12 Sept 2023

लंडनवारी - भाग ७

पाळणा, पुतळे व प्रज्ञास्थळे...
-----------------------------------


लंडन, सोमवार, २१ ऑगस्ट २०२३.


लंडनच्या ट्रिपमध्ये काही गोष्टी नक्की बघायच्या हे आम्ही जायच्या आधीच ठरवलं होतं. त्यात ‘लंडन आय’ आणि ‘मादाम तुस्साँ म्युझियम’ ही दोन ठिकाणं अगदी नक्की होती. पर्यटक आवर्जून जिथं जातातच अशी ही ठिकाणं आहेत. लंडनला गेल्यावर ही ठिकाणं पाह्यलाच पाहिजेत, असंही एक ते ‘टिकमार्क’ शास्त्र असतंच. अर्थात मला स्वत:ला ‘टिकमार्क’पेक्षाही ही ठिकाणं प्रत्यक्ष बघूनच अनुभवायची होती. इतरांचं त्याविषयी काय मत आहे, हे आत्ता मी विचारात घ्यायचं कारण नव्हतं. खरं म्हणजे पाच वर्षांपूर्वी आम्ही सिंगापूरला गेलो होतो, तेव्हा तिथं या दोन्ही गोष्टी अनुभवल्या होत्या. सिंगापूरला ‘लंडन आय’सारखंच ‘सिंगापूर फ्लायर’ आहे. तेव्हा आमची कंडक्टेड टूर होती आणि या फ्लायरमध्ये बसायचं की नाही, हे प्रत्येक पर्यटकावर सोपवलेलं होतं. तिथं आम्ही होय-नाही, होय-नाही करता करता सगळेच बसलो होतो. याशिवाय तिथल्या युनिव्हर्सल स्टुडिओत मादाम तुस्साँ संग्रहालय पण आहे. तिथलं संग्रहालय बघितलं असलं, तरी मूळ ठाणं हे लंडनमध्येच आहे आणि ते मला बघायचंच होतं. पुन्हा एकदा ‘अपूर्वाई’त या संग्रहालयाविषयी पहिल्यांदा वाचलं, तेव्हापासून ही उत्सुकता होती. पुलंनाही हे संग्रहालय फार काही आवडलं नव्हतं. मला मात्र ते बघायचंच होतं. आम्ही पुण्याला असतानाच तसं हर्षला सांगितलं होतं. नंतर आमचे डे-टु-डे कार्यक्रम फायनल झाल्यावर मी पुण्यातूनच आमच्या तिघांची आणि काकांची तिकिटं काढली. (या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे ॲडव्हान्स तिकिटं बुक केलेली बरी असतात.) आम्ही शनिवार-रविवारची तिकिटं न काढता, मुद्दाम सोमवारची सकाळची काढली. कमी गर्दी असावी हा अंदाज! हर्षनं सांगितल्याप्रमाणे त्या वेबसाइटवर दोन ठिकाणची तिकिटं पॅकेज म्हणून मिळत होती. आम्ही लंडन आय आणि मादाम तुस्साँ ही दोन ठिकाणं निवडली आणि प्रत्येकी ५० पौंडाचं तिकीट काढून टाकलं. तिकीट काढताना कुठल्या ठिकाणी किती वाजता पोचणार या वेळाही आपल्यालाच निवडाव्या लागतात. मी ‘लंडन आय’साठी सकाळी १०.४५ ची, तर ‘मादाम तुस्साँ’साठी १.४५ वाजताची वेळ निवडली. 
त्या दिवशी आम्ही सकाळी चौघे लवकर निघालो. लंडनला आल्यापासून आम्हाला इथल्या हवामानानं उत्कृष्ट साथ दिली होती. स्ट्रॅटफर्डला गेलो त्या दिवशी, म्हणजे शनिवारी वार्विकमध्येच आम्हाला थोडा पाऊस लागला होता. एरवी इथं रोज स्वच्छ ऊन पडत होतं. हर्ष व अनुजा म्हणालेही, की तुम्ही पुण्याहून ऊन घेऊन आलात! आणि तापमानही रोज किमान १३-१४ अंश सेल्सिअस आणि कमाल २२ ते २४ अंश सेल्सिअस! म्हणजे आपल्याकडे डिसेंबर व जानेवारीत पुण्यात असतं तसं सुंदर हवामान... शिवाय लंडन हे मुंबईसारखं समुद्रकिनारी नाही. त्यामुळं इथल्या हवेत दमटपणा नाही. शिवाय प्रदूषण आपल्या तुलनेत फारच कमी. त्यामुळं रोज निळंशार सुंदर आकाश दिसे. कितीही चाललं तरी घाम येत नसे. आम्ही मारे इथून दोन-दोन जर्किन्स आणि छत्र्याही नेल्या होत्या. मात्र, एखादेवेळी संध्याकाळी जर्किन घातलं तर घातलं.... एरवी मला तर ते अजिबात लागलं नाही. छत्रीही नाहीच. असो.
आम्ही फिन्सबरी पार्कला येऊन व्हिक्टोरिया लाइन घेतली. ऑक्सफर्ड सर्कसला जाऊन बेकरलू लाइन पकडली. या लाइननं वॉटर्लू स्टेशनला आलो. इथून ‘सिटी मॅपर’च्या मार्गदर्शनाखाली चालत चालत पाच-दहा मिनिटांत ‘लंडन आय’पाशी पोचलो. एका मुख्य रस्त्यावरून वळताच समोर तो भव्य पाळणा दिसला. आम्ही तिथंच ठिय्या दिला आणि ‘लंडन आय’च्या पार्श्वभूमीवर भराभर फोटो काढले. आकाश निरभ्र आणि निळंशार होतं. आम्ही  ‘लंडन आय’च्या रांगेत पोचलो. आत्ता खरं तर १०.२० च वाजले होते. मात्र, त्या रांगेत अजिबात गर्दी नव्हती. आम्हाला तिथल्या माणसानं लगेचच आत सोडलं. तिथं आत शिरता शिरता एक मुलगी सर्वांचे फोटो काढत होती. मला वाटलं, सुरक्षेसाठी वगैरे काढतात की काय... इन्शुरन्स, नॉमिनी वगैरे शंभर विचार डोक्यात आले. (‘च्यायला, हे पडलं तर...’ हा बेसिक इन्स्टिंक्टवाला विचार तर येऊन जातोच.) अर्थात आम्हाला सिंगापूरचा अनुभव होता. (त्या फोटोची गंमत नंतर कळली.) लाइन भराभर पुढं सरकत होती. आम्ही अक्षरश: पाचव्या मिनिटात ‘लंडन आय’च्या त्या भव्य काचेच्या खोलीत होतो. सिंगापूर फ्लायरमध्ये बसलो असलो, तरी तिथून लंडनचं विहंगम दृश्य थोडंच दिसणार होतं! इथं ते आम्ही मनसोक्त बघितलं. इथं पहिल्यांदा ‘बिग बेन’ (खरं तर त्याचं नाव एलिझाबेथ टॉवर), ब्रिटिश पार्लमेंट आणि त्याभोवतीचा सगळा परिसर दिसला. हळूहळू पाळणा वर जाऊ लागला आणि ‘थेम्स’चं सुंदर दर्शन घडलं. आपल्या पुण्यासारखेच या नदीवर थोड्या थोड्या अंतरावर पूल आहेत. मागच्या बाजूला त्या काचेच्या उत्तुंग इमारती, सेंट पॉल चर्च, शार्ड ही शंक्वाकृती उंच इमारत असं सगळं दिसत होतं. इथं सोबत कॉमेंटरीही असते. ती नीट ऐकली तर कुठून काय काय दिसतं, हे त्यात सांगितलेलं असतं. मात्र, बहुतांश पर्यटक एकमेकांत बोलत असतात आणि त्या माहितीत फार काही कुणाला रस नसतो. तरी इथून बकिंगहॅम पॅलेस दिसतो, हे मला त्या कॉमेंटरीमधूनच कळलं. थोड्या वेळातच मी तो शोधून काढला. आजूबाजूच्या परिसरात सगळी हिरवीगार मोकळी जागा आहे. आता आमची खोली सर्वांत वरच्या पातळीवर आली होती. इथून सर्व शहराचा नजारा अफाट दिसत होता. काहीही म्हणा, ‘लंडन आय’चा अनुभव हा प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे असा आहे. हळूहळू आता आम्ही खाली येऊ लागलो. या बाजूने पार्लमेंट आणि ‘बिग बेन’ आणि त्याशेजारचा पूल दिसत होता. फोटोंसाठी उत्कृष्ट संधी होती. भराभर फोटो काढेपर्यंत आम्ही खाली उतरलोही. घड्याळात बघितलं, तर अवघ्या २० ते २५ मिनिटांची ‘राइड’ झाली. सिंगापुरात आम्ही अर्धा तास होतो, असं आठवत होतं. अर्थात ही आजची राइडही खासच झाली. आम्ही बाहेर पडताना, त्या फोटोचं रहस्य कळलं. मगाशी काढलेला आमचा फोटो ‘लंडन आय’मधील त्या काचेच्या खोलीवर सुपरइंपोझ करून इथं विकत होते. सहज विचारलं, तर २० पौंड की अशीच महाग किंमत सांगितली. आम्ही आमच्या मोबाइलमधून भरपूर फोटो काढले असल्यानं तो फोटो अर्थातच काही विकत घेतला नाही. मला आमच्या जामखेडच्या नागपंचमीच्या जत्रेची आठवण झाली. आजही योगायोगाने नागपंचमीच होती आणि मी योगायोगाने चक्क लंडनच्या पाळण्यात बसलो होतो. जामखेडला नागपंचमीच्या दिवशी पाळण्यात बसायचं ही आमची लहानपणीची सर्वोच्च मौज असायची. तिथंही असे तात्पुरते स्टुडिओ यायचे. तिथं चंद्रावर किंवा मोटारसायकलवर किंवा मिथुन किंवा श्रीदेवीसोबत फोटो काढून मिळायचे. त्यामुळं आजच्या या नागपंचमीच्या योगायोगाची मला फार गंमत वाटली. 

आमची ही राइड तुलनेनं खूपच लवकर झाली होती. मग आम्ही समोरच्या एका स्मृतिवस्तूंच्या दुकानात जरा टाइमपास केला. सगळ्या वस्तू महागच होत्या. त्यामुळं खरेदीच्या भानगडीत न पडता, सरळ बाहेर पडलो. तिथंच शेजारी ॲक्वेरियम दिसलं. मग लक्षात आलं, की तिकीट काढताना या ॲक्वेरियमचाही पर्याय होता. आम्ही अर्थात तो घेतला नव्हता. तिथं विचारलं, तर प्रत्येकी ३० पौंड तिकीट होतं. एवढे पैसे घालवून मत्स्यालय बघण्याचा उत्साह आम्हाला नव्हता. मग रस्त्यानं भटकंती करत ट्रॅफल्गार स्क्वेअरपर्यंत जायचं ठरवलं. समोरच्या पुलापर्यंत आलो. तिथल्या पायऱ्या चढून वर आलो, तो सिंहाचं एक भव्य शिल्प दिसलं. त्याच्याखाली ‘द साउथ बँक लायन’ असं लिहिलं होतं. आम्ही या पुलावरून चालत चालत ‘एलिझाबेथ टॉवर’कडे निघालो. त्या पुलावर बरेच पर्यटक होते. ‘बिन बेन’च्या पार्श्वभूमीवर फोटो काढत होते. असा फोटो म्हणजे आपण लंडनला येऊन गेल्याचा पुरावाच! आम्ही त्या ठिकाणी जरा रेंगाळलो. मग चालत पुढं गेलो. डाव्या बाजूला ब्रिटिश पार्लमेंटची भव्य व जुनी इमारत दिसली. त्या परिसरात जरा बंदोबस्त दिसला. तिथून पुढे गेल्यावर विन्स्टन चर्चिल यांचा भव्य पुतळा दिसला. या परिसरात बरेच पुतळे आहेत. इथंच महात्मा गांधींचाही पुतळा आहे, हे मला माहिती होतं. जरा पुढं गेल्यावर तो दिसलाच. तिथं बरेच गोरे लोक फोटो काढत होते. विशेषत: लहान मुलांना गांधीजींच्या पुतळ्याजवळ उभं करून त्यांचे फोटो काढत होते, हे बघून बरं वाटलं. आम्हीही फोटो काढले. आता भूक लागली होती. सोबत घरून पार्सल आणलेला खाऊ इथंच बसून खाल्ला. महात्मा गांधींच्या पुतळ्याशेजारीच नेल्सन मंडेला यांचाही पूर्णाकृती पुतळा आहे. आम्ही तिथून चालत निघालो. रस्ता क्रॉस करताना घोडेस्वार पोलिस दिसले. इथं अजूनही काही पोलिस घोड्यांवरून गस्त घालतात. त्यात एक महिलाही होती. रस्त्याच्या पलीकडं आलो. इथं तो प्रसिद्ध टेलिफोन बूथ दिसला. लंडनमध्ये हे असे जुने लाल रंगाचे टेलिफोन बूथ अजून जपून ठेवले आहेत. लोक तिथं आत जाऊन फोटो काढत असतात. पुढं जाऊन डावीकडं वळलो, तर तिथं थेट डाउनिंग स्ट्रीटची गल्ली लागली. ‘१०, डाउनिंग स्ट्रीट’ हा ब्रिटिश पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा पत्ता. आत्ता एक भारतीय वंशाचा माणूस या पदावर असल्याचा अभिमान वाटला. थोडी ओळख काढून ऋषीभाऊंना भेटून यावं, असं वाटलं. पण तिथल्या नतद्रष्ट पोलिसांनी त्या गल्लीच्या तोंडावरच मोठं दार लावून तो रस्ता बंद केला होता. मला आणि उगाच ओळखीपाळखी सांगून, कुणाकडं जायला आवडत नाही. खरं तर आमच्याकडं तेवढा वेळच नव्हता, म्हणून मग पुढं निघालो. पुढं एक कॅव्हलरी म्युझियम लागलं. या इंग्रज लोकांना प्रत्येक गोष्टीचं संग्रहालय करायला नाद आहे. त्या घोडदळाच्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन घोडेस्वार उभे होते. लोक त्यांच्यासोबत फोटो काढून घेत होते आणि तेही निर्विकार चेहऱ्याने पोझ देत होते. (‘घोड्याच्या मागील बाजूला, शेपटीला हात लावू नये, अन्यथा लाथ बसेल’ अशी एक पुणेरी, अर्थात इंग्लिशमधली पाटीही तिथं दिसली.)

आम्हाला आता ट्रॅफल्गार स्क्वेअरला जायचं होतं. अगदी जवळ आहे, असं काकांनी सांगितलं त्यालाही बराच वेळ होऊन गेला होता. इथं चालायला लागणार हे आम्ही गृहीत धरलंच होतं. शिवाय समोर येईल तो प्रत्येक रस्ता, प्रत्येक इमारत, प्रत्येक आकाशचिन्ह आम्हाला नवीनच होतं. म्हणून आम्हीही रमतगमत चाललो होतो. मात्र, थोड्याच वेळात ‘ट्रॅफल्गार’ची मुख्य खूण असलेला तो उभा स्तंभ दिसू लागला. आमच्यासोबत चिनी विद्यार्थ्यांचा एक घोळका होता. बहुदा सहल असावी. आम्ही त्यांना पुढं जाऊ दिलं. ट्रॅफल्गार चौक भव्य होता. रस्त्यांचे दोन थर होते. ते ओलांडून आम्ही त्या चार सिंहांपाशी पोचलो. ही सिंहांची शिल्पं अतिशय भव्य आहेत. किती तरी सिनेमांत, फोटोंमध्ये पाहिलेल्या या प्रसिद्ध चौकाला अखेर माझे पाय लागले होते. शेजारीच कॅनडाचा भव्य दूतावास आहे. मागे नॅशनल गॅलरी आहे. तिथं दर्शनी भागात काही काम सुरू होतं. त्यामुळे तो भाग कापडानं झाकला होता. या चौकात जगातील सर्व देशांतील, सर्व वर्णांच्या, सर्व धर्मांच्या लोकांची गर्दी झाली होती. आपलेही लोक होतेच. या चौकात एका कोपऱ्यात एक कारंजं आहे. ते त्या वेळी बंद होतं. तसंच तिथं दर वेळी बदलून बदलून एक पुतळा असतो असं समजलं. हा परिसर रमणीय होता. लंडनमधला प्रसिद्ध लँडमार्क म्हणून इथं यायचंच होतं. तिथं थोडा वेळ बसलो. आता आम्हाला ‘मादाम तुस्साँ’ला जायचं होतं. मग अगदी त्या चौकातच असलेल्या चेरिंग क्रॉस अंडरग्राउंड स्टेशनला गेलो. इथं पुन्हा बेकरलू लाइन घेऊन बेकर स्ट्रीट स्टेशनला उतरलो. हे अंतर फार नव्हतं. आम्ही अक्षरश: पंधरा मिनिटांत इथं पोचलो. स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या शेरलॉक होम्सचा मोठा पुतळा दिसतो. आत स्टेशनमध्येही बेकर स्ट्रीट नावाशेजारी शेरलॉकचं चित्र काढलेलं आहे. शेरलॉक होम्सच्या पुतळ्यासोबत फोटो काढणं मस्टच होतं. इथूनच डावीकडे बघितल्यावर ‘मादाम तुस्साँ’चा तो फिकट हिरट्या रंगाचा डोम दिसला. आम्ही चालत तिथं पोचलो. आमची वेळ १.४५ असल्यानं तिथल्या गेटकीपर महिलेनं आम्हाला थोड्या वेळानं यायला सांगितलं. आम्ही थोडा वेळ तिथंच टाइमपास केला. शेरलॉक होम्सचं म्युझियम इथून जवळच आहे. ते निदान बाहेरून तरी बघून येऊ या, असं नील म्हणाला. पण तोवर वेळ गेला असता. मग आधी ‘मादाम तुस्साँ’ बघायचं आणि मग तिकडं जायचं असं ठरलं. इथंही सुदैवानं फार मोठी लाइन नव्हती. आम्ही लगेच आत गेलो. सिंगापूरच्या ‘मादाम तुस्साँ’त सुरुवातीला एका छोट्या बोटीनं मुख्य दारापर्यंत नेतात. जगात जिथं जिथं ‘मादाम तुस्साँ’ आहे, तिथं असेच काही तरी गमतीदार एंट्री पॉइंट केले आहेत, असं तेव्हा माझ्यासोबत असलेल्या आत्येभावानं - साईनाथनं - मला सांगितलं होतं. इथं मात्र तसं काही दिसलं नाही. आम्ही थेट वरच्या मजल्यावर गेलो. तळमजल्यावर राणी व राजघराण्यातल्या लोकांसोबत (म्हणजे त्यांच्या पुतळ्यांसोबत) फोटो काढण्याची संधी होतीच. मात्र, ‘लंडन आय’मध्ये तो प्रकार बघितलेला असल्यानं आम्ही तिकडं गेलोच नाही. 
पहिल्या मजल्यापासून पुतळ्यांना सुरुवात होते. मेणाचे हे पुतळे उत्कृष्टच आहेत.

विविध दालनांमधून त्यांची विभागवार मांडणी केली आहे. लहान मुलांना आवडेल, अशी रचना आहे. हॉलिवूड आणि पाश्चात्त्य जगाचा अर्थातच वरचष्मा आहे. शाहरुख, कटरिना व प्रियांका चोप्रा हे तीन भारतीय तिथं दिसले. कटरिना फारच गंडली होती. शाहरुख अगदी गोरापान, तर प्रियांका पूर्ण ‘हॉलिवूडी’ लूकमध्ये! त्यामुळं पुलंनी ‘अपूर्वाई’त भारतीय व्यक्तींच्या पुतळ्यांबद्दल जे लिहिले होते, त्याचीच अनुभूती आम्हाला पुन्हा इथं आली. राजघराण्याचा विभाग मात्र जबरदस्त होता. विशेषत: राणी एलिझाबेथचा पुतळा इतका हुबेहूब आणि सुंदर होता, की ती खरंच तिथं उभी आहे, असं वाटत होतं. बाकी सगळे ‘जेम्स बाँड’ ओळीनं होते, त्यात ब्रिटिश नट डॅनियल क्रेग अग्रभागी होता, तेही ठीक. इथले पुतळे काही काळानंतर बदलले जातात. त्यामुळे इथं दर वेळी वेगळे पुतळे बघायला मिळतात. याशिवाय काही दालनं नवी केली जातात, काही बदलली जातात. ‘ॲव्हेंजर्स’ किंवा अन्य सुपरहिरोंच्या विभागात बालगोपाळांची गर्दी होती. मुलांचा लाडका ‘स्पायडरमॅन’ही होता. सगळ्यांत शेवटी 'स्पिरिट ऑफ लंडन' नावाचा एक विभाग होता. तिथं छोट्या ट्रेननं फिरायचं होतं... खरं तर त्या गोल फिरणाऱ्या खुर्च्या होत्या. त्यातून सगळ्या लंडनचा इतिहास थोडक्यात, पण आकर्षक पद्धतीने दाखवला होता.
इथंही फिरता फिरता बरीच पायपीट झाली. सगळ्यांत शेवटी स्मृतिवस्तूंचं दालन होतंच. प्रत्येक गोष्टीचं व्यवसायीकरण कसं करावं, हे या इंग्लिश लोकांकडून शिकावं. आम्ही नुसताच तिथं फेरफटका मारला आणि बाहेर पडलो. आता नीलला शेरलॉक होम्सच्या त्या म्युझियमकडे जायचं होतं. मग मॅप लावून चालत तिकडे पोचलो. इथंही त्या संग्रहालयाला तिकीट होतं. त्यामुळं आम्ही बाहेरूनच ते बघितलं. फोटो वगैरे काढले. आता आम्हाला हर्षनं एके ठिकाणी यायला सांगितलं होतं. तिथं तो, अनुजा आणि काकू येणार होते. आम्हाला बसनं तिथं जाणं सोयिस्कर होतं. मग आम्ही बसस्टॉप शोधला आणि युस्टनकडे जाणारी बस पकडून हर्षच्या कॉलेजच्या जवळ (युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचं हॉस्पिटल होतं त्यासमोर) युस्टन स्क्वेअरला उतरलो. त्यांना यायला वेळ होता. मग तिथं जरा टाइमपास केला. थोड्याच वेळात ते तिघं बसनं आले आणि समोरच्या बाजूला उतरले. त्या रस्त्यावर ग्रेड सेपरेटर होता. त्यामुळं चौकापर्यंत जाऊन रस्ता ओलांडला आणि मग त्यांना भेटलो. इथंच ते भव्य हॉस्पिटल होतं. 

हा सगळा हर्षच्या यूसीएलचा परिसर होता. मला त्याचं कॉलेज, विद्यापीठ, तो शिकला ती जागा, आता तो शिकवतो ती जागा हे सगळं बघण्यात इंटरेस्ट होता. शिवाय त्यानिमित्तानं लंडनमधलं एक शैक्षणिक संकुल बघता येणार होतं. हर्षनंही सर्व ठिकाणं फिरून दाखवली. आम्ही ‘यूसीएल’च्या मुख्य इमारतीसमोर आलो. तिथं अनेक विद्यार्थी पदवीप्रदान झाल्यानंतर घालतात, तसा काळा गाऊन घालून फोटो काढत होते. मुख्य इमारतीसमोर ‘UCL’ अशी अक्षरं लावली होती. त्यांच्यासमोर मुलं फोटो काढत होते. त्या सर्व परिसरात चैतन्याचं वातावरण होतं. आम्ही ती इमारत आतून फिरून बघितली. तिथले वर्ग, लायब्ररी, कॅफेटेरिया सगळं बघितलं. तिथल्या कॅफेटेरियात बसून कॉफीही घेतली. इथं तुम्ही स्वत:चा मग आणलात तर कमी पैसे पडतात. ‘यूज अँड थ्रो’चा मग हवा असेल तर जास्त पैसे! एकूण प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत पर्यावरणाचा विचार दिसत होता.
हर्षबद्दल इथं सांगायला पाहिजे. हर्षवर्धन काकांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून हुशार. अकरावीत असताना ‘रोटरी यूथ एक्स्चेंज’अंतर्गत थेट अर्जेंटिनाला गेला होता. नंतर मुंबई विद्यापीठात आर्किटेक्चरमध्ये पहिला आला व सुवर्णपदक मिळवलं. तिथून ‘यूसीएल’मध्ये पीएचडी करण्यासाठी आला. शहरांचे नियोजन व शाश्वत विकास या विषयात त्याचा अभ्यास आहे. (पुण्याला त्याच्यासारख्या अभ्यासकांची आणि नियोजनकर्त्यांची आता खरी गरज आहे.) त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर व तो ‘डॉ.’ झाल्यावर त्या विद्यापीठाने त्याला तिथंच शिकवण्याची संधी देऊ केली. त्याची पत्नी अनुजा हीदेखील आर्किटेक्ट असून, लंडनमध्ये जॉब करते. खरं सांगायचं तर हे दोघं लंडनमध्ये राहतात आणि त्यांनी मोठ्या प्रेमानं आम्हाला तिथं बोलावलं म्हणून आमचं ‘लंडन घडलं’! यात किंचितही अतिशयोक्ती नाही.
हर्षनं नंतर तो आधी जिथं शिकायला होता, तो कॅम्पस दाखवला. तिथं एक बाग आहे. त्या बागेत महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा आहे. हे दोघेही ‘यूसीएल’मध्ये काही काळ शिकले म्हणून त्यांचे पुतळे! नूर इनायत खानचाही पुतळा एका कोपऱ्यात दिसला. ही ब्रिटिशांची हेर होती. तिची स्टोरी मला माहिती होती म्हणून पुतळ्याविषयी जरा उत्सुकता वाटली. दुसऱ्या महायुद्धात हिने ब्रिटिशांसाठी फ्रान्समध्ये हेरगिरी केली होती आणि तिथं तिला पकडण्यात आलं होतं आणि ठार मारण्यात आलं होतं.

या बागेतून बाहेर पडून आम्ही चालतच ब्रिटिश लायब्ररीत गेलो. मला ब्रिटिश लायब्ररी बघायची उत्सुकता होतीच. ब्रिटिश लायब्ररीचे भव्य प्रवेशद्वार आणि आतील तशीच सुंदर व भव्य इमारत बघून मी थक्क झालो. दारातच एका माणसाचा वाकून पुस्तक वाचतानाचा प्रचंड मोठा पुतळा आहे. आम्ही चाललो होतो, त्याखाली लायब्ररीचे अतिप्रचंड स्टोअरेज आहे, असे हर्षने आम्हाला सांगितले. आम्ही लायब्ररीच्या आत गेलो. तिथं डाव्या बाजूला एक छोटंसं संग्रहालय आहे. ते बघितलं. तिथं आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांपासून जगभरातील अतिप्राचीन ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. ल कार्बुजिए यांनी तयार केलेला चंडीगडच्या डिझाइनचा नकाशाही इथं बघायला मिळाला. बाहेर लायब्ररीच्या मध्यवर्ती भागात राजाने ग्रंथालयाला भेट दिलेली प्रचंड ग्रंथसंपदा काचेच्या उभ्या दालनात ठेवली आहे. तिची उंचीच साधारण तीन-चार मजल्यांएवढी होती. ब्रिटिश लायब्ररीत एका कोपऱ्यात वेगवेगळ्या देशांचे स्टॅम्प होते. त्यासाठीचा कॅटलॉग भिंतीतून बाहेर काढण्याची सोय होती. तिथंच एका जुन्या छपाईयंत्राचं मॉडेलही होतं. आम्ही या लायब्ररीचा दहा टक्केही भाग बघितला नाही. या इमारतीमागे आणखी किती तरी दालनं होती, असं समजलं. आमच्या पायांतले त्राण आता गेले होते. त्यामुळं नाइलाजानं इथून बाहेर पडलो. मला पुण्यातले सुरुवातीचे दिवस आठवले. माझ्या ट्रेनिंग काळात मला फर्ग्युसन रोडवरच्या ब्रिटिश लायब्ररीत जाण्याची संधी एकदा मिळाली होती. आमचे सर राजीव साबडे यांनी मला तिथून एक बातमी करायला सांगितली होती. तिथल्या ग्रंथपाल अनिल बक्षी यांना भेटून मी ती बातमी केली होती. (त्या महिला असूनही त्यांचं नाव ‘अनिल’ कसं, याचं मला खूप आश्चर्य वाटलं होतं आणि मी दोनदोनदा त्यांना नाव विचारून खात्री करून घेतली होती.) तेव्हा पुण्यातल्या, तुलनेनं छोटा व्याप असलेल्या त्या ब्रिटिश लायब्ररीतही मी दबून गेलो होतो. तिथल्या सभासदत्वासाठी कसं अनेक महिने वेटिंग असतं, वगैरे दंतकथाही आम्ही अनेक जणांकडून ऐकल्या होत्या. या पार्श्वभूमीवर लंडनच्या मूळ ब्रिटिश लायब्ररीत कधी जायला मिळेल, असं मला वाटलंही नव्हतं. पण आज तेही स्वप्न असं साकार झालं होतं! त्या ज्ञानसिंधू इमारतीला मनोमन नमस्कार करून बाहेर पडलो. 

आता इथून आमची पदयात्रा निघाली ती किंग्ज क्रॉस स्टेशनकडं. किंग्ज क्रॉस व सेंट पॅनक्रास ही नावं जोडीनं घेतली जातात. दोन्ही स्टेशन शेजारी शेजारी आहेत आणि आतून जोडलेली आहेत. सेंट पॅनक्रास स्टेशनवरून अन्य शहरांत (किंवा कदाचित परदेशात - विशेषत: पॅरिसला) ट्रेन जातात. थोड्याच वेळात हे स्टेशन आलं. आधी याच नावाचं एक भव्य हॉटेल दिसलं. हे स्टेशन आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारखंच दिसत होतं. लाल रंगाचं हे हॉटेल आणि स्टेशन ओलांडून पुढच्या चौकात आलो, की जरा आधुनिक चेहरा असलेलं किंग्ज क्रॉस स्टेशन दिसलं. हेही चांगलं मोठं होतं. इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे ‘हॅरी पॉटर’मधला तो प्रसिद्ध पावणेदहा क्रमांकाचा प्लॅटफॉर्म. इथं बाहेरच्या बाजूलाच तो प्लॅटफॉर्म केला असून, भिंतीत ती ट्रॉली निम्मी आत घुसलेली आहे, असं शिल्प केलेलं आहे. त्यामुळं इथं मुलांची नेहमी गर्दी असते. आम्ही गेलो, तेव्हाही तिथं फोटो काढण्यासाठी रांग होती. आम्ही लांबूनच फोटो काढले. आम्ही एवढे दमलो होतो, की समोर दिसलेल्या बाकड्यांवर संधी मिळताच सगळ्यांनी बसून घेतलं. 

इथून आम्ही चालत 'कोल ड्रॉप यार्ड' नावाच्या भागात गेलो. चालत जाताना 'गुगल'चं इथलं मोठं ऑफिस लागलं. पुढे 'ग्रेनरी गार्डन' नावाचा भाग लागला. तिथं जमिनीच्या लेव्हलला मस्त कारंजी केली होती. लहान मुलं तिथं हुंदडत होती; खेळत होती. सांभाळायला त्यांचे बाबा होते. शेजारीच बागेसारखी जागा केली होती. तिथं बसून आम्ही सोबत आणलेलं खाल्लं. पुढं तो कोल ड्रॉप यार्डमधे केलेला मॉल होता. तिथंही खाली भरपूर रेस्टॉरंट होती. आम्ही तिथून एक चक्कर मारली व परत आलो. आज भरपूर पायपीट झाली होती. आता घरी जायचे वेध लागले होते. परत चालत किंग्ज क्रॉस स्टेशनला आलो. हे स्टेशन अवाढव्य आहे. आम्ही कार्ड पंच करून आत प्रवेश केल्यानंतरही आत बराच भुलभुलय्या होता. अर्थात सर्वत्र दिशादर्शक पाट्या होत्या. अखेर बरंच चालल्यावर आमची पिकॅडिली (होम) लाइन आली. मग तिथून अंडरग्राउंड ट्रेन पकडून मेनर हाऊसला उतरलो. बागेतून चालत हर्षच्या घरी आलो तेव्हा पायांना फोड आले होते. मात्र, दिवसभर ‘पाळणा, पुतळे आणि प्रज्ञास्थळे’ यांच्या भेटीचा आनंद दुखऱ्या पायांहून किती तरी अधिक होता...


(क्रमश:)


----------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


--------------







2 comments:

  1. लंडनचे P.P.P. चे वर्णन खूप सुरेख👌👌👌👏👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद वीणाताई!

      Delete