1 Sept 2023

लंडनवारी - भाग ३

अ डे इन द म्युझियम...
---------------------------


लंडन, १७ ऑगस्ट २०२३

For every man the world is as fresh as it was at the first day, and as full of untold novelties for him, who has the eyes to see them.

- Thomas Henry Huxley (1825-1895)

लंडनमधल्या आमच्या भटकंतीची सुरुवात झाली, ती गुरुवारपासून. सकाळी हर्षवर्धन आणि अनुजानं आमच्यासाठी पोह्यांचा नाश्ता केला होता. हा सुखद धक्का होता. मस्त पोहे खाऊन आम्ही तिघं आणि राजूकाका असे चौघे जण भटकंतीला बाहेर पडलो. पुण्याहून निघतानाच मी आमच्या ट्रिपचं एक कच्चं नियोजन करून हर्षवर्धनला पाठवलं होतं. त्यात त्यानं काही सुधारणा केल्या व आम्ही त्यानुसार ते नियोजन सर्व दिवस पाळलं. त्यानुसार गुरुवारी आम्ही लंडनमधली संग्रहालयं पाहायला जाणार होतो. मला स्वत:ला नॅचरल हिस्टरी म्युझियम बघण्यात अतोनात रस होता. त्या भागातच सगळी संग्रहालयं आहेत, असं हर्षनं आम्हाला सांगितलं. अर्थात एकेक संग्रहालय नीट बघायला एक आख्खा दिवसही पुरत नाही, हे आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं. त्यामुळं जेवढं जमेल तेवढं बघू एवढंच ठरवून आम्ही बाहेर पडलो. आम्ही काल फिन्सबरी पार्क अंडरग्राउंड स्टेशनवरून हर्षच्या घरी येताना बागेतून आलो होतो. आता दुसऱ्या रस्त्याने जायचं असं ठरवलं. मला सहसा एकदा एखाद्या ठिकाणी गेलो, की ते ठिकाण, रस्ते नकाशासारखे पक्के लक्षात राहतात. (अशा मेंदूला मॅप ब्रेन म्हणतात का? नसतील तर म्हणा!) त्यामुळं अप्पर टॉलिंग्टन पार्कचा भूगोल माझ्या लगेच लक्षात आला. कुठून कुठं गेलं, की काय लागेल, हे समजलं. हर्षवर्धनच्या घरासमोर एक तिठा होता. डावीकडं सरळ गेलं, की एक चौक लागणार होता. तिथून डावीकडं वळून सरळ गेलं की हे स्टेशन. टिपिकल उच्च मध्यमवर्गीय अशी ती कॉलनी होती. सगळी घरं एका ओळीत, एकसारखी. टिपिकल ब्रिटिश बांधणी. सगळीच्या सगळी घरं किमान शंभर वर्षं जुनी असावीत. सगळे रस्ते डांबराचे. मला तिथं एकही काँक्रिटचा रस्ता दिसला नाही. ते सगळे रस्ते अगदी गुळगुळीत होते, असंही नाही. मात्र, खड्डेविरहित नक्कीच होते. आम्ही निघालो, त्या रस्त्यावर बागेतून येणारा एक जुनाट पूल होता. इथं पूर्वी एक रेल्वेलाइन होती. ती आता नाही; मात्र, त्या ट्रॅकची जागा त्या लोकांनी अजूनही नीट राखून ठेवली आहे. तिथं आता लोक पळायला किंवा फिरायला जातात. मी ती खूण म्हणून लक्षात ठेवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पट्ट्यांनी आखलेलं कार पार्किंग. त्यात व्यवस्थित गाड्या उभ्या केलेल्या. सर्व ब्रँडच्या आणि सर्व प्रकारच्या कार दिसल्या. एक जुनी, व्हिंटेज कार म्हणावी अशी एक लाल रंगाची सुंदर मर्सिडीजही होती. ती नंतर रोज तिथं दिसायची. कारच्या चार्जिंगसाठी रस्त्यावर पॉइंट केलेले. तिथं गाड्या चार्ज होत होत्या. बाकी कुणीही तिथं नव्हतं. एकूणच या उपनगरासारख्या भागात रस्त्यावर पटकन माणूस दिसणं कठीण. अर्थात आम्हाला तुरळक माणसं दिसली. पुढच्या चौकात रस्त्याचं काम सुरू होतं. आजूबाजूला बॅरिकेड्स लावली होती. मात्र, ट्रॅफिक व्यवस्थित शिस्तीत बाजूनं जात होती. सिग्नलला पादचाऱ्यांसाठी एक बटन असतं. रस्ता ओलांडायच्या वेळी ते दाबायचं आणि सिग्नल हिरवा व्हायची वाट बघायची. आम्ही सुरुवातीला कार आली की दचकून थांबायचो. मात्र, तो कारवाला स्वत:हून गाडीचा वेग कमी करून आम्हाला जायची खूण करायचा. मग आपण ‘थम्सअप’ करून पुढं जायचं. ही इथली पद्धत राजूकाकांनी आम्हाला सांगितली. नंतर आम्ही शिस्तीत बटन दाबून उभं राहायला लागलो आणि हिरवा दिवा लागला की कितीही जोरात गाडी येताना दिसली तरी बिनधास्त रस्ता ओलांडायचो. ती गाडी लांबवर पांढऱ्या पट्ट्याच्या आत थांबणार म्हणजे थांबणार. मग मोठी डबल डेकर बस असो, वा छोटी कार!
...तर त्या चौकात डावीकडं वळून आम्ही फिन्सबरी पार्क स्टेशनला आलो. या वेळी आम्ही काल जो एंट्रन्स चुकवला होता, त्या ‘वॉल टेरेस’च्या बाजूनं शिरलो. फिन्सबरी पार्क स्टेशन ज्या इमारतीत आहे, ती एक टोलेजंग इमारत होती. निदान १९-२० मजली तरी असावी. मात्र, त्या संपूर्ण परिसरात ती एकमेव उंच इमारत होती. बाकी सर्व घरं किंवा इमारती साधारण दोन ते तीन मजले एवढ्याच उंचीच्या! त्या स्टेशनच्या परिसरातच मोठा बसस्टॉप होता. शिवाय एक ‘पिक्चर हाउस’ नावाचं सिनेमागृहही होतं. समोरच एक ‘डी-मार्ट’सारखं मोठं डिपार्टमेंटल स्टोअरही होतं. त्यामुळं त्या भागात बऱ्यापैकी चहलपहल होती. आम्ही आमची कार्डं स्वाइप करून स्टेशनमध्ये प्रवेश केला. या स्टेशनला पिकॅडिली आणि व्हिक्टोरिया अशा दोन लाइन्स आहेत. पिकॅडिली ही साधारणत: पूर्व ते पश्चिम अशी तर व्हिक्टोरिया ही लाइन साधारणत: उत्तर ते दक्षिण अशी धावते. आम्ही येताना पिकॅडिली लाइननं आल्यामुळं आता आम्ही तिला आमची ‘होम लाइन’ घोषित करून टाकलं होतं. ‘म्युझियमसाठी इथं उतरा’ ही पाटी मी कालच साउथ केन्सिंग्टन स्टेशनवर बघितली होती. त्यामुळं आम्हाला आता ‘कॉकफॉस्टर’कडून येऊन ‘हिथ्रो टर्मिनल २ व ३’कडं जाणारी ट्रेन पकडायची होती. थोडक्यात काल आलो त्याच दिशेनं प्रवास करायचा होता. फक्त सात ते आठ स्टेशनांनंतर उतरायचं होतं. इथं फलाटावर गेल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिटांत ट्रेन येतेच. आम्ही फलाटावर गेल्यावर ती तशी आलीच. इथली अंडरग्राउंड ट्यूब तब्बल १६० वर्षं जुनी आहे - १८६३ मध्ये सुरू झालीय. डबे बरेच असतात. किमान आठ ते बारा. आत बसायला कुशनच्या सीट असतात. त्या निळ्या रंगाच्या असतात. बऱ्याचदा बोगद्यातून जाताना ब्रेकचा कर्णकर्कश्श आवाज या ट्रेन करतात. तेव्हा बहुतेक ब्रिटिश मंडळी चक्क कानांत बोट घालून बसतात, एवढा तो आवाज इरिटेटिंग असतो. अनेकदा डिस्प्ले बंद असतात. अनेकदा अनाउन्समेंटही होत नाही. बऱ्याचदा ट्रेन बोगद्यातच थांबते. एवढं सगळं असलं तरी लंडनकरांचं या ‘ट्यूब’वर अतोनात प्रेम आहे. मुंबईकरांचं जसं लोकलवर आहे तसंच! ही लंडनची जीवनदायिनी आहे. पुलंनी फार सार्थपणे या गाड्यांचं वर्णन ‘पाताळयंत्री गाड्या’ असं केलं होतं. खरोखर, संपूर्ण लंडन शहर व परिसराच्या खाली उभं असलेलं हे वेगळंच विश्व आहे. साधारण आठ ते दहा मेजर लाइन्स आहेत. नुकत्याच झालेल्या नव्या एलिझाबेथ लाइनची आता त्यात भर पडली आहे. पिकॅडिली, व्हिक्टोरिया, सेंट्रल, डिस्ट्रिक्ट अशा अनेक लाइन्स आहेत. हर्षच्या घरी नंतर आम्ही या ट्रेनचा एक गेमही खेळलो. त्यामुळं ही ‘अंडरग्राउंड’ समजायला मदत झाली. असो.
ठरल्याप्रमाणे, आम्ही साउथ केन्सिंग्टन स्टेशनला उतरलो. स्टेशनमध्ये सर्वत्र म्युझियमला कसं जायचं याच्या पाट्या होत्याच. एका बऱ्याच मोठ्या सब-वेतून आम्ही बरंच चाललो. हा सब-वे म्हणजे टिपिकल लंडनचा एक चेहरा. दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या जाहिरातींचे डिस्प्ले, त्यातून भरभर चालत जाणारी गोरी मंडळी... आम्ही जरा रमत-गमत चालत होतो. बाहेर पडलो, ते थेट म्युझियम रोडवरच. आजूबाजूला बघताच ‘अहाहा’ असं झालं. जुन्या ब्रिटिश शैलीच्या देखण्या इमारतींनी तो रस्ता नटला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना संग्रहालयं होती. नॅचरल हिस्टरी, सायन्स आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम अशी तीन तर तिथंच होती. आम्ही नॅचरल हिस्टरी म्युझियमच्या बाजूनं चालायला सुरुवात केली. म्युझियम रोड पार करून उजवीकडं वळालो, तेव्हा त्या म्युझियमच्या भव्य इमारतीचं मुख्य प्रवेशद्वार लागलं. इथं सर्व संग्रहालयं नि:शुल्क असतात. त्यामुळं संग्रहालयं बघायला पर्यटकांची कायमच गर्दी होत असते. आम्ही त्या प्रांगणातल्या लाइनीत उभे राहिलो. एव्हाना साडेअकरा वाजले होते. लंडनमध्ये आकाश निरभ्र होतं आणि चक्क ऊन जाणवत होतं. तरी ती लाइन भराभर पुढं सरकत होती. शेजारी आणखी एक वेगळी लाइन होती. ती तिकीटधारी मंडळींची होती. त्यांना अर्थातच प्राधान्यानं आणि थेट प्रवेश मिळत होता. ते तिकीट बरंच असावं. आम्हाला वेळ भरपूर होता आणि पौंडही खर्चायचे नव्हते. त्यामुळं आम्ही निवांत रांगेत उभे राहिलो. त्या रांगेत जगातले सर्व प्रांतांतले लोक होते. त्यांंचं निरीक्षण करण्यात आमचा वेळ चांगला गेला. नॅचरल हिस्टरी म्युझियमची इमारत अतिशय भव्य आणि सुंदर आहे. तिचे फोटो काढण्यातही वेळ गेला. ही इमारत १८८१ मध्ये उभी राहिली. (आपल्याकडे त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ वृत्तपत्र सुरू केले होते.) साधारण अर्ध्या तासानं आम्ही मुख्य इमारतीत प्रवेश केला. त्या भव्य घुमटाखाली तो प्रसिद्ध भलामोठा सांगाडा टांगून ठेवला होता. अनेकदा फोटोंमध्ये तो बघितला होता. मला तो डायनॉसॉरचा सांगाडा असावा, असं वाटत होतं. प्रत्यक्षात तो देवमाशाचा होता. 
नॅचरल हिस्टरी म्युझियम अपेक्षेप्रमाणेच अतिशय भव्य व मोठं निघालं. अर्थात माझी अपेक्षा वेगळी होती. आपल्याकडं संग्रहालयात असतात, तशी दालनं आणि माहिती अशी रचना तिथं नव्हती. मात्र, जे काही बघायला मिळालं, तेही अद्भुतच होतं. डायनॉसॉरचा वेगळा विभागच होता. त्या दालनाच्या शेवटी एक हलता डायनॉसॉर होता. तिथं मुलांची गर्दी होती. मला ते बघताच आपल्याकडच्या गणपतीच्या देखाव्यांची आठवण झाली. मी नीलला म्हटलंही - इथं कोपऱ्यात एक गणेशमूर्ती आणि शेजारी नागनाथपार गणेश मंडळ वगैरे फलक लिहिला की आपण पुण्यातच आहोत, असं वाटेल. पण एकूण मजा आली. ते संग्रहालय फिरून फिरून आमचे पाय दुखायला लागले. (हा अनुभव पुढं वारंवार येणार होता.) मग आम्ही त्या संग्रहालयाच्या बाजूला ‘डार्विन सेंटर’ अशी पाटी होती, तिकडं गेलो. तिथं एक कॅफे होता. बसायला जागाही होती. आम्ही तिथंच बसकण मारली. आमच्याप्रमाणेच आणखीही काही कुटुंबं तिथं खाली बसून आराम करत होती. आम्ही खायचे जिन्नस पार्सल आणले होते. त्यातले रोल तिथं खाऊन संपवले. डार्विन सेंटर भागात एक उंच अंडाकृती आठ मजली इमारत होती. मात्र, तिथं काही काम सुरू असल्यानं लिफ्ट बंद होती. मग आम्ही तिकडं जायचा प्रश्नच नव्हता. मग एक ॲटनबरो स्टुडिओ अशी पाटी दिसली. मात्र, तिथला ‘शो’ही बऱ्याच वेळानं होता. शेजारी एक इंटरॲक्टिव्ह सेंटर होतं, तिथंही कुठलंसं वर्कशॉप सुरू होतं. तिथल्या मुलीनं ‘वर्कशॉपसाठी आला असाल तर प्रवेश’ असं सांगितलं. आम्ही व आमच्यासारखे अनेक जण मग तिथूनच मागं फिरलो.

आता आम्ही पुन्हा त्या मध्यवर्ती डोमपाशी आलो. तिथं पायऱ्या चढून गेल्यावर डार्विनआजोबांचा पूर्णाकृती (खुर्चीवर बसलेला असा) संगमरवरी पुतळा आहे. तिथं सेल्फी काढणं हे मस्ट असतं. उजव्या बाजूला या संग्रहालयाची शताब्दी झाली, तेव्हा राणी एलिझाबेथच्या हस्ते बसविलेला एक फलक लावलेला होता. तिथून दुसऱ्या मजल्यावरचं संग्रहालय पाहायला आम्ही सुरुवात केली. तिथंच या मजकुराच्या अगदी सुरुवातीला उद्धृत केलेलं हक्सलेचं वचन सापडलं. मला सर्वांत अद्भुत वाटलं ते तिथं असलेलं एक पंधराशे वर्षं जुन्या झाडाचं खोड. हे खोड अमेरिकेतील एका झाडाचं आहे. सन ५५७ मध्ये हे झाड रोप म्हणून लावण्यात आलं असावं. त्यानंतर सुमारे १४०० की त्याहून अधिक वर्षं ते जगलं आणि नंतर मरण पावलं. या झाडाच्या महाप्रचंड खोडाचा एक भाग तिथं चक्रासारखा लावण्यात आला होता आणि त्या झाडाच्या जीवनकाळात जगभरात काय काय झालं, याची एक यादी तिथंच खाली लावण्यात आली होती. शेजारीच एक किमती खडे व मिनरल्सचंही प्रदर्शन होतं. मात्र, आम्ही तिथल्या बाकांवर पाच मिनिटं बसलो ते विश्रांतीसाठी. पुन्हा खाली आलो. उजव्या बाजूकडं गेलो तर तिथं कीटकांचं दालन होतं. तेही फारच वेगळं आणि अद्भुतरम्य होतं. नंतर या प्रदर्शनातून बाहेर पडायला म्हणून मागच्या बाजूला गेलो, तर तिथं एका एस्कलेटरवरून आणखी एका दालनात जायला मिळालं. पृथ्वीवरचे भूकंप आणि त्सुनामी आदी नैसर्गिक आपत्तींबाबतचं ते दालन होतं. तिथं एका ठिकाणी भूकंप झाल्यावर काय अनुभव येतो, याचा जिवंत अनुभव एका लाकडी फलाटावर उभं राहून घेता येत होता. तिथं अर्थातच गर्दी होती. या दालनात आम्ही काही काळ रमलो. मात्र, आता बराच उशीर झाला होता. शेवटी अगदी नाइलाजानं या संग्रहालयातून बाहेर पडलो. बाहेर पुन्हा म्युझियम रोडवर आलो. तिथं समोर बसायला छान कट्टे केले आहेत. अनेक पर्यटक तिथंच विसावले होते. आमचेही पाय बोलत असल्यामुळं आम्हीही तिथं टेकलो. दोन्ही बाजूंच्या त्या इमारती आणि त्यावर फडकणारा युनियन जॅक बघत बसलो. कुठल्याही राष्ट्राचं वैभव मोजताना तुम्ही नक्की काय मोजता? किंवा काय मोजलं पाहिजे? वारसा कसा जपून ठेवावा? का जपून ठेवावा? बरेच विचार मनात येऊन गेले. आमच्या नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची उभारणी करण्यासाठी अक्षरश: आयुष्य वेचलेले सुरेश जोशींसारखे व्रतस्थ लोक डोळ्यांसमोर आले. एकेका अस्सल कागदासाठी मैलोन् मैल सायकलवरून वाट तुडवणारे बाबासाहेब पुरंदरे आठवले. अर्थात हे सन्माननीय अपवाद. बाकी आपल्याकडच्या संग्रहालयांची आणि एकूणच वस्तू जपून ठेवण्याची ‘आस्था’ आठवली. 
शेजारी असलेलं सायन्स म्युझियमही खुणावत होतं. मग तिकडं गेलो. मगाशी बघितलं तेव्हा या संग्रहालयाबाहेर रांग होती. आता ती नव्हती. आम्ही सहज आत गेलो. तिथं पुन्हा तिकिटांची रांग दिसली. तिकीट नाहीय असं कळलं होतं. मग ही रांग कसली? जरा चौकशी केल्यावर कळलं, की ती ‘देणगीमूल्या’ची रांग आहे. ब्रिटिशांच्या व्यापारी वृत्तीचं दर्शन ठायी ठायी घडत होतं. आम्हाला कुठलीही देणगी वगैरे द्यायची नव्हती. मग आम्ही सरळ त्या रांगेतून पुढं शिरलो. हे संग्रहालयही अफलातून होतं. युरोपात सोळाव्या, सतराव्या आणि अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीचा हा चालता-बोलता इतिहासच आमच्यासमोर उभा राहिला होता. इथं इंग्लंडमधल्या एका मिलमधलं १९०३ मधलं मोठ्ठं यंत्र चालू अवस्थेत होतं. त्या यंत्राचा आकार आणि त्याचं तंत्रज्ञान यांची माहिती शेजारी दिली होती. याशिवाय त्या काळातली इतर सर्व यंत्रं, मोटारी, जहाजं इथपासून ते थेट विमानं आणि अंतराळयानं तिथं मांडली होती. सोबत प्रचंड माहिती होती. खरोखर, एक संग्रहालय एक दिवसात तरी पूर्ण नीट पाहून होईल का, अशी शंका वाटली.

इथं मला सर्वांत आवडलं ते जेम्स वॉटचं दालन. जेम्स वॉट संशोधनादी कामे करण्यापूर्वी आफ्रिकेतील गुलाम इंग्लंडमध्ये आणण्याचा व्यापार करीत असे. ही माहिती मला नवीन होती. ती तिथं वाचायला मिळाली. अर्थात नंतर कायद्यानं गुलामगिरी बंद झाल्यानंतर जेम्स वॉट संशोधनाकडं वळला आणि त्यानं किती महत्त्वाचे शोध लावले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या वॉटकडे असलेल्या तब्बल आठ हजारहून अधिक वस्तू त्या दालनात आहेत. ते बघून अक्षरश: डोळे गरगरतात. याशिवाय चंद्रावरून नील आर्मस्ट्राँगनं आणलेला एक छोटासा दगडही इथं ठेवला आहे. या म्युझियमच्या मागच्या बाजूला कॅफे आहे. तिथून खालच्या मजल्यावर गेलं, की आयमॅक्स थिएटर आहे. तिथं ‘ओपनहायमर’चे शो सुरू होते. पलीकडं कोव्हिडचं एक दालन होतं. आम्हाला अनुजानं याविषयी सांगितलं होतं. म्हणून ते मुद्दाम बघायला गेलो. अर्थातच ते अगदी अलीकडं उभारलेलं होतं. इंग्लंडनं कोव्हिडशी कसा लढा दिला, आदी माहिती तिथं होती. आपल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचाही एक फलक होता. तिथल्या उमेश शाळिग्राम यांचा फोटो व त्यांचा एक ‘कोट’ही तिथं दिसला. आम्ही अर्थातच तिथं फोटो काढले. सायन्स म्युझियमला आणखी दोन मजले होते. मात्र, आता आमच्यातलं त्राण पूर्ण संपलं होतं. मग शेवटी आम्ही तिथून बाहेर पडलो. समोरच व्हिक्टोरिया व अल्बर्ट म्युझियम होतं. पण जवळपास पाच वाजत आल्यानं आम्ही तिकडं फिरकलोच नाही. तिथून सरळ चालत निघालो. आता आम्हाला हाइड पार्क आणि रॉयल अल्बर्ट हॉलकडं जायचं होतं. चालत पाच मिनिटांत आम्ही तिथं पोचलो. रॉयल अल्बर्ट हॉलचंही नाव मी अनेक वर्षं वाचत-ऐकत होतो. आज तो प्रत्यक्ष (बाहेरून का होईना) पाहण्याचा योग आला. याच प्रसिद्ध हॉलमध्ये लता मंगेशकर यांनी १९७४ मध्ये कार्यक्रम सादर केला होता. इथं कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय आहेत. या अल्बर्ट हॉलच्या समोरच अल्बर्ट मेमोरियल आहे. हा प्रिन्स अल्बर्ट म्हणजे राणी व्हिक्टोरियाचा नवरा. त्या भव्य स्मारकात सर्वांत वरच्या बाजूला व्हिक्टोरियाचं चित्र कोरलं होतं, तर अल्बर्टचा बसलेला पूर्णाकृती पुतळा होता. त्या स्मारकाच्या चारही बाजूंना युरोप, आशिया, आफ्रिका आणि अमेरिका अशा चार खंडांची शिल्पे होती. आशिया खंडाच्या शिल्पात एक राजस्थानी स्त्री ठळक दिसते. स्मारकाच्या वरच्या बाजूला ‘व्हिक्टोरियाच्या औदार्यपूर्ण राजवटीचा’ गौरव करणारी वाक्यं कोरण्यात आली आहेत. एकूण हे स्मारक चांगलंच मोठं होतं. शेजारीच हाइड पार्कचा एक भाग असलेली बाग व भलीमोठी हिरवळ होती. आम्ही दमून जरा तिथं टेकलो. सोबत आणलेला खाऊ पुन्हा एकदा खाल्ला. जरा तरतरी आल्यावर पुन्हा चालत सर्पेंटाइन गॅलरी नावाचा भाग व तिथं असलेला लेडी डायना मेमोरियल वॉक बघायला गेलो. दहा मिनिटं तिथं चालत गेल्यावर आमचं अक्षरश: भान हरपलं एवढी सुंदर अशी ती बाग होती. तिथं मधोमध छोट्या कालव्यासारखं पाणी सोडलं होतं आणि अनेक बाळ-गोपाळ अगदी उघडेबंब होऊन तिथं हुंदडत होते, खेळत होते, पळत होते. शेजारच्या तळ्यात बदकं, राजहंस आदी पक्षी विहरत होते. राजहंसाचं एक देखणं व मोठं शिल्पही तिथं उभारलं होतं. त्या परिसरात येऊन फारच शांत वाटलं. या बागेची रचना डायनाच्या स्वभाववैशिष्ट्यांनुरूप कशी केली आहे, हे सांगणारा एक फलकही तिथं होता. त्या बागेत थोडं थांबून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. येताना एक कॉफीशॉप दिसलं होतं. तिथं जाऊन कॉफीपान करण्याचा मोह अनावर झाला. मग तिथं जाऊन कॉफी प्यायलो. बरं वाटलं. पायांना चालायला जरा बळ आलं. मग त्या देखण्या परिसरातून आम्ही हळूहळू चालत स्टेशनच्या दिशेनं चालू लागलो.
अंडरग्राउंड स्टेशनच्या सब-वेतून उतरून पुन्हा साउथ केन्सिंग्टन स्टेशनपर्यंत जाईपर्यंत बरीच पायपीट झाली. मग पिकॅडिली लाइनवरून आम्ही फिन्सबरी पार्कला उतरलो आणि पुन्हा चालत घरी आलो. आजचा पूर्ण दिवस बरीच पायपीट झाली होती. आता इथून पुढं आठवडाभर असंच रुटीन असणार होतं. संध्याकाळी घरी हर्ष-अनुजाच्या हातची गरमागरम पावभाजी खायला मिळाली आणि सगळ्या दिवसाचा शीण गेला. अंथरुणाला पाठ टेकताच गाढ झोप लागली... मनात मात्र हक्सलेचं ते वाक्य रेंगाळत होतं...(क्रमश:)

-------------------

2 comments:

  1. पहिले तीन ब्लॉग वाचले,खूपच छान लिहिलंय!बारीक सारीक गोष्टींची माहिती
    असल्याने नवीन प्रवाशाला खूप उपयोगी असं लेखन!आवडलं!
    मी काही लेखक नाही,मला जे सुचलं ते मी लिहीत गेलो!

    ReplyDelete