घरपरतीच्या वाटेवरती...
----------------------------
लंडन, गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३.
बघता बघता आठ दिवस सरलेही आणि आमचा पुन्हा मायदेशी परतण्याचा दिवस येऊन ठेपला. चांगली स्वप्नं लवकर संपतात, असं म्हणतात. माझ्यासाठी लंडनमधले हे आठ दिवस अशाच सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हते. आपलं रोजचं जगणं, भवताल, आपलं दैनंदिन चाकोरीबद्ध आयुष्य, घर, ऑफिस, नेहमीचा रस्ता, नेहमीची गाडी, नेहमीचा डबा, नेहमीचं बेड... हे सगळं आठ दिवस सोबत नव्हतं. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या, कधीही न अनुभवलेल्या अशा - ७५०० किलोमीटर अंतरावरच्या - एका जगप्रसिद्ध अशा शहरात आम्ही वास्तव्य केलं होतं. जवळपास रोज पायाला भिंगरी लागल्यासारखं, उत्सुक नजरेनं ते सगळं बघितलं होतं. डोळ्यांत साठवलं होतं, मेंदूत नोंदवलं होतं, हृदयात जपलं होतं!
आज, गुरुवारी रात्री ९.३० वाजता आमची परतीची फ्लाइट होती. येताना ‘इजिप्त एअर’ होती आणि कैरोला एक थांबा होता. जाताना मात्र मुद्दाम थेट जाणारी ‘एअर इंडिया’ची फ्लाइट बुक केली होती. घरी जाताना मध्ये कुठेही थांबायचा कंटाळा येतो आणि एकदा प्रवास सुरू झाला, की कधी घरी पोचतो असं होऊन जातं, हे मला अनुभवांती चांगलं माहिती होतं. प्रवासाचा दिवस म्हणून आम्ही या दिवशी कुठलाही नियोजित कार्यक्रम किंवा कुठेही भेट, फिरणं असं काही ठेवलं नव्हतं. सकाळी मोकळा वेळ होता, म्हणून आम्ही जवळच्या शॉपिंग मॉलमध्ये काही खरेदी करायला म्हणून बाहेर पडलो. या वेळी आम्ही बागेच्या उत्तर दिशेला गेलो. या भागात आम्ही आधी आलो नव्हतो. तिथं शेजारी शेजारी मोठे मॉल होते. शॉपिंग कॉम्प्लेक्सच होतं ते. मधोमध कार पार्किंगला मोकळी जागा होती. आम्ही आधी ‘पाउंडलँड’ नावाच्या दुकानात गेलो. पूर्वी आपल्याकडे ‘49 & 99’ अशी दुकानं असायची. त्यात बहुतेक वस्तू ४९ किंवा ९९ रुपयांना असायच्या. तसंच इथं होतं. इथं बहुतांश वस्तू एक पौंडाला मिळत होत्या. मग तिथं काही वस्तू घेतल्या. मग पुढं ‘सॅन्सबरीज’ हा मोठा मॉल होता, तिकडं गेलो. हे इथलं ‘डी-मार्ट’ म्हणायला हरकत नाही. कारण शहरात अनेक ठिकाणी याच्या शाखा बघितल्या. इथं दारात ट्रॉल्यांची जी लाइन होती, तिला कुलूप होतं. त्या ट्रॉलीच्या हँडलला एक नाणं सरकवायची खाच होती. तिथं एक पौंड टाकला, की ती कुलपासारखी साखळी निघते आणि मग ती ट्रॉली आपल्याला मिळते. परत जाताना ट्रॉली पुन्हा कुलूपबंद केली, की ती खाच उघडून आपला एक पौंड परत मिळतो. एका अर्थानं ते डिपॉझिट ठेवल्यासारखी व्यवस्था होती. मी असं आधी कुठं पाहिलं नव्हतं, म्हणून मला मजा वाटली.
मॉलमध्ये शिरताच मला सुरुवातीलाच एका शेल्फमध्ये रोजची वर्तमानपत्रं दिसली. टाइम्स, डेली मेल, डेली मिरर, डेली एक्स्प्रेस ही वृत्तपत्रं बघितली. इकडे आपल्यासारखी ब्रॉडशीट, म्हणजे मोठ्या आकाराची वृत्तपत्रं नाहीत. सगळी टॅब्लॉइड! मी गेल्या आठ दिवसांत रोजचा पेपर हाताळला नव्हता, त्यामुळं लगेच उत्सुकतेनं सगळे पेपर चाळले. भारताच्या चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगची बातमी सर्व वृत्तपत्रांनी चांगली दिली होती. आतील पानांत असली, तरी बहुतेकांनी पानभर वापरली होती. शीर्षकंही कौतुक करणारीच होती; अपवाद फक्त डेली एक्स्प्रेसचा! या वृत्तपत्रानं मात्र ‘चंद्रावर यान पाठविणाऱ्या या महासत्तेला यूके दर वर्षी अमुकतमुक मिलियन पौंडची मदत का करतोय?’ असं जरा खोचक शीर्षक दिलं होतं. ते अर्थात तिथल्या राज्यकर्त्यांना - विशेषत: आत्ताचे पंतप्रधान मूळ भारतीय वंशाचे आहेत हे लक्षात घेता - उद्देशून होतं, हे उघड होतं. मी ते पेपर वाचून तिथं ठेवून दिले आणि बाकी खरेदीकडं वळलो. इथली काही काही फळं वेगळी दिसली. केळी इथं पिकतच नाहीत, असं हर्षनं मागं सांगितलं होतं. इथं केळी येतात ती कोस्टारिकामधून. आलूबुखार, स्ट्रॉबेरी, संत्री, द्राक्षं ही फळंही आपल्यापेक्षा दिसायला थोडी वेगळी दिसतात. इकडे शेतमाल आयात करताना बरेच नियम, निर्बंध आहेत. त्याचा परिणाम असावा. पण इथल्या लोकांना त्यामुळं उत्तम दर्जाची फळं मिळतात, हे नक्की. आम्ही द्राक्षं घेतली होती, ती अगदी गोल आकाराची होती आणि भन्नाट चवीची होती. याच दालनाच्या पुढं द्राक्षांचं जन्मांतर असलेले द्रवही दिसले. आपल्याकडे ते असे उघड मॉलमध्ये विकायची टूम मध्येच निघते आणि परत विरून जाते. इकडे तसला काही पेच नसल्याने त्या विभागात जगभरातील उंची मद्ये सुखाने शेजारी शेजारी नांदत होती. मी उत्सुकतेने त्या भागात चक्कर टाकून आलो. तिथल्या वेगवेगळ्या वाइन, बीअर, व्हिस्की, रम, जीन आणि इतर ‘जी जी रं जी जी रं जी जी जी’ मंडळी आणि त्यातली व्हरायटी बघून थक्क झालो. जगात माणसानं काय ही मदहोश गोष्ट शोधून काढली आहे, असं वाटून गेलं. मी त्या चिंतनात बुडालेलो असतानाच कुटुंबाची हाक आली आणि मी पुन्हा भेंडी, बटाटा, वांगी आदी ‘मंडई’त शिरलो.
खरेदी झाल्यावर आता आपलं आपण बिल करायचं, यात आम्ही तयार झालो होतो. नीलला ते करण्याची क्रेझ होती. मग त्यानेच ते बिल केलं आणि आम्ही बाहेर पडलो. इथून चालत घरी पोचलो. आता बॅगा भरणे, काही वस्तू पुन्हा काढणे, परत भरणे असला कार्यक्रम सुरू झाला. सुदैवानं आम्हा दोघांनाही फार भरमसाठ सामान घेऊन फिरायची सवय नसल्याने आमच्या चार आटोपशीर आकाराच्या बॅगा पटकन भरून झाल्या. बॅगा भरणे हे माझं डिपार्टमेंट. त्यातल्या सर्व वस्तू नीट घडी घालून, कमीत कमी जागा व्यापतील, अशा पद्धतीने भरायला मला आवडतं. तर त्या बॅगाही भरून झाल्या. आम्ही संध्याकाळी साधारण पाच वाजता हर्ष-अनुजा आणि काका-काकूंचा निरोप घेऊन निघालो. काका-काकू पुढच्या आठवड्यात परत येणार होते. हर्ष आणि अनुजानं आज ‘वर्क फ्रॉम होम’ करायचं ठरवलं होतं. त्यामुळं ते आम्हाला सोडायला फिन्सबरी पार्क स्टेशनपर्यंत आले. इथं पुन्हा एकदा सेल्फ्यांची आवर्तनं झाली. आम्ही स्टेशनच्या आत जाऊन दिसेनासे होईपर्यंत काका आमचे फोटो काढत होते. आमचाही पाय नक्कीच जड झाला होता. मगाशी ‘सिटी मॅपर’वर हिथ्रो टर्मिनलकडे जाणाऱ्या ट्रेनच दिसत नव्हत्या. काही अडचण तर उद्भवली नाही ना, असं वाटलं. मात्र, तसं काही नव्हतं. स्टेशनवरून लगेच हिथ्रो टर्मिनल २ कडे जाणारी अंडरग्राउंड ट्रेन आली. आमचा आजचा या ट्रिपमधला तरी ‘अंडरग्राउंड’चा हा शेवटचा प्रवास होता. आमच्या मोठमोठ्या बॅगा दाराच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवल्याने मला उभ्यानेच प्रवास करावा लागला. सुमारे तासाभराचा हा प्रवास होता. आता आर्सेनल, हॉलोवे रोड, कॅलेडोनियन रोड, किंग्ज क्रॉस, रसेल स्क्वेअर, हॉलबर्न, कॉव्हेंट गार्डन, लिस्टर स्क्वेअर, पिकॅडिली सर्कस, ग्रीन पार्क, हाइड पार्क कॉर्नर, नाइटब्रिज, साउथ केन्सिंग्टन, ग्लॉसेस्टर रोड, अर्ल्स कोर्ट, बॅरन्स कोर्ट, ॲक्टन टाउन, ऑस्टरली, हन्सलो ईस्ट, हन्सलो सेंट्रल, हन्सलो वेस्ट ही स्टेशनं भराभर मागं पडत होती. आठ दिवसांच्या वास्तव्यात या स्टेशनांचा क्रम बऱ्यापैकी लक्षात राहिला होता. जवळपास तासा-सव्वा तासानंतर हिथ्रो टर्मिनल २ स्टेशन आलं. इथं उतरलो. बऱ्याच लिफ्ट, एस्कलेटर, ट्रॅव्हलेटर करत करत एकदाचे टर्मिनल २, अर्थात क्वीन्स टर्मिनलला पोचलो. इथं जाताना फार काही कटकट नसते. इमिग्रेशनमधून आम्ही झटपट आत आलो.
आम्हाला फ्लाइटमध्ये जेवण असणार होतं; पण पाच वाजल्यापासून रात्री दहा-सव्वादहापर्यंत काय खाल, म्हणून हर्षनं आम्हाला पराठे पार्सल करून दिले होते. मला तर खरं भरून आलं होतं. एवढं कोण करतं हो! आणि खरं सांगतो. आम्हाला तिथं पोचेपर्यंत भूक लागलीच होती. मग आम्ही वर तिथे बसून ते पराठे खाल्ले आणि खरंच बरं वाटलं. हर्षचा हा निर्णय किती बरोबर होता, हे आम्हाला नंतर कळणारच होतं.
आता ‘एअर इंडिया’च्या खिडकीत जाऊन सामान ‘चेक-इन’ करणं हा प्रकार राहिला होता. तिकडं भली-मोठी लाइन होती. आम्ही तिथल्या किऑस्कमध्ये ऑनलाइन (वेब) चेक-इन केलं. तिथून आलेल्या त्या पट्ट्याही ताब्यात घेतल्या. तरीही आम्हाला त्या लाइनीत उभं राहावं लागलं. अखेर बरंच पुढं गेल्यावर तिथल्या माणसांनी ऑनलाइन ‘चेक-इन’ केलेल्यांना वेगळ्या व छोट्या रांगेत उभं केलं. अखेर एकदाच्या बॅगा त्यांच्या ताब्यात गेल्या आणि आम्ही जरा मोकळे झालो. इकडून आता सिक्युरिटी. ते काम तसं लवकर झालं. फक्त इकडे सिक्युरिटी चेकिंग करताना बेल्ट काढायला लावला आणि आडवं उभं राहून, विशिष्ट पद्धतीने दोन्ही हात वर करून उभं राहायला लावलं. अर्थात सगळ्यांनाच तसं ते करत होते, पण मला जरा ते एम्बॅरसिंग वाटलं. अर्थात इलाज नव्हता. पण ते सगळं झटपट संपवून ‘ड्युटी फ्री’त रेंगाळलो. खरं तर आम्ही संपूर्ण ट्रिपमध्ये खरेदीचा मोह कटाक्षाने टाळला होता. इकडे सगळं पौंडाच्या हिशेबात महाग, हा महत्त्वाचा मुद्दा तर होताच; शिवाय भारतात जे मिळतं त्याच वस्तू इकडे घेण्यापेक्षा फिरण्यासाठी, खाण्यासाठी, तिकिटांसाठी ते पैसे वापरावेत, असं आम्हाला वाटत होतं. ‘ड्युटी फ्री’मध्येही खरेदीचा मोह आवरला आणि पुढं निघालो.
आमच्या फ्लाइटचा गेट नंबर ३९ होता, हे तिथल्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर कळलं. मग आम्ही तिकडं निघालो. तिकडं पोचायला चालत १० ते १५ मिनिटं लागतील, असंही तिथल्या फलकांवर लिहिलं होतं. ही सोय चांगली होती, मात्र त्यामुळं आमची पायपीट टळणार नव्हतीच. हा हिथ्रो विमानतळ एवढा अवाढव्य आहे, की बस! आम्ही पुन्हा अनेक लिफ्ट, एस्कलेटर, ट्रॅव्हलेटर अशी मजल-दरमजल करत त्या ३९ क्रमांकाच्या ‘एअर इंडिया’च्या गेटवर पोचलो. इकडे आपल्या लोकांची भरपूर गर्दी दिसली. खरं तर इथंच आपण भारतात असल्यासारखं वाटलं. ‘एअर इंडिया’च्या स्टाफमधले मराठी लोक एकमेकांत बोलताना ऐकू येत होतं. एकूण ‘मेरे देश की मिट्टी’चा सुगंध इकडेच यायला लागला होता. आमचं बोर्डिंग तसं वेळेत सुरू झालं आणि आम्ही विमानात जाऊनही बसलो. मात्र, आता खरी गंमत होती. आमच्या फ्लाइटला ‘टेक ऑफ’ करायला सिग्नलच मिळेना. बराच वेळ ते जागेवरच उभं होतं. हवाई सुंदऱ्यांनी लगबग करून लोकांना तेवढ्यात ती तसली पॅक्ड बिस्किटं वगैरे कोरडा खाऊ द्यायला सुरुवात केली. मात्र, लोकांची अस्वस्थता वाढत होती. अखेर पायलटने जाहीर केलं, की युरोपच्या आकाशात विमानांची प्रचंड गर्दी झाली असल्यानं आपल्याला उडायला परवानगी नाही. साधारण ११ वाजता आपण उड्डाण करू शकू. झालं! आता इथंच दीड तास बसणं आलं. अशा वेळी समोर चालणारा स्क्रीन व त्यावर एखादा सिनेमा बघणं ही करमणूक त्यातल्या त्यात घडू शकते. मात्र, आमच्या तिघांचेही समोरचे स्क्रीन धड नव्हते. एकही सुरू नव्हता. माझा तर शेवटपर्यंत झाला नाही. त्या सुंदरीला सांगून झालं. तिनं एकदा तिकडं जाऊन ती सिस्टीम रिसेटही केली. मात्र, स्क्रीन सुरू होण्यापलीकडे काहीही झालं नाही. मला बाकी काही नाही; पण तो ‘पाथ मोड’ तरी बघायचाच असतो. पण ते काही नशिबात नव्हतं. ‘एअर इंडिया’ आता ‘टाटां’कडं आली असली, तरी सेवा सुधारणेला अजून भरपूरच वाव आहे, असं वाटलं. प्रचंड कंटाळ्यानंतर अखेर ११ वाजून पाच मिनिटांनी ते विमान एकदाचं हललं. त्या प्रचंड विमानतळावर आमची ‘टॅक्सी’च १५ मिनिटं चालली. अखेर साडेअकराच्या सुमारास आमच्या त्या ‘बोइंग’नं अवकाशात झेप घेतली आणि आम्ही हुश्श केलं. खाली लंडन हिऱ्या-माणकांसारखं लखलखत होतं. मनातल्या मनात पुन्हा एकदा लंडनला ‘बाय बाय’ केलं. थोड्याच वेळात ढगांत खालचं दृश्य दिसेनासं झालं. आता रात्रही झाली होती. उशीर झाल्यानं हवाई सुंदरींनी भराभर जेवण आणून दिलं. इकडे ‘खान-पान’ व्यवस्था बरी होती. म्हणजे ‘पान’ बरं होतं; ‘खान’ ठीकठाकच होतं. एकूण पनीर हा प्रकार एवढ्या विविध तऱ्हेने तुमच्यावर मारला जातो की काही विचारू नका. काही पदार्थांबाबत केवळ ‘अतिपरिचया’ने ‘अवज्ञा’ होते, त्यातला हा एक!
२५ ऑगस्ट २३, मुंबई
असो. आता ही फ्लाइट नॉनस्टॉप असल्यानं थेट मुंबईतच उतरायचं होतं. निर्धारित वेळ सकाळी ११ ची होती. मात्र, निघायलाच उशीर झाल्याने आता ही तास-सव्वा तास उशिरा पोचणार हे गृहीत धरलंच होतं. माझा ‘पाथ मोड’ बंद असल्याने विमान नक्की कुठे आहे, हे काही कळतच नव्हतं. आता सकाळचा नाश्ता, चहाही देण्यात आला होता. खिडकीतून अरबी समुद्र तरी दिसेल असं वाटत होतं. मात्र, ढगांची दाट चादर होती. ती हटली, तरी खाली काळपट असंच काही तरी दिसायचं. आता तो समुद्र आहे की ढगच आहेत हे काही कळत नव्हतं. शेवटी मी तो नाद सोडला. थोड्याच वेळात ‘डिसेंडिंग’ सुरू होणार, अशी घोषणा झाली. मुंबईत पहिल्या फटक्यात कधी विमान उतरत नाही, हे माहिती होतंच. मग दोन फेऱ्या झाल्या. मागे येऊन परत महाराष्ट्राच्या मुख्य भूमीवर आलो. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या दिसायला लागल्या. अखेर ‘एटीसी’कडून ग्रीन सिग्नल मिळाला असावा. विमान झपाट्यानं खाली येऊ लागलं. खाडी ओलांडली आणि थोड्याच वेळात ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या एकुलत्या एक रन-वेला आमच्या विमानाची चाकं लागली. मनातल्या मनात ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर केला.
विमानातून टर्मिनलला आलो. विमानातच घोषणा झाली होती, की बॅगा ५ नंबरला येतील. आम्ही आपले त्या पट्ट्यापाशी जाऊन थांबलो. आमची आन्हिकंही उरकली. तरी त्या पट्ट्यावर काही हालचाल दिसेना. मग नीललाच शंका आली, म्हणून दहा नंबरच्या पट्ट्यापाशी गेलो. तिथं बॅगा येत होत्या. क्षणात आपण भारतात आल्याची जाणीव झाली. थोड्या वेळानं आलेल्या बॅगा गुपचूप उचलल्या. इकडे ‘ग्रीन चॅनेल’ला पहिल्यांदाच एक अधिकारी आडवा आला. कुठून आलात, बॅगेत काय वगैरे किरकोळ विचारल्यासारखं करून त्यानं (बहुदा आमच्या चेहऱ्यांकडं बघून) जाऊ दिलं. आम्ही जाताना जी कॅब पुण्यातून केली होती, त्यांनाच बोलावलं होतं. अखेर दीड वाजता आमची व त्यांची भेट झाली. फूड मॉलला एक ब्रेक घेऊन आम्ही जवळपास पाच -सव्वापाचला अखेर सुखरूप घरी पोचलो... लंडन ट्रिपचं स्वप्न अशा रीतीनं सुफळ संपूर्ण झालं होतं... मन समाधानानं शिगोशीग भरलं होतं...!
-----------------------------
उपसंहार...
नंतरचे दोन दिवस आमची सुट्टीच होती. जेटलॅग थोडासा जाणवला. सकाळी उशिरा उठलो. जवळपास दहाच्या पुढं... मग लक्षात आलं, आत्ता लंडनला साडेपाच वाजले असतील पहाटेचे! आम्हाला तिकडं साधारण साडेपाच-सहालाच जाग यायची. मात्र, दोन दिवस संपले आणि सोमवारपासून म्हणजे २८ ऑगस्टपासून ऑफिसला जायला लागलो. सुरुवातीचे काही दिवस लंडनला खरोखरच ‘मिस’ केलं. मग तिथं काढलेले फोटो, व्हिडिओ पुन:पुन्हा पाहिले. अंडरग्राउंड ट्रेनचे व्हिडिओ यू-ट्यूबवर बघितले. काका-काकू अजून तिकडंच असल्याने ते तिकडचे फोटो आमच्या ग्रुपवर टाकायचे आणि ‘आम्ही तुम्हाला मिस करतोय,’ असं लिहायचे. त्यामुळं तर हे आणखीनच जाणवायचं. मग फेसबुकवर एक ‘लंडन फोटोग्राफी क्लब’ नावाचा ग्रुप सापडला. तो जॉइन केला आणि तिथं फोटो टाकायला सुरुवात केली. संपूर्ण लंडन ट्रिपमध्ये सोशल मीडियावर एकही फोटो टाकायचा नाही, हे बंधन मी स्वत:वर घालून घेतलं होतं आणि ते परत येईपर्यंत पाळलं. आल्यावर शनिवारी सकाळी पहिल्या दिवसाचे, म्हणजे जातानाचे फोटो टाकले. त्यात ‘जाऊन आलो,’ असं स्पष्ट लिहिलेलं असूनही अनेकांना आम्ही त्याच दिवशी तिकडं गेलो आहोत, असं वाटलं, तो भाग निराळा! मग पुढचे काही दिवस रोजचे फोटो एकेका दिवशी आणि मग ३० ऑगस्टला ब्लॉगचा पहिला भाग लिहिला तेव्हा मलाच हुश्श वाटलं. हे लिखाण म्हणजे माझ्या स्वत:च्या आनंदासाठी केलेलं लिखाण आहे. अर्थात ते मी सोशल मीडियावर शेअर करतोच. त्यातून जे वाचतील ते वाचतील. मला स्वत:ला आणखी दहा-वीस वर्षांनी एवढे तपशील लक्षात राहणार नाहीत, म्हणून हे अगदी बारीक-सारीक वर्णन टिपून लिहून ठेवण्याचा घाट! शिवाय पुन्हा कधी जाणं होतंय, नाही होत कुणाला माहिती! अनेक गोष्टी करायच्या, बघायच्या राहिल्या हे तर उघडच आहे. मात्र, जे काही बघितलं तेही आयुष्यभर लक्षात राहील आणि त्या स्मृती आनंद देत राहतील, हे नक्की.
दोन दिवसांनंतर बाहेर पडलो, तर तिकडच्या सवयीप्रमाणे (झेब्रा क्रॉसिंगवरूनच) बिनधास्त रस्ता ओलांडायला लागलो, तर एक दुचाकीवाला जोरात आला आणि माझ्याकडे भयंकर लूक (‘दोन मिनिटं थांबता येत नाही का, ***’) देऊन पुढं निघून गेला. मी लंडनच्या नव्हे, तर पुण्याच्या रस्त्यावर आहे हे मग माझ्या डोक्यात आलं.
नंतर मी एकदा दुचाकी घेऊन निघालो होतो. आमच्या घराजवळच एक शाळा आहे. तिथं मोठं झेब्रा क्रॉसिंग आहे. तिथून एक बाई लहान मुलाची प्रॅम घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी पुढं येत होत्या, पुन्हा थांबत होत्या. मी आपोआप माझी बाइक हळू केली. मग मागून येणारी एक कारही स्लो झाली. त्यांना ते लक्षात आलं. त्यांनी झटकन रस्ता ओलांडला. जाताना माझ्याकडे पाहून एक स्मितहास्य केलं...
अवघी लंडनवारी इथं सुफळ झाली!!
(विशेष उल्लेख - शीर्षक प्रेरणा : शान्ता शेळके यांची कविता... कौशल इनामदार यांनी फार सुरेख चाल दिली आहे या कवितेला!)
(समाप्त)
-------------------
लंडन प्रवास मार्गदर्शिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
------