साभार परत...
-----------------
यंदा दिवाळी कधी आली अन् झटकन गेली, ते कळलंच नाही. वास्तविक ऑक्टोबर हा दिवाळीचा महिनाच नव्हे. नोव्हेंबर हा दिवाळीचा खरा मानकरी. या काळात पुण्यनगरीत जी थंडी पडते ना, त्या थंडीचे कोंदण दिवाळीला हवे. अर्थात ऋतुबदलाचा कुठलाही परिणाम आम्ही स्वतःवर होऊ देत नाही. आम्ही खुद्द किंचित लेखकू असल्यानं दिवाळी अंकांत लिहिणं हे आम्ही साहित्याप्रती आमचं कर्तव्यच समजतो. मराठी वाचकांना लाडू, चकली, करंज्या, कडबोळी, अनारसे, शंकरपाळी या फराळासोबतच कथा, कविता, लघुकथा, लघुकविता, व्यक्तिचित्रे, व्यंगचित्रे यांचाही फराळ लागतो, हे साहित्यिक सत्य आहे. सांप्रतकाळी 'आम्ही दिवाळी अंक वाचत नाही' असं म्हणायची एक फॅशन आली आहे म्हणे. हे म्हणजे 'आम्ही गोड खात नाही,' असं म्हणण्यासारखंच फॅशनेबल झालं. पण वास्तविक खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहिती असतं. ज्या कुणाला दिवाळी अंक वाचावेसे वाटत नाहीत, त्यांच्या कथा वा कविता नक्कीच दिवाळी अंकांच्या संपादकांकडून परत आल्या असाव्यात. 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' या न्यायानं त्यांना मग अन्य कुणाचं लिखाण वाचावंसं वाटत नसेल. पण आम्ही उदार अंतःकरणाचे इसम असल्यानं त्यांना समजून घेऊ शकतो. याचं कारण आम्हीही एके काळी हे दुःख सोसलं आहे. 'फाशी' किंवा 'जन्मठेप' या शब्दांपेक्षा अधिक धसका आम्ही 'साभार परत' या शब्दांचा घेतला होता. हल्ली मेलवर मजकूर पाठवतात. आपली मेल उघडलीच न गेल्याचा अनुभव आम्ही कित्येकदा घेतला आहे. काही विविक्षित संपादकांना व्हॉट्सअपवर पाठवलेल्या मेसेजवर 'सीन'च्या दोन निळ्या दांड्या पाहूनही संबंधित संपादकांनी उत्तर न दिल्यानं काही वेगळं 'सिन' करण्याचे विचारही मनात येऊन गेले आहेत. आमच्या परत आलेल्या एकेक लेखावर आणि कवितेवर स्वतंत्र लेख होऊ शकेल. तोही कुणी छापेल असं वाटत नाही. तर ते असोच.
हळूहळू तो दुष्काळ सरला आणि आमचंही साहित्य वेगवेगळ्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध होऊ लागलं. ते अर्थात यथातथाच असावं. पण वाढत्या दिवाळी अंकांना लागणारा वाढता मजकूर ते तरी कुठून आणणार? तिथं आमच्यासारख्यांनी अनाहूत पाठवलेलं साहित्य उपयोगी पडत असणार. (असं काही साहित्य वाचून तर 'आम्ही दिवाळी अंक वाचत नाही' असं म्हणण्याची फॅशन रूढ झाली नसेल ना!) पण काही का असेना, आम्ही दिवाळी अंकांतून झळकू लागलो, तसे अभिजात लेखकाचे एक तेज आमच्या चेहऱ्यावर अवतरू लागले. आम्ही काही नामांकित अभिजात लेखकांचे फोटो पाहू गेलो असता, भ्रमनिरास जाहला. उसाच्या रसाऐवजी एरंडाचा रस प्यावा लागला, तर साधारण जसा चेहरा होईल, तशा चेहऱ्यांना पाहून आम्ही अभिजात बेहोश झालो. त्यानंतर आमच्या चेहऱ्यावर आलेले तेज हे तेज वगैरे काही नसून, दिवाळीत फराळाच्या नावाखाली केलेल्या वाट्टेल त्या खादाडीचा पुरावा मिरवणारी सूज आहे, हे लक्षात आलं. आणखी एक भ्रमनिरास! काही नामवंत दिवाळी अंक विकत घेतल्यानंतर हल्ली जो होतो तोच!!
आम्ही दिवाळी अंकाचे लेखकू म्हणून मिरवू लागल्यावर स्वाभाविकच अन्यांचे लेख वाचणे हा प्रकार बंदच झाला. आम्ही आमचाच लेख तिन्ही-त्रिकाळ मुखासमोर बघून आनंदी होऊ लागलो. आपणच लिहिलेला लेख पुनःपुन्हा वाचून आम्ही मनोमन खूश होऊन गेलो. आपल्या अवतीभवती चाहत्यांचा, विशेषतः तरुण मुलींचा गराडा पडला असून, आपण त्यांना स्वाक्षऱ्या देत आहोत, असलं काहीबाही स्वप्न दिवसाढवळ्या आमच्या डोळ्यांसमोर तरळू लागलं. 'दिवाळी अंकाच्या लेखकानं एवढं फुटेज खायचं नसतं,' या आमच्या एका नतद्रष्ट मित्राच्या सल्ल्यानंतर आम्ही भानावर आलो. आमच्या पैशानं रविवारी सकाळी फुकटची मिसळ चापून आम्हालाच वर उपदेशामृत पाजणाऱ्या या मित्राचं काय करावं, हे आम्हाला कळलेलं नाही. त्याला एखाद्या पडेल दिवाळी अंकाच्या जाहिरातींची बिलं गोळा करायला पाठवावं, असा दुष्ट विचार कैकदा मनात येतो. पण आम्ही उदार अंतःकरणाचे असल्यानं दर वेळी तो सुटतो.
आम्ही लेखकू झाल्यानंतर लोक आम्हाला इतर दिवाळी अंकांविषयी प्रतिक्रिया विचारू लागले. त्यावर अंक न वाचताही मत व्यक्त करण्याचं एक हुकमी कसब आम्ही साधलं आहे. उदा. काही नामांकित दिवाळी अंकांचा कस आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, हे वाक्य टाकायला कुठल्याही अभ्यासाची गरज भासत नाही. एखाद्या दिवाळी अंकात जाहिराती वाढल्या असतील, तर ती असूया मजकुराबाबत कुत्सित कमेंट टाकून व्यक्त करता येते. एखाद्या दिवाळी अंकात गेल्या वर्षीपेक्षा एखादी कथा कमी आली असेल, तर 'चांगले कथाकार मराठीत राहिलेत कुठं?' हे वाक्य अगदी सहज भिरकावता येतं. असं केल्यानं आम्ही खऱ्या अर्थानं लेखकू म्हणून सिद्ध होतो. याशिवाय आपले लेख वा कविता नाकारणाऱ्या संपादकांचा व त्यांच्या अंकाचा यथेच्छ वचपा काढता येतो, ते वेगळंच!
त्यातच हल्ली दिवाळी अंकातले लेख गाजवता येतात म्हणे. सोशल मीडिया वापरण्यात आपण तज्ज्ञ असलं पाहिजे, एवढी एक अट यामागं आहे. मुळात आपला लेख कितीही भारी असला, तरी दिवाळी अंक विकत वगैरे घेऊन फार काही खूप लोक तो वाचणार नसतातच. त्यामुळं तो लेख सोशल मीडियावर टाकून उगाचच एक हवा करायची. असा लेख अर्थातच पूर्ण कधीही प्रकाशित करायचा नसतो. त्या लेखातील उत्तेजक, उन्मादक इ. इ. भागच जाहिरातवजा प्रसिद्ध करायचा असतो. (त्यासाठी अर्थात असा उत्तेजक, उन्मादक, उत्कंठावर्धक भाग मूळ लेखात असावा लागतो, एवढी एक बारीकशी अडचण आहे खरी.) पण हल्ली तेवढं बहुतेक लेखकूंना जमतं. उदा. आपण नव्या काळातले, आधुनिक कथाकार असू, तर स्त्री-पुरुष संबंधांबाबत काहीही लेखन करताना इंग्लिश शब्द वापरावेत. (मुळात आपण आधुनिकोत्तर आधुनिक कथाकार असू तर स्त्री-पुरुष संबंधांबाबतच लिहिणार नाही; कारण ती मागास गोष्ट ठरेल, हा भाग वेगळा!) तरी इंग्लिश शब्द वापरत लेख लिहिण्याची खुमारी काही वेगळीच असते, हे ध्यानात असू द्यावे. 'सीसीडीत एक्स्प्रेसो मागवून टीनानं लॅपटॉप ऑन केला, तेव्हा तिच्या थॉट प्रोसेसशी वेव्हलेंग्थ न जुळल्यानं कबीर डिस्टर्ब झाला... तिच्यासोबतचं नाइटआउट आठवून त्याच्या टेस्टस्टेरॉनची हायपर अॅक्टिव्हिटी सुरू झाली...' वगैरे वाक्यं लिहिली, की वाचणाऱ्याला हायक्लास कथा वाचत असल्याचा फील येतो. 'हा महानगरी संवेदना दाखविणारा लेख असल्यानं वाचक त्याच्याशी सहज रिलेट करू शकतो,' असं एक वाक्य समोरच्याला ऐकवायचं. मग आपल्याला लेखकूसोबत किंचित समीक्षकूही झाल्याचा आनंद होतो.
महानगरी संवेदनांसोबतच हल्ली ग्रामीण संवेदनाही जोरात आहेत. फक्त त्यांना ग्रामीण संवेदना न म्हणता, 'अस्सल मातीतला अनुभव', 'मुळांशी नातं सांगणारी कथा', 'वास्तवाची करपणारी दाहक धरती' वगैरे म्हणावं लागतं. अशा कथांमध्ये किंवा लेखांत आपल्यावर सतत अन्याय होत असल्याची भावना, कटिंग करून आल्यानंतर शर्टातले केस मानेवर टोचतात, तशी सदैव टोचत राहणं 'मस्ट' आहे. अशा कथा वा लेख लिहिताना ग्रामीण जीवनाशी आणि तिथल्या शब्दांशी परिचय असणं गरजेचं आहे. उदा. 'सांजचा वखत होता, चारी अंगानं फुफाटा उठला होता... धुळीच्या लोटात, करपलेल्या बाभळीच्या जोडीला उभं अंग जाळणारं ऊन माळरानावर वस्तीला आलं होतं... तेव्हा शंकरला लांबून येणारी एस्टी दिसली... आता तालुक्याला जाऊन एकडाव बैल इकला, म्हंजी चंद्रीच्या लग्नाचं बघता येईल,' असा मजकूर दिसल्यास किमान पासापुरते तरी मार्क मिळायला हरकत नसते. ग्रामीण कथा लिहिताना त्यात शेतकरी, शेती, बैल वा एसटी यांचा उल्लेख न आल्यास तो 'फाऊल' धरला जातो हे माहिती असावं. अर्थात हेही पुन्हा जुनंच वळण झालं. आधुनिक ग्रामीण कथा पण सोशल मीडियाच्या बाजेवर रेलून मस्त शीळ घालते आहे, हेही लक्षात असू द्यावं. तिथं ग्रामीण शृंगाराचं टेचात वर्णन करता आल्यास पासापुरते मार्क वाढून डिस्टिंक्शन मिळण्याची शक्यता वाढते. 'विहिरीवर शेंदायला आलेल्या वाडीवरच्या शेवंताची उघडी पाठ आबाला अस्वस्थ करीत होती. हातातल्या व्हॉट्सअपवर गावातल्या छपरी पोरांच्या ग्रुपमध्ये आलेला ताजा व्हिडिओ पाहतानाच आबाला शेवंता दिसल्यानं त्याचं मन थाऱ्यावर राहिलं नव्हतं. खाली पाटाच्या पाण्याला वाट गावत नव्हती. आबानं मोबाइल खिशात टाकला अन् हातातल्या फावड्यानं बांध फोडला आणि पाणी वाट फुटल्यागत वाहू लागलं...' असा आधुनिक जीवनाचा स्पर्श असलेली ग्रामीण कथा लिहिता येणं आवश्यक आहे. इथं लेखकाच्या प्रतिभेच्या पाण्यालाही मुक्त वाट फुटल्याचं आपल्याला जाणवेल.
याशिवाय विनोदी आणि गूढकथांना दिवाळी अंकांत मरण नाही. विनोदी कथा लिहिता येणं हे अवघडच. पण अनेक हुकमी लेखक हा हा म्हणता विनोदी कथा लिहितात. त्यातच दुसऱ्याच्या बायकोसोबतची 'फँटसी' हा एक या लोकांचा चिरतरुण विषय आहे. या कल्पनेतल्या वहिन्यांनी कित्येक वर्षं दिवाळी अंकांना उठाव दिला आहे, त्याबद्दल या समस्त विनोदी लेखकूंनी त्यांना (कल्पनेतच) पैठण्या पाठवायला हव्यात, असं आपलं आमचं मत आहे.
गूढकथा हाही तसा अवघड प्रकार. पण हल्ली नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन प्राइम किंवा तत्सम वाहिन्यांवर घरबसल्या अनेक परदेशी मालिका पाहायला मिळतात. त्यातलं एखादं सूत्र धरून एखादा बरा लेखक सहज गूढकथा हाणू शकतो. या गूढकथांचं कथानक कोकणातल्या एखाद्या खेड्यात घडत असेल, तर पुढचा विषय तसा सोपा होतो. मतकरी, दळवी, धारप थोडेफार वाचले, की एक मध्यम आकाराची गूढकथा तयार होते. ती वाचून अंगावर काटा नाही फुलला, तर लेखकाचा काटा काढण्याची सुरसुरी येते. ती मात्र दाबून धरावी!
कविता हा तर फार मोठा विषय. आमच्यासारखा गद्य माणूस तिच्या फार वाटेला जातच नाही. तरीही काही दिवाळी अंकांत नामवंत कवी वर्षानुवर्षं भिकार कविता का लिहीत असावेत, हा गहन प्रश्न मनात येतोच. यांची प्रतिभा दिवाळीआधीच सुट्टीवर जात असावी, असा एक संशय आहे.
आणखी एक शंका. 'आम्ही दिवाळी अंक वाचत नाही,' असं म्हणणाऱ्यांनी या अंकांच्या किमती पाहून तसं म्हटलंय का? कारण काही काही दिवाळी अंकांच्या किमतींनी यंदा खरंच कहर केला. चारशे रुपयांना एक अंक विकला जात आहे, हे पाहून भरून आले अन् गहिवरूनही आले. त्या मानानं मानधनात काहीच वाढ झाली नाही. पण हा सगळा 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' असल्यामुळं कोण बोलणार? मागे एकदा एका संपादकांकडं मानधनाचा विषय काढला असता, त्यांनी आमचे माता-पिता काढले. विषय तिथंच संपला. आमच्या एका होतकरू लेखक मित्रानं एका संपादकांकडं मानधन मागितले असता, संबंधित लेख वाचला म्हणून तुम्हीच आम्हाला मानधन का देऊ नये, असा सवाल करून त्या महाशयांनी आमच्या बिचाऱ्या मित्राची बोबडी वळविली होती. थोडक्यात, लेखक व कवीमंडळींना मिळणारं मानधन हा एक करुण विषय असल्यानं त्याविषयी बोलताना दर वेळी अश्रुपाताचा अनवस्था प्रसंग ओढवतो. त्यामुळं नकोच तो विषय!
बाकी 'साभार परत' साहित्याविषयी न बोलणंच बरं. आम्ही आता त्या कॅटॅगरीतून वर गेलो आहोत. त्यामुळं आता पुन्हा तिकडे पाहणे नाही. 'पुढच्या वर्षी अजिबात दिवाळी अंक वाचणार नाही,' असा घोर निश्चय आम्ही गेल्या वर्षी काही अनाकलनीय कारणांनी केला होता. यंदा आमचेच लेख असलेले काही अंक घरी येऊन पडले अन् आम्हाला साहित्यपाझर फुटला... आम्ही लगालगा बाजारात गेलो अन् गेल्या वर्षीएवढेच अंक विकत घेऊन आलो...
आमचा गेल्या वर्षीचा निश्चय 'साभार परत' करून...!
----
(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, डिसेंबर २०१७)
---
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
---
No comments:
Post a Comment