20 May 2022

बंगलोर-म्हैसूर डायरी - १

दक्षिणेकडे स्वारी
---------------------


नीलची बारावी परीक्षा संपल्यावर आम्हाला कुठे तरी छोटीशी ट्रिप करायची होती. अखेर बंगलोर-म्हैसूरला जायचं ठरलं आणि १० ते १३ मे अशी चार दिवसांची ही ट्रिप गेल्या आठवड्यात झालीही. या ट्रिपची थोडी पार्श्वभूमी सांगायची तर करोनाचा उल्लेख अपरिहार्य आहे. नीलची दहावी संपल्यावर, अर्थात एप्रिल २०२० मध्ये परदेशात (म्हणजे लंडन व पॅरिस या दोन आवडत्या शहरांत) ट्रिप काढायचा महत्त्वांकाक्षी प्लॅन आम्ही आखला होता. टिपिकल नोकरदार, मध्यमवर्गीय माणसासाठी युरोपची सहल हे एक स्वप्न असतेच. बऱ्याचदा ती पंचवार्षिक योजनाही असते. बरीच आधीपासून तयारी वगैरे. हे सगळं करून आम्ही पुण्यातल्या एका पर्यटन संस्थेत पैसेही भरले. पुढे लॉकडाउन सुरू झाला आणि सगळंच राहिलं. आमची ही महत्त्वाकांक्षी ट्रिप अर्थात बारगळली. पैसे वाया गेले. सुदैवानं सगळे पैसे भरले नव्हते. पण जे भरले होते, तेही मध्यमवर्गीयांसाठी जास्तच होते. व्हिसा वगैरे झालेले असल्यानं त्यातलेही निम्मे पैसे वाया गेले आणि निम्म्या रकमेची क्रेडिट नोट मिळाली. ती २०२१ अखेर वापरता येणार होती. मात्र, नीलची बारावी असल्यानं आम्ही ती २०२२ च्या अखेरपर्यंत वाढवून घेतली आणि अखेर त्याची परीक्षा संपल्यावर ही ट्रिप आखली. त्यातही जनरीतीप्रमाणं मे महिन्यात सगळे उत्तरेकडे जातात, तसं आम्हीही नैनिताल, मसुरी वगैरे ठरवत होतो. मात्र, नेहमी आमच्यासोबत येणारा माझा आत्येभाऊ व त्याच्या कुटुंबाला यायला जमणार नाही, असं कळलं. मग सात-आठ दिवसांची मोठी ट्रिप कॅन्सल करून छोटी ट्रिप करावी, असं ठरलं. धनश्री पूर्वी म्हैसूरला गेली होती. बंगलोरला मीही यापूर्वी गेलो होतो. मात्र, सर्व शक्यता लक्षात घेऊन चार दिवसांत याच दोन शहरांत फिरणं सहजशक्य आहे, असं लक्षात आलं. त्यामुळं एकेका पर्यायावर फुली मारत अखेर इथं जायचं ठरवलं. संबंधित पर्यटन कंपनीनं विमान तिकिटांपासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित करून दिल्यानं काही प्रश्न नव्हता. विमानानंच जायचं व यायचं हे (फार वेळ हाती नसल्यानं) पक्कं होतं. मग सीझनची महाग तिकिटं काढून शेवटी मंगळवारी पहाटे बंगलोरच्या फ्लाइटमध्ये पाय ठेवला. 
आमची फ्लाइट पहाटे ४.३५ वाजता होती. मला उशिरापर्यंत जागायची सवय असल्यानं मी झोपलोच नाही. पुण्यातून मध्यरात्री कॅब मिळेल, याची खातरी होती. तरीही एक पर्याय म्हणून चुलतभावाला सांगून ठेवलं. पण तशी वेळ आली नाही आणि आम्ही वेळेत म्हणजे अडीच वाजताच विमानतळावर येऊन पोचलो. सुट्ट्यांचा सीझन असल्यानं विमानतळावर गर्दी बरीच होती. पुण्याहून सर्वाधिक फ्लाइट दिल्लीला व त्यापाठोपाठ बंगलोरला असाव्यात. मला तर पूर्वी स्टेशनवरून सुटणाऱ्या पुणे-दादर एशियाड गाड्यांची आठवण आली. अगदी तितक्या फ्रिक्वेंटली नसल्या, तरी बऱ्याच फ्लाइट या दोन शहरांसाठी सुटत असतात. त्यात पुणे व बंगलोर ही दोन आयटी शहरं असल्यानं त्या क्षेत्रांतील लोकांची बरीच ये-जा असते. हे लोक लगेच ओळखू येतात. अर्थात आम्ही निघालो त्या वेळी इतर प्रवासीही भरपूर होते. पुणे-बंगलोर फ्लाइटची अधिकृत वेळ दीड तासांची असली, तरी एक तास पाच मिनिटांतच आपण बंगलोरला पोचतो. तिथला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मुख्य शहरापासून ४० किलोमीटर दूर आहे. आम्ही २००६ मध्ये प्रथम बंगलोरला गेलो होतो, तेव्हा त्या, शहरातल्या जुन्या विमानतळावर उतरलो होतो. नंतर २०१३ मध्ये ऑफिसच्या एका कार्यक्रमासाठी जाणं झालं, तेव्हा हा नवा विमानतळ बघायला मिळाला होता. आत्ताचा विमानतळ अवाढव्य आहेच; शिवाय आता तिथं दुसऱ्या टर्मिनलचं कामही जोरात सुरू असलेलं दिसलं. बरोबर साडेसहाला आम्ही तिथं लँड झालो. विमानातच होतो तोवर आम्हाला न्यायला आलेल्या ड्रायव्हरचा फोन आला. (त्याच्या व्यावसायिकतेची पहिली झलक मिळाली.) एअरपोर्टवर जरा आन्हिकं उरकली आणि बाहेर येऊन आमच्या या ड्रायव्हरला फोनाफोनी करून शोधलं. रामू असं त्याचं नाव. तो मूळ म्हैसूरचाच होता. बहुतेक ट्रॅव्हल्स कार ‘टोयोटा इटियॉस’च्या आहेत. आमची कार पण तीच होती. एसी होताच. आम्ही लगेच म्हैसूरकडं निघालो. बाहेर आल्या आल्या जाणवलं ते ढगाळ हवामान. अगदी सकाळची वेळ असली, तरी भरून आल्यासारखं वातावरण होतं. हे वातावरण आम्ही परत निघेपर्यंत कायम राहिलं. उन्हाचा त्रास होईल ही उरलीसुरली शंकाही दूर झाली. (पुढचे चार दिवस या दोन्ही शहरांत २० ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान तापमान होतं आणि पावसाचाही अनुभव आला...)
बंगलोर शहराला अर्थातच मोठे बायपास रस्ते आहेत. त्यामुळे म्हैसूरकडे जाताना आम्हाला अगदी शहरात जावं लागलं नाही. थोड्या अंतरावरच उजवीकडं तुमकूरकडं जाणारा रस्ता लागला. अर्थात बंगलोर शहर प्रचंड विस्तारलं असल्यानं या बायपास रोडवरही गर्दी होती. पुढं बरेच सिग्नल आणि ट्रॅफिकही लागलं. सकाळी सात-साडेसातला ते तुफान ट्रॅफिक बघून हायसं वाटलं. (पुण्यात असल्यासारखंच वाटलं अगदी... आणि हे फीलिंग पुढचे चार दिवस वेगवेगळ्या कारणांनी कायम राहणार होतं...) थोड्या वेळानं रामूनं आमच्या सांगण्यावरून एका हॉटेलला गाडी थांबविली. तिथं फार रिस्क न घेता, टिपिकल इडली-सांबार आणि चहा असा नाश्ता करून निघालो.
बंगलोर ते म्हैसूर हे अंतर साधारण १५० किलोमीटर आहे. या दोन्ही शहरांदरम्यान पुण्या-मुंबईसारखा एक्स्प्रेस-वे आहे, अशी माझी समजूत होती. फार पूर्वी तसं वाचल्याचं आठवत होतं. प्रत्यक्षात हा नेहमीचा चार-पदरी, वर्दळीचा रस्ता होता. एक्स्प्रेस-वेविषयी गुगल केलं असता, या रस्त्याचं काम सुरू आहे आणि ते ऑक्टोबर २२ पर्यंत पूर्ण होणार आहे, अशा बातम्या बघायला मिळाल्या. पुढं या रस्त्यानं जाताना अनेक ठिकाणी या एक्स्प्रेस-वेचं काम सुरू असल्याचं दिसलं. ते पूर्ण झाल्यावर या दोन शहरांमधलं अंतर दोन तासांवर येईल. सध्या किमान चार तास लागतात. मात्र, कामाची एकूण स्थिती बघता ऑक्टोबर २२ पर्यंत काय, ऑक्टोबर २३ पर्यंत तरी हे काम पूर्ण होईल की नाही, असं वाटलं. 

बंगलोर ते म्हैसूर हा रस्ता मात्र आल्हाददायक आहे. एक तर हवा ढगाळ होती. दोन्ही बाजूंनी भाताची हिरवीकच्च शेती तरारली होती. कौलारू घरं, छोटी गावं आणि बांधांवर हमखास असणारी नारळाची झाडं हे टिपिकल कोकणात किंवा गोव्यात दिसणारं दृश्य इथं सतत दिसत होतं. इथल्या फेमस ‘हळ्ळी मने’ची हॉटेलंही दिसली. (हळ्ळी- गाव, मने - घर, थोडक्यात गावातलं घर... या ब्रँडची हॉटेलं इथं बरीच लोकप्रिय आहेत. पण आम्ही काही तिथं थांबलो नाही.) पहिलं शहर लागलं ते रामनगर. हे शहर दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक तर सिल्क आणि दुसरं म्हणजे ‘शोले’चं शूटिंग इथंच झालं. उजव्या बाजूला ते डोंगर दाखवत रामूनं आम्हाला ती सगळी स्टोरी सांगितली. त्या डोंगरांच्या परिसरातच सिप्पींचं रामगढ साकारलं होतं. आता हे एक मध्यम जिल्ह्याच्या ठिकाणासारखं शहर झालं आहे. पुढचं शहर होतं चन्नपट्टण. हे आपल्या सावंतवाडीसारखं खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथंही थांबण्याची इच्छा असूनही वेळ नसल्यानं थांबता आलं नाही. जाणवलेली ठळक गोष्ट म्हणजे या सर्व शहरांच्या सुरुवातीलाच त्या शहराचं वैशिष्ट्य सांगणारी मोठी कमान उभारण्यात आली आहे. उदा. वेलकम टु सिल्क सिटी रामनगर किंवा वेलकम टु टॉइज सिटी चन्नपट्टणा इ. त्यामुळं आमच्यासारख्या बाहेरच्या पर्यटकांनाही त्या शहराचं वैशिष्ट्य सहज समजत होतं.
पुढचं शहर होतं मंड्या. या गावाचं नाव फार पूर्वीपासून बातम्या भाषांतरित करताना, लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या वेळी हाताखालून गेलं होतं. प्रसिद्ध कन्नड अभिनेते अंबरीष या मतदारसंघातून उभे राहायचे. त्यामुळं सर्व देशातील ठळक लोकसभा जागांमध्ये मंड्याचा कायम उल्लेख यायचा. हा सगळा भाग आपल्या नगरसारखा साखरेचं उत्पादन घेणारा! ‘वेलकम टु शुगर सिटी मंड्या’ हा बोर्ड तिथं होता, हे सांगायला नकोच.
मंड्यानंतर आलं श्रीरंगपट्टण. टिपू सुलतानच्या राजधानीचं हे ऐतिहासिक शहर. आमच्या ‘टूर प्रोग्राम’मध्ये इथलं ‘साइट सीइंग’ होतं, त्यामुळं रामूनं इमानदारीत तिथली सगळी ठिकाणं दाखवली. पहिल्यांदा पाहिला तो टिपूचा महाल. इथं क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन पैसे भरून तेच गेटवर दाखवायचं अशी पद्धत होती. ते सगळे सोपस्कार करून आत गेलो. आत ताजमहाल किंवा बिवी का मकबरा इथल्यासारखं लांबलचक गार्डन कम् कॉरिडॉर होता. सकाळचे साडेअकरा वाजले होते, पण ढगाळ हवा असल्यानं चालायला काही वाटत नव्हतं. आत छोटंसं संग्रहालय होतं आणि त्यात टिपूसंबंधी सगळी माहिती होती. ती फार बारकाईनं वाचण्याएवढा वेळ नव्हता. हे संग्रहालय बघायला मुस्लिम मंडळी बहुसंख्येनं येत होती, हे सहज लक्षात येत होतं. तिथून रामूनं आम्हाला रस्त्यातूनच एक मशीद, टिपूचं मृत्यूस्थळ, ब्रिटिश जिथून हल्ला करायला आत आले ते वॉटरगेट आणि टिपूचा आणखी एक जुना पडका महाल (खरं तर तिथं आता काहीच नाही) हे सगळं कारमधूनच दाखवलं आणि रंगनाथस्वामी मंदिराकडं नेलं. 

हे श्रीरंगपट्टणचं अतिशय प्राचीन मंदिर. गोपुरं होती. आत शेषशायी विष्णूच्या अध्यक्षतेखाली तमाम देवमंडळींचं संमेलनच भरलं होतं. इथं टिपिकल ग्रामीण कर्नाटकमधलं पब्लिक दिसलं. भरघोस गजरे लेवून वावरणाऱ्या बायका, कपाळाला गंध लावणारे पुरुष असा सगळा भाविकवर्ग दिसत होता. इथंही थांबायला फार वेळ नव्हता. त्यामुळं लगेच निघालो. साधारण अर्ध्या तासात म्हैसूर दृष्टिपथात आलं...
मी फार पूर्वीपासून या शहरात यायची मनीषा बाळगून होतो. अखेर तो योग आला. मला एकूणच एके काळी राजे-महाराजांची असलेली शहरं आवडतात. बडोदा, इंदूर ही शहरं यापूर्वी बघून झाली होती... आता दक्षिणेकडचं हे पहिलं राजेशाही शहर मी बघणार होतो... म्हैसूरविषयी पुष्कळ ऐकलं होतं. मुळात कर्नाटक हेच एके काळी म्हैसूर स्टेट म्हणून ओळखलं जात होतं. महाराष्ट्रात जे स्थान पुण्याचं तेच कर्नाटकात म्हैसूरचं; इथली कन्नड भाषा ही कशी प्रमाण कन्नड म्हणून ओळखली जाते इ. इ. ऐकलं होतं. अनेक कथा-कादंबऱ्यांतून मराठी लेखकांनीही म्हैसूरचं रोमँटिक वर्णन केलेले वाचलं होतं... त्यामुळं मी या ‘चंदननगरी’कडं एका वेगळ्या ओढीनं निघालो होतो... पुढचे पूर्ण दोन दिवस म्हैसूरचं थोडंफार दर्शन घडायचं होतं...  कन्नड भाषेचा गंधही नसताना मन म्हणू लागलं...

म्हैसुरिगे स्वागता!

(पूर्वार्ध)

----

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

No comments:

Post a Comment