11 Jun 2018

सिंगापूर डायरी - भाग १

जीवन में एक बार...
-----------------------

रविवार, ३ जून २०१८

खूप लहानपणी रेडिओवर 'जीवन में एक बार आना सिंगापूर' (सिंगापूर, १९६०) हे गाणं लागत असे, तेव्हा त्या गाण्याच्या शैलीमुळं आणि त्यातल्या वेगळ्या पद्धतीच्या (पूर्व आशियाई) संगीतामुळं ते ऐकायला मजा वाटत असे. नंतर चित्रहार, छायागीत या कार्यक्रमांतून ते गाणं प्रत्यक्ष बघितलं, तरी आपण आयुष्यात प्रत्यक्ष कधी सिंगापूरला जाऊ शकू, असं मला वाटलं नव्हतं. परदेशप्रवास हे केवळ स्वप्न आणि स्वप्नच असण्याचा तो काळ होता. सुदैवानं हे स्वप्न साकार होऊ शकतं, अशी परिस्थिती पुढं आयुष्यात आली. एक हौस म्हणून मी २००७ च्या सुरुवातीला पासपोर्ट काढला आणि लगेच सहा महिन्यांनी मला माझ्या तेव्हाच्या ऑफिसतर्फे, म्हणजे 'सकाळ'तर्फे थायलंडला जाण्याची संधीही मिळाली. पाच दिवसांचा तो अपघाती परदेश दौरा माझ्यासाठी अनुभवांची मोठी शिदोरी ठरला. पुढची दहा वर्षे मात्र पासपोर्टला अन्य कुठल्याही देशाच्या व्हिसाची हळद लागली नाही. अखेर २०१७ मध्ये पासपोर्टचं नूतनीकरण करतानाच येत्या वर्षभरात परदेशप्रवास करायचाच, असा निर्धार केला. धनश्री आणि नीलचे पासपोर्टही व्हिसाच्या हळदीविनाच एक्स्पायर झाले होते. शिवाय त्या दोघांनीही एकदाही परदेशप्रवास केला नव्हता. त्यामुळं तर हा निर्धार अगदी दृढ झाला. माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेला माझा आत्येभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली यांना आम्ही जानेवारीत भेटलो असताना एकदा हा विषय निघाला. त्यांनाही परदेशात एक मौजमजेची सफर करायची होती. त्यांच्याबरोबर बरोबर दहा वर्षांपूर्वी आम्ही हैदराबाद-रामोजीसिटीची सहल केली होती. आता सहकुटुंब पहिला परदेशप्रवासही आपण मिळूनच करू या, असं आम्ही ठरवलं. तेव्हा आमची मुलं खूपच लहान होती. आता नील नववीत गेलाय, तर साईनाथचा मुलगा अर्णव सातवीत! त्यामुळं त्यांना मजा येईल, असं ठिकाण आम्ही शोधायचं ठरवलं. हा शोध फारच सोपा होता. सिंगापूर! सर्वानुमते अगदी हेच शहर ठरवण्यात आलं. आमचं बजेट, सुट्टीचा कालावधी आणि मुलांच्या इंटरेस्टची सांगड सिंगापूरमध्ये अगदी अचूक बसत होती. आपलं आपण सहलीला जाण्याऐवजी टूर कंपनीचा पर्याय आम्ही निवडला. याचं कारण हा आमचा पहिलाच प्रवास असणार होता. त्यामुळं थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील; पण कम्फर्ट महत्त्वाचा, असा विचार केला. मग फेब्रुवारीत एका पर्यटन प्रदर्शनाला आम्ही मुद्दाम भेट द्यायला गेलो. तिथं वेगवेगळ्या नामवंत पर्यटन कंपन्यांचे स्टॉल होते. पण 'कॉक्स अँड किंग्ज' या कंपनीनं सादर केलेला प्रवासाचा आराखडा (आयटरनरी) आम्हाला सर्वांत जास्त आवडला. सहलीतला एक दिवस वगळला, तर फार भरगच्च कार्यक्रम नव्हते. विश्रांतीला, वैयक्तिक खरेदीला, सिंगापुरात पोचल्यावर, तसंच निघण्यापूर्वी बराच मोकळा वेळ मिळणार होता. त्यामुळं मग आम्ही फेब्रुवारीतच थोडे पैसे भरून या सहलीचं बुकिंग करून टाकलं. तीन जून ते आठ जून असा हा चार रात्र/पाच दिवसांचा कार्यक्रम होता.
जसजसा प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागला, तसतशी आमची उत्सुकता वाढत होती. विशेषतः नील खूप 'एक्सायटेड' होता. आम्ही प्रवासाची तयारी करायला सुरुवात केली. सगळे पैसे वगैरे भरून झाले. मेच्या अखेरीस कंपनीकडून व्हिसा आणि विमानप्रवासाची तिकिटं मिळाली. सिंगापूर एअरलाइन्स ही जगातली एक सर्वोत्तम प्रवासी वाहतूक कंपनी समजली जाते. आमच्या प्रवास कंपनीनं जाताना आणि येताना आम्हाला याच एअरलाइन्सची तिकिटं दिली होती. ती बघून आम्ही खूश झालो. शिवाय येताना व जातानाचा प्रवास A-380 या एअरबसच्या दुमजली विमानानं होता. ते मी नीलला सांगितल्यावर तर तो भलताच खूश झाला.
'ए ३८०' हे सध्याचं जगातलं सर्वांत मोठं प्रवासी विमान आहे. यामध्ये दोन मजले असतात. वरचा मजला एक्झिक्युटिव्ह, बिझनेस व प्रीमिअम इकॉनॉमी, तर खालचा सगळा इकॉनॉमी, म्हणजे जनता क्लास असतो. आम्ही अर्थातच जनता क्लासमध्ये होतो. (पण हा जनता क्लासही इतर विमानांच्या जनता क्लासपेक्षा भारी असतो, हे नंतर कळणार होतं.)
अखेर सर्व तयारी झाली. व्हिसा व तिकिटं हातात आल्यावर जवळच्या नातेवाइकांना, मित्रांना व ऑफिसमध्ये या प्रवासाची कल्पना दिली. (प्रवासी कंपनीच्या कार्यालयातल्या मुलीनं इन्शुरन्ससाठी नॉमिनी डिटेल्स विचारले, तेव्हा हे लक्षात आलं.) बाकी सगळ्यांसाठी हे सरप्राइज असणार होतं. वास्तविक हल्ली एवढे लोक परदेशात जातात, की त्या प्रवासाचं असं काही कौतुक कुणाला उरलेलं नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारा माझा मित्र तुषार तर निगडी किंवा हिंजवडीला जाऊन यावं तसा लंडनला अप-डाउन करत असतो. तरी प्रत्येकाचा परदेश प्रवासाचा अनुभव हा स्वतंत्र व खास असतो. तसे आम्ही आमचा हा अनुभव घ्यायला सज्ज झालो होतो. जगातल्या फार मोजक्या देशांना किंवा शहरांना आपण आवर्जून भेट द्यावी, असं मला वाटत आलंय. त्यात पहिल्या दहांमध्ये लंडन, पॅरिस, सिडनी, न्यूयॉर्क, सिंगापूर, बर्लिन, टोकियो, शांघाय, मॉस्को व कराची या शहरांचा (याच क्रमानं) समावेश आहे. त्यात पाचव्या क्रमांकाच्या शहराचा नंबर आधी लागला.
रविवारी (३ जून) रात्री ११.४० ची फ्लाइट होती. त्यामुळं दुपारी तीन वाजता पुण्यातून निघण्याचं नियोजन होतं. साईनाथनं त्याच्या घरून ओला कॅब बुक केली. आम्ही साधारणतः साडेतीनला निघालो. खालापूरच्या फूडमॉलला चहा वगैरे घेऊन मुंबईत विमानतळावर पोचायला साडेसात वाजले. तुलनेनं गर्दी कमी असल्यानं लवकर पोचलो. मी अकरा वर्षांपूर्वी याच विमानतळावरून बँकॉकला गेलो होतो. मात्र, त्यानंतर 'जीव्हीके'नं मुंबईच्या विमानतळाचं रूपडं पूर्ण पालटून टाकलं होतं. दिल्लीचं टर्मिनल -३ आणि मुंबईचं हे टी-२ (टर्मिनल - २ - आंतरराष्ट्रीय प्रस्थान) आता जबरदस्त झाले आहेत. मुंबईचा विमानतळ आता जगातल्या उत्तम विमानतळांमध्ये गणला जातो म्हणे. मी काही इतर आंतरराष्ट्रीय विमानतळ खूप बघितलेले नाहीत. पण तरी मुंबईचा नवा विमानतळ आवडलाच. या भव्य विमानतळावर प्रवेश केल्यापासून ते विमानात बसेपर्यंत फार भारी वाटत होतं. सुरुवातीला आमचा तिथला जो जिजो नावाचा काँटॅक्ट पर्सन होता, त्यानं आम्हाला सिंगापूर एअरलाइन्सच्या बोर्डिंग पासच्या लाइनीत उभं केलं आणि तो गेला. या कामासाठी त्याची काहीही गरज नव्हती. हे आमचं आम्हीही केलं असतं. असो. नंतर इमिग्रेशन वगैरे सोपस्कार पार पडून आम्ही डिपार्चर गेटला गेलो. तिथं आमच्या पोरांना भुका लागल्या. मग भारी विमानतळावरील 'भारी'च किमतीचे पदार्थ खाऊन त्यांचा आणि आमचाही जीव शांत केला. तिथल्या काचेतून आमचं एअरक्राफ्ट दिसत होतं... फारच मोठं जंबोजेट होतं ते... विमानतळावरील ही दुनियाच वेगळी. तिथल्या काचेला नाक लावून पलीकडं पार्किंग बेमध्ये सुरू असलेली त्या लोकांची लगबग पाहायला मला आवडतं. सेकंदा-मिनिटांच्या हिशेबानं कामं चाललेली असतात. एकेक गोष्टी 'टिक्' करायच्या असतात. थोडी चूक झाली, की थेट जिवाशीच खेळ. साडेदहा वाजता आमच्या विमानाच्या हवाई सुंदऱ्या यायला लागल्या. पुढच्या अर्ध्या तासातच बोर्डिंग सुरू झालं... सव्वाअकरा वाजता आम्ही त्या महाकाय प्रवासी वाहनात प्रवेश केला... पावणेबाराला इंजिनाची घरघर सुरू झाली.... 'कुर्सी की पेटी' बांधून आम्ही तय्यार झालो.... बरोबर मध्यरात्री बारा वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आमच्या 'एसक्यू ४२३'नं उड्डाण केलं... अरबी समुद्राच्या दिशेनं जाऊन आमच्या सुपरजंबोनं हलकेच डावं वळण घेतलं आणि आम्ही आग्नेय दिशेनं आकाशात हलके हलके वर जाऊन ३८ हजार फुटांवर स्थिरावलो... पुढच्या काही तासांतच आम्ही सव्वाचार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सिंगापूर बेटावर उतरणार होतो...
परिराज्याची स्वप्नील सफर सुरू झाली होती...                                                                      (क्रमशः)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


--------------------------------------

No comments:

Post a Comment