29 Jun 2025

दोन पुस्तकांविषयी...

१. वार्तांच्या झाल्या कथा
------------------------------

मोलाचा सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज

ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी लिहिलेलं ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे रोहन प्रकाशनतर्फे आलेलं नवं पुस्तक म्हणजे एक महत्त्वाचा सामाजिक, सांस्कृतिक दस्तावेज आहे. आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्यातील काहींच्या बातम्या होतात, तर काही काळाच्या उदरात गडप होतात. पत्रकार जेव्हा अशा घटना अनुभवतो, तेव्हा तो त्या घटनांचे वार्तांकन करत असताना एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय असा महत्त्वपूर्ण दस्तावेजच तयार करत असतो. साबडे यांनी ‘सकाळ’सारख्या पुण्यातील आघाडीच्या, प्रथितयश दैनिकात तब्बल ३४ वर्षं काम केलं. हे काम करताना साबडे यांनी अक्षरश: हजारो बातम्या लिहिल्या असतील किंवा संपादित केल्या असतील. प्रत्येक बातमीची काही कथा होत नाही. मात्र, काही बातम्या नक्कीच तशा असतात. त्या केवळ बातमीरूपात राहणं शक्यच नसतं. अशा घटनांचे दीर्घकालीन परिणाम त्या त्या वेळी समाजावर, त्या शहरावर होत असतात. या घटनांची बातमी आणि त्या बातमीमागील घटना यांची साद्यंत गोष्ट साबडे आपल्या त्यांच्या खास शैलीत सांगतात, तेव्हा आपणही त्या काळातील त्या अनुभवाचे रोमांच अनुभवू शकतो. ही साबडे यांच्या अस्सल अनुभवांची आणि ते शब्दबद्ध करणाऱ्या लेखणीची ताकद आहे.
साबडे यांचे हे पुस्तक दोन विभागांत आहे. पहिल्या विभागात पुण्याशी संबंधित बातम्या व त्यांच्या कहाण्या आहेत, तर दुसऱ्या विभागात देश-विदेशांतील महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेण्यात आली आहे. पहिल्या भागाचं शीर्षक ‘अवती-भवती’ असं असून, त्यात रजनीश आश्रमापासून ते जोशी-अभ्यंकर हत्याकांडापर्यंत आणि ‘टेल्को’पासून ते मार्केट यार्डच्या स्थलांतराच्या घटना येतात. या सहा दीर्घ लेखांमध्ये साबडे आपल्याला पुण्यातील सहा महत्त्वाच्या घटनांची सांगोपांग आणि वस्तुनिष्ठ माहिती देतात. दुसऱ्या भागाचं शीर्षक ‘देश-विदेश’ असं असून, त्यात श्रीलंकेपासून ते जेरुसलेमपर्यंत विषय साबडे यांनी हाताळले आहेत. राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांची अतिशय मनोज्ञ अशी व्यक्तिचित्रं त्यांनी या विभागात रेखाटली आहेत. मुळात पत्रकाराची लेखणी असल्यामुळं आपोआपच त्यांच्या लेखनात एक तटस्थपणा, नेमकेपणा आणि माहितीची सत्यता यांचं सुखद दर्शन घडतं. अर्थात ही तटस्थता कोरडी नाही. साबडे यांच्या पत्रकारामधला ‘माणूस’ सदैव जिवंत असतो आणि तो अतिशय संवेदनशीलतेनं या सर्व घटनांकडं पाहतो. त्यामुळं या सर्व कथनाला एक आत्मीय ओलावाही आहे. साबडे यांची शैली रसाळ आहे. वस्तुनिष्ठ तपशिलांचे कोंदण असल्यामुळं हे लेखन वाचताना बौद्धिक आनंद लाभतो.
साबडे केवळ ज्येष्ठ पत्रकार व माध्यमतज्ज्ञ नाहीत, तर लेखक व शिक्षकही आहेत. ‘सकाळ’मधील ३४ वर्षांच्या काळात विविध पदांवर काम करताना साबडे यांनी देश-विदेशांतील अनेक महत्त्वाच्या घटनांचं वार्तांकन केलं. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा सर्व प्रवास साबडे यांनी त्या त्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवला आहे. अवघ्या २७ व्या वर्षी पाकिस्तानला भेट देणारे ते सर्वांत कमी वयातील मराठी पत्रकार असावेत. पुण्यात बातमीदारी करताना साबडे यांचा समाजातील विविध घटकांशी संबंध आला. त्यातून पुण्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी ते जोडले गेले. पुणे श्रमिक पत्रकार संघापासून ते ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’पर्यंत पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संस्थांवर त्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करून, शब्दश: घडवलं आहे. (मीही त्यांचा एक विद्यार्थी आहे.) पत्रकारिता अभ्यासक्रमांत त्यांनी बातमीदारी, संपादन, फीचर रायटिंग असे अनेक विषय विद्यार्थ्यांना शिकवले आहेत. त्यांनी आपल्या शैलीदार भाषेत वृत्तपत्रांतून अनेक विषयांवर पल्लेदार लेख लिहून, वाचकांना आनंद दिला आहे. साबडे यांनी अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या असून, तेथील विविध सेमिनार, परिसंवाद, चर्चासत्रांत सहभाग घेतला आहे.
अलीकडं निवृत्तीनंतर ‘पुण्यभूषण’सारख्या दिवाळी अंकांतून ते पुण्यासंबंधी अतिशय मोलाचं, माहितीपूर्ण व रंजक लेखन करीत आहेत. विशेषत: जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर त्यांनी लिहिलेला सविस्तर, सर्वांगीण लेख वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. अशा लेखांद्वारे एका अर्थाने पुणे शहरासंबंधीचा एक दस्तावेजच त्यांच्या हातून तयार होत आहे. डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या ‘सकाळ स्कूल ऑफ जर्नालिझम’चे साबडे हे एक ‘टॉपर’  विद्यार्थी आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरू नये. वृत्तपत्रीय संकेत, मर्यादा व सभ्यता पाळून त्यांनी केलेलं वस्तुनिष्ठ वार्तांकन वाचकांना संपूर्ण व अचूक माहितीसह नवी दृष्टी प्रदान करतं, असं म्हटल्यास गैर ठरणार नाही. 
‘एका सेनानीचा अंत आणि जिंदा-सुखाशी गाठ’ हा लेख असेल किंवा ‘पुणेरी बावाजी – तुम जियो हजारो साल’ हा पुण्यातील पारशी समाजाविषयीचा लेख असेल; साबडे त्या विषयाची सर्वांगीण माहिती आपल्याला पुरवतात. वाचकाच्या मनात उत्पन्न होऊ शकणाऱ्या सर्व प्रश्नांचं, सर्व शंकांचं उत्तर त्याला लेखात मिळेल, याची पुरेपूर काळजी ते घेताना दिसतात. त्या त्या वेळी प्रत्यक्ष बातमीत लिहिता न आलेले, ज्याला ‘बातमीमागची बातमी’ म्हणतात, तसे – अनेक रंजक तपशीलही ते आपल्या लेखांत खुबीने पेरतात. त्यामुळं एखादी उत्कंठावर्धक मालिका पाहावी तसे आपण या लेखनात गुंतून पडतो. पोलंडमधील छळछावण्यांना भेट दिल्यानंतरच्या आठवणींवर आधारित ‘औशवित्त्झच्या असह्य स्मृती’ या लेखातून लेखकाची संवेदनशील बाजू लख्खपणे दिसते.
रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर यांनी उच्च निर्मिती मूल्यांची परंपरा अबाधित राखून या देखण्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. तब्बल ३१४ पानांच्या या पुस्तकाचं संपादन अनुजा जगताप यांनी केलं असून, मुखपृष्ठ राजू देशपांडे यांचं आहे.
पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात साबडे यांनी अनेकांना न रुचणारं आपलं परखड मतप्रदर्शनही केलं आहे. या ‘कथा’ एकमेकांपासून वेगळ्या असल्या, तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. त्यामुळं चोखंदळ वाचकांना नक्की आवडेल, असं हे पुस्तक आहे, यात शंका नाही.

(पूर्वप्रसिद्धी : रोहन मैफल - रोहन प्रकाशन)

----

२. अप अगेन्स्ट डार्कनेस
-----------------------------

फिटे अंधाराचे जाळे

मध्यंतरी मी सुनंदा अमरापूरकरांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचलं. ते मला अतिशय आवडलं. त्यानंतर मी सुनंदाताईंशी बोललो. एकूणच नगरच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. मी त्या पुस्तकावर इथं ब्लॉगवरही लिहिलंय. त्यानंतर मग साधारण महिन्यापूर्वी त्यांनी मला एक पुस्तक पाठवलं. ‘तुला नक्की आवडेल. वाच...’ असं म्हणाल्या. ते पुस्तक होतं मेधा देशमुख भास्करन यांचं ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’. या इंग्लिश पुस्तकाचा सुनंदाताईंनीच अनुवाद केला आहे. सकाळ प्रकाशनानं तो प्रकाशित केलाय. त्या पुस्तकाचं नाव ‘फिटे अंधाराचे जाळे’ असं अगदी समर्पक आहे. हे पुस्तक नगरमधील प्रसिद्ध स्नेहालय संस्थेचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी यांच्या ‘स्नेहालय’ उभारणीतील संघर्षाची गाथा सांगतं. हा अनुवाद सुनंदाताईंनी करणं अतिशय योग्य होतं, कारण त्यांचंही बरंचसं आयुष्य नगरमध्ये गेलंय. त्यामुळं अनुवादात व्यक्ती, संस्था, परिसर, ठिकाणं यांची नावं अचूक आली आहेत. काही वेळेला त्यांनी मूळ मराठी संभाषण कसं झालं असेल, हे लक्षात घेऊन अगदी अस्सल नगरी भाषाही वापरली आहे. त्यामुळं मला तरी बऱ्याचदा वाटलं, की हे मूळ पुस्तक खरं तर सुनंदाताईंनीच आधी मराठीत लिहायला हवं होतं. इतका तो अनुवाद ‘अनुवाद’ वाटतच नाही.
हे पुस्तक आवडलं याचं दुसरं कारण वैयक्तिक आहे. गिरीश कुलकर्णी यांच्या कुटुंबाशी आम्ही नात्याने जोडले गेलो आहोत. गिरीशची आई म्हणजे आमच्या शोभाकाकू. त्यांंचं माहेर जामखेड. गिरीशचे बाबा दिनूभाऊ कुलकर्णी यांनाही मी वैयक्तिकरीत्या ओळखत होतो. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे नगरमधल्या माझ्या अल्प वास्तव्याच्या काळात माझी गिरीश कुलकर्णींबरोबर एकदाही भेट झाली नाही. अर्थात मी तेव्हा लहान होतो आणि नेमका तोच काळ (१९८८-१९९१) ‘स्नेहालय’च्या प्रारंभीच्या उभारणीचा होता. मी नगरच्या मार्कंडेय विद्यालयात आठवी ते दहावी ही तीन वर्षं शिकलो. आमच्या शाळेच्या समोरच गांधी मैदान होतं आणि एका बाजूला चित्रा टॉकीज. तिच्या शेजारीच नगरची चित्रा गल्ली ही वेश्या वस्ती होती. गिरीश कुलकर्णींचं कार्य याच ठिकाणाहून सुरू झालं. म्हणजे मीही तेव्हा त्याच परिसरात वावरत होतो. अर्थात शाळेतल्या मुलांना त्या गल्लीकडं जायला बंदी असायची. पण गिरीश कुलकर्णी तेव्हा त्याच भागात त्यांच्या कार्याची उभारणी करत होते, हे वाचून मला एकदम आपुलकी वाटली.
गिरीश कुलकर्णी यांनी वेश्यांच्या मुलांसाठी, एड्स झालेल्या वेश्यांसाठी ‘स्नेहालय’च्या माध्यमातून मोठं काम उभं केलं. ज्या काळात या लोकांना जवळही करायला कुणी तयार नसे किंवा सामाजिक बहिष्काराचे ओझे त्यांना सोसावे लागे, त्या काळात गिरीश कुलकर्णी धाडसाने या महिलांजवळ गेले. त्यांचा विश्वास संपादन करताना त्यांना प्रचंड त्रास झाला. पुरुषांकडून त्या महिलांना कधी अशा वागणुकीची अपेक्षाच नव्हती. त्यामुळे त्यांना गिरीश यांच्याविषयीही विश्वास निर्माण व्हायला खूप वेळ लागला. गिरीश यांनी नगरमधलं ‘बिल्वदल’ हे त्यांचं निवासस्थानच अशा महिलांना राहण्यासाठी खुलं केलं. त्यानंतर समाजानेही मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढं केले. अर्थात आपली सामाजिक व्यवस्था, पोलिस यंत्रणा, हितसंबंधी लोक आणि गुंड मंडळी या सर्वांशी लढता लढता गिरीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगी शारीरिक मारही सोसला. मात्र, ते कधीही हिंमत हरले नाहीत. नगरच्या एमआयडीसीमध्ये अक्षरश: ओसाड जागेवर त्यांनी प्रचंड कष्टातून ‘स्नेहालय’चे नंदनवन उभे केले. ही सर्व संघर्षगाथा सुनंदाताईंनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं, असं हे पुस्तक आहे. ‘स्नेहालय’चं काम आता खूप मोठं झालं आहे. जोवर समाजात वेश्या आहेत, एड्ससारखा आजार आहे, त्यांचे प्रश्न आहेत तोवर ‘स्नेहालय’सारख्या संस्थांची गरज कायमच लागणार आहे. गिरीश कुलकर्णींसारखे सामाजिक कार्यकर्ते मात्र क्वचितच तयार होताना दिसतात. हे पुस्तक वाचून आणखी काही ‘गिरीश कुलकर्णी’ तयार झाले तर हा समाज आणखी सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही.

----


------------

26 Jun 2025

‘घायल’विषयी...

‘घायल’ची पस्तिशी…
--------------------------

परवा सहज ‘इन्स्टाग्राम’वर स्क्रोल करत होतो तर ‘घायल’वर सनी देओलची पोस्ट बघायला मिळाली. त्यात त्याने लिहिलं होतं, की आज (२२ जून) ‘घायल’ रिलीज होऊन ३५ वर्षे झाली. ‘घायल’ रिलीज झाला २२ जून १९९० रोजी! बापरे! बघता बघता ३५ वर्षं झाली. अगदी काल-परवा नवा रिलीज झालेला हा सिनेमा बघितल्याचं मला आठवत होतं. अर्थात मी तेव्हा खूप लहान, म्हणजे साडेचौदा-पंधरा वर्षांचा होतो. आज मात्र ‘घायल’ हा एक ‘कल्ट मूव्ही’ (नवा मार्ग तयार करणारा) आहे, असं आपण सहज म्हणू शकतो. कारण ‘घायल’ने त्या वेळेला सिनेमासृष्टीमध्ये एक तुफान आणलं आणि सनी देओलला एक ॲक्शन हिरो म्हणून प्रस्थापित केलं, यात वाद नाही
‘घायल’ प्रदर्शित झाला, त्या वेळची भारताची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थिती आजपेक्षा खूपच वेगळी होती. तेव्हा ‘मंडल’विरोधात आंदोलन सुरू होतं. केंद्रातलं राजीव गांधींचं सरकार जाऊन विश्वनाथ प्रताप सिंहांचं सरकार सत्तेत आलं होतं. तरुणांमध्ये एक अस्वस्थता होती. आणखी एक म्हणजे,  हा १९९१ च्या आधीचा, म्हणजे जागतिकीकरणाच्या आधीचा काळ होता. बरोबर त्याच्या आधी एक वर्ष हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. एका अर्थाने जागतिकीकरणापूर्वीच्या भारताचं दर्शन या सिनेमामध्ये होतं. घायल दिग्दर्शित केला आहे राजकुमार संतोषीने. संतोषी हा एक अफलातून दिग्दर्शक आहे. मी असं वाचलं होतं, की संतोषीने ‘घायल’ची कथा जेव्हा लिहिली त्या वेळेला कमल हसनला हिरो म्हणून घेऊन हा चित्रपट करायचा ठरवलं होतं. आता आपण कल्पनाच करू शकत नाही, की ‘घायल’चा हिरो कमल हसन असता तर काय झालं असतं! अर्थात तसं झालं नाही तो भाग वेगळा. मग संतोषी धर्मेंद्रकडे गेला आणि धर्मेंद्रने हा चित्रपट निर्माण करायचं ठरवलं. त्यानंतरचा पुढचा सगळा इतिहास आहे.
‘घायल’ हे उत्कृष्ट स्टोरीटेलिंगचं उदाहरण आहे. म्हणायला गेलं तर साधा एक ॲक्शनपट. पण त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपण या सिनेमाकडे बघितलं तर ‘घायल’चं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. ‘घायल’ इतक्या वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शकाने एका चौकटीत बसवला आहे, की आता तो बारकाईने बघताना आपण अक्षरशः थक्क होतो. अजय मेहरा नावाच्या मुंबईतल्या तरुणाची ही गोष्ट आहे. गोष्ट अगदी साधी. अजय (सनी) हा एक होतकरू बॉक्सिंगपटू आहे. त्याचं वर्षा (मीनाक्षी शेषाद्री) नावाच्या मुलीवर प्रेम आहे आणि त्याला एक मोठा भाऊ (राज बब्बर) आहे आणि एक अतिशय प्रेमळ अशी वहिनी (मौसमी चटर्जी) आहे. असं छान सुखी कुटुंब आहे. त्यात एकदा बॉक्सिंगच्या ट्रेनिंगला अजयला बेंगलोरला जावं लागतं आणि इकडे त्याचा भाऊ त्याला फोन करतो आणि सांगतो, की मला तुझ्या मदतीची गरज आहे आणि मी खूप अस्वस्थ आहे. अजय फोन ठेवतो आणि लगेच मुंबईला येतो. तिथे आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, की बलवंत राय (अमरीश पुरी) नावाच्या एका बड्या धेंडाकडे आपला भाऊ काम करत होता. मग अन्नू कपूर त्याला ती सगळी स्टोरी सांगतो. सिनेमा आपण बहुतेक सगळ्यांनी बघितला आहे. त्यामुळे पुन्हा इथे पुनरुक्ती करत नाही. पण त्यानंतर सर्व सिस्टीमला ज्या पद्धतीने हा अजय धडका देतो, तो या सिनेमाचा गाभा आहे. मग ते भ्रष्टाचारी पोलिस असतील; घरातला आहे असं दाखवून उलटलेला तो बॅरिस्टर गुप्ता (शफी इनामदार) असेल, बलवंत रायला मदत करणारे राजकारणी असतील! हे सर्व लढे दिग्दर्शकाने बारकाईने दाखवले आहेत. इंटरव्हलनंतर ज्या पद्धतीने अजयचा उद्रेक होतो, तशी ॲक्शन तोवरच्या हिंदी सिनेमात फार क्वचित आपल्याला बघायला मिळाली होती. एक अर्थाने इथे ‘जंजीर’शी तुलना करण्याचा मोह होतो. अमिताभला ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून प्रस्थापित करणारा ‘जंजीर’ आणि सनीला ॲक्शन हिरो म्हणून प्रस्थापित करणारा ‘घायल’ या दोन्ही सिनेमांत बरीच साम्यस्थळं आहेत. आता काळामधला फरक लक्षात घेतला तर त्या वेळेला अमिताभ पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होता आणि ‘घायल’मधला नायक पोलिसांसह सर्व व्यवस्थेला आव्हान देतो. या दोन चित्रपटांमध्ये साधारण १८ वर्षांचा काळ मध्ये गेला होता. भारतामधल्या एकूण सामाजिक व्यवस्थेमधला झालेला ढासळता बदल या सिनेमात अगदी स्पष्ट दिसून येतो.
‘घायल’ हा जागतिकीकरणाच्या आधीचा सिनेमा असल्यामुळे त्यात लँडलाईन फोन, अगदी ती तपकिरी रंगाची रेल्वे वगैरे असं सगळं दिसतं. मुंबईही कमी गर्दीची दिसते. एक वेगळं जग यात दिसतं. अन्नू कपूर सनीला बॉक्सिंग रिंगमध्ये लढवतो आणि तिथं पैसे कमावतो, तेही गमतीशीर आहे. एक मात्र नक्की आहे. ‘घायल’ बघताना आपल्याला एक क्षणही कंटाळा येत नाही. त्या सिनेमाच्या संकलनाचंही (व्ही. एन. मयेकर) हे यश आहे. ‘घायल’ला संगीत बप्पी लहिरींचं आहे. लता मंगेशकर आणि पंकज उधास यांचं एक द्वंद्वंगीत (माहिया) अगदी सुरुवातीला येतं. इतर गाणीही चांगली आहेत. एक आयटम साँगही आहे. बाकी तेव्हा ‘महाभारत’ किती लोकप्रिय होतं, ते यात प्रवीणकुमारला (‘महाभारता’तला भीम) एका दृश्यात आणलंय, त्यावरून सहज लक्षात येतं.
या सिनेमाने सनी देओलला एक ॲक्शन हिरो म्हणून अगदी वरच्या लीगमध्ये प्रस्थापित केलं. सनीची ॲक्शन हे इतर ॲक्शन हिरोंपेक्षा वेगळी आहे. कोर्टातला सीन बघा. बॅरिस्टर गुप्ता सनीवर  अतिशय घाणेरडा आरोप करतो, त्या वेळेला त्याचा जो काही उद्रेक आहे तो बघण्यासारखा आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात खदखदत असलेल्या एका संतापाला, चिडीला सनीने यात वाट करून दिली आहे. या चित्रपटात आणि नंतर जणू याचा सीक्वेला असल्यासारखा असलेला ‘घातक’सारखा सिनेमा असेल किंवा ‘दामिनी’मधला त्याचा वकिलाचा रोल असेल; एका अर्थाने एक अँटिएस्टॅब्लिशमेंट हिरो म्हणून सनीने आपलं निर्विवाद वर्चस्व सिनेमासृष्टीत स्थापन केलं. अर्थात मूळ श्रेय ‘घायल’चंच. सनीने या भूमिकेवर खूप काम केलं होतं म्हणा, किंवा संतोषीनं त्याच्याकडून ती भूमिका काढून घेतली म्हणा. अजय मेहरा म्हणजे सनीच! स्वत: सनीचीही ही अतिशय आवडती भूमिका आहे, यात आश्चर्य नाही.
अमरीश पुरीने यातला बलवंत राय हा व्हिलन इतका जबरदस्त साकारलाय, की क्या बात है! बलवंत राय आजही लक्षात आहे. राज बब्बरनेही भावाची भूमिका चांगली केलीय. बॅरिस्टर गुप्ताच्या पाताळयंत्री पात्राच्या भूमिकेत शफी इनामदार सहजतेने वावरले आहेत.  कुलभूषण खरबंदा पोलिस कमिशनरच्या भूमिकेत आहे. या सिनेमात अजय पोलिस कमिशनरलाच ओलीस धरतो;  तेही त्याच्याच घरात जाऊन, हे जरा अतीच दाखवलं आहे, सूडाची परिसीमा म्हणून आणि सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून त्या वेळेला प्रेक्षकांनी कदाचित ते स्वीकारलं असेल. बाकी यातले अगदी छोटे छोटे रोलही लक्षात आहेत. अजयचे ट्रेनर विजू खोटेचा थोडासा कॉमेडी रोल आहे. बलवंत रायचा सहायक मोहिले (ब्रह्मचारी) हाही लक्षात राहतो. शरद सक्सेना आहे. अन्नू कपूरही लक्षात राहतो. यात अतिशय वेगळा रोल आहे तो ओम पुरीचा. एसीपी डिसूझा म्हणून ओम पुरी सिनेमाच्या उत्तरार्धात येतात. ही भूमिका अतिशय चांगला लिहिलेली आहे. ते सनीला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्या वेळेला सनीचा आणि त्यांचा एक अगदी समोरासमोरचा एक संवाद आहे, तो अतिशय ऐकण्यासारखा आहे. (सलीम-जावेद जोडीची आठवण येते.) किंबहुना यातल्या अनेक संवादांना थिएटरमध्ये अतिशय टाळ्या पडायच्या. तो सिंगल स्क्रीन थिएटरचा जमाना होता. त्यात ‘घायल’ म्हणजे काय विचारू नका! अजय जेव्हा तुरुंगात जातो तिथं मग त्याला तीन मित्र भेटतात. त्यात सुदेश बेरी, शब्बीर खान आणि मितवा नावाचा एक नट आहे. (सिनेमातही त्याचं नाव मितवा असंच आहे.) तेच तिघं मिळून मग अजयला मदत करतात आणि मग तो सगळा सूड पूर्ण करतो.
आज ३५ वर्षांनी ‘घायल’ बघताना असं वाटलं, की आपण किती पुढे आलो! काळ केवढा बदलला! तेव्हा अजयचं कुटुंब एकत्र होतं. तो भाऊ-वहिनीबरोबर राहत होता आणि भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो हे सगळं करतो. आज असं होईल का? न्यूक्लिअर फॅमिली असलेल्या आजच्या काळात हे जरा कठीण वाटतं. सिनेमात सुरुवातीचं जे गाणं आहे ‘सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा,’  हे त्या तात्कालिक कुटुंबव्यवस्थेचं दर्शन घडवतं. ते खूप आनंद देणारं गाणं आहे. एकीकडं सगळं छान चाललेलं असतं आणि मग ते सगळं एका बड्या माणसामुळे कसं बिनसतं याची एक गडद पार्श्वभूमी हे गाणं तयार करतं.
‘घायल’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घायल ‘रि-रन‘लाही खूप चालला. नंतर १९९१, ९२, ९३ या सर्व काळात तो पुन:पुन्हा पडद्यावर येत राहिला. मी डेक्कन टॉकीजला ‘घायल’ अनेकदा बघितला. मॅटिनी शो असायचा आणि त्या शोला आम्ही काही मित्र नेहमी जायचो.
…मध्ये खूप वर्षे गेली आणि परवा अचानक सनी देओलच्या त्या पोस्टमुळे ‘घायल’ची आठवण आली आणि मग मी ‘ॲमेझॉन प्राइम’वर तो परत बघितला. पुन्हा तो बघतानाही मला अजिबात कंटाळा आला नाही. मी सर्वच्या सर्व सिनेमा परत एकदा एंजॉय केला. त्यासाठी राजकुमार संतोषी आणि ‘घायल’च्या सगळ्या टीमला दाद द्यावी लागेल. तेव्हा व्यावसायिकदृष्ट्या सुपरहिट आणि त्याच वेळेला पुढे जाऊन एक ‘कल्ट मूव्ही’ झालेला ‘घायल’  कधीही बघा, कंटाळा येणार नाही. माझा स्वतःचा हा अतिशय आवडता सिनेमा आहे. अशा सिनेमाला ३५  वर्षं झाली, यावर खरोखर विश्वास बसत नाही. आता मी पन्नाशीला आलोय आणि सनी देओल ६७ वर्षांचा झालाय. आजही तो ‘जाट’ नावाचा सिनेमा करतो आणि मी तोही एंजॉय करतो. अर्थात ‘घायल’ तो ‘घायल’च. तो बघण्यासारखी मजा कशातच नाही.


------------