10 Jan 2020

साहित्य शिवार दिवाळी २०१९ - अजय देवगण लेख

मनुष्यगणातला अभिनेता
------------------------------



अजय देवगण नामक अभिनेत्यानं १९९१ मध्ये 'फूल और काँटे' अशा टिपिकल नावाच्या टिपिकल सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हा आणखी एक 'बडे बाप का बेटा' वशिल्यानं रूपेरी पडद्यावर झळकला, अशीच प्रतिक्रिया उमटली होती. नव्वदचं ते दशक भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवं स्थित्यंतर घेऊन येत होतं. आधीची सुमारे ४०-५० वर्षं हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारी एकेक दिग्गज मंडळी एक तर काळाच्या पडद्याआड गेली होती किंवा निवृत्त तरी झाली होती. राज कपूरचं १९८८ मध्ये निधन झालं आणि त्याच वर्षी आमिर खानचा 'कयामत से कयामत तक' प्रदर्शित झाला. अमिताभ राजकारणाच्या अपयशी खेळीनंतर पुन्हा चित्रपटसृष्टीतलं आपलं सिंहासन पुन्हा बळकट करण्याच्या मागे होता. देवआनंदची जादू केव्हाच लोप पावली होती. राजेश खन्ना जवळपास निवृत्त झाला होता. सनी देओलचं बस्तान बसल्यानंतर धरमपाजींनीही मुख्य भूमिका करणं सोडलंच होतं. दिलीपसाब केवळ सुभाष घईसारख्या बड्या दिग्दर्शकांकडं मोजक्या चरित्र भूमिकांकडं वळले होते. तेव्हा चलती होती ती अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, गोविंदा, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती या जुन्या-नव्या हिरोंची! मात्र, लवकरच तीन 'खान'मंडळी रूपेरी पडद्यावर येऊन पुढची किती तरी वर्षं आपलं साम्राज्य निर्माण करणार होती. त्यापैकी आमिरचा पहिला चित्रपट तर १९८८ मध्ये पडद्यावर आलाही होता आणि जोरदार हिटही झाला होता. पुढच्याच वर्षी पटकथा लेखक सलीम खानचा सलमान नावाचा धाकटा पोरगा 'मैंने प्यार किया'मधून दमदार पदार्पण करता झाला. तिसरा खान तेव्हा 'दूरदर्शन'वर 'फौजी'सारख्या मालिका करत होता. तोही दोन-तीन वर्षांतच 'दिवाना', 'बाजीगर'मधून धमाकेदार एंट्री घेणार होता. पण हे सगळं जरा नंतर... ऐंशीचं दशक हे तसं अस्वस्थतेचं, बदलांचं, कमअस्सलतेचं दशक होतं. तेव्हा डिस्कोची क्रेझ होती. व्हिडिओ पार्लरांची चलती होती. एकपडदा थिएटरबाहेर ब्लॅकवाल्यांची दादागिरी होती. चित्रपट संगीताचं सुवर्णयुग संपलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळून चाळिशी उलटून गेली होती आणि चाळिशी उलटलेल्या मध्यमवर्गीय पुरुषासारखीच देशाची केविलवाणी अवस्था झाली होती. धड ना तरुण, धड ना म्हातारा... जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलेला आणि सभोवतीच्या परिस्थितीनं गांजलेला... काही तरी नवं, क्रांतिकारक घडायला हवं होतं. देशाचं राजकीय क्षितिज योग्य संधीची वाट पाहत होतं... आणि ते वर्ष उजाडलं... ते होतं १९९१.
भारताच्या आयुष्यात 'जागतिकीकरण' नावाच्या देखण्या स्त्रीनं प्रवेश केला आणि चाळिशीत देशाचं नवं अफेअर सुरू झालं. अजय देवगणचा 'फूल और काँटे' याच वर्षी झळकला. तो तुफान चालला. वास्तविक 'हिरो'च्या पारंपरिक व्याख्येत बसणारं रंग-रूप अजयकडं नव्हतं. तो सावळा होता. चेहरा मख्ख वाटत होता. मात्र, तरीही त्यानं दोन मोटारसायकलींवर पाय ठेवून उभं राहून घेतलेली एंट्री तुफान हलकल्लोळ माजवून गेली. कॉलेजच्या पोरा-पोरींनी 'फूल और काँटे' डोक्यावर घेतला. त्यातली सगळीच गाणी गाजली. अजयबरोबरच मधू या दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. हिंदी चित्रपटसृष्टीत तोवर एक बडं प्रस्थ होऊन बसलेले फाइटमास्टर वीरू देवगण यांचा अजय हा मुलगा असल्यानं, 'वशिल्यानं आलेला आणखी एक नट' अशी त्याची संभावना होण्याची शक्यता होतीच. मात्र, अजय देवगणनं हे सगळे अंदाज खोटे ठरविले. पुढची तीन दशकं हा पठ्ठ्या हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ पाय रोवून उभाच राहिला नाही, तर त्यानं अव्वल पाच हिरोंमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं. सुरुवातीला ठोंब्या चेहरा व अभिनयात ठोकळा वाटणाऱ्या या माणसानं पुढं सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी दोनदा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. त्याच्यात झालेला हा बदल सोपा नव्हता. हा आतला लढा असतो. आपला आपल्यालाच लढावा लागतो. अजय त्याच्या आयुष्यात कायमच हा लढा देत आला आहे. त्यामुळंच आज पन्नाशी पार केली तरी तो तगड्या नायकाच्या भूमिकेत उभा राहू शकतो. येत्या २२ नोव्हेंबरला त्याचा 'तानाजी - द अनसंग हिरो' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट येतोय.
(लेख लिहितेवेळी प्रदर्शनाची ही तारीख जाहीर झाली होती. नंतर ती पुढं ढकलली व आता हा चित्रपट आत्ता, आज, १० जानेवारीला प्रदर्शित झाला आहे.) 
या चित्रपटात अजय स्वतः नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका करतोय. 'लोकमान्य टिळक' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत हाच या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करतो आहे. त्यानिमित्तानं अजय देवगणच्या गेल्या तीन दशकांच्या यशस्वी कारकिर्दीचा आणि एक माणूस म्हणून त्याच्या झालेल्या प्रगतीचा वेध घ्यायला हरकत नाही.
ही देवगण मंडळी पंजाबी. मूळची अमृतसरची राहणारी. वीणा आणि वीरू देवगण हे अजयच्या आई-वडिलांचं नाव. त्यांच्या पोटी दोन एप्रिल १९६९ रोजी दिल्लीत अजयचा जन्म झाला. त्याचं जन्मनाव खरं तर विशाल. पण चित्रपटात नायक म्हणून पदार्पण करताना त्यानं विशाल हे नाव टाकून 'अजय' हे नाव धारण केलं. हे सगळं कुटुंबच चित्रपट व्यवसायाशी संबंधित आहे. वीरू देवगण फाइट मास्टर म्हणून नाव कमवून होते, तर आई वीणा निर्माती होती. अजयचा भाऊ अनिल देवगण हाही पटकथा लेखक आहे. अजयचा जन्म दिल्लीत झाला असला, तरी तो वाढला मुंबईतच. जुहू येथील सिल्व्हर बीच हायस्कूलमध्ये तो शिकला. त्यानंतर मिठीबाई कॉलेजातही गेला. मात्र, पहिला चित्रपट मिळाल्यानंतर अजयचं पुढचं औपचारिक शिक्षण थांबलंच. 'फूल और काँटे' नुसता सुपरहिट ठरला नाही, तर अजयला त्या वर्षीचं 'सर्वोत्कृष्ट पदार्पण - पुरुष' हा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्याच्याकडं भरपूर चित्रपटांच्या ऑफर आल्या, यात नवल नाही. त्यातले 'जिगर', 'संग्राम', 'विजयपथ', अक्षयकुमारसोबतचा 'सुहाग', 'हकीकत', 'नाजायज', 'दिलजले' आणि इंद्रकुमारचा 'इश्क' हे चित्रपट चांगले चालले. 'जिगर' चित्रपटादरम्यान नायिका करिश्मा कपूरसोबत अजयचं सूत जुळलं. पण हे अफेअर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलं नाही आणि १९९५ मध्ये त्यांचा 'ब्रेकअप' झाला. त्याच्या आदल्याच वर्षी म्हणजे १९९४ मध्ये आलेल्या 'विजयपथ' चित्रपटात तबू त्याची नायिका होती.
अजयचे हे उपरोल्लेखित चित्रपट चांगले चालले असले, तरी अजयच्या नावावर खणखणीत असं काही जमा नव्हतं. अभिजन प्रेक्षकांच्या दृष्टीनं तो अजूनही पिटातल्या प्रेक्षकांचाच, बी ग्रेडचा हिरो होता. त्याचा चेहरा कमालीचा थंड वाटायचा. बोलायचे ते त्याचे डोळे. त्या काहीशा निस्तेज चेहऱ्यावरचे ते डोळे गूढ, खोल असं काही तरी सांगायचे. अजयच्या या सुप्त ताकदीचा प्रत्यय लवकरच आला. वर्ष होतं १९९८ आणि चित्रपट होता - महेश भट यांचा 'जख्म.' अजयच्या कारकिर्दीतलं पहिलं महत्त्वाचं वळण आलं होतं. अजयच्या डोळ्यांतला 'दर्द' महेश भट यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाला जाणवला असावा. 'जख्म' ही महेश भट यांच्या स्वतःच्या आयुष्याचीच गोष्ट होती. त्यात त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना अजयला निवडावंसं वाटलं, हीच अजयमधल्या अभिनेत्याला मोठी दाद होती. मुस्लिम आई आणि हिंदू वडिलांच्या पोटी जन्मलेल्या अजय या संगीत दिग्दर्शकाची व्यथा आणि कथा हा सिनेमा मांडतो. हिंदू-मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन व्यक्तींमधलं अतूट प्रेम आणि त्यांच्या अपत्यांना बसणारी त्याची झळ याचं प्रत्ययकारी दर्शन महेश भट यांनी या चित्रपटातून केलं होतं. या चित्रपटासाठी संवेदनशील अभिनयाची गरज होती. महेश भट यांनी अजयकडून तसा अभिनय काढून घेतला म्हणा, किंवा अजयमधल्या सुप्त अभिनयगुणांना एकदम वाट सापडली म्हणा... या चित्रपटातून वेगळाच अजय देवगण प्रेक्षकांसमोर आला. यातलं त्याचं काम सगळ्यांना अतिशय आवडलं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चालला नाही. मात्र, अजयला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं त्याच्या या अभिनयक्षमतेवर राजमान्यतेचं शिक्कामोर्तबही झालं. या चित्रपटात लहानपणच्या अजयचं काम कुणाल खेमूनं केलं होतं. या चित्रपटातली गाणीही गाजली. विशेषतः अलका याज्ञिक यांच्या आवाजातल्या 'गली में आज चाँद निकला' या अप्रतिम गाण्यानं तर सर्वांना वेड लावलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. कुमार सानूनं म्हटलेलं 'हम यहाँ तुम कहाँ' हे गाणंही लोकप्रिय ठरलं. या चित्रपटात अजयची नायिका होती सोनाली बेंद्रे. अजयच्या कारकिर्दीला महत्त्वाचं वळण देण्याचं काम या चित्रपटानं केलं, यात शंका नाही. या चित्रपटानंतर अजय 'अ' श्रेणीतला कलाकार गणला जाऊ लागला. त्याला चित्रपटसृष्टीत गांभीर्यानं घेतलं जाऊ लागलं. हा 'लंबी रेस का घोडा' आहे, हे काही जाणत्या दिग्दर्शकांच्या लक्षात आलं. यापैकीच एक होता संजय लीला भन्साळी. भन्साळींनी त्यांच्या पुढच्या चित्रपटात अजयला महत्त्वपूर्ण भूमिका देऊ केली. अन्य प्रमुख कलाकार होते ऐश्वर्या राय व सलमान खान. वर्ष होतं १९९९ आणि चित्रपट होता - हम दिल दे चुके सनम! या चित्रपटाच्या तुफान यशानं अजयचं नशीबच बदलून गेलं. सुंदर, सुस्वरूप पत्नीचं लग्नाआधी दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम होतं, हे लक्षात आल्यावर तिला त्या प्रियकराची पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी तडफड करणारा वनराज अजयनं अतिशय आत्मविश्वासानं साकारला. अजयची भूमिका सहानुभूती मिळविणारी होती. पण त्यात अजयच्या त्या गूढ वेदना वागविणाऱ्या डोळ्यांचा आणि सहज अभिनयाचा वाटा मोठा होता. 'हम दिल दे चुके सनम' तुफान गाजला. यातली सर्वच्या सर्व गाणी सुपरहिट ठरली. सलमान आणि ऐश्वर्याचं प्रेमप्रकरण त्या वेळी बहरात होतं. अजयनं मात्र 'इश्क'च्या सेटवर भेटलेल्या काजोलबरोबर जोडी जमवून टाकली होती. आदल्याच वर्षी आलेला दोघांचाही 'प्यार तो होना ही था' (फ्रेंच किस या १९९५ मध्ये आलेल्या हॉलिवूडपटाचा रिमेक) चांगला चालला होता. खरं तर या दोघांची जोडी कुणालाच 'मेड फॉर इच आदर' वाटत नव्हती. प्रथमदर्शनी तरी ती विसंगत, कृत्रिम जोडी वाटायची. पण नियतीच्या मनात वेगळंच असतं. त्याच दोघांना एकमेकांच्या सान्निध्यात आयुष्याचा जोडीदार सापडला. दोघांनीही २४ फेब्रुवारी १९९९ रोजी महाराष्ट्रीय पद्धतीनं लग्न करून चित्रपटसृष्टीला एक धक्काच दिला. वयाच्या तिशीत अजय खऱ्या अर्थानं स्थिरावला होता. त्याचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य एका 'एक्स्प्रेस वे'च्या तोंडाशी येऊन उभं राहिलं होतं. इथून पुढचा प्रवास सुसाटच असणार होता...
रामगोपाल वर्माच्या 'कंपनी'त अजयला हाजी मस्तानची भूमिका करायला मिळाली. टिपिकल रामगोपाल वर्मा शैलीतील या गुन्हेपटात अजय चांगलाच शोभून दिसला. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कार मिळाला. याच वर्षी आलेल्या 'दिवानगी'मधली त्याची खलनायकी ढंगाची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. 'फिल्मफेअर'नं सर्वोत्कृष्ट व्हिलन म्हणून त्याचा गौरव केला. एकूणच २००२ ते २००४ ही वर्षं अजयच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ म्हणता येईल. राजकुमार संतोषीसारख्या ख्यातनाम दिग्दर्शकानं आपल्या 'द लिजंड ऑफ भगतसिंग' (२००३) या चित्रपटात अजयला प्रमुख भूमिका दिली. भगतसिंगांच्या भूमिकेचं अजयनं सोनं केलं. 'जख्म'पाठोपाठ या चित्रपटासाठीही त्याला दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याच वर्षी आलेल्या रामगोपाल वर्माच्या 'भूत' या गाजलेल्या चित्रपटातही अजय होता. अजय देवगणचं नाव इंडस्ट्रीत आता एक ताकदवान अभिनेता म्हणून दुमदुमू लागलं होतं. म्हणूनच पुढच्या वर्षी म्हणजे २००४ मध्ये ऋतुपर्ण घोष, प्रकाश झा आणि मणिरत्नम यांसारख्या बड्या दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात अजय हवासा वाटला. ऋतुपर्णचा 'रेनकोट' हा चित्रपट म्हणजे पडद्यावरची कविता होती. ओ. हेन्रीच्या 'द गिफ्ट ऑफ मॅगी' या कथेवर आधारित या चित्रपटात अजयची नायिका होती ऐश्वर्या राय. 'हम दिल दे चुके सनम'नंतर पुन्हा एकदा या जोडीनं उत्कृष्ट काम केलं आणि समीक्षकांची वाहवा मिळविली. प्रकाश झा यांनी 'गंगाजल'मध्ये अजयला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका दिली. भागलपूर इथल्या ॲसिड टाकून डोळे काढण्याच्या प्रकारावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात अजयनं एसएसपी अमितकुमार ही भूमिका प्रभावीपणे केली होती. 'गंगाजल' सुपरहिट झाला. इथूनच प्रकाश झा आणि अजय देवगण ही नवी दिग्दर्शक-अभिनेता जोडी जमली. या जोडीनं पुढं 'अपहरण' (२००५), 'राजनीती' (२०१०) असे काही चांगले चित्रपट दिले. सन २००४ मध्ये मणिरत्नम यांनी त्यांच्या 'युवा' या चित्रपटात अजयला मायकेल मुखर्जी ही विद्यार्थी नेत्याची भूमिका दिली. अजयनं ही भूमिकाही जोरदार केली. विशाल भारद्वाजनं शेक्सपीअरच्या नाट्यत्रयीवर आधारित आपल्या दुसऱ्या 'ओंकारा' या चित्रपटात अजयला स्थान दिलं. हा चित्रपट 'ऑथेल्लो'वर आधारित होता. यात ओंकारा शुक्ला उर्फ ओमीची शीर्षक भूमिका अजयनं केली होती. या वेळेपर्यंत त्याची ताकदवान अभिनेता ही प्रतिमा जनमानसातही रुजली होती. 'ओंकारा'नं या प्रतिमेलाही न्याय दिला. याच वर्षी अजयनं राजकुमार संतोषीच्या 'खाकी'मध्ये अमिताभ, ऐश्वर्या व अक्षयकुमारसोबत काम केलं.
हे सर्व सुरू असतानाच रोहित शेट्टी नावाचा एक अवलिया दिग्दर्शक अजयला भेटला. त्यानं 'गोलमाल : फन अनलिमिटेड' या आपल्या चित्रपटात अजयला चक्क विनोदी भूमिका दिली. तोवर अजयची गंभीर भूमिका करणारा नट अशी प्रतिमा झाली होती. इंद्रकुमारचा 'इश्क' आला त्यालाही जवळपास दहा वर्षे होत आली होती. मात्र, रोहित शेट्टीला काय वाटलं कुणास ठाऊक! त्यानं अजयला यात विनोदी भूमिकेत पुढं आणलं. आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. इथंही रोहित शेट्टी आणि अजय देवगण ही आणखी एक सुपरहिट दिग्दर्शक-अभिनेता जोडी पुढं आली. या 'गोलमाल' फ्रँजायजीनं पुढची दहा वर्षं काय धमाल केली हे सगळ्यांना माहिती आहे. पुढच्या चार वर्षांत 'गोलमाल'चे आणखी दोन भाग ('गोलमाल रिटर्न्स' आणि 'गोलमाल ३') आले. दोन वर्षांपूर्वी २०१७ मध्ये 'गोलमाल अगेन' हा चौथा चित्रपट आला. यातली अजयची 'गोपाल' ही भूमिका आणि त्यातले अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू हे सगळे कलाकार हिट आहेत. रोहित शेट्टी आणि अजय या जोडीनं २०११ मध्ये आणखी एका सुपरहिट फ्रँचायजीला जन्म दिला. तिचं नाव होतं - सिंघम. यातली अजयची बाजीराव सिंघम ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका कमालीची हिट झाली. तीन वर्षांनी, २०१४ मध्ये 'सिंघम रिटर्न्स' आला. तोही चांगला चालला. अजय देवगणला कणखर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना आवडतं. रोहित शेट्टीच्या चित्रपटात बाकी सगळा मालमसालाही ठासून भरलेला असल्यानं हे चित्रपट चांगली गर्दी खेचतात, असा अनुभव आहे. पहिल्या 'सिंघम'नंतर २०१२ मध्ये अजयनं रोहित शेट्टीचाच 'बोलबच्चन' हा चित्रपट केला. हा चित्रपट व त्यातली गाणीही गाजली. याच वर्षी दिवाळीत त्यानं 'सन ऑफ सरदार' हा त्याचा चित्रपट करण जोहर-शाहरुख जोडीच्या 'जब तक है जान'समोर प्रदर्शित करण्याचं धाडस दाखवलं होतं. तेव्हा त्याचा करणशी जाहीर वादही झाला होता. थिएटर वितरणावरून दोघा बड्या स्टारची जुंपली होती. अजयची पत्नी काजोल ही करण व शाहरुख दोघांचीही चांगली मैत्रीण. मात्र, या वादामुळं काजोलची करणशी असलेली मैत्री काही काळ तुटली होती, अशी कबुली करणनंच नंतर त्याच्या पुस्तकात दिली. 'सन ऑफ सरदार' हा चित्रपट तसा ठीकठाकच होता. पण या वादामुळं त्यालाही मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आणि चित्रपटानं चांगला गल्ला गोळा केला.
यानंतर अजयचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट २०१५ मध्ये आला, त्याचं नाव 'दृश्यम'. मूळ मल्याळी चित्रपटाचा सर्व दक्षिणी भाषांत रिमेक झाला होता. तसाच तो हिंदीत आला, तेव्हा निशिकांत कामतकडं त्याचं दिग्दर्शन आलं. मूळ चित्रपटाची पटकथा एवढी बांधीव व घट्ट होती, की निशिकांतला फार वेगळं काही करावंच लागलं नाही. हिंदीत हा चित्रपट गोव्यात घडताना दाखविण्यात आला होता. यात कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणाऱ्या विजय साळगावकर या चौथी पास, व्हिडिओ कॅसेटचं दुकान चालविणाऱ्या, पण अत्यंत डोकेबाज, हुशार माणसाची भूमिका अजयनं फार सुंदर साकारली होती. हिंदीतही हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अजयच्या नावावर आणखी एका चांगल्या भूमिकेची नोंद झाली.
त्यानंतर पुढच्या वर्षी अजयनं स्वतः दिग्दर्शित केलेला 'शिवाय' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झाला. (यापूर्वी त्यानं २००८ मध्ये 'यू, मी और हम' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.) 'शिवाय' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं असलं, तरी आधी ज्या प्रकारची हवा निर्माण करण्यात आली होती, ती पाहता, प्रेक्षक काहीसे निराशच झाले, असं म्हणता येईल. या चित्रपटातील साहसदृश्ये चांगली होती. 'क्लिफहँगर'सारख्या अनेक हॉलिवूडपटांचा त्यावरचा प्रभाव स्पष्ट जाणवत होता. मात्र, असं असलं तरी हा काही अजयचा सर्वोत्तम सिनेमा नव्हता. अजय पुन्हा फॉर्मात आला तो २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार गुप्ताच्या 'रेड' या चित्रपटामुळं. उत्तर प्रदेशात ऐंशीच्या दशकात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात अजयनं आयआरएस ऑफिसर अभय पटनाईक ही भूमिका केली होती. केवळ ३० कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल दीडशे कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर या वर्षी अजय पुन्हा इंद्रकुमारच्या 'टोटल धमाल' या 'धमाल' फ्रँजायजीमध्ये प्रथमच दिसला. याशिवाय 'दे दे प्यार दे' या अकीव अली दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडीतही अजय झळकला. यात त्यानं तब्बूसोबत अनेक वर्षांनी काम केलं. वयानं खूप लहान असलेल्या तरुणीच्या प्रेमात पडणाऱ्या नायकाची भूमिका त्यानं यात केली होती. यापूर्वी मधुर भांडारकरच्या 'दिल तो बच्चा है जी' (२०११) या चित्रपटातही अशाच प्रकारची भूमिका केली होती आणि ती प्रेक्षकांना आवडली होती. याशिवाय 'काल'सारख्या (२००५) भयपटात त्यानं केलेली कालीची छोटीशी भूमिकाही वेगळी आणि त्याच्या चाहत्यांना भावलेली होती. 'सन ऑफ सरदार'चा दिग्दर्शक अश्वनी धीर यानं त्यापूर्वी २०१० मध्ये काढलेल्या 'अतिथी तुम कब जाओगे?' या विनोदी चित्रपटातही अजयनं कोंकणा सेनशर्मा व परेश रावल यांच्यासोबत धमाल केली होती. याच वर्षी आलेल्या मिलन लुथ्राच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' या चित्रपटात अजयनं सुलतान मिर्झाची साकारलेली भूमिका अशीच प्रेक्षकपसंती मिळवून गेली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला.
आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती 'तानाजी' या चित्रपटाची. या चित्रपटात ओम राऊतच्या दिग्दर्शनाखाली अजयनं नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेला न्याय दिला असेल, अशी खात्री वाटते. दिवाळीनंतर प्रदर्शित होणारा हा चित्रपट लोकप्रिय ठरेल, असा अंदाज आहे. याशिवाय 'मैदान' नावाच्या एका चित्रपटात अजय फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका करणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी, म्हणजे २०२० मध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' या मल्टिस्टारर चित्रपटातही संजय दत्त, राणा दुगुबत्ती, परिणिती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अजय झळकणार आहे.
तब्बल तीन दशकांपूर्वी, म्हणजे १९९१ मध्ये सुरू झालेली अजयची कारकीर्द आगामी काळातही बहरत जाईल, यात शंका नाही. केंद्र सरकारने २०१६ मध्ये 'पद्मश्री' सन्मान देऊन त्याच्या कारकिर्दीचा गौरव केला आहेच. काजोलसोबत गेली दोन दशके तो सुखाचा संसार करतोय, याचंही त्याच्या चाहत्यांना कौतुक आणि अप्रूप आहे. त्यांना न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. अजयनं त्याच्या कारकिर्दीत फार वाद कधी ओढवून घेतलेले दिसत नाहीत. आपण बरं आणि आपलं काम बरं, अशी त्याची एकूण वृत्ती दिसते. त्याचं आडनाव 'देवगण' असलं, तरी त्याच्या बहुतेक भूमिका 'मानवी' आहेत. त्या अर्थानं तो 'मनुष्यगणातला अभिनेता' आहे. त्याच्या पुढील कारकिर्दीकडं चित्रपट रसिकांचं लक्ष राहील. त्यासाठी त्याला शुभेच्छा!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०१९)

---

8 Jan 2020

रिव्ह्यू - धुरळा

‘वुई, द राजकारणी...’
--------------------------

आपण सगळेच राजकारणी असतो. राजकारणात प्रत्यक्ष भाग घेत असू वा नसू! आपल्या रोजच्या जगण्यात आपण राजकारण करतच असतो. अगदी शाळेत असल्यापासून ते अगदी मृत्युपत्र लिहायची वेळ येईपर्यंत... आपण पक्के राजकारणी असतो. गंमत म्हणजे राजकारण करणारे तेच राजकारणी आणि आपण मात्र त्यांच्यापासून वेगळे कुणी तरी गरीब, भाबडे, सर्वसामान्य माणसं अशी आपण स्वत:ची पक्की समजूत करून घेतलेली असते. पण प्रत्यक्षात तसं नसतं. आपण जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला अगदी पक्के, मुरलेले, बेरकी, जहाँबाज, कावेबाज, पाताळयंत्री राजकारणी असतो. कुठे प्रमाण कमी असेल, तर कुठे अधिक, इतकंच! आपल्या कुटुंबात, नातेवाइकांत, ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये आपण सदैव राजकारणच करत पुढं जात असतो. म्हणून तर आपल्याला राजकारण आणि राजकारणी मंडळी यांच्याविषयी प्रचंड कुतूहल असतं. अशी माणसं दिसली, की त्यांच्या थेट चालणाऱ्या राजकारणाला नावं ठेवत, आपण स्वत:ही तसंच वागत असल्याचा ‘गिल्ट’ कमी करण्याची संधी आपल्याला मिळते, हे त्या कुतूहलामागचं प्रमुख कारण असतं. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आजच पाहिलेला ‘धुरळा’ हा नवा मराठी चित्रपट! समीर विद्वांस दिग्दर्शित व क्षितिज पटवर्धन लिखित हा चित्रपट आपल्याला हरघडी आपल्यातल्या राजकारणी व्यक्तीची आठवण करून देतो आणि हेच त्याचं सर्वांत मोठं यश आहे.
शेक्सपिअरच्या अनेक शोकांतिका किंवा मारिओ पुझोच्या ‘गॉडफादर’सारख्या कलाकृती कालातीत दर्जा गाठण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या कलाकृतींमध्ये मानवी जगण्याचे असे अनेक पदर दृग्गोचर झाले. माणसाच्या स्वभावातले अनेक कंगोरे, उत्क्रांतीच्या ओघातही टिकून राहिलेलं त्याच्यातलं पशुत्व, सदैव दुसऱ्यावर विजय मिळविण्याची, दुसऱ्याला टाचेखाली ठेवण्याची लालसा, त्याचं स्खलनशील असणं अशा अनेक गोष्टींचे पापुद्रे उलगडत या कलाकृती आपल्याला माणसाच्या जगण्याचं विराट दर्शन घडवतात. त्यातून मानवी स्वभावाविषयी काही मूलभूत स्वरूपाचं भाष्य आपल्याला बघायला मिळतं, अवगत होतं! समीर आणि क्षितिजची ही कलाकृती पाहून अशा कालातीत कलाकृतींची किमान आठवण व्हावी, हेदेखील या जोडीचं मोठं यशच म्हणावं लागेल. (तुलना करण्याचा प्रश्नच नाही; पण किमान मार्ग तरी योग्य निवडला हे म्हणायला हरकत नाही. भविष्यात ते तिथवर पोचतीलही, कुणी सांगावं...)
उत्तम पेपरवर्क, प्रतिपाद्य विषयाची स्पष्ट कल्पना, कल्पनाबीज-विस्तार-संघर्ष-सांगता या चतु:सूत्रीच्या साह्यानं बांधलेली घट्ट पटकथा, खटकेबाज-चुरचुरीत संवाद आणि त्याला अभिनयाची जोड या कुठलाही चित्रपट यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी! ‘धुरळा’ने यातील बहुतांश गोष्टींचे बॉक्स अचूक ‘टिक’ केले आहेत. अर्थात काही त्रुटीही त्यात आहेत. मात्र, चांगल्या गोष्टींचं पारडं जड आहे आणि त्यामुळंच हा चित्रपट पाहणं हा एक चांगला अनुभव ठरतो.
आपण सगळे राजकारणीच असतो आणि जगण्यातल्या कुठल्याही क्षेत्रात आपण राजकारण करत असतो, ही मध्यवर्ती थीम धरली, तर या थीमचा विस्तार करणारे अनेक चित्रपट, नाटकादी कलाकृती आपण यापूर्वीही पाहिल्या आहेत. ‘धुरळा’ही याच यादीतला सिनेमा आहे. यात दिग्दर्शकानं माणसातला ‘राजकारणी’ दाखविण्यासाठी गोष्टीचं नेपथ्य निवडलंय ते राजकारणाचंच! एका अर्थानं हे सुलभीकरण आहे. मात्र, या सुलभीकरणामुळं गोष्ट क्लिष्ट किंवा बोजड न होता, सगळ्यांना समजेल अशी सोपी-सरळ झालीय हा तिचा गुणच म्हणायला हवा.
आंबेगाव नामक छोट्या गावातलं सरपंचपद मिळवण्याची एका घराण्यातील, रक्ताच्या नात्यातील तीन लोकांची स्पर्धा हे या चित्रपटाचं एका ओ‌‌ळ‌ीतलं कथासूत्र! सत्तेचं पद किंवा खुर्ची - मग ती सरपंचपदाची असो की पंतप्रधानपदाची - ती मिळवण्यासाठी जगात सगळीकडं जे राजकारण चालतं, ते सारख्याच प्रमाणात क्रूर असतं आणि ‘राजकारणात सगळं क्षम्य’ या उक्तीला साजेसंच असतं. त्यामुळं इथं महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावाचं नेपथ्य दिग्दर्शकानं घेतलं असलं, तरी त्यातला सत्तासंघर्ष हा जगातील कोणत्या माणसाला परका वाटणार नाही. त्या अर्थानं ही ‘युनिव्हर्सल अपील’ असणारी गोष्ट आहे. मात्र, या गोष्टीचा विस्तार करताना त्यातील माणसांचं बाह्य द्वंद्व दाखवण्याच्या मोहात दिग्दर्शक पडल्यानं, माणसाच्या नेणिवेच्या पातळीवरचे काळेकरडे मनोव्यापार किंवा त्यांच्यातलं ते आदिम ‘पाशवी’ इन्स्टिंक्ट आपल्याला यात फारसं बघायला मिळत नाही. त्या पातळीवरचा एक धागा जरी यात ओवला गेला असता, तरी ही महान कलाकृती ठरली असती.
अर्थात, आत्ताही जे समोर येतं, ते कमी मनोरंजक किंवा कमी उत्तम दर्जाचं आहे, असं मुळीच नाही. मुळात इथं प्रत्येक पात्रावर खूप बारकाईनं काम झाल्याचं दिसतं. उभे कुटुंबातील अक्का, नवनाथ, हनुमंत, नीलेश, हर्षदा उर्फ बुरगुंडा आणि मोनिका या सर्व व्यक्तिरेखांचे आलेख आपल्यासमोर ठसठशीतपणे ‘उभे’ राहतात. या कुटुंबाला आव्हान देणारा हरीश गाढवे, त्याचे पित्ते, शिवाय या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवणारा आमदार ही बाकीची पात्रंही अगदी नीट उभी राहतात. प्रत्येक पात्राला एक व्यक्तिमत्त्व आहे आणि ते लिखाणातून त्या अभिनेत्यापर्यंत किंवा अभिनेत्रीपर्यंत नेमकेपणानं पोचलंय. चित्रपटाचा सुरुवातीचा काही काळ ही सगळी पात्रं उभी राहण्यात खर्च होतो, त्यामुळं चित्रपट सुरुवातीला काहीसा संथ वाटू शकतो. पण चित्रपटाचा एकूण कालावधी बराच मोठा (१७० मिनिटं) असल्यानं हा सुरुवातीचा वेळ सर्व पात्रं प्रस्थापित होण्यासाठी योग्यच आहे.
या चित्रपटात महिलांचं घरातलं, राजकारणातलं आणि एकूणच समाजातलं स्थान यावर सविस्तर भाष्य येतं. तसं ते यापूर्वीही ‘घराबाहेर’सारख्या चित्रपटांतून आलेलं आहे. मात्र, वीस वर्षांनंतरही आपल्याकडची परिस्थिती फारशी बदललेली नसल्यानं दिग्दर्शकाला हा ट्रॅक जोडणं आवश्यक वाटलं, यातच सारं काही आलं.  किंबहुना चित्रपटाच्या उत्तरार्धात हा संघर्ष संपूर्णपणे या कुटुंबातील तीन बायकांमध्ये विभागला जातो. या तिघींच्याही व्यक्तिरेखांमधले अनेक सूक्ष्म ‘पदर’ विद्वांस यांनी फार नजाकतीनं दाखवले आहेत. याशिवाय या चित्रपटात येणारी अन्य स्त्री पात्रंही ठळकपणे लक्षात राहतात, हे या कलाकृतीचं वैशिष्ट्य. चित्रपटाचा शेवट काहीशा अनपेक्षित नोटवर संपत असला, तरी या सगळ्याची अपरिहार्य परिणती ती असूच शकते, हे पटतं.
या चित्रपटाची पात्रयोजना आणि प्रमुख कलाकारांची कामं अगदी चोख जमली आहेत. अक्काच्या भूमिकेत अलका कुबल-आठल्ये अगदी फुल फॉर्मात आल्या आहेत. अंकुश चौधरी नवनाथच्या भूमिकेत शोभून दिसतो. या भूमिकेसाठी आवश्यक तो बेरकीपणा त्यानं चष्म्याआडच्या नजरेतून नेमका दाखवला आहे. हनुमंत उर्फ सिमेंट शेठच्या भूमिकेतील सिद्धार्थ जाधव हा यातलं सरप्राइझ पॅकेज आहे. सिद्धार्थच्या इमेजपेक्षा खूप वेगळा रोल त्याला मिळाला असून, त्यानं या संधीचं सोनं केलं आहे. या रोलबाबत फार काही सांगत नाही. तो प्रत्यक्ष पडद्यावरच पाहा. नीलेश ऊर्फ भाऊज्याच्या भूमिकेत अमेय वाघनं तडफदार कामगिरी केली आहे. हरीश गाढवेच्या भूमिकेत प्रसाद ओकनं एकदम तगडं काम केलंय. त्यानं ही भूमिका करून दिग्दर्शकावर आणखी एक ‘फेवर’च केला म्हणायचं! सई ताम्हणकरनं यातली हर्षदा ऊर्फ बुरगुंडा चांगली उभी केलीय. प्रचारसभेतील पहिल्या भाषणाचा तिचा सीन उत्तम जमलाय. मात्र, या सगळ्यांत भाव खाऊन गेलीय ती मोनिका साकारणारी सोनाली. दबून राहण्यापासून ते बंडखोरीपर्यंतचा या व्यक्तिरेखेचा सगळा प्रवास सोनालीनं फार प्रभावीपणे मांडलाय. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत, अनेक शेड्स आहेत. लिखाणात सर्वांत भाव खाऊन जाणारी ही भूमिका सोनालीनं जोरदार वठवून आणखीनच भाव खाल्लाय! तिच्या काही संस्मरणीय भूमिकांत या भूमिकेचा नक्कीच समावेश होईल. सुलेखा तळवलकर, उदय सबनीस यांनीही चांगली साथ दिलीय. अलका कुबल व सुलेखा तळवलकर प्यायच्या सीनमध्ये छानच ‘रम’ल्या आहेत! अगदी एकाच सीनमध्ये प्राजक्ता हणमघर धमाल उडवून गेलीय.
गावाकडचा चित्रपट आणि त्यातही राजकारण म्हटल्यावर देवेंद्र गायकवाड, श्रीकांत यादव, नितीन धंदुके आदी कलाकारांची उपस्थिती हल्ली अनिवार्य असते. हे लोक पडद्यावर दिसले, की आपोआपच त्या चित्रपटाला एक ऑथेंटिसिटी येत असावी.
अलीकडं आपल्या जगण्यातल्या जवळपास प्रत्येक बाबीत राजकारण शिरलेलं असताना आणि आपणही प्रत्येक गोष्टीत जोरदार राजकारण करीत असताना, गावच्या राजकारणावरचा हा ‘धुरळा’ अंगावर उडवून घ्यायलाच हवा; कारण ती धूळ साफ झाल्यानंतर आपल्याला आपल्यातला ‘राजकारणी’ लख्ख दिसू लागतो...

---

दर्जा : साडेतीन स्टार

---

30 Dec 2019

मटा - रविवार लेख

‘२०-ट्वेंटी’ची ‘कसोटी’
--------------------------

एकविसाव्या शतकातलं दुसरं दशकही संपत आलं आणि आता आपण ‘२०२०’ या वर्षात पदार्पण करीत आहोत. आपले दिवंगत माजी राष्ट्रपती - अन् कदाचित सर्वाधिक लोकप्रियही - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘महासत्ता’ होण्यासाठी ज्या वर्षाचं लक्ष्य आपल्याला दिलं होतं, तेच हे वर्ष! आपण ‘२०२०’मध्ये महासत्ता होऊ की नाही, याचं उत्तर आता आपल्याला मिळालेलंच आहे. तरीही वर्षाच्या सुरुवातीलाच नकारात्मक विचार कशाला मनात आणायचा? याच वर्षात म्हणजे २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात ‘२०-२०’ची, अर्थात टी-२० ची विश्वचषक स्पर्धा होते आहे. ती स्पर्धा जिंकून आपण याच वर्षात ‘२०-२०’मधील महासत्ता तर नक्कीच होऊ शकतो. आपल्या संघाला त्यासाठी शुभेच्छा...
क्रिकेट संघाचं तसं बरं चाललंय. पण आपल्या ‘भारत’ नावाच्या १३७ कोटी जनतेच्या संघाचं काय? एकविसावं शतक सुरू होण्याच्या वेळी म्हणजे २००१ मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या एक अब्जाचा टप्पा ओलांडून गेली होती. त्या जनगणनेत आपली लोकसंख्या १०७ कोटी नोंदली गेली होती. ही लोकसंख्या १९ वर्षांनंतर तब्बल ३० कोटींनी वाढून १३७ कोटी झाली आहे. लोकसंख्या नियोजनाचे सर्व प्रयत्न करूनही आपली लोकसंख्या एका दशकात १५ ते २० टक्क्यांनी वाढते आहे. त्यामुळंच आपण लवकरच चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरणार आहोत. डॉ. कलाम यांच्या मनातल्या ‘महासत्ते’शी आपल्या आत्ताच्या परिस्थितीची तुलना केली तर हाती काय येतं? गेल्या दोन दशकांत आपण कुठून कुठं आलो? यापुढं कुठं जाणार? आपल्या पुढच्या पिढीच्या हाती आपण कोणता वारसा सोपवत आहोत? या गोष्टींचा धांडोळा घेण्यासाठी ‘२०२०’मध्ये पदार्पण यापेक्षा चांगला मुहूर्त नसेल.
एकविसाव्या शतकाच्या आगमनाची पहिली ग्वाही आपल्याला मिळाली ती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या भाषणांमधून. एका अनपेक्षित परिस्थितीत थेट देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारावी लागलेल्या या तरुण पंतप्रधानाच्या डोळ्यांत पुढच्या शतकाची स्वप्नं होती. ‘हमें देखना हैं’ या त्यांच्या सानुनासिक उच्चारातील भाषणांची चेष्टा खूप झाली; पण ‘इक्कसवीं सदी’ हा शब्द सतत ऐकायला मिळाला तो त्यांच्याकडूनच. मोठमोठ्या आकाराचे कम्प्युटर सगळ्या कार्यालयांत विराजमान होण्याचा तो काळ होता. काय दुर्दैवी योगायोग... एकविसाव्या शतकाचं स्वप्न दाखविणाऱ्या राजीव गांधींची १९९१ मध्ये हत्या झाली आणि तेच वर्ष आपल्या इतिहासातलं एक वेगळं वळण देणारं वर्ष ठरलं. पुढच्या दशकात आपला देश कुठं जाणार आहे त्या रस्त्याची दिशा याच वर्षी निश्चित झाली. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली झाली आणि पुढच्या दहाच वर्षांत देश एका वेगळ्या वळणावर येऊन उभा राहिला. या आर्थिक धोरणांतील बदलांची फळं आता दिसू लागली होती. देशातील तरुणांना नवनव्या संधी उपलब्ध होत होत्या आणि देशाचा चेहरामोहराच बदलत होता. केबल टीव्हीपासून ते ‘कोकाकोला’पर्यंत आणि खासगी नोकऱ्यांपासून ते घराघरांत वाढू लागलेल्या आर्थिक सुबत्तेपर्यंत हा बदललेला चेहरा स्पष्टच जाणवत होता. वीस वर्षांपूर्वी म्हणजे २००० हे वर्ष उजाडण्याच्या वेळी सगळ्या जगात एक वेगळाच जोष संचारला होता. एका महत्त्वाच्या कालखंड बदलाचे आपण साक्षीदार आहोत, असं प्रत्येकाला वाटत होतं. ‘वायटुके’ नावाच्या कम्प्युटर प्रॉब्लेमचा तेव्हा बोलबाला होता. ‘इंटरनेट’ ही ‘इन थिंग’ व्हायला सुरुवात झाली होती. महानगरांमध्ये मॉल आणि मल्टिप्लेक्स संस्कृती रुजू लागली होती आणि महामार्गांचा चेहरा जरा गुळगुळीत होऊ लागला होता. सनदशीर मार्गानं, बुद्धीचा वापर करून भरपूर पैसे मिळविता येतात आणि संपत्ती निर्माण करता येते, याचा नवमध्यमवर्गीय तरुणांना झालेला साक्षात्कार ही त्या दशकाची सर्वांत मोठी देणगी होती. पैसा आल्यानं पारंपरिक मूल्यव्यवस्थेला हादरे बसण्याचाही हाच काळ होता. थोडक्यात, भौतिक सुखाची गंगा भारतभूमीवर अवतरली आणि लवकरच या ‘गंगे’चं पात्र आसेतुहिमाचल असं विस्तारलं.
पुढच्या दोन दशकांत हाच प्रवास अधिक वेगानं, अधिकाधिक वेगानं होत गेला. नेपथ्यरचना थोडीफार बदलली, तरी मूळ नाटकाचा संच तोच होता. एकीकडं संपत्तीनिर्माणाची संधी आणि दुसरीकडं पारंपरिक मूल्यव्यवस्थेशी संघर्ष असा हा जोडप्रवास काही काळ चालू राहिला. नंतर तंत्रज्ञानातील अफाट वेगवान बदलानं जगण्याची सगळी मितीच बदलवून टाकली. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर आपल्याकडं ‘स्मार्टफोन’ आले आणि आपलं जगणं खरंच पहिलं राहिलं नाही! त्यामुळं काय काय झालं आणि काय कमावलं-गमावलं हे आपल्याला आता सगळं ठाऊक झालं आहे. आता पुढं काय, हा प्रश्न आहे.
आता लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा, की २००० मध्ये जन्मलेली मुलंही आता १९ वर्षांची झाली आहेत. प्रौढ आहेत. त्यांनी मतदानही केलेलं आहे. त्याच्या लेखी विसावं शतक म्हणजे केवळ इतिहास आहे. त्यांच्यासमोर हे सगळं शतक उभं आहे. अजून ८० वर्षं आहेत. ही मुलंच हे शतक घडवणार आहेत. (विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा शेवटी जन्मलेल्यांचाही ठसा या शतकावर असेलच!) या मुलांसाठी आपण ‘वारसा’ म्हणून काय देणार आहोत, याचा विचार करू लागलो तर मात्र काहीशी निराशा दाटून आल्याखेरीज राहत नाही. यात सगळ्यांत महत्त्वाचा असेल तो पर्यावरणाचा प्रश्न. पर्यावरणाचे घातक परिणाम पुढील पिढ्यांना भोगायला लागू शकतात. याची जाणीव आता जागतिक पातळीवर सगळीकडं होऊ लागली आहे. ऋतुचक्र बदलत चाललं आहे, हे आपणही आत्ता अनुभवतोय. निसर्गाचा समतोल ढासळला तर माणसानं बसवलेली घडी विस्कटायला अजिबात वेळ लागणार नाही. हा प्रश्न आपल्या अस्तित्वाशीच निगडित असल्यानं त्यावर पुढच्या काळात अधिकाधिक काम करावं लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक प्रगतीचा. देशासमोर बेरोजगारी, मंदी, घटलेला वृद्धिदर हे सगळंच मोठं आव्हान आहे. या तरुण पिढीच्या हाताला काम मिळालं नाही, तर त्यांच्यातील ऊर्जास्रोताला विघातक वळण मिळण्यास वेळ लागत नाही. आपण आत्ताही आजूबाजूला याची लागण झालेली पाहतोच आहोत. तेव्हा पुढच्या काळात तातडीनं या प्रश्नावर सगळ्यांनी मिळून मार्ग काढलाच पाहिजे. तिसरा प्रश्न आहे तो महानगरांमधील पायाभूत सुविधांचा. आपली खेडी ओस पडत चालली आहेत आणि शहरं अतिभयानक पद्धतीनं फुगत चालली आहेत. ही नैसर्गिक वाढ नाही. ही आपल्या फसव्या नियोजनामुळं आलेली सूज आहे. महानगरांमध्ये आत्ताच वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, महागाई आणि बेशिस्त या दुर्गुणांचा सर्वत्र संचार दिसतो. भविष्यात ही स्थिती सुधारली नाही तर रस्त्यारस्त्यावर खून पडायला वेळ लागायचा नाही. हे अराजक टाळण्यासाठी शहरांमधली गर्दी नियंत्रित केलीच पाहिजे.
सगळं जगणंच ‘टी-२०’सारखं वेगवान होत चाललेलं असताना आणि सगळ्याच प्रश्नांवर झटपट उत्तरं शोधण्याचा जमाना असताना, काही गोष्टींकडं दीर्घ पल्ल्याच्या कसोटी क्रिकेटसारखं बघितलं पाहिजे. टिकून राहणं एवढंच आव्हान केवळ पुरेसं नाही, तर टिकून राहून जगण्याचा आणि मानव्याचा दर्जा टिकवणं ही खरी ‘कसोटी’ आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २९ डिसेंबर २०१९)

---

25 Dec 2019

मटा रविवार संवाद लेख

स्वप्नांचा 'केक'वॉक
-----------------------

ख्रिसमसची चाहूल लागली, की तो शुभ्र दाढीधारी, लाल टोपीवाला सांताक्लॉज आठवतो. नाताळच्या आदल्या दिवशी रात्री हा गुपचूप घरी येऊन मुलांना भेटवस्तू ठेवून जातो. त्यासाठी घरोघरी मुलं ते सॉक्स टांगून ठेवतात. (याहून बरी वस्तू चालली असती खरं तर!) असो. तर मुलांची अशी दर वर्षी मजा मजा असते. पण आमचं म्हणणं, मोठ्यांनी काय पाप केलंय? त्यांनाही सांतानं भेटवस्तू द्याव्यात की...
आमच्या मागण्या तशा काही फार नसतात. मध्यममार्गीय विचारांची आणि मध्यमवर्गीय मनांची धाव कुठवर जाणार हो! पण पहाटे पहाटे येऊन सांताबाबानं कधीही बिल न येणारं एखादं क्रेडिट कार्ड आमच्या मोज्यात टाकलं, तर काय हरकत आहे? नोटाबंदीच्या धसक्यानंतर आम्ही शक्यतो रोख रक्कम बाळगणं बंदच केलंय. तसंही खिशात पैसे असले, की ते नाहक खर्च होतात. त्यापेक्षा ते नसलेलेच बरे. मात्र, कधीच बिल न येणारं क्रेडिट कार्ड मिळालं तर आम्ही आयुष्यभर सांताची गुलामी करायला तयार आहोत. विरक्ती ही संतांची शिकवण असली, तर आसक्ती ही सांताची शिकवण आहे. आणि आम्ही आमच्या आयुष्यात अजून आसक्ती सोडलेली नाही. आम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडतात. आम्हाला चांगले सिनेमे पाहायला आवडतं, नाटकं पाहायला आवडतात, सवाई गंधर्व महोत्सव सोफ्यावर बसून ऐकायचा असतो; याशिवाय बिझनेस क्लासनं इंटरनॅशनल प्रवास करायचा असतो. सगळं जग हिंडून बघायचं असतं. आणखी म्हणाल, तर अंबानींच्या मुलीच्या लग्नात (वाढपी म्हणून नव्हे) मिरवायचं असतं; प्रियांका-निकच्या लग्नात तिचा बेस्ट मॅन व्हायचं असतं (आता दुसरा पर्याय तरी कुठं ठेवलाय तिनं?); याशिवाय सहकारसम्राट, शिक्षणसम्राट, मद्यसम्राट आदी मंडळींच्या दर वर्षी नित्यनेमानं होणाऱ्या वेगवेगळ्या समारंभांना, लग्नांना-बारशांना-मुंजींना आम्हाला हेलिकॉप्टरनं जायचं असतं. फक्त बारीकशी अडचण एवढीच, की या सगळ्यांसाठी फार पैसे लागतात हो! म्हणून आम्हाला ना सांताकडून ते कधीही बिल न येणारं क्रेडिट कार्ड हवंय. (वास्तविक आपल्या देशात कधीही परत न फेडण्याची कर्जे सरकारी बँकांकडून घेऊन, मोठमोठ्या लोकांनी केवढा 'आदर्श' घालून दिला आहे. पण आम्हाला एवढी मोठी झेप काही जमायची नाही. त्यामुळं आम्हाला आपलं बिल न येणारं कार्ड पुरे!) बघा सांता, जमवा तेवढं!
आणि हो, सांता, आम्हा शहरवासीयांना अजून एक हक्काची जागा हवीय. ती द्याल का तुम्ही? आम्ही जिथं कुठं आमची दुचाकी किंवा चारचाकी घेऊन जाऊ, तिथं तिला लगेचच पार्किंग मिळेल, अशी काही तरी जादू करा ना! म्हणजे बटण दाबलं, की गाडीच्या समोर बरोबर तेवढी मोकळी जागा तयार झाली पाहिजे. अहो, आम्ही साधी भाजी आणायला गेलो, तरी पार्किंगसाठी दोन दोन, तीन तीन चकरा माराव्या लागतात आम्हाला. म्हणजे भाजी शंभर रुपयांची आणि त्यासाठी पेट्रोल जाळायचं दोनशे रुपयांचं असा आमचा उफराटा कारभार झालाय बघा. त्यामुळं आमच्या गाडीला अशी एक जादूची यंत्रणा बसवा, की ती गाडी आम्ही जिथं कुठं घुसवू तिथं आपोआप त्या गाडीच्या आकाराची जागा तयार व्हायला हवी. आजूबाजूची गर्दी अशी अवाक होऊन बघत राहिली पाहिजे. (पुण्यात हे दृश्य जमवणं तसं अवघड आहे म्हणा. इथं कितीही भारी सेलिब्रिटी शेजारून गेला, तरी आपल्या कट्ट्यावरच्या टोळीतून मान न वळवणारेच जास्त!) पण तरीही ती पार्किंगला आयती जागा मिळण्याची आमची फँटसी कायम आहे. सांताबाबा, आता अशी जादू फक्त तुमच्या पोतडीतच आहे बघा. तर विचार करा. तेवढं काम करूनच टाका...
अजून एक छोटीशी मागणी. खरं तर ही छोटीशी मागणी नाही म्हणता येणार; कारण त्या मागणीतच आम्हाला 'खूप काही' हवंय. सांता, आम्ही आता भारी भारी स्मार्टफोन वापरतो. पण त्यात कितीही जागा असली, तरी ती आम्हाला पुरत नाही. त्यामुळं आम्हाला अनलिमिटेड डेटा दिलात, तसंच अनलिमिटेड स्पेस पण द्या ना! हे म्हणजे खायला द्यायचं, पण पोट नाही द्यायचं असं झालं. असं करू नका. पोटावर मारा; पण डेटावर मारू नका. आमचं वाय-फाय, आमचं नेटवर्क कधीही बंद पडू देऊ नका. आमच्या स्मार्टफोनची बॅटरी कधीही उतरू देऊ नका. तुम्हाला तर माहितीच आहे, की हल्ली आम्ही एक वेळ न जेवता राहू (पण एक वेळच हं... रात्री मजबूत जेवू!), पण स्मार्टफोनशिवाय आम्हाला एक मिनिटही काढणं केवळ अशक्य आहे. आमच्या पोस्टवर येणाऱ्या 'लाइक'च्या संख्येवर आमचा त्या त्या वेळचा मूड असतो, हेही आता सांगायला नको. तेव्हा सांता, येताना भरपूर जीबी, टीबी भरून स्पेस घेऊन या आणि आमच्या गरिबाच्या स्मार्टफोनच्या झोळीत तेवढी टाका. हे तुम्हाला नक्की जमेल सांता... बघाच! तुम्ही हे एकदा केलंत की आमचे सगळे 'लाइक' तुम्हालाच!
सांता, आमच्या आजूबाजूला सध्या गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हे असे वेडपट लोक आम्हाला रोज रस्त्यानं जाता-येता दिसतात. काही जण भयानक धूर सोडणाऱ्या गाड्या चालवत असतात, काही जण बेदरकारपणे सिग्नल मोडून पुढं आपलं बाइकरूपी घोडं दामटत असतात, काही जण बसमधून बाहेरच्यांची पर्वा न करता पचापच थुंकत असतात, काही लोक रस्त्याच्या डाव्या बाजूला येऊन उभे राहतात आणि सिग्नल सुटला, की समोर जाणाऱ्यांना गाडी आडवी घालून उजव्या बाजूला वळतात, काही जण 'नो एंट्री'तून सरळ घुसतात आणि वर त्यांना काही म्हटलं, की बोलणाऱ्याचीच आय-माय उद्धरतात, काही महाभाग मध्यरात्री प्रचंड मोठा आवाज करीत, महागड्या गाड्या उडवीत बेफाम उद्दामपणा करतात, काही जण वाढदिवसाच्या नावाखाली वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथं फटाके उडवतात आणि अक्षरशः लाखो रुपयांचा धूर करतात, काही थोर महात्मे दारू पिऊन गाड्या चालवतात आणि स्वतःबरोबरच दुसऱ्याच्याही जीवाला धोका उत्पन्न करतात. तेव्हा सांताजी, या सगळ्यांचा मेंदू गुडघ्यातून काढून पुन्हा डोक्यात जागच्या जागी बसवणं तुम्हाला जमेल काय? ही मागणी आम्ही स्वतःसाठी नाही, तर आमच्या शहरासाठी, सगळ्या समाजासाठी करतो आहोत. तुम्हाला 'सीएसआर' म्हणून काही जबाबदारी असेलच की! त्या 'हेड'खाली एवढं काम करून टाका आणि तुम्हीही पुण्य कमवा...
याखेरीज अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ऑफिसात बॉसने न कुरकुरता हवी तेवढी रजा देणे, बायकोनं न कुरकुरता मित्रांसोबत हव्या तेवढ्या पार्ट्या करायला वा हुंदडायला जाऊ देणे, आपल्या क्रिकेट संघाने परदेशात जाऊन दर वेळीच माती न खाणे, मराठी सीरियलमध्ये डोक्यात न जाणारे (आणि डोक्याला पटणारे) प्रसंग घडविणे, वेळच्या वेळी बस/ट्रेन/विमान यांचे रिझर्व्हेशन मिळणे, फार अपेक्षा ठेवून वाचायला घेतलेले पुस्तक अगदीच टुकार न निघणे, फेसबुकवर आपण एका हेतूनं टाकलेली पोस्ट लक्षात न घेता, मूर्खासारख्या भलत्याच कमेंट करणाऱ्या लोकांना लिस्टीतून आपोआप गायब करणे अशा किती तरी गोष्टी तुम्ही सहज करू शकता, सांता... तुम्ही हे केलंत ना, तर लक्षावधी लोक तुम्हाला दुवा देतील बघा! (आमच्याकडं तर लगेच तुमचं मंदिरही बांधतील आणि वर तुमच्या धर्माच्या/जातीच्या चौकशा सुरू होतील.) असो.
आता शेवटची एकच मागणी - आमच्या राजकारण्यांना भ्रष्टाचार न करण्याची बुद्धी द्या...
अरे, अरे! असे पळून जाऊ नका हो सांता, एवढं अवघड आहे का हे? अहो, थांबा ना... असं काय करता? ओ सांता...

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २३ डिसेंबर २०१८)

---

30 Nov 2019

चिंतन आदेश दिवाळी २०१९ - लेख

जीवन त्यांना कळले हो...
-----------------------------


माणूस जन्माला आल्यापासून कुणाच्या ना कुणाच्या तरी प्रभावाखाली वाढत असतो. कुणाच्याही प्रभावापासून मुक्त असा माणूस मिळणं कठीणच. आपल्यावर सगळ्यांत आधी आपल्या आईचा व नंतर वडिलांचा प्रभाव पडत असतो. अगदी सुरुवातीपासून याच दोन व्यक्ती आपल्याबरोबर असतात. हे रक्ताचं नातं असल्यानं तो प्रभाव शारीरिक व मानसिक असा दोन्ही पद्धतींनी होतो. नंतर महत्त्वाचा प्रभाव पडतो तो आपल्या भावंडांचा. त्यातही मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांचा प्रभाव जास्त पडतो. अनेकांच्या आयुष्यात आई-वडिलांच्या जोडीनं त्यांच्या मोठ्या भावाचा किंवा बहिणीचा प्रभाव महत्त्वाचा असल्याचं दिसून येतं. सचिन तेंडुलकर व त्याचा मोठा भाऊ अजित हे याचं ठळक उदाहरण सांगता येईल. सख्ख्या भावंडांनंतर मग चुलत, मामे, मावस अशी भावंडं, त्यानंतर काका, मामा, मावशी, आत्या, काकू, मामी अशी नाती येतात. हे सगळे लोक अगदी लहानपणापासून आपल्यासोबत असल्यानं त्यांच्यापैकी कु णाचा तरी प्रभाव आपल्यावर पडणं अगदी सहज शक्य असतं. यातल्या कुणाला तरी वाचनाची आवड असते, कुणाला वाद्य वाजविण्याचा छंद असतो, तर कुणाला भटकंतीचा... या सगळ्यांचा आपल्यावर कळत-नकळत प्रभाव पडत असतो. त्यानंतर आपल्या आयुष्यात येणारी महत्त्वाची प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आपले गुरू, शिक्षक. अनेकांच्या आयुष्यात शिक्षकांचा वाटा फार महत्त्वाचा असतो. शिक्षक अनेक विद्यार्थ्यांचं जीवन अक्षरशः 'घडवत' असतात. शाळेतले, महाविद्यालयांतले सर्व शिक्षक आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असतात. याशिवाय आपण आयुष्यात ज्यांना कधीही भेटलो नाही, अशा व्यक्तींचाही प्रभाव आपल्यावर पडू शकतो. यात इतिहासातील व्यक्तिरेखा असतात, तसेच आपल्या जन्मापूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीही असतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत आणि अल्बर्ट आइन्स्टाइनपासून ते महात्मा गांधींपर्यंत हजारो व्यक्तिश्रेष्ठ येऊ शकतात. याशिवाय आपल्या काळातच वावरणाऱ्या, पण आपण त्यांना कधीही भेटू शकू अशी शक्यता नसलेल्याही व्यक्ती आपल्यावर प्रभाव पाडत असतात. यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील गावसकर अशांची नावे सांगता येतील. काही जणांचं आयुष्य अगदी वेगळं, विलक्षण असतं. अशा व्यक्तींचे अनुभव ऐकून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. तसं जगावंसं वाटतं. अशा व्यक्तींच्या जीवनशैलीचाही आपल्यावर नकळत प्रभाव पडतो.
माझ्या आयुष्यावर वर उल्लेख केलेल्या प्रत्येक घटकाचा कमी-अधिक प्रभाव पडला आहे. आई-वडील, लहानपणीचे शिक्षक हे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे गुरू व प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती असतातच. त्यामुळे मी ते गृहीत धरूनच पुढे लिहितो. आमच्या गावी एक उत्तम दर्जाचं वाचनालय होतं. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची गोडी लागली. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं 'महाराज' हे पुस्तक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी कुतूहल निर्माण झालं. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्रात होऊन गेलं, याचा अभिमान दाटून आला. पुढं महाराजांविषयी विपुल लेखन वाचण्यात आलं. या आभाळाएवढ्या माणसाबद्दलचा आदर वाढतच गेला. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एवढा विलक्षण होता, की त्यांच्या जीवनातले एकेक पैलू समजून स्तिमित व्हायला होतं. अजूनही कुठल्याही किल्ल्यावर, गडावर गेलो, की तिथल्या मातीला महाराजांचे चरणस्पर्श झाले असतील, या भावनेनं ऊर दाटून येतो. सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांची पावलं बघून असेच डोळे भरून आले होते. मायमाउलीसारखी रयतेची काळजी घेणारा हा राजा केवढ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आयुष्य झुंजला, हे बघून मी सदैव नतमस्तक होतो. माणसांची अचूक पारख, जीवाला जीव देणारा दिलदार स्वभाव, प्रसंगी दोन पावलं माघार घेण्याचं चातुर्य आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आईचं स्वप्न साकार करण्यासाठी तळहातावर शिर घेऊन उभ्या आयुष्याचीच केलेली झुंज या सगळ्याच गोष्टींमुळं महाराज मोठे झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कायम आहे आणि राहील.
पुढं पुस्तकं वाचत असताना अनेक लेखकांच्या लिखाणाने प्रेरित झालो. पण माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो विनोदी वाङ्मयाचा. यात चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार अशा अनेक लेखकांचे नाव सांगता येईल.
पण त्यातही माझ्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव कुणा एका व्यक्तीचा पडला असेल, तर तो पु. ल. देशपांडे यांचा. केवळ लेखक पुलं नव्हेत, तर पुलंच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचाच तो प्रभाव होता. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रच पुलंच्या प्रेमात होता व त्यांना 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असं बिरुदही लाभलं होतं. तेव्हा माझ्यावरचा प्रभाव फार काही वेगळा म्हणता यायचा नाही. पण हा प्रभाव कसा पडत गेला, याची थोडी चिकित्सा जरूर करता येईल.
पुलंची पुस्तकं वाचताना सर्वांत प्रथम लक्षात आली ती एक गोष्ट. त्यांचं बहुतांश लेखन हे कथा किंवा कादंबरी या स्वरूपात नव्हतं. म्हणजे एका साच्यातील काल्पनिकता त्यांच्या लिखाणात नव्हती. त्यांनी जे जे लिहिलं, त्याला वास्तव जगण्याचा एक अदृश्य धागा सदैव गुंफलेला जाणवायचा. त्यामुळंच मुंबईसारख्या शहरात किंवा चाळीत कधीही न राहिलेल्या माझ्यासारख्या मुलाला 'बटाट्याची चाळ'ही भिडली. कल्पनेच्या जगात त्यांनी नेलं, पण ते अशा स्वरूपात! 'अपूर्वाई' व 'पूर्वरंग' हा कित्येक मराठी माणसांनी केलेला पहिला परदेश प्रवास होता. त्याआधी मराठी साहित्यिक परदेशांत गेले नव्हते, असं नाही. पण पुलंनी स्वतःबरोबर आम्हाला तिथं साक्षात फिरवून आणलं. त्यामुळं सुमारे ५०-५५ वर्षांनीही पुलंच्याच या लिखाणाचे संदर्भ संबंधित देशात कुणी गेला तरी आजही लिहिले जातात. 'व्यक्ती आणि वल्ली'सारखं पुलंचं अजरामर पुस्तक फार लहान वयात वाचल्यानं माणसं समजायला मदत झाली. जगात किती वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात आणि त्यांच्यात किती वैविध्य असतं हे पुलंचं लिखाण वाचूनच समजलं. नंतर वय वाढत गेलं, तसं पुलंनी केलेलं गंभीर लेखनही वाचलं. त्यांचे सिनेमे पाहिले, त्यांनी लिहिलेली नाटकं पाहिली, त्यांच्या गाजलेल्या एकपात्री प्रयोगांच्या चित्रफिती नंतर पाहायला मिळाल्या. हे सगळं बघून या माणसाच्या अष्टपैलुत्वाची नव्यानं ओळख घडत गेली. सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी...' हे पुस्तक वाचल्यावर सुरुवातीला सुनीताबाईंचा राग आला होता. पण वयाची प्रगल्भता आल्यानंतर त्या लेखनाचंही मोल कळलं.
मी दहावीत असताना याच पुलप्रेमातून त्यांना पोस्टकार्ड पाठविण्याचं धाडस मी केलं होतं. महिनाभरानं त्यांचं चक्क उत्तर आलं, तेव्हा मला गगन ठेंगणं झालं. मग मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, तेही त्यांना कळवलं. त्यावर त्यांचं अभिनंदनाचं उत्तर आलं. आता तर मला हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला होता. पुलंचे ते आशीर्वाद घेऊन मी पुण्यात पुढील शिक्षणासाठी दाखल झालो. एके दिवशी रस्त्यावरच्या फोन बूथवरून थेट त्यांच्या घरी फोन लावला. फोन सुनीताबाईंनी उचलला. 'मला भाईकाकांशी बोलायचंय' असं मी चाचरत चाचरत म्हटलं. थोड्या वेळानं साक्षात पुलं फोनवर आले. त्यांनी माझी अगदी हळुवार आवाजात चौकशी केली. मी कुठं शिकतो, काय करतो विचारलं. मी त्यांना सांगितलं, की मला तुमचं साहित्य आवडतं. त्यावर त्यांनी 'काय आवडलं नेमकं' असं विचारलं. मला उत्तर सुचेना. मग मी 'सगळंच आवडतं' असं ठोकून दिलं. एका हातात रुपयाची आणखी दोन कॉइन धरून मी उभा होतो. युनिव्हर्सिटी रोडवरच्या वर्दळीचा आवाज एका बाजूनं मोठमोठ्यानं येत होता. आणि मी रिसीव्हरला लावलेल्या कानात प्राण आणून माझ्या परमदैवताचं बोलणं ऐकत होतं. हे सगळं बोलणं मिनिटा-दीड मिनिटांचं झालं असेल. नंतर त्यांनी हळुवारपणे 'आता मी ठेवतो हं फोन' असं सांगून फोन बंद केला. त्या वेळी पुलंचं वय ७२-७३ असावं. ते खरोखर थकले होते. त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर पूर्ण थांबला होता. त्यानंतर मी पुलंना आणखी दोन पत्रं पाठवली. त्याचीही त्यांनी उत्तरं पाठविली. पण पहिल्या पत्रातला मजकूर आता हळूहळू कमी होत गेला होता. अक्षरांतील थरथर वाढली होती. माझ्या आवडत्या लेखकाची ही शारीरिक विकलता मला सहन झाली नाही. मी नंतर त्यांना पत्रं लिहिणं थांबवलं. त्यांना प्रत्यक्ष भेटायला जायची फार इच्छा होती. पण ते कधी जमलं नाही. त्या काळात ते मुळातच खूप थकले होते. सुनीताबाई अगदी मोजके, जवळचे लोक सोडले तर त्यांना बाहेरच्या कुणाला भेटूही देत नसत, असं ऐकू येई. मग त्या धास्तीपोटी कधी जाणं झालंच नाही. पुढं मी 'सकाळ'मध्ये उपसंपादक म्हणून काम करू लागलो. त्यानंतर वर्ष-दोन वर्षातच पुलंची तब्येत खूप खालावली व त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुलंचे ते शेवटचे जवळपास आठ-पंधरा दिवस आम्ही काही पत्रकार रोज 'प्रयाग'ला जायचो. मी पुलंना प्रत्यक्ष असं तिथंच पाहिलं. साधारण दहा मीटर अंतरावरून... काचेपलीकडं एका कॉटवर ते झोपले होते व नाकावर ऑक्सिजन मास्क लावला होता. आयुष्यात रंगबिरंगी मुखवटे घालून जगभरातल्या मराठी रसिकांना सतत हसवत ठेवणाऱ्या या अवलियाचं ते तसं दर्शन मात्र मला अगदी असह्य झालं. काही दिवसांनी पुलं गेले. माझ्या ऑफिसमध्ये मला ही बातमी कळली. चारचौघांत रडण्याची एक मध्यमवर्गीय, घाबरट भीती मनात होती. मग ऑफिसबाहेर आलो. शनिवारवाड्याच्या कॉर्नरवरून घरी जाताना अश्रूंचा बांध फुटला. मनसोक्त रडलो. वास्तविक ते जाणार हे जवळपास स्पष्टच झालं होतं. पण तरीही 'ते आहेत' ही गोष्ट समाधान देणारी होती. आता 'ते नाहीत' ही बाब झेपत नव्हती. माझ्या घरात तोपर्यंत माझ्या आजोबांचे व आजीचे मृत्यू मी पाहिले होते. त्यानंतर एवढे अश्रू कुणासाठीही वाहिले नाहीत. ते वाहिले फक्त पुलंसाठी. पुलं शरीरानं नसले तरी त्यांच्या पुस्तकांच्या, चित्रफितींच्या किंवा चित्रपटांच्या, नाटकांच्या रूपानं आपल्यातच आहेत, याची जाणीव नंतर होऊ लागली आणि खूप दिलासा मिळाला. पुढं मी लिहायला लागलो. सदरं लिहिली, चित्रपट परीक्षणं लिहिली, पुस्तकं लिहिली. कुणी कुणी म्हणायचं, तुझ्या लिखाणावर पुलंचा प्रभाव दिसतो. मला आतून बरं वाटायचं. पण नंतर लक्षात यायचं, आपण नकळत त्यांची नक्कल करतो आहोत का? नक्कल करून आपली स्वतःची शैली विकसित होणार नाही. मग प्रयत्नपूर्वक त्या प्रभावापासून दूर जाण्याचा प्रयत्न (फक्त लेखनापुरता) करायला लागलो. मात्र, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वानं माझ्यावर घातलेली मोहिनी कायमच आहे व राहील.
पुलंनी मला काय दिलं, असा विचार करायला लागलो, तर एखाद्या कॅलिडोस्कोपमधून पाहावं तसे त्यांनी आपल्या जगण्याला दिलेले विविध रंग व आकार दिसू लागतात. मी गेल्या वर्षी लिहिलेलं 'थ्री चीअर्स' हे विनोदी लेखांचा संग्रह असलेलं पुस्तक पुलंनाच अर्पण केलंय. त्यांच्या जन्मशताब्दीत हा योग यावा, हे मला फार मोठं भाग्य वाटतं. या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात मी पुलंनी माझ्यावर केलेल्या गारूडाबद्दल लिहिलंय. त्याचा थोडा भाग इथं सांगणं औचित्याचं होईल, असं वाटतं. मी लिहिलंय -

'पुलंनी महाराष्ट्राला निर्मळपणे हसायला शिकवलं. पुलंच्या आधी विनोद नव्हता, असं नाही. मात्र, पुलंनी त्यांच्या आनंदयात्रेसारख्या जगण्यातून हा विनोद नीट समजावून सांगितला. जगण्याकडं पाहण्याची एक अतिशय स्वच्छ, निरोगी दृष्टी दिली. आयुष्य भरभरून जगायला लावणारा मूलमंत्र दिला. खूप लहानपणापासून पु. लं.चं वाचत गेलो आणि जगणं उमगत गेलं. विनोद हा त्यांच्या जगण्यातला केवळ एक भाग होता, हेही कळलं. त्यांची संगीताची आवड, त्यांच्यातला खेळिया, अवलिया चित्रकर्मी, प्रतिभावान रंगकर्मी, कुशल दिग्दर्शक, वक्ता, दाता असे अनेक पैलू नंतर उलगडत गेले आणि या व्यक्तिमत्त्वाविषयीचा आदर वाढतच गेला. एक माणूस आपल्या उण्यापुऱ्या ८० वर्षांच्या आयुष्यात काय काय करू शकतो, याचं पुलंचं आयुष्य हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. पुलंच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन माझ्यासारखी अनेक मुलं लिहिती झाली आणि याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या अतिशय नितळ, निखळ, सात्त्विक अशा लिखाणालाच आहे, यात शंका नाही. जगण्यावर विलक्षण प्रेम असल्याशिवाय आणि माणूस म्हणून संपूर्ण विकास झाल्याशिवाय असं लिखाण कुणाच्या हातून लिहून होणार नाही. पुलंनी या मातीवर, मराठी भाषेवर, इथल्या माणसांवर मनापासून प्रेम केलं. जगण्याचं प्रयोजन शिकवलं, कलेचा आस्वाद कसा घ्यावा याचे धडे दिले. गुणग्राहकता कशी असते, हे स्वतःच्या वागणुकीतून दाखवून दिलं. आपणही असं अर्थपूर्ण जगलं पाहिजे, असं त्यांच्या आयुष्याकडं बघून वाटावं, एवढं रसरशीत जगले. पुलंचा विनोद म्हणजे केवळ शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरती करीत साधलेला विनोद नव्हता. जगण्यातली विसंगती टिपत, विसंवादातून नेमका सूर शोधण्याचं कसब त्या विनोदात होतं. त्यांचा विनोद कधीच घायाळ करीत नव्हता. उलट तो निर्विष असा विनोद होता आणि आपल्याला स्वतःवर हसायला शिकवायचा. मराठी जनांच्या मनाची मशागत करीत पु. लं.नी विनोदाची ही दिंडी अभिमानानं आयुष्यभर खांद्यावर मिरविली. ही दिंडी एवढी चैतन्यशील आणि देखणी होती, की मराठी माणूस वारकऱ्यांच्या भक्तिभावाने पुलंच्या मागून विनोदाचे, आनंदाचे गाणे गात गात चालत निघाला. पुलंची ही आनंदयात्रा त्यांच्या ऐहिक अंतानंतरही सुरूच आहे. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तात आता हा आनंदयात्री आहे. पुलंच्या मागं निघालेल्या या प्रचंड दिंडीतला, आनंदयात्रेतला मी एक लहानसा वारकरी आहे, यात्रेकरू आहे. त्यांनी दाखविलेल्या सत्त्व व सत्याच्या निखळ मार्गानं वाट चालण्याचा प्रयत्न करतो आहे. या पुस्तकातले हे सगळे लेख म्हणजे या आनंदयात्रेत उधळलेला अबीर-गुलाल आहे. पु. ल. ज्या काळात जगले त्याहून आजचा काळ किती तरी वेगळा आहे. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती आणि जगण्याचा वाढलेला वेग श्वास गुदमरवून टाकतो आहे. रुढी-परंपरांचे स्खलन आणि मूल्यांची घसरगुंडी रोजची झाली आहे. माणसा-माणसांतला संवाद वाढण्याऐवजी कमी होताना दिसतो आहे. कुटुंब संस्थेवर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत. अशा वातावरणात सकारात्मक भाव मनात ठेवून जगत राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. मात्र, पुलंच्या लिखाणातून ही ऊर्जा आपल्याला सतत मिळत राहते. आयुष्याचा एवढा मंगलमय उत्सव साजरा करण्याऐवजी रडत बसू नका, असंच त्यांचे शब्द आपल्याला सतत सांगतात. जगणं साजरं करण्याची ही दृष्टी पुलंनी आपल्याला दिली, हे त्यांचे ऋण कुठलाही मराटी माणूस कधीच विसरू शकणार नाही.'

पुलंचा प्रभाव असा केवळ माझ्यासारख्या एका व्यक्तीवर नव्हे, तर सर्व समाजावर पडलेला आहे. या थोर व्यक्तिमत्त्वाकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. स्वतः पुलंना व्यक्तिपूजेचा तिटकारा होता. मात्र, एखाद्या माणसाच्या गुणांवर ते भरभरून प्रेम करीत. म्हणून तर 'गुण गाईन आवडी'सारखं पुस्तक ते लिहू शकले. महाराष्ट्रातल्या आनंद यादव, दया पवार यासारख्या कित्येक लेखकांना पुलंनी उजेडात आणलं. वैचारिक विचारसरणीनं ते समाजवादी होते. समाजातल्या तळागाळातल्या लोकांविषयी त्यांना आस्था होती. ही आस्था त्यांनी अनेकदा कृतीतून व्यक्त केली होती व लाखो रुपयांच्या देणग्या मुक्त हस्ते दिल्या. पुलं व सुनीताबाईंचं सहजीवनही हेवा वाटावं असं होतं. बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम हे दोघं करीत, तेव्हा महाराष्ट्राचं अवघं सांस्कृतिक वैभव त्या रंगमंचावर अवतरलंय, असं वाटे. कुणी तरी या दोघांना 'महाराष्ट्राचं फर्स्ट कपल' म्हटलंय ते अगदी बरोबर आहे.
आपल्याला असं जगता यावं, असं मला फार थोड्या माणसांविषयी वाटलेलं आहे. पु. ल. हे त्यात अग्रस्थानी आहेत. वयाच्या पन्नाशीत त्यांनी बंगाली शिकायचा ध्यास घेतला म्हणून मीही ती भाषा गिरवण्याचा (अयशस्वी) प्रयत्न केला. पुलंचं मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित होण्यापलीकडं त्यातून अन्य काही निष्पन्न झालं नाही. पण एखाद्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर प्रभाव कसा आणि किती असू शकतो, हे सांगण्यासाठीच केवळ ही बाब इथं नमूद केली.
पुलंसारखा आणि त्यांच्याएवढा प्रभाव अद्याप कुणाचाच पडला नसला, तरी वयाच्या एका टप्प्यानंतर आणखीही काही लेखक आवडू लागले. त्यात गौरी देशपांडे व मिलिंद बोकील यांचा उल्लेख करावाच लागेल. या दोन्ही थोर स्त्री-पुरुषांचा माझ्यावर पुष्कळ प्रभाव पडला आहे, असं म्हणता येईल. या दोघांच्याही लेखनातून विशेषतः स्त्री व पुरुष नातेसंबंधांच्या अनेकानेक छटा उलगडत गेल्या. गौरीच्या बाबतीत तर तिच्या लेखनासोबतच तिच्या विलक्षण जगण्याचाही सदैव हेवा वाटत आला आहे. वयाच्या पस्तिशीनंतर मी हे दोन्ही लेखक वाचले, हे एका परीनं बरंच झालं. विशेषतः आपल्या एकारलेल्या, सरळसोट मध्यमवर्गीय जगण्यात गौरी किंवा बोकिलांनी लिहिलेले स्त्री-पुरुष येणं जवळपास दुरापास्तच. तसे अनुभवही गाठीला लाभणं दुर्मीळ. पण जग आपल्यासारखं सरळसोट किंवा एकारलेलं नसतंच. त्यामुळं ते समजून घेण्यासाठी या दोघांचं बोट धरणं गरजेचं होतं. ते वेळीच मिळालं. त्यामुळं स्त्रियांविषयीची माझी टिपिकल, पारंपरिक मतं बदलायला पुष्कळ उपयोग झाला. वयानुसार येणारी प्रगल्भता अनेकांच्या विचारांमध्ये परावर्तित होतेच असं नाही. मात्र, गौरी व बोकील वाचल्यानंतर माझ्या विचारांतही बदल झाला, हे मला मान्य करायला हवं. ते बदललेले विचार माझ्या पुढील लेखनातही आपोआप उतरले. त्यामुळं माझ्या जगण्यावर या दोघांचाही प्रभाव आहे, यात शंका नाही.
क्रिकेट हाही माझा आवडीचा खेळ. अगदी लहानपणापासून हा खेळ बघत आणि खेळत आलोय. क्रिकेटमध्ये माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला तो सुनील मनोहर गावसकर या 'लिटल मास्टर'चा. आमच्या लहानपणी घरी टीव्ही आला तेव्हा टीव्ही सुरू केल्यावर सर्वप्रथम दिसले ते हेच महाशय. सुनील हा आमचा बालपणातला हिरो होता. भारतीय क्रिकेटला सुनील गावसकरनं आत्मसन्मान दिला, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हेल्मेट न घालता, विंडीजच्या तोफखान्यासमोर उभा राहणारी ही बटूमूर्ती आमच्या अभिमानाचा विषय होती. मला जरा कळायला लागेपर्यंत गावसकर निवृत्तही झाला होता, पण त्याचा थोडा खेळ तरी मी 'लाइव्ह' टीव्हीवर पाहिला आहे. नंतर त्यानं समालोचनात कारकीर्द केली, तीही जोरदार यशस्वी झाली आहे. 'केव्हा थांबावं याचा अचूक निर्णय घेणारा माणूस' म्हणूनही मला गावसकर प्रिय आहे. त्याला मराठीपणाचा अभिमान आहे. पण तरी त्याचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व हेवा करावा असं आहे. त्याच्या स्वभावात एक मिश्कीलपणा आहे, तो कॉमेंटरी करत असतानाही सदैव प्रत्ययास येतो. त्याच्या खेळाच्या ज्ञानाविषयी तर काही शंकाच नाही. त्यामुळंच आज सत्तरीतही तो 'आउटडेटेड' झालेला नाही, तर उत्साहानं जगभर फिरत मस्त क्रिकेट व जगणं एंजॉय करत असतो. हे मला फार आवडतं. आपलं म्हातारपण कुणासारखं जावं, तर ते गावसकरसारखं, असंच मला सतत वाटत असतं.
असाच काळावर विजय मिळविणारा आणखी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा माणूस म्हणजे अमिताभ बच्चन. विशेषतः 'सेकंड इनिंग'मधला अमिताभ मला विशेष आवडतो. अमिताभमधला एक कुटुंबवत्सल, सुसंस्कृत माणूस सर्वाधिक भावतो. आपण आयुष्याच्या उत्तरार्धात 'ग्रेस' टिकवून जगावं कसं, तर गावसकरप्रमाणेच अमिताभसारखं असं उत्तर माझं मन कायम देतं. अमिताभचं आयुष्यही विलक्षण चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्यात वैयक्तिक आनंदाचे क्षण आहेत, तशीच दुःखंही आहेत. पण हा माणूस सगळ्या गोष्टींना हसतमुखानं सामोरा गेला आणि आजही किती तरी सहकारी कलाकारांपेक्षा जास्त बिझी आहे. अमिताभ 'आदर्श व यशस्वी भारतीय पुरुषा'चं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या उतारवयातील उत्साहासारखा उत्साह आपल्यालाही लाभावा, असं वाटतं, हे जास्त खरं आहे.
कवी बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत सांगायचं, तर 'जीवन त्यांना कळले हो' असं ज्यांच्याविषयी खात्रीनं म्हणता येईल, अशा या सगळ्या मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाखाली जगताना, आपणही आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवावं आणि भविष्यात कुणी तरी आपल्यावरही 'माझ्यावर श्रीपाद ब्रह्मे यांचा प्रभाव आहे,' असं लिहिण्याइतपत आयुष्यात काही तरी करून दाखवावं, एवढीच इच्छा आहे.
प्रभावाच्या प्रभावाखाली एवढी अपेक्षा ठीकच म्हणावी ना!

---

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१९)
---

18 Nov 2019

चपराक दिवाळी अंक २०१९ - लेख

'रानडे'तले दिवस
---------------------



पुण्यातला फर्ग्युसन रस्ता म्हणजे तुरेवाला कोंबडाच. हा आरवल्याशिवाय गावात उजाडत नाही. आम्ही त्याला प्रेमानं एफसी रोड म्हणतो. (तसंही निम्मं वाक्य इंग्लिशमध्ये बोलल्याशिवाय या रस्त्याचं नागरिकत्व मिळत नाही.) अशा या महान रस्त्यावर रूपाली, वैशाली आणि तुलनेत नव्यानं झालेलं वाडेश्वर अशी तीन तीर्थक्षेत्रं (डेक्कनकडून आलं, की) उजव्या बाजूला आहेत. डाव्या बाजूची सगळी कसर आमच्या रानडे इन्स्टिट्यूटनं भरून काढलेली आहे. आधी पुणे शहर जगात भारी, त्यात फर्ग्युसन रस्ता पुण्यात भारी आणि त्यात हे चार धाम एफसी रोडवर भारी! अशा या चार धामांपैकी एक असलेल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मला शिकायला मिळालं हे माझं खरोखर भाग्य... पत्रकारितेतलं ते एक वर्ष म्हणजे आयुष्यातलं एक संस्मरणीय वर्ष होतं, यात शंका नाही.
बरोबर दोन दशकं उलटली. जुलै १९९९ मध्ये मी या संस्थेत प्रवेश घेतला. तेव्हा माझं सगळं उलटंच चालू होतं. अपयशी इंजिनीअरिंगनंतर मी १९९४ मध्ये अचानक नगरच्या 'लोकसत्ता'त प्रूफरीडर म्हणून काम करू लागलो होतो. नंतर सप्टेंबर १९९७ मध्ये पुण्यात 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. सहा महिन्यांत उपसंपादक आणि दीड वर्षांत कायम झालो. उपसंपादक म्हणून जवळपास दोन वर्षं काम केल्यानंतर मी पत्रकारितेचे मूळ धडे गिरवायला निघालो होतो. माझ्यासोबतच 'सकाळ'मध्ये रुजू झालेला मंदार कुलकर्णीही होता. आम्ही तेव्हाचे संपादक विजय कुवळेकर सरांची परवानगी घेतली आणि बी. सी. जे.चा अर्ज भरला. तेव्हा हा एकच वर्षाचा कोर्स होता आणि त्याला बी. सी. जे. (बॅचलर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) असं म्हणत. प्रवेशाची अट किमान पदवी ही होती. माझं सगळंच अर्धवट झाल्यानं मी नगरला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी. ए.ला प्रवेश घेतला होता. पुण्यात नोकरी आणि वीकएंडला नगरला क्लासेस अशी कसरत चालू होती. पण फर्स्ट क्लासमध्ये बी. ए. झालो आणि बी. सी. जे. ला प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. तेव्हा या कोर्सच्या शेवटी दिल्लीला जी स्टडी टूर नेली जायची, त्याचं मला अत्यंत आकर्षण वाटत होतं. तोवर मी दिल्ली पाहिली नव्हती. या कोर्सच्या निमित्ताने दिल्लीदर्शन होईल, असा एक हेतू मनात होताच. तेव्हा मी आणि मंदारनं या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. आम्ही ऑलरेडी वृत्तपत्रांत काम करीत असल्यानं आम्हाला ती परीक्षा फारच सोपी गेली. वस्तुनिष्ठ प्रश्न वगैरे तर आम्ही किरकोळीत उडवले. त्यामुळं प्रवेशाच्या लिस्टमध्ये आमचं नाव आलं होतं. नंतरचा टप्पा हा मुलाखतीचा होता. तेव्हा अरुण साधू सर या विभागाचे प्रमुख होते. साधू सर, उज्ज्वला बर्वे मॅडम आणि अजून कुणी तरी एक पाहुणे अशा तिघांनी माझी मुलाखत घेतली. साधू सरांनी एवढंच विचारलं, की तुम्ही ऑलरेडी नोकरी करतच आहात, तर मग हा कोर्स कशाला करताय? मग त्यांना सांगितलं, की पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण व पदवी हवी आहे. त्यानंतर आम्ही हा कोर्स मधेच सोडून जाऊ आणि त्यांची एक सीट वाया जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अजिबात मधेच सोडून जाणार नाही, अशी हमी दिल्यावर माझा प्रवेश निश्चित झाला.
रानडे इन्स्टिट्यूटचा परिसर रम्य आहे. गुडलक चौक ओलांडला, की डाव्या बाजूला आर्यभूषण मुद्रणालयाची जुनी इमारत लागते. तिथं कोपऱ्यावरच नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचा पुतळा आहे. त्यानंतर लगेच आमची रानडे इन्स्टिट्यूट. वास्तविक हा पुणे विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग. पण तो ज्या इमारतीत भरतो, तिथं पूर्वी रानडे इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट होती. ती १९१० मध्ये स्थापन झाली होती. नंतर ती बंद पडली असावी. मात्र, १९६४ मध्ये याच इमारतीत पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू झाला. नंतर समोर नव्या इमारतीत विद्यापीठाचा परकीय भाषा विभागही सुरू झाला. फर्ग्युसन रस्त्यावर मोक्याच्या जागेवर ही संस्था वसली असल्यानं वृत्तपत्रविद्या विभाग इथून दुसरीकडं जायला सगळ्यांचाच विरोध आहे. मी या ठिकाणी प्रवेश घेतला, तेव्हा म्हणजे १९९९ मध्ये फर्ग्युसन रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक चालायची. मध्ये चांगला मोठा डिव्हायडर व त्यावर सोडियम व्हेपरचे लखलखीत दिवे होते. समोर 'वाडेश्वर'ही नव्हतं. तिथं छोटी छोटी दुकानं लागलेली असायची, असं आठवतंय. शेजारचं 'जोशी वडेवाले'ही नव्हतं. तिथं 'मयुरी' नावाचं एक छोटंसं रेस्टॉरंट होतं. त्याला एक पोटमाळा होता. लपून सिगारेट ओढण्यासाठी मुलांची (आणि मुलींचीही) ती फेव्हरिट जागा होती. ‘त्रिवेणी’ मात्र तेव्हाही होतं. तेव्हा तिथं आत बसायला दोन बाकडी होती. तिथं दाटीवाटीत बसून कित्येकदा मित्रांसोबत चहा-क्रीमरोल हाणले आहेत. अलीकडं झालेलं 'वेस्टसाइड'ही नव्हतं. तिथं एक छोटासा बंगला होता, असं आठवतंय. तोवर मी 'सकाळ'मध्ये सायकलच वापरत होतो. पुण्यात कुठंही रिपोर्टिंगला जायचं असेल, तरी सायकलवरूनच जायचो. तेव्हा सायकली बऱ्यापैकी वापरल्या जात होत्या. आमच्या ऑफिसात रीतसर भलंमोठं सायकल स्टँड होतं. जिथं रिपोर्टिंगला जायचो, त्या संस्थांमध्येही सायकल स्टँड असायचेच. मात्र, 'रानडे'त प्रवेश घेतल्यानंतर मला तिथं सायकलवर जायची लाज वाटायला लागली. नवी गाडी घेण्याची ऐपत नव्हती. सुदैवानं माझा जीवलग मित्र नीलेश नगरकर यानं तेव्हा नवी बाइक घेतली आणि त्याची 'एम-८०' मी विकत घेतली. आता मी त्या ग्रे कलरच्या 'एम-८०'वरून ऐटीत कॉलेजमध्ये येऊ लागलो.
लवकरच कॉलेज सुरू झालं आणि नवे मित्र-मैत्रिणी मिळाले. पुणे विद्यापीठाचा लौकिक मोठा असल्यानं इथं देशभरातून विद्यार्थी येत असतात. आमच्याही वर्गात दिल्ली, इंदूर इथून आलेल्या मुली होत्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेली मुलं होती. अशा वर्गात आपोआपच काही गट पडतात. मुलं आणि मुली हे तर अगदी ढोबळ गट झाले. पण ‘सिटी’तले आणि ‘बाहेरचे’ असे दोन गट पडले. ‘इंग्लिश मीडियमवाले’ आणि ‘मराठी मीडियमवाले’ असा एक गट पडला. (आम्हाला उत्तरपत्रिका मराठी किंवा इंग्लिशमधून लिहिण्याची मुभा होती. वर्षाच्या सुरुवातीलाच हा चॉइस सांगावा लागे. मी स्वाभाविकच मराठी निवडलं.) याशिवाय मराठी आणि अमराठी असाही एक गट पडला. जातीवरून गट पडल्याचं मला तरी आठवत नाही. तेव्हा ते वारं नसावं. (नंतर मात्र हे फार वेगानं वाढलं, असं निरीक्षण आहे.) आमच्या वर्गात मी, मंदार, सिद्धार्थ केळकर, संतोष देशपांडे, गणेश देवकर, गजेंद्र बडे, सुमीत शहाणे, श्रीरंग गायकवाड, दीपक चव्हाण, विनोद पाटील, जय अभ्यंकर, अभियान हुमणे, अर्जुन भागचंद, मठपती आदी मुलं होती, तर जया जोस, कल्याणी चांदोरकर, गौरी कानेटकर, मानसी सराफ, उमा कर्वे, वैशाली भुते, अर्चना माळवे, वैशाली चिटणीस, प्रियंवदा कौशिक, प्रियांका डांगवाल, अस्मिता वैद्य, मीरा कौप, कस्तुरी डांगे, कल्पना पडघन, प्रिया कोठारी, सादिया समदानी, लिनेट थाइपरंबिल आदी मुली होत्या. यातले बहुसंख्य मित्र-मैत्रिणी आजही संपर्कात आहेत. (आमच्या वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुपही तयार झालाय, हे सांगायला नकोच!) विशेष म्हणजे बरेच जण आजही पत्रकारितेत सक्रिय आहेत.
साधू सर आमचे एचओडी होते. त्यामुळं आम्ही अगदी भाग्यवान ठरलो. साधू सर नियमित लेक्चर घेत नसत; पण एखाद्या ऑफ तासाला वर्गात येत आणि त्यांचा मूड लागला, तर कुठल्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांवरचं खास ‘साधू शैली’तलं विवेचन आम्हाला ऐकायला मिळे. साधू सरांचा मित्रपरिवार व गोतावळा मोठा होता. त्यांच्यामुळं महाराष्ट्रातल्या बऱ्याच नामवंतांचे पाय आमच्या इन्स्टिट्यूटला लागत. कधी काही काम असेल, तर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये जायचो. सर अनेकदा त्यांच्या आवडत्या ‘विल्स’चे झुरके घेत बसलेले असत. आम्हा विद्यार्थ्यांशी ते कायमच मैत्रीच्या नात्यानं वागले. आमच्या काही सहकाऱ्यांना तर ते सिगारेटही ऑफर करायचे म्हणे. (हे त्या सहकाऱ्यांनीच आम्हाला सांगितलं. साधू सरांना विचारायची हिंमतच नव्हती.) पण सरांचा मोकळा स्वभाव बघता हे शक्य होतं.
इतर विषयांना प्रा. उज्ज्वला बर्वे, प्रा. केवलकुमार, किरण ठाकूर सर, प्रा. प्रसन्नकुमार अकलूजकर सर, प्रा. जयदेव डोळे सर नियमित शिकवायचे. विठ्ठल माविनकुर्वे सर, श्रीकांत परांजपे सर, आशा चौधरी मॅडम, त्रिवेणी माथूर मॅडम वेगवेगळे विषय शिकवायला यायचे. अकलूजकर सरांचा मराठीचा तास सोडला, तर इतर सर्व विषय इंग्लिशमधून शिकवले जायचे. नंतरची चर्चा (आणि वाद-विवाद) बहुतांश मराठीतूनच चालायची. आम्ही सुरुवातीला मराठी मीडियमवाले दबकून असायचो. पण त्यातही मंदार व मी ऑलरेडी ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत असल्यानं आम्ही उगाचच सीनिऑरिटी गाजवायचो. इतर मुलंही आम्हाला जरा दबकून वागायचे. नंतर आम्ही इंग्लिश मीडियम ग्रुपशी मैत्री केली. त्यातल्या कल्याणी, प्रियंवदा, उमा यांच्याशी चांगली मैत्री झाली व ती आजतागायत टिकून आहे. गौरी, मानसी, अर्चना या तर ‘मराठी’वाल्याच होत्या. कल्याणीनं आणि मी असं ठरवलं होतं, की मी तिच्याशी कायम इंग्लिशमध्ये बोलणार आणि ती माझ्याशी कायम मराठीतून बोलणार... ती मराठीच होती, त्यामुळं तिला काही प्रॉब्लेमच नव्हता. मी मात्र माझ्या मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये तिच्याशी अफाट गप्पा मारायचो. पण ती कायम शांतपणे ऐकून घ्यायची. काही चुकलं तर सांगायची.
काही शिक्षक आपोआप लाडके होतात. उज्ज्वला बर्वे मॅडमचा तास आम्हाला सगळ्यांनाच आवडायचा. किरण ठाकूर सर गमतीजमतीत मस्त रिपोर्टिंग शिकवायचे. त्यांनी आम्हाला एक भन्नाट असाइनमेंट दिली होती. ती अजूनही लक्षात आहे. ‘रावणानं सीतेला पळवून नेलं,’ ही घटना आजच्या काळात घडली असती, तर तुम्ही तिची बातमी कशी लिहिली असती, अशी ती असाइनमेंट लिहिली होती. त्या वेळी माझ्या प्रतिभेला धुमारे फुटले आणि मी अगदी रंगवून ती बातमी लिहिल्याचं मला आठवतंय. तो कागदही बरीच वर्षं जपून ठेवला होता. बाहेर एखादा महत्त्वाचा कार्यक्रम किंवा समारंभ असेल, तर त्याचंही वार्तांकन करायला जावं लागायचं. पुणे विद्यापीठात तेव्हा म्हणजे जानेवारी २००० मध्ये सायन्स काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा आमचं सगळं डिपार्टमेंट कामाला लागलं होतं. आम्ही ‘वृत्तविद्या’चा खास अंक तेव्हा काढला होता.
‘वृत्तविद्या’ म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा पेपर. हा टॅब्लॉइड, चार पानी किंवा आठ पानी पेपर दर महिन्यातून एकदा काढणं हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग होता. ‘वृत्तविद्या’साठी रीतसर टीम पाडल्या जायच्या. संपादक, वृत्तसंपादक नेमले जायचे. आमच्या टीमचा नंबर आला, तेव्हा विनोद पाटील संपादक झाला होता, असं मला आठवतंय. मी संतोष सिवनच्या ‘टेररिस्ट’ नावाच्या चित्रपटाचं परीक्षण लिहिलं होतं. (चित्रपट परीक्षणाची ही हौस तेव्हापासून... नंतर मी दीर्घकाळ माझ्या वृत्तपत्रासाठी हे काम करणार आहे, हे तेव्हा ठाऊक नव्हतं!) तेव्हा ‘बिनधास्त’ हा सिनेमा जोरदार चालू होता. मी तर त्या सिनेमाच्या प्रेमात पडलो होतो. वेळ मिळेल तेव्हा प्रभात चित्रपटगृहात जाऊन मी या सिनेमाला बसायचो. तब्बल १४ वेळा मी हा सिनेमा पाहिला, तोही दर वेळी वेगळ्या व्यक्तीला सोबत घेऊन! या रहस्यप्रधान चित्रपटातील ‘खून कोणी केला?’ हे रहस्य शेवटी उलगडतं. सोबत नेलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर ते रहस्य उलगडतानाचं आश्चर्य पाहत बसायला मला आवडे. ‘प्रभात’मध्ये एवढ्या वेळेला जाऊन तिथले मेहेंदळे काका, भिडेकाका, वाघकाका ही सगळी मंडळी ओळखीची झाली. नंतर आम्हाला एका वेगळ्या व्यवसायातील माणसाची मुलाखत घेऊन या, अशी असाइनमेंट देण्यात आली, तेव्हा मी डोअरकीपरचं काम अनेक वर्षं करणाऱ्या मेहेंदळेकाकांचीच मुलाखत घेतली. ‘प्रभातनगरीचा द्वारपाल’ असं शीर्षक त्या मुलाखतीला दिल्याचं मला अजून आठवतं. ‘बिनधास्त’ गर्ल शर्वरी जमेनीस हिची पहिली मुलाखतही मी या ‘वृत्तविद्या’साठी घेतली. ‘सकाळ’मध्ये कामाला असल्यानं त्यांच्या घरची दारं माझ्यासाठी उघडली. शर्वरीशी मस्त गप्पा झाल्या. मुलाखत छापली. “बिनधास्त’ अभिनय अन् अथक कथक’ असं त्या मुलाखतीचं शीर्षक होतं. ‘वृत्तविद्या’चा अंक काढणं हा खूप धमाल अनुभव असे. या कामासाठी रात्री उशिरापर्यंत डिपार्टमेंटमध्ये थांबण्याची परवानगी असे. मग बाहेरच सगळ्यांनी मिळून काही तरी भेळ वगैरे अबरचबर खाणं, सतत चहा-सिगारेटी असं सगळं चाललेलं असायचं. आपला अंक इतरांपेक्षा चांगला व्हावा, अशी धडपड चालायची. ताज्यातली ताजी बातमी घ्यायचा हट्ट असायचा. तेव्हा ‘गुगल’ नुकतंच सुरू झालं होतं. सकाळची ‘ई-सकाळ’ही वेबसाइटही नुकतीच सुरू झाली होती. डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये बहुतेक एकच इंटरनेट कनेक्शन होतं आणि त्याचा स्पीड अतिमंद होता. फोटो डाउनलोड करणे हा काही तासांचा कार्यक्रम असायचा. आमचे नेर्लेकर सर या कामात सगळ्यांना मदत करायचे. भोपळ‌े बाई कायम मदतीला तत्पर असायच्या. शिंदे म्हणून शिपाई होते, (मला वाटतं, प्रसिद्ध बाबू टांगेवाले यांचे ते चिरंजीव होते...) तेही कायम हसतमुखानं मदत करायचे.
या डिपार्टमेंटमध्ये मागच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये कँटीन होतं. हे रमेशचं कँटीन. या डिपार्टमेंटच्या मांडवाखालून गेलेल्या तमाम पत्रकारांच्या भावविश्वातला आजही हळवा कोपरा असलेलं हे कँटीन! तिथं किती चहा घेतले, किती वडा-पाव, किती समोसे, किती ब्रेड-पॅटिस आणि किती पोहे खाल्ले याची गणतीच नाही. किती तरी आनंदाच्या प्रसंगी इथंच खिदळलो. मित्र-मैत्रिणींसोबत दंगा केला. कधी दु:खी झालो, कधी रडलो... ते सगळं या कँटीनच्या साक्षीनंच! (नंतर डिपार्टमेंटमधे शिकवायला जायची, पेपर तपासायला जायची संधी मिळाली, तेव्हाही याच कँटीनची साथ होती.) खरं तर या कँटीनवर वेगळा लेख होऊ शकतो. एवढ्या तिथल्या आठवणी आहेत!
मुळात आमचं शैक्षणिक वर्ष मोठं विलक्षण होतं. १९९९-२००० असं आमचं हे बी. सी. जे. चं वर्ष होतं. एक शतक कूस बदलताना आम्ही पाहत होतो. देशात तीन वर्षं राजकीय अस्थैर्य आणि अशांततेत गेल्यानंतर वाजपेयींचं पूर्ण बहुमताचं सरकार अखेर स्थापन झालं होतं. सचिन तेंडुलकरची महान खेळाडू होण्याकडं दमदार वाटचाल सुरू होती. सुभाष घईंच्या ‘ताल’च्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. शतक बदलताना जगभराच्या संगणकांना वर्ष बदलण्याचा मोठा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येणार होता आणि तो सोडवू शकणाऱ्या भारतीय इंजीनीअर्सना जगभरातून मागणी येत होती. ‘वायटूके’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या या प्रॉब्लेममुळं भारतात ‘डॉट कॉम’ कंपन्यांचं पेव फुटलं होतं. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात अचानक वाढ झाली होती. आमचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आसपास ‘कारगिल’चं युद्ध झालं होतं आणि पुढचा काळ काही भारत-पाकिस्तान संबंधांत विलक्षण तणाव निर्माण झाला होता. बाळासाहेब ठाकरे साहित्यिकांना ‘बैल’ म्हणत होते आणि मनोहर जोशींना काढून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदावर बसवत होते. त्याच वर्षात त्यांची सत्ता गेली आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रिपद मिळालं. आम्ही हे सगळे बदल बघत होतो. ऑफिसात त्याच्या बातम्या लिहीत होतो आणि ‘रानडेत’ वर्गात येऊन परत त्यावर वेगळी चर्चा करीत होतो. रात्री उशिरा ‘मंडई विद्यापीठा’त ज्येष्ठ पत्रकारांसोबत रंगणारी मैफल आम्हाला नवनवे गॉसिप पुरवायची. ती दुसऱ्या दिवशी वर्गात शायनिंग मारायला उपयोगी पडायची. तेव्हा ऑफिसव्यतिरिक्त इतर अनेक कार्यक्रमांना, मुलाखतींना, महोत्सवांना, प्रदर्शनांना किंवा संमेलनांना जाऊन बसायची आम्हाला फार हौस होती. मी आणि मंदार, मी आणि संतोष असे आम्ही किती तरी कार्यक्रम एकत्र पाहिले, अनुभवले. कुठल्याही गोष्टीचा मुळी कंटाळा यायचाच नाही. कितीही काम असू दे किंवा कितीही अभ्यास असू दे! मुळात तेव्हा सगळे बॅचलर होतो आणि स्वत: कमावत होतो. सगळ्या गोष्टी आपल्या चॉइसनं करण्याची ती गंमत होती. सगळी मज्जाच!
‘वृत्तविद्या’चे अंक अशा विलक्षण धुंदीतच आम्ही काढले. सायन्स काँग्रेस संपली आणि फेब्रुवारीत आम्हाला गॅदरिंगचे वेध लागले. तेव्हा मराठी आणि इंग्लिश असे दोन डिप्लोमाही सकाळीच्या वेळी चालत. मराठी डिप्लोमाला आमचे काही मित्र-मैत्रिणी होते. तीन विभागांचं एकत्रित स्नेहसंमेलन म्हणून ‘त्रिवेणी’ असं नाव या गॅदरिंगला होतं. मी या गॅदरिंगमध्ये ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ सादर केलं. मंदारनं ‘हसवाफसवी’मधले ‘कृष्णराव हेरंबकर’ सादर केले. मी त्याची मुलाखत घेतली. संतोष देशपांडेनं डोनाल्ड डकचे अप्रतिम आवाज काढले. डिप्लोमाच्या माधवी कुलकर्णीनं म्हटलेलं ‘त्याची धून झंकारली रोमारोमांत’ अजूनही लक्षात आहे. गॅदरिंगची धमाल संपली आणि आम्हाला वेध लागले ते दिल्ली ट्रिपचे...
मार्चमध्ये आम्ही दिल्लीला गेलो. स्वत: अरुण साधू सर आणि बर्वे मॅडम आमच्याबरोबर होत्या. गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसनं आम्ही जाणार होतो. ती गाडी पहाटे चार वाजता पुण्यात येते. आम्ही सगळे रात्री बारा वाजताच स्टेशनला पोचलो. गाडी वेळेत आली. रात्रभर जागूनही कुणालाच कंटाळा आलेला नव्हता. आम्ही अखंड बडबडत होतो. आम्हा मुलांची रिझर्व्हेशन्स जनरल स्लिपर डब्यात होती, तर साधू सर एसी डब्यात होते. प्रसिद्ध पत्रकार प्रफुल्ल बिडवई हेही त्यांच्यासोबत होते, असं आठवतंय. संतोष, मी, सिद्धार्थ आणि मंदार अशी आमची चौकडी जमली होती. गणेश, रंगा हेही दंगा करायला सोबत असायचेच सतत! मला आदल्या दिवाळीत माझ्या थोरल्या मेव्हण्यांनी ‘सोनी’चा वॉकमन भेट दिला होता. तो मोबाइलपूर्व काळ असल्यानं हा वॉकमन मला अत्यंत प्रिय होता. मी त्याचे भरपूर सेल सोबत घेऊन ठेवले होते. तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिगारेट विकायला नुकतीच बंदी आली होती. आमच्यापैकी अनेकांची त्यामुळं गैरसोय होणार होती. मात्र, मुलांनी सिगारेटची पाकिटं सोबत आणली होती. त्यामुळं मुलं आणि सिगारेट ओढणाऱ्या काही मुली असे सगळेच खूश झाले. मग रेल्वेतल्या टॉयलेटजवळच्या जागेत जाऊन दोघं-दोघं, तिघं-तिघं सिगारेट ओढून यायचो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भोपाळच्या अलीकडं बुधनीच्या घाटात रेल्वे आली तेव्हा मी ‘ताल’ची कॅसेट ऐकत उभा राहिलो. ‘रमता जोगी’ हे गाणं, हलती रेल्वेगाडी आणि समोरचा सूर्यास्त हे दृश्य माझ्या स्मरणात कायमचं कोरलं गेलंय. (पुढे दोन-तीन वर्षांत अजून दोनदा याच मार्गानं दिल्लीला जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी या घाटात आलो की ‘ताल’ची कॅसेट काढून ऐकायचो.) तिसऱ्या दिवशी पहाटे आम्ही निजामुद्दीनला पोचलो. तोवर मला निजामुद्दीन हे एका स्टेशनचं नाव आहे हेही ठाऊक नव्हतं. निजामुद्दीनच्या आधी ओखला स्टेशन लागतं. मी पहाटेच गाडीच्या दरवाजावर येऊन बाहेर बघत होतो. तिथली जाणवणारी थंडी, शेजारी मोठमोठ्या कारखान्यांची धुराडी, तिथल्या हायमास्ट सोडियम व्हेपरच्या पिवळ्या दिव्यांचा झगमगाट आणि मला आधी ‘कोहरा’ वाटलेली, पण प्रत्यक्षात दिल्लीतली अतिशय प्रदूषित असलेली हवा आणि त्यामुळं दिसणारा धुरकट आसमंत... हे दृश्य आजही डोळ्यांसमोर आहे.
आमची राहण्याची सोय नवी दिल्लीतील चाणक्यपुरीमधील यूथ होस्टेलमध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली मला प्रथमदर्शनीच आवडली. दिल्लीतले पुढचे आमचे पाच-सहा दिवस अगदी स्वप्नवत होते. कॉलेजमधले माझे दिवस मला फारसे काही नीट एंजॉय करता आले नव्हते. ती सगळी कसर इथं भरून निघाली. दिल्लीत आम्ही तेव्हाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना नॉर्थ ब्लॉकमधल्या कार्यालयात भेटलो. साधू सर सोबत असल्याने सत्तेचे सगळे दरवाजे आमच्यासाठी सहज उघडले जात होते. अडवाणींनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. ‘ही ल्युटन्स दिल्ली कधी स्थापन झाली,’ असा प्रश्न त्यांनी विचारला होता. मी नुकतंच वाचलेलं असल्यानं मी १९२९ असं उत्तर दिलं. पुण्यात परराज्यांतले अनेक विद्यार्थी शिकायला येतात; तुमच्यापैकी किती जण परराज्यांतील आहेत, असंही त्यांनी विचारलं. जिलेबी, ढोकळा वगैरे पदार्थ समोर होते. चहा झाला. एकूण ही भेट संस्मरणीय होती. नंतर शास्त्री भवनला पीआयबीचं ऑफिस बघितलं आणि  तिथंच तत्कालीन पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनाही आम्ही भेटलो. नाईकांनीही आम्हाला चांगला वेळ दिला आणि गप्पा मारल्या. नंतर एकेका दिवशी आम्ही तत्कालीन अवजड उद्योग मंत्री मनोहर जोशी, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांनाही भेटलो. ‘बीबीसी’चे प्रसिद्ध वार्ताहर मार्क टुली यांनाही निजामुद्दीन परिसरातील त्यांच्या घरी जाऊन भेटलो. टुली यांनी अस्खलित हिंदीतून आमच्याशी गप्पा मारल्या. संगमा यांच्या घरीही खूप मजा आली. जोशींचा बंगला मोठा होता. सकाळी त्यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या लॉनवर बसून आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. नंतर आम्ही एनडीटीव्हीच्या ‘ग्रेटर कैलाश’मधील ऑफिसमध्ये गेलो. तिथं राजदीप सरदेसाई भेटले. ‘मी या क्षेत्रात जास्तीत जास्त अजून पाच वर्षं राहीन,’ असं ते आम्हाला तेव्हा म्हणाले होते. या खासगी वृत्तवाहिन्यांना तेव्हा भारतातून अपलिंकिंगची परवानगी नव्हती. तेव्हा सिंगापूर की हाँगकाँगवरून एनडीटीव्हीचं अपलिंकिंग व्हायचं. त्याला पाच मिनिटं वेळ लागायचा. त्यामुळं तिथली स्टुडिओतली सगळी घड्याळं पाच मिनिटं पुढं लावलेली होती, हे बघून आश्चर्य वाटलं. नंतर आम्ही ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ऑफिसातही गेलो. मात्र, ‘आकाशवाणी’तली भेट मला विशेष आवडली. ‘दिल्ली आकाशवाणी’ची गोलाकार इमारत छान आहे. तिथं आम्हाला प्रत्यक्ष बातम्या प्रक्षेपित होताना पाहता आल्या. ‘बोरून हलदार’ हे नाव अनेक वर्षं ऐकून माहिती होतं. ते त्या दिवशी बातम्या द्यायला होते. आम्ही काचेपलीकडून ब्रॉडकास्ट बघत होतो. समोरचा दिवा लागला आणि ‘धिस इज ऑल इंडिया रेडिओ. द न्यूज, रेड बाय बोरून हलदार’ असे खर्जातले, चिरपरिचित शब्द कानावर पडल्यावर थरारून जायला झालं.  बातम्या देऊन ते बाहेर आले, तेव्हा मी त्यांना सहज विचारलं, ‘आम्ही खूप लहानपणापासून तुमचा आवाज ऐकतो आहोत. तुम्ही किती वर्षं हे काम करताय?’ त्यावर, ‘आय ॲम वर्किंग हिअर फॉर लास्ट हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स’ असं म्हणून गडगडाटी हसत ते निघून गेले.
नंतर समोरच असलेल्या ‘पीटीआय’च्या ऑफिसलाही आम्ही भेट दिली. ‘यूएनआय’चं कँटीन फेमस आहे. तिथं जाऊन इडली, ‘सुजी हलवा’ आदी पदार्थ खाल्ल्याचं आठवतंय. याच वेळी मी आणि सिद्धार्थ साधू सरांसोबत जॉर्ज फर्नांडिसांना भेटायला त्यांच्या कृष्ण मेनन मार्गावर असलेल्या बंगल्यात गेलो. फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते. आम्ही आत गेलो आणि त्यांची अँबेसिडर समोरूनच आली. फर्नांडिस समोरच ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. काच खाली करून ते साधूंशी बोलले. साधूंच्या ‘मुंबई दिनांक’मधलं डिकास्टा हे पात्र जॉर्ज यांच्यावरच बेतलेलं आहे, असं ऐकलं होतं. इथं लेखक व ‘डिकास्टा’ यांना साक्षात भेटताना आम्ही बघत होतो. फर्नांडिस यांनी आम्हाला नंतरची एक वेळ दिली; मात्र तेव्हा ती भेट झालीच नाही.
प्रमुख भेटी-गाठी संपल्यावर आम्ही एक दिवस दिल्लीतील ‘स्थलदर्शन’ केलं. कुतुबमिनार, लोटस टेंपल, हुमायून कबर आदी ठिकाणी फिरलो. नंतर आम्ही एक वेगळी बस करून आग्र्यालाही गेलो. ताजमहाल बघून आलो. रोज संध्याकाळी दिल्लीत भटकंती आणि तिथलं खाणं-पिणं असं भरपूर एंजॉय केलं. ‘मशिन का ठंडा पानी’ बघून मजा वाटायची. तिथल्या फेमस पालिकाबाजारमध्ये शॉपिंग केलं. आईला साडी आणि दोन्ही बहिणींना ड्रेस घेतल्याचं आठवतंय. तेव्हा दिल्लीत मेट्रो यायची होती. अक्षरधाम मंदिरही बहुतेक व्हायचं होतं. अखेर आठवडाभरानं त्याच ‘निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस’नं पुण्याला परतलो.
परतल्यानंतर बर्वे मॅडमनी आम्हाला दिल्ली ट्रिपचा वृत्तांत लिहिण्याची असाइनमेंट दिली. मी ती जरा ललित शैलीत, हलक्याफुलक्या भाषेत लिहिली. ती त्यांनाही आवडली. मी असं लिहू शकतो, याचा विश्वास त्यांना वाटला. ही असाइनमेंटही मी बरेच दिवस जपून ठेवली होती.
दिल्ली ट्रिपवरून परतलो आणि पुण्यात कडक उन्हाळा सुरू झाला. अभ्यासाचे दिवस सुरू झाले. राहिलेल्या असाइनमेंट पूर्ण करण्याची घाई-गडबड सुरू झाली. कमी हजेरी भरलेली मुलं साधू सरांकडं चकरा मारू लागली. डिपार्टमेंटचं वातावरणच बदललं. रमेशच्या कँटीनमध्ये पडीक असलेली पोरं पटापटा घर, होस्टेल, रूम गाठू लागली. कधी नाही ते चार पुस्तकं उघडून वाचू लागली. मी आणि संतोष देशपांडे बऱ्याचदा एकत्र अभ्यास करायचो. तेव्हा संतोषचं प्रेमप्रकरण सुरू होतं. (वर्गात नव्हे!) मधूनच तो त्याच्या कविता ऐकवायचा. मे महिन्यात आमची परीक्षा होती. मॉडर्न कॉलेजमध्ये आमचे नंबर आले होते. मी आणि संतोष बरोबरच पेपरला जायचो. जाताना डेक्कनला ‘अपना घर’मध्ये साबुदाणा खिचडी आणि तिथलं मधुर ताक पिऊन आम्ही पुढं जायचो. एकाही पेपरला हा क्रम चुकला नाही. परीक्षा संपल्या आणि डिपार्टमेंटमधलं आमचं वर्षही संपलं... दोन-तीन महिन्यांनी निकाल लागला. मला फर्स्ट क्लास मिळाला होता. हा कोर्स केल्याचं सार्थक झालं. मार्कांपेक्षाही वर्षभर तिथं जे शिकायला मिळालं, ती शिदोरी अजूनही पुरते आहे. नंतरही डिपार्टमेंटशी संबंध राहिलाच. पेपर तपासायला जाण्याच्या निमित्तानं डिपार्टमेंटला पाय लागत राहिले. नंतर तिथं तीन वर्षं शिकवायचीही संधी मिळाली. जिथं आपण शिकलो, त्याच वर्गात शिकवायला मिळणं यापेक्षा अधिक भाग्य ते कुठलं!
नंतर मी ‘मटा’त आलो आणि डिपार्टमेंट हाकेच्या अंतरावर आलं. अगदी संध्याकाळच्या चहालाही रमेशच्या कँटीनला जाऊ लागलो. व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर पुन्हा सगळे मित्र एकत्र आले. ग्रुप तयार झाला. सगळ्यांची ख्यालीखुशाली कळू लागली. बहुतेक जण पत्रकारितेत सक्रिय आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. छान वाटतं! आता वीस वर्षांत भरपूर गोष्टी बदलल्या आहेत. काही चांगलं घडलंय, तर काही वाईट! पण बदल होत राहणारच. आज मागे वळून पाहिलं, तर लक्षात येतं, की डिपार्टमेंटनं आपल्याला काय दिलं? विद्यार्थिवृत्ती कायम ठेवण्याची दीक्षा दिली, मोठमोठ्या लोकांकडून शिकण्याची संधी दिली, सदैव पाय जमिनीवर ठेवण्याची शिकवण दिली आणि भरपूर मित्रपरिवार दिला. या सर्व गोष्टींसाठी मी ‘रानडे’तल्या त्या सुंदर दिवसांशी कायम कृतज्ञ राहीन!

---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक दिवाळी अंक २०१९)

---

31 Oct 2019

मनशक्ती दिवाळी २०१९ - कथा

स्वप्न
------

डोंगर. उंचच उंच डोंगरांची रांग... हिरवागार निसर्ग आणि जणू हिरवाईचा शालू नेसलेली धरती... मधूनच आपलं विमान उडतंय. खरं तर ते विमान पण नाहीय. आपल्यालाच पंख फुटलेयत. खालचा भव्य पसारा डोळ्यांत मावत नाहीय. शेतं, त्यातून पळणाऱ्या चिमुकल्या नद्या, छोटी छोटी गावं, त्यातून जाणारे लहानशा रेषेसारखे रस्ते... मेंदूतून एकापाठोपाठ एक घोषणा होताहेत - समुद्रसपाटीपासून आपण आत्ता २५ हजार फुटांवर आहोत. बाहेरचं तापमान उणे १२ अंश सेल्सिअस आहे... वगैरे. पण या घोषणा नुसत्याच ऐकू येताहेत. शरीराला कसलीच जाण नाही. हां, थोडीशी थंडी वाजतेय जरूर; पण अंगावरचं पांघरूण ओढलं, की मस्त ऊबदार वाटतं. हलकीशी गुंगीही येतेय... एरवी रोजच्या जगण्यातले असह्य ताण पाठीवर घेऊन-वाहून अक्षरशः बाक आलाय अंगाला... आता हे ओझं वाटत नाहीय. एकदम हलकं हलकं वाटतंय... या उंचीचं एक अनाम आकर्षण वाटत आलेलं आहे. भीती नाही वाटत कधी. उलट अजून उंच उंच जावंसं वाटतं. इतकं उंच, की तिथून पृथ्वीची ती निळीशार सुंदर कडा दिसली पाहिजे. मग असंच अजून थोडं वर... अजून थोडं... पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची कक्षा भेदून एकदम पार निघून जावं... ते 'व्हॉयेजर' की असंच कुठलं तरी यान सोडलं होतं ना, तसं! दूर दूर निघून जावं सगळ्या गुरुत्वाकर्षणांच्या कक्षा ओलांडून... चंद्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून... सगळ्यांना टाटा-बाय बाय करत, अजून दूर... आपल्या आकाशगंगेच्याही पार... काय असेल तिथं? कुठलं विश्व नांदत असेल? आपलं वय काय असेल तिथं? तिथून चुकूनमाकून परत आलोच पृथ्वीवर, तर काय दिसेल? शतकं ओलांडली असतील का पृथ्वीनं? की सगळं आहे तसंच असेल? लेक ओळखेल का आपल्याला??

...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

कानाचे पडदे भेदून जाणारा तो कर्णकर्णश आवाज आला आणि प्रियंवदा खाडकन जागी झाली. तिनं आजूबाजूला पाहिलं. बेडरूममध्ये एसीचा हलका आवाज येत होता. खिडकीतून उन्हाची तिरीप येत होती. तिनं घड्याळात पाहिलं. सव्वासात वाजले होते. ती स्वप्नातून आता मात्र पूर्ण जागी झाली. इतका वेळ त्या उंचच उंच डोंगरांवरून विहरताना तिचं भान हरपलं होतं. पण आता ती वास्तव जगात आली होती. तिला सकाळी करायच्या शंभर गोष्टींची यादी डोळ्यांसमोर आली. दूध तापवायचं, सगळ्यांचा चहा करायचा, मुलीचा-नवऱ्याचा आणि स्वतःचा डबा करायचा... पळत कॅब गाठायची. दीड तास प्रवास करून ऑफिस गाठायचं... तिथं मान मोडेपर्यंत काम करायचं, दीड-दोनला कसं तरी घाईत सँडविच-कॉफी नामक लंच संपवायचं, पुन्हा मीटिंग, मग प्रेझेंटेशन्स, मग मीटिंग... पुन्हा कॅब, पुन्हा दीड-दोन तास प्रवास... घरी यायचं. यंत्रवत जेवण करायचं. मुलीशी थोडं-फार बोलायचं! नवऱ्याशी दोन ठरलेली वाक्यं बोलायची आणि पुन्हा आपल्या बेडरूममधल्या ऊबदार दुलईत शिरून झोपायचं... दिवसभर एवढा शीण झालेला असतो, की मग कधी झोप लागते ते कळतच नाही.

...


समुद्र. निळाशार अथांग समुद्र. वर मोठमोठी जहाजं संथगतीनं मार्गक्रमण करताहेत. आपण त्या स्कुबा डायव्हरसारखा पोशाख करून आपल्या जहाजाच्या डेकवरून थेट समुद्रात उडी मारतोय... खोल खोल समुद्रात शिरतोय... वर अफाट, अथांग पाण्याचा पसारा आणि त्याखालच्या अलौकिक दुनियेत आपण! किती तरी प्रकारचे मासे... रंगीबिरंगी... याशिवाय बाकी किती तरी चित्र-विचित्र प्राणी. आत्तापर्यंत डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरच बघितलेले. पाणसर्प, ऑक्टोपस, कासवं आणि नावं माहिती नसलेले किती तरी! याशिवाय प्रवाळांची ती अद्भुत सृष्टी. केवढे त्यांचे रंग आणि केवढे त्यांचे आकार! आपण संथपणे पाण्यात विहरतोय. इथं कुणीही कुणाला त्रास देत नाहीय. जो तो आपल्या विश्वात मग्न. इथली शांतताही एकदम अजब. त्या शांततेचाही आवाज ऐकू येतो. तो आवाज स्वर्गीय असतो. आपल्या रोजच्या जगण्यातले सगळे कर्कश कोलाहल इथं पूर्णपणे विसरायला होतं. या शांततेचा डोह विलक्षण आकर्षक आहे. पण हे 'फेटल अॅट्रॅक्शन' आहे. या डोहाला थांग नाही. त्यात उडी मारली, की गडप व्हायचं. कुठं, कसं माहिती नाही. पण त्या अज्ञाताची भीती वाटते. एकीकडं विलक्षण ओढही वाटते. पूर्वी उंचीवर गेलं, की आपल्याला असं व्हायचं. एकदम त्या कड्यावरून खाली झोकून द्यावंसं वाटायचं. का, ते माहिती नाही. कुठं तरी खोलवर आत दडून बसलेली त्या अज्ञाताची ओढ त्या क्षणी एकदम अनावर व्हायची. कितीदा तरी पाय मागं घेतले. पण पुढच्या वेळी पाऊल मागं पडेलच याची शाश्वती नाही. आताही त्या समुद्रात सात-आठ किलोमीटर खोल उतरल्यावर तिथंही एक आणखी खोल दरी दिसतेय. गर्ता म्हणतात हिला! आता हिची ओढ का लागावी? माणूस खूप दुःखात असला, की दुःखाच्या गर्तेत लोटला असं म्हणतो आपण... ती हीच का? पण ही तर विलक्षण देखणी आहे. तिथं आत आत काय असेल, याची ओढ लागलीय केव्हाची. समुद्राच्या प्रचंड पाण्याचा दाब डोक्यावर आणि त्यात ही मनाची आणखी खोल खोल जाण्याची वेडी घालमेल... काय करावं? मारावीच का उडी? मागं सरकून अंदाज घ्यावा... एक-दोन-तीन म्हणावं आणि घ्यावी सरळ उडी. काय होईल ते होईल. बघू या... एक... दोन...

...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

प्रियंवदाला पुन्हा खाडकन जाग आली. कुठून तरी उंचावरून आपण दाणकन गादीवर आपटलो आहोत, असं तिला वाटून गेलं. बेडरूममध्ये सगळीकडं निळा प्रकाश पसरला होता. आपण अजूनही समुद्राच्या तळाशी आहोत की काय, असं प्रियंवदाला क्षणभर वाटलं. पण तो बेडरूममधल्या निळ्या एलईडीचा प्रकाश होता. उन्हाची तिरीप डोकावतच होती. घड्याळात सात वीस झाले होते. कालच्यापेक्षा पाच मिनिटं उशीर. पुन्हा कालचाच सगळा क्रम... फक्त आज नवरा सकाळीच टूरला निघून गेला होता, म्हणून त्याचा डबा नव्हता, इतकंच! मुलीला शाळेत निघायला उशीर झाला. तिची खूपच पळापळ झाली. कसंबसं आवरलं. कालच्या मीटिंगच्या नोट्स काढायच्या होत्या. कॅबमध्ये ते काम करू म्हणून ती तशीच निघाली. ब्रेकफास्ट राहिलाच. पुन्हा ऑफिस, चहा, प्रचंड काम, काम, क्लाएंटस्, फोन, आरडाओरडा, काहींची बेशिस्त, मग चिडचिड... तसाच घाईत दुपारचा बर्गर-कॉफीचा लंचब्रेक, पुन्हा मीटिंग, काम, क्लाएंट्स, मीटिंग, काम... कधी तरी ऑफिस संपलं. पुन्हा कॅबचा दीड-दोन प्रवास. ऑफिसमधल्या मैत्रिणींसोबत थोडा टीपी, थोडं गॉसिप. गालावर हलकेच उमटलेली स्मितरेषा... आज नवरा घरी नव्हता. लेकीचा अभ्यास घ्यायचा, काही तरी खायचं आणि झोपायचं. तासाभरात संपणारं काम... ती पुन्हा बेडरूममधल्या त्या निळाईत शिरली... हलकेच डोळे कधी मिटले कळलं नाही.

...

मग एके दिवशी ती हिमालयात विहरून आली. तिथल्या पांढऱ्याशुभ्र रंगानं तिला वेड लावलं. फार पूर्वी कधी तरी ती आई-वडिलांसोबत मसुरीला आली होती; पण मनसोक्त बर्फ खेळायला मिळालाच नव्हता. किती तरी चित्रपटांतून तिनं नायक-नायिका ते बर्फाचे गोळे एकमेकांना मारतात, ते बघितलं होतं. तिला एकदा तरी तसं करायचं होतं. बाकी हिमालयाची भव्यता पाहून तिला पुन्हा एकदा ते सर्वस्व झोकून देऊन समर्पित व्हायचं फीलिंग आलं. लोकांना हिमालयाची पुनःपुन्हा ओढ का लागते, हे तिला समजावून घ्यायचं होतं. तिला चालत, ट्रेक करत तो सगळा भूभाग पालथा घालायचा होता. तिला त्या शुभ्र वर्णात हरवून जायचं होतं. सांताक्लॉजसारखी पांढरी दाढी असणारे किंवा आपल्या ऋषी-मुनींसारखे दिसणारे एखादे प्रेमळ आजोबा त्यांच्या मांडीवर खेळायला बोलवत आहेत, असं तिला वाटे. तिला त्या डोंगरांवरून घसरत यायचं होतं, स्कीइंग करायचं होतं. गोंडोलात बसायचं होतं. तिनं बेडरूममधल्या एसीचं टेंपरेचर दहावर खाली आणलं. एकदम हुडहुडी भरून आली. तिनं दोन जाड रजया अंगावर घेतल्या आणि ती ‘हिमालयाच्या सफरी’वर निघाली. इथंही तिला पंख फुटले. एव्हरेस्ट, कांचनजुंगा, ल्होत्से अशा सर्व शिखरांच्या वरून ती उडत निघाली. मानसरोवरापर्यंत पोचली. तिथल्या थंडगार पाण्याचा हलकासा शिपका तिनं तोंडावर मारला... आणि....

... 

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

तिला जाग आली!

....

असे खूप दिवस गेले, खूप रात्री गेल्या. प्रियंवदाची स्वप्नं अफाट होती, अचाट होती. जवळपास रोज रात्री तिनं स्वप्नात तिच्या जवळपास सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. कधी तरी तिच्या आईच्या कुशीत शिरावंसं वाटायचं. तेव्हा ती पाय पोटाजवळ घेऊन गर्भावस्थेतल्या बाळासारखी झोपून राहायची. पण तिच्या आईचा गर्भ आपोआप तिच्या सभोवती साकारायचा आणि तिला ऊब द्यायचा. हजारो रक्तपेशींचा रक्तवर्ण तिच्या सभोवती तयार व्हायचा. कधी तिला तिचं गाव आठवायचं. गावातलं शेत, तिथली विहीर आठवायची. फ्रॉकमध्ये वेचलेल्या चिंचा, बोरं आठवायची. कधी तिला कॉलेजात असताना सह्याद्रीत तुफान पावसात केलेली भटकंती आठवायची. हे सगळं ती पुनःपुन्हा जगायची. रोज रात्री...

आणि एक दिवस...

टर्रर्रर्रर्र... टिण टिण टिण.... टर्रर्रर्रर्र.... टिण टिण टिण....

गजर झाला. वाजतच राहिला. तिला जाग आलीच नाही...

...

आणि लांब तिकडं, आकाशगंगेच्या पलीकडं, कुणी तरी दोन्ही हातांची ओंजळ करून कुणाला तरी अलगद हातात घेत होतं...
हे मात्र स्वप्न होतं की नव्हतं, याचं रहस्य त्या गूढगर्भ ब्रह्मांडालाच ठाऊक होतं!

---

14 Oct 2019

वाचन प्रेरणा दिन - मटा लेख

वाचन आणि ‘प्रज्वलित मन’
--------------------------


डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून १५ ऑक्टोबर हा आता ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. पुस्तक वाचनातून आपल्याला नक्की काय मिळू शकतं आणि वाचन केलं नाही तर आपण काय गमावू शकतो याचा यानिमित्त घेतलेला वेध...

----

आपण दूर कुठं तरी डोंगराच्या माथ्यावर, गर्द जंगलाच्या मध्यावर, नितळ पाण्याच्या लाटेवर, अनाघ्रात-अनवट वाटेवर, विलक्षण शांततेच्या कुशीत असावं; स्वत:च स्वत:मध्ये असण्याच्या या आगळ्या प्रवासाची अनुभूती घेत स्वत:मधल्या अजूनही न सापडलेल्या गोष्टींचा शोध घेत राहावं; एकाच वेळी बाह्य जगाशी हळूहळू संपर्क तोडत असताना, आतल्या संवादाची ऊर्मी वाढवत जावं... कुठे तरी ती तार झंकारावी आणि एका अलौकिक आनंदानं अंतर्मन लख्ख उजळून निघावं...
खरं सांगू का? हे एक स्वप्न आहे, स्वप्न! हे असलं स्वप्न आपण कित्येकदा पाहिलं असेल, वाचलंही असेल. पण प्रत्यक्षात आपल्या बाबतीत यातली एकही गोष्ट घडत नाही, हीच वस्तुस्थिती! रोजच्या ट्रॅफिक जॅममधून, प्रचाराच्या कर्ण्यांच्या कर्णकर्कश आवाजातून, सततच्या कलहाच्या उच्चरवातून जिथं आपला बाह्य आवाज आपल्याला ऐकू येत नाही, तिथं अंतर्मनाचा वगैरे आवाज कुठून ऐकू यायला! तेव्हा जवळपास अप्राप्य अशा या स्वप्नाची भरपाई करणार तरी कोण? अशा वेळी एकच करावं. आपल्या उशाशी असलेलं आपलं आवडतं पुस्तक घ्यावं आणि त्यात डोकं घालून हरवून जावं... वाचनानं मला काय दिलं, असा प्रश्न कुणी विचारला, तर हेच उत्तर आपोआप समोर येईल. केवळ स्वप्नांमध्येच आपण जगू शकतो, अशा अलौकिक आनंदाची अनुभूती आपल्याला वाचन देतं. 
वाचन म्हणजे पुस्तकाचं वाचन. छापील शब्दांचं वाचन. हे वाचन आपल्याला आयुष्यभराचं मैत्र देतं. ते शब्द लिहिणाऱ्या व्यक्तीच्या एकूण जगण्याच्या आकलनाचा काही वाटाही आपल्याला देतं. लेखकाच्या भावविश्वाचा भाग होण्याची संधी देतं. आपल्या स्वत:च्या भावविश्वाची निर्मिती करण्याची प्रेरणा देतं. या सगळ्या प्रक्रियेतून आपल्या जगण्यावर निश्चित परिणाम घडवतं.... आणि हा परिणाम सकारात्मकच असतो, हे नक्की! खूप लहानपणापासून वाचनाची आवड असलेली व्यक्ती आणि अजिबात वाचनाची आवड नसलेली व्यक्ती यांची जडणघडण सरळच वेगळ्या पद्धतीनं होते. अर्थात आपण काय वाचतो, हेही यासाठी महत्त्वाचं आहे. चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, असं आपण म्हणतो, तेव्हा त्यातल्या आशयाचा, विचारांचा मुद्दा येतो. आपण ज्या पद्धतीचा आशय वाचतो, जो विचार वाचतो त्याचाच पगडा पुढंही आपल्या आयुष्यावर दीर्घकाळ राहतो. पुस्तकं वाचणं आणि सतत वाचत राहणं ही पुस्तकप्रेमी माणसासाठी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असल्यानं आपण काय वाचत राहिलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे याविषयी त्याची समजही वाढत जाते. विशेष म्हणजे पुस्तकं वाचूनच त्याची ही समज वाढते. पुस्तक वाचन आपल्याला समृद्ध करतं ते अशा रीतीने! 
लहानपणीच या वाचनाची गोडी लागली, की आपोआप काही गुण आपल्या अंगी येऊ लागतात. एका जागी शांतपणे एखादी गोष्ट मन लावून करीत बसणे हाही आजच्या काळात तसा मोठाच गुण म्हणायचा. पुस्तकं वाचणाऱ्या माणसात सहजच हा गुण रुजतो. फार तर तो वाचनाच्या जागा बदलेल; पण त्यापलीकडे त्याच्या हातून वावगे काही घडायचे नाही. वाचन करणाऱ्या माणसाची स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वर्धिष्णू होऊ लागते. वाचनातील एखादी गोष्ट समजली नाही, तर ती समजेपर्यंत चैन पडत नाही. त्यामुळं नव्या गोष्टी समजतात, हे ओघानं आलंच. वाचनातून नवरसांचा परिपोष होत असल्यानं आपलं भावनिक कुपोषण होत नाही. जगात किती प्रकारचे लोक किती वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या जगण्यातल्या भावभावना व्यक्त करतात, हे पाहूनच आपण थक्क होतो. आपल्या परिघापलीकडचं जग पाहण्याची दिव्य दृष्टी केवळ वाचनातूनच आपल्याला लाभू शकते. वाचनामुळं लक्ष एकाग्र करण्याची सवय अंगी जडते. पुस्तकात संपूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपण त्या लेखनाचा आनंद घेऊ शकत नाही, हे स्पष्टच आहे. आजच्या काळात आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता दिवसेंदिवस चिंताजनकरीत्या कमी होत चालली असताना, पुस्तक वाचनातून आपण ती क्षमता इतरांपेक्षा अधिक राखू शकतो, हा मोठाच फायदा आहे. भाषेच्या दृष्टीने पुस्तक वाचनाचा फायदा तर फारच मोठा आहे. छापील अक्षरे म्हणजे कुठल्याही भाषेतील अचूक, प्रमाण अशी अक्षरे! आपण सतत उत्तम दर्जाची छापील अक्षरे पाहत राहिलो, त्या अक्षरांपासून तयार झालेले अचूक शब्द वाचत राहिलो, त्या शब्दांच्या समूहाद्वारे तयार झालेले अर्थपूर्ण वाक्य समजून घेत राहिलो, त्या वाक्यांच्या समुच्चयातून तयार झालेला लेख पाहत, मेंदूत मुरवत वाचत राहिलो तर आपल्या मेंदूमध्ये त्या प्रमाण, अचूक शब्दांची ‘छायास्मृती’ (फोटो मेमरी) तयार होते. त्यामुळं नंतर कधीही चुकीचे किंवा अप्रमाणित शब्द वाचले, की ते खटकायला लागतात. अचूक शब्दांचा मेंदूचा हा आग्रह आपल्याला उत्तम भाषाज्ञानाकडं घेऊन जातो. प्रत्येकानं त्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करायला पाहिजे, असं नाही. केवळ उत्तम दर्जाची पुस्तकं वाचली, तरी पुष्कळ काम होऊ शकेल. पुस्तकं राहिली, तर भाषा राहील आणि भाषा टिकली तर त्या भाषेतली पुस्तकं येतील, असं हे गणित आहे. त्यामुळं वाचनाची आवड आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. छापील शब्दांचं हे प्रेम आपल्याला माणूस म्हणून उन्नत करीत राहतं; जगभरात आपल्याहून किती तरी थोर माणसं होऊन गेली आहेत आणि आपल्याला अजून भरपूर काही शिकायचंय या भावनेतून आपल्याला विनम्र ठेवतं. आजच्या सभोवतालात हे विशेषच महत्त्वाचं!
वाचनाचे हे फायदे तर झालेच; पण वाचनाच्या या सवयीचा सर्वांत मोठा व महत्त्वाचा परिणाम होतो तो आपल्या मनावर. जन्मल्यापासून आपला पिंड संस्कृती, परंपरा, रुढी, प्रथा, रिवाज अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून घडत असतो. आपल्याला कसं घडवायचं याचे निर्णय आपल्याला पुरेशी समज यायच्या आधी आपल्या वतीनं दुसरंच कोणी तरी घेत असतं. आपले आई-वडील हे त्यातले प्रमुख; पण बहुतांश वेळा किमान त्यांचा हेतू तरी स्वच्छ असतो किंवा भाबडा तरी असतो. मात्र, समाज नावाचा मोठा गाडा चालविणारे वेगळेच कुणी असतात. त्यांची इथे वा तिथे सत्ता असते. ती दर वेळी राजकीय असतेच असं नाही. ती सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे धार्मिक असू शकते; नव्हे, असतेच! ही सत्ता राखणारे आपल्या सोयीने आपल्याला घडवत असतात. त्यासाठी त्यांच्या सोयीच्या गोष्टींची बाळगुटी आपल्याला लहानपणापासून चाटविली जाते. आपण पुस्तकं वाचली नाहीत किंवा जगात कोणी काय म्हणून ठेवलंय, काय विचार केला आहे हे जाणून घेतलं नाही, तर याच बाळगुटीचं बाळसं आपल्या अंगावर चढतं आणि आपण या सत्ताधीशांना हवे तसे नागरिक म्हणून आपसूक घडत राहतो. वाचनामुळं आपल्या मेंदूला विचार करायची शिस्त लागू शकते आणि हीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळं करणारी ताकदही असू शकते. विचार करणाऱ्या मेंदूला प्रश्न पडू लागतात; विचारायला अवघड असे प्रश्न पडू शकतात. प्रश्न विचारणारे मेंदू जास्त संख्येनं तयार होणं ही कोणत्याही सत्ताधीशासाठी धोक्याची घंटा असते. अर्थात, हे ज्ञानही आपल्याला पुस्तकं वाचूनच मिळू शकतं. 
मेंढ्यांचा कळप असतो आणि वाघ जंगलात एकटा, सार्वभौम सत्ताधीश म्हणून राज्य करतो. आपल्याला कळप म्हणून जगायचंय की प्रश्न विचारणारा सार्वभौम, विचारी माणूस व्हायचंय हे आपल्या पुस्तक वाचनाच्या आवडीवरून ठरू शकतं. निर्णय आपल्याच हाती!
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, पुणे आवृत्ती; १३ ऑक्टोबर २०१९)