5 Sept 2023

लंडनवारी - भाग ४

शेक्सपीअरच्या गावा जावे...
---------------------------------स्ट्रॅटफर्ड, शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३.

लंडनची ट्रिप ठरली, तेव्हा त्यात लंडनबाहेरचं एक ठिकाण अगदी नक्की होतं. ते म्हणजे शेक्सपीअरच्या गावी - अर्थात स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन - इथं भेट देणं. एक लेखक असल्यानं स्ट्रॅटफर्डला जाणं हे मला अगदी ‘मस्ट’च होतं म्हणा ना! जगभरात लेखक, नाटककार, साहित्यिक, कवी-कवयित्री यांची अनेक उत्तमोत्तम स्मारकं आहेत. त्यातलं कदाचित सर्वांत लोकप्रिय ठिकाण म्हणजे स्ट्रॅटफर्ड हेच असावं. आपल्याकडं मी असं एकमेव स्मारक पाहिलं आहे ते म्हणजे कवी केशवसुत यांचं. गणपतीपुळ्याजवळ असलेल्या मालगुंड या छोट्या गावी केलेलं हे स्मारक सुंदर आहे. शिवाय रेल्वेनं मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एका एक्स्प्रेसला ‘तुतारी एक्स्प्रेस’ असं नाव देऊन केशवसुतांचा गौरव केला आहे. नाशिकलाही कविवर्य कुसुमाग्रजांचं देखणं स्मारक आहे. मात्र, ते पाहण्याचा योग मला अद्याप आलेला नाही. पांडवलेण्यांच्या पायथ्याशी असलेलं दादासाहेब फाळक्यांचं स्मारक मात्र मी पूर्वी बघितलं आहे. ते चांगलं होतं. आता त्याची स्थिती कशी आहे ते माहिती नाही. पुण्यासारख्या शहरात वास्तविक लेखक-कवींची चांगली स्मारकं असायला हवी होती. गदिमांचं स्मारक अजूनही होतं आहे. पु. ल. देशपांडे त्या मानाने भाग्यवान. त्यांच्या नावे पुण्यात एक अप्रतिम उद्यान तर आहेच; शिवाय फर्ग्युसन आणि सिंहगड रस्त्यांवर त्यांच्या पुस्तकांची चित्रं किंवा कोट्सही लावण्यात आली आहेत. अर्थात पुलंची लोकप्रियता पाहता हे अपेक्षित आहेच. अगदी अलीकडं नळस्टॉपच्या उड्डाणपुलाखाली इरावती कर्वे, शान्ताबाई शेळके आदी लेखिकांना चित्ररूपानं झळकताना बघून आनंद वाटला.
स्ट्रॅटफर्डला जायची आमची योजना आम्ही हर्षवर्धनला सांगितल्यानंतर, त्यानं लंडनमधून बसमधून निघणारी एक डे टूर बुक केली. राजूकाका आणि काकूंनाही आमच्यासोबत यायचं होतं. आम्ही पुण्यात असतानाच हर्षनं शुक्रवारची एक दिवसाची ही सहल बुक करून टाकली. त्यात वार्विक, स्ट्रॅटफर्ड, ऑक्सफर्ड आणि कोट्सवाल्ड या चार ठिकाणांचा समावेश आहे, म्हटल्यावर आमचा आनंद द्विगुणित झाला. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज यांपैकी एक तरी घडावं, अशी मनोमन इच्छा होतीच. त्यातलं ऑक्सफर्ड घडणार होतं. सकाळी साडेआठ वाजता ही बस व्हिक्टोरिया स्टेशनजवळून निघणार होती. मग आम्ही त्या दिवशी लवकर उठून भराभर आवरलं आणि सात वाजताच घराबाहेर पडलो. फिन्सबरी पार्क अंडरग्राउंड स्टेशनला पिकॅडिली आणि व्हिक्टोरिया अशा दोन्ही लाइन्स आहेत. या वेळी आम्हाला व्हिक्टोरिया लाइननं व्हिक्टोरिया स्टेशनला जायचं होतं. ही लाइन पिकॅडिलीपेक्षा खोल असल्यानं तिथून प्रवास करताना उकडतं, असं आम्हाला अनुजानं सांगितलं होतं. आम्ही फिन्सबरी पार्क स्टेशनला शिरलो आणि पाचही जण व्हिक्टोरिया लाइनच्या फलाटावर पोचलो. तिथं एक ट्रेन उभीच होती. ती व्हिक्टोरिया स्टेशनकडं (साउथ बाउंड) जाणारी आहे, याची खात्री करून मी, धनश्री व काका ट्रेनमध्ये शिरलो. काकू आणि नील जरा मागं होते. तेवढ्यात अचानक ट्रेनचे दरवाजे बंद झाले. दोन मिनिटं आम्हाला जरा धक्का बसला. मात्र, आम्ही लगेच त्यांना खुणा करून ‘पुढच्या ट्रेननं या’ असं सांगितलं. आम्ही थोड्याच वेळात व्हिक्टोरिया स्टेशनला पोचलो. उतरून फलाटावरच थांबलो. तीन मिनिटांत पुढची ट्रेन येणार होती. ती आलीच. त्यातून नील व काकू यांना उतरताना पाहिलं आणि आम्ही सगळ्यांनीच हुश्श केलं. यातून एक धडा शिकलो. सगळे एकत्र असतील तरच ट्रेनमध्ये चढायचं. अर्थात पुढं असा प्रसंग आला नाही. मात्र, त्या दिवशी नील एकटाच फलाटावर असता, तर काय झालं असतं, असं वाटून गेलं. अर्थात तो एवढ्या आत्मविश्वासानं तिथं वावरत होता, की तो एकटा असता तरी मागून व्यवस्थित आला असता असंही वाटलं.
आम्ही व्हिक्टोरिया स्टेशनच्या बाहेर आलो. हा परिसर अतिशय भव्य आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असलेल्या जुन्या भारदस्त इमारतींनी भरलेला होता. आम्हाला सव्वाआठचं रिपोर्टिंग होतं. आम्ही सात पन्नासला स्टेशनबाहेर आलो होतो. मग मॅपची मदत घेऊन आमची बस सुटणार होती तो स्टॉप शोधून काढला. इथं सिटीमॅपर नावाचं एक ॲप आहे. आम्ही आल्या आल्या हर्षवर्धन व अनुजानं आम्हाला ते डाउनलोड करायला सांगितलं होतं. हे ॲप अतिशय उपयुक्त होतं आणि पुढं आम्ही ते जवळपास रोज, सतत वापरलं. ‘टेक मी समव्हेअर’ असं त्या ॲपवर यायचं. तिथं आपण इच्छित गंतव्य स्थान टाकलं, की तु्म्ही असलेल्या जागेपासून त्या ठिकाणापर्यंत पोचायचे अनेक पर्याय तिथं यायचे. नुसते यायचे नाहीत, तर तिथं जायला किती वेळ व किती पैसे लागतील हेही त्यात यायचं. सगळ्यांत स्वस्त पर्याय आधी यायचा. बस स्वस्त असायची, पण वेळ जास्त लागायचा. एकूण ‘अंडरग्राउंड’ हाच त्यातल्या त्यात सर्वोत्तम पर्याय असायचा. तर या मॅपच्या मदतीनं आम्ही व्हिक्टोरिया मुख्य स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेला आमचा स्टॉप शोधून काढला. तिथं नॅशनल एक्स्प्रेसच्या अनेक बस थांबलेल्या होत्या. या बस लंडनहून इतर शहरांना जाणाऱ्या, थोडक्यात लक्झरी एसटी बस होत्या. आम्ही बरोबर आठ वाजून तेरा मिनिटांनी आमच्या बसपाशी पोचलो. तिथं एक जण हातात एक लिस्ट घेऊन उभाच होता. त्यानं आम्हाला हातात बांधायचे ते बँड (ते हल्ली आपल्याकडं ‘सवाई’ला असतात...) दिले आणि आम्ही बसमध्ये शिरलो. बस बऱ्यापैकी भरलेली होती. मात्र, मागच्या बाजूला आम्हाला बसायला जागा मिळाली. एकूण ३०-३५ पर्यटक असावेत. मात्र, त्यात आमच्याशिवाय कोणीही भारतीय नव्हतं. 
आमचा गाइड सर्वांत पुढं बसला होता. त्याचं नाव चार्ली की असंंच काही तरी होतं. मी विसरलो. चालकाचं नाव टोनी होतं. सुरुवातीला टोनीला प्रोत्साहन म्हणून टाळ्या वगैरे झाल्या. सर्व गाइड असतात, तसाच हाही अति वेगानं बोलणारा, (तेच तेच) विनोद करणारा असा एक झिपरा, तरुण पोरगा होता. त्याची आई चिलीची आणि वडील टर्किश होते. तो वयाच्या अकराव्या वर्षापासून इथंच लंडनमध्ये वाढला वगैरे. बस सुरू झाली आणि त्यानं माइक हातात घेऊन अखंड बडबड सुरू केली. आता हा सर्व प्रवासात असाच बोलणार की काय, अशी भीती वाटली. एक तर त्यांचे ‘ॲक्सेंट’ आपल्याला धड कळत नाहीत. त्यात हा माइक फारच तोंडाशी घेऊन बोलत होता. त्यामुळं त्याचा ‘एको’ येत होता. लंडनमधून बाहेर पडताना पुन्हा आम्ही काल बघितलेली नॅशनल हिस्टरी म्युझियम वगैरे संग्रहालयं दिसली. तेव्हा त्याने ‘आजूबाजूला पाहा. आम्ही जगभरातून चोरून आणलेल्या वस्तू तुम्हाला तिकडं बघायला मिळतील’, ‘तिथं डायनॉसॉर पण आहेत आणि ते रात्री जिवंत होतात’ वगैरे विनोद केले, तेवढे कळले. हळूहळू गाडी लंडन शहराबाहेर पडली. त्या रस्त्यावर आम्हाला लंडनमधला एकमेव (निदान मी बघितलेला) उड्डाणपूल दिसला. तोही बराच जुना असावा आणि रेल्वेलाइनवर होता. बाकी उड्डाणपूल ही संकल्पना लंडनने तरी बाद ठरवलेली दिसली. आपल्याकडे मात्र उड्डाणपुलांमागे उड्डाणपूल असा धडाका सुरू आहे. आमची बस वातानुकूलित होती आणि सर्व सोयींनी सुसज्ज होती. बसच्या आत एक टॉयलेटही होतं. काचा मोठ्या होत्या. त्यामुळं बाहेरचं दृश्य छान दिसत होतं. मला खिडकीशी बसून बाहेरचं सगळं बघायला नेहमीच आवडतं. मुळात आम्ही इंग्लंडच्या कंट्रीसाइडला चाललो होतो. हा लंडनहून बर्मिंगहॅमला जाणारा ‘एम ४०’ (मोटार-वे) होता. आपल्या एक्स्प्रेस-वेसारखाच सहा लेनचा आणि चांगला प्रशस्त होता. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण डांबरी होता. काँक्रिटीकरणाचं खूळ इकडं फारसं दिसलं नाही. (ते अमेरिकेकडून आलं असावं.) लंडन ते बर्मिंगहॅम हे अंतर ८९ मैल (म्हणजे साधारण १४३ किलोमीटर) एवढं होतं. बर्मिंगहॅमच्या थोडंच अलीकडं वार्विक हे गाव होतं, तिथं आम्हाला जायचं होतं. हा आमच्या प्रवासातला सर्वांत लांबचा पल्ला होता. तो आधी करून मग आम्ही स्ट्रॅटफर्ड, कोट्सवाल्ड व ऑक्सफर्ड असं लंडनच्या दिशेनं परत जात जात संध्याकाळी सात वाजता पुन्हा लंडनला पोचणार होतो. टोनीनं बस भरधाव सोडली होती. ग्रामीण इंग्लंडचा नजारा डोळे भरून बघायला मिळणार, म्हणून मी खूश होतो. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. त्यानं नंतर दिवसभर साथ केली. आम्ही लंडनबाहेर असलेला हा एकमेव दिवस होता आणि आमच्या वास्तव्यातला पाऊस असलेलाही हा एकमेव दिवस ठरला.

बरोबर साडेदहाला गाडी वार्विकला पोचणार होती. त्याआधी पंधरा मिनिटं आमच्या गाइडची बडबड सुरू झाली. त्यानं वार्विकची माहिती द्यायला सुरुवात होती. तिथला कॅसल, म्हणजे राजप्रासाद आम्हाला आधी दाखवणार होते. बरोबर साडेदहाला त्या छोट्याशा गावात आमची बस शिरली. कॅसलकडे जाताना अनेक पर्यटन बस व अन्य गाड्या दिसल्या. आम्ही उतरलो. इथं मात्र छत्र्या उघडाव्या लागल्या. आम्ही या टूरचं तिकीट काढताना कॅसलचं वेगळं तिकीट काढलं नव्हतं. मग गाइडनं सांगितलं, की इथं आपण दोन तास थांबणार आहोत. तुम्ही इथं ऐन वेळी तिकीट काढून कॅसल बघू शकता किंवा या गावात फेरफटका मारून गाव बघू शकता. त्या गावात मध्यभागी एक म्युझियम आहे आणि ते फ्री आहे, असंही त्यानंच सांगितलं. आम्हाला कॅसल बघण्यात इंटरेस्ट नव्हताच. मग आम्ही आधी तिथल्या एका स्मृतिवस्तू दुकानात वेळ घालवला. मग बाहेर आलो. तिथं एक दगडी भिंत होती. ‘टाउन गेट’ असं लिहिलं होतं. तिथून आम्ही पलीकडं गेलो, तर ते गाव लागलं. अतिशय सुंदर व टुमदार असं हे वार्विक गाव होतं. अगदी हलका हलका पाऊस पडत होता. आम्हाला आता भुका लागल्या होत्या. मग सोबत आणलेले रोल तिथं फस्त केले. मग चालत त्या गावात निघालो. दोन्ही बाजूंनी सुंदर इमारती, दिव्यांचे आकर्षक खांब, त्यावर फुलांची सजावट... किती फोटो काढावेत असं झालं. थोड्याच वेळात त्या गावातील मुख्य चौकात पोचलो. एका अतिशय जुन्या व घुमटाकार इमारतीत ते म्युझियम होतं. आत बरीच गजबज होती. एका आजीबाईंनी आमचं हसून स्वागत केलं. आम्ही त्या अगदी छोट्याशा म्युझियममध्ये शिरलो. दोन्ही बाजूंनी काही वस्तूही विकायला ठेवल्या होत्या. इथंही एक लहान का होईना, डायनॉसॉर होताच. म्युझियमच्या वरच्या मजल्यावरही वस्तू होत्या. आम्ही वर गेलो, तर तिथं भारताचा मोठा नकाशा लावलेलं एक छोटं दालन दिसलं. एवढ्या आडबाजूच्या गावात भारताचा मोठा नकाशा आणि भारतातल्या वस्तू कशा काय, असं जरा आश्चर्यही वाटलं. त्या गावाच्या जवळच लीमिंग्टन या गावी राहणाऱ्या हॉरेस विल्यम बॉयर या अँग्लो-इंडियन व्यक्तीनं या वस्तू संग्रहालयाला दिल्या होत्या. त्याचा जन्म लोणावळ्याचा. तो मुंबईत शिकला. तो एक चांगला ॲथलीट होता. त्यानं त्याच्या आईच्या वापरात असलेला एक दगडी खलबत्ताही संग्रहालयाला दिला होता. त्या काचेच्या चौकोनी दालनातील फलकावर ‘अवर कॉमनवेल्थ - इंडिया’ असं लिहिलं होतं. ते त्यांच्या दृष्टीनं ठीकच असलं, तरी आपल्याला खटकतंच. आता बास की! किती दिवस कॉमनवेल्थ, असा विचार मनात येऊन गेल्याशिवाय राहिला नाही. मात्र, त्या दालनापाशी आम्ही प्रेमानं फोटो काढले, हेही खरं! 
आम्ही त्या म्युझियममधून बाहेर पडलो. त्या गावातल्या प्रमुख रस्त्यावरून दुसऱ्या टोकापर्यंत चक्कर मारली. त्या बाजूला एक जुना टॉवर व घड्याळ होतं. एकूणच हे देखणं गाव मला फारच आवडलं. विशेष अपेक्षा नसताना बघितल्यामुळं असेल, पण वार्विक मनात ठसलं!
एव्हाना दोन तास होत आले होते. आम्ही बसपाशी आलो. बसच्या दारात खडूनं एका पाटीवर गाडीत पुन्हा जमा व्हायची वेळ गाइडनं लिहिलेली असायची. आम्ही आता वेळेत येऊन बसलो. थोड्याच वेळात बाकी सगळे कॅसल बघून आले आणि आमची गाडी एकही मिनिट न दवडता, अगदी वेळेवर स्ट्रॅटफर्डच्या दिशेनं निघाली. इथून स्ट्रॅटफर्ड अगदीच जवळ, म्हणजे वीस मिनिटांवर होतं. आम्ही साधारण पाऊणच्या सुमारास तिथं पोचलो. स्ट्रॅटफर्ड मला वाटलं, त्यापेक्षा बरंच मोठं गाव निघालं. थोड्याच वेळात आम्ही तिथल्या बस पार्किंगमध्ये पोचलो. तिथं रस्ता ओलांडला, की लगेच शेक्सपीअरच्या स्मारकाकडे जाणारा रस्ता येतो. सुरुवातीलाच तिथं एक जोकरचा पुतळा आहे. तिथं पोचलो आणि त्या गावाच्या एकूण सौंदर्यानं मी स्तिमित झालो. तिथून सरळ निघणारा एक मोठा रस्ता... मधोमध बसायला बाक, दोन्ही बाजूंना कॅफे आणि इतर दुकानं... आम्ही रमत-गमत पुढं निघालो. लगेच डाव्या बाजूला शेक्सपीअरचं घर लागलं. शेक्सपीअरचा काळ सतराव्या शतकातला. म्हणजे आपल्याकडं तेव्हा शिवपर्व सुरू होतं. बाकी या इंग्लिश लोकांनी गोष्टी इतक्या सुंदर जतन करून ठेवल्या आहेत, की आपली वारंवार दाद जाते. जगभरातल्या लोकांची तिथं गर्दी झाली होती. यातल्या अनेकांनी शेक्सपीअर नक्की किती वाचला होता, कोण जाणे. मी स्वत: तरी कुठं सगळा वाचला आहे? मात्र, कुठल्या ना कुठल्या रूपात तो तुमच्यापर्यंत पोचतोच. आपल्याकडं वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी शेक्सपीअरचा ‘किंग लिअर’ मराठीत ‘नटसम्राट’च्या रूपानं आणला. मॅकबेथ, ऑथेल्लो, हॅम्लेट आदी नाटकं आपल्याकडंही गाजली. गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, नाना फाटक आदी मान्यवर नटांनी शेक्सपीअरची पल्लेदार वाक्यं, त्याचे कालातीत संवाद आपल्यापर्यंत पोचविले. अगदी अलीकडं सुमीत राघवनलाही ‘हॅम्लेट’ करून पाहावासा वाटला. चंद्रकांत कुलकर्णींनी या भव्य प्रयोगाचं दिग्दर्शन केलं होतं.
मला आठवतंय त्याप्रमाणे १९९० च्या आसपास कधी तरी कुसुमाग्रजांनी स्ट्रॅटफर्डला भेट दिल्यानंतर ‘मटा’मध्येच एक दीर्घ लेख लिहिला होता. ‘स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन’ हे शब्दही मी कदाचित त्याच वेळी प्रथम वाचले असावेत. तेव्हा अर्थात आपण या गावी कधी जाऊ हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र, आज ते स्वप्न सत्यात उतरलं होतं. ‘टु बी ऑर नॉट टु बी’ हा सवालच उरला नव्हता. शेक्सपीअरच्या घरासमोर आम्ही भरपूर फोटो काढले. तिथं त्या घरावर एक लेखणीही होती. तिथं तर मी आवर्जून फोटो काढला. जरा पुढं गेल्यावर ‘बार्ड’चा पूर्णाकृती सुंदर पुतळा होता. तिथंही फोटोंना भरपूर गर्दी होती. मला एकदम सुचलं, की आपण इथं विंदांची ‘तुकोबाच्या भेटी शेक्सपीअर आला’ ही कविता वाचावी. मग काय, राजूकाकांनाही ही कल्पना एकदम आवडली. त्यांनी उत्साहानं व्हिडिओ केला. मला ती कविता तिथं वाचून फारच मस्त वाटलं. आमच्याकडं फार वेळ नव्हता. आता आम्हाला एव्हन नदीही बघायची होती. मग आम्ही तिथून चालत चालत नदीवर गेलो. त्याच्या अलीकडं एक कालवा होता. बाजूला सुंदर हिरवळ होती. (वाच्यार्थ घ्या, लाक्षणिक अर्थ घ्या... चालेल!) ती चिमुकली एव्हन नदी तर फारच सुंदर होती. नदीत बोटिंगही होतं. मात्र, आम्ही बदकांचं आणि हंसांचं नैसर्गिक बोटिंग बघत तिथंच काठावर बसून राहिलो. एक अपार शांतता मनाला स्पर्शून जात होती. काही बोलू नये, कुठलेही फोटो काढू नयेत, कुठलेही मेसेज बघू नयेत... केवळ डोळे मिटून ती नदी आतून स्पर्शून घ्यावी, असं वाटत होतं. अर्थात ही पारलौकिक अवस्था फार काळ टिकणं परवडणार नव्हतं. थोड्याच वेळात तिथून निघालो. शेजारी रॉयल शेक्सपीअर कंपनीचं भलंमोठं थिएटर झालं आहे. तिथं शेक्सपीअरची नाटकं सतत सुरू असतात. तिथं एका भारतीय चमूकडून केल्या जाणाऱ्या प्रयोगाचीही जाहिरात दिसली. याशिवाय स्ट्रॅटफर्डमध्ये एका खुल्या रंगमंचावर हौशी मंडळींकडून शेक्सपीअरचं कुठलं ना कुठलं नाटक सतत सुरू असतं, असंही आम्ही ऐकलं होतं. मात्र, आमची ‘कंडक्टेड टूर’ असल्यानं तिकडं जायला वेळ मिळाला नाही.

पुन्हा त्या रस्त्यावरून येताना काकांना तिथल्या पोस्टात जायचा मोह झाला. इथली पोस्टं म्हणजे विविध वस्तू भांडार असतात. तिथं सगळं काही मिळतं. काकांनी तिथं एक स्मृतिवस्तू घेतली आणि आम्ही तिथून निघालो. वेळेत बसपाशी येऊन पोचलो. बसही अर्थात वेळेत निघाली. आता आम्हाला कॉट्सवाल्डला जायचं होतं. मात्र, या टूरवाल्यांनी आमची निराशा केली. त्यांनी आम्हाला कोट्सवाल्डमधून नुसतीच चक्कर मारली. तिथं गाडी थांबवलीच नाही. गाइडनं गाडीत बसूनच सगळी माहिती दिली. वास्तविक मी कोट्सवाल्डविषयी, तिथल्या अप्रतिम फ्रेंच कॉलन्यांविषयी बरंच ऐकलं होतं. मात्र, आम्हाला गाडीतूनच एक झलक बघून समाधान मानावं लागलं. 
आता आमची बस ऑक्सफर्डला निघाली होती. हे जगातलं एक ख्यातनाम विद्यापीठ आपण प्रत्यक्ष तिथं कधी जाऊन बघू, असं मला खरोखर कधी वाटलं नव्हतं. मात्र, आता आम्ही ऑक्सफर्डच्या वाटेवर होतो. पुण्याला अनेकदा ‘ऑक्सफर्ड ऑफ दी ईस्ट’ असं म्हटलं जातं. आता आम्ही प्रत्यक्ष, ओरिजिनल ऑक्सफर्डला चाललो होतो. मला वाटलं होतं, त्यापेक्षा ऑक्सफर्ड हे बरंच मोठं शहर निघालं. अर्थात, इथली विविध नामांकित कॉलेजेस, जगभरातून येणारे विद्यार्थी आणि त्यामुळं इथं होणारी मोठी आर्थिक उलाढाल यामुळं हे शहर विस्तारत गेलं असणारच म्हणा. 

आमच्या गाइडनं आम्हाला ऑक्सफर्डमधील सर्वांत जुन्या कॉलेजच्या समोर सोडलं. त्या कॉलेजसमोरचा जो रस्ता होता, तिथं विद्यार्थ्यांनी तंबू ठोकले होते. काही तरी कार्यक्रम सुरू होता. एकूण त्या परिसराच्या ‘विद्यापीठ’ असण्याची एक झलक तिथं मिळाली होती. आमचा सगळा ग्रुप एकेक जुनं कॉलेज बघत पुढं सरकत होता आणि त्या भव्य, जुन्या, प्राचीन शिक्षण वारशाकडं बघून सतत अचंबित होत होता. इथली कुठलीही वास्तू शंभर वर्षांपेक्षा कमी जुनी नसावी. मात्र, त्या इमारतींच्या आत कित्येक शतकं सुरू असलेल्या ज्ञानदानाच्या यज्ञामुळं त्या वास्तूंना आपोआप पावित्र्याची एक झळाळी लाभली होती. स्वच्छ निळ्या आकाशात शिरलेल्या तिथल्या चर्चच्या शिखरांप्रमाणेच या कॉलेजांच्या मातकट, पिवळ्या इमारतीही त्याच तोलानं शेजारी उभ्या होत्या. तिथल्या सर्व रस्त्यांवर तरुणाईची चहलपहल दिसत होती. छोट्या छोट्या दुकानांतून, रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅफेमधून, रेस्तराँमधून तारुण्य सळसळत होतं. एखाद्या प्राचीन वटवृक्षाच्या सावलीत गुलाबाचा ताटवा फुलावा, तसं ते दृश्य वाटत होतं. आम्ही तिथल्या ग्रंथालयाच्या इमारती पाहिल्या; दोन इमारती जोडणारा तो ऐतिहासिक पूल पाहिला; जगप्रसिद्ध (व आता बंद झालेली) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस बघितली. जगभरातील कित्येक प्रज्ञावंत इथं शिकून गेले. कित्येक नोबेल पारितोषिक विजेते, कित्येक महत्त्वाचे शोध लावणारे शास्त्रज्ञ याच रस्त्यानं, याच फरशीवरून चालले असतील याचा विचार करून अंगावर अक्षरश: काटा येत होता. या सगळ्या वास्तूंना लोटांगण घालावं अशी फार तीव्र इच्छा मनात आली होती. मात्र, मनात येईल तसं वागण्याचं धाडस सर्वांच्याच अंगात असतं नाही. सगळं बघून बाहेरच्या रस्त्यावर आलो, तर तिथं पुन्हा एक सायन्स म्युझियम दिसलं. आइन्स्टाइननं त्याचा जगविख्यात E = mc2 हा सिद्धान्त ज्या फळ्यावर लिहिला तो फळा त्या मूळ सिद्धान्तासह इथंच जतन करून ठेवला आहे. (अगदी अलीकडं ‘ओपनहायमर’ चित्रपटात तो प्रसंग पाहिला होता.) मी आणि नील उत्साहानं त्या म्युझियमच्या पायऱ्या चढायला लागलो. तर नेमकं आइन्स्टाइनचं दालन त्या दिवशी बंद होतं. समोरून त्या संग्रहालयाचा कर्मचारी आला. टिपिकल ब्रिटिश विनोदबुद्धीची झलक त्यानं दाखवली. आम्हाला म्हणाला, ‘अरेरे, तुम्ही आलात खरे! पण तुम्हाला माहितीय ना आइन्स्टाइनचे केस किती वाढतात ते... तर तो आता कटिंग करायला गेला आहे. आणि त्याचे केस तीन दिवसांनी वाढतात. मगच तो इथं येतो.’ आम्ही हे ऐकून हसलो. आमची निराशा दूर पळाली. आम्ही म्हटलं त्याला, ‘सांगा अल्बर्टला, तुझ्याकडे भारतातून पाहुणे आले होते...’ तर ‘नक्की सांगतो...’ असं म्हणत पुन्हा हसला. 
आम्ही तिथून निघालो, तर आम्हाला रस्त्यात जगप्रसिद्ध ट्रिनिटी कॉलेज दिसलं. मात्र, तिथंही गेट बंद होतं. तिथंच दारात एक बाक होता. तिथं बराच वेळ बसलो. त्या प्रमुख रस्त्यावरची सगळी मौज बघत बसलो. परतताना चहा किंवा कॉफीची तल्लफ आली. आमची बस जिथं उभी होती, तिथं समोरचं एक चक्क टपरी होती कॉफीची. तो एक लेबनीज माणूस होता. त्यानं आम्हाला कॉफी तर दिलीच, पण आम्ही भारतीय म्हटल्यावर त्याच्याकडं असलेली एक आपली २० रुपयांची नोटही आम्हाला दिली. तो म्हणाला, की एका भारतीय माणसानं की मित्रानं त्याला ती दिली आहे. मात्र, इथं मला तिचा काय उपयोग? तुम्ही ही घेऊन जा. मग मी ती नोट नीलला दिली. त्यावर तो नीलला म्हणाला, की याचं चॉकलेट घे आणि खा. आम्ही प्रेमानं हसलो. आमच्याच बसमध्ये असलेले एक मोरोक्कोचे काका आम्हाला कॉफीच्या टपरीवर भेटले. आम्ही घेतली म्हटल्यावर त्यांनीही कॉफी घेतली. मला नंतर ते म्हणाले, की इथल्या कॉफीला काही चव नाही. आपल्याला दुपारी काही तरी गळ्यात गरम ओतायची सवय आहे, तेवढ्यापुरता हिचा उपयोग! मला हसू आलं. ब्रिटिशेतर म्हणून त्यांनी लगेच आम्हाला त्यांच्या गटात ओढलं होतं. 
आता बस इथून थेट लंडनला जाणार होती. टोनीनं पुन्हा एकदा भरधाव गाडी सोडली. बरोबर सातच्या सुमारास आम्ही व्हिक्टोरिया स्टेशनला पोचलो. येतानाही इंग्लंडच्या ग्रामीण भागाचं डोळे भरून दर्शन झालं. हा भाग आपल्या मावळ किंवा मुळशी तालुक्यांसारखाच. तशीच हिरवाई, पाण्याची समृद्धी, डोंगर, शेतं... सगळंच जवळपास तसं! ब्रिटिशांनी पुण्याला आपलं एक प्रमुख ठाणं उगाच नव्हतं मानलं. त्यांना हा सगळा परिसर इंग्लंडची आठवण करून देणारा वाटत असणार तेव्हाही!
लंडनमध्ये पोचल्यावर आमच्या बसनं आम्हाला जरा निराळ्या ठिकाणी सोडलं. तिथून साउथ केन्सिंग्टन स्टेशन जवळ होतं. मग मी काकांना म्हटलं, आपण व्हिक्टोरियानं न जाता, साउथ केन्सिंग्टन स्टेशनला जाऊन आपली (होम लाइन) पिकॅडिली घेऊ या. मग आम्ही चालत चालत त्या स्टेशनला गेलो. पिकॅडिली लाइनची ट्रेन पकडून मेनर हाउस स्टेशनला उतरलो. हे स्टेशन फिन्सबरी पार्कच्या पुढं येतं. पार्कच्या दुसऱ्या बाजूनं. तिथून हर्षचं घर जवळ पडतं. मग आम्ही नंतर रोज याच स्टेशनला परतू लागलो. मेनर हाऊस स्टेशनला उतरून बागेतून चालत घरी पोचलो. घरी हर्षनं गरमागरम जेवण तयार ठेवलं होतं. ते जेवून लगेचच झोपलो एवढे दमलो होतो. आता हॅम्लेटच्या बापाचं नाही, पण शेक्सपीअरच्या गावातील दृश्यांचं भूत मानगुटीवर बसून नाचत होतं...


(क्रमश:)

--------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-------

4 comments:

 1. मला ब्रिटिश कौन्सिलची फेलोशिप असल्याने मी इंग्लंड मध्ये तीन महिने होतो. या वास्तव्यात मला ऑक्सफर्ड, लिव्हरपूल व अबर्डीन (स्कॉटलंड) या विद्यपीठात व्याख्याने द्यायची होती. ऑक्सफर्ड मधल्या प्रसिद्ध ऑल सोल्स कॉलेजात व्याख्यान दिल्यानंतर प्रो. विमल मतीलाल (डॉ. राधाकृष्णन यांच्या नंतर तत्त्वज्ञान विषयाची प्रसिद्ध स्पाल्डिंग चेअर भूषविणारे) हे मला दुपारी जेवणासाठी म्हणून प्राध्यापकांसाठी असलेल्या मेस मध्ये घेऊन गेले. ही मेस म्हणजे लाकडी बाके असलेली एक छोटीशी खोली होती. त्यात मोजकीच माणसे होती. माझी औपचारिक ओळख करून दिल्या नंतर प्रा. मतीलाल यांनी हळूच माझ्या कानांत त्यांची पूर्ण ओळख करून देताना त्यातले तीन प्राध्यापक हे नोबेल पारितोषिक विजेते होते हे सांगितले. हे सगळे मस्तपैकी खात पीत गप्पा मारताना पाहून हल्लीच्या भाषेत "खूप भारी" वाटले.

  ReplyDelete
 2. वा छान वाटले ही ग्रामीण भागाची
  सहल वाचल्यावर. शेवटी लेखनकला
  एका पत्रकार मित्राचीच आहे.२००७ ला
  मि चार महीने लंडनला राहिलो होतो. त्या वेलच्या आठवनी ही लेखमाला
  वाचल्यावार जागृत होतात. चुटपुट
  लागलेली आठवण म्हणजे ग्रेट विन्स्टन
  चर्चिल ह्यांच्या गावी गेलेल्या मित्रांच्या
  सहलीत मला सामील होता आले नाही.केंब्रिजचे दर्शन झाले.ते मात्र
  अविस्मरणीयच.


  ReplyDelete