13 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग ३

आज मैं उपर...
-----------------मंगळवार, ५ जून, २०१८.
सहलीचा दुसरा दिवस सर्वाधिक पॅक होता. बरंच काही बघायचं होतं. आज आमच्या हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट होता. परदेशांत जसा ब्रेकफास्ट असतो, तसाच तो होता. पोहे, उपमा, थालिपीठ किंवा फोडणीचा भात वा पोळी खायला सोकावलेल्या आमच्या देहांना हा परदेशी कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट जमत नाही. पण न जमवून काय करता? तेव्हा मुकाट जे आहे ते खाल्लं. त्यातही ते कॉर्नफ्लेक्स, मोसंबी किंवा सफरचंदाचा रस आणि कलिंगडाच्या फोडी एवढ्यावर माझं काम भागतं. (बायकोनं आयता भाजून दिलेला ब्रेड व बटर असेल, तर फारच उत्तम!) तेव्हा ते कार्य झटपट उरकून, सरिनाच्या मार्गदर्शनाखाली बसमध्ये जाऊन पुढील सहलीसाठी सज्ज जाहलो. आमचा भारतातला मुख्य टूर लीडर कुणाल हाही आदल्या दिवशी ती ११ जणांची फॅमिली घेऊन आम्हाला जॉइन झाला होता. आता आम्ही एकूण ४५ जण झालो होतो. सर्वांत प्रथम सिटी पॅनॉरमिक टूर. यात सिंगापूरमधल्या महत्त्वाच्या वास्तू सरिनानं गाडीतूनच दाखवल्या. आणि त्या गाडीतूनच बघण्यासारख्या होत्या! त्यात त्या पंजाच्या आकाराच्या पाच इमारती, सिंगापूरचा सिटी कौन्सिल हॉल आणि युद्धातील सैनिकांचं स्मारक (त्याचा आकार दोन चॉपस्टिक शेजारी ठेवल्यासारखा आहे) एवढं लक्षात राहिलं. उडत्या तबकडीच्या आकाराची एक इमारत होती. ते त्यांचं नवं सुप्रीम कोर्ट होतं, की आणखी काय होतं, देव जाणे. सिंगापूरमधली ती प्रसिद्ध तीन हॉटेलांची इमारत व त्यावर ती होडीच्या आकाराची आडवी आणखी एक इमारत दृष्टिपथात आली. सिंगापूर बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही प्रवेश केला होता.
सिंगापूरचं प्रतीक मानला गेलेला तो मर्लायन (धड माशाचं व शिर सिंहाचं) इथंच होता. आम्हाला इथं सोडण्यात आलं. या मर्लायनच्या पार्श्वभूमीवर तुम्ही फोटो काढून घेतलेच पाहिजेत. नाही तर तुम्ही सिंगापुरात आला होता की नाही, यावर जगभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यामुळं आम्ही ते आद्यकर्तव्य पार पाडलं. जगभरातल्या पर्यटकांचा मेळा तिथं भरला होता. त्यात चिनी-जपानी सर्वाधिक, त्याखालोखाल मलेशिया किंवा व्हिएतनाम आदी इतर आग्नेय आशियातले देशांतले पर्यटक, मग भारतीय आणि मग युरोप-अमेरिका असं साधारण प्रमाण दिसलं. जगभरातलं आंतरखंडीय सौंदर्य तिथं त्या उन्हात तळपत होतं. हॉट पँट्स आणि मिनी स्कर्टसची चलती दिसत होती. मी माझ्या भावाला म्हटलंही, की आपण सहाही खंडांतल्या बायकांचे सुंदर पाय आज पाहिले! त्यातही जपानी किंवा चिनी स्त्रियांचे पाय पाहावेत. 'गुळगुळीत' या शब्दाने त्याचं वर्णन करणं फारच गुळगुळीत होईल. अर्थात आम्ही रोज एफ. सी. रोडनं फिरत असल्यानं नजरेला अजिबात सवय नव्हती, असं नाही. पण प्रत्येक खंडातलं सौंदर्य वेगळंच... युरोपीय बायकांचा पांढरेपणा नकोसा वाटतो. त्यात त्यांच्या अंगावरचे ते बारीक काळपट वांगासारखे डाग फारच खुपतात. शिवाय आंघोळीचं आणि त्यांचं हाडवैर असावं. त्या तुलनेनं जपानी किंवा चिनी स्त्रियांचा मऊसूतपणा कमालीचा मोहक वाटतो. देवानं त्यांच्या डोळ्यांत आणि नाकात थोडी दुरुस्ती केली, तर किती छान होईल! असो.
हा मर्लायन म्हणजे 'ममा मर्लायन' होती म्हणे. शेजारीच एक बेबी मर्लायन होता. डॅडा मर्लायन नंतर भेटणार, असं सरिनानं सांगितलं. एवढं महत्त्व मिळालेली ममा फारच फॉर्मात होती, यात आश्चर्य नाही. आमचा पुढचा टप्पा 'गार्डन बाय द बे' हा होता. तिथला फ्लॉवर डोम आम्ही पाहणार होतो. लवकरच तिथं पोचलो. अत्यंत सुरेख अशा त्या महाप्रचंड बागेत आम्ही शिरलो.
खरोखर अगदी अप्रतिम अशी फुलं, झाडं तिथं होती. खाली जमिनीतून पाणी खेळवलं होतं. वरती डोम होता. त्यामुळं एसीसारखं गार वातावरण होतं. फोटो काढायला अगदी उत्तम स्पॉट... भरपूर फोटो काढले. मला फुला-पानांतलं फार काही कळत नाही. पण पाहायला आवडतात. त्याहीपेक्षा ही सुंदर फुलं पाहून हरखून जाणारी, वेडी होणारी जपानी माणसं पाहायला मला मज्जा येत होती. अक्षरशः लोकरीच्या गुंड्यासारखी त्यांची ती गुबगुबीत मुलं, त्यांना त्या छोट्या ट्रॉलीमध्ये घालून फिरवणाऱ्या त्यांच्या आया... बरं, या बायकांच्या चेहऱ्यावरून त्यांची वयं अजिबात कळत नाहीत. कॉलेजवयीन मुलगी म्हणावे, तर दुसरी एखादी कॉलेजवयीन मुलगी येऊन तिला ममा म्हणून हाक मारायची... एकजात संतूर गर्ल सगळ्या! पुलंनी खूप पूर्वी अमेरिकन म्हाताऱ्या कशा जगप्रवासाला निघतात, याचं वर्णन केलं होतं. इथंही आम्हाला त्या दिसल्याच. फरक एवढाच होता, की आता त्या सहकुटुंब होत्या. त्यांचे म्हातारेही त्यांच्यासोबत होते. 'फ्लॉवर डोम'मध्ये सगळ्यांत जास्त काय फुलले होते, तर ते माणसांचे चेहरे! आणि आपल्या कुटुंबासोबत, प्रियजनांसोबत हसऱ्या चेहऱ्यानं आनंद लुटणारी माणसं पाहणं यासारखा स्ट्रेसबस्टर नाही. आमच्याही चेहऱ्यावर ती खुशी आपोआप उतरली होती. पौषातल्या पहाटे पानांवर हलकेच दव येऊन उतरावं तशी!
फ्लॉवर डोमनंतर बाहेर सगळ्या ग्रुपचं फोटोसेशन झालं. आता आम्ही सिंगापूर फ्लायरजवळ जेवायला जाणार होतो. सिंगापूर फ्लायर म्हणजे 'लंडन आय'च्या धर्तीवर बांधलेलं मोठं जायंट व्हील! यातल्या एका खोलीएवढ्या मोठ्या आकाराच्या केबिनमध्ये बसून त्या जायंट व्हीलमध्ये फिरण्याचा आनंद लुटता येतो. आमच्या टूर प्रोग्राममध्ये या फ्लायरचा समावेश नव्हता. पण बसमधल्या सर्व उत्साही मंडळींनी स्वखर्चानं फ्लायरची राइड घ्यायची ठरवलं. आम्हाला काय करावं ते कळेना. तिकीट ३३ डॉलर मोठ्यांना व २२ डॉलर लहान मुलांना, म्हणजे तसं बऱ्यापैकी होतं. शेवटी फक्त मुलांना पाठवावं, असा विचार केला. पण आमची पोरं एकटी जाईनात. शेवटी 'होऊ दे खर्च' म्हणत सगळ्यांनीच जायचं ठरवलं. आणि अर्ध्या तासानं या निर्णयाचं सार्थक झालं, असंच वाटलं. सिंगापूर फ्लायर म्हणजे 'आज मैं उपर... आसमाँ नीचे' असा शब्दशः अनुभव देणारी स्वप्नवत राइड! वास्तविक मी लहानपणी पाळण्यांमध्ये पुष्कळ बसलो आहे. पण १६५ मीटर, म्हणजे जवळपास ५० मजली इमारतीएवढ्या उंच जाणाऱ्या पाळण्यात बसायची माझी ही पहिलीच वेळ होती. पण ती केबिन आणि तिथली एकूण सुरक्षितता पाहून जी काही थोडी फार अँग्झायटी होती, तीही गेली. मला एकूणच उंचीची भीती वाटत नाही. (पण पाण्याची वाटते!)
पुढचा अर्धा तास आम्ही सहा जण त्या एका केबिनमध्ये अक्षरशः धमाल केली. हे फ्लायर अगदी हळूहळू फिरतं. लांबून पाहिलं, तर ते बंदच आहे, असं वाटतं. पण त्याच्या या मंदगती फिरण्यामुळं अजिबात भीती वाटत नाही, हे खरं. शिवाय राइड अर्धा तास म्हणजे बऱ्यापैकी चालते. सिंगापूर बिझनेस डिस्ट्रिक्ट, सिंगापूर पोर्ट, सिंगापूर रिव्हर आणि त्यामागची खाडी असा बराच मोठा नजारा इथून दिसतो. शहराची स्वच्छता, फ्लायओव्हर्सचं जाळं, नीटनीटक्या पार्क केलेल्या बसगाड्या, कार, रस्त्यानं चालणारी व वरून अगदी चिमुकली दिसणारी माणसं हे सगळं पाहून परमसंतोष जाहला.
या राइडनंतर त्याच कॉम्प्लेसमध्ये असलेल्या 'भंडारी इन' नावाच्या हॉटेलमध्ये आमचं जेवण झालं. जेवणानंतर आम्हाला केबल कारनं सेंटोसा आयलंडमध्ये जायचं होतं. (हो, हे तेच सेंटोसा, जिथल्या हॉटेलमध्ये काल किम जोंग व ट्रम्प भेटले!) बस लवकरच एका छोट्याशा घाटरस्त्यानं एका डोंगराच्या माथ्यावर गेली. या डोंगरापासून पलीकडं आयलंडपर्यंत केबल कार होती. मध्ये नदी व खाडीचं मुख होतं. नुकतंच फ्लायरमध्ये बसून आल्यामुळं केबल कारमध्ये बसून जाताना फार विशेष काही वाटलं नाही. पण नदीवरून जाताना खालचे क्रूझ, धक्का, लांबून जाणारी मोनोरेल, युनिव्हर्सल स्टुडिओ (इथं आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो), समुद्र-मत्स्यालय, फ्लायओव्हर हे सगळं छान दिसत होतं. पंधरा मिनिटांत आम्ही सेंटोसा स्टेशनवर पोचलो. इथं आम्हाला मादाम तुस्साँ म्युझियम व 'इमेजेस ऑफ सिंगापूर' हे सिंगापूरचा इतिहास सांगणारं प्रदर्शन पाहायचं होतं. मला आणि साईनाथला इतिहासात रस असल्यानं आम्ही तिकडची रांग धरली. मात्र, तिथं बराच वेळ जाऊ लागला. आम्हाला एक-दीड तासात दोन्ही संपवून बाहेर यायचं होतं. मग शेवटी ती रांग व तो कार्यक्रम सोडून आम्ही मादाम तुस्साँ प्रदर्शनाकडं वळलो. इथं आधी एक बोटीची छोटी राइड असते. मादाम तुस्साँ प्रदर्शनात प्रत्येक ठिकाणी असं काही तरी एक असतंच, असं साईनाथनं सांगितलं. ती उगाचच झालेली दीड मिनिटांची बोट राइड संपवून आम्ही मुख्य प्रदर्शनाकडं वळलो. या मादाम तुस्साँ बाईंच्या मेणाच्या प्रदर्शनाविषयी मी प्रथम वाचलं ते 'अपूर्वाई'त... त्यानंतर सिंगापूरमध्ये हे प्रदर्शन पाहण्याचा योग आला. पुतळे करण्याचं या लोकांचं कसब वादातीतच आहे. प्रत्येक पुतळ्याभोवती फोटो काढून घ्यायला ही गर्दी जमत होती. आम्हीही तेच केलं. पण माझं या पुतळ्यांविषयी एक निरीक्षण आहे. आपल्याला बाकीचे पुतळे आवडतात; पण आपल्या देशातल्या लोकांचे पुतळे फारसे पटत नाहीत. या सिंगापूरच्या प्रदर्शनातही गांधीजी होते, मोदी होते... याखेरीज 'आयफा'चा एक वेगळा विभागच होता. त्यात अमिताभ, रणबीर, काजोल, माधुरी, शाहरुख असे अनेकांचे पुतळे होते. पण यापैकी शाहरुख व थोडाफार रणबीर वगळला, तर इतर पुतळे फारसे आवडले नाहीत. माधुरी तर अजिबात जमली नव्हती. बाकी माझ्या आवडत्या ऑड्री हेपबर्नसोबत माझा एक झक्कास फोटो साईनं काढला आणि सगळे पैसे वसूल झाले...!
हे प्रदर्शन बघून झाल्यावर मग चहा-कॉफी ब्रेक होता. उकाडा असला, तरी कॉफी घेऊन बरं वाटलं. इथंच त्या डॅडा मर्लायनचा भव्य पुतळा होता. पण हा पुतळा पांढराशुभ्र नव्हता, तर खऱ्या सिंहासारखा मातकट, पिवळट रंगाचा होता. इथून मोनोरेलनं एक स्टेशन पुढं जायचं होतं. आमच्या तिकिटातच ही राइड असल्यानं त्यासाठी वेगळं तिकीट काढावं लागलं नाही. पुढच्या स्टेशनवर उतरून आम्ही 'विंग्ज ऑफ टाइम' हा साउंड अँड लाइट अँड वॉटर अँड लेझर शो बघायला गेलो. खूप गर्दी होती. पण पुरेसे बाक होते. त्यामुळं सगळ्यांना नीट बसता आलं. अंधार पडू लागला, तसे त्या बीचवरचे दिवे उजळू लागले. समोर आकाशात केशरिया रंगाची मनसोक्त उधळण झाली होती. विमानं इकडून तिकडं जात होती. दूरवर त्यांचे दिवे लुकलुकत होते. थंडगार वारं वाहू लागलं होतं. समोर लाकडाचे साधारण दहा बाय दहा फूट आकाराचे पाच-सहा चौकोन, पंचकोन एका मोठ्या लाकडी प्लॅटफॉर्मवर तिरप्या आकारात ठेवले होते. त्यावरच हा सगळा खेळ रंगणार होता. अंधार झाला आणि हा सुंदर शो सुरू झाला. समोर एक मुलगा व मुलगी आले. चालता चालता ती मुलगी एका कातळामागे पडते. मग एकदम लेझरनं तो प्लॅटफॉर्म उजळून निघाला. तिथून एक गरुडासारखा पक्षी आला. त्यानं या दोघांना पंखांवर घेतलं. आता त्यांना काळाचा प्रवास करायचा होता. अशा त्या थीमवर मग पुढं एक उत्कृष्ट नाट्य रंगलं. त्यात ध्वनी, प्रकाश आणि शेवटी दारुकामाचा अफाट वापर करण्यात आला होता. पंधरा मिनिटांनी हे झकास नाटक संपलं... आमचा दिवसही संपला...
बसमधून मग डिनरसाठी 'लिटल इंडिया'त गेलो. जेवून हॉटेल... अत्यंत धावपळीत हा दुसरा दिवस संपला... दमणूक झाली होती. त्यामुळं गादीला पाठ टेकताच झोप आली. पण स्वप्नातही फ्लायर आणि केबल कारमधला तरंगता प्रवास आठवून 'आज मैं उपर' असंच वाटत होतं...

(क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
---

No comments:

Post a Comment