बिऱ्हाड निघालंय लंडनला...
----------------------------------
संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी करावी लागते, असं म्हणतात; तर नोकरदार माणसाच्या परदेश प्रवासाची तयारी हक्काच्या रजेपासून करावी लागते...
...पु. लं.च्या ‘अपूर्वाई’च्या धर्तीवरची अशी सुरुवात लंडनच्या प्रवासवर्णनाची होणं हे लंडनमधल्या सर्व पाट्या इंग्लिशमध्ये असण्याइतकंच स्वाभाविक आहे. याचं कारण म्हणजे मुळात लंडन या शहराची ओळखच मला पु. लं.च्या ‘अपूर्वाई’तून झाली. त्यापूर्वी शाळेत इतिहास किंवा भूगोल शिकताना लंडन शहराचं नाव कानावरून गेलं असेलही. मात्र, त्या शहराविषयी किंवा एकूणच इंग्लंडविषयी कुतूहल निर्माण होण्याचं पहिलं कारण पु. लं.चं हे अप्रतिम प्रवासवर्णनच होतं, यात वाद नाही. लंडनला आपण कधी जाऊ शकू, असं स्वप्नही रंगविण्याची तेव्हा ऐपत नव्हती, तो भाग वेगळा! मात्र, जेव्हा पहिल्यांदा आपण परदेशी प्रवास करू शकू, असा आत्मविश्वास पुढं आला, तेव्हा डोळ्यांसमोर लंडनचंच नाव आलं. आणखी एक कारण म्हणजे प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांचा ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हा धमाल एकपात्री प्रयोग. खूप लहानपणापासून मी या प्रयोगाची कॅसेट ऐकून लक्ष्मणरावांच्या बोलण्याची नक्कल करीत आलो आहे. तेव्हा लंडनचं आकर्षण या प्रयोगानं आणखी वाढवलं हे नक्की.
पुढं वेगवेगळ्या कारणांनी जागतिक घडामोडींची माहिती होत गेली, तेव्हा लंडनचं महत्त्व कळत गेलं. आपलं आणि इंग्रजांचं नातं तसं लव्ह-हेट स्वरूपाचं आहे. आपला इतिहास आपल्याला बदलता येत नाही. लहानपणापासून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास म्हणजे इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा इतिहास असंच माहिती होतं. पुढं अर्थात त्यातलेही वेगवेगळे पैलू समजत गेले. एक मात्र आहे. माझ्या पिढीचा जन्म स्वातंत्र्यानंतर जवळपास २८ वर्षांनी झालेला असल्यामुळं आमच्या मनावर इंग्रजी राजवटीचं कुठलंही ओझं नाही. कसलंही ‘बॅगेज’ नाही. आपल्याकडे जुन्या पिढीतले अनेक लोक इंग्रजांचा उल्लेख ‘साहेब’ किंवा इंग्लंडचा उल्लेख ‘साहेबाच्या देशात’ असा करतात. मी किंवा माझ्या पिढीत कुणी असा उल्लेख करताना फार दिसत नाही. आमच्यासाठी इंग्लंड हा इतर देशांसारखाच एक देश आणि लंडन हे जगातील इतर शहरांसारखंच एक शहर.
असं असलं, तरी आपल्याला लंडनचं तीव्र आकर्षण वाटतं हे माझ्या लक्षात आलं. त्यात जशी अबोध मनातील ऐतिहासिक कारणांची जाणीव असू शकते, तसंच सध्याच्या काळातील त्या शहराचं आंतरराष्ट्रीय महत्त्व, तेथील विविध आकर्षणं, शेक्सपीअरपासून ते जॉर्ज बर्नार्ड शॉपर्यंत अनेक नाटककार-लेखक-कवी, ब्रिटिशांचं डॉक्युमेंटेशन किंवा सगळं जपून ठेवायची वृत्ती या सगळ्यांचा समावेश करता येईल. तिथली एकूण शिस्त हाही एक कुतूहलाचा भाग. त्यातच अलीकडं ‘नेटफ्लिक्स’वर ‘द क्राउन’ ही भव्य वेबसीरीज पाहिल्यावर तर तेथील राजघराण्याच्या आकर्षणाचीही भर त्यात पडली. हे सगळं बघता, लंडनला कधी तरी जायला मिळावं, असं फार वाटत होतं.
माझा मेव्हणा म्हणजे धनश्रीचा धाकटा चुलतभाऊ डॉ. हर्षवर्धन व त्याची पत्नी अनुजा हे दोघं गेल्या काही वर्षांपासून लंडनमध्ये राहतात. ते आम्हाला अनेकदा तिकडं बोलावत होते. नीलची दहावी झाल्यावर आम्ही एका ट्रॅव्हल कंपनीतर्फे लंडन व पॅरिसची ट्रिप बुकही केली होती. मात्र, २०२० च्या एप्रिलमध्ये निघणारी ती ट्रिप कोव्हिडमुळे निघालीच नाही. अत्यंत उत्साहात असलेल्या आमचा तेव्हा चांगलाच मूड गेला. अर्थात नंतर लॉकडाउन व कोव्हिडमुळं पुढची अडीच-तीन वर्षं कशी गेली ते कळलंही नाही. यंदा मात्र पुन्हा एकदा चुलतसासरे राजीव जतकर (यांचा उल्लेख आता यापुढे ‘राजूकाका’ असा करीन) यांनी, ‘आम्ही हर्षवर्धनकडे या जुलै-ऑगस्टमध्ये चाललो आहोत, आम्ही तिथं असतानाच तुम्ही पण या,’ असं पुन्हा एकदा आग्रहानं सांगितलं. मग आम्ही दोघांनीही हे जरा मनावर घेतलं आणि अखेर एकदाची ही ट्रिप ठरवली. आमचा तिथं राहण्याचा प्रश्न नव्हता. मात्र, तिघांची विमान प्रवासाची तिकिटं, व्हिसा आदी खर्चही बराच होता. शिवाय पौंडाचं वाढतं वजन बघता, लंडनमध्येही फिरण्यासाठी-खाण्यासाठी बराच खर्च येणार हे उघड दिसत होतं. मात्र, आम्ही अखेर हिय्या केला आणि दोन महिन्यांपूर्वी एकदाची तिकिटं काढली. मग व्हिसा आला. ‘यूके’चा व्हिसा मिळणं तसं बऱ्यापैकी अवघड असतं. मात्र, आम्हाला २०२० मध्ये मिळाला होता, म्हणून याही वेळी नक्की मिळेल, याची खात्री होती. मग १६ ऑगस्टला जायचं आणि २४ ऑगस्टला तिथून निघायचं असं ठरवलं. ऑफिसमध्ये सांगून झालं. रजा, सुट्ट्यांचं नियोजन झालं. नील आमच्यासोबत येणार हे नक्की होतं. तोही अतिशय उत्साहात होता.
प्रवास नियोजन करणाऱ्या एका प्रसिद्ध वेबसाइटवर जाऊन मी रोज मुंबई-लंडन तिकिटं पाहायचो. अखेर एके दिवशी जाताना ‘इजिप्त एअर’चं कैरोला हॉल्ट असलेलं आणि येताना ‘एअर इंडिया’चं लंडन-मुंबई असं थेट अशी तिकिटं बुक केली. मला एकदम आठवलं, की पु. ल. ही तेव्हा कैरो मार्गेच लंडनला गेले होते. सुएझ कालव्याचं वगैरे वर्णन त्यात आहे. मला या योगायोगाचं विलक्षण आश्चर्य वाटलं. निघण्याचा दिवस जसजसा जवळ येत चालला तसतसा आमचा उत्साह शिगेला पोचला. अगदी जवळचे नातेवाइक आणि लंडनला यापूर्वी जाऊन आलेले मित्रमंडळी आणि अर्थातच आमच्या सहलीचे प्रेरणास्थान राजूकाका, अलकाकाकू, हर्ष आणि अनुजा यांच्याशी आम्ही नियमित संपर्कात होतोच. परकीय चलन किती घ्यावं, कॅश किती घ्यावी, ऑयस्टर कार्ड घ्यावं की फॉरेक्स कार्ड बरं पडेल, थंडीचे कपडे किती घ्यावेत, प्रत्येकाची वेगळी छत्री घ्यावी का, बूट कसे असावेत, घरात वेगळ्या चपला असाव्यात का, एकूण किती बॅगा घ्याव्यात अशी सगळी चर्चा आणि सल्ले यांचा ताळमेळ घालून आम्ही पुढील गोष्टी भराभर केल्या.
आमची फ्लाइट १६ तारखेला पहाटे तीन वाजता मुंबईवरून होती. त्यामुळे १५ ऑगस्टच्या दिवशी मुंबईकडे प्रवास करावा लागेल, हे लक्षात आलं. या दिवशी एक्स्प्रेस-वेवर बऱ्यापैकी ट्रॅफिक जॅम असेल, लोणावळ्यात गर्दी असेल, असा विचार करून, दुपारी चार वाजताच कॅब बोलावली. सर्व आवरून, आम्ही अखेर लंडनप्रवासाला सज्ज झालो होतो... कॅब वेळेवर आली आणि विशेष म्हणजे कुठलाही ट्रॅफिक जॅम वगैरे न लागता, आम्ही रात्री साडेआठ वाजताच मुंबईच्या छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर दाखल झालो. हा विमानतळ अतिशय सुंदर व भव्य आहे. एवढ्या लवकर पोचल्यामुळं तिथं आता टाइमपासच करायचा होता. आम्ही वेब चेक-इन केलं होतं. मात्र, तरी तिथं ‘इजिप्त एअर’चं काउंटर सुरू झाल्यावरच बॅगा ‘लगेज चेक-इन’ करता आल्या. तोवर दहा वाजून गेले होते. आम्ही घरूनच खायचं नेलं होतं. त्यामुळं रात्रीचं जेवण लगेच करून घेतलं. मग सिक्युरिटी, इमिग्रेशन वगैरे पार पडून साधारण बाराच्या सुमारास आम्ही आमच्या फ्लाइटच्या गेटवर गेलो. आम्हाला कैरो ते लंडन प्रवासाचे बोर्डिंग पासही इथंच दिले होते. ‘इजिप्त एअर’मधून मी पहिल्यांदाच जात होतो. ही विमान कंपनी ‘स्टार अलायन्स’चा भाग आहे आणि इजिप्तची सरकारी विमान कंपनी आहे. दोन्ही प्रवासांसाठीची एअरक्राफ्ट ‘बोइंग’ची होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांना बहुतांश हीच विमानं वापरली जातात आणि त्यात प्रवासीसंख्याही अर्थातच जास्त असते. तीन-तीन सीटच्या तीन रांगा असतात. आमचे सीट क्रमांक कन्फर्म होते. अडीचच्या सुमारास बोर्डिंग सुरू झाले. मला मुळात हलत्या वाहनात झोप येत नाही. इथं तर लंडन प्रवासाची मोठी उत्सुकता होती. त्यामुळं पहाटेचे तीन-सव्वातीन वाजले तरी मी टेक-ऑफ बघायला लहान मुलाच्या उत्सुकतेने खिडकीशेजारी बसलो होतो. थोड्याच वेळात ते जंबो जेट सुसाट वेगाने रन-वेवर धावायला लागले आणि क्षणार्धात टेक-ऑफ करत अवकाशाच्या अथांग पोकळीकडे झेपावले. दोन सेकंदात मुंबई शहर संपले. झगमगणारा वांद्रे-वरळी सेतू चिमुकला भासू लागला. थोड्याच वेळात विमान ढगांमध्ये शिरले आणि जमीन (इथं समुद्र) दिसणे बंद झाले.
मी यापूर्वी थायलंड व सिंगापूर असे परदेश प्रवास केले होते. मात्र, पश्चिमेकडे, तेही थेट युरोपात - लंडनला - पहिल्यांदाच चाललो होतो. विमान रोरावत आकाशात उंच उंच निघाले होते. साधारण दहा-बारा किलोमीटर उंचीवर जाऊन ते त्याच्या निर्धारित मार्गावर स्थिर झाले. कितीही नाही म्हटले, तरी आता डोळे मिटायला लागले होते. डोळ्यांवर झोप होती आणि डोळ्यांआड लंडनची दृश्ये स्वप्नासारखी सरकू लागली होती. गेले कित्येक दिवस मी ‘यू-ट्यूब’वर लंडन शहर पालथे घातले होते. एअरपोर्टपासून ते तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांपर्यंत, तिथल्या अंडरग्राउंड ट्यूबपासून ते लालचुटुक डबल डेकर बसपर्यंत, बकिंगहॅम पॅलेसपासून ते स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हनपर्यंत... सगळं काही सिनेमासारखं डोळ्यांपुढं तरळत होतं... विमान पुढं पुढं निघालं होतं आणि स्वप्न आणि सत्य यांच्यातलं अंतर कमी कमी होत चाललं होतं...
(क्रमश:)
--------------
मस्त वर्णन ..,👌👌👌🌹परत एकदा वाचण्यासारखे ... पु. लं च्या प्रवासवर्णनाची आठवण झाली👍👍
ReplyDeleteधन्यवाद वीणाताई... तुम्ही नेहमी कौतुक करता!
Deleteमस्त आम्ही पण तुमच्या बरोबर प्रवास करतोय...पण व्हिदाऊट तिकीट! 😊
ReplyDeleteव्वा... व्वा... Welcome on board...
Delete