15 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग ५

खग येती कोटरासी...
-----------------------



गुरुवार, ७ जून २०१८

सहल आता अंतिम टप्प्यात आली होती. आज फक्त जुरांग बर्ड पार्कला भेट होती. त्यानंतर संध्याकाळचा वेळ शॉपिंगसाठी फ्री होता. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सातला परतीची फ्लाइट होती. नेहमीप्रमाणे सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून पावणेनऊला लॉबीत येऊन थांबलो. आज जरा सगळे निवांत होते. त्यामुळं बसही थोडी उशिरा सुटली. सरिनाला 'र' आणि 'ड' म्हणता यायचं नाही. त्यामुळं ती 'जुरांग बर्ड पार्क'चा उच्चार 'ज्युओंग बप्पा' असा काही तरी करायची. आमचा गाइड कुणाल गाडीत असला, तर तो गाडी सुटताना रोज 'गणपतीबाप्पा मोरया'चा गजर करायचा. मी म्हटलं, सरिनाला वाटेल, की आपल्याकडं पण गणपती नावाचं बर्ड पार्क आहे की काय!
जुरांग बर्ड पार्क मलेशियाच्या सीमेच्या बाजूला होतं. त्या पार्कपासून अवघ्या वीस-बावीस किलोमीटरवर मलेशियाची सीमा होती. सिंगापूर ते क्वालालंपूर हा प्रवास अनेक पर्यटक बसनंच करतात. साधारण तीनशे-साडेतीनशे किलोमीटरचं हे अंतर बस पाच तासांत पार करते. विमानानं जायला अर्धा-एक तास लागत असला, तरी इमिग्रेशन वगैरे सोपस्कार करून प्रवासाचा वेळ पाच तासांवर जातोच. त्यापेक्षा अनेक पर्यटक बसनंच जातात. थोड्याच वेळात बर्ड पार्क आलं. हेही सिंगापुरातलं एक लोकप्रिय ठिकाण असल्यानं तिथं गर्दी होतीच. इथं गेल्या गेल्या पेंग्विन पाहायला मिळाले. या पक्ष्याविषयी मला आकर्षण आहे. मध्यंतरी 'एम्परर पेंग्विन'विषयी एक फिल्म पाहिली होती, तेव्हापासून तर विशेषच... सिंगापुरात अंटार्क्टिकाप्रमाणं नियंत्रित तापमान तयार करून त्यात हे पक्षी ठेवण्यात आले आहेत. तिथं त्यांना हिंडायला-फिरायला मोकळी जागा होती. पण काही झालं तरी तो परक्या भूमीवरचा बंदीवासच... एकदम सावरकर आठवले. आपलं मन पक्ष्यापेक्षाही वेगवान... कुठून कुठं जाईल, सांगता येत नाही. अंटार्क्टिका खंडात माणसाचं नखही दिसायची शक्यता नसताना इथं काचेपलीकडं माणसांच्या झुंडीच्या झुंडी पाहून त्या पेंग्विनना काय वाटत असेल, याचा मी विचार करत बसलो. हा अत्यंत बुद्धिमान पक्षी आहे, असं म्हणतात. त्यातले अनेक कित्येक मिनिटे अजिबात हालचाल न करता तस्सेच उभे होते. 'गेलाबिला की काय,' असा खास भारतीय विचार माझ्या मनात डोकावला खरा... पण त्यांच्या त्या निद्राराधनेत अजिबात व्यत्यय आणू नये, असंही वाटलं. पेंग्विन पक्ष्यांना खायला घालण्याचा एक खेळ बाहेरच्या बाजूला सुरू होता. हे पेंग्विन आफ्रिकेतले होते म्हणे. त्यामुळं ते सामान्य तापमानात राहू शकतात. पाण्यात टाकलेले मासे पकडायची त्यांची धडपड मुलांना मजेशीर वाटत होती. एरवी कधी बघायला न मिळणारे हे पक्षी इथं मनसोक्त बघायला मिळाले. मुंबईच्या जिजामाता बागेतही हे पेंग्विन आणून ठेवले आहेत. पण ते बघण्याआधी सिंगापुरात बघायला मिळाले.
नंतर या बर्ड पार्कमध्ये दोन शो पाहायला मिळाले. पहिल्या शोमध्ये गिधाडासारखे मोठे पक्षी होते. त्यात प्रेक्षकांमधल्या काही जणांना बोलावून त्यांच्या हातावर हे पक्षी लँड करायला लावायचे. एका भारतीय तरुणीला बोलावलं. ती धीटपणे गेली, पण नंतर शो कंडक्ट करणाऱ्या मुलीनं त्या पक्ष्याचं वजन विचारल्यानंतर, तिनं '५० किलो' असं सांगितल्यावर हसावं की रडावं कळेना. मला ते वजन पाच किलो असेल, असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात ते अवघं दोन किलो होतं. हा शो झाल्यावर दुसरा एक 'हाय फ्लायर शो' होता. हा शो जास्त चांगला होता. यातली ती शीना नावाची मुलगी किमान दोन-तीन वर्षं हा शो सादर करीत असावी. कारण २०१६ मधला तिचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर पाहायला मिळाला. (शक्य त्यांनी नक्की बघा.) यात अमिगो नावाच्या बोलक्या पोपटाचा लोकप्रिय शो दिसतो. हा पोपट पढवलेलं सगळं घडाघडा बोलतो. अगदी गाणी वगैरेही म्हणतो. जरा अविश्वसनीयच प्रकार वाटला. याशिवाय त्या रिंगांतून पक्ष्यांना उडायला लावणं वगैरे अगदी सर्कस टाइप प्रकार होते. या बुद्धिमान पक्ष्यांना प्रशिक्षण देऊन तयार केलं होतं. ते सगळं पाहायला कितीही छान वाटलं, तरी शेवटी माणूस आपल्या मनोरंजनासाठी त्या मुक्या जीवांना (अपवाद तो अमिगो) राबवतोय, असंच वाटलं.
हा शो संपल्यावर मग एक ट्राम घेऊन पुढच्या एका ठिकाणी उतरलो. इथं पक्ष्यांना खायला घालायला एका वाटीत धान्य मिळतं. त्याची किंमत ३ डॉलर. मग ते पक्षी तुमच्या हातावर वगैरे येऊन बसतात म्हणे. मला तर हे पक्षी हातावर घेणे प्रकार पाहिल्यावर लहानपणच्या इतिहासाच्या पुस्तकातला शहाजहान की अकबर की असाच कुठलासा बादशहाच आठवतो. शिवाय ती शिबी राजाची गोष्ट आठवते. पक्षी किंवा प्राणी यांच्याविषयीचं माझं प्रेम लांबूनच आहे. ('पाळीव प्राणी' याबाबतीत पुलंचं आणि माझं एकमत आहे. हा हा हा!) पण माझ्या मुलाला तो पक्षी हातावर घ्यायचाच होता. पण एवढ्या लोकांच्या वाट्यांतलं धान्य खाऊन खाऊन त्या पक्ष्यांना वारंवार अपचन होत असणार. कारण 'शिट शिट' असे उच्चार जागोजागी कानावर पडत होते. मीपण एकदा थोडक्यात बचावलो. पण त्या उंच मचाणांवरून इकडं-तिकडं फिरायला मजा येत होती. शिवाय तीन डॉलरची वाटी न घेताही एक पंचरंगी पोपट आमच्या लेकाच्या हातावर बसला आणि तो धन्य झाला. (तो म्हणजे माझा मुलगा!)
परत येतानाची ट्राम पकडली आणि पुन्हा प्रवेशद्वारावर आलो. येताना एका तळ्यात विहरणारा राजहंस दिसला आणि डोळ्यांचं पारणं फिटलं. परतल्यावर त्या बर्ड पार्कमध्येच असलेल्या एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये लंच होतं. ते आटोपून आम्ही परत हॉटेलला आलो.
थोडी विश्रांती घेऊन साडेपाच वाजता बस आम्हाला शॉपिंगला न्यायला परत येणार होती. संध्याकाळी आम्ही सगळे परत त्या मुस्तफा मार्केटच्या गल्लीत हजर. आता मला ती गल्ली आणि आजूबाजूचे रस्ते पाठ झाले होते. पहिल्याच दिवशी हेरून ठेवलेल्या काही दुकानांमध्ये इष्ट ती खरेदी झाली. तरी 'मुस्तफा'च्या आत शिरायचा मोह आवरत नव्हता. अखेर तिथंही गेलो. आपल्याकडं साधारणतः दहा वर्षांपूर्वी 'बिग बझार'ची जी अवस्था होती, तीच कळा त्या मार्केटला होती. यापूर्वी या मार्केटविषयी जे काही ऐकलं होतं ते आणि प्रत्यक्षात तो मॉल पाहून साफ अपेक्षाभंग झाला. तिथं स्थानिक लोक (त्यात भारतीयच पुन्हा) किराणा माल वगैरे खरेदी करत होते, ते पाहून तर आम्ही बाहेरच पडलो. समोर एक सिटी मॉल नावाचा मोठा मॉल होता. तिथं एक दोन डॉलर जपानी शॉप (आपल्याकडच्या ४९/९९ सारखं) आहे, असं कळलं होतं. ते ऐकून तिथं धाव घेतली. पण तेही विशेष असं नव्हतं. एकूणच खरेदी या विषयावर आपला 'आतला आवाज' जे काही सांगतो, तेच बरोबर असतं, याची प्रचिती पुन्हा आली. केवळ प्रतीकात्मक अशी थोडीफार खरेदी आम्ही केली आणि जेवायला परतलो.
रात्री हॉटेलात लवकर आल्यामुळं आमच्या हॉटेलच्या परिसरात भटकंती करायचं ठरवलं. हा ऑर्चर्ड रोड म्हणजे इथला एमजी रोड म्हणायला हरकत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भव्य मॉल उभे होते. आमच्या हॉटेलच्या गल्लीतून बाहेर पडल्यावर समोरच एक 'सेक्स शॉप' दिसलं. त्यावर गावठी पद्धतीचं भडक लाइटिंग केलं होतं. ते पाहून धनश्री व वृषालीनं रस्ता बदलला. येताना याच रस्त्यावर मी जरा थोडा पुढं एकटा चालत आलो, तेव्हा एका कॉलगर्लनं हटकलं. या दोन मुलींना आमच्या बायकांनी पहिल्या दिवशीच पाहिलं होतं. त्यातली एक अशी अचानक भेटली. मी काहीच न बोलता पुढं गेलो, हे पाहून तिनं मागच्या बाजूला एका कारजवळ चार-पाच तरुण उभे होते तिकडं मोर्चा वळवला.
बाकी हा रस्ता आणि तिथले मॉल झक्कास होते. रस्त्याच्या या बाजूनं दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी एक स्कायवॉकसारखा पूल होता. आम्ही एका इमारतीतून वर जाऊन त्या वॉक-वेमधून त्या दुसऱ्या मॉलमध्ये उतरलो. विंडो शॉपिंग करत करत मग पायाचे तुकडे पडायला लागल्यावर हॉटेलात परतलो. हा इथला शेवटचा मुक्काम होता... दिवसभराच्या वणवणीमुळं गाढ झोप लागली.

शुक्रवार, ८ जून २०१८

दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करायला गेलो, तेव्हा धो धो पाऊस आला. आमच्या चार दिवसांच्या मुक्कामात त्यानं अजिबात तोंड दाखवलं नव्हतं. शुक्रवारी सकाळी इतर प्रवासी कंपन्यांच्या टूर दाखल झाल्या होत्या. आता या लोकांचं साइट सीइंग बोंबलणार, असं वाटलं. पण दोन तासांनी पुन्हा स्वच्छ ऊन पडलं. आम्हाला साडेअकराला चेक-आउट करायचं होतं. मग सगळं आवरून निघायची तयारी केली. पुन्हा एकदा 'लिटल इंडिया'त जेवायला गेलो. या रेस्टॉरंटमध्ये कॉम्बो थाळी होती. मग मी साउथ इंडियन थाळी घेतली. जरा चवीत बदल! छान वाटलं. नंतर पुन्हा थोडा वेळ होता, म्हणून 'लास्ट मिनिट शॉपिंग'ला सगळे बाहेर पडले. मला आमच्या सासरेबुवांनी फर्माइश केल्यानुसार एक रेडिओ आणायचा होता. मग 'मुस्तफा'त एक मनाजोगता जपानी रेडिओ मिळाला. अखेर अडीच वाजता सगळं आटपून आमची बस विमानतळाच्या दिशेला लागली. साडेतीनला आम्ही आमच्या 'टर्मिनल ३'ला आलो. इथं बोर्डिंग पास, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार झटपट पार पडले. साडेचारच वाजले होते. मग साईनाथनं मित्रांसाठी फर्माईशींवरून 'ड्यूटी फ्री'तच करायची खास खरेदी करून मैत्रीची 'ड्यूटी' बजावली. मी त्याच्याबरोबर सहज तिथं चक्कर मारत होतो. एका वाइनच्या (की अन्य कुठलं मद्य होतं, देव जाणे) बॉटलवर चार हजार डॉलर किंमत पाहिली आणि डोळे विस्फारले! बाकी लोक तिथं मनसोक्त खरेदी करीत होते. तिथल्या पोरी इकडून तिकडं पळत होत्या. वेगवेगळ्या ऑफर सांगत होत्या. हौसेला मोल नसतं, एवढं तिथं नक्की पटलं.
थोड्याच वेळात आमचं गेट नं. ७ आहे, हे कळलं. मग तिकडं जाऊन बसलो. तिथं लेग मसाजच्या खुर्च्या होत्या. आमच्या पोरांनी तेवढ्यात त्यांचा वापर करून तो वेळ सत्कारणी लावला. थोड्याच वेळात आमच्या विमानाच्या हवाई सुंदऱ्या येऊ लागल्या. पावणेसातला आम्ही चेक-इन करून आमच्या 'सुपरजंबो'च्या पोटात जायला सज्ज झालो. संध्याकाळची वेळ होती. अजून पुरतं मावळलं नव्हतं. स्वच्छ वातावरण होतं. सुरेख संधीप्रकाश पडला होता. 'संधीप्रकाशात अजून जो सोने' या बोरकरांच्या ओळी आठवल्या. गेले पाच दिवस आम्ही परिराज्यात, एका स्वप्नील राज्यात प्रवास करीत होतो. आता आमचा हा विशालकाय 'ए ३८०' नावाचा गरुड आम्हाला पोटात घेऊन पुन्हा आमच्या घरट्याकडं न्यायला सज्ज झाला होता. बरोबर सात वाजता विमानानं पश्चिम दिशेला उंच आकाशात झेप घेतली. क्षणार्धात सिंगापूरची खाडी ओलांडून विमान मलेशियाच्या भूमीवर आलंही! मी पुन्हा समोरच्या स्क्रीनवर सिनेमे पाहण्याची खटपट सुरू केली. सिनेमे अर्थात तेच होते. पण काही पाहावंसं वाटेना. मन एकदम शांत शांत होऊन गेलं होतं. त्यात या वेळी मेन्यूकार्डातल्या पेयांचा नीट उपभोग घ्यायचा हे ठरवलंच होतं. मग साईनाथनं वाइन घेतली आणि मी बिअर... ही सिंगापूरची लोकल 'टायगर बिअर' होती. तो एक टिन वाघोबा पोटात जाताच, मुळातच ३८ हजार फुटावर असलेलं आमचं विमान अजूनच मस्त विहरतंय असं वाटायला लागलं. गुंगी आली. पण या वेळी आमच्या सीट्स अगदी मागच्या बाजूला आणि त्यात मागं वॉशरूम आल्यानं तिथल्या त्या एअर प्रेशरच्या आवाजानं दर वेळी दचकायला व्हायचं. तशीही मला झोप लागत नाहीच. मग जेवण आलं. या वेळचं जेवण वेळेत होतं. पण त्या लोकांकडं व्हेज डिश कमी पडल्यानं गोंधळ झाला. आमच्या मागचा एक सरदारजी चांगलाच भडकला. मग ज्येष्ठ हवाई सुंदरी आणि सुंदर दोघेही येऊन तीनतीनदा त्याची माफी मागून गेले. आम्ही मात्र त्या बाईनं जे दिलं, जेव्हा दिलं, तेवढंच आणि त्या वेळेला मुकाट गिळलं. आधीच्या पेयाचा परिणाम म्हणा, की आपले संस्कार म्हणा!
मुंबईत नेहमीप्रमाणं कंजेशन होतं. मी आतापर्यंत अनेकदा विमानानं मुंबईत उतरलोय. पण विमान आलं आणि थेट तिथं उतरलं असं एकदाही झालेलं नाही. त्यात पुणे, रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आमच्या विमानानं एक गिरकी घेऊन पुन्हा परतीचा प्रवास धरला. पंधरा मिनिटं टाइमपास झाल्यावर ते पुन्हा मुंबईकडं निघालं. विमान ३८ हजार फुटांवरून डिसेंडिंग करत १३ हजार फुटांवर आलं होतं. पण लँडिंगला परवानगी मिळत नव्हती. बाहेर प्रचंड ढगाळ हवामान होतं. विजा कडकडत होत्या. दोनदा विमानाला प्रचंड जर्क बसून ते अत्यंत वेगानं हजार-एक फूट तरी खाली आलं असेल. तेव्हा सगळे देव आठवले! असं एकदा सोडून दोनदा झालं. नाही म्हटलं, तरी जरा टरकायला झालंच. त्यात हा पायलट फार काही बोलत नव्हता. कुठली घोषणाही करत नव्हता. पण लवकरच लँडिंगचा सिग्नल मिळाला आणि खिडकीतून जमिनीवरचे दिवे दिसू लागले, तसं हुश्श वाटलं. थोड्याच वेळात विमान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या एकुलत्या एका रन-वेवर उतरलं.
सगळे सोपस्कार करून विमानातून खाली उतरलो. आपल्या मातृभूमीला पुनश्च पाय लागले आणि मन भरून आलं! प्रवास सुखरूप झाल्याबद्दल पायलटपासून ते सर्व देवांपर्यंत सर्वांचे मनोमन आभार मानले. बाहेर आलो. आपल्याकडं दहाच वाजले होते. पण आमच्या शरीरासाठी रात्रीचे साडेबारा वाजले होते. डोळ्यांत पेंग होती. पट्ट्यावरून बॅगा काढायला प्रचंड गर्दी होती. अखेर सामान घेतलं आणि इमिग्रेशनचे सोपस्कार पार पडून त्या 'ग्रीन चॅनेल'तून बाहेर आलो. साईनाथनं ओला कॅब बुक केली. ती येऊन निघेपर्यंत साडेअकरा वाजले. खालापूरच्या फूड प्लाझामध्ये चहा घेतला आणि एकदम बरं वाटलं. घाटात नेहमीप्रमाणे ट्रॅफिक जाम होता. अखेर पहाटे चार वाजता घरी येऊन पोचलो... प्रचंड दमायला झालं असलं, तरी घरट्यात परतल्यावर पाखरांना काय वाटत असेल, यांचा अंदाज आला...
परिराज्याची सफर संपली असली, तरी तिथल्या आठवणी कायमच्या मनावर कोरल्या गेल्या होत्या. कुटुंबासह झालेली पहिली परदेशवारी सुफळ संपूर्ण झाली होती... पक्षी आपल्या घरट्यात शांत निजले होते... डोळ्यांत दूरदेशची रंगीत स्वप्ने लेवून...!!

(समाप्त)



                                        ---------------------------------------------------------

14 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग ४

परिराज्यात...
---------------



बुधवार, ६ जून २०१८

सहलीच्या आजच्या दिवशी फक्त युनिव्हर्सल स्टुडिओजची भेट हा एकच कार्यक्रम होता. याचं कारण तिथं करायला एवढ्या गोष्टी होत्या, की एक दिवसही कमी पडावा. तिथं काय असणार याची साधारण कल्पना होती. उत्तमोत्तम राइड्स, मनोरंजनाचे कार्यक्रम, म्युझिक शो, लाइव्ह शो, प्रदर्शनं, फोर-डी शो, साहसी खेळ असं सारी काही तिथं होतं. कुमारवयीन मुलांसाठी अगदीच उत्तम! एका अर्थानं नील व अर्णव या दोघांनाही इथं खरी मजा येणार होती. सकाळी नेहमीप्रमाणं कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट उरकून आम्ही बरोबर पावणेनऊ वाजता लॉबीत तयार राहिलो. आमच्यासोबत असलेल्या १८ जणांच्या कुटुंबाला कायम उशीर व्हायचा. त्यावरून रोज बसमध्ये विनोद झडायचे. सरिना बस सोडण्याची रोज धमकी द्यायची. अर्थात तिनं तसं एकदाही केलं नाही तो भाग वेगळा. पण बाकी सगळे लोक वेळेत येऊन बसायचे आणि या लोकांमुळं उशीर व्हायचा याची नंतर कटकट व्हायला लागलीच. पण फार काही अनवस्था प्रसंग न ओढवता ट्रिप पुढेही नीट पार पडली. तर ते असो.
आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो, त्या सेंटोसा आयलंडवरच हा युनिव्हर्सल स्टुडिओ उभा होता. पण या वेळी आम्ही केबल कार न घेता, बसनं तिथं गेलो. या वेळी सेंटोसा बेटाचं मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळालं. तिथं पर्यटकांच्या बसगाड्या उभ्या करण्यासाठी अवाढव्य अंडरग्राउंड पार्किंग केलेलं आहे. आतमध्ये व्यवस्थित मार्किंग, दिशादर्शक फलक, चालत जाणाऱ्या पर्यटकांना रस्ते दाखवण्यासाठी मार्गदर्शक, वर येण्यासाठी सरकते जिने अशी अतिशय उत्तम, यूजरफ्रेंडली म्हणतात तशी, व्यवस्था होती. आम्ही वर आलो आणि त्या स्टुडिओजच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन थांबलो. इथं युनिव्हर्सल स्टुडिओजचा तो भव्य गोल फिरत होता. त्याभोवती फोटो काढून घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती. सरिना तिकिटं काढून येईपर्यंत आम्हीही फोटोसेशन करून घेतलं. आल्यावर तिनं सांगितलं, की इथून तुम्ही सगळे आत जा आणि आपापल्या सोयीनं सगळ्या राइड्स व शो पाहा. आता थेट संध्याकाळी पावणेसात वाजता याच जागी पुन्हा सगळे भेटू. दुपारच्या जेवणासाठीची कुपन्स तिनं आमच्या हवाली केली आणि आम्ही आत शिरलो.
मी हैदराबादचा रामोजी फिल्म सिटी स्टुडिओ पूर्वी दोनदा पाहिला असल्यानं मला युनिव्हर्सल स्टुडिओत काय असेल, याची साधारण कल्पना होती. कारण 'रामोजी'ची थीमच मुळात स्टुडिओच्या या मनोरंजननगरीवर बेतलेली आहे. आत प्रवेश करताच आपण परिराज्यात आलो असल्याचाच भास झाला. हॉलिवूडच्या धर्तीवर इथली सगळी रचना होती. तशाच इमारती, फूटपाथ, रस्त्यावरच्या गाड्या, दिव्याचे खांब, कमानी, खिडक्या... सगळं सगळं अगदी कॉपी टु कॉपी. ही एक वेगळीच दुनिया होती. आमचा टूर गाइड कुणाल आम्हाला आधी 'ट्रान्स्फॉर्मर्स'च्या फोर डी शोकडं घेऊन गेला. मात्र, हा शो काही कारणानं लगेच सुरू होणार नव्हता, असं कळलं. मग आम्ही त्या कपबशीच्या आकारातल्या गाड्यांत बसून ढकलाढकलीची राइड असते ती घेतली. ही अगदीच छोट्या मुलांची राइड होती. पण तरी मज्जा आली. समोरच तो मोठ्ठा रोलर कोस्टर होता. आणि त्यावर किंचाळणाऱ्या लोकांच्या दोन राइड्स सुरूच होत्या. आमच्यापैकी एकालाही त्या राइडमध्ये बसण्याची हौस नव्हती. मग आम्ही परत 'ट्रान्स्फॉर्मर्स'कडं आलो. या वेळी प्रवेश सुरू झाला होता. आत आत जात बरेच आत गेलो. तिथं भली मोठी लाइन होती. त्या 'क्यू'मध्ये अंधार होता आणि बारीक निळसर प्रकाश पसरला होता. जपानी स्त्रियांचं सौंदर्य त्या प्रकाशात आणखी खुलून त्या 'निळावंती' झाल्या होत्या. 'गे निळावंती कशाला, झाकीसी काया तुझी' असं म्हणण्याचा प्रश्नच नव्हता; कारण ती फारशी झाकलेली नव्हतीच. त्यांची ती मुलायम कांती आणि तो निळसर प्रकाश यामुळं आपण एखाद्या कसबी शिल्पकारानं घडवलेलं शिल्प पाहत आहोत की काय, असा भास त्यांच्याकडं पाहून होत होता. एका कॉलेजवयीन जपानी सुंदरीकडं माझी नजर अशीच खिळून राहिली होती. तेवढ्यात ती रांग सोडून अचानक पुढं पुढं आमच्याकडं यायला लागली. त्या गौरांगनेला आपल्या मनातलं वाचता येतं की काय, असं वाटेपर्यंत ती 'नमास्ते, नमास्ते' असं म्हणत, तीनतीनदा वाकून तिला पुढं जाऊ देण्याची विनंती करीत होती, हे लक्षात आलं. तिची आठ-दहा वर्षांची मुलगी रांग सोडून अचानक पुढं गेली होती (बहुदा बारच्या खालून वाकून), त्यामुळं तिला तिच्याजवळ जायचं होतं. पुन्हा एकदा या जपानी गौरांगनेनं गोड अपेक्षाभंग केला होता. ती संतूर मॉम होती! असो.
रांग संथगतीनं पुढं सरकत होती. वर भिंतींवर टीव्ही स्क्रीन लावले होते आणि त्यावर 'ट्रान्स्फॉर्मर्स'मधल्या पात्रांचे ते खर्जातल्या आवाजातले घुमारदार संवाद गुंजत होते. एकूण वातावरणात फारच भारलेपण आलं होतं. आता आपल्याला काही तरी अद्भुत बघायला मिळणार, याची लहान मुलांसारखी उत्सुकता मोठ्यांच्याही डोळ्यांत दिसत होती. चिनी-जपान्यांच्या तर ती डोळ्यांतही मावत नव्हती व त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरत होती. अनेक म्हाताऱ्याही उत्सुकतेनं ही राइड घ्यायला रांगेत थांबल्या होत्या. त्यात एक स्वेटर घातलेल्या आपल्या भारतीय काकूही होत्या. (सौथिंडियन असाव्यात.) अखेर तो क्षण आला. आम्ही त्या कारमध्ये बसलो. शेजारून एक कव्हर आलं आणि ती कार अर्धी झाकली गेली. मग थोडा वेळ वेटिंगला थांबली. आमच्या पुढची कार पुढं सरकली तशी आमची कारही त्या गुहेत शिरली. समोर मोठ्ठा स्क्रीन होता... तिथं एकदम 'ट्रान्स्फॉर्मर्स'चे सीन दिसायला लागले. आणि आम्ही एकदम त्या सीनमध्येच शिरलो. पुढची पाच मिनिटं म्हणजे एक अफाट अनुभव होता. आम्ही त्या हॉलिवूडच्या सिनेमात घुसलो होतो. जोरात पळत होतो, खाली जात होतो, एकदम अवकाशात फेकले जात होतो, मोठमोठ्या यंत्रांमध्ये घुसत होतो, इमारतींवर आदळत होतो, रस्त्यांवर आपटत होतो, त्यातले हिरो आम्हाला वाचवत होते आणि आम्ही त्यातल्या व्हिलनच्या मागे लागलो होतो. काय चाललं होतं, काहीच कळत नव्हतं एवढ्या तुफान वेगानं सगळ्या हालचाली होत होत्या. एरवीच्या फोर-डी शोमध्ये आपण जागेवरच असतो. आपली सीट फार तर थोडी फार हलत असते. इथं ही कार या दालनातून त्या दालनात वेगानं फिरत होती. वर-खाली होत होती. त्यामुळं तो व्हर्चुअल अनुभवही अस्सल वाटू लागला होता. अखेर प्रचंड आदळआपट करून ती राइड थांबली, तेव्हा आम्ही हुश्श केलं. पण खरं तर अजिबात भीती वाटली नाही. उलट आम्ही फारच एंजॉय केलं. (दिवस संपला, तेव्हाही आम्हाला सर्वाधिक आवडलेली राइड हीच होती, यावर एकमत झालं.) त्यात थ्रीडी गॉगलमुळं धमाल आली.... एकूणच चाळीस मिनिटं रांगेत थांबल्याचं सार्थक झालं. आम्ही हसत-खिदळतच बाहेर आलो. बाहेरही ट्रान्स्फॉर्मर्सचे सांगाडे समोर उभे करून ठेवले होते. तिथं फोटोसेशन पार पडलं.
यानंतर 'लाइट, कॅमेरा, ॲक्शन' असा एक लाइव्ह शो होता. स्टीव्हन स्पिलबर्गनं तो सादर केला होता. (अर्थात त्याचा व्हिडिओ दाखवत होते.) त्यानंतर प्रत्यक्षात न्यूयॉर्कमध्ये चक्रीवादळ आल्याचं दृश्य तो कसा शूट करील, हे दाखवणारं प्रात्यक्षिक पुढच्या दालनात होतं. एका लाकडी फलाटावर आम्ही उभे होतो. समोर साधारण शंभर बाय सत्तर फूटच्या हॉलमध्ये सगळं नाट्य सुरू होतं. समोरच्या पडद्यावर न्यूयॉर्कची स्कायलाइन दिसत होती. समोर प्रत्यक्षात पाणी होतं. सगळ्यात शेवटी एक प्रचंड मोठी बोट येऊन प्रेक्षकांच्या कठड्याला धडकते, तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले. एकूण हाही शो मस्तच वाटला. नंतर एक 'एल्मो टीव्ही शो' नावाचा म्युझिक शो पाहिला. यात ती कार्टून्स प्रत्यक्षात रंगमंचावर येऊन नाटुकलं सादर करीत होती. सुंदर रंगसंगतीमुळं पाहायला छान वाटत होतं. पण ती पात्रं ओळखीची नसल्यानं थोड्याच वेळात कंटाळा आला. अनेक लोक उठून जायला लागले. मग आम्हीही तेच केलं. मुलांना भुका लागल्या होत्या. मग एका हॉटेलमध्ये नेऊन पोरांना पिझ्झा खायला घातला.
त्यानंतर एक 'मादागास्कर' नावाची राइड केली. ही छान होती. एका प्रचंड मोठ्या जहाजाच्या पोटातून पाण्याचा कालवा काढला होता. सुरुवातीला आपण एका होडीत बसतो आणि त्या जहाजाच्या पोटात पाण्यातूनच शिरतो. आतमध्ये आजूबाजूला सगळी मादागास्करची स्टोरी उलगडत जाते. खऱ्या अर्थानं परिराज्यात आल्याचा अनुभव इथं मिळाला. त्या बोटीतून जाताना समोर एक पाण्याचा धबधबा जोरात पडत होता. आता आपण त्याच्याखालून जाताना सगळे भिजणार, म्हणून आम्ही सावरून बसलो. बॅगा वगैरे खाली टाकल्या. प्रत्यक्षात बोट तिथून जाताना ते पाणी बाजूला सरकतं आणि बोट अलगद मधून जाते. नंतर मग आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. या राइडनंतर एक इजिप्शियन ममीची राइड होती, तिथं गेलो. पण तिथं पुन्हा रोलर कोस्टर आहे असं कळल्यावर तो बेत कॅन्सल केला. तिथं मोठमोठे इजिप्शियन पुतळे होते. तिथं फोटोसेशन झालंच. समोरच ऑॲसिस नावाचं हॉटेल होतं. त्या संपूर्ण युनिव्हर्सल स्टुडिओत याच हॉटेलमध्ये भारतीय जेवण मिळत होतं. आम्ही आमची कुपन्स वापरून तिथं जेवलो. जेवण ठीकठाकच होतं. मात्र, उन्हाची वेळ असल्यानं व आम्ही बऱ्यापैकी दमल्यानं ते जेवणही रुचकर लागलं. इकडं पिकत काही नसल्यामुळं सगळा भाजीपाला मलेशियातून व बाकी धान्यं वगैरे भारतातूनच येतात. त्यामुळं फ्रोझन फूडचं प्रमाण जास्त. जिथं जाऊ तिथं छोले किंवा चना मसाला हीच भाजी असायची. पण एकदा भूक लागल्यावर काय! जेवणं झाल्यावर पुन्हा उत्साह आला फिरायला... मग जुरासिक पार्क आणि 'फार फार अवे' या विभागांत जाऊन तिथल्या राइड घेतल्या. त्यातली श्रेकची राइड मस्त होती. नंतर 'जुरासिक वर्ल्ड' हा लाइव्ह शो बघायला गेलो. तो ठीकठाकच होता. आपल्याकडं गणपतीसमोर देखावे करतात, त्यातला प्रकार वाटत होता. यानंतर आम्हाला कुणालनं 'वॉटरवर्ल्ड' हा स्टंट शो पाहायला सांगितला होता, म्हणून आवर्जून तिकडं गेलो. हा शो मात्र खरोखर भारी होता. यात समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर पाणी उडवण्यात येतं. तिथं ब्लू, ग्रीन व रेड असे झोन केले होते. ज्यांना अंगावर पाणी उडालं तरी चालणार आहे अशा प्रेक्षकांनी सर्वांत समोर ब्लू झोनमध्ये बसायचं. ज्यांना थोडं पाणी उडालं तरी चालणार आहे अशांनी मागं ग्रीन झोनमध्ये, तर ज्यांना अजिबात पाणी उडवून घ्यायचं नाही त्यांनी सर्वांत मागं रेड झोनमध्ये बसायचं, अशी व्यवस्था होती. आम्ही ब्लू झोनच्या अगदी मागं व ग्रीन झोनच्या पहिल्या रांगेत बसलो. सुरुवातीला दोन तरुण आले. सर्कशीतल्या विदूषकांसारख्या गमती करायला त्यांनी सुरुवात केली. मधूनच ते एक बादलीभर पाणी समोरच्या लोकांवर भिरकवायचे. एक जण प्रेक्षकांत येऊन एक लांबलचक पिचकारीसारखी गन घेऊन त्यातनं पाणी उडवायचा. सगळे लोक येऊन बसेपर्यंत हा मजेचा प्रकार चालला. त्यानंतर खरा स्टंट शो सुरू झाला. त्यात पाच-सहा तरुण आणि एक (अर्थातच सुंदर) तरुणी होती. एक हिरो होता, ही हिरॉइन, एक व्हिलन... असा सगळा मसालापटाला शोभेलसा सीन होता. समोर पाण्यात ती स्कूटर चालवत तो हिरो पाण्याचे फवारे प्रेक्षकांवर उडवायचा. समोरच्या मोठ्ठ्या दारातून एक बोट यायची. उंच शिड्या, डेक असा सगळा जामानिमा होता. एकूण पंधरा मिनिटं त्या लोकांनी भरपूर धावाधाव करून लोकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर आम्ही जुरासिक पार्कमधली ॲडव्हेंचर वॉटर राइड घेतली, ती तर फार धमाल होती. एका गोल गोल फिरणाऱ्या चकतीमध्ये बसून जोरदार पाण्याच्या प्रवाहासोबत आपण आदळत, हिंदकाळत जातो. मध्ये ते डायनॉसोर दिसतात, बोगदा लागतो, मग अचानक एकदम ही चकती वर काय जाते, तिथून जोरात खाली फेकली जाते... सगळंच धमाल. या राइडमध्ये आम्ही पुरेपूर भिजलो... पण फारच मजा आली.
अशा अनेक गमतीशीर राइड घेत, काही राइड दोनदोनदा अनुभवत आम्ही या युनिव्हर्सल स्टुडिओची पुरेपूर मजा लुटली. संध्याकाळ झाली, तसं ऊन कमी झालं आणि तिथं वारं वाहू लागल्यावर आणखीनच गार वाटायला लागलं. रामोजीसिटीपेक्षा इथला एरिया कमी असला, तरी मनोरंजनाची साधनं आणि प्रकार सरस होते. अखेर मुख्य रस्त्यावर येऊन भरपूर फोटोशूट केलं आणि पाय रेंगाळत असतानाही बाहेर पडलो. सरिना आमची वाटच पाहत होती. तिनं आम्हाला वास्तव जगात आणलं. बसमधून आम्ही डिनरसाठी 'लिटल इंडिया'कडं निघालो, तरी मन मात्र त्या परिराज्यातच रेंगाळलं होतं...

(क्रमशः) 

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

13 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग ३

आज मैं उपर...
-----------------



मंगळवार, ५ जून, २०१८.
सहलीचा दुसरा दिवस सर्वाधिक पॅक होता. बरंच काही बघायचं होतं. आज आमच्या हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट होता. परदेशांत जसा ब्रेकफास्ट असतो, तसाच तो होता. पोहे, उपमा, थालिपीठ किंवा फोडणीचा भात वा पोळी खायला सोकावलेल्या आमच्या देहांना हा परदेशी कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट जमत नाही. पण न जमवून काय करता? तेव्हा मुकाट जे आहे ते खाल्लं. त्यातही ते कॉर्नफ्लेक्स, मोसंबी किंवा सफरचंदाचा रस आणि कलिंगडाच्या फोडी एवढ्यावर माझं काम भागतं. (बायकोनं आयता भाजून दिलेला ब्रेड व बटर असेल, तर फारच उत्तम!) तेव्हा ते कार्य झटपट उरकून, सरिनाच्या मार्गदर्शनाखाली बसमध्ये जाऊन पुढील सहलीसाठी सज्ज जाहलो. आमचा भारतातला मुख्य टूर लीडर कुणाल हाही आदल्या दिवशी ती ११ जणांची फॅमिली घेऊन आम्हाला जॉइन झाला होता. आता आम्ही एकूण ४५ जण झालो होतो. सर्वांत प्रथम सिटी पॅनॉरमिक टूर. यात सिंगापूरमधल्या महत्त्वाच्या वास्तू सरिनानं गाडीतूनच दाखवल्या. आणि त्या गाडीतूनच बघण्यासारख्या होत्या! त्यात त्या पंजाच्या आकाराच्या पाच इमारती, सिंगापूरचा सिटी कौन्सिल हॉल आणि युद्धातील सैनिकांचं स्मारक (त्याचा आकार दोन चॉपस्टिक शेजारी ठेवल्यासारखा आहे) एवढं लक्षात राहिलं. उडत्या तबकडीच्या आकाराची एक इमारत होती. ते त्यांचं नवं सुप्रीम कोर्ट होतं, की आणखी काय होतं, देव जाणे. सिंगापूरमधली ती प्रसिद्ध तीन हॉटेलांची इमारत व त्यावर ती होडीच्या आकाराची आडवी आणखी एक इमारत दृष्टिपथात आली. सिंगापूर बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही प्रवेश केला होता.
सिंगापूरचं प्रतीक मानला गेलेला तो मर्लायन (धड माशाचं व शिर सिंहाचं) इथंच होता. आम्हाला इथं सोडण्यात आलं. या मर्लायनच्या पार्श्वभूमीवर तुम्ही फोटो काढून घेतलेच पाहिजेत. नाही तर तुम्ही सिंगापुरात आला होता की नाही, यावर जगभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यामुळं आम्ही ते आद्यकर्तव्य पार पाडलं. जगभरातल्या पर्यटकांचा मेळा तिथं भरला होता. त्यात चिनी-जपानी सर्वाधिक, त्याखालोखाल मलेशिया किंवा व्हिएतनाम आदी इतर आग्नेय आशियातले देशांतले पर्यटक, मग भारतीय आणि मग युरोप-अमेरिका असं साधारण प्रमाण दिसलं. जगभरातलं आंतरखंडीय सौंदर्य तिथं त्या उन्हात तळपत होतं. हॉट पँट्स आणि मिनी स्कर्टसची चलती दिसत होती. मी माझ्या भावाला म्हटलंही, की आपण सहाही खंडांतल्या बायकांचे सुंदर पाय आज पाहिले! त्यातही जपानी किंवा चिनी स्त्रियांचे पाय पाहावेत. 'गुळगुळीत' या शब्दाने त्याचं वर्णन करणं फारच गुळगुळीत होईल. अर्थात आम्ही रोज एफ. सी. रोडनं फिरत असल्यानं नजरेला अजिबात सवय नव्हती, असं नाही. पण प्रत्येक खंडातलं सौंदर्य वेगळंच... युरोपीय बायकांचा पांढरेपणा नकोसा वाटतो. त्यात त्यांच्या अंगावरचे ते बारीक काळपट वांगासारखे डाग फारच खुपतात. शिवाय आंघोळीचं आणि त्यांचं हाडवैर असावं. त्या तुलनेनं जपानी किंवा चिनी स्त्रियांचा मऊसूतपणा कमालीचा मोहक वाटतो. देवानं त्यांच्या डोळ्यांत आणि नाकात थोडी दुरुस्ती केली, तर किती छान होईल! असो.
हा मर्लायन म्हणजे 'ममा मर्लायन' होती म्हणे. शेजारीच एक बेबी मर्लायन होता. डॅडा मर्लायन नंतर भेटणार, असं सरिनानं सांगितलं. एवढं महत्त्व मिळालेली ममा फारच फॉर्मात होती, यात आश्चर्य नाही. आमचा पुढचा टप्पा 'गार्डन बाय द बे' हा होता. तिथला फ्लॉवर डोम आम्ही पाहणार होतो. लवकरच तिथं पोचलो. अत्यंत सुरेख अशा त्या महाप्रचंड बागेत आम्ही शिरलो.
खरोखर अगदी अप्रतिम अशी फुलं, झाडं तिथं होती. खाली जमिनीतून पाणी खेळवलं होतं. वरती डोम होता. त्यामुळं एसीसारखं गार वातावरण होतं. फोटो काढायला अगदी उत्तम स्पॉट... भरपूर फोटो काढले. मला फुला-पानांतलं फार काही कळत नाही. पण पाहायला आवडतात. त्याहीपेक्षा ही सुंदर फुलं पाहून हरखून जाणारी, वेडी होणारी जपानी माणसं पाहायला मला मज्जा येत होती. अक्षरशः लोकरीच्या गुंड्यासारखी त्यांची ती गुबगुबीत मुलं, त्यांना त्या छोट्या ट्रॉलीमध्ये घालून फिरवणाऱ्या त्यांच्या आया... बरं, या बायकांच्या चेहऱ्यावरून त्यांची वयं अजिबात कळत नाहीत. कॉलेजवयीन मुलगी म्हणावे, तर दुसरी एखादी कॉलेजवयीन मुलगी येऊन तिला ममा म्हणून हाक मारायची... एकजात संतूर गर्ल सगळ्या! पुलंनी खूप पूर्वी अमेरिकन म्हाताऱ्या कशा जगप्रवासाला निघतात, याचं वर्णन केलं होतं. इथंही आम्हाला त्या दिसल्याच. फरक एवढाच होता, की आता त्या सहकुटुंब होत्या. त्यांचे म्हातारेही त्यांच्यासोबत होते. 'फ्लॉवर डोम'मध्ये सगळ्यांत जास्त काय फुलले होते, तर ते माणसांचे चेहरे! आणि आपल्या कुटुंबासोबत, प्रियजनांसोबत हसऱ्या चेहऱ्यानं आनंद लुटणारी माणसं पाहणं यासारखा स्ट्रेसबस्टर नाही. आमच्याही चेहऱ्यावर ती खुशी आपोआप उतरली होती. पौषातल्या पहाटे पानांवर हलकेच दव येऊन उतरावं तशी!
फ्लॉवर डोमनंतर बाहेर सगळ्या ग्रुपचं फोटोसेशन झालं. आता आम्ही सिंगापूर फ्लायरजवळ जेवायला जाणार होतो. सिंगापूर फ्लायर म्हणजे 'लंडन आय'च्या धर्तीवर बांधलेलं मोठं जायंट व्हील! यातल्या एका खोलीएवढ्या मोठ्या आकाराच्या केबिनमध्ये बसून त्या जायंट व्हीलमध्ये फिरण्याचा आनंद लुटता येतो. आमच्या टूर प्रोग्राममध्ये या फ्लायरचा समावेश नव्हता. पण बसमधल्या सर्व उत्साही मंडळींनी स्वखर्चानं फ्लायरची राइड घ्यायची ठरवलं. आम्हाला काय करावं ते कळेना. तिकीट ३३ डॉलर मोठ्यांना व २२ डॉलर लहान मुलांना, म्हणजे तसं बऱ्यापैकी होतं. शेवटी फक्त मुलांना पाठवावं, असा विचार केला. पण आमची पोरं एकटी जाईनात. शेवटी 'होऊ दे खर्च' म्हणत सगळ्यांनीच जायचं ठरवलं. आणि अर्ध्या तासानं या निर्णयाचं सार्थक झालं, असंच वाटलं. सिंगापूर फ्लायर म्हणजे 'आज मैं उपर... आसमाँ नीचे' असा शब्दशः अनुभव देणारी स्वप्नवत राइड! वास्तविक मी लहानपणी पाळण्यांमध्ये पुष्कळ बसलो आहे. पण १६५ मीटर, म्हणजे जवळपास ५० मजली इमारतीएवढ्या उंच जाणाऱ्या पाळण्यात बसायची माझी ही पहिलीच वेळ होती. पण ती केबिन आणि तिथली एकूण सुरक्षितता पाहून जी काही थोडी फार अँग्झायटी होती, तीही गेली. मला एकूणच उंचीची भीती वाटत नाही. (पण पाण्याची वाटते!)
पुढचा अर्धा तास आम्ही सहा जण त्या एका केबिनमध्ये अक्षरशः धमाल केली. हे फ्लायर अगदी हळूहळू फिरतं. लांबून पाहिलं, तर ते बंदच आहे, असं वाटतं. पण त्याच्या या मंदगती फिरण्यामुळं अजिबात भीती वाटत नाही, हे खरं. शिवाय राइड अर्धा तास म्हणजे बऱ्यापैकी चालते. सिंगापूर बिझनेस डिस्ट्रिक्ट, सिंगापूर पोर्ट, सिंगापूर रिव्हर आणि त्यामागची खाडी असा बराच मोठा नजारा इथून दिसतो. शहराची स्वच्छता, फ्लायओव्हर्सचं जाळं, नीटनीटक्या पार्क केलेल्या बसगाड्या, कार, रस्त्यानं चालणारी व वरून अगदी चिमुकली दिसणारी माणसं हे सगळं पाहून परमसंतोष जाहला.
या राइडनंतर त्याच कॉम्प्लेसमध्ये असलेल्या 'भंडारी इन' नावाच्या हॉटेलमध्ये आमचं जेवण झालं. जेवणानंतर आम्हाला केबल कारनं सेंटोसा आयलंडमध्ये जायचं होतं. (हो, हे तेच सेंटोसा, जिथल्या हॉटेलमध्ये काल किम जोंग व ट्रम्प भेटले!) बस लवकरच एका छोट्याशा घाटरस्त्यानं एका डोंगराच्या माथ्यावर गेली. या डोंगरापासून पलीकडं आयलंडपर्यंत केबल कार होती. मध्ये नदी व खाडीचं मुख होतं. नुकतंच फ्लायरमध्ये बसून आल्यामुळं केबल कारमध्ये बसून जाताना फार विशेष काही वाटलं नाही. पण नदीवरून जाताना खालचे क्रूझ, धक्का, लांबून जाणारी मोनोरेल, युनिव्हर्सल स्टुडिओ (इथं आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो), समुद्र-मत्स्यालय, फ्लायओव्हर हे सगळं छान दिसत होतं. पंधरा मिनिटांत आम्ही सेंटोसा स्टेशनवर पोचलो. इथं आम्हाला मादाम तुस्साँ म्युझियम व 'इमेजेस ऑफ सिंगापूर' हे सिंगापूरचा इतिहास सांगणारं प्रदर्शन पाहायचं होतं. मला आणि साईनाथला इतिहासात रस असल्यानं आम्ही तिकडची रांग धरली. मात्र, तिथं बराच वेळ जाऊ लागला. आम्हाला एक-दीड तासात दोन्ही संपवून बाहेर यायचं होतं. मग शेवटी ती रांग व तो कार्यक्रम सोडून आम्ही मादाम तुस्साँ प्रदर्शनाकडं वळलो. इथं आधी एक बोटीची छोटी राइड असते. मादाम तुस्साँ प्रदर्शनात प्रत्येक ठिकाणी असं काही तरी एक असतंच, असं साईनाथनं सांगितलं. ती उगाचच झालेली दीड मिनिटांची बोट राइड संपवून आम्ही मुख्य प्रदर्शनाकडं वळलो. या मादाम तुस्साँ बाईंच्या मेणाच्या प्रदर्शनाविषयी मी प्रथम वाचलं ते 'अपूर्वाई'त... त्यानंतर सिंगापूरमध्ये हे प्रदर्शन पाहण्याचा योग आला. पुतळे करण्याचं या लोकांचं कसब वादातीतच आहे. प्रत्येक पुतळ्याभोवती फोटो काढून घ्यायला ही गर्दी जमत होती. आम्हीही तेच केलं. पण माझं या पुतळ्यांविषयी एक निरीक्षण आहे. आपल्याला बाकीचे पुतळे आवडतात; पण आपल्या देशातल्या लोकांचे पुतळे फारसे पटत नाहीत. या सिंगापूरच्या प्रदर्शनातही गांधीजी होते, मोदी होते... याखेरीज 'आयफा'चा एक वेगळा विभागच होता. त्यात अमिताभ, रणबीर, काजोल, माधुरी, शाहरुख असे अनेकांचे पुतळे होते. पण यापैकी शाहरुख व थोडाफार रणबीर वगळला, तर इतर पुतळे फारसे आवडले नाहीत. माधुरी तर अजिबात जमली नव्हती. बाकी माझ्या आवडत्या ऑड्री हेपबर्नसोबत माझा एक झक्कास फोटो साईनं काढला आणि सगळे पैसे वसूल झाले...!
हे प्रदर्शन बघून झाल्यावर मग चहा-कॉफी ब्रेक होता. उकाडा असला, तरी कॉफी घेऊन बरं वाटलं. इथंच त्या डॅडा मर्लायनचा भव्य पुतळा होता. पण हा पुतळा पांढराशुभ्र नव्हता, तर खऱ्या सिंहासारखा मातकट, पिवळट रंगाचा होता. इथून मोनोरेलनं एक स्टेशन पुढं जायचं होतं. आमच्या तिकिटातच ही राइड असल्यानं त्यासाठी वेगळं तिकीट काढावं लागलं नाही. पुढच्या स्टेशनवर उतरून आम्ही 'विंग्ज ऑफ टाइम' हा साउंड अँड लाइट अँड वॉटर अँड लेझर शो बघायला गेलो. खूप गर्दी होती. पण पुरेसे बाक होते. त्यामुळं सगळ्यांना नीट बसता आलं. अंधार पडू लागला, तसे त्या बीचवरचे दिवे उजळू लागले. समोर आकाशात केशरिया रंगाची मनसोक्त उधळण झाली होती. विमानं इकडून तिकडं जात होती. दूरवर त्यांचे दिवे लुकलुकत होते. थंडगार वारं वाहू लागलं होतं. समोर लाकडाचे साधारण दहा बाय दहा फूट आकाराचे पाच-सहा चौकोन, पंचकोन एका मोठ्या लाकडी प्लॅटफॉर्मवर तिरप्या आकारात ठेवले होते. त्यावरच हा सगळा खेळ रंगणार होता. अंधार झाला आणि हा सुंदर शो सुरू झाला. समोर एक मुलगा व मुलगी आले. चालता चालता ती मुलगी एका कातळामागे पडते. मग एकदम लेझरनं तो प्लॅटफॉर्म उजळून निघाला. तिथून एक गरुडासारखा पक्षी आला. त्यानं या दोघांना पंखांवर घेतलं. आता त्यांना काळाचा प्रवास करायचा होता. अशा त्या थीमवर मग पुढं एक उत्कृष्ट नाट्य रंगलं. त्यात ध्वनी, प्रकाश आणि शेवटी दारुकामाचा अफाट वापर करण्यात आला होता. पंधरा मिनिटांनी हे झकास नाटक संपलं... आमचा दिवसही संपला...
बसमधून मग डिनरसाठी 'लिटल इंडिया'त गेलो. जेवून हॉटेल... अत्यंत धावपळीत हा दुसरा दिवस संपला... दमणूक झाली होती. त्यामुळं गादीला पाठ टेकताच झोप आली. पण स्वप्नातही फ्लायर आणि केबल कारमधला तरंगता प्रवास आठवून 'आज मैं उपर' असंच वाटत होतं...

(क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
---

12 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग २

'माजुलाह सिंगापुरा'
-----------------------

सोमवार, ४ जून २०१८.

मुंबईवरून आमचं विमान सिंगापूरच्या दिशेनं निघालं तेव्हा रविवार रात्रीचे बारा वाजून गेले होते. सोमवार उजाडला होता. विमानात हवाई सुंदऱ्यांनी दिलेल्या विविध सेवांचा जमेल तसा लाभ घेणं सुरू होतं. सुरुवातीला मेन्यूकार्ड आलं. त्यात अपेयपानाची यादी पाहून मन लुभावलं. पण तो मोह आवरला आणि सफरचंदाचा रस मागवला. विमानातलं जेवण हा एक अजब प्रकार असतो. आमच्या नावापुढं 'व्हेजिटेरियन हिंदू मिल' असं लिहिलं होतं. हे आमच्या प्रवास कंपनीनं परस्परच ठरवलं होतं. अर्थात आम्ही शाकाहारीच होतो, ते सोडा. विमानाची वेळ रात्री ११.४० ची असो, नाही तर पहाटे तीनची... दोन तासांपेक्षा जास्त वेळाचा प्रवास असेल, तर हे लोक जेवणादी सरबराई करतातच. लोक जेवून निघाले असतील वगैरे विचार त्यांना शिवत नाही. अर्थात, आम्ही विमानतळावरचे 'भारी' पदार्थ खाऊन अर्धवट भुकेलेच राहिलो होतो. तेव्हा मध्यरात्री समोर आलेलं ते व्हेज हिंदू जेवण मुकाट गिळलं. आपल्या समोर जो टीव्हीचा स्क्रीन असतो, तो आपला पहिल्या फटक्यात कधीच चालू होत नाही. या वेळी अपवाद ठरला. माझा टीव्ही व्यवस्थित चालत होता, पण धनश्रीचा बंद होता. त्यांच्या त्या इअरफोनची कॉर्ड शिटाच्या नक्की कुठल्या हातात घुसवायची याचं बऱ्याच जणांचं कायम कन्फ्युजन होतं. शेवटी इष्ट कार्ये पार पडली आणि मी सिनेमे शोधायला लागलो. 'शेप ऑफ द वॉटर' सापडला. पण तो लावल्या लावल्या पहिल्याच दृश्यात नायिका संपूर्ण विवस्त्रावस्थेत बाथटबमध्ये शिरली, तसं मी चॅनेल बदललं. मागचे एक शीख आजोबा दोन शिटांच्या मधल्या जागेतून माझ्याच स्क्रीनकडं पाहत होते, हे मला कळत होतं. शेवटी बरंच सर्फिंग केल्यावर 'फास्टर फेणे'ही सापडला. त्यानंतर मात्र मी तो टीव्ही बंद केला आणि फ्लाइट पाथ मोड लावून ठेवला. मला हा फ्लाइट पाथ पाहायला नेहमीच आवडतं. त्यात विपुल माहिती दिलेली असते. आपण किती हजार फुटावर आहोत, बाहेर किती तापमान आहे, अंतर किती राहिलंय, इकडची वेळ, तिकडची वेळ... असं सगळं... ते पाहत कधी झोप लागली ते कळलंही नाही.
सकाळी जाग आली ती डाव्या बाजूनं समोरच्या खिडकीतून उन्हाची तिरीप आल्यावर... आम्ही सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सिंगापुरात पोचणार होतो. अजून एक तास होता. सहा वाजले होते. उजाडलं होतं. रात्री फ्रेश मूडमध्ये आम्ही विमानात बसल्या बसल्या हवाईताईंनी गरम टुवाल दिले होते. त्यामुळं आता सकाळी पारोशी तोंडं पुसायला पुन्हा ते मिळणार नाहीत, याची खात्री होती. तसंच झालं. पण इअरफोनसोबत दिलेल्या किटमध्ये एक अत्यंत बालब्रश आणि बालपेस्ट लाभली. हेही पुण्य कमी नसे नशिबाला म्हणून आम्ही लँडिंगची वाट पाहू लागलो. हळूहळू जमीन दिसू लागली. जरा पल्याड समुद्र होताच. सिंगापूर आणि मलेशिया एकमेकांना जोडूनच... त्यामुळं आमचं विमान मलेशियावरूनच चाललं होतं. हळूहळू डिसेंडिंग सुरू झालं. बरोबर सात वाजून वीस मिनिटांनी आम्ही सिंगापूरच्या त्या भव्य चांगी विमानतळावर लँड झालो. ईगल हॅज लँडेड... नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर उतरल्यावर काढलेले हे उद्गार आम्ही 'चांगी'वर उतरल्यावर काढत होतो. सध्या तरी आमच्यासाठी सिंगापूर हाच चंद्र होता. विमान धावपट्टीवर टेकताक्षणी (ज्याला इंग्रजीत ते 'टच्ड डाउन' असं स्पेसिफिकली म्हणतात...) काही लोकांच्या अंगात एकदम उत्साह संचारतो. ज्यांना फ्लाइटची फ्राइट असते, असे लोक संपूर्ण प्रवासभर भिजल्या उंदरागत आपल्या खुर्चीवर बसून असतात. पण विमान एकदा जमिनीवर टेकलं, की त्यांच्यातल्या उंदराचा 'शेर' होतो आणि ते उठून एकदम ती वरची केबिन उघडायला लागतात. भारतात देशांतर्गत प्रवास करताना मी हे अनेकदा पाहिलं आहे. इथंही निम्मे लोक उठलेच. त्यातले ९९ टक्के आपलेच होते, हे सांगायला नकोच. आमचं हॉटेल चेक इन दुपारी तीन वाजता होतं. त्यामुळं आम्ही निवांत होतो. सावकाश सगळे गेल्यावर आम्ही बाहेर पडलो. चांगी विमानतळाची भव्यता एकदम काही जाणवली नाही. पण प्रकर्षानं जाणवली ती एक गोष्ट. ती म्हणजे कमी माणसं... हा एवढा मोठा एअरपोर्ट मला रिकामा रिकामा वाटत होता. सकाळची वेळ होती. आमच्या विमानातले लोक भराभरा बॅगा आणायला पुढे गेले होते. आम्ही निवांत समोरच्या खुर्च्यांवर बसलो. स्वच्छतागृहाची भेट अटळ होती. तिथं मला एक आपल्या भारतीय शैलीचं शौचकूपही दिसलं. शेवटी सिंगापूर हे आशियातच आहे, असं म्हणून मी सिंगापूरला एकदम आपल्या आतल्या वर्तुळात नेऊन ठेवलं. माणसाचं कसं असतं ना, प्रत्येक ठिकाणी आपण आपला कम्फर्ट शोधायला बघतो. हेच मी श्रीलंकेत गेलो असतो, तर मला तो देश सिंगापूरपेक्षा जवळचा वाटला असता. इथं युरोप किंवा अमेरिकेपेक्षा आता मला सिंगापूर 'आशियाई' म्हणजे आपलं वाटत होतं. आपण आपला परीघ मोठा करीत नेला, तरी त्यातल्या बाहेरच्या वर्तुळापेक्षा एका आतल्या वर्तुळाचा आपला शोध सदैव सुरू असतो. मला त्या स्वच्छतागृहात हेच फीलिंग आलं...
त्या बालब्रशनं तोंड वगैरे धुऊन बाहेर आलो आणि सिंगापूरच्या त्या टर्मिनल ३ वर अरायव्हल्सच्या दिशेनं निघालो, तशी त्या एअरपोर्टची भव्यता कळून आली. शेजारूनच दुसऱ्या टर्मिनलला जाणारी छोटी दोन डब्यांची मेट्रो ट्रेन दिसली आणि आपण परदेशात येऊन पोचल्याची खात्री पटली. इमिग्रेशनचे सोपस्कार पार पाडताना एक आपल्याकडचेच काका जरा गडबडलेले दिसले. मग साईनाथ त्यांच्या मदतीला धावला. हे मोडक नावाचे काका पुण्याहून आले होते आणि आमच्याच सहलीबरोबर होते. पहिला मेंबर भेटला तो असा... मग पुन्हा इमिग्रेशन ओलांडून बॅगा वगैरे उचलून आमच्या तिथल्या काँटॅक्ट पर्सन मुलीची वाट पाहत बसलो. शेवटी तिला फोन गेला. ती आमच्यासमोरूनच जात होती. त्यामुळं तिनं लगेच ओळखलं. तिनं तिचं नाव 'सरिना' असं सांगितलं. सिंगापुरी चायनीज वंशाची होती. हिच्याबरोबरच आम्हाला पुढचे पाच दिवस फिरायचं होतं. आमच्या ग्रुपमध्ये एकूण ३४ लोक आहेत, असं कळलं. (नंतर अजून ११ लोक त्यात जोडले गेले.) आम्ही सहा जण आणि मोडककाका व त्यांचे एक मित्र सोडून अजून तब्बल २६ लोकांचा शोध सरिनाला घ्यायचा होता. मग आम्ही तिथल्या कॉफीशॉपमध्ये कॉफी घेतली. सिंगापूरचं चलन पहिल्यांदा वापरलं. लगेच, दोन (सिंगापूर) डॉलरची कॉफी म्हणजे १०६ रुपयांना पडली, असा मध्यमवर्गीय हिशेब केला. मात्र, यानंतर असा हिशेब करायचा नाही, असं ठरवलं आणि ते शेवटपर्यंत पाळलं. अखेर ते सगळे लोक आले. एक १८ जणांचा ग्रुप होता. एक पाच जणांची फॅमिली होती आणि एक तिघांची... सगळे आले, मग आमच्या बसपर्यंत सामान वाहून नेलं. बस सिंगापूर शहराच्या दिशेनं धावू लागली. ही चांगली एसी बस होती. पुढे सर्व ट्रिपमध्ये प्रवाशांची ने-आण करायला अशाच चांगल्या, मोठ्या एसी बस मिळाल्या. सिंगापूर हे बेट असल्यामुळं आणि त्यातही विषुववृत्ताच्या जवळ असल्यानं तिथं कायम दमट हवा असते. उकाडा जाणवतो. त्यामुळं जिकडं-तिकडं एसी असतोच.
सिंगापूर हा एके काळी मलायाचाच (आत्ताचा मलेशिया) भाग होता आणि मलाया ही ब्रिटिशांची वसाहत होती. ईस्ट इंडिया कंपनीचं आग्नेय आशियातलं बंदर म्हणून याचं महत्त्व होतं. दुसऱ्या महायुद्धात जपाननं सिंगापूरचा ताबा मिळवला. आपल्यासाठी महत्त्वाचा संदर्भ म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच सिंगापुरात येऊन इंडियन नॅशनल आर्मी स्थापन केली आणि जपानच्या मदतीनं ब्रिटिशांना शह देण्याचा धाडसी प्रयत्न केला. मला नंतर सिंगापुरात धावत्या बसमधून 'इंडियन नॅशनल आर्मी'चा एक बोर्डही दिसला. पण आमच्या सहलीचा कार्यक्रम फिक्स असल्यानं तिथं जाऊन काय ते पाहता आलं नाही. असो. मलेशियाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य १९६३ मध्ये मिळालं. मात्र, सिंगापूरनं आपलं स्वतंत्र वैशिष्ट्य असल्याचं घोषित करून मलेशियापासून दोन वर्षांतच स्वातंत्र्य मिळवलं आणि आत्ताचं जे सिंगापूर राष्ट्र आहे ते १९६५ मध्ये उदयास आलं. सिंगापूर हे 'एक शहर राष्ट्र' आहे. अवघ्या सातशे चौरस किलोमीटर परिसरात हा देश संपतो. मुख्य बेट व आजूबाजूची ६२ चिमुकली बेटं यावर सिंगापूरची सत्ता चालते. लोकसंख्या आहे ६० लाख फक्त! नंतर सरिनाला मी आमच्या पुण्याची लोकसंख्या जवळपास तुमच्या देशाएवढी आहे, असं सांगितलं, तेव्हा तिचे डोळे (तिला शक्य होते तेवढे) विस्फारले. पण या सिंगापुरी लोकांना आपल्या देशाचा विलक्षण अभिमान आहे. 'माजुलाह सिंगापुरा' (सिंगापूर, आगे बढो) हे त्यांचं राष्ट्रगीत. ली कुआन यू हे त्यांचे पहिले पंतप्रधान. त्यांना 'आधुनिक सिंगापूरचे जनक' मानलं जातं. सरिनाही त्यांच्याविषयी अत्यंत आदरानं बोलायची. नंतर मादाम तुस्साँ म्युझियममध्ये यांचा पुतळाही पाहिला. तर या ली कुआन यांनी जवळपास तीन दशकांच्या आपल्या कारकिर्दीत सिंगापूरची आत्ता दिसते आहे ती प्रगती घडवून आणली. तिसऱ्या जगातून 'पहिल्या जगा'त त्यांनी हा देश नेऊन ठेवला.
सिंगापूरमध्ये चिनी वंशाचे लोक सर्वाधिक म्हणजे ७५ टक्के आहेत. १३-१४ टक्के मलाय आहेत, तर जवळपास दहा टक्के भारतीय आहेत. धर्म जास्त करून बौद्ध व नंतर ख्रिश्चन, इस्लाम... हिंदूंचं प्रमाण पाच टक्के!
भारतीय लोकांचा 'लिटल इंडिया' नावाचा भाग आहे. ते प्रसिद्ध मुस्तफा मार्केट तिकडंच आहे. आम्हाला हॉटेलमध्ये चेक-इन करण्याआधी तिकडं जेवायला जायचं होतं. आमची बस सुमारे ४०-४५ मिनिटांचा प्रवास करून ऑर्चर्ड स्ट्रीट परिसरात असलेल्या आमच्या चॅन्सेलर हॉटेलमध्ये पोचली. येताना सरिनानं सिंगापूरमध्ये शिस्तीची एकदा उजळणी करून घेतली. (खाली काही फेकायचं नाही, कचरा करायचा नाही, बसमध्ये काहीही खायचं वा प्यायचं नाही इ. इ.) सिंगापूर ही एके काळची ब्रिटिश वसाहत असल्यानं इथं आपल्यासारखंच रस्त्याच्या डाव्या बाजूनं ड्राइव्ह करतात. त्यामुळं फारसं वेगळं वाटलं नाही. हॉटेल भव्य होतं. मजले दहाच होते; पण आडवं बरंच होतं. शिवाय तिथं हॉटेलांचं संकुलच होतं. आमची गाडी थेट इमारतीच्या आत हॉटेलच्या दारात जाऊन थांबली. मग सर्व जड सामान तिथंच ठेवलं. टाइमपास म्हणून हॉटेलच्या टेरेसवर गेलो. तिथं स्विमिंग पूल होता. मात्र, आम्हाला झोपा यायला लागल्या होत्या. थोडा वेळ तिथं चक्क झोप काढली. मग दीडला परत खाली... सरिना आम्हाला 'लिटल इंडिया'त घेऊन गेली. तिथं सितारा नावाचं एक भारतीय रेस्टॉरंट होतं. तिथं सगळे जेवणावर तुटून पडले. ब्रेकफास्ट असा नीट झाला नव्हता. त्यामुळं जेवल्यावर बरं वाटलं. त्या परिसराची जरा नंतर फिरून रेकी केली. समोरच मुस्तफा मार्केट होतं. मला वाटत होतं, त्यापेक्षा हे प्रथमदर्शनी फारच साधंसुधं वाटलं. त्याउलट त्याच्यासमोरच्या रस्त्यावर आपल्या हाँगकाँग लेनसारखी किंवा तुळशीबागेसारखी छोटी छोटी दुकानं होती, ती मला आवडली. (नंतर बरीच खरेदी तिथंच झाली.) इथंच आमचा ११ जणांचा दुसरा ग्रुप जॉइन झाला. मग सगळे पुन्हा हॉटेलवर गेलो. मग रीतसर चेक-इन वगैरे सोपस्कार झाले. आमच्या रूमवर गेलो. इथं खोल्या लहान असतात, हे आधीच सांगितलं होतं. आमची खोली मला मध्यम वाटली. पण दिवसभराचा प्रवासाचा शिणवटा घालविण्यासाठी फ्रेश होणं गरजेचं होतं. तेव्हा आंघोळी करून चक्क ताणून दिली. संध्याकाळी पावणेसहा वाजता नाइट सफारीसाठी जायचं होतं... बरोबर पावणेसहाला आम्ही लॉबीत आलो. फोटोसेशन झालं. मग बसमधून नाइट सफारीला रवाना झालो. सिंगापूर झू आणि ही नाइट सफारी शेजारी शेजारीच आहे.
तिथं पर्यटकांची झुंबड उडाली होती. खास रात्री दिसणारे प्राणी आणि इतरही प्राणी या नाइट सफारीत पाहायला मिळतात. त्यासाठी एका छोट्या ट्रेनमध्ये बसायचं होतं. तिथं आम्हाला लाइन धरावी लागली. अखेर ती ट्राम आली. त्यात बसून आम्ही ते सगळे प्राणी पाहिले. वाघ, सिंह, गवे, अस्वलं, हत्ती, सांबरं, चितळं, गेंडा असले मोठे प्राणीही मोकळ्या जागेत फिरत होते. यातल्या फक्त वाघासमोर जाळी होती. बाकी सगळ्या प्राण्यांना थेट पाहू शकत होतो. काही प्राणी तर धीटपणे त्या ट्रामजवळही येत होते. ही सफारी चांगली होती, तरी फार काही ग्रेट वाटली नाही. नंतर या निशाचर प्राण्यांचा एक शो होता, तिकडं जाऊन बसलो. एक चायनीज मुलगी तो कंडक्ट करीत होती. तिथंही भरपूर गर्दी उसळली होती. हा शो छान होता. त्यांचे स्वयंसेवक लोकांमधून ते प्राणी फिरवत होते, तेव्हा मजा आली. एक अजगर आणला, तेव्हा प्रेक्षकांतून त्या मुलीने लोक बोलावले. आपल्या एक भारतीय काकू व एक जपानी काका गेले. त्यांनी ऐटीत तो अजगर हाती धरला. प्रेक्षकांत हिंदी प्रेक्षकांचं प्रमाण बरंच होतं. त्यामुळं तमीळ किंवा हिंदीतून अनाउन्समेंट झाली, की आरडाओरडा व्हायचा. त्या मुलीनं पाच-सहा भाषांतून सुरुवातीच्या घोषणा केल्या. आमच्या शेजारी रशियातून आलेली छोटी मुलं होती. ती 'रशिया रशिया' करून ओरडत होती. पण त्या मुलीला रशियन येत नसावं. असं ते छोटंसं जागतिक पर्यटक संमेलनच भरलं होतं तिथं. तो शो पाहून आम्ही तिथल्याच एका 'युलु युलू' नावाच्या हॉटेलमध्ये जेवलो. इथं बुफेच होतं. त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांना जेवणावर ताव मारला. नंतर तिथल्या आइस्क्रीमसाठी आपल्या लोकांनी नेहमीप्रमाणे वचावचा करून गोंधळ घातलाच. हे सगळं संपवून बसमध्ये बसून परत निघालो, तेव्हा दहा वाजले होते. हॉटेलवर परतलो आणि झोपलो...
दुसरा दिवस अत्यंत भरगच्च कार्यक्रमांचा होता... हा सहलीतला एकमेव पॅक दिवस... उद्या मजा येणार म्हणून आम्ही सेंटोसा आयलंडची स्वप्नं पाहत परदेशातल्या पहिल्या झोपेच्या आधीन झालो...

(क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
---

11 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग १

जीवन में एक बार...
-----------------------

रविवार, ३ जून २०१८

खूप लहानपणी रेडिओवर 'जीवन में एक बार आना सिंगापूर' (सिंगापूर, १९६०) हे गाणं लागत असे, तेव्हा त्या गाण्याच्या शैलीमुळं आणि त्यातल्या वेगळ्या पद्धतीच्या (पूर्व आशियाई) संगीतामुळं ते ऐकायला मजा वाटत असे. नंतर चित्रहार, छायागीत या कार्यक्रमांतून ते गाणं प्रत्यक्ष बघितलं, तरी आपण आयुष्यात प्रत्यक्ष कधी सिंगापूरला जाऊ शकू, असं मला वाटलं नव्हतं. परदेशप्रवास हे केवळ स्वप्न आणि स्वप्नच असण्याचा तो काळ होता. सुदैवानं हे स्वप्न साकार होऊ शकतं, अशी परिस्थिती पुढं आयुष्यात आली. एक हौस म्हणून मी २००७ च्या सुरुवातीला पासपोर्ट काढला आणि लगेच सहा महिन्यांनी मला माझ्या तेव्हाच्या ऑफिसतर्फे, म्हणजे 'सकाळ'तर्फे थायलंडला जाण्याची संधीही मिळाली. पाच दिवसांचा तो अपघाती परदेश दौरा माझ्यासाठी अनुभवांची मोठी शिदोरी ठरला. पुढची दहा वर्षे मात्र पासपोर्टला अन्य कुठल्याही देशाच्या व्हिसाची हळद लागली नाही. अखेर २०१७ मध्ये पासपोर्टचं नूतनीकरण करतानाच येत्या वर्षभरात परदेशप्रवास करायचाच, असा निर्धार केला. धनश्री आणि नीलचे पासपोर्टही व्हिसाच्या हळदीविनाच एक्स्पायर झाले होते. शिवाय त्या दोघांनीही एकदाही परदेशप्रवास केला नव्हता. त्यामुळं तर हा निर्धार अगदी दृढ झाला. माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेला माझा आत्येभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली यांना आम्ही जानेवारीत भेटलो असताना एकदा हा विषय निघाला. त्यांनाही परदेशात एक मौजमजेची सफर करायची होती. त्यांच्याबरोबर बरोबर दहा वर्षांपूर्वी आम्ही हैदराबाद-रामोजीसिटीची सहल केली होती. आता सहकुटुंब पहिला परदेशप्रवासही आपण मिळूनच करू या, असं आम्ही ठरवलं. तेव्हा आमची मुलं खूपच लहान होती. आता नील नववीत गेलाय, तर साईनाथचा मुलगा अर्णव सातवीत! त्यामुळं त्यांना मजा येईल, असं ठिकाण आम्ही शोधायचं ठरवलं. हा शोध फारच सोपा होता. सिंगापूर! सर्वानुमते अगदी हेच शहर ठरवण्यात आलं. आमचं बजेट, सुट्टीचा कालावधी आणि मुलांच्या इंटरेस्टची सांगड सिंगापूरमध्ये अगदी अचूक बसत होती. आपलं आपण सहलीला जाण्याऐवजी टूर कंपनीचा पर्याय आम्ही निवडला. याचं कारण हा आमचा पहिलाच प्रवास असणार होता. त्यामुळं थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील; पण कम्फर्ट महत्त्वाचा, असा विचार केला. मग फेब्रुवारीत एका पर्यटन प्रदर्शनाला आम्ही मुद्दाम भेट द्यायला गेलो. तिथं वेगवेगळ्या नामवंत पर्यटन कंपन्यांचे स्टॉल होते. पण 'कॉक्स अँड किंग्ज' या कंपनीनं सादर केलेला प्रवासाचा आराखडा (आयटरनरी) आम्हाला सर्वांत जास्त आवडला. सहलीतला एक दिवस वगळला, तर फार भरगच्च कार्यक्रम नव्हते. विश्रांतीला, वैयक्तिक खरेदीला, सिंगापुरात पोचल्यावर, तसंच निघण्यापूर्वी बराच मोकळा वेळ मिळणार होता. त्यामुळं मग आम्ही फेब्रुवारीतच थोडे पैसे भरून या सहलीचं बुकिंग करून टाकलं. तीन जून ते आठ जून असा हा चार रात्र/पाच दिवसांचा कार्यक्रम होता.
जसजसा प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागला, तसतशी आमची उत्सुकता वाढत होती. विशेषतः नील खूप 'एक्सायटेड' होता. आम्ही प्रवासाची तयारी करायला सुरुवात केली. सगळे पैसे वगैरे भरून झाले. मेच्या अखेरीस कंपनीकडून व्हिसा आणि विमानप्रवासाची तिकिटं मिळाली. सिंगापूर एअरलाइन्स ही जगातली एक सर्वोत्तम प्रवासी वाहतूक कंपनी समजली जाते. आमच्या प्रवास कंपनीनं जाताना आणि येताना आम्हाला याच एअरलाइन्सची तिकिटं दिली होती. ती बघून आम्ही खूश झालो. शिवाय येताना व जातानाचा प्रवास A-380 या एअरबसच्या दुमजली विमानानं होता. ते मी नीलला सांगितल्यावर तर तो भलताच खूश झाला.
'ए ३८०' हे सध्याचं जगातलं सर्वांत मोठं प्रवासी विमान आहे. यामध्ये दोन मजले असतात. वरचा मजला एक्झिक्युटिव्ह, बिझनेस व प्रीमिअम इकॉनॉमी, तर खालचा सगळा इकॉनॉमी, म्हणजे जनता क्लास असतो. आम्ही अर्थातच जनता क्लासमध्ये होतो. (पण हा जनता क्लासही इतर विमानांच्या जनता क्लासपेक्षा भारी असतो, हे नंतर कळणार होतं.)
अखेर सर्व तयारी झाली. व्हिसा व तिकिटं हातात आल्यावर जवळच्या नातेवाइकांना, मित्रांना व ऑफिसमध्ये या प्रवासाची कल्पना दिली. (प्रवासी कंपनीच्या कार्यालयातल्या मुलीनं इन्शुरन्ससाठी नॉमिनी डिटेल्स विचारले, तेव्हा हे लक्षात आलं.) बाकी सगळ्यांसाठी हे सरप्राइज असणार होतं. वास्तविक हल्ली एवढे लोक परदेशात जातात, की त्या प्रवासाचं असं काही कौतुक कुणाला उरलेलं नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारा माझा मित्र तुषार तर निगडी किंवा हिंजवडीला जाऊन यावं तसा लंडनला अप-डाउन करत असतो. तरी प्रत्येकाचा परदेश प्रवासाचा अनुभव हा स्वतंत्र व खास असतो. तसे आम्ही आमचा हा अनुभव घ्यायला सज्ज झालो होतो. जगातल्या फार मोजक्या देशांना किंवा शहरांना आपण आवर्जून भेट द्यावी, असं मला वाटत आलंय. त्यात पहिल्या दहांमध्ये लंडन, पॅरिस, सिडनी, न्यूयॉर्क, सिंगापूर, बर्लिन, टोकियो, शांघाय, मॉस्को व कराची या शहरांचा (याच क्रमानं) समावेश आहे. त्यात पाचव्या क्रमांकाच्या शहराचा नंबर आधी लागला.
रविवारी (३ जून) रात्री ११.४० ची फ्लाइट होती. त्यामुळं दुपारी तीन वाजता पुण्यातून निघण्याचं नियोजन होतं. साईनाथनं त्याच्या घरून ओला कॅब बुक केली. आम्ही साधारणतः साडेतीनला निघालो. खालापूरच्या फूडमॉलला चहा वगैरे घेऊन मुंबईत विमानतळावर पोचायला साडेसात वाजले. तुलनेनं गर्दी कमी असल्यानं लवकर पोचलो. मी अकरा वर्षांपूर्वी याच विमानतळावरून बँकॉकला गेलो होतो. मात्र, त्यानंतर 'जीव्हीके'नं मुंबईच्या विमानतळाचं रूपडं पूर्ण पालटून टाकलं होतं. दिल्लीचं टर्मिनल -३ आणि मुंबईचं हे टी-२ (टर्मिनल - २ - आंतरराष्ट्रीय प्रस्थान) आता जबरदस्त झाले आहेत. मुंबईचा विमानतळ आता जगातल्या उत्तम विमानतळांमध्ये गणला जातो म्हणे. मी काही इतर आंतरराष्ट्रीय विमानतळ खूप बघितलेले नाहीत. पण तरी मुंबईचा नवा विमानतळ आवडलाच. या भव्य विमानतळावर प्रवेश केल्यापासून ते विमानात बसेपर्यंत फार भारी वाटत होतं. सुरुवातीला आमचा तिथला जो जिजो नावाचा काँटॅक्ट पर्सन होता, त्यानं आम्हाला सिंगापूर एअरलाइन्सच्या बोर्डिंग पासच्या लाइनीत उभं केलं आणि तो गेला. या कामासाठी त्याची काहीही गरज नव्हती. हे आमचं आम्हीही केलं असतं. असो. नंतर इमिग्रेशन वगैरे सोपस्कार पार पडून आम्ही डिपार्चर गेटला गेलो. तिथं आमच्या पोरांना भुका लागल्या. मग भारी विमानतळावरील 'भारी'च किमतीचे पदार्थ खाऊन त्यांचा आणि आमचाही जीव शांत केला. तिथल्या काचेतून आमचं एअरक्राफ्ट दिसत होतं... फारच मोठं जंबोजेट होतं ते... विमानतळावरील ही दुनियाच वेगळी. तिथल्या काचेला नाक लावून पलीकडं पार्किंग बेमध्ये सुरू असलेली त्या लोकांची लगबग पाहायला मला आवडतं. सेकंदा-मिनिटांच्या हिशेबानं कामं चाललेली असतात. एकेक गोष्टी 'टिक्' करायच्या असतात. थोडी चूक झाली, की थेट जिवाशीच खेळ. साडेदहा वाजता आमच्या विमानाच्या हवाई सुंदऱ्या यायला लागल्या. पुढच्या अर्ध्या तासातच बोर्डिंग सुरू झालं... सव्वाअकरा वाजता आम्ही त्या महाकाय प्रवासी वाहनात प्रवेश केला... पावणेबाराला इंजिनाची घरघर सुरू झाली.... 'कुर्सी की पेटी' बांधून आम्ही तय्यार झालो.... बरोबर मध्यरात्री बारा वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आमच्या 'एसक्यू ४२३'नं उड्डाण केलं... अरबी समुद्राच्या दिशेनं जाऊन आमच्या सुपरजंबोनं हलकेच डावं वळण घेतलं आणि आम्ही आग्नेय दिशेनं आकाशात हलके हलके वर जाऊन ३८ हजार फुटांवर स्थिरावलो... पुढच्या काही तासांतच आम्ही सव्वाचार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सिंगापूर बेटावर उतरणार होतो...
परिराज्याची स्वप्नील सफर सुरू झाली होती...                                                                      (क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


--------------------------------------