21 Aug 2025

रूपेरी पडद्याचे मानकरी

रूपेरी पडद्याचे मानकरी - - सोहराब मोदी
--------------------------------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी सोहराब मोदी यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

श्रोते हो, नमस्कार...

भारतीय चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत ज्या कलाकारांनी या जगतावर आपला अमीट ठसा उमटवला, त्यात सोहराब मोदी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. मूकपटांच्या काळापासून ते अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत केवळ चित्रपट निर्मितीचा ध्यास घेणारे सोहराब मोदी यांनी आपल्या कारकिर्दीच्या ऐन भरात अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. त्यांची ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली एक महत्त्वाची चित्रपट निर्मिती संस्था ठरली. १९४१ मध्ये आलेला पृथ्वीराज कपूर यांचा ‘सिकंदर’ हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा आणि गाजलेला चित्रपट म्हणावा लागेल. त्यांच्या ‘मिर्झा’ गालिब या १९५४ मध्ये आलेल्या चित्रपटानं तर सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिलं जाणारं राष्ट्रपतीचं सुवर्णकमळही जिंकलं होतं. अभिनेत्री सुरैया हिनं या चित्रपटात गायिलेल्या उत्तमोत्तम गाण्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही प्रभावित केलं होतं. या दोन चित्रपटांखेरीज ‘खून का खून’, ‘पुकार’, ‘पृथ्वी वल्लभ’, ‘झाँसी की रानी’, ‘जेलर’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. सोहराब मोदी यांनी अभिनेता म्हणूनही अनेक चित्रपटांत काम केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील अगदी सुरुवातीच्या काळातील ‘शो-मॅन’ असंच त्यांचं वर्णन करावं लागेल.
श्रोते हो, सोहराब यांचं पूर्ण नाव होतं सोहराब मेरवानजी मोदी. त्यांचा जन्म दोन नोव्हेंबर १८९७ रोजी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांना एकूण १२ मुलं होती. त्यातले सोहराब हे अकरावं अपत्य. सोहराब केवळ तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचे वडील तत्कालीन ब्रिटिश अमदानीतील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. सोहराब यांचं बालपण उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं गेलं. त्यांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला. उत्तर प्रदेशातल्या वास्तव्यामुळं लहानपणीच त्यांना हिंदी आणि उर्दू या भाषांची गोडी लागली. नंतर झालं असं, की शालेय शिक्षण झाल्याबरोबर सोहराब यांनी त्यांच्या प्राचार्यांना ‘मी पुढं कशात करिअर करू?’ असं विचारलं होतं. त्यांच्या प्राचार्यांनी सांगितलं, की तुझा आवाज अतिशय चांगला आहे. त्यामुळे तू एक तर राजकारणात जा किंवा अभिनय क्षेत्रात जा. सोहराब यांनी अर्थात सिनेमात जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी सोहराब यांनी त्यांचे मोठे भाऊ केकी यांच्यासह फिरते चित्रपट प्रदर्शक म्हणून काम सुरू केलं. ग्वाल्हेरच्या टाऊन हॉल इथं हे दोन भाऊ चित्रपट दाखवीत असत. याच काळात सोहराब मोदींना नाटकवेडानं झपाटून टाकलं. हे नाट्यप्रेम पुढं आयुष्यभर कायम राहिलं. आज हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण बघा, वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी आर्यसुबोध थिएटर कंपनी स्थापन केली. भावाबरोबर त्यांनी भारतभर फिरून पारसी रंगभूमीवरचा नट म्हणून चांगलं नाव कमावलं. विशेषत: शेक्सपिअरची नाटकं सादर करण्यात या कंपनीची खासियत होती. सोहराब यांच्यावरही शेक्सपिअरच्या नाटकांचा खूप प्रभाव पडला. नाटकाचा पडदा पडला, तरी प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत असत. या टाळ्यांनी, या कौतुकामुळं सोहराब यांचं नाट्यकलेवरचं प्रेम अधिकच वाढत गेलं. याच काळात काही मूकपटांतही अभिनेता म्हणून त्यांनी नशीब आजमावलं.
श्रोते हो, आपण त्या काळाची कल्पना करा. विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात भारतात एकीकडं ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य लढा जोर धरू लागला होता आणि दुसरीकडं सिनेमाची कला दिवसेंदिवस प्रगती करत होती. तो काळ नाट्यकलेचा सुवर्णकाळ होता. बंगाल, महाराष्ट्र आदी राज्यांत अनेक दिग्गज कलाकार रंगभूमी गाजवत होते. महाराष्ट्रात केशवराव भोसले, बालगंधर्वांमुळं संगीत रंगभूमीही जोरात होती. त्याच जोडीला मूकपटांची निर्मितीही जोरात सुरू झाली होती. मुंबई हे या नव्या चित्रपटकलेची अनभिषिक्त राजधानी ठरली होती. तिकडं उत्तरेत लाहोरलाही चित्रपटसृष्टी आकार घेत होती. या वातावरणात सोहराब मोदींनी देशभर फिरून रंगभूमी गाजवली आणि त्याच जोडीला सिनेमा या तंत्राधिष्ठित आधुनिक कलेनंही त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
रसिक हो, काळ झपाट्यानं पुढं सरकत होता. १९३२ हे वर्ष उजाडलं. ‘आलमआरा’ या चित्रपटाद्वारे भारतात बोलपटांचं युग सुरू झालं. नाही म्हटलं तरी तत्कालीन नाटकांना याचा फटका बसू लागला. महाराष्ट्रासह सर्व देशातच रंगभूमी आणि नाट्यव्यवसाय काहीसा मागे पडू लागला. भारतातील बहुसंख्य जनता बोलपटांच्या प्रभावाने वेडावून गेली. चाणाक्ष सोहराब मोदींनी बदललेल्या काळाची ही पावलं ओळखली. त्यांनी १९३५ मध्ये स्टेज फिल्म कंपनी स्थापन केली. या कंपनीद्वारे तयार करण्यात आलेले पहिले दोन चित्रपट नाटकांवरूनच घेण्यात आले होते. यातील पहिला चित्रपट ‘खून का खून’ शेक्सपिअरची अजरामर शोकांतिका ‘हॅम्लेट’वरून घेण्यात आला होता. मेहदी हसन एहसान यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्यासाठी त्यांनीच लिहिलेल्या ‘हॅम्लेट’च्या उर्दू रूपांतरित नाटकाचा आधार घेण्यात आला होता. त्यानंतर १९३६ मध्ये आलेला ‘सैद-ए-हवस’ हा चित्रपट शेक्सपिअरच्या ‘द लाइफ अँड डेथ ऑफ किंग जॉन’ या नाटकावरून प्रेरित होता. मात्र, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ कोसळले.
खरं म्हणजे एवढ्या अपयशानं कुणीही हाय खाल्ली असती. पण या अपयशानं खचून न जाता सोहराब मोदींनी १९३६ मध्ये ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ या पुढे प्रसिद्धीस पावलेल्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. या बॅनरखाली पुढे भविष्यात अनेक उत्तमोत्तम सिनेमे तयार होणार होते आणि इतिहास घडणार होता. नाटकावरून चित्रपट तयार करण्याचा नाद सोडून सोहराब यांनी आपल्या पुढील चित्रपटांसाठी समकालीन विषयांची निवड केली. सुरुवातीला त्यांना अपयश आलं. इथं श्रोते हो, त्याबाबतचा एक किस्सा नक्की ऐकण्यासारखा आहे. सोहराब यांनी १९३७ मध्ये ‘आत्मा तरंग’ नावाचा चित्रपट काढला होता. तो फ्लॉप झाला. त्यामुळं सोहराब दु:खात होते. एके दिवशी चार व्यक्ती थिएटरमध्ये हा चित्रपट बघून बाहेर पडत असताना त्यांना सोहराब दिसले. त्या चौघांनी यांना विचारलं, की आपणच सोहराब मोदी का? त्यावर सोहराब दु:खी चेहरा करून म्हणाले, ‘होय, मीच तो दुर्दैवी.’ त्यावर त्या चौघांपैकी एक जण सोहराब यांना म्हणाले, की आपण असं का म्हणता? आपण अशाच सामाजिक प्रश्नांवर चित्रपट तयार करीत राहा. एक ना एक दिवस आपल्याला खूप मोठं यश मिळेल. हे ऐकल्यावर सोहराब आनंदित झाले. नंतर त्यांना कळलं, की ते चौघे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. अशा लोकांकडून शाबासकी मिळाल्यामुळं सोहराब यांनी नव्या उत्साहानं पुढील चित्रपट निर्मिती हाती घेतली.
त्यांचा ‘मीठा जहर’ हा १९३८ मध्ये आलेला चित्रपट दारूच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन करणारा होता, तर त्याच वर्षी आलेला ‘तलाक’ हा चित्रपट तत्कालीन समाजातील घटस्फोटांची समस्या मांडणारा होता. १९३९ मध्ये आलेला ‘पुकार’ हा ऐतिहासिक चित्रपट बादशहा जहाँगीरच्या न्यायकाट्याच्या कसोटीच्या दंतकथेवर आधारित होता. यात स्वत: सोहराब यांनी संग्रामसिंह या राजपुताची भूमिका केली होती. यानंतर १०४० मध्ये आलेल्या ‘भरोसा’ या चित्रपटात सोहराब यांनी एका अतिशय धाडसी विषयाला हात घातला होता. एक बहीण व भाऊ अज्ञानातून एकमेकांच्या प्रेमात पडतात, असा तो विषय होता. मजहर खान, चंद्रमोहन आणि सरदार अख्तर यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. ‘फिल्म इंडिया’चे संपादक बाबूराव पटेल एरवी सोहराब यांच्या चित्रपटांना लक्ष्य करीत. मात्र, त्यांनीही ‘भरोसा’चं वर्णन ‘एक चांगला चित्रपट’ असं केलं होतं.
श्रोते हो, अशा पद्धतीनं सोहराब यांची घोडदौड सुरू होती. तोवर त्यांच्या चित्रपटांनी चांगलं यश मिळवलं असलं, तरी सोहराब मोदींना आकर्षण होतं ते ऐतिहासिक विषयांचं. यानंतर आलेली त्यांची पुकार, सिकंदर आणि पृथ्वी वल्लभ ही चित्रत्रयी त्यांच्या इतिहासप्रेमाची साक्ष आहे. यातला पुकार चित्रपट पडद्यावर आला १९३९ मध्ये, ‘सिकंदर’ आला १९४१ मध्ये, तर ‘पृथ्वी वल्लभ’ प्रदर्शित झाला १९४३ मध्ये. यातही सर्वाधिक गाजला तो पृथ्वीराज कपूर यांना सिकंदराच्या भूमिकेत अजरामर करणारा चित्रपट ‘सिकंदर’.
यातला पहिला चित्रपट ‘पुकार’ मुघल बादशहा जहाँगीर याच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाची बरीचशी दृश्यं प्रत्यक्ष राजवाड्यांत, महालांत चित्रित करण्यात आली होती. त्यामुळे त्याची भव्यता प्रेक्षकांना दिपवून गेली. तेव्हाचे प्रसिद्ध स्टार चंद्रमोहन आणि नसीम बानो यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. याच नसीम बानोशी नंतर सोहराब यांनी लग्न केलं.
यानंतर सोहराबची मोदींच्या जीवनातील सर्वांत भव्य, गाजलेला चित्रपट ‘सिकंदर’ आला. यात जगज्जेत्या सिकंदराच्या भूमिकेने पृथ्वीराज कपूर यांना अजरामर केले. स्वत: मोदी यांनी यात पोरस राजाची भूमिका केली होती. सोहराब मोदींनी ‘सिकंदर’च्या निर्मिती खर्चात कोणतीही कसूर ठेवली होती. मोठमोठे सेट्स. श्रीमंती थाट, उत्तम निर्मिती मूल्ये यामुळं ‘सिकंदर’ हा एक भव्य-दिव्य चित्रपट ठरला. यातील युद्धाच्या दृश्यांनी तर या चित्रपटाची तुलना तत्कालीन हॉलिवूडमधील युद्धपटांशी केली गेलो. या चित्रपटाने पृथ्वीराज कपूर आणि मोदी या दोघांनाही ऐतिहासिक यश आणि यशस्वी प्रतिमा मिळवून दिली. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. महात्मा गांधी यांचे असहकार आंदोलन देशभरात जोरात होते. अशा वेळी ‘सिकंदर’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग आणखी चेतवले. ब्रिटिशांच्या तत्कालीन बॉम्बे सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट संमत केला असला, तरी नंतर काही लष्करी कँटोन्मेंटमधील थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यास बंदी घालण्यात आली. असं असलं तरी या चित्रपटाची लोकप्रियता दीर्घकाळ कायम राहिली. गोवा मुक्ती आंदोलनाच्या वेळी, म्हणजे १९६१ मध्ये दिल्लीत हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये लावण्यात आला होता. 

या चित्रत्रयीतला तिसरा चित्रपट म्हणजे ‘पृथ्वी वल्लभ’ हा कन्हैयालाल मुन्शी यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. यात स्वत: सोहराब मोदी नायकाच्या, तर दुर्गा खोटे नायिका राणी मृणावलतीच्या भूमिकेत होत्या. या दोघांच्या अभिनयाच्या जुगलबंदीची तेव्हा चर्चा झाली होती. चित्रपट तयार करत असले तरी मोदी यांचं नाट्यप्रेम या सर्व काळात शाबूत होतं. पारसी थिएटर तगविण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले. चित्रपटरसिकांनीही मोदी यांच्यावर तेवढंच प्रेम केलं.
रसिक हो, याबाबतचा एक किस्सा सांगतात तो आपल्याला इथं सांगायलाच हवा. त्याचं असं झालं, की १९५० मध्ये मोदी यांचा शीशमहल हा चित्रपट मुंबईत मिनर्व्हा थिएटरमध्ये सुरू होता. तेव्हा स्वत: मोदी एका खेळाला थिएटरमध्ये उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पाहिलं, की पहिल्या रांगेत एक माणूस डोळे बंद करून बसला आहे. या माणसाला सिनेमा आवडला नसेल आणि त्यामुळे तो झोपला असेल, असं समजून मोदींना जरा वाईट वाटलं आणि त्यांनी त्या माणसाचे तिकिटाचे पैसे परत करा आणि त्याला थिएटरमधून जाऊ द्या, असं सांगितलं. त्यावर त्यांना सांगण्यात आलं, की तो माणूस अंध आहे. मात्र, केवळ मोदी यांचे संवाद ऐकण्यासाठी तो थिएटरमध्ये येतो. हे ऐकल्यावर मोदींना गहिवरून आलं.
मोदींच्या नावे अनेक विक्रम आहेत. भारतातील पहिला टेक्निकलर चित्रपट 'झांसी की रानी'साठी त्यांनी हॉलिवूडमधून तंत्रज्ञ बोलावले होते. त्यात ‘गॉन विथ द विंड’ या जगप्रसिद्ध चित्रपटाचे कॅमेरामन अर्नेस्ट हॉलर यांचाही समावेश होता. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी व इंग्लिश भाषेत तयार करण्यात आला होता. ‘द टायगर अँड द फ्लेम’ असं इंग्लिश चित्रपटाचं शीर्षक होतं. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या वेळी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलणाऱ्या झाशीच्या तरुण राणीची भूमिका मेहताबने साकारली होती. मोदींनी राणीचे प्रमुख सल्लागार असलेल्या राजगुरूंची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही त्यातल्या भव्य युद्धदृश्यांसाठी वाखाणला गेला. ऐतिहासिक घटनांचं नेमकं व यथार्थ चित्रण, भव्य सेट्स आणि मेहताबच्या अभिनयासाठी हा चित्रपट गाजला. झाशीच्या राजवाड्यातील अनेक प्रसंग उत्कृष्टपणे चित्रित करण्यात आले होते.  त्यासाठी सोहराब यांनी त्यांचे कला दिग्दर्शक रुसी बँकर आणि पंडित दुबे यांना झाशीचा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाठवलं होतं. यातील युद्धाची दृश्यं कोल्हापुरात चित्रित करण्यात आली होती. मोदींना आपल्या पात्रांमधील भावोत्कटतेचे खूप आकर्षण होते. त्यांनी अतिशय मनापासून हा चित्रपट तयार केला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने मोदींना मोठा फटका बसला. त्यामुळं त्यांना ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ ही आपली कंपनी कर्जापायी गहाण ठेवावी लागली होती.
श्रोत हो, असं असलं तरी सोहराब मोदी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. ‘मिर्झा गालिब’ या १९५४ मधल्या चित्रपटातून त्यांनी दणदणीत पुनरागमन केलं. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याच्या कारकिर्दीत होऊन गेलेल्या गालिबवर आधारित या चित्रपटाला १९५४ चे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. ‘मिर्झा गालिब’मध्ये शीर्षक भूमिका भारतभूषणने केली होती. नायिका सुरैया होती. तिच्या गाण्यांमुळेही हा सिनेमा गाजला. ‘आह को चाइहिये एक उमर’, ‘नुक्ताचीन है गम-ए-दिल’, ‘दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है’, ‘ये न थी हमारी किस्मत’ अशी यातली तिची सगळीच गाणी खूप गाजली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनाही हा चित्रपट भावला. सुरय्याने मिर्झा गालिबला जणू जिवंत केल्याचे सांगून नेहरूंनी तिचे कौतुकही केलं होतं. ‘तुमने मिर्झा गालिब की रूह को जिंदा कर दिया,’ असे त्यांचे नेमके शब्द होते.
श्रोते हो, त्या काळात चित्रपट निर्मितीसाठी स्टुडिओची व्यवस्था होती. मुंबईत मोठमोठे स्टुडिओ तेव्हा कार्यरत होते. सोहराब मोदींची कंपनीही अशाच भव्य-दिव्य चित्रपटांसाठी प्रसिद्ध होती. पन्नासच्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार येऊन दाखल होत होते. सर्वांनाच काही ना काही करून दाखवायचं होतं. या कलाकारांच्या डोळ्यांतली स्वप्नं सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर मूर्त होऊन अवतरत होती. प्रेक्षकांना वेगळ्याच स्वप्नसृष्टीत नेत होती. अशाच वेड्या मंडळींपैकी एक ‘सपनों का सौदागर’ होते सोहराब मोदी.
श्रोते हो, काळ झपाट्यानं पुढं चालला होता. १९४७ मध्ये आपला देश इंग्रजांच्या राज्यापासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच सर्व देशात उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण पसरलं होतं. प्रत्येक क्षेत्राला नवनिर्मितीचा ध्यास होता. हिंदी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नव्हती. या काळात सिनेमानिर्मितीचा वेग वाढला. राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद या त्रयीचं राज्य सुरू झालं. स्टुडिओंचं महत्त्व शाबूत असलं, तरी चित्रपटांचे विषय बदलत होते. आता पौराणिक आणि ऐतिहासिक सिनेमांचा काळ जरा मागं पडून, सामाजिक, कौटुंबिक आणि रोमँटिक चित्रपटांना मागणी वाढू लागली. सोहराब मोदीही या काळात आपली कलेवरची निष्ठा कायम टिकवून होते. यानंतर सोहराब यांनी ‘नौशेरवान-ए-आदिल’ हा १९५७ मध्ये आलेला आणि ‘समय बडा बलवान’ हा १९६९ मध्ये आलेला चित्रपट असे काही चित्रपट तयार केले. हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले असले, तरी या चित्रपटांमध्ये मोदींच्या आधीच्या चित्रपटांसारखी जादू नव्हती, असं चित्रपट अभ्यासकांचं मत होतं. त्यातल्या त्यात ‘जेलर’  या १९५८ मध्ये आलेल्या चित्रपटाची चर्चा झाली. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सोहराब यांनी १९३८ मध्ये तयार केलेल्या आपल्याच याच नावाच्या चित्रपटाचा २० वर्षांनी रिमेक केला होता. या चित्रपटात, मोदींनी एका विवेकी माणसाचे रूपांतर अत्याचारी माणसात कसं होतं, याचं प्रत्ययकारी चित्रण केलं होतं. यातील नायकाची भूमिका स्वत: सोहराब यांनीच केली होती. पहिल्या चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका लीला चिटणीस यांनी केली होती, तर २० वर्षांनी आलेल्या दुसऱ्या चित्रपटात कामिनी कौशल यांना नायिकेची भूमिका देण्यात आली होती. नायकाला त्याच्या पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय असतो. या संशय पिशाच्चामुळं एका विवेकी माणसाचं रूपांतर एका ‘राक्षसा’त कसं होतं, हे यात मोदींनी दाखवलं होतं. एका अर्थानं हा सायको-थ्रिलर प्रकारचा सिनेमा होता. १९५८ मध्ये आलेल्या चित्रपटाला मदनमोहन यांचं संगीत होतं. यातलं ‘हम प्यार में जलनेवालों को चैन कहाँ आराम कहाँ’ हे गाणं अतिशय प्रसिद्ध आहे.
त्यांच्या शेवटच्या काही हिट चित्रपटांमध्ये कुंदन (१९५५), राजहट (१९५६) आणि मेरी बिवी मेरे बच्चे (१९६०) यांचा समावेश होता. यातला ‘कुंदन’ हा चित्रपट व्हिक्टर ह्यूगो यांच्या ‘ला मिझराबल’ या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित होता. पं. सुदर्शन यांनी या चित्रपटाचं लेखन केलं होतं. यातील ‘कुंदन’ ही शीर्षक भूमिका स्वत: सोहराब यांनी साकारली होती.
प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती बंद केल्यानंतरही, सोहराब मोदींनी चित्रपट बनवण्याचा विचार कधीच सोडला नाही. १९८२ मध्ये, जेव्हा ते ८५ वर्षांचे होते) आणि त्यांना अगदी हालचाल करणेही कठीण होते, तरीही त्यांनी ‘गुरुदक्षिणा’ नामक चित्रपटाचा मुहूर्त केला होता. त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, लोकांनी चित्रपटाच्या त्यांच्या वेडाचा गैरफायदा घेतला. अनेकांना त्यांनी आगाऊ पैसे दिले आणि ते कधीही वसूल झाले नाहीत. यात त्यांना खूप पैसे गमवावे लागले. ‘गुरुदक्षिणा’ चित्रपटाच्या 'मुहूर्ता'नंतर दोनच दिवसांनी सोहराब मोदी आजारी पडले आणि नंतर कधीच बरे झाले नाहीत. त्यांना कर्करोगानं ग्रासलं आणि त्यातच मुंबईत २८ जानेवारी १९८४ रोजी त्यांचं निधन झालं. पुढे १९८६ मध्ये त्यांच्या पत्नीने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, की सोहराबला फक्त चित्रपट निर्मितीचं वेड होतं आणि खरं तर त्यांना इतर कोणत्याही गोष्टीत रस नव्हता. अंगात अतिशय ताप असतानाही सोहराब चित्रपटाचं शूटिंग करत असत आणि अजिबात सुट्टी घेत नसत.
सोहराब यांचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या टिपिकल सिनेमा नटासारखंच होतं. नसीम बानोसोबतचं नातं संपल्यानंतर सोहराब मोदींनी त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री मेहताबशी २८ एप्रिल १९४६ रोजी तिच्या वाढदिवशी लग्न केलं. सोहराब त्या वेळी ४८ वर्षांचे होते. मेहताब यांचा जन्म गुजरातमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला आणि त्यांनी सोहराब दिग्दर्शित 'परख' (१९४४) या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. सोहराब यांच्या मोठ्या भावानं त्यांना श्री रामकृष्ण परमहंसांबद्दल माहिती दिली. याशिवाय माता श्री शारदादेवींचेही मार्गदर्शन ते घेत असत. त्यांनी सोहराब यांना त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात कलकत्त्यातील उद्बोधन इथं दीक्षा दिली होती.
रसिक हो, सोहराब मोदी स्वभावानं दिलदार होते. ‘मुघले आझम’बाबतचा त्यांचा एक किस्सा याची साक्ष देतो. ‘मुघले आझम’च्या निर्मितीतील विलंबामुळं या चित्रपटाला वित्तपुरवठा करणाऱ्या शापूरजी पालनजी या कंपनीने चित्रपटाचं दिग्दर्शन सोहराब मोदी यांच्याकडं देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कंपनीच्या ड्रायव्हरने सोहराब यांना के. असीफ यांच्या या चित्रपटाच्या अफाट वेडाविषयी व दातृत्वाविषयी सांगितलं. ते ऐकल्यावर सोहराब यांना वाटलं, की नाही. या सिनेमाचं दिग्दर्शन आपण नाही, तर के. असीफनंच केलं पाहिजे. त्यांनी नंतर ‘शापूरजी पालनजी’ला हे पटवून दिलं आणि ‘मुघले आझम’च्या दिग्दर्शनाची सूत्रं असीफकडंच राहिली. पुढं त्या चित्रपटानं काय इतिहास घडवला हे आपल्याला माहिती आहेच.
अशा या सिनेमाचे सच्चे प्रेमी असलेल्या दिलदार सोहराब मोदींना १९८० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ते या पुरस्काराचे दहावे मानकरी होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय चित्रपटसृष्टीनं जे ‘शोमॅन’ बघितले, त्यातल्या या बिनीच्या शिलेदाराला अभिवादन...!

---

(आकाशवाणीवर प्रसारित झालेला, निवेदक प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेला भाग आता यूट्यूबवर ऐका.)

हा भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

---

सोहराब मोदी यांच्या ‘जेलर’ चित्रपटातील एक लोकप्रिय गीत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...


---------

13 Jul 2025

फुलपाखरू - प्रस्तावना व परीक्षण

फुलपाखरू प्रस्तावना व परीक्षण
------------------------------------------------------

माझं ‘फुलपाखरू’ हे कुमारकथांचं पुस्तक मे महिन्यात प्रकाशित झालं. या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका विभावरी देशपांडे हिनं प्रस्तावना लिहिली आहे. ही प्रस्तावना आणि सोबत या पुस्तकाचं साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका-कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी ‘मटा’साठी केलेलं परीक्षण...

----

मुलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन

विभावरी देशपांडे

‘करील मनोरंजन जो मुलांचे जडेल प्रभूशी नाते तयाचे’ ही सानेगुरुजींची उक्ती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आपण त्या दर्जेदार, मूल्याधिष्ठित साहित्यावर वाढलोही आहोत. पण आजही बालसाहित्याला, बालनाट्याला आणि बालचित्रपटांना मुख्य प्रवाहात महत्वाचं स्थान मिळत नाही. तरीही त्या निर्मितीतून मिळणारा  निखळ आनंद आणि बालप्रेक्षकांचं, बालवाचंकांचं भरभरून मिळालेलं प्रेम माझ्यासारख्या मुलांसाठी काम करणाऱ्यांना हवंहवंसं वाटतं.
लहान मुलांसाठी लिहिताना आपल्या आतलं मूल जागं करावं लागतं. लहान मुलाचा निरागसपणा, प्रचंड कुतूहल, निस्सीम प्रेम करण्याची क्षमता, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे बघण्याची वृत्ती  ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याच आत जाऊन  शोधाव्या लागतात. लहान मुलांच्या  नजरेतून जगाकडे बघावं लागतं. नाहीतर आपलं लिखाण अप्रामाणिक आणि उपरं वाटू लागतं. श्रीपादच्या कथांमध्ये मला जाणवलेली आणि भावलेली ही एक महत्वाची गोष्ट आहे. श्रीपादच्या स्वभावातच त्यानी त्याच्या आत जपून ठेवलेलं एक मूल आहे. माणूस म्हणून त्याच्यात  असलेला उत्साह, प्रेम करण्याची, माणसं जोडण्याची वृत्ती त्याच्या ह्या कुमारकथांमध्ये तंतोतंत उतरली आहे.
ह्या कथांची भाषा साधी आणि ओघवती आहे. मुलांचं जग काही आपल्या जगापेक्षा वेगळं नसतं. आपल्याच भवतालात ती जगत असतात. फक्त त्यांचा दृष्टीकोन, निरीक्षण आणि जाणिवा वेगळ्या असतात. श्रीपादनी नेमकं हेच अचूक पकडलं आहे. त्याच्या कथांमधली मुलं ह्याच जगातली आहेत. त्यांचा भवताल हाच आहे. पण त्यात ती काय पाहतात, काय अनुभवात आणि त्यातून त्यांचा भावनिक, मानसिक प्रवास काय होतो हे ह्या कथा आपल्यासमोर हळूच उलगडतात. मग पौगंडावस्थेतल्या मुलीला जाणवणारा एकटेपणा, त्यातून तिची एका कृत्रिम यंत्राशी झालेली तात्पुरती मैत्री आणि त्यातली भावनाशून्यता जाणवल्यावर परत माणसांच्या जगापर्यंत तिचा झालेला प्रवास ही कथा असो किंवा लहान गावातल्या, सामान्य परिस्थितील्या एका मुलाच्या आयुष्यात एक दिवस काहीतरी अद्भुत घडल्याची कथा असो, ह्या कथांनी कुमार वयातल्या मुलामुलींचं संवेदनशील मन खूप छान पकडलं आहे. त्यात विषयांचं, सामाजिक, भौगोलिक वास्तवाचं वैविध्य आहे. आणि मुख्य म्हणजे मुलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन आहे.
कथा लांबलचक नाहीत. मोजक्या शब्दांत एक संपूर्ण अनुभव देणाऱ्या आहेत. त्यात केंद्रस्थानी कुमार वयातली मुलं आहेत. घटना, प्रसंग प्रौढांच्या जगातले असले तरी ती फक्त पार्श्वभूमीच राहते. कथा घडते ती मुलांच्या तात्कालिक भावविश्वातच. तरीही ह्या कथा मोठ्यांसाठीही रंजक होतात कारण मुलांचा दृष्टिकोन आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातो.
आजच्या काळात पुढची पिढी मराठी भाषेपासून दूर जात असताना मुलांसाठी मराठीत उत्तम साहित्य निर्माण होणं, त्याची भाषा सुयोग्य आणि सुंदर असणं ही अपरिहार्यता   आहे. श्रीपादसारख्या अचूक आणि उत्तम मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लेखकांनी अशी साहित्यनिर्मिती करणं म्हणजे भाषा टिकवण्यासाठी उचललेले उत्तम पाऊल आहे असं मला वाटतं.
श्रीपादनी मुलांसाठी अधिकाधिक लिहीत राहावं. तो ते करीलच. माझ्याकडून ह्या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा.

-----------

फुलपाखरू परीक्षण
-------------------------

मुलांच्या मनात शिरून लिहिलेल्या कथा

डॉ. संगीता बर्वे

मोठी माणसं जेव्हा जेव्हा आपलं बालपण आठवतात तेव्हा ते त्यात रमून जातात. मग ते म्हणू लागतात, किती छान होतं ना आपलं बालपण... अगदी फुलपाखरासारखं!
आता मात्र अगदी उलट झालंय. माणसं मोठी झाल्यावर त्यांचा सुरवंट होत जातो आणि ती आपापल्या कोशात जातात. त्यांना अनेक कंगोरे फुटतात. जगण्यातले अनेक काटे त्यांच्या आणि दुसऱ्यांच्या अंगाला टोचू लागतात. मग मोठी माणसं म्हणू लागतात की रम्य ते बालपण... ते बालपण आपल्याला परत मिळाले पाहिजे.
खऱ्या खऱ्या फुलपाखराचं मात्र माणसापेक्षा वेगळं असतं… ते आधी सुरवंट असतं आणि नंतर त्याचं रूपांतर रंगीत फुलपाखरात होतं. मोठ्या माणसांची काही वेळा गडबड होऊन जाते. आधीचं फुलपाखरासारखं जगणं नंतर सुरवंटासारखं काटेरी होऊन जातं.
श्रीपाद ब्रह्मे यांनी मात्र आपलं बालपण अजूनही तसंच छान जपलं आहे. मुलांसाठी त्यांनी छान छान गोष्टी लिहिल्या आहेत. आणि बुकगंगा पब्लिकेशन्सनं सुबकपणे पुस्तकरूपात त्या मुलांपर्यंत पोहोचवल्याही आहेत. मुलांसाठी कुमारकथा लिहिणारे लेखक हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच असावेत.  श्रीपाद ब्रह्मे यांनी 'फुलपाखरू' या कथासंग्रहामध्ये ‘सुरवंटाचे फुलपाखरू होतानाच्या कुमारकथा’ लिहून ही उणीव भरून काढली आहे.
‘लहान मुलांसाठी लिहिताना आपल्या आतलं मूल जागं करावं लागतं. लहान मुलांचा निरागसपणा, प्रचंड कुतूहल, निस्सीम प्रेम करण्याची क्षमता, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे बघण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याच आत जाऊन शोधाव्या लागतात; नाही तर आपलं लिखाण अप्रामाणिक आणि उपरं वाटू लागतं,’ असं अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे यांनी ‘फुलपाखरू’च्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. ते किती यथार्थ आहे हे ब्रह्मे यांच्या कुमारकथा वाचताना जाणवतं.
ब्रह्मे यांनी अतिशय विचारपूर्वक मुलांच्या मनात शिरून लिहिलेल्या या कथा आहेत. रायगड येथे सहलीला गेलेली सायली फुलपाखराच्या मागे धावता धावता रस्ता चुकते आणि मैत्रिणी पुढे गेल्यानंतर मनातून जरा घाबरते. मात्र, हळूहळू स्वतःला सावरत मनाशी म्हणते, की  जास्तीत जास्त काय होईल? आपल्याला न घेता तर हे लोक नक्कीच जाणार नाहीत. त्यांना कळलंही असेल की मी हरवलेय म्हणून… फुलपाखराच्या नादापायी आपण रस्ता चुकलो म्हणून…  तिला फुलपाखराचा खूप राग येतो. मात्र, ते किती मस्त उडतंय, तसं छान आपल्याला जगता यायला हवं असं तिला वाटून जातं. ती हळूच फुलपाखराजवळ जाते. फुलपाखरू पुढं आणि सायली मागं असं करता करता पाण्याचा आवाज येऊ लागतो आणि ती रेंजमध्ये आल्यामुळे तिचा मोबाइल खणखणतो. सायलीला रस्ता सापडतो.
'अपना टाईम आयेगा 'ही तर फारच भन्नाट गोष्ट आहे. डिजिटल घड्याळ हवं असणाऱ्या रघूला चक्क विराट कोहलीकडूनच अशा घड्याळाची भेट मिळते. कशी ते तुम्हाला गोष्टीतूनच वाचावं लागेल. गोष्टी वाचता वाचताच आपण गोष्टींच्या जंगलात कधी शिरतो हे कळतच नाही.
‘एक होतं जंगल. जंगलात काहीच नव्हतं मंगल. झाडे दु:खी, प्राणी दुःखी, नदी दुःखी, नद्यांमधले मासेही दुःखी... का बर बाबा असं?’ असा प्रश्न मुलांना नक्की पडेल आणि उत्सुकतेने ते पुढे वाचतील तर जंगलामधले प्राणी का दुःखी आहेत, याचे कारण कळल्यानंतर त्यांच्या मनात सुरू होणाऱ्या विचारांचं अत्यंत प्रभावी चित्रण ‘सेल्फी, सेल्फी सेल्फिश’ या कथेमध्ये लेखकाने रेखाटले आहे.
समुद्रदेवतेच्या वेशात दिसलेली सुशी, राधाच्या रेंजमध्ये आलेले आई-बाबा, गाड्यांचे नंबर पाठ करणारा डोंगरवाडीचा रघू... रघूच्या तर सगळ्याच करामती कुमार वाचकांना नक्की आवडतील; कारण लेखकाने खरोखरच मुलांच्या मनाचा विचार करून, मुलांच्या मनात शिरून त्यांच्या मनात काय चालले असावे याचा अभ्यास करून या गोष्टी लिहिल्या आहेत. तेव्हा छोट्या मित्रांनो , श्रीपाद ब्रह्मे यांचा ‘फुलपाखरू' हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीरूपात आणण्याचा प्रयत्न करा असे जाता जाता सहज म्हणून सांगावेसे वाटते.

 …

फुलपाखरू
लेखक : श्रीपाद ब्रह्मे
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पृष्ठे : ११४, किंमत : १५० रुपये


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, १३ जुलै २०२५)

---

हे पुस्तक विकत घ्यायचे असल्यास इथे क्लिक करा...

----

11 Jul 2025

‘मेट्रो... इन दिनों’विषयी...

महानगरांतले ‘महासागर’
------------------------------


टायटॅनिक चित्रपटातला एक संवाद मला फार आवडतो. रोझ म्हणते - ए वुमन्स हार्ट इज ॲन ओशन ऑफ सिक्रेट्स... किती खरं आहे ते! मला वाटतं, केवळ स्त्रीच का, आपल्या सर्वांचीच हृदयं म्हणजे गुपितांचे महासागर असतात. अनुराग बासूच्या ‘मेट्रो... इन दिनों’मधली सगळी पात्रंही अशीच. हृदयात कसल्या कसल्या गुपितांचे - रागाचे, द्वेषाचे, तिरस्काराचे, व्यक्त न केलेल्या भावनांचे, अलोट प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आतल्या आत कुढण्याचे - महासागर बाळगणारी. हा सिनेमा बघण्याचं एक खास कारण होतं. याच दिग्दर्शकानं २००७ मध्ये आणलेल्या ‘ए लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटानं तेव्हाच्या जाणिवांना चांगलाच हादरा दिला होता. आपला भवताल बदलतो आहे यात फार धक्कादायक नव्हतं; मात्र आपणही बदलतोय, आपल्या धारणाही बदलताहेत हे जाणवून जास्त हादरा बसला होता. आता १८ वर्षांनी त्या सिनेमाचा - कथानक म्हणून नव्हे; तर कथनाचा आत्मा म्हणून - जणू सीक्वेल असलेला हा सिनेमा कसा झाला असेल, हे पाहण्याची उत्सुकता होती. महानगरी जगण्यात आपण आपल्या भावभावनांचं व्यवस्थापन करताना (किंवा करता न आल्यानं म्हणा) जे काही घोळ घालून ठेवतो, त्या गोंधळाची - आतल्या अन् बाहेरच्या ‘केऑस’ची - ती कहाणी होती. आता १८ वर्षांनी तर काळ आणखीनच बदललाय. तेव्हा आकार घेत असलेली महानगरं आता अक्राळविक्राळ रूप धारण करून बिनचेहऱ्याची झाली आहेत. मॉलपासून मेट्रोपर्यंत सर्वत्र चकचकाट वाढला आहे, पण आपल्या आतला संवेदनांचा दिवा तेवतो आहे का? काहीच कळेनासं झालंय. आधीचा सिनेमा आला होता, तेव्हा सात वर्षांची असलेली पिढी आता पंचविशीत आहे. त्यांचं जगणं सुरुवातीपासूनच महानगरी आणि त्यामुळं सर्वच बाबतींत ‘केऑटिक’ आहे. मग त्यांचं आणि त्यांच्यासोबत जगत असलेल्या माझ्यासारख्या मधल्या पिढीचं आणि त्याहून मोठ्या म्हणजे सीनिअर्सचं जगणं आता कसं झालं आहे? मूलभूत भावना त्याच असल्या, तरी त्या हाताळण्यातला गोंधळ वाढला आहे की कमी झाला आहे? या आणि अशा सगळ्या प्रश्नांना भिडणारा ‘मेट्रो... इन दिनों’ या कारणांसाठी तरी बघायला हवा. एक प्रकारे आपणच आरशात बघितल्यासारखं हे आहे.
‘मेट्रो... इन दिनों’ चित्रपट चांगला मोठा आहे. तब्बल पावणेतीन तासांचा. दिग्दर्शकानं तब्येतीत यातली सगळी पात्रं उभी केली आहेत. अर्थात तब्बल आठ प्रमुख व्यक्तिरेखा असल्यानं त्यातही सर्वच्या सर्व पात्रं तितक्याच ताकदीनं ठसतात, असं नाही. काही जमली आहेत, तर काही फसली आहेत. उदा. पार्थ (आदित्य रॉय कपूर) या व्यक्तिरेखेचा संपूर्ण आलेख चांगला उभा राहिला आहे. वस्तुत: या व्यक्तिरेखेला सिनेमात नातेसंबंधांचा काहीच आगापिछा नाही. तरीही एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून ते पात्र आपल्यासमोर नीट उभं राहतं. याउलट अनुपम खेरनं साकारलेला ज्येष्ठ नागरिक किंवा आकाश (अली फजल) ही पात्रं तेवढ्या परिपूर्णतेनं उभी राहत नाहीत. काजोल (कोंकणा सेनशर्मा) व माँटी (पंकज त्रिपाठी) यांच्या ट्रॅकला जरा जास्तच महत्त्व दिलंय. त्यामुळं तो ताणल्यासारखा झाला आहे, तर याउलट चुमकी (सारा अली खान) आणि काजोलची टीनएजर मुलगी यांचे ट्रॅक काहीसे अर्धवट राहिल्यासारखे झाले आहेत.
असं असलं तरी पहिल्या सिनेमाप्रमाणे यातही प्रीतम आणि त्याचा ऑर्केस्ट्रा महानगरांत, कुठे रस्त्यावर, कुठे टेरेसवर, कुठे पात्रांच्याच आजूबाजूला, कुठे पार्टीत गात गात सिनेमा पुढं नेतो. हा सिनेमा म्हणजे स्वतंत्रपणे एक ‘म्युझिकल’ आहे असं म्हणावं इतकं यातलं संगीत अविभाज्य आहे. यातले शब्द लक्षात राहिले नसले तरी सिनेमात ऐकताना ते चांगले वाटत होते. किंबहुना प्रत्येक पात्राची कहाणी या छोट्या छोट्या गाणुल्यांमधून आपल्यासमोर येते. कधी कधी या गाण्यांचा अतिरेकही होतो. त्यात संगीत प्रीतमचं असल्यामुळं ते कंठाळी आहे हेही वेगळं सांगायला नको. मात्र, असं असलं तरी या सिनेमात ते खपून गेलंय. या सिनेमातल्या पात्रांच्या मनात सुरू असलेला कल्लोळच जणू त्या कंठाळी वाद्यमेळांतून आपल्यावर आदळतोय, असंही वाटून गेलं. आता हे प्रीतमनं हेतुत: केलंय की नकळत झालंय ते आपल्या आपण ठरवावं.
सिनेमाच्या नावात ‘मेट्रो’ असल्यानं तो स्वाभाविकपणे भारतातल्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता व पुणे या पाच प्रमुख महानगरांत घडतो. (पुण्यात चुमकी व काजोलचं माहेर असलं, तरी ते एका घरापुरतंच दिसतं. सिनेमात मुंबई, कोलकता जसं ‘दिसतं’ तसं पुणे शहर ‘दिसत’ नाही. त्यामुळं ते इथं फक्त उल्लेखाच्या पातळीवरच राहतं.) याशिवाय या शहरी गोंगाटावर उतारा म्हणून कालका-शिमला ट्रेन आहे आणि समुद्राशिवायचा गोवाही आहे. याशिवाय बरंच काही आहे. महानगरी जगण्याची पार्श्वभूमी बऱ्याच फ्रेम्समधून दिसत राहते. मग ती मेट्रो असेल, उंच उंच इमारती असतील, कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा रस्त्यावरची वाहतूक असेल. कोलकत्यात ट्राम आवर्जून दिसते. मुंबईतल्या दृश्यांत उंच उंच इमारती आणि मुंबईचा झगमगाट दिसतो. दिल्ली, बंगळुरूतही तिथली मेट्रो आणि महत्त्वाची ठिकाणं नेपथ्य म्हणून दिसत राहतात. या सर्व दृश्यांमुळे सिनेमातल्या पात्रांच्या मनातल्या कल्लोळाला योग्य तो कॅनव्हास मिळतो. 

यातली काजोल आणि माँटीची गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहते. ती जरा ताणलेली आहे आणि त्यामुळे नंतर जरा कंटाळवाणी आणि काहीशी प्रेडिक्टेबल वाटते. त्या तुलनेत पार्थ आणि चुमकीचा ट्रॅक अधूनमधून येत असला तरी तो जास्त फ्रेश आणि ‘खरा’ वाटतो. गंमत म्हणजे यातलं पार्थ हे पात्र मात्र तसं नाही. ते काहीसं ‘अनरिअल’ किंबहुना आपल्याला आपण जसं व्हावं असं वाटतं, पण होऊ शकत नाही, त्या धर्तीवरचं वाटतं. वर म्हटल्याप्रमाणे लिखाणातही या पात्राला चांगला न्याय मिळाला असल्यानं ते शेवटपर्यंत भाव खाऊन जातं. त्या तुलनेत पंकज त्रिपाठीचा ‘माँटी’ मात्र सतत मार खात राहतो. त्या पात्राच्या मूर्खपणामुळे त्याच्याविषयी सहानुभूतीही वाटत नाही. अनुपम खेरला फारसं फुटेज नसलं तरी त्यानं आणि नीना गुप्तानं मिळालेलं काम नेहमीच्या जोशात केलं आहे. त्यांच्यातली एनर्जी अफाट आहे. फातिमा सना शेख आणि अली फजलचा ट्रॅकही विस्कळित झाला आहे. कदाचित त्यांच्यातल्या विस्कळित संबंधांसारखाच. 
सुरुवातीला या सर्व पात्रांचं इंट्रोडक्शन येतं, तेव्हा या सर्व कथा स्वतंत्र आहेत की काय, असं वाटतं. मात्र, नंतर हळूहळू ही पात्रं एकमेकांशी संबंधित आहेत हे कळतं. काही पात्रं थेट एकमेकांशी संबंधित नसली तरी त्यांचे रस्ते एकमेकांना छेदून जातात. कुठे ना कुठे, कुणी ना कुणी एकमेकांना भेटत राहतं. ही सगळी गुंतागुंत दिग्दर्शकानं नीट हाताळली आहे. (तरी एकदा पंकज त्रिपाठी कार चालवत असताना अचानक अली फजल त्याच्या कारसमोर येतो, तेव्हा त्याला ‘अरे गुड्डू’ असा डायलॉग (संदर्भ - मिर्झापूर ही वेबसीरीज) देण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही.)
यातल्या तरुण पिढीचं चित्रण स्वतंत्रपणे कौतुकास्पद आहे. यातल्या तिघींचे व्हिडिओ कॉल सुरू असताना त्यातली जी सर्वांत तरुण आहे (चुमकी) तिच्या फोनची बॅटरी अगदी संपत आलेली असते, हेही दिसतं. (‘जेन झी’च्या मुलांच्या फोनच्या बॅटरी कायम लो असतात आणि ज्येष्ठ नागरिक आपले मोबाइल सतत चार्ज करून ठेवतात, असं एक इंटरेस्टिंग निरीक्षण आहे.) आता हे दिग्दर्शकानं मुद्दाम केलं की ते नकळत तसं चित्रित झालंय हे माहिती नाही. मात्र, बारकाईने पाहिल्यास हे दिसतं खरं. यातल्या काजोल व माँटीच्या टीनएजर मुलीचा ट्रॅक त्या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. आपल्याला मुलं आवडतात की मुली याचा निर्णय ही पंधरा वर्षांची मुलगी करू शकत नसते आणि तिच्या आयुष्यातला तो सर्वांत मोठ्ठा प्रॉब्लेम असतो. हा ट्रॅक दिग्दर्शकानं म्हणावा तसा खुलवलेला नाही. तो काहीसा मुग्धच राहिला आहे. 
असं सगळं असलं तरी हा सिनेमा आवर्जून पाहा. कथेला महत्त्व असलेला, अनेक कलाकारांचा समावेश असलेला तरी एकही ‘सुपरस्टार’ नसलेला, एकही ‘आयटेम साँग’ नसलेला, शक्य असूनही एकही अश्लील किंवा तुलनेनं बोल्ड दृश्य नसलेला असा हा एक स्वच्छ, पण अंतर्मुख करायला लावणारा सिनेमा आहे. सिनेमा अगदी शंभर टक्के परिपूर्ण नाही, हे खरंच; पण पावणेतीन तासांचा असूनही ‘बोअर’ होत नाही, हेही खरं. त्यामुळं आपल्या आवडत्या व्यक्तीसह मोठ्या पडद्यावरच पाहावा, हे नक्की. 

(दर्जा - साडेतीन स्टार)

----

29 Jun 2025

दोन पुस्तकांविषयी...

१. वार्तांच्या झाल्या कथा
------------------------------

मोलाचा सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज

ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी लिहिलेलं ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे रोहन प्रकाशनतर्फे आलेलं नवं पुस्तक म्हणजे एक महत्त्वाचा सामाजिक, सांस्कृतिक दस्तावेज आहे. आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्यातील काहींच्या बातम्या होतात, तर काही काळाच्या उदरात गडप होतात. पत्रकार जेव्हा अशा घटना अनुभवतो, तेव्हा तो त्या घटनांचे वार्तांकन करत असताना एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय असा महत्त्वपूर्ण दस्तावेजच तयार करत असतो. साबडे यांनी ‘सकाळ’सारख्या पुण्यातील आघाडीच्या, प्रथितयश दैनिकात तब्बल ३४ वर्षं काम केलं. हे काम करताना साबडे यांनी अक्षरश: हजारो बातम्या लिहिल्या असतील किंवा संपादित केल्या असतील. प्रत्येक बातमीची काही कथा होत नाही. मात्र, काही बातम्या नक्कीच तशा असतात. त्या केवळ बातमीरूपात राहणं शक्यच नसतं. अशा घटनांचे दीर्घकालीन परिणाम त्या त्या वेळी समाजावर, त्या शहरावर होत असतात. या घटनांची बातमी आणि त्या बातमीमागील घटना यांची साद्यंत गोष्ट साबडे आपल्या त्यांच्या खास शैलीत सांगतात, तेव्हा आपणही त्या काळातील त्या अनुभवाचे रोमांच अनुभवू शकतो. ही साबडे यांच्या अस्सल अनुभवांची आणि ते शब्दबद्ध करणाऱ्या लेखणीची ताकद आहे.
साबडे यांचे हे पुस्तक दोन विभागांत आहे. पहिल्या विभागात पुण्याशी संबंधित बातम्या व त्यांच्या कहाण्या आहेत, तर दुसऱ्या विभागात देश-विदेशांतील महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेण्यात आली आहे. पहिल्या भागाचं शीर्षक ‘अवती-भवती’ असं असून, त्यात रजनीश आश्रमापासून ते जोशी-अभ्यंकर हत्याकांडापर्यंत आणि ‘टेल्को’पासून ते मार्केट यार्डच्या स्थलांतराच्या घटना येतात. या सहा दीर्घ लेखांमध्ये साबडे आपल्याला पुण्यातील सहा महत्त्वाच्या घटनांची सांगोपांग आणि वस्तुनिष्ठ माहिती देतात. दुसऱ्या भागाचं शीर्षक ‘देश-विदेश’ असं असून, त्यात श्रीलंकेपासून ते जेरुसलेमपर्यंत विषय साबडे यांनी हाताळले आहेत. राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांची अतिशय मनोज्ञ अशी व्यक्तिचित्रं त्यांनी या विभागात रेखाटली आहेत. मुळात पत्रकाराची लेखणी असल्यामुळं आपोआपच त्यांच्या लेखनात एक तटस्थपणा, नेमकेपणा आणि माहितीची सत्यता यांचं सुखद दर्शन घडतं. अर्थात ही तटस्थता कोरडी नाही. साबडे यांच्या पत्रकारामधला ‘माणूस’ सदैव जिवंत असतो आणि तो अतिशय संवेदनशीलतेनं या सर्व घटनांकडं पाहतो. त्यामुळं या सर्व कथनाला एक आत्मीय ओलावाही आहे. साबडे यांची शैली रसाळ आहे. वस्तुनिष्ठ तपशिलांचे कोंदण असल्यामुळं हे लेखन वाचताना बौद्धिक आनंद लाभतो.
साबडे केवळ ज्येष्ठ पत्रकार व माध्यमतज्ज्ञ नाहीत, तर लेखक व शिक्षकही आहेत. ‘सकाळ’मधील ३४ वर्षांच्या काळात विविध पदांवर काम करताना साबडे यांनी देश-विदेशांतील अनेक महत्त्वाच्या घटनांचं वार्तांकन केलं. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा सर्व प्रवास साबडे यांनी त्या त्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवला आहे. अवघ्या २७ व्या वर्षी पाकिस्तानला भेट देणारे ते सर्वांत कमी वयातील मराठी पत्रकार असावेत. पुण्यात बातमीदारी करताना साबडे यांचा समाजातील विविध घटकांशी संबंध आला. त्यातून पुण्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी ते जोडले गेले. पुणे श्रमिक पत्रकार संघापासून ते ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’पर्यंत पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संस्थांवर त्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करून, शब्दश: घडवलं आहे. (मीही त्यांचा एक विद्यार्थी आहे.) पत्रकारिता अभ्यासक्रमांत त्यांनी बातमीदारी, संपादन, फीचर रायटिंग असे अनेक विषय विद्यार्थ्यांना शिकवले आहेत. त्यांनी आपल्या शैलीदार भाषेत वृत्तपत्रांतून अनेक विषयांवर पल्लेदार लेख लिहून, वाचकांना आनंद दिला आहे. साबडे यांनी अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या असून, तेथील विविध सेमिनार, परिसंवाद, चर्चासत्रांत सहभाग घेतला आहे.
अलीकडं निवृत्तीनंतर ‘पुण्यभूषण’सारख्या दिवाळी अंकांतून ते पुण्यासंबंधी अतिशय मोलाचं, माहितीपूर्ण व रंजक लेखन करीत आहेत. विशेषत: जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर त्यांनी लिहिलेला सविस्तर, सर्वांगीण लेख वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. अशा लेखांद्वारे एका अर्थाने पुणे शहरासंबंधीचा एक दस्तावेजच त्यांच्या हातून तयार होत आहे. डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या ‘सकाळ स्कूल ऑफ जर्नालिझम’चे साबडे हे एक ‘टॉपर’  विद्यार्थी आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरू नये. वृत्तपत्रीय संकेत, मर्यादा व सभ्यता पाळून त्यांनी केलेलं वस्तुनिष्ठ वार्तांकन वाचकांना संपूर्ण व अचूक माहितीसह नवी दृष्टी प्रदान करतं, असं म्हटल्यास गैर ठरणार नाही. 
‘एका सेनानीचा अंत आणि जिंदा-सुखाशी गाठ’ हा लेख असेल किंवा ‘पुणेरी बावाजी – तुम जियो हजारो साल’ हा पुण्यातील पारशी समाजाविषयीचा लेख असेल; साबडे त्या विषयाची सर्वांगीण माहिती आपल्याला पुरवतात. वाचकाच्या मनात उत्पन्न होऊ शकणाऱ्या सर्व प्रश्नांचं, सर्व शंकांचं उत्तर त्याला लेखात मिळेल, याची पुरेपूर काळजी ते घेताना दिसतात. त्या त्या वेळी प्रत्यक्ष बातमीत लिहिता न आलेले, ज्याला ‘बातमीमागची बातमी’ म्हणतात, तसे – अनेक रंजक तपशीलही ते आपल्या लेखांत खुबीने पेरतात. त्यामुळं एखादी उत्कंठावर्धक मालिका पाहावी तसे आपण या लेखनात गुंतून पडतो. पोलंडमधील छळछावण्यांना भेट दिल्यानंतरच्या आठवणींवर आधारित ‘औशवित्त्झच्या असह्य स्मृती’ या लेखातून लेखकाची संवेदनशील बाजू लख्खपणे दिसते.
रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर यांनी उच्च निर्मिती मूल्यांची परंपरा अबाधित राखून या देखण्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. तब्बल ३१४ पानांच्या या पुस्तकाचं संपादन अनुजा जगताप यांनी केलं असून, मुखपृष्ठ राजू देशपांडे यांचं आहे.
पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात साबडे यांनी अनेकांना न रुचणारं आपलं परखड मतप्रदर्शनही केलं आहे. या ‘कथा’ एकमेकांपासून वेगळ्या असल्या, तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. त्यामुळं चोखंदळ वाचकांना नक्की आवडेल, असं हे पुस्तक आहे, यात शंका नाही.

(पूर्वप्रसिद्धी : रोहन मैफल - रोहन प्रकाशन)

----

२. अप अगेन्स्ट डार्कनेस
-----------------------------

फिटे अंधाराचे जाळे

मध्यंतरी मी सुनंदा अमरापूरकरांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचलं. ते मला अतिशय आवडलं. त्यानंतर मी सुनंदाताईंशी बोललो. एकूणच नगरच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. मी त्या पुस्तकावर इथं ब्लॉगवरही लिहिलंय. त्यानंतर मग साधारण महिन्यापूर्वी त्यांनी मला एक पुस्तक पाठवलं. ‘तुला नक्की आवडेल. वाच...’ असं म्हणाल्या. ते पुस्तक होतं मेधा देशमुख भास्करन यांचं ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’. या इंग्लिश पुस्तकाचा सुनंदाताईंनीच अनुवाद केला आहे. सकाळ प्रकाशनानं तो प्रकाशित केलाय. त्या पुस्तकाचं नाव ‘फिटे अंधाराचे जाळे’ असं अगदी समर्पक आहे. हे पुस्तक नगरमधील प्रसिद्ध स्नेहालय संस्थेचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी यांच्या ‘स्नेहालय’ उभारणीतील संघर्षाची गाथा सांगतं. हा अनुवाद सुनंदाताईंनी करणं अतिशय योग्य होतं, कारण त्यांचंही बरंचसं आयुष्य नगरमध्ये गेलंय. त्यामुळं अनुवादात व्यक्ती, संस्था, परिसर, ठिकाणं यांची नावं अचूक आली आहेत. काही वेळेला त्यांनी मूळ मराठी संभाषण कसं झालं असेल, हे लक्षात घेऊन अगदी अस्सल नगरी भाषाही वापरली आहे. त्यामुळं मला तरी बऱ्याचदा वाटलं, की हे मूळ पुस्तक खरं तर सुनंदाताईंनीच आधी मराठीत लिहायला हवं होतं. इतका तो अनुवाद ‘अनुवाद’ वाटतच नाही.
हे पुस्तक आवडलं याचं दुसरं कारण वैयक्तिक आहे. गिरीश कुलकर्णी यांच्या कुटुंबाशी आम्ही नात्याने जोडले गेलो आहोत. गिरीशची आई म्हणजे आमच्या शोभाकाकू. त्यांंचं माहेर जामखेड. गिरीशचे बाबा दिनूभाऊ कुलकर्णी यांनाही मी वैयक्तिकरीत्या ओळखत होतो. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे नगरमधल्या माझ्या अल्प वास्तव्याच्या काळात माझी गिरीश कुलकर्णींबरोबर एकदाही भेट झाली नाही. अर्थात मी तेव्हा लहान होतो आणि नेमका तोच काळ (१९८८-१९९१) ‘स्नेहालय’च्या प्रारंभीच्या उभारणीचा होता. मी नगरच्या मार्कंडेय विद्यालयात आठवी ते दहावी ही तीन वर्षं शिकलो. आमच्या शाळेच्या समोरच गांधी मैदान होतं आणि एका बाजूला चित्रा टॉकीज. तिच्या शेजारीच नगरची चित्रा गल्ली ही वेश्या वस्ती होती. गिरीश कुलकर्णींचं कार्य याच ठिकाणाहून सुरू झालं. म्हणजे मीही तेव्हा त्याच परिसरात वावरत होतो. अर्थात शाळेतल्या मुलांना त्या गल्लीकडं जायला बंदी असायची. पण गिरीश कुलकर्णी तेव्हा त्याच भागात त्यांच्या कार्याची उभारणी करत होते, हे वाचून मला एकदम आपुलकी वाटली.
गिरीश कुलकर्णी यांनी वेश्यांच्या मुलांसाठी, एड्स झालेल्या वेश्यांसाठी ‘स्नेहालय’च्या माध्यमातून मोठं काम उभं केलं. ज्या काळात या लोकांना जवळही करायला कुणी तयार नसे किंवा सामाजिक बहिष्काराचे ओझे त्यांना सोसावे लागे, त्या काळात गिरीश कुलकर्णी धाडसाने या महिलांजवळ गेले. त्यांचा विश्वास संपादन करताना त्यांना प्रचंड त्रास झाला. पुरुषांकडून त्या महिलांना कधी अशा वागणुकीची अपेक्षाच नव्हती. त्यामुळे त्यांना गिरीश यांच्याविषयीही विश्वास निर्माण व्हायला खूप वेळ लागला. गिरीश यांनी नगरमधलं ‘बिल्वदल’ हे त्यांचं निवासस्थानच अशा महिलांना राहण्यासाठी खुलं केलं. त्यानंतर समाजानेही मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढं केले. अर्थात आपली सामाजिक व्यवस्था, पोलिस यंत्रणा, हितसंबंधी लोक आणि गुंड मंडळी या सर्वांशी लढता लढता गिरीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगी शारीरिक मारही सोसला. मात्र, ते कधीही हिंमत हरले नाहीत. नगरच्या एमआयडीसीमध्ये अक्षरश: ओसाड जागेवर त्यांनी प्रचंड कष्टातून ‘स्नेहालय’चे नंदनवन उभे केले. ही सर्व संघर्षगाथा सुनंदाताईंनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं, असं हे पुस्तक आहे. ‘स्नेहालय’चं काम आता खूप मोठं झालं आहे. जोवर समाजात वेश्या आहेत, एड्ससारखा आजार आहे, त्यांचे प्रश्न आहेत तोवर ‘स्नेहालय’सारख्या संस्थांची गरज कायमच लागणार आहे. गिरीश कुलकर्णींसारखे सामाजिक कार्यकर्ते मात्र क्वचितच तयार होताना दिसतात. हे पुस्तक वाचून आणखी काही ‘गिरीश कुलकर्णी’ तयार झाले तर हा समाज आणखी सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही.

----


------------

26 Jun 2025

‘घायल’विषयी...

‘घायल’ची पस्तिशी…
--------------------------

परवा सहज ‘इन्स्टाग्राम’वर स्क्रोल करत होतो तर ‘घायल’वर सनी देओलची पोस्ट बघायला मिळाली. त्यात त्याने लिहिलं होतं, की आज (२२ जून) ‘घायल’ रिलीज होऊन ३५ वर्षे झाली. ‘घायल’ रिलीज झाला २२ जून १९९० रोजी! बापरे! बघता बघता ३५ वर्षं झाली. अगदी काल-परवा नवा रिलीज झालेला हा सिनेमा बघितल्याचं मला आठवत होतं. अर्थात मी तेव्हा खूप लहान, म्हणजे साडेचौदा-पंधरा वर्षांचा होतो. आज मात्र ‘घायल’ हा एक ‘कल्ट मूव्ही’ (नवा मार्ग तयार करणारा) आहे, असं आपण सहज म्हणू शकतो. कारण ‘घायल’ने त्या वेळेला सिनेमासृष्टीमध्ये एक तुफान आणलं आणि सनी देओलला एक ॲक्शन हिरो म्हणून प्रस्थापित केलं, यात वाद नाही
‘घायल’ प्रदर्शित झाला, त्या वेळची भारताची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थिती आजपेक्षा खूपच वेगळी होती. तेव्हा ‘मंडल’विरोधात आंदोलन सुरू होतं. केंद्रातलं राजीव गांधींचं सरकार जाऊन विश्वनाथ प्रताप सिंहांचं सरकार सत्तेत आलं होतं. तरुणांमध्ये एक अस्वस्थता होती. आणखी एक म्हणजे,  हा १९९१ च्या आधीचा, म्हणजे जागतिकीकरणाच्या आधीचा काळ होता. बरोबर त्याच्या आधी एक वर्ष हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. एका अर्थाने जागतिकीकरणापूर्वीच्या भारताचं दर्शन या सिनेमामध्ये होतं. घायल दिग्दर्शित केला आहे राजकुमार संतोषीने. संतोषी हा एक अफलातून दिग्दर्शक आहे. मी असं वाचलं होतं, की संतोषीने ‘घायल’ची कथा जेव्हा लिहिली त्या वेळेला कमल हसनला हिरो म्हणून घेऊन हा चित्रपट करायचा ठरवलं होतं. आता आपण कल्पनाच करू शकत नाही, की ‘घायल’चा हिरो कमल हसन असता तर काय झालं असतं! अर्थात तसं झालं नाही तो भाग वेगळा. मग संतोषी धर्मेंद्रकडे गेला आणि धर्मेंद्रने हा चित्रपट निर्माण करायचं ठरवलं. त्यानंतरचा पुढचा सगळा इतिहास आहे.
‘घायल’ हे उत्कृष्ट स्टोरीटेलिंगचं उदाहरण आहे. म्हणायला गेलं तर साधा एक ॲक्शनपट. पण त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपण या सिनेमाकडे बघितलं तर ‘घायल’चं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. ‘घायल’ इतक्या वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शकाने एका चौकटीत बसवला आहे, की आता तो बारकाईने बघताना आपण अक्षरशः थक्क होतो. अजय मेहरा नावाच्या मुंबईतल्या तरुणाची ही गोष्ट आहे. गोष्ट अगदी साधी. अजय (सनी) हा एक होतकरू बॉक्सिंगपटू आहे. त्याचं वर्षा (मीनाक्षी शेषाद्री) नावाच्या मुलीवर प्रेम आहे आणि त्याला एक मोठा भाऊ (राज बब्बर) आहे आणि एक अतिशय प्रेमळ अशी वहिनी (मौसमी चटर्जी) आहे. असं छान सुखी कुटुंब आहे. त्यात एकदा बॉक्सिंगच्या ट्रेनिंगला अजयला बेंगलोरला जावं लागतं आणि इकडे त्याचा भाऊ त्याला फोन करतो आणि सांगतो, की मला तुझ्या मदतीची गरज आहे आणि मी खूप अस्वस्थ आहे. अजय फोन ठेवतो आणि लगेच मुंबईला येतो. तिथे आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, की बलवंत राय (अमरीश पुरी) नावाच्या एका बड्या धेंडाकडे आपला भाऊ काम करत होता. मग अन्नू कपूर त्याला ती सगळी स्टोरी सांगतो. सिनेमा आपण बहुतेक सगळ्यांनी बघितला आहे. त्यामुळे पुन्हा इथे पुनरुक्ती करत नाही. पण त्यानंतर सर्व सिस्टीमला ज्या पद्धतीने हा अजय धडका देतो, तो या सिनेमाचा गाभा आहे. मग ते भ्रष्टाचारी पोलिस असतील; घरातला आहे असं दाखवून उलटलेला तो बॅरिस्टर गुप्ता (शफी इनामदार) असेल, बलवंत रायला मदत करणारे राजकारणी असतील! हे सर्व लढे दिग्दर्शकाने बारकाईने दाखवले आहेत. इंटरव्हलनंतर ज्या पद्धतीने अजयचा उद्रेक होतो, तशी ॲक्शन तोवरच्या हिंदी सिनेमात फार क्वचित आपल्याला बघायला मिळाली होती. एक अर्थाने इथे ‘जंजीर’शी तुलना करण्याचा मोह होतो. अमिताभला ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून प्रस्थापित करणारा ‘जंजीर’ आणि सनीला ॲक्शन हिरो म्हणून प्रस्थापित करणारा ‘घायल’ या दोन्ही सिनेमांत बरीच साम्यस्थळं आहेत. आता काळामधला फरक लक्षात घेतला तर त्या वेळेला अमिताभ पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होता आणि ‘घायल’मधला नायक पोलिसांसह सर्व व्यवस्थेला आव्हान देतो. या दोन चित्रपटांमध्ये साधारण १८ वर्षांचा काळ मध्ये गेला होता. भारतामधल्या एकूण सामाजिक व्यवस्थेमधला झालेला ढासळता बदल या सिनेमात अगदी स्पष्ट दिसून येतो.
‘घायल’ हा जागतिकीकरणाच्या आधीचा सिनेमा असल्यामुळे त्यात लँडलाईन फोन, अगदी ती तपकिरी रंगाची रेल्वे वगैरे असं सगळं दिसतं. मुंबईही कमी गर्दीची दिसते. एक वेगळं जग यात दिसतं. अन्नू कपूर सनीला बॉक्सिंग रिंगमध्ये लढवतो आणि तिथं पैसे कमावतो, तेही गमतीशीर आहे. एक मात्र नक्की आहे. ‘घायल’ बघताना आपल्याला एक क्षणही कंटाळा येत नाही. त्या सिनेमाच्या संकलनाचंही (व्ही. एन. मयेकर) हे यश आहे. ‘घायल’ला संगीत बप्पी लहिरींचं आहे. लता मंगेशकर आणि पंकज उधास यांचं एक द्वंद्वंगीत (माहिया) अगदी सुरुवातीला येतं. इतर गाणीही चांगली आहेत. एक आयटम साँगही आहे. बाकी तेव्हा ‘महाभारत’ किती लोकप्रिय होतं, ते यात प्रवीणकुमारला (‘महाभारता’तला भीम) एका दृश्यात आणलंय, त्यावरून सहज लक्षात येतं.
या सिनेमाने सनी देओलला एक ॲक्शन हिरो म्हणून अगदी वरच्या लीगमध्ये प्रस्थापित केलं. सनीची ॲक्शन हे इतर ॲक्शन हिरोंपेक्षा वेगळी आहे. कोर्टातला सीन बघा. बॅरिस्टर गुप्ता सनीवर  अतिशय घाणेरडा आरोप करतो, त्या वेळेला त्याचा जो काही उद्रेक आहे तो बघण्यासारखा आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात खदखदत असलेल्या एका संतापाला, चिडीला सनीने यात वाट करून दिली आहे. या चित्रपटात आणि नंतर जणू याचा सीक्वेला असल्यासारखा असलेला ‘घातक’सारखा सिनेमा असेल किंवा ‘दामिनी’मधला त्याचा वकिलाचा रोल असेल; एका अर्थाने एक अँटिएस्टॅब्लिशमेंट हिरो म्हणून सनीने आपलं निर्विवाद वर्चस्व सिनेमासृष्टीत स्थापन केलं. अर्थात मूळ श्रेय ‘घायल’चंच. सनीने या भूमिकेवर खूप काम केलं होतं म्हणा, किंवा संतोषीनं त्याच्याकडून ती भूमिका काढून घेतली म्हणा. अजय मेहरा म्हणजे सनीच! स्वत: सनीचीही ही अतिशय आवडती भूमिका आहे, यात आश्चर्य नाही.
अमरीश पुरीने यातला बलवंत राय हा व्हिलन इतका जबरदस्त साकारलाय, की क्या बात है! बलवंत राय आजही लक्षात आहे. राज बब्बरनेही भावाची भूमिका चांगली केलीय. बॅरिस्टर गुप्ताच्या पाताळयंत्री पात्राच्या भूमिकेत शफी इनामदार सहजतेने वावरले आहेत.  कुलभूषण खरबंदा पोलिस कमिशनरच्या भूमिकेत आहे. या सिनेमात अजय पोलिस कमिशनरलाच ओलीस धरतो;  तेही त्याच्याच घरात जाऊन, हे जरा अतीच दाखवलं आहे, सूडाची परिसीमा म्हणून आणि सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून त्या वेळेला प्रेक्षकांनी कदाचित ते स्वीकारलं असेल. बाकी यातले अगदी छोटे छोटे रोलही लक्षात आहेत. अजयचे ट्रेनर विजू खोटेचा थोडासा कॉमेडी रोल आहे. बलवंत रायचा सहायक मोहिले (ब्रह्मचारी) हाही लक्षात राहतो. शरद सक्सेना आहे. अन्नू कपूरही लक्षात राहतो. यात अतिशय वेगळा रोल आहे तो ओम पुरीचा. एसीपी डिसूझा म्हणून ओम पुरी सिनेमाच्या उत्तरार्धात येतात. ही भूमिका अतिशय चांगला लिहिलेली आहे. ते सनीला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्या वेळेला सनीचा आणि त्यांचा एक अगदी समोरासमोरचा एक संवाद आहे, तो अतिशय ऐकण्यासारखा आहे. (सलीम-जावेद जोडीची आठवण येते.) किंबहुना यातल्या अनेक संवादांना थिएटरमध्ये अतिशय टाळ्या पडायच्या. तो सिंगल स्क्रीन थिएटरचा जमाना होता. त्यात ‘घायल’ म्हणजे काय विचारू नका! अजय जेव्हा तुरुंगात जातो तिथं मग त्याला तीन मित्र भेटतात. त्यात सुदेश बेरी, शब्बीर खान आणि मितवा नावाचा एक नट आहे. (सिनेमातही त्याचं नाव मितवा असंच आहे.) तेच तिघं मिळून मग अजयला मदत करतात आणि मग तो सगळा सूड पूर्ण करतो.
आज ३५ वर्षांनी ‘घायल’ बघताना असं वाटलं, की आपण किती पुढे आलो! काळ केवढा बदलला! तेव्हा अजयचं कुटुंब एकत्र होतं. तो भाऊ-वहिनीबरोबर राहत होता आणि भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो हे सगळं करतो. आज असं होईल का? न्यूक्लिअर फॅमिली असलेल्या आजच्या काळात हे जरा कठीण वाटतं. सिनेमात सुरुवातीचं जे गाणं आहे ‘सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा,’  हे त्या तात्कालिक कुटुंबव्यवस्थेचं दर्शन घडवतं. ते खूप आनंद देणारं गाणं आहे. एकीकडं सगळं छान चाललेलं असतं आणि मग ते सगळं एका बड्या माणसामुळे कसं बिनसतं याची एक गडद पार्श्वभूमी हे गाणं तयार करतं.
‘घायल’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घायल ‘रि-रन‘लाही खूप चालला. नंतर १९९१, ९२, ९३ या सर्व काळात तो पुन:पुन्हा पडद्यावर येत राहिला. मी डेक्कन टॉकीजला ‘घायल’ अनेकदा बघितला. मॅटिनी शो असायचा आणि त्या शोला आम्ही काही मित्र नेहमी जायचो.
…मध्ये खूप वर्षे गेली आणि परवा अचानक सनी देओलच्या त्या पोस्टमुळे ‘घायल’ची आठवण आली आणि मग मी ‘ॲमेझॉन प्राइम’वर तो परत बघितला. पुन्हा तो बघतानाही मला अजिबात कंटाळा आला नाही. मी सर्वच्या सर्व सिनेमा परत एकदा एंजॉय केला. त्यासाठी राजकुमार संतोषी आणि ‘घायल’च्या सगळ्या टीमला दाद द्यावी लागेल. तेव्हा व्यावसायिकदृष्ट्या सुपरहिट आणि त्याच वेळेला पुढे जाऊन एक ‘कल्ट मूव्ही’ झालेला ‘घायल’  कधीही बघा, कंटाळा येणार नाही. माझा स्वतःचा हा अतिशय आवडता सिनेमा आहे. अशा सिनेमाला ३५  वर्षं झाली, यावर खरोखर विश्वास बसत नाही. आता मी पन्नाशीला आलोय आणि सनी देओल ६७ वर्षांचा झालाय. आजही तो ‘जाट’ नावाचा सिनेमा करतो आणि मी तोही एंजॉय करतो. अर्थात ‘घायल’ तो ‘घायल’च. तो बघण्यासारखी मजा कशातच नाही.


------------

31 May 2025

आठवणीतली गाणी

शून्य गढ़ शहर...
--------------------


आठ एप्रिल. पं. कुमार गंधर्व यांचा वाढदिवस. त्या दिवशी सकाळी चालताना मग कुमारजींचं काही तरी ऐकणं अपरिहार्यच होतं. मी माझं आवडतं भजन लावलं - शून्य गढ शहर बस्ती... हे भजन मी पहिल्यांदा केव्हा ऐकलं हे आता आठवत नाही. मात्र, पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासून या भजनानं माझ्या मनावर एक निराळंच गारूड केलं आहे. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी ट्रेननं मी इंदूरला निघालो होतो. संध्याकाळी पाच-साडेपाचचा सुमार असेल. पाऊस नव्हता, पण हवा पावसाळी होती. देवास स्टेशन आलं. तिथं उतरता येणं तर शक्य नव्हतं, पण नजर भिरभिरत राहिली. कुमारांचं घर याच परिसरात असेल. इथल्याच हवेत त्यांनी श्वास घेतला असेल... बाहेर गव्हाची हिरवीगार शेतं दिसत होती. मध्येच सूर्यदर्शन होत होतं आणि त्या संध्याकाळच्या उन्हात ती हिरवीगार शेती चमकत होती. मला एकदम ‘शून्य गढ़ शहर...’ आठवलं. मी यू-ट्यूबवर ते भजन लावलं आणि इअरफोन लावून ऐकू लागलो. ट्रेनच्या खिडकीतून मागं पळणारी शेती, झाडं दिसत होती. एका लयबद्ध वेगानं ट्रेन चालली होती. त्यात केवळ तानपुरा आणि तबल्याच्या साथीनं कुमारजींनी म्हटलेलं ‘शून्य गढ़ शहर...’ ऐकणं हा खरोखर एक वेगळ्याच प्रकारचा आध्यात्मिक अनुभव होता. ते भजन ऐकताना मला गुंगीच आली. पुढं किती तरी दिवस कुमारांचे ते स्वर आणि त्या हलत्या रेल्वेतला मी मलाच आठवत राहिलो होतो...

हे भजन पुढीलप्रमाणे - 

शून्य गढ़ शहर शहर घर बस्ती,
कौन सोता कौन जागे है
लाल हमारे हम लालन के,
तन सोता ब्रह्म जागे है...

जल बिच कमल, कमल बिच कलिया,
भंवर बास ना लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नीत देता है...

तन की कुंडी मन का सोटा
ग्यान की रगड लगाता है
पांच पचीस बसे घट भीतर,
उनकू घोट पिलाता है...

अगन कुंडसे तपसी तापे,
तपसी तपसा करता है
पांचो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है...

एक अप्सरा सामें ऊभी जी
दूजी सुरमा हो सारे है ||
तिसरी रंभा सेज बिछाये,
परण्या नहीं कुंवारा है...

परण्या पहिले पुतर जाया,
मात पिता मन भाया है
शरण मछिंदर गोरख बोले,
एक अखंडी ध्याया है...


आपल्यापैकी बहुतेकांना ही रचना माहितीच असेल. गोरक्षनाथांनी लिहिलेली ही रचना विलक्षण आध्यात्मिक पातळीवरचा अनुभव देते. शरीराला एका नगराची उपमा देऊन गोरक्षनाथांनी हे भजन रचले आहे. याचा अर्थही किती सुंदर आहे. शरीरापलीकडच्या ब्रह्मस्वरूपाची, त्या चेतनेची आठवण करून देणारं हे भजन आपल्या आध्यात्मिक परंपरेची लखलखीत मोहोर आपल्या मनावर उमटवून जातं.
इंटरनेटवर या भजनाविषयी अधिक माहिती घेता, कुणा महेश बडगुजर नावाच्या व्यक्तीने २०१५ मध्ये लिहिलेला एक लेख सापडला. त्यात त्यांनी या भजनाचा अर्थ अगदी सुरेख पद्धतीने उलगडून सांगितला आहे. तो अतिशय वाचनीय आहे. त्यामुळे त्यांच्याच शब्दात द्यायचा मोह आवरत नाही. तो येणेप्रमाणे - 
(महेश बडगुजर लिहितात -
ही रचना आहे गोरक्षनाथांची. शरीराला एका नगरीची उपमा देत गोरक्षनाथांनी ही रचना केली असली तरी त्यात मांडण्यात आले आहे ते विश्वाचे ब्रह्मस्वरूपच. या शरीराचे रक्षण सहस्रदलकमल एखाद्या गडकोटासारखे करते. त्यात आत्मा वास करून असतो. अशी शरीरधारी काही माणसे जागी आहेत म्हणजेच त्यांना ब्रह्मज्ञान झाले आहे तर काही निद्रिस्त आहेत म्हणजेच अज्ञानात बुडून गेली आहेत, असे गोरक्षनाथ सांगतात. ‘लाल’ म्हणजेच परमेश्वर किंवा ब्रह्म. तो आणि आपण एकच असे अद्वैत येथे गोरक्षनाथ मांडतात. या शरीराचे दहा दरवाजे म्हणजेच प्रत्येकी दोन डोळे, नाकपुड्या, कान, गुह्येंद्रिये आणि एक मुख व एक ब्रह्मरंध्र. प्रलोभने आणि वासनांची हीच प्रवेशद्वारे. योगी या दरवाजांवर शरीराचीच (दरवाजाची) कडी आणि मनाचा सोटा हाती घेऊन पहारा देत असतो, असे गोरक्षनाथ सांगतात. पंचमहाभूते, त्यांनी बनलेली पंचवीस तत्त्वे यांचे हे शरीर. त्यांना साधनेचे घोट पाजण्याची तपस्या तपस्व्याला करावी लागते. पंचमहाभूते ही तर खऱ्या, सच्च्या तपस्व्याची शिष्येच. पण सच्चा योगी त्यांच्यापासूनच अलिप्त राहतो यावर गोरक्षनाथांचा भर आहे. अविद्या, विद्या, आत्मा या तिन्ही अप्सरा. माणसाला मोहवणाऱ्या. या तिन्ही प्रियतम परमेश्वरापाशीच आहेत. म्हणजेच ब्रह्म ब्रह्मचारी नाही तर आपल्या प्रियेसोबतच आहे असे गोरक्षनाथ सांगून जातात. या विश्वाची निर्मिती करून प्रकृती आणि पुरुष या मातापित्यांना आनंद देणाऱ्या या निर्गुण, निराकार ब्रह्माचेच आपण चिंतन करतो, असे सांगत गोरक्षनाथ समस्त मानववर्गाला तेच करण्याचा उपदेशही देत असतात.)

हे वाचल्यानंतर, हा अर्थ उमगल्यानंतर हे भजन ऐकणं हा आनंद विशेष आहे.
असंच आणखी आवडणारं भजन म्हणजे - उड जाएगा हंस अकेला...
त्याविषयी पुन्हा केव्हा तरी...

----

हे भजन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

----

दोन गाणी - दोन आठवणी हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------

30 May 2025

जयंत नारळीकर आठवणी

 ‘प्रोफेसर’ जयंत विष्णू नारळीकर...
-------------------------------------------

प्रा. जयंत नारळीकर गेले! २० मे २०२५ रोजी पहाटे झोपेतच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. तसे ते गेले काही महिने आजारीच होते. पण ते ‘आहेत’ ही भावनाही पुरेशी असायची. असं अगदी थोड्या लोकांबाबत मला वाटून गेलंय. पु. ल. असतील, भीमसेन जोशी असतील किंवा लतादीदी असतील... या सर्वांच्या बाबतीत त्यांच्या शेवटच्या काळात असंच वाटायचं, की ते ‘आहेत’ हीच भावना केवढी पुरेशी आहे! आपण ज्या आसमंतात वावरतो आहोत, ज्या हवेत श्वास घेत आहोत त्याच हवेत तेही श्वास घेत आहेत, आपण ज्या शहरात राहतोय तिथंच तेही राहताहेत किंवा आपल्यापासून जवळपासच राहताहेत ही भावना फार सुंदर असायची. प्रा. जयंत नारळीकर गेले तेव्हाही असंच वाटून गेलं.
खरं तर जयंत नारळीकर सरांशी थेट संबंधित अशा माझ्या अगदी दोन-तीनच आठवणी आहेत. सर्वांत महत्त्वाची आठवण म्हणजे माझी पहिली मोठी बातमी वृत्तपत्रात छापून आली ती नारळीकरांच्या व्याख्यानाची होती. मी तेव्हा नगरला ‘लोकसत्ता’त प्रूफरीडर म्हणून काम करत होतो. ‘कॉलेज पोर्च’ नावाचं एक सदर माझ्याकडं देण्यात आलं होतं. त्यात कॉलेजांमधल्या घटना-घडामोडी संकलित करणे किंवा काही प्रसंगी कॉलेजांमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणे असं स्वरूप होतं. आमचे गुरुजी सतीश कुलकर्णी यांनी मला हे काम दिलं होतं. एका अर्थाने माझ्या पुढच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची पायाभरणीच सुरू होती म्हणा ना! तर बहुतेक १९९६ असेल, नगर कॉलेजात नारळीकरांचं व्याख्यान होतं आणि ते कव्हर करायला मला पाठवण्यात आलं. मला अर्थातच आनंद झाला. मी कॉलेजमध्ये गेलो. तो एक मोठा वर्ग होता व समोर बेंचवर मुलं बसली होती. मीही त्यांच्यातच बसून ते व्याख्यान ऐकलं व तडक ऑफिसला निघून आलो. कार्यक्रमानंतर इतर पत्रकार त्यांना भेटले असतील, अनौपचारिक गप्पा झाल्याही असतील. पण तेव्हा मला काही ते सुचलं नाही. मात्र, मी लिहिलेली बातमी ‘लोकसत्ता’त चांगली चार कॉलमी छापून आली. ‘परग्रहांवरही जीवसृष्टीचे अस्तित्व शक्य’ असं काही तरी शीर्षक होतं, एवढंच आता आठवतंय. छापून आलेली प्रत्येक ओळ मी फायलीत कापून. जपून ठेवायचो. तशी ही बातमीही किती तरी दिवस जपून ठेवली होती. कदाचित अजूनही असेल...
मधे बरीच वर्षं गेली. मी पुण्यात ‘मटा’त रुजू झालो होतो. साधारण २०१२-१३ मध्ये मी त्यांचं ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे आत्मचरित्रपर पुस्तक श्रीधर लोणी यांच्याकडून घेऊन वाचलं आणि ते वाचून मी चांगलाच प्रभावित झालो. त्याच काळात त्यांची पंचाहत्तरी येत असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि यानिमित्त आपण त्यांची मुलाखत घ्यावी, असं मी आमच्या संपादकीय बैठकीत सुचवलं. त्यानुसार तेव्हाचे चीफ रिपोर्टर आशिष पेंडसे व मी अशा दोघांनी जाऊन ही मुलाखत घ्यावी, असं ठरलं. पेंडसे दीर्घकाळ विद्यापीठ व शिक्षण बीट बघत असल्यानं त्यांचा नारळीकर सरांशी चांगलाच परिचय होता. मग आम्ही रीतसर सरांची वेळ घेऊन त्यांच्या घरी गेलो व ती मुलाखत घेतली. ही माझी खऱ्या अर्थाने त्यांच्याशी झालेली पहिली, मोठी भेट. सरांनी आम्हाला भरपूर वेळ दिला. तेव्हा स्मार्टफोन व त्यातल्या कॅमेऱ्याचं प्रस्थ फारसं नव्हतं. त्यामुळं आम्ही काही त्यांच्यासोबत आमचा फोटो काढला नाही. मंगलाताई तेव्हा घरी नव्हत्या. (जयंत नारळीकर व मंगलाताई यांचं सहजीवन पाहून मला नेहमीच पु. ल. व सुनीताबाईंची आठवण होते. नंतर नारळीकरांबाबत अनेकांनी सोशल मीडियावर जे लिखाण केलं, त्यात हाच उल्लेख केलेला पाहून माझं ते वाटणं अगदीच चुकीचं नव्हतं, याची खातरी पटली.) तेव्हाची आणखी एक गंमत अजून लक्षात आहे. नारळीकरांच्या दारात पुठ्ठ्याचं एक साधं घड्याळ केलं होतं. अगदी पूर्वी लहान मुलं विज्ञान प्रदर्शनात वगैरे करायची तसं. त्या घड्याळात शून्य लिटर, अर्धा लिटर, एक लिटर, दीड लिटर व दोन लिटर असं लिहिलं होतं आणि त्याप्रमाणे तो काटा त्यावर ठेवला जाई. (आम्ही गेलो तेव्हा काटा एकवर होता.) ते घड्याळ पाहून मला तेव्हा खूप मजा वाटली होती, हे खरं.
नंतर आम्ही वारज्यात राहत असलेल्या ईशाननगरीजवळ अचानक त्यांचं व्याख्यान असल्याचं मला समजलं. हे साधारण २०१६ असावं. त्या व्याख्यानाला अर्थातच अलोट गर्दी झाली होती. पण आमचीच सोसायटी असल्यानं पदाधिकाऱ्यांना सांगून मी नारळीकर सरांना भेटलो. आधीच्या भेटीची आठवण करून दिली. तेव्हा मी लोणी सरांकडून ‘चार नगरांतले माझे विश्व’ची प्रत बहुतेक परत मागून घेतली. (याचं कारण, नारळीकर सर एरवी नुसती स्वाक्षरी देत नसत. एक तर त्यांच्या पुस्तकावर देत असत किंवा मुलांनी मागितली, तर ते त्यांना पोस्टकार्डवर एक विज्ञानविषयक प्रश्न विचारायला सांगत व त्याला उत्तर म्हणून कार्ड पाठवत व त्यावर स्वाक्षरी करत असत.)  माझ्याकडं ती प्रत असल्यानं मला त्यांनी पहिल्या पानावर स्वाक्षरी दिली, हे सांगणे न लगे. या भेटीच्या वेळी नील लहान होता. या वेळी मात्र मी नारळीकरांसोबत त्याचा फोटो आवर्जून काढून घेतला.
लोणी सरांचा व सरांचा दीर्घकाळ परिचय होता. लोणी सर ‘सकाळ’मध्ये वृत्तसंपादक असताना नारळीकर सरांचे काही लेख आम्ही प्रसिद्ध केले होते, तेव्हा ‘सरांना त्यांच्या नावामागे ‘डॉ.’ लावलेलं फारसं आवडत नाही; त्याऐवजी ‘प्रा.’ लिहीत जा,’ असं लोणी सर डेस्कवरील सर्वांना आवर्जून सांगायचे.
केंब्रिजमध्ये शिकलेल्या नारळीकरांना ‘प्रोफेसर’ या शब्दाची महती चांगलीच ठाऊक होती. आपण त्याला मराठीत समानार्थी असलेला ‘प्राध्यापक’ हा शब्द फारच कॅज्युअली वापरतो. केंब्रिजमध्ये असलेल्या अनेक नोबेल विजेत्या प्रोफेसरांएवढंच मोठेपण नारळीकर सरांकडं होतं, हे निर्विवाद. या मोठेपणाचं ओझं त्यांना कधीही झालं नाही. ‘विद्या विनयेन शोभते’ हे सुभाषित त्यांना अगदी शोभून दिसे. एवढ्या उत्तुंग उंचीच्या माणसांच्या सहवासात काही क्षण जरी घालवले तरी त्या सहवासाचा कस्तुरीसारखा सुगंध आपलं आयुष्य दरवळून टाकतो. विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारांची जोपासना करत राहणं हीच प्रा. नारळीकरांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

---

20 Apr 2025

कूर्ग ट्रिप १२-१५ एप्रिल २५ (भाग ३)

कावेरीच्या उगमापासून कॉफीच्या बियांपर्यंत...
-------------------------------------------------------


कूर्ग, १४ एप्रिल २५

आज ब्रेकफास्ट झाल्यावर बरोबर नऊ वाजता अराफात हॉटेलपाशी आला. आम्ही लगेच निघालो ते तलकावेरीला. हे कावेरी नदीचं उगमस्थान. मडिकेरीपासून साधारण ४५ किलोमीटर अंतर. आठ किलोमीटर आधी त्रिवेणी संगम लागतो. आम्ही मंगळुरू रस्त्याकडे निघालो. आम्हाला परवा येताना तलकावेरीकडं जाणाऱ्या रस्त्याची मोठी कमान दिसली होती. मडिकेरीपासून साधारण सात-आठ किलोमीटर अंतरावर हा फाटा आहे. आम्ही तिकडं वळलो. आतला रस्ता आतापर्यंतच्या रस्त्यांच्या तुलनेनं थोडा लहान व काही काही ठिकाणी जरा खराब होता. अराफात सारखा म्हणत होता, की इकडं यायचं तर अगदी सकाळी सहा वाजता निघायला पाहिजे. त्या रस्त्यावर मस्त वातावरण असतं. क्वचित धुकं वगैरेही असतं. अर्थात आम्ही नऊ वाजता निघालो असल्यानं थोड्याच वेळात ऊन चांगलंच तापलं आणि काचा बंद करून कारमधला एसी सुरू करावा लागला. तलकावेरीकडं जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निसर्गानं अक्षरश: सौंदर्याची उधळण केली होती. डोंगरदऱ्या, उतारावर घनदाट झाडी, छोटी छोटी गावं, मंगलोरी कौलं घातलेली टुमदार घरं असं ते सगळं दृश्य म्हणजे कुठल्याही चित्रकारासाठी पर्वणीच. (मध्येच बोलताना मंगलोरी कौलांचा विषय निघाला, तर अराफात म्हणाला, की आम्हीही इकडं त्याला कौलं असंच म्हणतो.) 
साधारण तास-सव्वा तासानं आम्ही त्रिवेणी संगमापाशी पोचलो. इथं बागमंडला मंदिर आहे. त्रिवेणी संगमावर आता मोठा पूल झाला आहे. इथं कावेरी, कनिके व संज्योती (गुप्त) या नद्यांचा संगम आहे. कावेरीच्या उगमापासून हे स्थान अगदी जवळ असल्याने इथं नदीचं पात्र अगदी लहान होतं. दुसरी नदीही लहान होती. त्यामुळं तो त्रिवेणी संगमाचा परिसर तसा अगदी छोटा होता. तिथं टुमदार घाट बांधलेला होता. आम्ही तिथं जाऊन पाण्यात पाय भिजवले. काही काही भाविक पाण्यात उतरून स्नान करत होते. बाजूला दोन छोटी मंदिरं होती. ऊन रणरणायला लागलं असलं, तरी एकूण तो परिसर रमणीय होता. आम्ही तिथून मग बागमंडला मंदिरात गेलो. इथं बाहेर चपला काढण्यासाठी स्टँड होते आणि सगळीकडं एका जोडाला तीन रुपये असा स्टँडर्ड दर होता. शिवाय प्रत्येक ठिकाणी यूपीआयचा स्कॅनरही असायचा. इथंही बाहेरच ड्रेसकोडचा बोर्ड होता. आत मोबाइलवरून फोटो काढण्यास मनाईचे फलक लावले होते. आम्ही गेलो तेव्हा तिथं गर्दी कमी होती, तरीही एक गार्ड आत फिरून कुणी फोटो, सेल्फी वगैरे काढत नाहीय ना, हे अगदी डोळ्यांत तेल घालून पाहत होता. शिवाय तो ड्रेसकोडबाबतही बराच कडक असावा. कारण आम्ही नंतर बाहेर पडलो, तेव्हा स्कर्ट घातलेली एक ललना बाहेरूनच दर्शन घेताना दिसली. आम्ही अगदी थांबून पाहिलं, पण ती काही आत गेली नाही. गार्ड समोरच उभा होता. हे मंदिर छान होतं. इथल्या पद्धतीप्रमाणे सुरुवातीलाच जे दार होतं, त्यावर मोठं गोपुरासारखं बांधकाम होतं. त्या तुलनेत आतल्या मंदिराचा कळस उंचीनं अगदीच लहान होता. मंदिराच्या संकुलाला चारी बाजूंनी मजबूत दगडी भिंतींचं कुंपण होतं. आतमध्ये आपल्यासारख्याच देवळी होत्या. तिथं काही भाविक सावलीला बसून होते. आतमध्ये मुख्य मंदिरासोबत सुब्रह्मण्यम, गणपती यांची छोटी छोटी मंदिरं होती. तिथं खूप शांत, छान वाटलं. दर्शन घेऊन थोडा वेळ ‘देवाचिये द्वारी बसलो क्षणभरी’! अर्थात पुढं निघायचं होतं. 

बाहेर आलो. ऊन जाणवत होतं, म्हणून एके ठिकाणी शहाळ्याचं पाणी प्यायलो. अराफातला बोलावलं. आता पुढचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आणखी चढणीचा होता. छोटेखानी घाटच. मात्र, आडवा पसरलेला. अखेर अर्ध्या तासानं ती तलकावेरी क्षेत्राची कमान दिली. इथं बाहेर बऱ्याच चारचाकी गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. अनेक स्थानिक मंडळी दुचाकीवरूनही सहकुटुंब सहलीला आल्याप्रमाणे तिथं आलेली दिसली. इथंही अगदी बाहेरच चपला स्टँड होता. तिथून आत त्या फरशीच्या पायऱ्यांवरून भर उन्हात चालत जायचं होतं. अर्थात सगळेच लोक तसे अनवाणीच निघाले होते. त्या कमानीखालीच जरा सावली होती. आम्ही पाच मिनिटं तिथं थांबून, फोटो सेशन करून पुढं निघालो. काही पायऱ्या चढून गेल्यावर कावेरीचा उगम असलेलं ते कुंड लागलं. तिथं पुजारी आणि सुरक्षारक्षक बसले होते. पाण्यात नाणी टाकू नयेत, हात-पाय धुऊ नयेत, फोटो काढू नयेत वगैरे बऱ्याच सूचनांचा फलक तिथं होता. आम्ही त्याचं पालन करीत फक्त कुंडाचं व तिथल्या देवीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. काही भाविक मात्र तिथंही मोबाइल काढून शूटिंग करत होते. मग त्यांना त्या सिक्युरिटी गार्डचा ओरडा खावा लागला. शेजारी आणखी एक कुंड होतं. तिथं मात्र भरपूर नाणी पडलेली दिसली. इथं बहुतेक ती नाणी टाकून इच्छा व्यक्त करायची जागा असावी. आम्हीही त्या कुंडात नाणी टाकली. इथून आणखी वर डोंगरावर जाण्याचाही एक रस्ता होता. मात्र, तेव्हा ऊन झालं असल्यानं आणि आम्हाला लवकर परत निघायचं असल्यानं आम्ही वर गेलो नाही. अर्धात जिथं कुंड होतं, तिथूनही समोरचं निसर्गदृश्य अत्यंत सुंदर दिसत होतं. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगांनी तो सर्व परिसर व्यापला होता. त्यामुळं एवढ्या उन्हातही डोळ्यांना गार वाटत होतं. थोडा वेळ तिथं फोटोसेशन करून आम्ही खाली उतरलो. अराफातभाई आमची वाट पाहत थांबलेच होते. लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा मडिकेरीत येईपर्यंत आम्हाला एक वाजला. मग आधी ‘अंबिका उपाहार’ या अराफातच्या लाडक्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. इथं बदल म्हणून मी नॉर्थ इंडियन थाळी मागवली. भरपूर जेवण झालं. नंतर लस्सी मागवली.
जेवणं झाल्यावर आम्हाला आता पहिल्या दिवशी राहिलेल्या कॉफी प्लँटेशनकडं जायचं होतं. अराफातला सकाळीच तसं सांगितल्यामुळं तो खूश झाला होता. आम्ही लगेच तिकडं गेलो. पहिल्या दिवशी आम्हाला भेटलेला उंचापुरा, भरघोस मिशा असलेला माणूसच तिथं होता. ‘तुम्ही परत आलात हे बघून आनंद झाला,’ असं त्यानं आवर्जून सांगितलं. आम्ही प्रत्येकी दोनशे रुपयांचं तिकीट काढलं. इथं मात्र स्कॅनरची सोय नव्हती. त्यामुळे रोख पैसे द्यावे लागले. त्यांनी एक तरुण मुलगा गाइड म्हणून दिला. त्यानं अर्ध्या तासाची पायी भटकंती करून ते सर्व प्लँटेशन आम्हाला नीट दाखवलं. सुरुवातीला हातात काठ्या दिल्या. त्यामुळं ट्रेक करत असल्याचा फील येतो म्हणे. त्या मुलानं आम्हाला कॉफीची निरनिराळी झाडं दाखवली. कॉफीच्या बिया, पानं, त्या बिया काढण्यापासून ते कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सर्व काही तिथं दाखवण्यात आलं. स्थानिक वेगळी झाडं बघायला मिळाली. 'सिल्व्हर ओक'ची झाडं तिथं विपुल प्रमाणात दिसली. वेगळ्या आकाराच्या संत्र्यांचं एक झाडही होतं. सागाची उंच झाडं होती. एकूण दोनशे रुपये तिकीट काढलं, त्याचं सार्थक झालं. ही पाहणी संपवून आम्ही वर येऊन बसलो, तर त्यांनी तिथली स्पेशल ब्लॅक कॉफी आणून दिली. ती अतिशय सुंदर होती. शिवाय अर्धा तास पायपीट केल्यानंतर ती मिळाल्यामुळं गरम असली, तरी छान वाटली. त्यानंतर मग तिथला कॉफीचा कारखाना बघायला गेलो. तिथल्या माणसानं अगदी बारकाईनं पुन्हा एकदा सगळी प्रक्रिया सांगितली. कॉफीचे विविध प्रकार दाखवले. तिथली स्पेशल ‘कावेरी कॉफी’ही दाखवली. यात मार्केटिंगचा भाग अर्थातच होता. मात्र, अमुक एक घ्याच, अशी सक्ती अजिबात नव्हती. त्यामुळं आम्ही वरच्या दुकानात जाऊन आम्हाला हवी ती खरेदी केली. 

आता इथून आम्हाला जायचं होतं ते फोर्ट म्युझियमला. मडिकेरी गावाच्या अगदी मध्यभागी हा जुना किल्ला आहे. आम्ही अगदी थोड्याच वेळात तिथं पोचलो. एका जुन्या चर्चच्या जागी हे शासकीय संग्रहालय आहे. मात्र, त्या दिवशी आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी असल्यानं हे संग्रहालय बंद होतं. मग आम्ही त्या किल्ल्याच्या परिसरात नुसता एक फेरफटका मारला. मुख्य इमारतीत आता न्यायालय व इतर काही सरकारी कार्यालये आहेत. समोरच्या बाजूला दोन हत्तींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. तिथं शेजारी या किल्ल्याची माहिती लिहिली होती. कूर्गच्या राजाने १६८१ मध्ये हा किल्ला उभारला. किल्ल्यात एक गणपती मंदिरही होतं. आम्ही तिथं जाऊन दर्शन घेतलं. पलीकडून गावात निघणारा आणखी एक रस्ता व मोठं दगडी प्रवेशद्वार होतं. ते पाहून मला आपल्या पन्हाळ्यावरील ‘तीन दरवाजा’ची आठवण आली. नील त्या वरच्या तटाच्या भिंतीवरही जाऊन आला. तिथं आणखी काही मराठी पर्यटक होते. थोडा वेळ रेंगाळून निघालो,
आता आम्हाला शेवटच्या पर्यटनस्थळी - राजाज टोम्ब - इथं जायचं होतं. इथल्या राजांची समाधी असलेली ही एक बाग आहे. तिकडं जाताना अराफातनं जुन्या मडिकेरी गावातून मुद्दाम कार नेली. त्यामुळं आम्हाला ते शांत, निवांत पहुडलेलं गाव बघता आलं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणाची (शिरूर, वैजापूर, येवला, फलटण, श्रीगोंदा इ,) आठवण येईल, असं ते ‘सुशेगाद’ गाव होतं. दोन दोन मजली घरं, समोर छोटं अंगण, तिथं लावलेल्या दुचाकी गाड्या, घरांसमोर ठेवलेली छोटी फुलझाडं, काही ठिकाणी रांगोळ्या, तर काही घरांसमोर बकऱ्या बांधलेल्या अशा संमिश्र वस्तीच्या त्या भागातून जाताना त्या गावाचं ‘खरं’ दर्शन घडलं. आता अराफात त्याच्या घरी वगैरे नेतो की काय, असं आम्हाला क्षणभर वाटलं. पण तो पक्का प्रोफेशनल होता. त्यानं तसं काही न करता आम्हाला थेट त्या राजांच्या समाधीपाशी सोडलं. तिथंही तिकीट होतं. ते काढून आम्ही आत शिरलो, तेव्हाच आभाळ भरून आलं होतं. त्या दोन समाध्या आमच्या जेमतेम पाहून झाल्या आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. आम्ही पळतच येऊन कारमध्ये बसलो. इथून पुढं ‘ॲबी फॉल’कडे जायची आमची इच्छा नव्हती. जोरदार पाऊस आला तर सगळा रस्ता चिखलाचा आहे आणि तुम्हालाही भिजावं लागेल, असं अराफात म्हणाला. एकूणच तिथून सहा किलोमीटरवर असलेल्या आणि आता अगदी क्षीण धार पडत असलेल्या त्या धबधब्याकडं जायला तोही फारसा उत्सुक नव्हता, हे आमच्या लक्षात आलं. मग आम्हीही म्हटलं, की नको आता जायला तिकडं. चला हॉटेलवर. पडत्या फळाची आज्ञा घेऊन अराफातनं आम्हाला थेट हॉटेलवर आणून सोडलं. तेव्हा जेमतेम साडेचार, पाचच वाजले होते. मात्र, आता पावसानं चांगलाच जोर पकडला होता. उद्या आमचं चेक-आउट होतं, त्यामुळं आम्ही अराफातला सकाळी नऊ वाजता यायला सांगितलं अन् त्याचा निरोप घेतला.
आज आम्ही लवकरच हॉटेलवर आल्यामुळं आणि बाहेर पाऊस पडत असल्यानं रेस्टॉरंटमधूनच वर चहा मागवला. इथं कॅरमची पण सोय होती. मग नीलनं खाली रिसेप्शनला फोन करून कॅरम मागवला. थोड्याच वेळात हॉटेलचा माणूस कॅरम घेऊन आला. अगदी पावडरसह. मी खूप दिवसांनी कॅरम बोर्डवर हात साफ करून घेतला. काही काही फेव्हरिट शॉट जसेच्या तसे जमताहेत का, ते पाहिलं. चक्क जमले. आपल्या मेंदूची क्षमता अचाट असते हे खरं. किती तरी वर्षांनी खेळूनही मधल्या गोलात असलेली सोंगटी डावीकडच्या बॉक्समध्ये एका फटक्यात पाडता आली. तो विशिष्ट कट अगदी जसाच्या तसा जमला, याचा आनंद झाला. थोडा वेळ कॅरम खेळलो, पण आम्ही बाल्कनीत बसलो होतो आणि तिथ आता जोरात पाऊस यायला लागला. मग आत येऊन उरलेला डाव खेळलो. मग नीलला कंटाळा आल्यावर कॅरम परत देऊन टाकला. खरं तर आज आम्हाला मडिकेरीतल्या आणखी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन डिनर करायचं होतं. मात्र, पाऊस एवढा वाढला, की आम्ही तो बेत रद्द केला. शेवटी हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो. आज सुट्टीचा शेवटचा दिवस असल्यानं बरेच लोक चेक-आउट करून गेले होते. त्यामुळं डिनरला तिथं फक्त आम्ही तिघंच होतो. अर्थात त्यांनी व्यवस्थित सर्व्ह केलं. जेवून आम्ही वर आलो. आता सगळं आवरून ठेवायचं होतं. उद्या ब्रेकफास्ट करून परतीचा प्रवास सुरू करायचा होता...


कूर्ग/मंगळुरू/बंगळुरू/पुणे, १५ एप्रिल २५

मंगळवारी सकाळी लवकर उठून आवरून ठेवलं. ब्रेकफास्ट केला. बॅगा आवरून ठेवल्या. बरोबर नऊ वाजता अराफात आला. आम्ही इथल्या रेस्टॉरंटमध्ये जे काही दोन-तीन दिवस जेवलो होतो, त्याचं बिल त्यांनी एकदम दिलं. मग ते पेमेंट केल्यावर चेक-आउट पूर्ण झालं. आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आमचं बंगळुरूला जाणारं विमान मंगळुरूवरून दुपारी ३.२५ वाजता निघणार होतं. मध्ये १३७ किलोमीटरचा प्रवास होता. आम्हाला निदान दोन वाजता तरी मंगळुरूत पोचायला हवं होतं. त्यामुळं आम्ही नऊ वाजता निघालो. मात्र, रस्त्यानं फारशी वाहतूक नसल्यानं आम्ही १२.३० वाजताच मंगळुरू शहरात पोचलो. मग दुपारचं जेवण शहरातच कुठल्याही तरी रेस्टॉरंटमध्ये करून घ्यावं, असं ठरवलं. त्यानुसार अराफातनं आम्हाला एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. खरं तर ते रेस्टॉरंट अगदीच साधं होतं. मात्र, आता आमच्याकडं वेळ नव्हता. अर्थात तिथं जेवण व्यवस्थित मिळालं. मग जेवून आम्ही लगेच विमानतळाकडं निघालो. बरोबर दीड वाजता आम्ही विमानतळावर पोचलो. अराफातला निरोप दिला. त्याच्या दोन मुलींसाठी खाऊसाठी पैसे दिले. त्यामुळं तो खूश झाला. आम्ही ‘डिजियात्रा’त नोंदणी केलेली असल्यानं आमचं चेक-इन फटाफट झालं. हा विमानतळ अगदीच छोटा होता. गर्दीही कमी होती. इथून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइट जास्त संख्येने होत्या. आमचं विमान वेळेत आलं. वेळेत निघालं. इथून टेक-ऑफ करतानाही विमान दरीच्या बाजूकडे जाईल आणि तिथून विरुद्ध दिशेने उडेल असा माझा अंदाज होता. तसंच झालं. त्या अपघातानंतर केलेला का कायमस्वरूपी इलाज असणार. आमचं फ्लाइट अर्ध्याच तासाचं होतं. मात्र, बंगळुरू विमानतळावर ‘गो अराउंड’ करावं लागल्यानं जरा वेळ लागला. तरी पाच वाजता आम्ही लँड झालो होतो. इथून आम्ही आतल्या आत जे ‘अन्तर्राज्यीय स्थानांतर’ असतं, तिकडं जाऊ शकलो. तिथंही ‘डिजियात्रा’मुळं प्रवेश सुकर झाला. (पुण्यात प्रवास सुरू करताना माझं ‘डिजियात्रा’ चाललं नव्हतं. त्यामुळं मला रेग्युलर रांगेतून आत यावं लागलं होतं. सुदैवानं मंगळुरू व बंगळुरूत ती अडचण आली नाही आणि माझाही प्रवेश सहज झाला.) इथल्या गेटवर जाऊन बसलो. महागामोलाची कॉफी घेतली. पाण्याची बाटलीही अशीच महागाची विकत घेतली. (आमची स्टीलची पाण्याची बाटली अराफातच्या गाडीतच विसरली. त्याचा फोनही आला होता. पण काय करणार? राहू दे म्हटलं आता तुम्हाला...) गेटची एकदा बदलाबदली होणं हे जवळपास रिच्युअल असतं. ते झालं. मग त्या गेटवरून बोर्डिंग सुरू झालं आणि आम्ही एकदाचे पुणेगामी विमानात बसलो. खरं तर हा तासाभराचा प्रवास; पण पुण्याला चक्क लँडिंग सिग्नल मिळेना. पुण्यावरही आमचं ‘गो अराउंड’ सुरू झालं. मी तसा बऱ्याचदा पुणे विमानतळावर उतरलोय, मात्र इथं ‘गो अराउंड’ करायची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. आता पुण्यातल्या रस्त्यांवरच्या ट्रॅफिक जॅमची लागण आकाशालाही झालेली दिसते. असो. फार उशीर झाला नाही. आम्ही साडेआठला उतरलो. मग त्या बॅटरी ऑपरेटेड गाड्यांतून एअरो मॉलला गेलो. तिथून ‘रॅपिडो’ची कॅब बुक केली. मात्र, त्यांचा अधिकृत थांबा तिथं नसल्यानं आम्हाला त्या कॅबवाल्यानं सिम्बायोसिस रस्त्यानं जरा मागं बोलावलं. मग तिथवर चालत गेलो. कॅबनं साडेदहा वाजता घरी सुखरूप पोचलो. 
कूर्गची ट्रिप अगदी जशी व्हायला हवी होती तशी झाली. थोडं आमचं नियोजन, बरीचशी ‘विहंग टूर्स’च्या परांजपे दाम्पत्याची आस्था आणि स्थानिक नागरिक व हवामानाची साथ यामुळं ही ट्रिप यशस्वी झाली. 
या ट्रिपला आम्हाला सर्व मिळून माणशी ३० हजार रुपये खर्च आला. 
(‘विहंग टूर्स’चे शैलेंद्र परांजपे यांचा फोन नंबर - ९५५२५५७५७२)


(समाप्त)

---------

बंगळूर-म्हैसूर डायरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

--------

19 Apr 2025

कूर्ग ट्रिप १२-१५ एप्रिल २५ (भाग २)

कावेरीअम्मा अन् हत्ती...
-----------------------------

कूर्ग, १३ एप्रिल २५.

सकाळी साडेसहाच्या सुमारास जाग आली अन् बाल्कनीत गेलो तर समोर डोंगरावर सूर्यदेव उगवलेले. घरबसल्या असं सूर्योदयाचं अप्रतिम दृश्य बघण्याचा योग खूप दिवसांनी आला. थोड्या वेळानं दोन पक्षी तिथून उडत गेले आणि अगदी शाळेत आपण सूर्योदयाचं चित्र काढतो तसं ते ‘पिक्चर परफेक्ट’ झालं. रूममध्ये चहा-कॉफीची सोय होती. त्या बाल्कनीतल्या खुर्चीवर बसून, अत्यंत थंडगार हवेत, हातात गरमागरम चहाचा कप घेऊन तो सूर्योदय बघणं हे केवळ परमसुख होतं. आजचा दिवस झकास जाणार याची खात्री पटली. हॉटेलमध्ये आम्हाला ब्रेकफास्ट होता. तो घेऊन आम्ही बरोबर नऊ वाजता तयार राहिलो. आज नौशाद नावाचा ड्रायव्हर येणार आहे, हे परांजपेंनी काल रात्री मेसेज करून कळवलं होतं. फोन केला तर नौशादमियाँ खाली येऊन थांबले होते. आम्ही कारमध्ये बसलो आणि आमच्या पहिल्या पर्यटनस्थळाकडं निघालो - दुबारे एलिफंट कॅम्प. 
हे ठिकाण मैसुरू रोडवर आणि कूर्गपासून साधारण ४०-४५ किलोमीटर अंतरावर होतं. सकाळच्या त्या हवेत, कोवळ्या उन्हात प्रवास करताना अतिशय आल्हाददायक वाटत होतं. नौशादमियाँ अगदी मितभाषी होते. अराफातच्या बरोबर उलट. त्यामुळं मीच बडबड करत होतो. रस्ता अतिशय सुंदर होता. (हेआता गृहीतच धरावं.) मला स्वत:ला काही क्षण तिथं ड्रायव्हिंग करायचा मोह झाला. साधारण ३५ किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही उजवीकडं वळलो. मुख्य रस्ता सोडून आपण आत वळलो, की आत कच्चा, खराब रस्ता असणार हा आपल्याकडचा अनुभव. इथं मात्र आतला रस्ताही तेवढाच चांगला होता. साधारण आठ किलोमीटरवर आम्ही पुन्हा डावीकडं वळलो. तिथं लगेच तो दुबारे कॅम्प आला. तिथं पार्किंगसाठी भरपूर जागा होती. सकाळची वेळ असली तरी भरपूर गर्दी होती. तो चांगलाच प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट असणार, हे दिसत होतं. दोन्ही बाजूंना दुकानं होती. एका ठिकाणी स्वच्छतागृहाची चांगली व्यवस्था होती. तिथं पाच रुपये घेत होते, पण त्यामुळं ती स्वच्छतागृहं खरोखर स्वच्छ होती. एकूणच पर्यटनस्थळावर पर्यटकांची चांगली काळजी घेण्याची वृत्ती इथं दिसली. आम्ही तातडीनं नदीच्या बाजूला धाव घेतली. कावेरीचं पात्र दृष्टीस पडलं. नदीपात्राच्या कडेला बांधलेल्या भिंतीमधूनच खाली पायऱ्या उतरत होत्या. तिथून थेट नदीच्या पाण्यातच आपण प्रवेश करतो. बऱ्याच ठिकाणी खाली वाळूची पोती वगैरे टाकली आहेत. पण काही ठिकाणी पाणी गुडघ्यापेक्षाही खोल होतं. शिवाय निसरडे दगड आणि काही ठिकाणी पाण्याला असलेला थोडासा वेग यामुळं ही नदी ओलांडणं हा चांगलाच थ्रिलिंग अनुभव ठरला. आम्ही सोबत एक ज्यूटची पिशवी घेऊन गेलो होतो. त्यात तिघांच्याही चपला टाकल्या व अनवाणी त्या पाण्यात उतरलो. एकमेकांचे हात धरत, सावरत ती नदी ओलांडणं हा फार भन्नाट अनुभव होता. साधारण दोनशे मीटर अंतर पार करून, बऱ्याच लोकांसोबत आम्हीही एकदाचे पलीकडच्या तीरावर पोचलो.हा कॅम्प साधारण साडेअकरापर्यंत सुरू असतो. आम्ही पोचलो तेव्हा दहा वाजले होते. तीन हत्तींचा एक कळप नदीच्या त्या बाजूला अंघोळीला आल्याचं आम्हाला नदी ओलांडताना दिसलं होतं. पलीकडच्या तीरावर पोचल्यावर दरडोई १४० रुपयांचं तिकीट काढून आम्ही आत गेलो. सुरुवातीला या हत्ती प्रशिक्षण केंद्राची माहिती होती. आजूबाजूच्या शेतांत त्रास देणारे हत्ती पकडून वन विभाग त्यांना इथं आणून ठेवतो. यातल्या काही हत्तींना पुन्हा जंगलात सोडलं जातं, तर काही हत्तींना प्रशिक्षण दिलं जातं. यातले काही हत्ती मैसुरूच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवातही सहभागी होतात. तिथं वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती साखळदंडांनी बांधून ठेवले होते. त्यातले काही हत्ती पर्यटकांना सरावले होते, असं दिसलं. सोंड उंचावून दाखव, मान वळवून दाखव, झाडावरचा पाला तोडून दाखव असले प्रयोग काही हत्तींनी सुरू केले. काही हत्तींचे माहूत पैसे घेऊन, पर्यटकांच्या डोक्यावर सोंड ठेवून आशीर्वाद देण्याचे प्रात्यक्षिक त्यांच्या हत्तींकडून करवून घेत होते. आम्हाला त्या हत्तींची नदीवरची अंघोळ बघण्याची इच्छा होती. मात्र, पुढची अंघोळ आता साडेअकरा वाजता होणार असं कळलं. आम्ही तो सगळा भाग फिरून बघितला. तिथं आता चांगलाच उकाडा जाणवू लागला होता. आम्ही थोडा वेळ तिथल्या बाकांवर बसलो. आता नदीवर इकडं येणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत होती. आम्हाला परत निघायचं होतं. मग पुन्हा एकदा हत्तींसोबत फोटोसेशन केलं आणि परतीची वाट धरली. 

परत निघताना त्या नदीत आता चांगलीच गर्दी झाली होती. तिथं गर्दी नियंत्रित करायला कोणी नव्हतं. लोक कसेही येत होते. येणारी झुंड मोठी असल्यानं जाणाऱ्यांना वाटच मिळत नव्हती. शेवटी कसेबसे पलीकडं पोचलो. अगदी त्या काठावर दोन सुरक्षारक्षक गर्दी नियंत्रित करताना दिसले. मात्र, त्या काळात अनेक जण, विशेषत: मुली त्या पाण्यात घसरून पडल्या. कडेवर लहान मूल घेऊन ही नदी ओलांडणारेही कही महाभाग होते. त्यातल्या एकाला तर घसरल्यावर मीच हात देऊन सावरलं. एकूण येताना जेवढा उत्साह होता, तेवढा परतताना काही राहिला नाही. शेवटी एकदाची नदी ओलांडली. कावेरीअम्माला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो. नौशादमियाँना फोन केल्यावर ते तातडीनं हजर झाले आणि आम्ही पुढच्या ठिकाणाकडं निघालो. 
आता आम्ही गोल्डन टेम्पल हे ठिकाण बघायला निघालो होतो. थोड्याच वेळात आम्ही त्या मॉनेस्ट्रीपाशी पोचलो. समोर एका मोठ्या मैदानात पार्किंगची व्यवस्था होती. आमच्या ड्रायव्हरनं मॉनेस्ट्रीच्या दारात सोडलं आणि तो निघून गेला. या संकुलाचं नाव ‘नामड्रोलिंग मॉनेस्ट्री’. पेनॉर रिनपोचे यांनी १९६३ मध्ये ही मॉनेस्ट्री सुरू केली. तिबेटी बुद्धांचं हे सर्वांत मोठं शिक्षण संकुल आहे, असं मानलं जातं. इथं बांधलेलं मंदिर सोन्याच्या पत्र्यानं मढवलेलं आहे, म्हणून त्याला ‘गोल्डन टेम्पल’ असंही म्हटलं जातं. तिबेटी बुद्ध धर्माच्या नाइंगमा या वंशाचे हे शैक्षणिक संकुल असून, इथं सुमारे सात हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. हा विहार आणि तिथला एकूणच परिसर भव्य आणि शांत वाटला. मुख्य विहारात बुद्धाची अतिशय शांत, ४० फूट उंच मूर्ती आहे. शेजारी आणखी दोन गुरूंच्या तेवढ्याच भव्य मूर्ती आहेत. त्या परिसरात पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आम्ही बाहेर पडलो, तेव्हा तिथं बरंच उकडत होतं. समोर दुकानं होती. एका दुकानात आम्ही मलेशियाचं एक सॉफ्ट ड्रिंक घेतलं. ते प्यायल्यावर जरा बरं वाटलं. शेजारी आणखी एक स्मृतिवस्तूंचं दुकान होतं. तिथंही चक्कर मारली. थोड्या वेळानं आम्ही तेथून निघालो. आता साधारण एक वाजत आला होता. नौशादमियाँना परत बोलावून घेतलं. आता जेवायचं होतं. मग त्यांनाच एखादं हॉटेल दाखवायला सांगितलं. त्यांनी रस्त्यात ‘नक्षत्रम्’ नावाचं एक व्हेज हॉटेल सुचवलं. आम्ही तिथं थांबून जेवलो. मी रीतसर साउथ इंडियन मिल्स मागवलं. त्यात भरपूर भात आणि तीन-चार प्रकारच्या भाज्या, वरण, रस्सम असं सगळंच आलं. सर्व ‘भातार्पणमस्तु’ करून खाल्लं. त्यामुळं पोट व्यवस्थित भरलं.
इथून आमचा पुढचा स्पॉट होता निसर्गधाम. ही एक बागच आहे. या बागेच्या दारात भरपूर दुकानं होती. एक प्रकारचं शॉपिंग कॉम्प्लेक्सच. तिथं अत्यंत स्वस्तात म्हणजे शंभर रुपयांना एक टी-शर्ट वगैरे अशी दुकानं होती. तिथं प्रचंड गर्दी उसळली होती, हे सांगायला नकोच. आम्ही आधी बागेत जायचं ठरवलं. दरडोई ४० रुपये तिकीट काढून आम्ही आत गेलो. आत नदीवरचा एक झुलता पूल होता, तो छान होता. मात्र, त्या पुलाच्या मधोमध गेलं, की लोक मोबाइल काढून सेल्फी काढत बसायचे. आम्हीही तेच केलं. नंतर दोन्ही बाजूंचे सुरक्षारक्षक ओरडायला लागले, की मग लोक पुढं सरकायचे. निसर्गधाम या उद्यानात प्रामुख्याने बांबूचं बन होतं. एका बाजूला कॉटेजेस होती. पण तिथं कुणी राहताना दिसलं नाही आणि ती अगदीच पर्यटकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गात होती. आम्ही आतपर्यंत चक्कर मारली. त्या भागातील वेगवेगळ्या जाती-जमातींच्या नृत्य प्रकाराचे पुतळे उभारले होते. पुढं एक बर्ड पार्क लागलं. इथं पुन्हा वेगळं तिकीट होतं. ते काढून आत गेलो. आत मकाउसारख्या पक्ष्यांसोबत फोटो काढून घेण्याची सोय होती. त्याला अर्थात पुन्हा पैसे होते. नीलला त्या पक्ष्यासोबत फोटो काढायचा होता. मग आम्ही पैसे भरले. मग तिथल्या त्या पक्षीपालक ताईंनी नीलला त्या पिंजऱ्यात नेलं आणि तो भला मोठा पक्षी त्याच्या खांद्यावर व मग हातावर ठेवून फोटो काढायला सांगितले. नीलचे फोटो काढून झाल्यावर त्या ताईंनी आता तो पक्षी मला खांद्यावर घेऊन फोटो काढायची ऑफर दिली. (एकावर एक फ्री...) माझी फारशी इच्छा नव्हती, पण शेवटी तो पक्षी खांद्यावर बसवून एकदाचे फोटो काढून घेतले. बाहेर इतरही पक्षी होते. सगळ्यांत भारी म्हणजे शहामृगांची जोडी होती. हे उंच व भव्य पक्षी सहसा बघायला मिळत नाहीत. बाकी पार्क फार मोठं नव्हतं. पण जे पक्षी बघितले ते बघून मजा आली.

पुढं गेल्यावर एका ठिकाणी झिपलाइन (दोरावरून घसरत पलीकडं जायचं) सुरू होतं. नीलला ते करायचं होतं. मग शंभर रुपये देऊन ते करून घेतलं. व्हिडिओ वगैरे काढला. येताना एक झाडावरचं मचाणवजा घर दिसलं. मग शिडीवरून तिथं चढून थोडा वेळ बसलो. एकूण या ‘निसर्गधामा’त चांगला टाइमपास झाला. येताना आम्हाला बोटिंगही करायचं होतं, पण बराच उशीर झाला होता. त्यामुळं पार्कमधून बाहेर पडलो. समोरच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सकडं पाय वळलेच. तिथं बराच टाइमपास झाला. थंड ज्यूस प्यायलो. टी-शर्टची खरेदी झाली. अखेर तिथून नौशादमियाँना फोन करून बोलावून घेतलं व एकदाचे तिथून बाहेर पडलो.
आता आम्ही पुन्हा कूर्गच्या दिशेने निघालो. रस्त्यात जोरात पाऊस सुरू झाला. मात्र, सुदैवानं तो थोड्या वेळात तो थांबला. आम्हाला आता कूर्गमधलं जनरल थिमय्या म्युझियम बघायला जायचं होतं. थोड्याच वेळात आम्ही तिथं पोचलो. मडिकेरी गावात मुख्य रस्त्यावरच हे संग्रहालय आहे. ‘सनीसाइड’ असं त्या बंगल्याचं जे नाव होतं, तेच या संकुलाला देण्यात आलं आहे. अतिशय सुंदर, मोक्याच्या जागेवर हा बंगला उभा आहे. बंगल्याच्या समोर दरीसारखा खोल भाग असून, पुढच्या डोंगरावर वसलेलं गाव इथून स्पष्ट दिसतं. तिकीट काढून आत गेल्यावर उजव्या बाजूला विमान, पाणबुडी, रणगाड्याच्या प्रतिकृती ठेवलेल्या दिसल्या. ‘अमर जवान ज्योती’चंही काम सुरू असलेलं दिसलं. संग्रहालयाच्या सुरुवातीलाच बंगल्याबाहेर एक मोठी, लष्करी बुटाची प्रतिकृती आहे. तिथं इंग्रजीतील एक कविताही लिहिली आहे. जनरल थिमय्या हे कूर्गचे भूमिपुत्र. लष्करप्रमुखपदापर्यंत त्यांची वाटचाल गौरवशाली होती. सायप्रसमध्ये त्यांना अकाली मरण आले. त्यांचा सर्व जीवनप्रवास या संग्रहालयात मांडला आहे. कूर्गमध्ये प्रवेश करताना आम्हाला एक लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा दिसला होता. तो थिमय्या यांचाच असावा, असं मला वाटलं होतं. मात्र, तो फील्ड मार्शल करिअप्पा यांचा होता. तेही कूर्गचेच भूमिपुत्र. त्यानंतर पुढच्या चौकात आणखी एक असाच लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा आहे. ते ब्रिगेडिअर मानप्पा की अशाच नावाचे भूमिपुत्र अधिकारी होत. थिमय्या यांचा घोड्यावर स्वार असलेला पुतळा आहे. तो या संग्रहालयाच्या थोडं पुढं, आमच्या हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता.

या संग्रहालयाची भेट आटोपून आम्ही मागच्या बाजूला असलेल्या कॅफेत आलो. तिथं आम्हाला छान गरमागरम कॉफी मिळाली. ती घेतल्यावर एकदम तरतरी आली. आम्ही मागच्या बाजूने बाहेर पडताना पुन्हा एकदा त्या रणगाड्यासमोर, विमानासमोर फोटो काढले. आम्ही बाहेर पडलो, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. नौशादमियाँनी आम्हाला हॉटेलवर सोडलं आणि ते गेले. आजचं आमचं स्थलदर्शन तसं लवकर आटोपलं होतं. मात्र, हॉटेलवर आल्यावर नाही म्हटलं तरी दिवसभराचा थकवा जाणवलाच. मग सरळ आराम केला. खालच्या रेस्टॉरंटमधून चहा-कॉफी रूमवरच मागवली. ती लगेच आली. चहा घेऊन बरं वाटलं. संध्याकाळी फारशी भूक नव्हती. मग इथं झोमॅटो किंवा ‘स्विगी’वरूनही तुम्ही खायला मागवू शकता, हा काल अराफातने सांगितलेला उपाय लक्षात आला. नीलला पिझ्झा मागवायचा होता. मग आम्ही तिथल्या ‘डॉमिनोज’मधून पिझ्झा मागवला. त्या छोट्याशा गावात अशी सेवा देणारे किती लोक असणार? आम्ही ऑर्डर नोंदवल्यावर तिथल्या माणसाचा नीलला थेट फोन आला. त्यानं हे आहे, ते नाही असं सांगून ऑर्डर पुन्हा कन्फर्म केली. आम्ही पुन्हा ‘जे आहे त्यातून’ निवडून ऑर्डर दिली. अर्ध्या तासात तो मुलगा पिझ्झा घेऊन हॉटेलच्या खाली आला. मग नीलनं रिसेप्शनपाशी जाऊन ते पार्सल आणलं. पिझ्झा खाल्ला, तरी मला थोडी भूक होती. मग पुन्हा खालच्या रेस्टॉरंटमधून कर्ड राइस मागवला व जरा उशिरा म्हणजे नऊ वाजता खाल्ला. आयपीएलची मॅच होतीच. आज जरा उशिरा झोपलो तरी चालणार होतं. उद्या साइटसीइंगचा शेवटचा दिवस, अराफात व परांजपे दोघांचेही फोन आले. दिवस कसा गेला, वगैरे चौकशी परांजपेंनी आपुलकीने केली. उद्याचा पहिला कार्यक्रम तलकावेरीचा अर्थात, कावेरीच्या उगमाकडं जाऊन तिथं दर्शन घेण्याचा होता. शिवाय काल राहून गेलेली आणखी एक गोष्ट खुणावत होती...


(क्रमश:)


--------------

पुढील व शेवटचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----------