाढा परत पाठ करायला सुरुवात केली होती. 'सावजी'चं वेड नसलं, तरी 'विष्णूजी, विष्णूजी' करायला सुरुवात केली होती. चार-दोन साहित्यिक मित्रांना 'काय बे भैताडा' म्हणून पाठीत गुद्दे घातले होते. पुण्यातल्याच मिठाईच्या दुकानातून संत्रा बर्फी आणून ही कशी नागपूरची अस्सल संत्रा बर्फी आहे, असं सांगून भाव खाल्ला होता. एलकुंचवार व ग्रेस यांचं ९० टक्के साहित्य कळत नसलं, तरी त्यांच्या साहित्यावरच आमचा पिंड कसा बालपणापासून पोसला आहे, हे सांगणाऱ्या काही पोस्ट्स अशाच शेअर करून टाकल्या. वडाभात कशाशी खातात हेही आम्हास ठाऊक नव्हतं, याचं कारण आम्ही भातावर वडापावातला बटाटेवडा कुस्करून घातला आणि तो फोटो 'इन्स्टाग्राम'वर शेअर केला. त्यानंतर आमची यथेच्छ टवाळी उडवण्यात आली. अर्थात अजून आम्हाला महामंडळाच्या अध्यक्षांवर छाप पाडायची होतीच. त्यामुळं आम्ही दाढी वाढवायला सुरुवात केली. काही दिवसांतच आमचा चेहरा सध्याच्या अध्यक्षांसारखा घटकेत करुण, तर घटकेत रागीट दिसू लागला. सरकारच्या निधीचा विषय निघाल्यास करुण आणि सहभागी लेखकांच्या मानधनाचा विषय निघाल्यास रागीट असा त्याचा पोटभेद समजल्यावर मग आम्हाला त्या त्या प्रसंगी तसे चेहरे करणं साधूनच गेलं. तरी त्यांच्या व आमच्या प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग अफजलखान-शिवाजीमहाराज भेटीपेक्षा कमी थरारक नव्हता. (आता या भेटीत शिवाजीमहाराज कोण व अफजलखान कोण, याचा फैसला आम्ही भावी साहित्य इतिहासकारांवर सोपवतो.) तर ते असोच.
एवढे सगळे प्रयत्न करूनही आपण अध्यक्ष होऊच याची काही खात्री नव्हती. प्रशासक उमेदवार जोरात होते, अनुवादक हवेत होते, समीक्षक लाटेवर होते, तर कथाकार तरंगत होते. आम्हीही उभे आहोत, याची कुणाला कल्पनाही नव्हती, याचं आम्हास अधिक दुःख झालं. पण मतदारांच्या 'आतल्या आवाजा'ला आम्ही आर्त अशी साद घातली होती. मराठी सारस्वताचा मेरुमणी निवडणारी हजारेक मेंदूंची क्षमता फारच अचाट होती, याचा आम्हाला काहीसा अंदाज आला होता. आता सर्वस्वी 'त्याच्या' हातात होतं...
... आणि तो दिवस उजाडला. संमेलनाध्यक्षपदी चक्क आम्ही निवडून आलो. एका अल्पस्वल्प बुद्धीच्या 'ठोंब्या' लेखकूचा झालेला हा सन्मान पाहून आमचा आमच्यावरच विश्वास बसेना. पण मुलाखती घ्यायला आलेले चॅनेलचे व वृत्तपत्रांचे पत्रकार पाहून खात्री पटली. कुणी तरी पेढ्यांचा बॉक्स आमच्या हिच्या हाती सोपविला. तिनं सराईतासारखा अर्धा पेढा आमच्या मुखी भरवला. कॅमेऱ्यांचे फ्लॅश लखलखले... मुलाखती झाल्या... आम्हाला आनंदाश्रू आवरेनात. मुलाखतीला आलेल्या पत्रकारांनाही अश्रू आवरेनात. दोघेही एकमेकांना खांदा द्यायला धडपडलो. अखेर मुलाखती संपल्या. अशा मुलाखतींत काय सांगायचे असते ते आम्ही पाठच करून ठेवले होते. त्यानुसार, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार, हा हुकमी लीड आम्ही पत्रकारांना काढून दिला. त्यावर एका चावट पत्रकाराने 'संमेलनाध्यक्षपदाला यापुढील काळात तरी अभिजात दर्जा मिळेल काय?' असा प्रश्न विचारून आमचे पित्त खवळवले. तरी आम्ही आलेपाक तोंडात ठेवून शांतता पाळली. संमेलन होईपर्यंत अशा भोचक पत्रकारांपासून सावध राहावे, एवढी खूणगाठ मनाशी बांधून ठेवली.
आता संमेलन येईपर्यंत नव्या नवऱ्याच्या तोऱ्यात राहायचं... सगळीकडं मुलाखती देत फिरायचं... डोईवर आहेत नाहीत ते सर्व केस काळे करून घ्यायचे (अरे, 'काळे'वरून आठवलं... आत्ताचे अध्यक्ष कुठं भेटले का हो?) असे अनेक कार्यक्रम मनात तयार होत होते. संमेलन संपल्यावर राज्यभर फिरण्यासाठी एक लाखाचा चेक मिळणार आहे, या कल्पनेनंच हुशारी आली. ते पैसे वापरून सगळीकडं फिरायचं, राज्य नुसतं शहाणं करून सोडायचं असा संकल्प आम्ही लगेचच संकष्टीचा मुहूर्त धरून करून टाकला. (संकष्टीवरून आठवलं, बरेच दिवस अष्टविनायक यात्रा करायची राहिली आहे. येत्या वर्षात जमून जाईल...!)
अशी सगळी मज्जा मज्जा सुरू असताना अचानक आपल्याला अध्यक्षांचं भाषण लिहायचंय हे लक्षात आलं. आमची एकदम घाबरगुंडी उडाली. आम्हाला काही अध्यक्षांचं भाषण लिहिता येत नव्हतं. आता काय करावं? मग गेलो प्रशासक उमेदवारांकडं... ते पडले असले, तरी मनानं चांगले होते. त्यांच्या कानावर अडचण घातली. ते म्हणाले, हात्तिच्या! एवढंच ना... मी लिहितो की तुमचं भाषण... त्यांनी तातडीनं एका स्टेनो बोलवून त्याला भाषण डिक्टेट करायला सुरुवात केली...
आम्ही आयतं भाषण घेऊन घरी आलो आणि येताना लक्षात आलं, की अरेच्चा, आपल्यातला लेखक मरण पावला आज... हळहळ वाटली... खिशाला लावलेलं पेन नदीवर तर्पण करून आलो....
आणि मग एकदम साक्षात्कार झाला, अरे, ये तो होना ही था! आपण संमेलनाध्यक्ष नाही का झालो? मग आपण आता सामान्य लेखकू कसे राहणार? हे लक्षात आलं आणि आम्ही हुश्श केलं... आमच्यातला 'ठोंब्या' आता हुशार झाला होता... मग लगेच आम्ही आमच्यातल्या लेखकाला 'निरोप' दिला आणि पीआर म्हणून नव्या संमेलनस्थळी कूच केलं...

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जानेवारी २०१८)

---

(समाप्त)

---

No comments:

Post a Comment