9 Sept 2023

लंडनवारी - भाग ६

श्रावणातली आनंदजत्रा...
-----------------------------


लंडन, रविवार, २० ऑगस्ट २०२३.


आमच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात आम्ही रविवारचा दिवस मुद्दाम मोकळा ठेवला होता. याचं कारण म्हणजे माझा मावसभाऊ मंदार शेटे याच्याकडे जमलं तर जाऊ या, असं आम्ही ठरवलं होतं. मंदार ब्रिस्टॉलला राहतो. योगायोगाने माझी मावशी व मंदारचे बाबाही सध्या त्याच्याकडेच होते. मी मावशीला लंडनला येणार असल्याचं सांगितल्यावर तिनं मला ब्रिस्टॉलला मंदारच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. विशेष म्हणजे मंदारनं तिथं नवीन घर घेतलं असून, त्याची पूजा त्याच दिवशी (म्हणजे रविवारी) होती. त्यामुळं दुधात साखर असा हा योग होता. मी लंडनहून ब्रिस्टॉलला जाणाऱ्या बसची किंवा ट्रेनची माहिती घेतली. ट्रेनचं तिकीट बऱ्यापैकी महाग होतं. मात्र, ‘नॅशनल एक्स्प्रेस’च्या बस तुलनेनं स्वस्त होत्या. मात्र, व्हिक्टोरिया बस टर्मिनसवरून ब्रिस्टॉलला जायला तीन तासांचा प्रवास होता. तीन तास जायला आणि तीन तास यायला म्हटल्यावर आम्हाला एका दिवसात परत येणं खूपच गडबडीचं झालं असतं. शिवाय ब्रिस्टॉलच्या बस टर्मिनसवर उतरल्यावर मंदारच्या घरी जायला आम्हाला पुन्हा एखादी बस किंवा टॅक्सी करावी लागली असती. मंदारच्या घरी पूजा असल्यानं ६०-७० पाहुणे, मित्रमंडळी त्याच्याकडे येणार होती. त्यामुळं आम्हाला नीट बोलताही आलं नसतं. शिवाय इकडे हर्ष व अनुजानं आमच्यासाठी वेळ काढला होता, त्यांच्यावरही जरा अन्याय झाल्यासारखं झालं असतं. म्हणून मग आम्ही मावशीकडं जाणं नाइलाजानं रद्द केलं. तसं मी तिला आदल्या दिवशीच मेसेज करून कळवलं. 
फार काही नियोजित कार्यक्रम नसल्यामुळं रविवारी आम्ही निवांत होतो. माझा जामखेडचा भाऊ म्हणा, मित्र म्हणा... परेश (देशमुख) गेली १५ वर्षं लंडनमध्ये राहतोय. मध्यंतरी २०१९ मध्ये तो पुण्यात आला, तेव्हा मी त्याला प्रथम भेटलो होतो. त्याची आई - म्हणजे आमच्या शोभाकाकू - मला अनेक दिवसांपासून लंडनला आमच्या घरी ये, असं म्हणत होत्या. त्यामुळं मला परेशला मला भेटायचंच होतं. (तो आत्ताही जुलैत इकडे आला होता. मात्र, पुण्यात आमची भेट झाली नाही. आम्ही एकाच दिवशी लंडनला निघालो होतो. फक्त फ्लाइटमध्ये बारा तासांचं अंतर होतं. आम्ही आधी निघालो होतो. मग लंडनमध्येच भेटू असं आम्ही ठरवलं. मात्र, काकू पुण्यातच असल्यानं त्यांची भेट लंडनमध्ये होणार नव्हती...) त्यानुसार मग मी त्याला मेसेज केला. तो हर्षच्या घरापासून तुलनेनं जवळ म्हणजे ७ किलोमीटरवर राहत होता. मी त्याला सांगितलं, की तूच इकडे ये आणि आम्हाला तुझ्या घरी घेऊन चल. त्यानं ११ वाजता येतो, असं कळवलं. मग आम्ही जरा निवांत आवरलं. नीलला खूप दिवसांपासून शेजारच्या बागेत सायकल खेळायची होती. मग तो अनुजाची सायकल घेऊन काकांसोबत शेजारच्या बागेत गेला. धनश्री व मी थोड्या वेळानं काही तरी खाऊ घेऊन जाऊ या म्हणून बाहेर पडलो. मेनर हाऊस स्टेशनच्या शेजारी ‘लिडल’ नावाचं एक छोटं सुपर मार्केट आहे. तिथं बराचसा खाऊ मिळेल, असं आम्हाला अनुजानं सांगितलं होतं. त्यातल्या त्यात रविवारी हेच सुपर मार्केट लवकर उघडतं. बाकी सगळे ११ नंतर उघडतात, असं कळलं. मग आम्ही दोघं बाग ओलांडून त्या सुपर मार्केटमध्ये गेलो. हे सुपर मार्केट तसं अगदीच काही छोटं नव्हतं. तिथं जवळपास सगळंच मिळत होतं. इथले ‘जाफा केक्स’ नावाचे केक प्रसिद्ध आहेत. ते आवर्जून घ्या, असं अनुजानं सांगितलं होतं. मग ते केक घेतले. खोबऱ्याची बिस्किटं मिळाली. इतर थोडा फार खाऊ घेतला आणि आलूबुखार, केळी आणि द्राक्षं अशी फळंही घेतली. इथं सुपर मार्केटमध्ये आपल्या वस्तू आपणच बिल करून घ्यायच्या असतात. तिथं साधारण सात-आठ बिल स्टेशन्स होती. तिथं कुणी ना कुणी तरी बिल करत होतं. ते बिल कसं करताहेत हे आम्ही बघत होतो. आपल्याकडे डी-मार्ट किंवा अन्य सुपर मार्केटमध्ये जसं बिल करतात तसंच करायचं होतं. बार कोड स्कॅन करायचा होता. आमचा नंबर आल्यावर आम्ही सराईतपणे, सहजपणे बिल केलं. मात्र, सुट्ट्या केळ्यांचं बिल कसं करायचं ते कळेना. कारण तिथं कुठला बार कोड नव्हता. मग शेवटी आम्ही तिथल्या सहायक महिलेला हाक मारली. ती एक धिप्पाड कृष्णवर्णीय महिला होती. पोलिसासारख्या ड्रेसमध्ये होती. ती तातडीनं आली आणि तिनं आम्हाला फळांचं बिल कसं करायचं हे सांगितलं. समोरच्या स्क्रीनवर ऑप्शन होते. त्यातला ‘फ्रूट’ हा पर्याय निवडून त्यातील ‘बनाना’वर क्लिक करायचं होतं. मग त्याचा जो काय रेट असेल तो आपोआप ॲप्लाय होऊन बिल तयार होत होतं. बिल पूर्ण झाल्यावर उजवीकडच्या ट्रेमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या. समोरच्या पीओएसवर आमचं कार्ड स्कॅन केलं. काही तरी आठ-नऊ पौंड बिल झालं होतं. मग वस्तू उचलल्या आणि बाहेर पडलो.

बागेतून परत येत असताना आम्हाला नील दिसला. मग मीही त्या सायकलवरून त्या बागेत फेरफटका मारला. काकांनीही एक चक्कर मारली. आम्ही अकरा वाजता घरी परतलो. परेश अकरा वाजता आम्हाला न्यायला येणार होता. इथल्या स्वामीनारायण मंदिरात जाऊन मग तो आमच्या इथं येणार होता. थोड्याच वेळात त्याचा मेसेज आला, की तो सव्वाबारापर्यंत येतोय. आम्ही तोवर घरी पोचलो होतो. सव्वाबाराला परेश सहकुटुंब आला. आम्ही बाहेर आलो तर त्याची आलिशान टेस्ला कार बघून उडालोच. म्हणजे भारीच वाटलं. आपल्याकडं अजून ही गाडी आलेली नसल्यानं मी तरी पहिल्यांदाच पाहत होतो. या गाडीचे दरवाजे बाजूने खालून वर (डिकी उघडतो तसे) उघडतात. हे सगळं मी आधी फक्त सिनेमातच पाहिलं होतं. परेशसोबत त्याची पत्नी पूर्वा आणि दोन मुली अवनी व श्रेयाही आल्या होत्या. दोन्ही कुटुंबांची मी ओळख करून दिली. आम्ही लगेच त्याच्यासोबत निघालो. अर्ध्या तासात फिंचली भागातल्या त्याच्या घरी (ग्लुस्टर ड्राइव्ह) पोचलो. परेशचं घर भलंमोठं होतं. दुमजली घरावर तिसरा मजला चढवण्याचं काम सुरू होतं. खाली भरपूर सामान पडलं होतं. घरात एवढं काम काढलं असूनही तो आम्हाला घेऊन घरी आला होता. आम्हालाच जरा संकोचल्यासारखं झालं. परेश व कुटुंबीयांनी शेगावहून संत श्री गजानन महाराजांचा मोठा मुखवटा आणला होता. तो कुणाकडे तरी द्यायचा होता. मात्र, त्याआधी घरी त्याची यथासांग पूजा झाली. मग रीतसर आरती वगैरे करून आम्ही जेवायला बसलो. आम्हाला श्रावणातलं मेहुण म्हणूनच त्यानं बोलावलं होतं. पूर्वानं साग्रसंगीत सगळा स्वयंपाक केला होता. श्रीखंड-पुरी, आम्रखंड, बटाट्याची भाजी, चटण्या, कुरडया-पापड, साधं वरण-भात-तूप-लिंबू असा सगळा सुंदर बेत होता. आम्ही फरशीवरच बेडशीट घालून मांडी घालून जेवलो. फार मजा आली. माझी आई गजानन महाराजांची भक्त आहे. मी तिला लगेच तिथले फोटो पाठवले. लंडनमध्येही आम्हाला श्रावणातलं मेहुण म्हणून असं भोजन मिळावं (आणि वर दक्षिणाही मिळावी) ही खरोखर गजानन महाराजांचीच कृपा म्हणावी लागेल. आपले आई-वडील जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी आपल्यासाठी सदैव देवापुढं बसलेले असतात; त्यांच्या प्रार्थनेचं बळ आपल्यामागे अदृश्यपणे उभं असतं आणि म्हणून आपलं सगळं सुरळीत सुरू असतं, यावर माझा विश्वास आहे. याला मग भाबडी श्रद्धा म्हणा किंवा अन्य काही! 
परेशची स्वत:ची आयटी कंपनी आहे. जेवण व्हायच्या आधी त्यानं सगळं घर फिरवून दाखवलं. मागचं भलं मोठं अंगण (परस) व तिथली हिरवळ छान होती. तिथं धबधबा, कोपऱ्यात बार्बेक्यू असं सगळं मस्त तो करणार होता.  परेशच्या आणखी दोन (चार पायांच्या) ‘मुली’ तिकडं बागडत होत्या. त्यातल्या कॉन कोर्सो की अशाच काहीशा जातीच्या धिप्पाड कुत्रीची मला खरोखर फार भीती वाटली. असो. पण मला परेशच्या या प्रगतीचं खरोखर खूप मनापासून कौतुक वाटलं आणि आनंदही झाला. नीता (कुलकर्णी) आमची कॉमन मैत्रीण. मग तिला व्हिडिओ कॉल करणं आलंच. मजा आली. 

आम्हाला आता निघायचं होतं. परेश आमच्यासाठी टॅक्सी बुक करत होता. मात्र, आम्हाला हर्ष व अनुजानं टॉटनहॅम कोर्ट रोडला यायला सांगितलं होतं. म्हणून मग आम्ही परेशला आम्हाला ‘ईस्ट फिंचली’ अंडरग्राउंड स्टेशनला सोड असं सांगितलं. ‘टेस्ला’ आता चार्जिंगला लावली होती. त्यामुळं मग परेशनं त्याच्या ‘आय १०’मधून आम्हाला स्टेशनला सोडलं. ईस्ट फिंचली स्टेशन ओव्हरग्राउंड होतं. नॉर्दर्न लाइनवरच्या या स्टेशनवरून आम्हाला टॉटमहॅम कोर्ट रोडला यायचं होतं. मात्र, आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर फिन्सबरी पार्कला उतरून घरी जायचं ठरवलं. दुपारी अडीच-तीनला आम्ही घरी पोचलो. मग जरा विश्रांती घेतली. संध्याकाळी पाच वाजता पुन्हा उत्साहानं आवरून, सगळेच बाहेर पडलो. मला बऱ्याच दिवसांचं डबल डेकरमध्ये बसायचं होतं, हे हर्षला माहिती होतं. आज तसा वेळही होता. मग आम्ही मेनर हाऊस स्टेशनच्या रस्त्याला जाऊन डबल डेकर बस पकडली. मी तातडीने वरच्या मजल्यावर धाव घेतली. अगदी पुढच्या सीट्सवर कुणी ना कुणी बसलंच होतं. पण मला त्यामागच्या सीटवर जागा मिळाली. किती वर्षांचं माझं स्वप्न अखेर आज साकार झालं होतं! इकडे बहुतेक सगळ्या बस डबल डेकरच आहेत. लाल रंगाच्या या बस लंडनच्या सगळ्या रस्त्यांवर धावत असतात. बसच्या पुढच्या दारातून चढायचं. बसमध्ये कंडक्टर नसतोच. ड्रायव्हरजवळ लावलेल्या पीओएस मशिनला कार्ड लावायचं. हिरवा दिवा लागला, की मग पुढं जायचं. उतरायला मधल्या बाजूला दार आहे. सर्व रस्त्यांवर डावीकडची लेन या बससाठी राखीव असते. सायकलस्वारांना ओलांडून जायचं नाही, अशा सर्वत्र सूचना दिसल्या. सायकलवाले मात्र डाव्या बाजूने जोरात बसला ओव्हरटेक करून जाताना दिसतात. इथं अनेक बस ड्रायव्हर एशियन किंवा आफ्रिकी दिसतात. अनेक महिलाही ड्रायव्हर आहेत. त्या मात्र जास्त ‘व्हाइट’च होत्या. इथं बसला ठरलेलं १.७५ पौंड तिकीट आहे. एक स्टॉप प्रवास करा नाही तर शेवटपर्यंत करा. ‘टीएफएल’ (ट्रान्स्पोर्ट फॉर लंडन) या खासगी कंपनीतर्फे लंडनची वाहतूक चालविली जाते. कार्डमधून पैसे गेले, की ते ‘टीएफएल’ला गेले, असा मेसेज यायचा. मला डबल डेकर बसमध्ये बसल्याचा फारच आनंद झाला होता. मी तिथून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. लंडनमधले रस्ते फार मोठे नाहीत. मात्र, त्या रस्त्यावर एवढ्या पांढऱ्या लाइन्स ओढलेल्या असतात आणि एवढ्या सूचना लिहिलेल्या असतात की बस! बसवाल्यांच्या कौशल्याची मात्र कमाल वाटली. आमची बस कॅमडेन टाऊन भागातून गेली. हर्ष पूर्वी इथं राहत होता. काकांना त्या परिसराची आणि तिथल्या कालव्याची आठवण आली. त्यांनी बसमधून आम्हाला तो सगळा भाग दाखवला.

अर्ध्या-पाऊण तासात आम्ही टॉटनहॅम कोर्टला आलो. इथंच प्रसिद्ध ऑक्सफर्ड स्ट्रीट आहे. स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या समोरचा चौक जत्रेसारखा फुललेला दिसला. इथं अंडरग्राउंड स्टेशनवरून रस्ता बाहेर येतो, तिथं काचेचं एक त्रिकोणी छत आहे. आम्ही तिथं रस्त्यावर असलेल्या एका टपरीवजा दुकानात काही स्मृतिवस्तू पाहू लागलो. बऱ्यापैकी सौदा झाला आणि काही वस्तू आम्ही घेतल्या. इथून समोरच असलेल्या आउटरनेट या ठिकाणी आम्हाला हर्ष घेऊन गेला. एका इमारतीच्या खाली पार्किंगसारख्या जागेत तिन्ही बाजूंच्या भिंतींवर आणि छतावर मजेशीर प्रोजेक्शन सुरू होतं. त्यात चित्रं होती, स्माईली होत्या. अनेक जण खाली चक्क झोपून छताकडं बघत होते. इथून मला खरं तर ऑक्सफर्ड रोडवर भटकायचं होतं. मात्र, हर्षनं आमची गाडी पुढं दुसऱ्या दिशेला काढली. आम्ही वेस्टएंड, सोहो या भागाकडं निघालो होतो. जाताना ओडियन नावाचं थिएटर दिसलं. नंतर हर्षनं आम्हाला सात रस्ते एकत्र येतात, त्या परिसरात नेलं. तिथं अगदी आपल्या मुंबईच्या इरॉस थिएटरसारखा तोंडवळा असलेलं केंब्रिज थिएटर दिसलं. इथं ‘मटिल्डा’ या नाटकाचे शो सुरू होते. त्या सात रस्ता चौकात मधोमध एक मध्यम आकाराचा मनोरा होता. आम्ही तिथं जरा वेळ बसलो. मला लातूरच्या गंजगोलाईची आठवण झाली. तिथंही असेच अनेक रस्ते एकत्र येऊन मिळतात. आता आम्हाला भूक लागली होती. मग हर्षनं आम्हाला एका खाऊ गल्लीत नेलं. (नाव विसरलो.) तिथं एका स्टॉलवर भारतीय पदार्थ मिळत होते. साडेसात-आठ झालेले असल्यामुळं आता जेवूनच घ्यावं, असं ठरलं. मग काकांनी चक्क एक थाळी मागवली. मी आणि धनश्रीनं डोसा, तर नीलनं वडापाव घेतला. बऱ्याच दिवसांनी (म्हणजे पाच दिवसांनी) हे खाणं खाऊन जरा बरं वाटलं. खाल्ल्यामुळं ताजंतवानंही वाटलं आणि फिरायलाही जरा उत्साह आला. आता हर्षनं आम्हाला गल्ली-बोळांतून वेस्ट एंड परिसरात नेलं. एक मात्र जाणवलं. कितीही छोटी गल्ली किंवा बोळ असले, तरी सगळीकडे कमालीची स्वच्छता असायची; तसंच फुलांनी खिडक्या किंवा दाराच्या कमानी सजवलेल्या दिसल्या. वेस्ट एंड परिसर म्हणजे इकडची नाट्यपंढरी! या भागात अनेक थिएटर आहेत. समोरच एक भव्य थिएटर दिसलं. (त्याचं नाव विसरलो.) मात्र, तिथं ‘हॅरी पॉटर अँड द कर्स्ड चाइल्ड’चे प्रयोग सुरू होते. त्या थिएटरच्या बाह्य भागावर अतिशय सुंदर लायटिंग केलेलं होतं. एकूणच तो सगळा परिसर झगमगत होता. इथं एखादं नाटक बघायला मिळालं, तर काय बहार येईल, असं माझ्या मनात येऊन गेलं. (आमच्या प्लॅनमध्ये नाटक नव्हतं. पण माझ्या नशिबात होतं; आणि दोनच दिवसांनी मी ते पाहिलं...) 
इथून भटकत आम्ही सोहोच्या ‘चायना टाउन’मध्ये शिरलो. मी लंडनमध्ये आल्यापासून पाहत होतो, की इकडे आता चिनी लोक भरपूर दिसतात. विशेषत: तरुण विद्यार्थी. ‘अंडरग्राउंड’मध्येही ते बऱ्याच संख्येने असतात. हा ‘चायना टाउन’ परिसर म्हणजेच जणू मिनी चीनच. त्या संपूर्ण भागात चिनी (आणि कोरियन) रेस्टॉरंट होती. अगदी आपल्याकडे गणपतीत रस्त्यावर टेबलं टाकून बसायची व्यवस्था करतात, तसंही केलेलं दिसलं. (इकडे साउथ हॉल हा भाग आपल्या पंजाबी मंडळींचा भाग मानला जातो. इतका, की तिकडे अनेक पाट्याही पंजाबी भाषेत आहेत. मला काही या भागात जायला मिळालं नाही. चायना टाउन मात्र बघता आलं.) इथं रस्त्यांच्या वर दोन्ही बाजूंना जोडून आपल्याकडं पताका लावतात, तसे यांनी त्यांचे ते लाल कंदील सगळीकडं लावले होते. भरपूर सजावट होती. इकडच्या हॉटेलांमध्येही गर्दीही भरपूर होती. त्यात आज रविवार असल्यामुळे तर विशेषच गर्दी उसळली होती. 

आम्ही इकडून चालत चालत पिकॅडिली सर्कसपर्यंत पोचलो. हा लंडनचा एक मध्यवर्ती आणि महत्त्वाचा चौक. त्या चौकात एका बाजूला मोठमोठे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले लावले आहेत. आजूबाजूच्या इमारतीही मंद दिव्यांनी, प्रकाशझोतांनी झगमगत होत्या. संपूर्ण लंडन शहर म्हणजेच एक आनंदजत्रा आहे, असं मला आल्यापासून वाटत होतं. त्याचा हा चौक म्हणजे आणखी एक पुरावा होता. चौकाच्या मधोमध कुठला तरी नाचाचा कार्यक्रम सुरू होता. एक कृष्णवर्णीय तरुण आणि त्याचा एक साथीदार चपळाईने नाचत होते. लोक भोवती उभे राहून व्हिडिओ काढत होते. आम्ही बराच वेळ त्या चौकात उभे होतो. त्या चौकात अगदी मधोमध ‘मसाला झोन’ नावाचं भारतीय रेस्टॉरंट होतं. रस्त्यावर त्याचं मेनूकार्ड लावलं होतं. त्यात काही कोकणी नॉन-व्हेज पदार्थही दिसले.
आता आमचे पाय बोलायला लागले होते. पण भटकणं संपत नव्हतं. आम्ही आणखी पुढं गेलो, तर तिथं ओडियन हे भव्य थिएटर दिसलं. या थिएटरमध्ये अनेक सिनेमांचे प्रीमिअर शो होतात, असं हर्षनं सांगितलं. या थिएटरच्या समोर मोकळी जागा आहे. डाव्या बाजूला एम्पायर आयमॅक्स थिएटर होतं. अनेक लोक तिथल्या कट्ट्यांवर बसले होते. बाजूनं जी मोकळी जागा होती, तिथं प्रसिद्ध चित्रपट पात्रांचे पुतळे उभारले होते. आम्हाला झाडूवरून उडणाऱ्या हॅरी पॉटरचा पुतळा दिसला. ओडियन थिएटरच्या वर ‘बॅटमॅन’चा पुतळा उभारलेला आहे. इथून घरी जाताना पुन्हा बसनंच जायचं ठरलं. आम्ही बसस्टॉपवर आलो. तिथंही ‘महाराजा’ नावाचं एक भारतीय हॉटेल दिसलं. 
थोड्याच वेळात बस आली. पुन्हा एकदा डबल डेकरमध्ये बसण्याचा आनंद... घर अगदी जवळ आलं असताना सर्वांत पुढच्या सीटवर एकदाचं बसायला मिळालं. आमचा स्टॉप आला. आता बागेला वळसा घालून रस्त्याने आम्हाला घराकडं जायचं होतं. चालत चालत घरी पोचलो, तेव्हा अकरा वाजून गेले होते. आज उशिरा सुरू झालेली ही भटकंती उशिराच संपली होती. 
परेशकडचा पाहुणचार, पहिलीवहिली ‘टेस्ला’ची आणि डबल डेकरची सफर आणि पिकॅडिली सर्कससह ‘वेस्ट एंड’चं दर्शन यामुळं हा श्रावणातला लंडनमधला पहिला व एकमेव रविवार सार्थकी लागला होता...

(क्रमश:)



----------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

2 comments:

  1. खूप सुंदर वर्णन ...अगदी तुमच्याबरोबर आम्ही पण सारे काही पाहतोय, अनुभवतोय असेच वाटत आहे ...लंडन वारी खूपच एन्जॉय करते आहे...👏👏👏👌👍🌹

    ReplyDelete