31 Aug 2023

लंडनवारी - भाग २

ओह... लंडन...!!
-------------------बुधवार, १६ ऑगस्ट २०२३.


...पहाटे सहाच्या सुमारास आमचं विमान कैरोमध्ये उतरलं. मला त्याआधीच जाग आली. खिडकीतून कुठं सुएझ कालवा वगैरे दिसतोय का, हे मी पाहत होतो. मात्र, अतिशय ढगाळ हवा असल्यानं खालचं नीट काहीच दिसत नव्हतं. एक मोठी नदी किंवा नदीसदृश जलाशय दिसला. तीच ‘नाईल’ असावी, अशी मी स्वत:ची समजूत काढून घेतली. थोड्याच वेळात विमान कैरोत उतरलं. इथं आम्हाला विमान बदलायचं होतं. आमचं पुढचं विमान स्थानिक वेळेनुसार, सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी होतं. सकाळच्या वेळी हा ‘ब्रेक’ आला, ते बरंच होतं. इथलं विमानतळही मोठं व सुसज्ज असलं, तरी मुंबईच्या मानानं अगदी कमी गर्दी हे जाणवत होतं. आम्ही निवांत सकाळची आन्हिकं उरकून घेतली. इथं खायला काही मिळेल, अशी आशा नव्हतीच. त्यामुळं घरूनच ठेपले वगैरे घेऊन आलो होतो. ते फार बरं झालं. आम्ही ज्या मजल्यावर होतो, तिथून आणखी वर एक मजला होता आणि तिथं कुठलंसं म्युझियम असल्याची पाटी होती. आम्ही वर गेलो. म्हटलं, थोडा वेळ आहे तर ते संग्रहालय तरी बघू. मात्र, तिथं जाऊन पाहिलं तर तिथं कुणीच नव्हतं. शिवाय एंट्री फी पाच (अमेरिकी) डॉलर होती. इजिप्तचं चलन इजिप्शियन पौंड आहे. मग आम्ही तिकडं न जाता अगदी मोकळ्या अशा त्या मजल्यावर बसून नाश्ता केला. नंतर आम्हाला सकाळी सकाळी चहा किंवा कॉफी असं काही तरी अगदी हवंच होतं. आम्ही पुन्हा खाली आलो. शेजारीच एक कॅफे होता. मात्र, तो महागडा असावा. तिथं एका दुकानात कॉफी विचारली, तर तिथं फक्त टर्किश कॉफी उपलब्ध होती. आमचे भारतीय चेहरे बघून त्या दुकानदारानं आवर्जून, ‘यात दूध नसतं बरं का,’ असं सांगितलं. शिवाय ती कॉफी ८० पौंडाला होती. आमच्याकडे थोडे फार अमेरिकी डॉलर असले तरी ते तिथं खर्च करायची अजिबात इच्छा नव्हती. शिवाय विमानात पुन्हा सगळं मिळणार होतंच. 
मग सरळ खाली येऊन गेटवर जाऊन बसलो. आता लंडनच्या फ्लाइटला गर्दी वाढत होती. कैरो हे आशिया, आफ्रिका आणि युरोप या तिन्ही खंडांच्या मध्यावर असल्यानं तिन्ही दिशांना जाणाऱ्या फ्लाइट्सची इथं गर्दी होती. एरवी जी नावं फक्त नकाशातच बघितली होती, त्या ट्युनिस, रियाध किंवा दोहा आदी ठिकाणी जाणारी विमानं चार्टवर दिसत होती. कैरो शहर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहेच. आपल्याला इथं ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ मिळतो. त्यामुळं आमच्या फ्लाइटला जर १०-१२ तास वेळ असता, तर बाहेर जाऊन पिरॅमिड्स तरी बघता आले असते, असा विचार मनात आला. एकूण आपलं मन हावरट असतंच. थोड्याच वेळात बोर्डिंग सुरू झालं. इथं सिक्युरिटी अगदी दारातच होती. अगदी कमी जागा आणि रांग जास्त! त्यात हे लोक बूट पण काढायला लावत होते. शिवाय माझ्या सॅकमध्ये असलेला डिओडरंट तिथल्या माणसानं फेकून दिला, त्यामुळं माझी आणखीच चिडचिड झाली. मुंबईतल्या सिक्युरिटीत पास झालेला हा डिओ इथं एकदम नापास कसा काय झाला? पण असो. आम्ही आता बोर्डिंगला सज्ज झालो. इथं मात्र विमान अगदी वेळेत उडालं. निदान विमानातून तरी पिरॅमिड्स दिसतात का, हे बघायचा प्रयत्न केला. मात्र, तसं काही घडलं नाही. अगदी थोड्याच वेळात विमानानं एक हलकं डावीकडं वळण घेतलं आणि ते उंच उंच जाऊ लागलं. क्षणार्धात जमीन दिसेनाशी झाली आणि ढग आले. मग समोरच्या स्क्रीनवर मी ‘फ्लाइट पाथ मोड’ लावून ठेवला तो शेवटपर्यंत! 
विमान अगदी काहीच मिनिटांत भूमध्य समुद्रावरून उडायला लागलं. लहानपणी केवळ पुस्तकात वाचलेला, अभ्यासलेला भूगोल एवढ्या वर्षांनी आता नजरेच्या टप्प्यात आला होता. हा समुद्र ओलांडला, की विमान युरोपच्या भूमीत शिरणार होतं. मुंबई ते कैरो हे हवाई अंतर होतं साधारण चार हजार ३४६ किलोमीटर आणि विमानानं हे अंतर साधारण साडेपाच तासांत पार केलं होतं. तेच कैरो ते लंडन हे हवाई अंतर होतं ३५०० किलोमीटर आणि विमानानं हे अंतर कापायला लागणार होते साधारण साडेचार तास! कैरोची वेळ मुंबईपेक्षा अडीच तास मागे, तर लंडनपेक्षा दोन तास पुढे! कैरो विमानतळावर उतरल्यानंतर इंटरनॅशनल रोमिंग सुरू झाल्यावर मोबाइलनं लोकेशन घेऊन, स्वत:ची वेळ लगेच बदलली होती. मात्र, हातातल्या घड्याळातले काटे फिरवून मी स्थानिक वेळ ॲडजस्ट केली होती. (मला स्मार्ट वॉचपेक्षा अजूनही पारंपरिक घड्याळ वापरायला आवडतं!) आता कैरोवरून विमान निघाल्यावर मी लंडनच्या वेळेला घड्याळ जुळवलं. आम्ही लंडनच्या स्थानिक वेळेनुसार, दुपारी दीड वाजता हिथ्रो विमानतळावर उतरणार होतो. आमचं विमान त्याच्या निर्धारित उंचीवर जाऊन स्थिर झाल्यावर थोड्याच वेळात आमचं ‘एशियन हिंदू व्हेज’ जेवण आधी आलं. याची एक गंमत झाली. मी आपल्याकडच्या एका पर्यटनसेवा देणाऱ्या ॲपवरून आमची तिकिटं काढली होती. नंतर ‘इजिप्त एअर’चं ॲप डाउनलोड केलं. त्यात आमची नावं जरा उलटसुलट दिसायला लागली. म्हणून मी आधी त्या ॲपमध्ये ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझा फोन नंबर भारताच्या कोडसह सेव्ह न झाल्यानं ती दुरुस्ती तिथं होईना. मग मी ‘इजिप्त एअर’च्या मुंबई ऑफिसमध्ये फोन करून माझा प्रॉब्लेम सांगितला. तिथल्या माणसानं ‘तुमची नावं बरोबर आहेत,’ असं सांगितलं. मग मी आमच्या ‘व्हेज’ जेवणाबाबत विचारलं. तर त्यानं तुमचं ‘एशियन हिंदू व्हेज’ इथं नोंदलं आहे, असं सांगितलं. आता मी ही माहिती आधी न भरता, ते कसं काय झालं, ते एक ती क्लिओपात्राच जाणे! पण काही का असेना, आमचं जेवण सर्वांत आधी आलं. इजिप्तच्या मंडळींना जेवढं व्हेज देता आलं, तेवढं त्या बिचाऱ्यांनी दिलं. कुठल्याही परिस्थितीत अन्नाला नावं ठेवायची नाहीत, असं आपल्याला शिकवलेलं असतं. मग मी ‘भारतमाता की जय’ असं म्हणून ते जेवण निमूट गिळलं. त्यातली फळं आणि सलाड मात्र छान होतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नंतर चहा आला आणि तो आपल्याकडच्या चहासारखा नीट झाला. त्यामुळं छान वाटलं. 
भूमध्य समुद्रावरून विमान आता युरोपच्या भूमीत शिरलं. हवाही स्वच्छ व्हायला लागली. क्वचितप्रसंगी खालची जमीनही दिसू लागली. इटलीलगतच्या खाडीसारख्या चिंचोळ्या समुद्रातून विमान दीर्घकाळ वायव्येकडं सरकत होतं. हळूहळू इटली, ऑस्ट्रिया, जर्मनीतली शहरं नकाशात दिसू लागली. रोम, नेपल्स, साल्सबर्ग, स्टुटगार्ट, बर्लिन अशी शहरं आमच्या आजूबाजूला होती आणि आम्ही त्या युरोपच्या मुख्य भूमीच्या कित्येक हजार फूट वरून उडत निघालो होतो. आम्ही उजव्या बाजूला बसलो होतो आणि खिडकीतून अचानक ‘आल्प्स’चे बर्फाच्छादित डोंगर दिसू लागले. आपल्या सह्याद्रीसारखीच दूरवर पसरलेली ती डोंगररांग आणि भोवताली चिमुकल्या नद्या आणि हिरवेगार गवताळ प्रदेश... स्वप्नात दिसावीत तशी दृश्यं आता हळूहळू प्रत्यक्ष दिसायला लागली होती. आता लंडन एक हजारहून कमी किलोमीटर दूर राहिलं होतं. आम्ही मुंबईहून सात हजार किलोमीटरहून अधिक प्रवास पूर्ण करणार होतो. त्यातला जवळपास ८५ टक्के अंतर आता आम्ही कापलं होतं. आता विमान बेल्जियमच्या दिशेनं वर सरकू लागलं. युरोप आणि ब्रिटन यात अर्थातच पुन्हा समुद्र आहे. ब्रिटन हे युरोपच्या मुख्य भूमीपासून वेगळं, पण अगदी जवळ असलेलं असं बेट. त्यामुळं सर्वच अर्थांनी ब्रिटननं युरोपपेक्षा आपलं वेगळेपण जपलं आहे. ते अगदी भूगोलातही कायम आहे. (म्हणून तर ‘ब्रेक्झिट’ घडलं...) बेल्जियमकडून विमान किंचित दक्षिणेला वळून आता वेगाने ब्रिटिश भूमीकडं कूच करू लागलं. अंतर आता अगदीच कमी राहिल्यानं विमानाचं ‘डिसेंडिंग’ही सुरू झालं. क्षणार्धात ती खाडी संपली आणि एकदम ब्रिटनची किनारपट्टी नजरेस आली. मनानं एकदम ‘अहाहा...’ केलं. ‘ओह... लंडन!’ असे उद्गारही मनानं काढले असावेत. (नसतील काढले तरी काढले असं समजावे.) 
आता सुंदर छोटी खेडी, हिरवीगार जमीन आणि निळंशार आकाश दिसू लागलं. हिथ्रो विमानतळावर मुंबईसारखंच ट्रॅफिक जॅम असल्यानं विमानानं घिरट्या मारल्या. एकदा तर अगदी रन-वेपर्यंत येऊन विमान पुन्हा वर उडालं. आता कधी एकदा लंडनमध्ये पोचतो असं झालं असताना हे ‘एटीसी’ अगदी जीव काढत होतं. पुन्हा विमानानं एक-दोन घिरट्या मारल्या. मात्र, (आम्ही कदाचित चुकीच्या बाजूनं बसल्यानं असेल) शहराचं विहंगम दृश्य आम्हाला काही दिसलंच नाही. असो. थोड्याच वेळात विमानानं ‘टच्ड डाउन’ केलं आणि आम्ही हुश्श केलं. आम्ही अखेर सदेह लंडनमध्ये दाखल झालो होतो. हिथ्रो विमानतळ अवाढव्य आहे. आमच्या विमानाची ‘टॅक्सी’ (रन-वेपासून ते विमान उभं राहतं ती जागा येथपर्यंतचा टारमॅकवरचा प्रवास) दहा मिनिटं चालली होती. अखेर ते कुठं तरी येऊन उभं राहिलं. मोबाइल सुरू झाले. 

आम्ही थोड्या वेळानं रांगेतून विमानाबाहेर पडलो. हिथ्रो विमानतळाकडं निघालो. इथं बाहेर पडल्या पडल्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’मध्ये लक्ष्मणराव देशपांडे म्हणतात तसं ‘हिव भरलं’ नाही. याचं कारण इथं आत्ता उन्हाळा सुरू होता आणि तापमान १४ ते २५ अंश सेल्सियस या दरम्यान होतं. (पुढंही लंडनच्या हवेनं आमच्यावर सतत कृपा केली.) एखाद्या शहरात जाण्यासाठी अहोरात्र ध्यास घ्यावा आणि प्रत्यक्षात तिथं पोचल्यावर फारशी काही एक्साइटमेंट वाटू नये, असं मला काही क्षण झालं. मग मला एकदम लक्षात आलं, की इथं मला काही परकं वाटतच नाहीय. हा एअरपोर्ट मी यापूर्वी अनेकदा ‘यू-ट्यूब’वर बघून पालथा घातला होता. त्यामुळं मला मी काही नवीन बघतो आहे, असं वाटेचना. त्यामुळं मला एकाच वेळी खूप भारी आणि त्याच वेळी एकदम ‘कम्फर्टेबल’ वाटत होतं. एअरपोर्टवरून बॅगा काढणं हा एक व्याप असतो. आम्हाला बॅगा घ्यायला बराच वेळ लागला. नंतर इमिग्रेशन विभागात गेलो. ‘वेलकम टु यूके बॉर्डर’ असा फलक तिथं होता. तिथं ब्रिटिश व युरोपीय देशांच्या पासपोर्टधारकांसाठी वेगळा विभाग व अन्य सर्व देशांतील पासपोर्टधारकांसाठी वेगळा विभाग आहे. आम्ही ‘अन्य’ विभागातून पुढं गेलो. इमिग्रेशनला शिस्तीत रांगा लागल्या होत्या. ब्रिटिश शिस्तीची ही पहिली झलक होती. आम्ही तिघं एकाच कुटुंबातले म्हटल्यावर आम्हाला एकाच विंडोवर बोलावलं. तिथं एक कृष्णवर्णीय हसतमुख तरुणी होती. तिनं आमची चौकशी केली. नातेवाइकांना भेटायचंय म्हटल्यावर व परतीचं तिकीट दाखवल्यावर तिनं फार काही न बोलता आम्हाला सोडलं. आता आम्ही खऱ्या अर्थानं ‘यूके’त प्रवेश केला होता. इथून पुढं आता आमचं आम्हाला अंडरग्राउंड ट्रेन घेऊन हर्षवर्धन राहतो त्या फिन्सबरी पार्क स्टेशनला जायचं होतं. सुदैवानं हिथ्रो विमानतळावरून जाणारी पिकॅडिली लाइन थेट त्या स्टेशनला जाते. आम्ही मग अगदी सराईतासारखे लिफ्टने खाली आलो. आणखी एक-दोन कॉरिडॉर, सरकते जिने पार करून अखेर पिकॅडिली लाइनवर आलो. इथं आम्हा तिघांकडची तीन फॉरेक्स कार्डं स्वाइप करायची होती. याची सगळी तालीम आधीच झाली होती. मग आम्ही अगदी रोज प्रवास करत असल्यासारखी ती कार्डं स्वाइप केली. समोरच ट्रेन उभी होती. ती इथूनच (किंवा एक स्टेशन मागे - टर्मिनल ५ वरून) सुटत असल्यानं फारशी गर्दी नव्हती. आम्ही लगेच आत शिरलो. इथल्या ‘ट्यूब’नं प्रवास करायचा हा पहिलाच प्रसंग. आमच्यासारखेच बाहेरून आलेले प्रवासी बरेच होते. ते सगळेच आपापल्या मोठ्या बॅगा आपल्या सीटसमोर ठेवूनच बसले होते. आम्हीही तसंच केलं. इथून फिन्सबरी पार्क स्टेशन बरंच दूर होतं. मध्ये जवळपास २७ की २८ स्टेशनं जाणार होती. एका अर्थानं आम्ही लंडनच्या नैर्ऋत्य टोकाकडून ईशान्येकडं चाललो होतो. मला वाटलं होतं, तशी ही ट्रेन संपूर्ण अंडरग्राउंड नव्हती. एखादं स्टेशन गेल्यावर ती ‘ओव्हरग्राउंड’ आली. हंसलोची दोन-तीन स्टेशनं जमिनीवरच होती. मग पुन्हा ट्रेन अंडरग्राउंड गेली. या दरम्यान तिथं पडलेला ‘मेट्रो’ हा (मोफत वितरित होणारा) टॅब्लॉइड पेपर मला मागे पडलेला दिसला. मी सराईत लंडनकरासारखा लगेच तो तोंडापुढं धरून वाचायला सुरुवात केली. हे बघून समोर बसलेल्या एक स्थानिक गृहस्थाला कदाचित ‘गिल्ट’ आला असावा. कारण मी तो पेपर खाली ठेवताच त्यानं तातडीनं तो उचलून त्यात तोंड घातलं. शेजारी एक गोऱ्या आजीबाई पुस्तकात तोंड घालून बसल्या होत्या. हे दृश्य पुढं वारंवार दिसणार होतं. एकेक स्टेशनं येत होती. आम्ही जवळपास संपूर्ण लंडन शहर क्रॉस करून चाललो होतो. मात्र, अंडरग्राउंड असल्यानं बाहेरचं शहर काहीच दिसत नव्हतं. स्टेशनांवर जी माहिती लिहिली होती, ती मात्र ती कुतूहलाने बघत होतो. उदा. ग्रीन पार्क स्टेशनवर ‘बकिंगहॅम पॅलेससाठी इथं उतरा,’ असं लिहिलं होतं, तर साउथ केन्सिंग्टन स्टेशनवर ‘म्युझियम्ससाठी इथं उतरा’ असं लिहिलं होतं. किंग्ज क्रॉससारखं मोठं स्टेशनही लागलं. पुढं पुढं शहराच्या मध्यवर्ती भागातली स्टेशनं यायला लागली, तशी ट्रेनमधली गर्दी वाढली. एक जाणवलं, ते म्हणजे हे मिनी वर्ल्ड आहे. जगभरातले लोक इथं दिसतात. सर्व वर्णांचे, सर्व वंशांचे, सर्व धर्मांचे... त्यांचे पोशाख मात्र टिपिकल होते. बहुतेक पुरुष कॅज्युअल्समध्ये होते, तर महिलांच्या पोशाखांत प्रचंड विपुलता होती. स्कर्टपासून ते साडीपर्यंत आणि पंजाबीपासून ते हिजाबपर्यंत सगळे पोशाख दिसत होते. आणखी एक जाणवलं, ते म्हणजे कुणाला बाकी कुणाशी काही पडलेलं नव्हतं. जो तो आपापल्या विश्वात मग्न होता. कुणी पेपर वाचत होतं, कुणी पुस्तकात डोकं घातलं होतं, तर कुणी मोबाइलमध्ये. (अंडरग्राउंडमध्ये मोबाइलला रेंज येत नाही, त्यामुळं अनेक जण डाउनलोड केलेले सिनेमे बघत होते, नाही तर गाणी ऐकत होते.) इथं पुस्तकं जास्त वाचली जातात, त्याचं हेही एक कारण असावं, असं वाटून गेलं.
अखेर तास-सव्वा तासाच्या प्रवासानंतर आम्ही फिन्सबरी पार्क स्टेशनला पोचलो. ‘वे आउट’ असे बोर्ड सगळीकडं लिहिले होतेच. राजूकाका आम्हाला न्यायला स्टेशनवर येणार होते. त्यांनी आणि अनुजाने आम्हाला ‘वॉल टेरेस’च्या बाजूनं बाहेर पडा, असं सांगितलं होतं. ते काही आम्हाला समजलं नाही आणि आम्ही मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडलो. हाही भाग मी यू-ट्यूबवर पाहिला असल्यानं मला अनोळखी काहीच वाटेना. तेवढ्यात काका, काकू व अनुजा पुढच्या प्रवेशद्वाराकडं आले आणि त्यांना बघून आम्ही आनंदानं हुश्श केलं. पुण्यावरून काल ४ वाजता सुरू केलेला प्रवास आज इथं जवळपास संध्याकाळच्या सहा वाजता म्हणजे २६ तासांनी (आणि इंग्लंड आपल्यापेक्षा साडेचार तासांनी मागे आहे, ते धरल्यास जवळपास साडेतीस तासांनी) संपला होता. तरी इथून पुढं हर्षवर्धनच्या घराकडं साधारण एक किलोमीटर चालत जायचं होतं. स्टेशनच्या बाजूलाच फिन्सबरी पार्क ही मोठी बाग आहे. या बागेतून त्यांच्या घरी जायला शॉर्ट कट आहे. मग आम्ही तिथून रमत-गमत, मस्त चालत, चाकांच्या बॅगा ओढत आरामात घरी पोचलो. ‘९२, अप्पर टॉलिंग्टन पार्क’ हा पत्ता बघून, सगळ्या प्रवासाचा शीण गेला. हर्षवर्धन राहत असलेलं हे घर शंभर वर्षं जुनं आहे. तिथं आणखी दोन की तीन भाडेकरू राहतात. आम्ही घरात शिरलो. बॅगा टाकल्या आणि खाली गालिचावर पाय ताणून बसलो. फार बरं वाटलं. चहा झाला.
थोड्याच वेळात हर्षवर्धन आला. तो म्हणाला, की संध्याकाळी आपण बागेत फिरायला जाऊ. त्या हवेचा गुण म्हणा, किंवा काही... आम्ही चक्क त्यांच्यासोबत पुन्हा फिरायला बाहेर पडलो. इथं सध्या रोज संध्याकाळी (रात्री?) आठ वाजता अंधार पडतो. त्यामुळं आम्ही बागेतून फिरून घरी येईपर्यंत उजेड होता. तिथल्या तळ्यापर्यंत गेलो. तिथले ‘राजहंस’ पाहिले. आम्ही ज्याच्याकडं राहायला गेलो होतो, तो हर्षवर्धन हाही एक ‘राजहंस’च आहे. त्याच्या कर्तृत्वाविषयी पुढं लिहीनच.
घरी आलो. जेवणं झाली. गप्पा सुरूच होत्या. दुसऱ्या दिवसापासून काय काय करायचं, याचं नियोजन सुरू होतं. मात्र, आता प्रवासाचा थकवा जाणवू लागला होता. आम्ही आडवे झालो आणि क्षणार्धात झोप लागली... आता उद्यापासून लंडनकर म्हणून जगायचं होतं आठ दिवस...
वेगळं विश्व, वेगळी मजा, वेगळा अनुभव, वेगळी नशा!(क्रमश:)

-------------

No comments:

Post a Comment