14 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग ४

परिराज्यात...
---------------



बुधवार, ६ जून २०१८

सहलीच्या आजच्या दिवशी फक्त युनिव्हर्सल स्टुडिओजची भेट हा एकच कार्यक्रम होता. याचं कारण तिथं करायला एवढ्या गोष्टी होत्या, की एक दिवसही कमी पडावा. तिथं काय असणार याची साधारण कल्पना होती. उत्तमोत्तम राइड्स, मनोरंजनाचे कार्यक्रम, म्युझिक शो, लाइव्ह शो, प्रदर्शनं, फोर-डी शो, साहसी खेळ असं सारी काही तिथं होतं. कुमारवयीन मुलांसाठी अगदीच उत्तम! एका अर्थानं नील व अर्णव या दोघांनाही इथं खरी मजा येणार होती. सकाळी नेहमीप्रमाणं कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट उरकून आम्ही बरोबर पावणेनऊ वाजता लॉबीत तयार राहिलो. आमच्यासोबत असलेल्या १८ जणांच्या कुटुंबाला कायम उशीर व्हायचा. त्यावरून रोज बसमध्ये विनोद झडायचे. सरिना बस सोडण्याची रोज धमकी द्यायची. अर्थात तिनं तसं एकदाही केलं नाही तो भाग वेगळा. पण बाकी सगळे लोक वेळेत येऊन बसायचे आणि या लोकांमुळं उशीर व्हायचा याची नंतर कटकट व्हायला लागलीच. पण फार काही अनवस्था प्रसंग न ओढवता ट्रिप पुढेही नीट पार पडली. तर ते असो.
आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो, त्या सेंटोसा आयलंडवरच हा युनिव्हर्सल स्टुडिओ उभा होता. पण या वेळी आम्ही केबल कार न घेता, बसनं तिथं गेलो. या वेळी सेंटोसा बेटाचं मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळालं. तिथं पर्यटकांच्या बसगाड्या उभ्या करण्यासाठी अवाढव्य अंडरग्राउंड पार्किंग केलेलं आहे. आतमध्ये व्यवस्थित मार्किंग, दिशादर्शक फलक, चालत जाणाऱ्या पर्यटकांना रस्ते दाखवण्यासाठी मार्गदर्शक, वर येण्यासाठी सरकते जिने अशी अतिशय उत्तम, यूजरफ्रेंडली म्हणतात तशी, व्यवस्था होती. आम्ही वर आलो आणि त्या स्टुडिओजच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन थांबलो. इथं युनिव्हर्सल स्टुडिओजचा तो भव्य गोल फिरत होता. त्याभोवती फोटो काढून घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती. सरिना तिकिटं काढून येईपर्यंत आम्हीही फोटोसेशन करून घेतलं. आल्यावर तिनं सांगितलं, की इथून तुम्ही सगळे आत जा आणि आपापल्या सोयीनं सगळ्या राइड्स व शो पाहा. आता थेट संध्याकाळी पावणेसात वाजता याच जागी पुन्हा सगळे भेटू. दुपारच्या जेवणासाठीची कुपन्स तिनं आमच्या हवाली केली आणि आम्ही आत शिरलो.
मी हैदराबादचा रामोजी फिल्म सिटी स्टुडिओ पूर्वी दोनदा पाहिला असल्यानं मला युनिव्हर्सल स्टुडिओत काय असेल, याची साधारण कल्पना होती. कारण 'रामोजी'ची थीमच मुळात स्टुडिओच्या या मनोरंजननगरीवर बेतलेली आहे. आत प्रवेश करताच आपण परिराज्यात आलो असल्याचाच भास झाला. हॉलिवूडच्या धर्तीवर इथली सगळी रचना होती. तशाच इमारती, फूटपाथ, रस्त्यावरच्या गाड्या, दिव्याचे खांब, कमानी, खिडक्या... सगळं सगळं अगदी कॉपी टु कॉपी. ही एक वेगळीच दुनिया होती. आमचा टूर गाइड कुणाल आम्हाला आधी 'ट्रान्स्फॉर्मर्स'च्या फोर डी शोकडं घेऊन गेला. मात्र, हा शो काही कारणानं लगेच सुरू होणार नव्हता, असं कळलं. मग आम्ही त्या कपबशीच्या आकारातल्या गाड्यांत बसून ढकलाढकलीची राइड असते ती घेतली. ही अगदीच छोट्या मुलांची राइड होती. पण तरी मज्जा आली. समोरच तो मोठ्ठा रोलर कोस्टर होता. आणि त्यावर किंचाळणाऱ्या लोकांच्या दोन राइड्स सुरूच होत्या. आमच्यापैकी एकालाही त्या राइडमध्ये बसण्याची हौस नव्हती. मग आम्ही परत 'ट्रान्स्फॉर्मर्स'कडं आलो. या वेळी प्रवेश सुरू झाला होता. आत आत जात बरेच आत गेलो. तिथं भली मोठी लाइन होती. त्या 'क्यू'मध्ये अंधार होता आणि बारीक निळसर प्रकाश पसरला होता. जपानी स्त्रियांचं सौंदर्य त्या प्रकाशात आणखी खुलून त्या 'निळावंती' झाल्या होत्या. 'गे निळावंती कशाला, झाकीसी काया तुझी' असं म्हणण्याचा प्रश्नच नव्हता; कारण ती फारशी झाकलेली नव्हतीच. त्यांची ती मुलायम कांती आणि तो निळसर प्रकाश यामुळं आपण एखाद्या कसबी शिल्पकारानं घडवलेलं शिल्प पाहत आहोत की काय, असा भास त्यांच्याकडं पाहून होत होता. एका कॉलेजवयीन जपानी सुंदरीकडं माझी नजर अशीच खिळून राहिली होती. तेवढ्यात ती रांग सोडून अचानक पुढं पुढं आमच्याकडं यायला लागली. त्या गौरांगनेला आपल्या मनातलं वाचता येतं की काय, असं वाटेपर्यंत ती 'नमास्ते, नमास्ते' असं म्हणत, तीनतीनदा वाकून तिला पुढं जाऊ देण्याची विनंती करीत होती, हे लक्षात आलं. तिची आठ-दहा वर्षांची मुलगी रांग सोडून अचानक पुढं गेली होती (बहुदा बारच्या खालून वाकून), त्यामुळं तिला तिच्याजवळ जायचं होतं. पुन्हा एकदा या जपानी गौरांगनेनं गोड अपेक्षाभंग केला होता. ती संतूर मॉम होती! असो.
रांग संथगतीनं पुढं सरकत होती. वर भिंतींवर टीव्ही स्क्रीन लावले होते आणि त्यावर 'ट्रान्स्फॉर्मर्स'मधल्या पात्रांचे ते खर्जातल्या आवाजातले घुमारदार संवाद गुंजत होते. एकूण वातावरणात फारच भारलेपण आलं होतं. आता आपल्याला काही तरी अद्भुत बघायला मिळणार, याची लहान मुलांसारखी उत्सुकता मोठ्यांच्याही डोळ्यांत दिसत होती. चिनी-जपान्यांच्या तर ती डोळ्यांतही मावत नव्हती व त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरत होती. अनेक म्हाताऱ्याही उत्सुकतेनं ही राइड घ्यायला रांगेत थांबल्या होत्या. त्यात एक स्वेटर घातलेल्या आपल्या भारतीय काकूही होत्या. (सौथिंडियन असाव्यात.) अखेर तो क्षण आला. आम्ही त्या कारमध्ये बसलो. शेजारून एक कव्हर आलं आणि ती कार अर्धी झाकली गेली. मग थोडा वेळ वेटिंगला थांबली. आमच्या पुढची कार पुढं सरकली तशी आमची कारही त्या गुहेत शिरली. समोर मोठ्ठा स्क्रीन होता... तिथं एकदम 'ट्रान्स्फॉर्मर्स'चे सीन दिसायला लागले. आणि आम्ही एकदम त्या सीनमध्येच शिरलो. पुढची पाच मिनिटं म्हणजे एक अफाट अनुभव होता. आम्ही त्या हॉलिवूडच्या सिनेमात घुसलो होतो. जोरात पळत होतो, खाली जात होतो, एकदम अवकाशात फेकले जात होतो, मोठमोठ्या यंत्रांमध्ये घुसत होतो, इमारतींवर आदळत होतो, रस्त्यांवर आपटत होतो, त्यातले हिरो आम्हाला वाचवत होते आणि आम्ही त्यातल्या व्हिलनच्या मागे लागलो होतो. काय चाललं होतं, काहीच कळत नव्हतं एवढ्या तुफान वेगानं सगळ्या हालचाली होत होत्या. एरवीच्या फोर-डी शोमध्ये आपण जागेवरच असतो. आपली सीट फार तर थोडी फार हलत असते. इथं ही कार या दालनातून त्या दालनात वेगानं फिरत होती. वर-खाली होत होती. त्यामुळं तो व्हर्चुअल अनुभवही अस्सल वाटू लागला होता. अखेर प्रचंड आदळआपट करून ती राइड थांबली, तेव्हा आम्ही हुश्श केलं. पण खरं तर अजिबात भीती वाटली नाही. उलट आम्ही फारच एंजॉय केलं. (दिवस संपला, तेव्हाही आम्हाला सर्वाधिक आवडलेली राइड हीच होती, यावर एकमत झालं.) त्यात थ्रीडी गॉगलमुळं धमाल आली.... एकूणच चाळीस मिनिटं रांगेत थांबल्याचं सार्थक झालं. आम्ही हसत-खिदळतच बाहेर आलो. बाहेरही ट्रान्स्फॉर्मर्सचे सांगाडे समोर उभे करून ठेवले होते. तिथं फोटोसेशन पार पडलं.
यानंतर 'लाइट, कॅमेरा, ॲक्शन' असा एक लाइव्ह शो होता. स्टीव्हन स्पिलबर्गनं तो सादर केला होता. (अर्थात त्याचा व्हिडिओ दाखवत होते.) त्यानंतर प्रत्यक्षात न्यूयॉर्कमध्ये चक्रीवादळ आल्याचं दृश्य तो कसा शूट करील, हे दाखवणारं प्रात्यक्षिक पुढच्या दालनात होतं. एका लाकडी फलाटावर आम्ही उभे होतो. समोर साधारण शंभर बाय सत्तर फूटच्या हॉलमध्ये सगळं नाट्य सुरू होतं. समोरच्या पडद्यावर न्यूयॉर्कची स्कायलाइन दिसत होती. समोर प्रत्यक्षात पाणी होतं. सगळ्यात शेवटी एक प्रचंड मोठी बोट येऊन प्रेक्षकांच्या कठड्याला धडकते, तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले. एकूण हाही शो मस्तच वाटला. नंतर एक 'एल्मो टीव्ही शो' नावाचा म्युझिक शो पाहिला. यात ती कार्टून्स प्रत्यक्षात रंगमंचावर येऊन नाटुकलं सादर करीत होती. सुंदर रंगसंगतीमुळं पाहायला छान वाटत होतं. पण ती पात्रं ओळखीची नसल्यानं थोड्याच वेळात कंटाळा आला. अनेक लोक उठून जायला लागले. मग आम्हीही तेच केलं. मुलांना भुका लागल्या होत्या. मग एका हॉटेलमध्ये नेऊन पोरांना पिझ्झा खायला घातला.
त्यानंतर एक 'मादागास्कर' नावाची राइड केली. ही छान होती. एका प्रचंड मोठ्या जहाजाच्या पोटातून पाण्याचा कालवा काढला होता. सुरुवातीला आपण एका होडीत बसतो आणि त्या जहाजाच्या पोटात पाण्यातूनच शिरतो. आतमध्ये आजूबाजूला सगळी मादागास्करची स्टोरी उलगडत जाते. खऱ्या अर्थानं परिराज्यात आल्याचा अनुभव इथं मिळाला. त्या बोटीतून जाताना समोर एक पाण्याचा धबधबा जोरात पडत होता. आता आपण त्याच्याखालून जाताना सगळे भिजणार, म्हणून आम्ही सावरून बसलो. बॅगा वगैरे खाली टाकल्या. प्रत्यक्षात बोट तिथून जाताना ते पाणी बाजूला सरकतं आणि बोट अलगद मधून जाते. नंतर मग आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. या राइडनंतर एक इजिप्शियन ममीची राइड होती, तिथं गेलो. पण तिथं पुन्हा रोलर कोस्टर आहे असं कळल्यावर तो बेत कॅन्सल केला. तिथं मोठमोठे इजिप्शियन पुतळे होते. तिथं फोटोसेशन झालंच. समोरच ऑॲसिस नावाचं हॉटेल होतं. त्या संपूर्ण युनिव्हर्सल स्टुडिओत याच हॉटेलमध्ये भारतीय जेवण मिळत होतं. आम्ही आमची कुपन्स वापरून तिथं जेवलो. जेवण ठीकठाकच होतं. मात्र, उन्हाची वेळ असल्यानं व आम्ही बऱ्यापैकी दमल्यानं ते जेवणही रुचकर लागलं. इकडं पिकत काही नसल्यामुळं सगळा भाजीपाला मलेशियातून व बाकी धान्यं वगैरे भारतातूनच येतात. त्यामुळं फ्रोझन फूडचं प्रमाण जास्त. जिथं जाऊ तिथं छोले किंवा चना मसाला हीच भाजी असायची. पण एकदा भूक लागल्यावर काय! जेवणं झाल्यावर पुन्हा उत्साह आला फिरायला... मग जुरासिक पार्क आणि 'फार फार अवे' या विभागांत जाऊन तिथल्या राइड घेतल्या. त्यातली श्रेकची राइड मस्त होती. नंतर 'जुरासिक वर्ल्ड' हा लाइव्ह शो बघायला गेलो. तो ठीकठाकच होता. आपल्याकडं गणपतीसमोर देखावे करतात, त्यातला प्रकार वाटत होता. यानंतर आम्हाला कुणालनं 'वॉटरवर्ल्ड' हा स्टंट शो पाहायला सांगितला होता, म्हणून आवर्जून तिकडं गेलो. हा शो मात्र खरोखर भारी होता. यात समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर पाणी उडवण्यात येतं. तिथं ब्लू, ग्रीन व रेड असे झोन केले होते. ज्यांना अंगावर पाणी उडालं तरी चालणार आहे अशा प्रेक्षकांनी सर्वांत समोर ब्लू झोनमध्ये बसायचं. ज्यांना थोडं पाणी उडालं तरी चालणार आहे अशांनी मागं ग्रीन झोनमध्ये, तर ज्यांना अजिबात पाणी उडवून घ्यायचं नाही त्यांनी सर्वांत मागं रेड झोनमध्ये बसायचं, अशी व्यवस्था होती. आम्ही ब्लू झोनच्या अगदी मागं व ग्रीन झोनच्या पहिल्या रांगेत बसलो. सुरुवातीला दोन तरुण आले. सर्कशीतल्या विदूषकांसारख्या गमती करायला त्यांनी सुरुवात केली. मधूनच ते एक बादलीभर पाणी समोरच्या लोकांवर भिरकवायचे. एक जण प्रेक्षकांत येऊन एक लांबलचक पिचकारीसारखी गन घेऊन त्यातनं पाणी उडवायचा. सगळे लोक येऊन बसेपर्यंत हा मजेचा प्रकार चालला. त्यानंतर खरा स्टंट शो सुरू झाला. त्यात पाच-सहा तरुण आणि एक (अर्थातच सुंदर) तरुणी होती. एक हिरो होता, ही हिरॉइन, एक व्हिलन... असा सगळा मसालापटाला शोभेलसा सीन होता. समोर पाण्यात ती स्कूटर चालवत तो हिरो पाण्याचे फवारे प्रेक्षकांवर उडवायचा. समोरच्या मोठ्ठ्या दारातून एक बोट यायची. उंच शिड्या, डेक असा सगळा जामानिमा होता. एकूण पंधरा मिनिटं त्या लोकांनी भरपूर धावाधाव करून लोकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर आम्ही जुरासिक पार्कमधली ॲडव्हेंचर वॉटर राइड घेतली, ती तर फार धमाल होती. एका गोल गोल फिरणाऱ्या चकतीमध्ये बसून जोरदार पाण्याच्या प्रवाहासोबत आपण आदळत, हिंदकाळत जातो. मध्ये ते डायनॉसोर दिसतात, बोगदा लागतो, मग अचानक एकदम ही चकती वर काय जाते, तिथून जोरात खाली फेकली जाते... सगळंच धमाल. या राइडमध्ये आम्ही पुरेपूर भिजलो... पण फारच मजा आली.
अशा अनेक गमतीशीर राइड घेत, काही राइड दोनदोनदा अनुभवत आम्ही या युनिव्हर्सल स्टुडिओची पुरेपूर मजा लुटली. संध्याकाळ झाली, तसं ऊन कमी झालं आणि तिथं वारं वाहू लागल्यावर आणखीनच गार वाटायला लागलं. रामोजीसिटीपेक्षा इथला एरिया कमी असला, तरी मनोरंजनाची साधनं आणि प्रकार सरस होते. अखेर मुख्य रस्त्यावर येऊन भरपूर फोटोशूट केलं आणि पाय रेंगाळत असतानाही बाहेर पडलो. सरिना आमची वाटच पाहत होती. तिनं आम्हाला वास्तव जगात आणलं. बसमधून आम्ही डिनरसाठी 'लिटल इंडिया'कडं निघालो, तरी मन मात्र त्या परिराज्यातच रेंगाळलं होतं...

(क्रमशः) 

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

No comments:

Post a Comment