13 Sept 2023

लंडनवारी - भाग ८

लॉर्ड्स ते ‘माउसट्रॅप’ व्हाया डॉ. बाबासाहेब...
------------------------------------------------


लंडन, मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३.


लंडनला आल्यावर ‘मस्ट वॉच’च्या यादीत ‘लॉर्ड्स’ असणारच होतं. किती लहानपणापासून या मैदानाच्या दंतकथा ऐकल्या होत्या! आपण आपला पहिलावहिला वर्ल्ड कप १९८३ मध्ये याच मैदानात उंचावला. मी तेव्हा तिसरीत होतो. मात्र, मला तेव्हाची काहीच आठवण नाही. ती फाइल माझ्या मेंदूतून कायमची डिलीट झालीय आणि याची मला फार खंत आहे. मला १९८१, ८२ च्या घटना आठवतात. मात्र, १९८३ चा वर्ल्ड कप काही केल्या आठवत नाही. नुकत्याच आलेल्या ‘८३’ या सिनेमामुळं या सगळ्या गोष्टी (म्हणजे काही आठवत नाहीय असं) पुन्हा आठवल्या. त्यामुळं जखमेवर मीठच चोळलं गेलं. आता प्रत्यक्ष लॉर्ड्सवर जाऊनच या पापाचं क्षालन करणं गरजेचं होतं. मी लॉर्ड्सची डे टूर शुक्रवारीच बुक केली होती. काका आमच्यासोबत येणार होतेच. इथं डे टूर म्हणजे १०० मिनिटांची टूर! त्यासाठी ३० पौंड तिकीट होतं. ज्येष्ठ नागरिकांना २३.५० पौंड होतं. तिकीट काढल्याबरोबर मला एमसीसीकडून कन्फर्मेशनची मेल आली. एमसीसी म्हणजे मेरिलिबोन क्रिकेट क्लब. लॉर्ड्सचं मैदान या क्लबच्या मालकीचं आहे. (खरं म्हणजे होतं, असं म्हणायला पाहिजे. कारण प्रत्यक्ष मैदानात गेलो तेव्हा जे. पी. मॉर्गन या अमेरिकी बँकेचा लोगो सर्वत्र दिसत होता. थोडक्यात, या मैदानाचे सर्वेसर्वा प्रायोजक आता ही बँक होती.) असो. एमसीसी म्हणजे टिपिकल ब्रिटिश क्लब. त्यांच्या मेलमधल्या (पुणेरी वाटतील अशा) सूचना वाचून त्याची खात्रीच पटली. अमुक वाजता गेटवर या, त्या अमक्या गेटनं न येता ‘ग्रेस गेट’नं (महान इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांच्यावरून दिलेलं नाव) या, आल्यावर अमुक करा, तमुक करा, अगदी वॉशरूमला कधी जाऊन या, पाण्याची बाटली ठेवा, संग्रहालय कधी पाहा अगदी अशा बारीक-सारीक सूचना वाचून आज लंडनमध्ये पहिल्यांदाच अस्सल इंग्लिश बाण्याचा अनुभव येणार, याची खात्री पटली. 
दहा वाजता पोचायचं म्हणून आम्ही भराभर आवरलं. मात्र, लॉर्ड्सला जाण्यासाठी सोयीची अंडरग्राउंड ट्रेन नाही. बसने बराच वेळ लागेल, असं दाखवत होते. मग अनुजाने आम्हाला टॅक्सी बुक करून दिली. इथं टॅक्सीत अजून बसलो नव्हतो, आता तोही अनुभव घेता आला. ‘उबर’ची टॅक्सी पाच मिनिटांत दारात आली. ड्रायव्हरकाका थोडे वयस्कर, गोरेपान होते. पन्नास ते साठच्या दरम्यान वय असावं. मात्र, ब्रिटिश वाटत नव्हते. मी पुढे त्यांच्याशेजारी बसलो होतो. हे ड्रायव्हरकाका मला इजिप्शियन किंवा तुर्की असावेत, असं वाटलं. त्यांचं नावही त्या मेसेजमध्ये आलं होतं. आता लक्षात नाही. काका चांगली जोरात टॅक्सी हाणत होते. एक-दोनदा त्यांनी जरासं चिडून हॉर्नही वाजवला. एकदा पिवळा दिवा लागल्यावर त्यांनी टॅक्सी जोरात दामटली, तेव्हा तर काका काही काळ भारतात राहून गेले असावेत, अशी शंका यायला लागली. लंडनमध्ये बघितलेला हा एकमेव ‘फॉल्ट’! असो. टॅक्सी केल्याचा एक फायदा असा झाला, की आम्ही फारच लवकर, म्हणजे साडेनऊ वाजताच त्या ‘ग्रेस गेट’वर पोचलो. तिथं अजून कुणी झाडायलाही आलं नव्हतं, असं म्हणायला नको, म्हणून एक कर्मचारी खरोखर ते गेट झाडत होता. आमच्या ड्रायव्हरकाकांचे पैसे अनुजानं आधीच दिले होते. १५ पौंड लागले. चौघांचा हिशेब केला तर ट्रेनएवढेच पैसे लागले. आम्ही भारतातून आलोय हे काकांनी कधीच ओळखलं होतं. त्यामुळं उतरताना आवर्जून ‘नमस्ते’ म्हणाले. (इकडे बऱ्याच लोकांना हिंदी किंवा भारतीय भाषा कळतात, असं मला नंतर कुणी तरी सांगितलं. ते खरंच असावं.) 
आम्ही त्या ‘ग्रेस गेट’च्या समोरच्या रस्त्यावर ऐसपैस फूटपाथ होता. तिथं एका बाकावर बसकण मारली. मला आणि काकांना बसवेना, म्हणून आम्ही जरा त्या रस्त्यानं पुढपर्यंत चालायला गेलो. लता मंगेशकरांचा लॉर्ड्सच्या समोरच फ्लॅट आहे, हे मला माहिती होतं. समोरच्या बाजूला बऱ्याच रहिवासी इमारती होत्या. आपल्याकडच्या कर्वेनगर, आयडियल कॉलनी किंवा दादर, पार्ल्यात आलोय की काय, असं वाटायला लागलं. एकूण हा सेंट जॉन्स वूड रोडचा सगळा परिसर उच्चभ्रू वाटत होता. आम्ही त्या रस्त्याच्या टोकावर गेलो आणि परत आलो. येताना एका घरावर देवनागरीत ‘श्री गोपालकृष्ण’ की असंच काही तरी लिहिलेलं बघून गंमत वाटली. (फोटो काढला नाही, कारण इथं खासगी घरं, व्यक्ती यांचे फोटो काढायचे आम्ही टाळत होतो. लोकांना ते आपल्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण वाटूच शकतं.) परत ग्रेस गेटवर आलो, तो थोडे फार पर्यटक दारात येऊ लागले होते.
आम्ही बरोबर दहा वाजता आत शिरलो. आमचं तिकीट चेक करून झाल्यावर आत सोडलं. गळ्यात घालायला प्रत्येकाला एक पास दिला. उजव्या बाजूला वॉशरूम होती. बहुतेक लोक आल्यावर विचारत असावेत, म्हणून तिथला कर्मचारी आधीच ‘तिकडं आहे, जाऊन या’ असं सांगत असावा. जणू कार्यक्रमाचा एक भाग असावा, अशा पद्धतीने आम्ही तिकडं जाऊन आलो. मग दहा ते साडेदहा तिथलं म्युझियम बघा, असं सांगण्यात आलं. बरोबर साडेदहा वाजता आमची टूर सुरू होणार होती. आम्ही चालत त्या छोटेखानी संग्रहालयात गेलो. गेल्या गेल्या डिकी बर्डचा छोटासा अर्धपुतळा बघितला. बहुतेक भारतीय मुलांसारखा मीही लहानपणापासून क्रिकेटवेडा. आम्ही लहानपणी दुसरा कुठलाही खेळ खेळला नाही. आम्ही अहोरात्र आमच्या वाड्यात, शाळेच्या मैदानावर फक्त क्रिकेट खेळलो. नंतर प्रत्यक्ष खेळणं कमी झालं तरी खेळाविषयी बाकी माहिती भरपूर! अनेक सामने टीव्हीवर पाहिलेले बारीकसारीक तपशिलांसह लक्षात आहेत. गावातल्या ग्रंथालयात जाऊन षटकार, चौकार, क्रीडांगण, स्पोर्ट्सस्टार आवर्जून वाचायचो. दिलीप प्रभावळकर, शिरीष कणेकर यांचं लिखाण विशेष आवडायचं. वर्तमानपत्रांत अर्थात बाळ ज. पंडित आणि वि. वि. करमरकर हे आमचे आवडते लेखक, पत्रकार होते. रेडिओवरही त्यांचं मराठीतील ‘धावतं समालोचन’ लहानपणी अनेकदा ऐकलं होतं. त्यामुळं माझी अवस्था लॉर्ड्सवर पंढरपुरात पहिल्यांदा पाय ठेवलेल्या त्या भाबड्या भाविकासारखी झाली होती. जो दिसेल त्या कळसाला गहिवरून नमस्कार आणि जी दिसेल त्या व्यक्तीला ‘माऊली’ म्हणून हात जोडणं अशीच माझी स्थिती झाली होती. लॉर्ड्सवरच्या त्या भिंतींनी, त्या मैदानाने, तिथल्या गवताच्या पात्यांनी काय काय बघितलं असेल, या विचाराने मन भारावलं होतं. ते छोटेखानी संग्रहालय छानच होतं. तिथंच आपल्या कपिलनं जिंकलेल्या प्रुडेन्शिअल करंडकाची प्रतिकृती होती. कपिलची माहिती होती. गांगुलीनं २००२ मध्ये अंगातला जो शर्ट काढून गरागरा फिरवला होता, तो शर्टही होता. ॲशेसची प्रतिकृती होती. अनेक खेळाडूंच्या वस्तू - पॅड्स, ग्लोव्हज, शूज, स्टंप, बॉल आणि अर्थात बॅट तिथं ठेवल्या होत्या. मला सगळेच खेळाडू माहिती होते. एकेक वस्तू आणि तिथली माहिती वाचताना माझं मन भूतकाळात जात होतं. थोड्याच वेळात तो अर्धा तास संपला आणि आम्हाला बाहेर बोलावण्यात आलं. सर्व पर्यटकांचे दोन गट करण्यात आले आणि दोन गाइडनी त्या गटांना आपल्या ताब्यात घेतलं. आमचा गाइड माइक नावाचा एक दाढीवाला गृहस्थ होता. हाही बऱ्यापैकी वयस्कर असावा. पन्नाशीपारचा तर नक्कीच. हा टिपिकल इंग्रज होता. त्याच्या बोलण्यात तो सुप्रसिद्ध ‘ब्रिटिश ह्यूमर’ आला, तशी मला खात्री पटली, की पुढची १०० मिनिटं मस्त जाणार. आम्ही भारतातून आलो होतो, तसा एक जण मेलबर्नवरून आला होता. मग त्यानं त्या माणसाला आणि आम्हाला पुढच्या टूरमध्ये विशेष टोमणे मारले आणि चेष्टाही केली. अर्थात भारतीय क्रिकेट व क्रिकेटपटूंविषयी त्याला चांगलीच माहिती होती, यात शंका नाही. मीही त्याला तोडीस तोड उत्तरं देत होतो. नंतर मी त्याच्याबरोबर स्वतंत्रपणे गप्पाही मारल्या. 

लॉर्ड्सची ती प्रसिद्ध लाँगरूम, तिथं लावलेली आपल्या कपिल व वेंगसरकरची तैलचित्रं, जिन्यात लावलेली नामवंत खेळाडूंची पोर्ट्रेट्स, पाहुण्या संघाची ड्रेसिंग रूम, इंग्लिश टीमची ड्रेसिंग रूम हे सगळं बघून मी भारावून गेलो, यात वाद नाही. पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये, लॉर्ड्सवर शतकं केलेल्यांची आणि एका डावात पाचहून अधिक बळी घेतलेल्यांची नावे फलकावर लावली आहेत. आपल्या कर्नल वेंगसरकरनं लॉर्ड्सवर तीन शतकं ठोकली आहेत. गावसकरला भारताकडून खेळताना इथं शतक नाही काढता आलं, पण १९८७ मध्ये एमसीसीच्या द्विशतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित एमसीसी विरुद्ध शेष विश्व या कसोटी सामन्यात गावसकरनं १८८ धावा चोपून ती कसर भरून काढली होती. विशेष म्हणजे या सामन्यात त्याला बाद केलं होतं ते शेष विश्व संघाकडून खेळणाऱ्या रवी शास्त्रीनं. ‘भारतीय लोकांनी गांगुली गॅलरी आवर्जून जाऊन पाहा,’ असं माइकनं सांगितलं, तेव्हा आम्ही ती गॅलरी जाऊन बघितली. कपिलला वर्ल्ड कप दिला ती मिडल गॅलरी. ती बरीच मोठी आहे. मात्र, ती आत्ता बंद होती व आम्हाला तिथं जाता आलं नाही. अर्थात ‘गांगुली गॅलरी’च्या ती अगदी शेजारीच आहे. मी माइकला आवर्जून सांगितलं, की गांगुलीची ती कृती म्हणजे फ्लिंटॉफनं मुंबईत केलेल्या तशाच कृतीचं प्रत्युत्तर होतं. त्यावर तो म्हणाला, ‘मी हे एरवी सांगतो लोकांना... आजच बोलायचं विसरलो. बाकी मला व्यक्तिश: फ्लिंटॉफ अजिबात आवडत नाही.’ आता तो मला हे तोंडदेखलं म्हणाला, की खरंच विसरला, हे ‘लॉर्ड’च जाणे! लॉर्ड्सचं मैदान त्या लाँगरूममधून अतिशय सुरेख दिसत होतं. आज सामना नव्हता, त्यामुळं मैदानात कुणीच नव्हतं. खरं तर इथं एखादा स्थानिक का होईना, सामना सुरू असताना यायला हवं होतं असं मला वाटून गेलं.
दोन्ही गटांना आलटून पालटून या ड्रेसिंग रूम व लाँग रूम दाखविण्यात येत असल्यानं आम्ही थोड्या वेळानं पुन्हा संग्रहालयात गेलो. तिथून मग समोरच्या बाजूला असलेल्या मीडिया सेंटरमध्ये आम्हाला (मैदानाच्या बाहेरून वळसा घालून) नेण्यात आलं. तिथं खरं तर लिफ्ट होती. पण आम्ही पायऱ्या चढून गेलो. बऱ्याच पायऱ्या होत्या. त्यामुळं त्या मीडिया सेंटरमध्ये पोचेपर्यंत बरीच दमछाक झाली. तिथल्या खुर्च्यांवर जाऊन टेकलो. अनेकदा थेट प्रक्षेपणात पाहिलेल्या या मीडिया सेंटरमध्ये आज प्रत्यक्ष हजेरी लावण्याचा, तिथं बसण्याचा योग आला होता. हे काचेचं, आडवं, लांबड्या कॅप्सूलसारखं मीडिया सेंटर इथं आधी नव्हतं. १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप भरला होता, त्यानिमित्ताने ते बांधण्यात आलं. मला हे बातम्यांत वाचल्याचं व्यवस्थित आठवत होतं. या मीडिया सेंटरच्या डिझाइनसाठी स्पर्धाही झाली होती. एका चेक आर्किटेक्ट दाम्पत्याने ती जिंकली, असं माइकने सांगितलं. लॉर्ड्सच्या मैदानाला उतार आहे. तो इथून नीट दिसत होता. मैदानाची एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा तब्बल आठ फुटांनी उंच आहे. सचिन तेंडुलकरला या मैदानावर फारसं यश मिळालं नाही. त्याच्या इथल्या सर्वोच्च धावा आहेत ३७. या उतारामुळं त्याला त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळता यायचं नाही, असं तो बोलून दाखवायचा, असं माइकने सांगितलं. नशीब कसं असतं बघा. जे सचिनला जमलं नाही, ते आगरकरला जमलं. आगरकरचं लॉर्ड्सवर शतक आहे चक्क! त्यापूर्वी तो सात वेळा शून्यावर बाद झाला होता. माइकनं ड्रेसिंग रूममध्ये आम्हाला ही माहिती दिली, तेव्हा मी आता आगरकर भारताच्या निवड समितीचा अध्यक्ष झाल्याचं सांगितलं. माइकसाठी ही माहिती नवी होती. पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या शतकांची यादी आहे, तर यजमान संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये इंग्लिश खेळाडूंची यादी आहे. या दोन्ही यादीत कॉमन नाव कुणाचं आहे, असं माइकनं विचारलं. मी दुलीपसिंहजींचं नाव घेतलं. कारण ते तिथं दिसतच होतं. मात्र, या प्रश्नाचं उत्तर होतं गॉर्डन ग्रिनीज. त्यानं वेस्ट इंडिजकडूनही शतक केलं होतं आणि १९८७ च्या त्या सामन्यात एमसीसीकडूनही शतक केलं होतं. त्यामुळं त्याचं नाव दोन्हीकडच्या यादीत शतकवीर म्हणून होतं. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे शतकवीर व पाच बळी या दोन्ही यादींत समाविष्ट असलेले एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे विनू मांकड. माइकनं त्यांचंही नाव घेतलं आणि ‘मांकडिंग’साठीच त्यांचं नाव घेतलं जातं, हे दुर्दैवी आहे, असंही तो म्हणाला. माइक हा पक्का क्रिकेटवेडा होता. त्यामुळं आमच्या अवांतर गप्पाही खूप झाल्या. मी पुण्याहून आलोय म्हटल्यावर ‘पुणे इज ए नाइस प्लेस’ म्हणाला. आता तो इंग्लंडच्या टीमबरोबर भारतात येणार आहे. त्यातही हैदराबाद आणि धरमशालाला तो जाणार होता. ‘पुणे वर्ल्ड कपच्या पाच मॅचेस होस्ट करतंय’ असं मी सांगितल्यावर ‘मग तर पुण्याला यायलाच पाहिजे,’ असं म्हणाला. संग्रहालयात भारताने जिंकलेल्या कपचा विषय निघाला. तेव्हा माइकनं लॉर्ड्सची प्रेक्षकक्षमता किती आहे, असा प्रश्न विचारला. मी ‘२७ हजार’ असे सांगितल्यावर त्यानं ‘३१ हजार’ असं सांगितलं. वर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता एक लाख ३२ हजार आहे, असं सांगून, एवढ्या प्रेक्षकांसमोर इंग्लंडचा संघ ट्रॉफी उंचावणार, ही अभिमानाचा गोष्ट असेल ना, असा खास, ब्रिटिश खवचट विनोदही त्यानं केला. मी जोरात ओरडून, ‘नाही, नाही... भारतच वर्ल्ड कप उचलणार तिथं, पण तुम्ही बघायला नक्की या,’ असं सांगितल्यावर सगळे हसले. ऑस्ट्रेलियातून आलेल्या माणसालाही तो असंच चिडवत होता. मात्र, त्या माणसाला माझ्याइतकी क्रिकेटमध्ये गती नव्हती. त्यामुळं तो सामना फारसा रंगत नव्हता. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ‘ॲशेस’ असं नाव का पडलं, हेही तिथं लिहिलं आहे. १८८२ मध्ये ओव्हलवर झालेली कसोटी इंग्लंड हरलं. तेव्हा एका समीक्षकानं ‘आज इंग्लंड क्रिकेट ओव्हल येथे मरण पावलं. दहनविधी इंग्लंडमध्ये होणार असून, ॲशेस ऑस्ट्रेलियात नेल्या जातील,’ असं संतापून लिहिलं होतं. ते कात्रण तिथं काचेत ठेवलंय. त्यावरून नंतर या दोन्ही संघांच्या कसोटी मालिकेला ॲशेस म्हणण्यात येऊ लागलं. ॲशेसची एक अगदी छोटी प्रतिकृती तिथं होती. (ओरिजनल ऑस्ट्रेलियाकडं आहे; आमच्याकडं कधी येणार, काय माहिती? असंही माइक विनोदानं म्हणाला.) नीलनं त्या ट्रॉफीसोबत फोटो काढून घेतला. एकूण इथं आम्ही क्रिकेटमय होऊन गेलो होतो.

एमसीसी पूर्वी जरा कर्मठ, रुढीवादी अशी संस्था होती. आता ती हळूहळू बदलत आहे. स्त्रियांना पूर्वी मेंबरशिप नसायची. नंतर ती मिळू लागली. एवढंच नव्हे, तर इंग्लंडच्या महिला टीमची कर्णधार एमसीसीची अध्यक्षही झाली. श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा हाही आत्ता या एमसीसीचा अध्यक्ष होता. त्यानं इथं बऱ्याच सुधारणा केल्या, असं माइक सांगत होता. या मीडिया सेंटरच्या वर कॉमेंटरी बॉक्स होता. तिथंच आपले गावसकर, हर्षा भोगले, रवी शास्त्री आदी मंडळी बसून कॉमेंटरी करतात. अर्थात, तिथं बरीच इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असल्यामुळं आम्हाला त्या मजल्यावर जायला परवानगी नव्हती. मला गावसकरचा एमसीसीचा किस्सा आठवला. एमसीसीनं गावसकरला मानद सदस्यत्व देऊ केलं होतं. मात्र, त्यांच्या ज्या काही रुढीवादी अटी-शर्ती होत्या (कोट-टाय घालून यायचं वगैरे) त्या गावसरकरला काही आवडल्या नाहीत आणि त्यानं हे सदस्यत्व चक्क नाकारलं. सचिन मात्र मानद सदस्य आहे आणि तो नेहमी इथं येतो. इथं त्याला आवडतं, असं माइक सांगत होता.
नंतर आम्ही खाली उतरून अगदी मैदानावर गेलो. मैदानाच्या अगदी लगत असलेल्या खालच्या खुर्च्यांवर बसता आलं. तिथं फोटोसेशन करणं प्राप्तच होतं. मैदानावरची ती हिरवळ मनाला मोहवत होती. एकदा तरी या मैदानावर खेळता यायला पाहिजे होतं, असं वाटलं. (मन कसं असतं पाहा. आधी हे लॉर्ड्स बघितलं नव्हतं, तेव्हा आयुष्यात निदान एकदा तरी तिथं जावं, एवढंच वाटत होतं. आता आलोय तर हिरवळीवर कधी खेळू असं वाटू लागलं. खेळायलाही मिळालं असतं तर नक्कीच शतक तरी व्हावं, असंच वाटलं असतं.) या मैदानात पूर्वी एक झाड होतं. आणि इंग्लंडमध्ये पर्यावरणाला अतोनात महत्त्व असल्यानं ते झाड तसंच ठेवण्यात आलं होतं. सीमारेषा त्या झाडाला ॲडजस्ट करून आखण्यात आली होती, असा किस्सा मी पूर्वी वाचला होता. आता मात्र ते झाडही मला तिथं दिसलं नाही आणि तिथल्या एका अधिकारी माणसाला (तो भारतीयच वाटत होता...) त्याबद्दल विचारलं, तर त्यालाही काही माहिती नव्हतं. त्यामुळं ती उत्सुकता तशीच राहिली. लॉर्ड्सवर प्रत्येक कसोटी सामना सुरू होताना बेल वाजविली जाते. ही बेल वाजवण्याचा मान मिळणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. ती घंटा आम्हाला दूरवरूनच दाखविण्यात आली. 
आता आम्ही बाहेर आलो. टूर इथंच संपली होती. बाहेर क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांचे झेंडे फडकत होते. आपला तिरंगाही तिथं होता. मग त्यासोबत फोटो काढले. माइक आम्हाला इथंच बाय करून निघून गेला. आम्ही दुसऱ्या बाजूच्या गेटनं बाहेर पडलो.

इथं जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, असं कळलं होतं. मग ‘सिटी मॅपर’वर बघून बसनं तिकडं गेलो. तीन स्टॉप गेल्यावर ‘लंडन झू’पाशी उतरलो. वास्तविक हे झू आम्हाला अचानकच लागलं होतं. ते बघायला जावं अशी अतोनात इच्छा झाली. पुलंनी ‘अपूर्वाई’त वर्णन केलेला ‘आपल्याकडं बघूनही न बघितल्यासारखं करणारा हिंदी कावळा’ बघायची फार इच्छा होती. मात्र, आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. मग चालत तिकडं गेलो. प्राइमरोज हिल भागात किंग हेन्रीज रोड इथं हे स्मारक आहे. ही दुमजली वास्तू महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये विकत घेतली. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन तेव्हा झालं होतं. डॉ. बाबासाहेब इथं १९२० ते २१ असं एक वर्ष राहिले होते. इथं आत गेल्यावर आमच्यासारखीच आणखी एक मराठी फॅमिली संग्रहालय बघायला आलेली दिसली. (हिंदी कावळ्यासारखंच त्यांनीही आमच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं, तो भाग वेगळा!) तिथल्या रजिस्टरमध्ये आमची नावं नोंदविली. त्या फॅमिलीचं नाव आमच्या वरतीच होतं. ते लंडन परिसरातच राहत असावेत, असं कळलं. असो. हे स्मारक नीटनेटकं आहे. दोन मजले फिरून आम्ही सर्व पाहिलं. आंबेडकरांच्या नेहमीच्या वापरातल्या वस्तू, त्यांचं बेड, त्यांचा टी-सेट असं सगळं तिथं व्यवस्थित जतन करून ठेवलं होतं. अर्थात त्यांची विपुल ग्रंथसंपदा आणि आपली राज्यघटना होतीच. या इमारतीला खाली उतरणारा टिपिकल ब्रिटिश घरांत दिसणारा गोल जिना होता. इथं येऊन हे स्मारक बघितलं, याचं बरं वाटलं. असंच इथलं सावरकरांचं घरही बघायचं होतं. मात्र, काकांनी ते पूर्वी पाहिलं होतं. तिथं अन्य कुणी तरी लोक राहतात आणि त्या वास्तूवर केवळ नीलफलक लावला आहे, असं काकांचं म्हणणं होतं. त्यामुळं तिथं जायचं राहिलं. महाराष्ट्र सरकारने तीही वास्तू विकत घेऊन सावरकरांचं असंच सुंदर स्मारक तिथं करायला काय हरकत आहे? असो. 

आम्ही इथून बाहेर पडलो. तिथल्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी रेस्टॉरंट होती आणि रस्त्यावर टेबल-खुर्च्या टाकून लोक जेवत होते. आम्हालाही भूक लागली होती. मात्र, हवी तशी डिश कुठे मिळेना. शेवटी एका फळाच्या दुकानांत जाऊन भरपूर द्राक्षे घेतली आणि तीच खाल्ली. सोबत आमचं पार्सल होतंच. आता आम्हाला घरी जायचे वेध लागले होते. इथलं जवळचं स्टेशन होतं चॉक फार्म. मग तिथपर्यंत पायी निघालो. वाटेत आणखी एक सुपर मार्केट लागलं. तिथं काही खायला (तयार) मिळतंय का, हे पाहायला हे तिघे आत शिरले. तिथला विक्रेता एक गुजराती मुलगा होता. त्याला आम्हाला ‘व्हेज’ पाहिजे म्हणजे काय, हे नीट समजलं. तोही व्हेजिटेरियनच होता. त्यानं आम्हाला हवे ते सँडविच काढून दिले. तिथं समोसाही होता. मात्र, तो एकच होता व अति तेलकट होता. मग आम्ही सँडविच घेतली आणि बाहेर पडलो. चॉक फार्म स्टेशन हे नॉर्दर्न लाइनवर आहे. इथून आम्ही घरची वाट पकडली. 
आम्हाला आता संध्याकाळचे वेध लागले होते. आज ‘माउसट्रॅप’चा प्रयोग बघायला जायचं होतं. मला लंडनमध्ये नाटक बघायला मिळेल, असं मुळीच वाटलं नव्हतं. आमच्या मूळ प्लॅनमध्येही ते नव्हतं. मात्र, शनिवारी की रविवारी घरी सहज बोलताना हा विषय निघाला. हर्ष आणि अनुजानंही हे नाटक बघितलं नव्हतं. मी फार पूर्वी एकदा सहज चाळा म्हणून इंटरनेटवर या नाटकाची तिकिटं बुक करता येतात का, हे बघितलं होतं. तेव्हाही तीन-तीन, चार-चार महिने आधी या नाटकाची तिकिटं काढावी लागतात, असं वाचलं होतं. त्यामुळं इथं ऐन वेळी ते बघायला मिळेल, अशी आशाच नव्हती. मात्र, हर्ष व अनुजाने सहज चेक केलं, तर मंगळवारची तिकिटं उपलब्ध होती, तीही केवळ २५ पौंडात. ही थोडी बाजूची तिकिटं होती आणि त्यांना ‘रिस्ट्रिक्टेड व्ह्यू’ होता, म्हणून तिकीट कमी होतं. आम्हाला तरी चालणार होतं. मग लगेच दोघांनीही आमची सातही जणांची तिकिटं बुक केली. आम्ही पिकॅडिली लाइन पकडून कोव्हेंट गार्डन इथं उतरलो. हे कोव्हेंट गार्डन म्हणजे इथला पूर्वीचा फुलबाजार. जॉर्ज बर्नार्ड शॉला ‘पिग्मॅलियन’मधली त्याची ‘फुलराणी’ इथंच भेटली होती म्हणे. (नंतर पुलंनी याच नाटकावरून ‘ती फुलराणी’ हे  अजरामर रूपांतर केलं.) कोव्हेंट गार्डनमध्ये आता फुलबाजार भरत नाही. मात्र, त्या इमारतीवर सगळीकडं सुंदर फुलं-वेली होत्या, आत विविध दुकानं, रेस्टॉरंट होती. आपल्या मंडईसारखाच हा परिसर होता. मध्ये एका मोकळ्या जागी एक कलाकार ‘चार्ली चॅप्लिन’ सादर करत होता. तिथं भरपूर गर्दी होती. तो कलाकार सगळ्यांना हसवत होता. लंडन नावाच्या आनंदजत्रेचं हे आणखी एक हसरं, देखणं रूप आम्ही बघत होतो. आम्हाला अर्थात नाटकाला जायचं होतं. त्यामुळं तो खेळ थोडासा पाहून पुढं निघालो. आम्हाला सेंट मार्टिन थिएटर गाठायचं होतं. 

‘माउसट्रॅप’ हे अगाथा ख्रिस्तीचं अतिशय गाजलेलं नाटक. ‘हूडनइट’ म्हणजे खून कोणी केला, असं रहस्य असलेलं! एका आडबाजूच्या रिसॉर्टमध्ये एका हिमवादळी रात्री पाच पाहुणे येतात. यजमान मालक-मालकीण आणि हे पाच जण आणि नंतर येणारा सार्जंट अशा आठ लोकांत हे नाटक घडतं. नाटकाच्या शेवटी खून कोणी केला, या रहस्याची उकल होते. या नाटकाचा प्रयोग १९५२ साली पहिल्यांदा झाला. त्यानंतर हे नाटक इथं अखंड, रोज सुरू आहे. केवळ करोनाकाळात काही महिने ब्रेक झाला तेवढाच. इथं नाट्यगृहाच्या आत प्रयोग क्रमांक कितवा, याचा एक फलक असतो. तिथं आपण आपला सेल्फी काढायचा. आम्ही बघितला तो प्रयोग क्र. २९ हजार २६१ होता. नाट्यगृहाबाहेर येताच तिथं या नाटकाची महत्ता सांगणारा नीलफलक दिसला. नाटकाला ५० वर्षं झाली तेव्हा राणी एलिझाबेथच्या हस्ते २५ नोव्हेंबर २००२ रोजी हा फलक बसविण्यात आला होता. आम्ही ज्या वेस्टएंड परिसरात आलो होतो, तिथंच हे थिएटर आहे. इथं अशी अनेक थिएटर आहेत आणि रोज नाटकं सुरूच असतात. आम्ही जो प्रयोग पाहणार होतो, त्या प्रयोगातील सर्व कलाकारांची नावं लाकडी फलकावर दर्शनी भागात लावलेली होती. थिएटर अतिशय सुंदर, कलात्मक होते. आम्ही आत शिरलो. आमची तिकिटं ड्रेस सर्कलची होती. त्याही वर आणखी एक बाल्कनी होती. आमची तिकिटं स्कॅन करून आम्ही आत शिरलो. हे थिएटर फार भव्य नव्हतं. मला तर भरत नाट्य मंदिराचीच आठवण झाली. अर्थात या थिएटरची लांबी फार नसली, तरी उंची भरपूर होती. शिवाय ही वास्तू अतिशय आकर्षक होती. आतलं लाकडी फर्निचर, समोरचा लाल मखमली पडदा त्या थिएटरच्या अभिजाततेची साक्ष देत होता. आमची तिकिटं एकदम कोपऱ्यात होती. या खुर्च्या जवळपास रंगमंचाला काटकोनात होत्या. (त्यामुळंच त्यांची तिकिटं कमी होती.) आम्ही गेलो, तर तिथल्या आधी बसलेल्या सर्वांना उठावं लागलं, एवढी लेगस्पेस कमी होती. एकदा बसलं, की बसलं! पुन्हा नाटक संपेपर्यंत उठायची भानगड नाही. हर्ष, अनुजा व काका-काकूंची तिकिटं अगदी आमच्यासमोर होती. आपल्यासारख्याच तीन बेल झाल्या. एक अनाउन्समेंट झाली आणि नाटक सुरू झालं. रंगमंच फार मोठा नव्हता. मात्र, सर्व कलाकार कसलेले होते. यांचं इंग्लिश आपल्याला कळणार का, असं वाटलं होतं. मात्र, तशी फार अडचण आली नाही. काय चाललंय ते नीट कळत होतं. रंगमंचाच्या मधोमध एख खिडकी होती आणि तिच्यामागून बाहेरील हिमवादळाचा आभास निर्माण करण्यात आला होता. बाकी फार चमत्कृती या नाटकात नव्हत्या. सर्व भर संवादांवर आणि कलाकारांच्या मंचीय हालचालींवर होता. यातील एका अभिनेत्यावर विनोदनिर्मितीची जबाबदारी होती. तो तरुण अभिनेता भलताच काटक होता. त्याच्या संवादांना हशाही येत होता. बाकी नाटक गंभीर होतं. इंटरव्हलच्या आधीच्या प्रसंगात रंगमंचावरील दिवे एकदम गेले. दिवे लागले तेव्हा आपल्यासमोर (आणखी एक) खून झालेला दिसला. आम्ही प्रेक्षक एकदम हादरलो आणि टाळ्यांच्या गजरातच पडदा पडला.

नाटक बरोबर दोन तास वीस मिनिटांचं होतं. एक तास पहिला भाग, मग वीस मिनिटांचं मध्यंतर व नंतरचा भागही साधारण एक तास! इथं इंटरव्हलला आइस्क्रीम खायची पद्धत दिसली. आम्हाला हलायला जागाच नसल्यानं आम्ही उठलो नाही. इंटरव्हलनंतर पुन्हा एकदा अनाउन्समेंट झाली आणि नाटक सुरू झालं. पहिल्या भागापेक्षा हा भाग वेगवान होता. इथं सार्जंटकडून सगळ्यांची चौकशी सुरू होते. संशयाची सुई एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे फिरत राहते. शेवटी काहीसा धक्कादायक, पण बराचसा अपेक्षित असा खुलासा होतो. ‘हूडनइट’ ते कळतं आणि पडदा पडतो. नंतर इथं ‘कर्टन कॉल’ घेण्याची पद्धत आहेच. सगळे कलाकार समोर आले आणि बराच वेळ टाळ्यांचा गजर होत राहिला. मुख्य कलाकारानं सर्वांचे आभार मानले आणि आता हे रहस्य कुणाला सांगू नका, असं आवाहन करताना डोक्याला कुलूप लावल्याची ॲक्शन केली. त्यावरही टाळ्या पडल्या. आम्ही आनंदानं बाहेर आलो. पुन्हा एकदा फोटोसेशन झालं. नाटकाच्या दरम्यान कुणाचाही फोन वाजला नाही की कुणी मधे बोललं नाही, हे महत्त्वाचं. लंडनमध्ये हे नाटक बघायला मिळेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. त्यामुळं नाटक कसं होतं, त्यातलं रहस्य किती प्रभावी होतं, यातलं नाट्यमूल्य किती, धक्कातंत्र किती वगैरे सर्व मूल्यात्मक मुद्दे माझ्यासाठी आता गौण होते. एक जागतिक कीर्तीचं नाटक, त्याच्या जन्मगावी, मूळ थिएटरमध्ये अनुभवण्याचा एक वेगळाच व शब्दांत न सांगता येणारा अनुभव माझ्या खाती जमा झाला होता, हेच महत्त्वाचं होतं. या नाटकातले सगळे कलाकार अतिशय व्यावसायिक व आपली भूमिका चोख करणारे होते. यातल्या सार्जंटची भूमिका पूर्वी सर रिचर्ड ॲटनबरो यांनीही केली आहे, असं समजलं. 
नाटक बघून आम्ही सगळेच खूप खूश झालो होतो. त्या आनंदात जवळपास तरंगतच आम्ही घर गाठलं. आम्ही येताना अंडरग्राउंडनं आलो, की बसनं आलो, हे मला आज खरोखर अजिबात आठवत नाही. ते आठवून लिहिण्याची गरजही वाटत नाही. घरी येऊन झोपलो, तेव्हा लॉर्ड्सच्या हिरवळीपासून ते सेंट मार्टिन्सच्या लाल मखमली पडद्यापर्यंत आयुष्यात कधी घडतील असं वाटत नसलेल्या गोष्टी एकाच दिवशी घडल्या होत्या. त्यात बाबासाहेबांच्या स्मारकभेटीची अकल्पित गोष्टही घडली होती. एखादा दिवस आयुष्यभर काळीजकुपीत जपून ठेवावा, असा उगवतो. माझ्यासाठी असे काही दिवस नक्कीच आहेत. त्यातला आजचा एक, हे नक्की!

(क्रमश:)

-----------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-----------







No comments:

Post a Comment