21 Sept 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग १२

पत्तनीय अन् उत्तरीय...
---------------------------

मे महिन्याच्या ऐन उकाड्यात आम्ही प्रतिभासाधनेचा यत्न करीत आहोत. वास्तविक आमरस-पुरी खाऊन, एसी २० वर ठेवून किंवा पंखा पाचवर ठेवून गारेगार झोपायचे हे दिवस! परंतु आम्ही स्वतःस 'आम' लेखक समजत नसल्यानं आमचं काही तरी वेगळंच सुरू असतं. मागल्या महिन्यात लेख 'बनविण्या'च्या संकटातून आमची सुटका झाली खरी; तोवर हे प्रमाण आणि बोलीचं भांडण समोर येऊन ठाकलं. आमच्यासारख्या लेखकूची जी काही उरलीसुरली प्रतिभा आहे, ती या भांडणात मातीमोल होईल आणि वाचकांना अस्सल मातीतला लेख वाचायला मिळेल, अशा आशेनं आम्ही याही विषयाला हात घातला. 'हात घालीन तिथं माती' हा आमचा लौकिक असल्यानं प्रमाण आणि बोलीच्या भांडणात आपली स्वतःचीच माती होणार, याविषयी आमची पूर्ण खातरी झाली होती. तरी लेखकू म्हणून अंगी आडमाप उत्साह असल्यानं आम्ही या दोन्ही बोल्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली.
वास्तविक प्रमाण मराठीला 'बोली' म्हणणं हा तिचा अपमान आहे. हे म्हणजे पुण्याला पिंपळवंडी बुद्रुक म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे महावस्त्राला गमछा म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे आमरसाला गुळवणी म्हणण्यापैकी आहे. हे म्हणजे... (जाऊ द्या. उपम्यातच लेख संपायचा!) तर सांगायचा मुद्दा हा, की प्रमाण मराठी हे एक वेगळेच प्रकर्ण असून, ऋषीच्या कुळाप्रमाणे व नदीच्या मुळाप्रमाणे त्याचे कूळ व मूळ सापडणे कठीण होय. तरीदेखील 'तैत्तरीय उपनिषदा'प्रमाणे एक 'पत्तनीय उपनिषद' मुठेच्या तीरी उत्खननाअंती सापडल्याची चर्चा इतिहास संशोधक मंडळात दुपारच्या चहाच्या वेळी सुरू असल्याचे अस्मादिकांच्या कानी आले आहे. इतिहास संशोधक मंडळात दुपारी चहा मिळतो, या (तुलनेनं दुय्यम अशा) गोष्टीकडंच सर्वांचं लक्ष गेल्यानं ही अफवा असावी, अशी खातरी वाटून मंडळींनी संबंधित संशोधनाकडं दुर्लक्ष केलं. वास्तविक 'पत्तनीय' या नावातच हे उपनिषद पुण्यपत्तनाचे असावे, हे स्पष्ट होते. त्यातील 'पत्तनीय' या शब्दाविषयी इतिहास संशोधक मंडळातल्या विवाहित आणि अविवाहित मेंबरांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाल्याचे कळले. 'पत्तनीय' हा शब्द 'पत्नीय' या शब्दाचा अपभ्रंश असावा, यावर विवाहित मंडळी ठाम होती; तर विवाह झाल्यानंतर विवाहित मंडळी स्वतःच 'पत्तनीय' होत असल्यानं ती उपनिषदच काय, पण चार ओळींचा श्लोकदेखील लिहिण्याच्या योग्यतेची उरत नाहीत, असा अविवाहित मंडळींचा दावा होता, म्हणे. या दाव्या-प्रतिदाव्यांमध्ये दुपारच्या चहापासून ते संध्याकाळच्या वड्यापर्यंत वेळ गेला. अखेर या विषयाचा निर्णय घेण्यासाठी एक द्विसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झाला आणि मंडळाची सभा संपली, असे समजले. पूर्वी वाचनालयात चोरून प्रौढांची मासिके वाचण्याचा छंद आम्ही जोपासला असल्यानं मंडळात सायंसमयी गुपचूप प्रवेश करणे आम्हास कठीण गेले नाही. आम्ही 'पत्तनीय उपनिषद' अलगद उलगडून चाळण्यास सुरुवात केली. चारशे भूर्जपत्राच्या त्या ग्रंथावर सुरुवातीलाच एवढ्या सूचना आणि उपसूचना होत्या, की हा ग्रंथ पुण्यनगरीतील प्रमाण मराठीतला आद्य ग्रंथ असावा, याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका उरली नाही. 'आपण ज्या पानांवर हा ग्रंथ वाचता आहात, ते भूर्जपत्र आहे, केळीचे पान नव्हे; सबब अन्नग्रहण करताना ग्रंथ पाहून त्याची वाट लावू नये,' ही पहिलीच सूचना वाचून तर ग्रंथाची जन्मदात्री पेठ कोणती असावी, हेही आम्हास कळून चुकले. मंडळाच्या परिसरातच या प्रमाणग्रंथाचा जन्म झाला असावा, हे ताडून आम्ही तातडीनं एक नीलफलक बनवायची ऑर्डर देऊन टाकण्याचा निर्धार मनातल्या मनात करून टाकला. अर्थात एवढ्या सूचना ज्या अर्थी आहेत, त्या अर्थी हे 'पत्नीय उपनिषद'ही असूच शकते, या विचारानं पुन्हा मनात शंकासुराने थैमान घातले. जसजसा ग्रंथ वाचीत गेलो, तसतसे हे 'पत्नीय' आणि 'पत्तनीय' असे दोन्ही उपनिषदांचे प्याकेज असल्याचे आमच्या ध्यानात आले. हे एवढे जीवघेणे मिश्रण सहन न झाल्यानेच तत्कालीन वाचकांनी हा ग्रंथराज प्रकाशित होण्यापूर्वीच मुठेच्या तीरी पुरला असावा, यात आता कोणतीही शंका राहिली नाही. घरोघरी (आपापल्या) धर्मपत्नींच्या मुखात असते, तीच 'प्रमाण मराठी' असा उलगडा आम्हाला अखेर झाला आणि ब्रह्मज्ञान झाल्याप्रमाणे आमच्यामागे झगमगीत वर्तुळ चमकू लागले. जिचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द अन् प्रत्येक अक्षर आपल्याला प्रमाण मानावंच लागतं, तिची भाषा ती प्रमाण भाषा! एवढी साधी-सोपी व्याख्या आमच्या जाणत्या पूर्वजांनी कित्येकशे वर्षांपूर्वी करून ठेवली होती, अं? आम्ही आदरानं हातच जोडले. तत्कालीन पुणेरी मराठीत तत्कालीन पत्नी आंब्याचा टोप आदळत आपल्या पत्तनीय पतीस म्हणाली असेल, 'ग्रंथ कसले खरडता? आम्रफलाची रसनिष्पत्ती कोण करणार? आमचे श्वशुरश्री? नुसता रस हवा प्राशायला...' त्यानंतर संबंधित पत्तनीय पतिराजांचा साहित्यातलाच नव्हे, तर एकूणच जगण्यातला रस कमी झाला असेल, यात काय नवल! आंब्याच्या दिवसात केळी खायची वेळ यावी, तसे आयुष्य झाले असणार. त्यातूनच या ग्रंथराजाला मुठेकाठी मोक्ष मिळाला असणार... नक्कीच!
पत्तनीय उपनिषदांतील काही कलमे खरोखर भयावह होती. तत्कालीन पत्नीसत्ताक पद्धतीचा प्रत्यय त्यातून येत होता. पतीने स्वयंपाक करावा, भांडी घासावीत, (गृहस्थ)आश्रमाची झाडलोट करावी, केरवारे करावे, एवढेच नव्हे, तर सायंकाळी तिला मोगऱ्याचा गजरा आणून देऊन तिची वेणी घालावी आदी नियम वाचून आम्ही जागीच पत्तनस्थ व्हायची वेळ आली. एका अर्थाने ही केवळ श्रवण करायची भाषा होती. बोलणारी केवळ पुण्यपत्तनस्थ पेठीय पत्नीच होती. मेरा वचन ही है मेरा शासन! बरोब्बर!! या भाषेचे हे उगमस्थान समजल्यानंतर अनेक कोड्यांचा एकदम उलगडा झाला... पत्तनीय उपनिषदाने फार मोठे काम केले होते.
आता मुद्दा बोलीचा होता. बोली भाषा ही मुळात बोलीच असल्यानं त्यात कुणी ग्रंथ लिहिला असण्याची शक्यता फारच धूसर होती. त्यातही मरहट्ट देशी बोलींचे अनेक प्रकार. खान्देशी बोली, वऱ्हाडी बोली, दखनी, कोकणी, आगरी, मराठवाडी अशा किती तरी... मग वाटलं, या प्रत्येक बोलीत तेव्हा कसं बोलत असतील? आणि काय आश्चर्य...! 'पत्तनीय उपनिषदा'च्या शेवटच्या पानावर आम्हाला एक खूण सापडली. तोंडावर पट्टी बांधलेला एक स्मायली असतो ना, तशी ती खूण दिसत होती. आम्ही हल्लीच काही रहस्यकथा वाचलेल्या असल्यानं हा 'क्लू' पकडून आम्ही एवढ्या रात्री त्वरेनं मुठेकाठी धाव घेतली. (रहस्यकथा वाचल्यानंतर काही काळ रात्री एकट्यानं गाव बोकाळणं अपरिहार्य असतं...) तिथं गेल्यावर आधी कॉफीपान करणे मस्ट असते. ते केले आणि मग सावकाशीनं 'क्लू'ची जागा शोधू लागलो. फार वेळ लागला नाही. 'पत्तनीय उपनिषद' सापडले होते, त्याच्याशेजारीच आम्हाला हा दुसरा ग्रंथ मिळाला - 'उत्तरीय उपनिषद'! उत्तरीय उपनिषदात तरी बोलीची उत्तरं मिळतील, अशी आशा होती. हा ग्रंथ अगदीच चिमखडा होता. अवघ्या ६०-७० पानांचा... आम्ही तो सहजीच बगलेत मारून मंडळात नेला. तेथील कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात (इतिहास संशोधन हे असेच करावे लागते. त्यामुळं आम्ही तेथील लाइटी घालवून कंदील पेटविला...) आम्ही 'उत्तरीय' तपासणी करू लागलो. इथं सूचना वगैरे काही नव्हत्या. थेट मजकूर होता. लेखकाच्या नावाच्या जागी 'पत्तनीय' एवढेच लिहिले होते. पुढं तत्कालीन च्यायला, मायला आदी शब्दांनी सुरुवात होती. नंतर 'भ'ची बाराखडी सुरू झाली. पुढं पुढं एवंगुणविशिष्ट मातृकुलाचा उद्धार करण्यात आला होता. तत्कालीन मराठी भाषा चांगलीच जोरकस होती, असे आमच्या लक्षात आले. तेव्हाच्या लोकांनी केवळ शिव्या देऊन एखाद्या सैन्याचा पाडाव केला, असे एखाद्या शुभ्रदाढीधारी संशोधकाने आत्ता आम्हाला सांगितले असते, तरी आम्ही त्यावर सहजी विश्वास ठेवला असता.

नंतर नंतर तर त्या ग्रंथात केवळ हो - हो, बरं, ठीक आहे, चालेल, अच्छा... जसं तू म्हणशील तसं, तुझी मर्जी एवढ्याच अर्थाचे तत्कालीन शब्द (ते शब्द इथं लिहिणं कठीण आहे...) दिसू लागले. आम्हाला कळेचना, हे असं का आहे ते? शेजारीच पडलेल्या 'पत्तनीय उपनिषदा'ची भूर्जपत्रं तेवढ्यात फडफडली. त्या आवाजानं दोन कबुतरं उडाली आणि दोन दिशांना पांगली. आम्ही एकदा 'पत्तनीय'कडं, तर एकदा 'उत्तरीय'कडं बघू लागलो. एव्हाना 'उत्तरीय'चं उत्तरीय घसरून आम्हाला आतल्या नग्न सत्याचं दर्शन घडलंच होतं. पण आता 'पत्तनीय'ची पानंही काही सांगू पाहत होती. आम्ही एकदा डावीकडं, तर एकदा उजवीकडं पाहू लागलो. आणि अचानक साक्षात्कार झाला. डोक्यात पूर्णच प्रकाश पडला. कंदिलाची वात मोठी झाली आणि आमचा चेहरा उजळला. 'पत्तनीय'मध्ये लिहिलेल्या आदेशवजा सूचनांचे पालन केल्याची माहिती तेवढी फक्त 'उत्तरीय'मध्ये दिली होती. याचा अर्थ हा ग्रंथ तत्कालीन 'पतीं'नी लिहिला होता... डावीकडे प्रश्न, उजवीकडं उत्तरं... खाली मान घालून दिलेली! सुरुवातीला कोड लँग्वेजमध्ये लिहिलेली अक्षरं म्हणजे शिव्या होत्या. त्या पत्नी विभागाला कळू नयेत, म्हणून खास वेगळ्या भाषेत लिहिल्या होत्या. पत्नीच्या आज्ञेसमोर आपलं काही चालत नसल्याची हताशा त्यातून जाणवत होती. भाषा आणि संताप जोरकस असला, तरी त्यातून करुणेचा एक झरा झुळूझुळू वाहत होता. आम्हाला 'उत्तरीया'ची दया आली. जी बोलू दिली जात नाही ती बोली! अच्छा, अशी भानगड आहे तर! तत्क्षणी तत्कालीन बोलीचा अभ्यास करण्याची आमची इच्छाच मरून गेली.
गेल्या कित्येक शतकांपासून सुरू आहे हे भांडण... फक्त तिचं ऐकायचं... आपण काही बोलायचं नाही. तिनं आदेश द्यायचा आणि आपण ऐकायचं. हेच सुरू आहे! ती आपली पत्नी आहे हे मान्य; पण एवढा धाक असतो का कुठं? पत्तनीय पतीला बोलूच द्यायचं नाही? हा हन्त हन्त... केवढी ही खन्त!
प्रमाण आणि बोलीचं लग्न लावून ज्या सोयऱ्यांनी दोघांच्याही आयुष्याची वाट लावली, त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. आधी दोघंही किती सुखात होते. ती तिच्या प्रमाणात, मापात बोलत होती आणि तोही मुक्तछंदात तिच्यावर शब्दफुलं उधळत होता. ती नाजूक, प्रमाणबद्ध होती, तर तो मजबूत अन् रांगडा होता. ती त्याच्यावर अनुरक्त होती, तर तोही तिच्यावर लट्टू होता. ती महालातली राणी होती, तर तो माळरानाचा राजा होता. ती हळवी होती, तो कठोर होता. दोघांचीही जोडी छान होती. एकमेकांना शोभत होते. ते एकमेकांना पूरक आहेत हे ओळखून आमच्या पूर्वसूरींनी त्यांना वेळप्रसंगी 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू दिलं; पण लग्न टाळलं. आता मात्र गोंधळ झाला. दोघांचंही लग्न लावण्याचा दुर्बोध हट्ट काही मंडळींनी धरला आणि पाट लावला. पाट लावला अन् तिथंच वाटही लागलीच! फार पूर्वीच्या काळी पुनवडी गावाच्या काठी असंच घडलं होतं आणि त्यातून 'पत्तनीय' आणि 'उत्तरीय'चा जन्म झाला होता.
आताही पुण्यनगरीच्या काठी, फेबु अन् व्हॉट्सअपच्या बांधावर हाच वेडा खेळ पुनश्च काही दुर्बोध मंडळी करीत आहेत, असं समजलं. अरेरे... काय हा वेडेपणा! या राक्षसविवाहातून ना तिला सुख, ना त्याला मज्जा! त्यातून जन्माला येणार फक्त विषम संकर, नकोशी संतती!
'नको, नको... नगं नगं, नकोय हे,  न्हाय पायजेल... सोडा मला... वंगाळ हाय हे...' आम्ही प्रमाण अन् बोलीत मिक्स किंचाळू लागलो. एकदम जाग आली. आम्ही घरातच होतो.
निद्रोपनिषद संपले होते... प्रमाण आयुष्य सुरू जाहले होते... पर ते बी 'बोली'वाणी लई झ्याक व्हतं...!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जून २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

No comments:

Post a Comment