12 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग २

'माजुलाह सिंगापुरा'
-----------------------

सोमवार, ४ जून २०१८.

मुंबईवरून आमचं विमान सिंगापूरच्या दिशेनं निघालं तेव्हा रविवार रात्रीचे बारा वाजून गेले होते. सोमवार उजाडला होता. विमानात हवाई सुंदऱ्यांनी दिलेल्या विविध सेवांचा जमेल तसा लाभ घेणं सुरू होतं. सुरुवातीला मेन्यूकार्ड आलं. त्यात अपेयपानाची यादी पाहून मन लुभावलं. पण तो मोह आवरला आणि सफरचंदाचा रस मागवला. विमानातलं जेवण हा एक अजब प्रकार असतो. आमच्या नावापुढं 'व्हेजिटेरियन हिंदू मिल' असं लिहिलं होतं. हे आमच्या प्रवास कंपनीनं परस्परच ठरवलं होतं. अर्थात आम्ही शाकाहारीच होतो, ते सोडा. विमानाची वेळ रात्री ११.४० ची असो, नाही तर पहाटे तीनची... दोन तासांपेक्षा जास्त वेळाचा प्रवास असेल, तर हे लोक जेवणादी सरबराई करतातच. लोक जेवून निघाले असतील वगैरे विचार त्यांना शिवत नाही. अर्थात, आम्ही विमानतळावरचे 'भारी' पदार्थ खाऊन अर्धवट भुकेलेच राहिलो होतो. तेव्हा मध्यरात्री समोर आलेलं ते व्हेज हिंदू जेवण मुकाट गिळलं. आपल्या समोर जो टीव्हीचा स्क्रीन असतो, तो आपला पहिल्या फटक्यात कधीच चालू होत नाही. या वेळी अपवाद ठरला. माझा टीव्ही व्यवस्थित चालत होता, पण धनश्रीचा बंद होता. त्यांच्या त्या इअरफोनची कॉर्ड शिटाच्या नक्की कुठल्या हातात घुसवायची याचं बऱ्याच जणांचं कायम कन्फ्युजन होतं. शेवटी इष्ट कार्ये पार पडली आणि मी सिनेमे शोधायला लागलो. 'शेप ऑफ द वॉटर' सापडला. पण तो लावल्या लावल्या पहिल्याच दृश्यात नायिका संपूर्ण विवस्त्रावस्थेत बाथटबमध्ये शिरली, तसं मी चॅनेल बदललं. मागचे एक शीख आजोबा दोन शिटांच्या मधल्या जागेतून माझ्याच स्क्रीनकडं पाहत होते, हे मला कळत होतं. शेवटी बरंच सर्फिंग केल्यावर 'फास्टर फेणे'ही सापडला. त्यानंतर मात्र मी तो टीव्ही बंद केला आणि फ्लाइट पाथ मोड लावून ठेवला. मला हा फ्लाइट पाथ पाहायला नेहमीच आवडतं. त्यात विपुल माहिती दिलेली असते. आपण किती हजार फुटावर आहोत, बाहेर किती तापमान आहे, अंतर किती राहिलंय, इकडची वेळ, तिकडची वेळ... असं सगळं... ते पाहत कधी झोप लागली ते कळलंही नाही.
सकाळी जाग आली ती डाव्या बाजूनं समोरच्या खिडकीतून उन्हाची तिरीप आल्यावर... आम्ही सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सिंगापुरात पोचणार होतो. अजून एक तास होता. सहा वाजले होते. उजाडलं होतं. रात्री फ्रेश मूडमध्ये आम्ही विमानात बसल्या बसल्या हवाईताईंनी गरम टुवाल दिले होते. त्यामुळं आता सकाळी पारोशी तोंडं पुसायला पुन्हा ते मिळणार नाहीत, याची खात्री होती. तसंच झालं. पण इअरफोनसोबत दिलेल्या किटमध्ये एक अत्यंत बालब्रश आणि बालपेस्ट लाभली. हेही पुण्य कमी नसे नशिबाला म्हणून आम्ही लँडिंगची वाट पाहू लागलो. हळूहळू जमीन दिसू लागली. जरा पल्याड समुद्र होताच. सिंगापूर आणि मलेशिया एकमेकांना जोडूनच... त्यामुळं आमचं विमान मलेशियावरूनच चाललं होतं. हळूहळू डिसेंडिंग सुरू झालं. बरोबर सात वाजून वीस मिनिटांनी आम्ही सिंगापूरच्या त्या भव्य चांगी विमानतळावर लँड झालो. ईगल हॅज लँडेड... नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर उतरल्यावर काढलेले हे उद्गार आम्ही 'चांगी'वर उतरल्यावर काढत होतो. सध्या तरी आमच्यासाठी सिंगापूर हाच चंद्र होता. विमान धावपट्टीवर टेकताक्षणी (ज्याला इंग्रजीत ते 'टच्ड डाउन' असं स्पेसिफिकली म्हणतात...) काही लोकांच्या अंगात एकदम उत्साह संचारतो. ज्यांना फ्लाइटची फ्राइट असते, असे लोक संपूर्ण प्रवासभर भिजल्या उंदरागत आपल्या खुर्चीवर बसून असतात. पण विमान एकदा जमिनीवर टेकलं, की त्यांच्यातल्या उंदराचा 'शेर' होतो आणि ते उठून एकदम ती वरची केबिन उघडायला लागतात. भारतात देशांतर्गत प्रवास करताना मी हे अनेकदा पाहिलं आहे. इथंही निम्मे लोक उठलेच. त्यातले ९९ टक्के आपलेच होते, हे सांगायला नकोच. आमचं हॉटेल चेक इन दुपारी तीन वाजता होतं. त्यामुळं आम्ही निवांत होतो. सावकाश सगळे गेल्यावर आम्ही बाहेर पडलो. चांगी विमानतळाची भव्यता एकदम काही जाणवली नाही. पण प्रकर्षानं जाणवली ती एक गोष्ट. ती म्हणजे कमी माणसं... हा एवढा मोठा एअरपोर्ट मला रिकामा रिकामा वाटत होता. सकाळची वेळ होती. आमच्या विमानातले लोक भराभरा बॅगा आणायला पुढे गेले होते. आम्ही निवांत समोरच्या खुर्च्यांवर बसलो. स्वच्छतागृहाची भेट अटळ होती. तिथं मला एक आपल्या भारतीय शैलीचं शौचकूपही दिसलं. शेवटी सिंगापूर हे आशियातच आहे, असं म्हणून मी सिंगापूरला एकदम आपल्या आतल्या वर्तुळात नेऊन ठेवलं. माणसाचं कसं असतं ना, प्रत्येक ठिकाणी आपण आपला कम्फर्ट शोधायला बघतो. हेच मी श्रीलंकेत गेलो असतो, तर मला तो देश सिंगापूरपेक्षा जवळचा वाटला असता. इथं युरोप किंवा अमेरिकेपेक्षा आता मला सिंगापूर 'आशियाई' म्हणजे आपलं वाटत होतं. आपण आपला परीघ मोठा करीत नेला, तरी त्यातल्या बाहेरच्या वर्तुळापेक्षा एका आतल्या वर्तुळाचा आपला शोध सदैव सुरू असतो. मला त्या स्वच्छतागृहात हेच फीलिंग आलं...
त्या बालब्रशनं तोंड वगैरे धुऊन बाहेर आलो आणि सिंगापूरच्या त्या टर्मिनल ३ वर अरायव्हल्सच्या दिशेनं निघालो, तशी त्या एअरपोर्टची भव्यता कळून आली. शेजारूनच दुसऱ्या टर्मिनलला जाणारी छोटी दोन डब्यांची मेट्रो ट्रेन दिसली आणि आपण परदेशात येऊन पोचल्याची खात्री पटली. इमिग्रेशनचे सोपस्कार पार पाडताना एक आपल्याकडचेच काका जरा गडबडलेले दिसले. मग साईनाथ त्यांच्या मदतीला धावला. हे मोडक नावाचे काका पुण्याहून आले होते आणि आमच्याच सहलीबरोबर होते. पहिला मेंबर भेटला तो असा... मग पुन्हा इमिग्रेशन ओलांडून बॅगा वगैरे उचलून आमच्या तिथल्या काँटॅक्ट पर्सन मुलीची वाट पाहत बसलो. शेवटी तिला फोन गेला. ती आमच्यासमोरूनच जात होती. त्यामुळं तिनं लगेच ओळखलं. तिनं तिचं नाव 'सरिना' असं सांगितलं. सिंगापुरी चायनीज वंशाची होती. हिच्याबरोबरच आम्हाला पुढचे पाच दिवस फिरायचं होतं. आमच्या ग्रुपमध्ये एकूण ३४ लोक आहेत, असं कळलं. (नंतर अजून ११ लोक त्यात जोडले गेले.) आम्ही सहा जण आणि मोडककाका व त्यांचे एक मित्र सोडून अजून तब्बल २६ लोकांचा शोध सरिनाला घ्यायचा होता. मग आम्ही तिथल्या कॉफीशॉपमध्ये कॉफी घेतली. सिंगापूरचं चलन पहिल्यांदा वापरलं. लगेच, दोन (सिंगापूर) डॉलरची कॉफी म्हणजे १०६ रुपयांना पडली, असा मध्यमवर्गीय हिशेब केला. मात्र, यानंतर असा हिशेब करायचा नाही, असं ठरवलं आणि ते शेवटपर्यंत पाळलं. अखेर ते सगळे लोक आले. एक १८ जणांचा ग्रुप होता. एक पाच जणांची फॅमिली होती आणि एक तिघांची... सगळे आले, मग आमच्या बसपर्यंत सामान वाहून नेलं. बस सिंगापूर शहराच्या दिशेनं धावू लागली. ही चांगली एसी बस होती. पुढे सर्व ट्रिपमध्ये प्रवाशांची ने-आण करायला अशाच चांगल्या, मोठ्या एसी बस मिळाल्या. सिंगापूर हे बेट असल्यामुळं आणि त्यातही विषुववृत्ताच्या जवळ असल्यानं तिथं कायम दमट हवा असते. उकाडा जाणवतो. त्यामुळं जिकडं-तिकडं एसी असतोच.
सिंगापूर हा एके काळी मलायाचाच (आत्ताचा मलेशिया) भाग होता आणि मलाया ही ब्रिटिशांची वसाहत होती. ईस्ट इंडिया कंपनीचं आग्नेय आशियातलं बंदर म्हणून याचं महत्त्व होतं. दुसऱ्या महायुद्धात जपाननं सिंगापूरचा ताबा मिळवला. आपल्यासाठी महत्त्वाचा संदर्भ म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच सिंगापुरात येऊन इंडियन नॅशनल आर्मी स्थापन केली आणि जपानच्या मदतीनं ब्रिटिशांना शह देण्याचा धाडसी प्रयत्न केला. मला नंतर सिंगापुरात धावत्या बसमधून 'इंडियन नॅशनल आर्मी'चा एक बोर्डही दिसला. पण आमच्या सहलीचा कार्यक्रम फिक्स असल्यानं तिथं जाऊन काय ते पाहता आलं नाही. असो. मलेशियाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य १९६३ मध्ये मिळालं. मात्र, सिंगापूरनं आपलं स्वतंत्र वैशिष्ट्य असल्याचं घोषित करून मलेशियापासून दोन वर्षांतच स्वातंत्र्य मिळवलं आणि आत्ताचं जे सिंगापूर राष्ट्र आहे ते १९६५ मध्ये उदयास आलं. सिंगापूर हे 'एक शहर राष्ट्र' आहे. अवघ्या सातशे चौरस किलोमीटर परिसरात हा देश संपतो. मुख्य बेट व आजूबाजूची ६२ चिमुकली बेटं यावर सिंगापूरची सत्ता चालते. लोकसंख्या आहे ६० लाख फक्त! नंतर सरिनाला मी आमच्या पुण्याची लोकसंख्या जवळपास तुमच्या देशाएवढी आहे, असं सांगितलं, तेव्हा तिचे डोळे (तिला शक्य होते तेवढे) विस्फारले. पण या सिंगापुरी लोकांना आपल्या देशाचा विलक्षण अभिमान आहे. 'माजुलाह सिंगापुरा' (सिंगापूर, आगे बढो) हे त्यांचं राष्ट्रगीत. ली कुआन यू हे त्यांचे पहिले पंतप्रधान. त्यांना 'आधुनिक सिंगापूरचे जनक' मानलं जातं. सरिनाही त्यांच्याविषयी अत्यंत आदरानं बोलायची. नंतर मादाम तुस्साँ म्युझियममध्ये यांचा पुतळाही पाहिला. तर या ली कुआन यांनी जवळपास तीन दशकांच्या आपल्या कारकिर्दीत सिंगापूरची आत्ता दिसते आहे ती प्रगती घडवून आणली. तिसऱ्या जगातून 'पहिल्या जगा'त त्यांनी हा देश नेऊन ठेवला.
सिंगापूरमध्ये चिनी वंशाचे लोक सर्वाधिक म्हणजे ७५ टक्के आहेत. १३-१४ टक्के मलाय आहेत, तर जवळपास दहा टक्के भारतीय आहेत. धर्म जास्त करून बौद्ध व नंतर ख्रिश्चन, इस्लाम... हिंदूंचं प्रमाण पाच टक्के!
भारतीय लोकांचा 'लिटल इंडिया' नावाचा भाग आहे. ते प्रसिद्ध मुस्तफा मार्केट तिकडंच आहे. आम्हाला हॉटेलमध्ये चेक-इन करण्याआधी तिकडं जेवायला जायचं होतं. आमची बस सुमारे ४०-४५ मिनिटांचा प्रवास करून ऑर्चर्ड स्ट्रीट परिसरात असलेल्या आमच्या चॅन्सेलर हॉटेलमध्ये पोचली. येताना सरिनानं सिंगापूरमध्ये शिस्तीची एकदा उजळणी करून घेतली. (खाली काही फेकायचं नाही, कचरा करायचा नाही, बसमध्ये काहीही खायचं वा प्यायचं नाही इ. इ.) सिंगापूर ही एके काळची ब्रिटिश वसाहत असल्यानं इथं आपल्यासारखंच रस्त्याच्या डाव्या बाजूनं ड्राइव्ह करतात. त्यामुळं फारसं वेगळं वाटलं नाही. हॉटेल भव्य होतं. मजले दहाच होते; पण आडवं बरंच होतं. शिवाय तिथं हॉटेलांचं संकुलच होतं. आमची गाडी थेट इमारतीच्या आत हॉटेलच्या दारात जाऊन थांबली. मग सर्व जड सामान तिथंच ठेवलं. टाइमपास म्हणून हॉटेलच्या टेरेसवर गेलो. तिथं स्विमिंग पूल होता. मात्र, आम्हाला झोपा यायला लागल्या होत्या. थोडा वेळ तिथं चक्क झोप काढली. मग दीडला परत खाली... सरिना आम्हाला 'लिटल इंडिया'त घेऊन गेली. तिथं सितारा नावाचं एक भारतीय रेस्टॉरंट होतं. तिथं सगळे जेवणावर तुटून पडले. ब्रेकफास्ट असा नीट झाला नव्हता. त्यामुळं जेवल्यावर बरं वाटलं. त्या परिसराची जरा नंतर फिरून रेकी केली. समोरच मुस्तफा मार्केट होतं. मला वाटत होतं, त्यापेक्षा हे प्रथमदर्शनी फारच साधंसुधं वाटलं. त्याउलट त्याच्यासमोरच्या रस्त्यावर आपल्या हाँगकाँग लेनसारखी किंवा तुळशीबागेसारखी छोटी छोटी दुकानं होती, ती मला आवडली. (नंतर बरीच खरेदी तिथंच झाली.) इथंच आमचा ११ जणांचा दुसरा ग्रुप जॉइन झाला. मग सगळे पुन्हा हॉटेलवर गेलो. मग रीतसर चेक-इन वगैरे सोपस्कार झाले. आमच्या रूमवर गेलो. इथं खोल्या लहान असतात, हे आधीच सांगितलं होतं. आमची खोली मला मध्यम वाटली. पण दिवसभराचा प्रवासाचा शिणवटा घालविण्यासाठी फ्रेश होणं गरजेचं होतं. तेव्हा आंघोळी करून चक्क ताणून दिली. संध्याकाळी पावणेसहा वाजता नाइट सफारीसाठी जायचं होतं... बरोबर पावणेसहाला आम्ही लॉबीत आलो. फोटोसेशन झालं. मग बसमधून नाइट सफारीला रवाना झालो. सिंगापूर झू आणि ही नाइट सफारी शेजारी शेजारीच आहे.
तिथं पर्यटकांची झुंबड उडाली होती. खास रात्री दिसणारे प्राणी आणि इतरही प्राणी या नाइट सफारीत पाहायला मिळतात. त्यासाठी एका छोट्या ट्रेनमध्ये बसायचं होतं. तिथं आम्हाला लाइन धरावी लागली. अखेर ती ट्राम आली. त्यात बसून आम्ही ते सगळे प्राणी पाहिले. वाघ, सिंह, गवे, अस्वलं, हत्ती, सांबरं, चितळं, गेंडा असले मोठे प्राणीही मोकळ्या जागेत फिरत होते. यातल्या फक्त वाघासमोर जाळी होती. बाकी सगळ्या प्राण्यांना थेट पाहू शकत होतो. काही प्राणी तर धीटपणे त्या ट्रामजवळही येत होते. ही सफारी चांगली होती, तरी फार काही ग्रेट वाटली नाही. नंतर या निशाचर प्राण्यांचा एक शो होता, तिकडं जाऊन बसलो. एक चायनीज मुलगी तो कंडक्ट करीत होती. तिथंही भरपूर गर्दी उसळली होती. हा शो छान होता. त्यांचे स्वयंसेवक लोकांमधून ते प्राणी फिरवत होते, तेव्हा मजा आली. एक अजगर आणला, तेव्हा प्रेक्षकांतून त्या मुलीने लोक बोलावले. आपल्या एक भारतीय काकू व एक जपानी काका गेले. त्यांनी ऐटीत तो अजगर हाती धरला. प्रेक्षकांत हिंदी प्रेक्षकांचं प्रमाण बरंच होतं. त्यामुळं तमीळ किंवा हिंदीतून अनाउन्समेंट झाली, की आरडाओरडा व्हायचा. त्या मुलीनं पाच-सहा भाषांतून सुरुवातीच्या घोषणा केल्या. आमच्या शेजारी रशियातून आलेली छोटी मुलं होती. ती 'रशिया रशिया' करून ओरडत होती. पण त्या मुलीला रशियन येत नसावं. असं ते छोटंसं जागतिक पर्यटक संमेलनच भरलं होतं तिथं. तो शो पाहून आम्ही तिथल्याच एका 'युलु युलू' नावाच्या हॉटेलमध्ये जेवलो. इथं बुफेच होतं. त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांना जेवणावर ताव मारला. नंतर तिथल्या आइस्क्रीमसाठी आपल्या लोकांनी नेहमीप्रमाणे वचावचा करून गोंधळ घातलाच. हे सगळं संपवून बसमध्ये बसून परत निघालो, तेव्हा दहा वाजले होते. हॉटेलवर परतलो आणि झोपलो...
दुसरा दिवस अत्यंत भरगच्च कार्यक्रमांचा होता... हा सहलीतला एकमेव पॅक दिवस... उद्या मजा येणार म्हणून आम्ही सेंटोसा आयलंडची स्वप्नं पाहत परदेशातल्या पहिल्या झोपेच्या आधीन झालो...

(क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
---

No comments:

Post a Comment