एक होती राणी...
---------------------
राजघराणे आणि राजसत्ता ही संकल्पना आता आधुनिक काळात फार महत्त्वाची राहिली नसली, तरी राजघराण्याला देव्हाऱ्यात बसवून पारंपरिक भक्तिभावाने त्याचे गुणगान करणारे काही देश जगाच्या पाठीवर अजून शिल्लक आहेत. युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटन हा त्यातलाच एक. या देशाची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. राणीपदावर तब्बल ६९ वर्षे राहण्याचा विक्रम एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदला गेलाय. या राणीविषयी...
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (वय ९६) यांचे गुरुवारी निधन झाल्याने ब्रिटिश साम्राज्याचे राजपद सर्वाधिक काळ भोगलेली व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. एलिझाबेथ यांनी २०१५ मध्येच वयाच्या ८९ व्या वर्षी ब्रिटनची सर्वांत प्रदीर्घ काळ राणी म्हणून हयात असलेली व्यक्ती हा विक्रम नोंदविली होता. त्यानंतर सात वर्षे त्या हयात होत्या. राणी म्हणून पदावर असण्याचा त्यांचा काळ सुमारे ६९ वर्षांहून अधिक होता. यापूर्वी हा विक्रम एलिझाबेथ यांच्या खापरपणजी राणी व्हिक्टोरिया यांच्या नावावर होता. त्या १८३७ ते १९०१ या काळात ब्रिटनच्या राणी होत्या. हा विक्रम राणी एलिझाबेथ यांनी मोडला. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी बालमोराल येथील पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला, तेव्हा काळाचा एक विस्तृत पट पाहणारी एक जिवंत दंतकथा आता इतिहासात जमा झाली आहे.
ब्रिटन ही वास्तविक जगातील सर्वांत जुनी लोकशाही. या देशाने जगाला आधुनिक लोकशाही विचार दिला, शास्त्रशुद्ध आचार-विचारांची बैठक दिली, विज्ञाननिष्ठा, नवे प्रदेश शोधण्याचे साहस, कमालीचे स्वदेशप्रेम, शिस्त आदी गुण दिले याविषयी सर्वसाधारण जगात एकमत असावे. याच वेळी कमालीचे परंपरावादी आणि जुन्या गोष्टी निष्ठेने जतन करणारेही हेच लोक आहेत. त्यामुळे या देशात राजसत्तेचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. राजा किंवा राणी रूढ अर्थाने राज्य करीत नसले, तरी शिक्क्याचे धनी तेच आहेत. ब्रिटनचे लष्कर अजूनही रॉयल आर्मी आहे आणि त्यांचे नौदलही रॉयल नेव्ही. ब्रिटिशांना आपल्या राजघराण्याविषयी कमालीचे प्रेम आहे. शिवाय ही राणी तशी केवळ फक्त ब्रिटनची नाही, तर कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आदी राष्ट्रकुलातील अनेक देश या राणीला आपलीच राणी मानतात. (भारत राष्ट्रकुलात असला, तरी आपण त्या राणीला आपली राणी मानत नाही.) यातले राजकारण बाजूला ठेवून राणी आणि राजघराणे यांच्याविषयी ब्रिटनमध्ये एवढी आत्मीयता का, याचा शोध घेणे औत्सुक्याचे ठरेल.
ब्रिटन काय, किंवा जगभरातील अनेक देश काय, राजा हाच एके काळी सार्वभौम सत्ताधीश असे. राजा गेला, की वंशपरंपरेने त्याचा मुलगा राजा होणार हे ठरलेले असे. रयतेला त्यात वेगळे काही वाटत नसे. भारतातही अगदी अलीकडच्या काळापर्यंत संस्थाने अस्तित्वात होती. या संस्थानांतील लोकांना त्यांच्या तत्कालीन राजांविषयी भरभरून बोलताना आपण आजही ऐकतो. (याला अपवाद आहेतच.) राजघराण्यांविषयी लोकांना असलेल्या या आपुलकीत कुठे तरी त्या संस्थानाकडून मिळणारी सुरक्षितता आणि एका मोठ्या कुटुंबासारखी मिळणारी वागणूक हे प्रमुख घटक असावेत. अगदी ब्रिटनमधील लोकांमध्येही हीच मानसिकता दिसते. राणी एलिझाबेथ यांचे सर्वसामान्य नागरिकांसोबत अनेक फोटो आहेत. बदलत्या काळानुसार बदलणारी ही राणी होती, असे एकूण तिच्या स्वभावावरून वाटते. इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणेच तिनेही आयुष्यात चढ-उतार सोसले, भोगले. त्या त्या वेळी दुःखाला वाट करून दिली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिने राजघराण्याच्या अनेक खटकणाऱ्या परंपरा बदलून काही चांगल्या गोष्टी रूढ केल्या. त्यात १९९२ मध्ये तिने प्राप्तिकर आणि भांडवली नफा कर भरायला सुरुवात केली. याशिवाय तिचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेस आणि विंडसर पॅलेस या वास्तू जनतेला पाहण्यासाठी खुल्या केल्या. त्यातून मिळणाऱ्या पैशांतूनच या वास्तूंची देखभाल करण्यात येऊ लागली. आणखी महत्त्वाचे म्हणजे राजघराण्यातल्या वारसाक्रमातील पुरुषप्रधानता तिने संपुष्टात आणली. यामुळे आता जो कोणी थोरला असेल, मुलगा वा मुलगी, तो राजा किंवा राणी होऊ शकणार आहे. या राणीने लोकांमधले आणि राजघराण्यातले अंतर बऱ्यापैकी कमी केले. तिने वॉकअबाउट नावाचा (आपल्याकडच्या जनता दरबारासारखा) सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याचा कार्यक्रम सुरू केला. शिवाय ही राणी बऱ्यापैकी शांत स्वभावाची आणि सहृदय असल्याचे दिसते. ती फारशा कुठल्या वादात अडकली नाही. शांतपणे आपले जीवन जगत राहिली. मुलगा युवराज चार्ल्स व युवराज्ञी डायना यांचे वादळी वैवाहिक जीवन, घटस्फोट व नंतर डायनाचा मृत्यू या सर्व घटना तिने पाहिल्या, पचवल्या. राजघराण्याला आपले दुःख जाहीरपणे व्यक्त करता येत नाही किंवा आनंदाचेही प्रदर्शन करता येत नाही. त्यांच्या प्रतिष्ठेच्या अवाढव्य कल्पनांसमोर त्यांचे व्यक्तिगत आयुष्य संपूर्णपणे दबून जाते, यात शंका नाही.
एलिझाबेथ राणीचे आयुष्य हा कदाचित एका कादंबरीचा किंवा भव्य चित्रपटाचा सहज विषय होऊ शकतो. अलीकडे ‘नेटफ्लिक्स’वर आलेल्या ‘द क्राउन’ या महामालिकेमुळे राणी आणि एकूणच राजघराण्याविषयी पुन्हा जगभर चर्चा सुरू झाली. यातल्या नायिकेने आता खऱ्या आयुष्यातून एक्झिट घेतली आहे. तिच्या आयुष्यात अनेक भावभावनांचे हिंदोळे आहेत. मुळात ही एलिझाबेथ नावाची तरुणी ब्रिटनची राणी होण्याची शक्यताच नव्हती. कारण ती तिच्या आई-वडिलांचे तिसऱ्या क्रमांकाचे अपत्य होती. राजपुत्र अल्बर्ट, ड्यूक ऑफ यॉर्क आणि त्यांची पत्नी लेडी एलिझाबेथ बॉवेस-लिऑन यांची ही कन्या. मात्र, राजा पाचव्या जॉर्जच्या निधनानंतर एलिझाबेथचे काका एडिवर्ड सातवा राजा झाला. पण अमेरिकी घटस्फोटिता असलेल्या वॅलिस सिम्प्सन हिच्याबरोबर लग्न करायचे म्हणून तो राजगादी सोडून चक्क पळून गेला. (शेवटी प्रेम श्रेष्ठ!) त्यामुळे एलिझाबेथचे वडील राजा झाले (सहावे जॉर्ज) आणि एलिझाबेथ राजगादीची वारस. युवराज्ञीने १९४७ मध्ये फिलीप माउंटबॅटन यांच्याशी विवाह केला. दुसऱ्या महायुद्धानंतरचा तो कठीण काळ होता. युवराज्ञीने स्वतःचा ड्रेस विकत घेण्यासाठी रेशन कुपन वापरल्याची नोंद आहे. (राणीच्या पुढील काळातील साधेपणाचे रहस्य त्या युद्धजन्य परिस्थितीत काढलेल्या दिवसांत असावे.) एलिझाबेथच्या पतीने, फिलीपने, नवे ड्यूक ऑफ एडिंबरा हे पद स्थापन केले व स्वतःला तसे नामाभिधान घेतले. या दाम्पत्याला चार मुले झाली. प्रिन्स चार्ल्स, प्रिन्सेस ॲन, प्रिन्स अँड्र्यू व प्रिन्स एडवर्ड अशी ही चार मुले. एलिझाबेथचे वडील सहावे जॉर्ज यांचे सहा फेब्रुवारी १९५२ रोजी निधन झाले, तेव्हा ती पतीसह केनियाच्या सहलीवर होती. वडील गेले, त्याच क्षणी ती राणी झाली. मात्र, विधिवत राज्यरोहणाचा सोहळा वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये दोन जून १९५३ रोजी झाला. तेव्हा हा समारंभ प्रथमच टीव्हीवरून प्रसारित करण्यात आला होता.
तेव्हापासून आत्तापर्यंत एलिझाबेथ यांनी राजपदावर सुखेनैव राज्य केले. तिचा मुलगा प्रिन्स चार्ल्स आता ७३ वर्षांचा आहे. तो आता ब्रिटनचे राजा होईल. ब्रिटनमध्ये या राजघराण्यात त्यानंतर कित्येक चढ-उतार झाले. एका व्यक्तीच्या आयुष्यात ६९ वर्षांचा काळ हा तसा मोठा काळ आहे. जगातही केवढे बदल झाले या काळात! राणी मात्र आहे तिथेच होती. तिच्या चेहऱ्यावर एक मिश्कील भाव दिसे. एखाद्या प्रेमळ, अनुभवी आजीबाईसारखी ही राणी दिसायची. अगदी परवा ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा प्रसिद्ध झालेला फोटो हा या राणीचा शेवटचा सार्वजनिक फोटो ठरला. आपल्या शांत स्वभावाप्रमाणेच या राणीने अगदी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. ब्रिटिश नागरिकांसह जगभरातील तिच्या चाहत्यांच्या मनात दु:खाचे मळभ दाटले असणार, यात शंका नाही.
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे; ९ सप्टेंबर २०२२)
---