28 Jun 2026

फेसबुकवरचे छोटे रिव्ह्यू - भाग १

(काही काही सिनेमांचे त्या त्या वेळी फेसबुकवर छोटे रिव्ह्यू लिहिले होते. ते ब्लॉगवर एकत्र असावेत, म्हणून इथे शेअर करतो आहे. फेसबुकवर काही वेळा ते हरवूनही जातात. इथे चांगले दस्तावेजीकरण होते, म्हणूनही...)

---------

१. मुळशी पॅटर्न

आरारारारारारा...
---------------------

''पुण्यालगतच्या जमिनींना सोन्याचा भाव आल्यानं चहूबाजूंना गुंठामंत्र्यांचं पीक वाढलं. शून्य कर्तृत्व असताना वाडवडिलांच्या पुण्याईवर हाती जबर पैसा आला. या पैशांचं करायचं काय, हा प्रश्नच होता. मग चुकीच्या दिशांनी त्या पैशाला वाटा फुटू लागल्या. ‘इझी मनी’नं इथल्या भवतालातल्या शांततेचं अपहरण केलं. अनाचार माजला. व्यसनांची संगत लागली. त्यामुळं डोकं जाग्यावर राहिलं नाही. मग गुन्हे घडायला कितीसा अवकाश उरणार? सध्या पुण्याच्या आजूबाजूला हेच होताना दिसतंय. शहरातल्या आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या जाणत्यांना याची खंत वाटते आहे. पण वारकरी संप्रदायाची शिकवण असलेल्या या जुन्या सालस, पापभिरू पिढीचा आता नव्या पिढीला धाक उरला नाही. आपण या सगळ्या व्यवस्थेत ‘आइटसाइडर’ होत चालल्याची जाणीव आता त्यांना अंतर्बाह्य पोखरते आहे....''

(- ‘पुणं बदलतंय... खरंच?’ या ‘मटा पुणे आवृत्ती विशेष दिवाळी अंका’तील माझ्या लेखातून)

.....

प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा एक्झॅक्टली ही वर नमूद केलेली गोष्ट दाखवतो. मात्र, अडीच तासांचा हा सिनेमा म्हणावी तशी मनाची पकड घेत नाही. समकालीन विषयांना भिडणारे सिनेमे मराठीत येत नाहीत, अशी पूर्वी तक्रार असायची. आता या सिनेमामुळं तशी तक्रार करायला जागा नाही, हे खरं. मात्र, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गंभीर बदलांचं चित्रण करताना गुन्हेगारीपटांची ठरलेली लोकप्रिय वळणं टाळण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरता आलेला नाही. शिवाय फ्लॅशबॅक तंत्राविषयी असलेलं दिग्दर्शकाचं ऑब्सेशन ही कथा सांगताना अडथळ्याचं ठरलं आहे. सलग जमिनीचे तुकडे तुकडे पडल्यावर शेतकऱ्याला जेवढं दु:ख होईल, तेवढंच दु:ख सिनेमाप्रेमी प्रेक्षकाला यातली गंभीर कथा तुकड्या-तुकड्यानं पाहताना होतं. प्रवीण तरडे यांचा पहिला ‘देऊळ बंद’ हा सिनेमा मला आवडला होता. त्यामुळं या दिग्दर्शकाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण ‘मुळशी पॅटर्न’ त्या अपेक्षांना न्याय देत नाही. रामगोपाल वर्मा ते अनुराग कश्यप आदी मंडळींनी हिंदी सिनेमात सेट केलेल्या ट्रेंडची मराठी आवृत्ती काढण्यातच दिग्दर्शक (कदाचित नकळतपणे) रमलेला वाटला. उदा. यातलं सुनील अभ्यंकर यांनी साकारलेलं वकिलाचं पात्र. अभ्यंकरांनी हा वकील फार जोरदार उभा केला आहे, तरी राहून राहून तो ‘सत्या’मधल्या मकरंद देशपांडेंनी साकारलेल्या मुळे वकिलाची आठवण करून देतो. उपेंद्र लिमये यांच्या अभिनयाची चिरपरिचित शैली त्यांच्या यातल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेला मारक ठरली आहे. सुरुवातीचं निवेदन करतानाचा त्यांचा तो धीर-गंभीर आवाज विषय सेट करणारा वाटतो, पण त्याच वेळी अधिकाऱ्याच्या भूमिकेत ते एकाच पट्टीत जी संवादफेक करतात, ती नंतर कंटाळवाणी वाटू लागते. तीच गोष्ट महेश मांजरेकर यांच्या पात्राची. हमाली करणारा एक शेतकरी त्यांनी उभा केला आहे. मात्र, त्यांची संवादफेक खटकल्याशिवाय राहत नाही.
कथा फ्लॅशबॅक तंत्रानं सतत मागं-पुढं होत असल्यानं यातल्या राहुल या न-नायकापासून ते कुठलंच पात्र धड उभं राहत नाही. अपवाद मोहन जोशी यांनी साकारलेल्या राहुलच्या वडिलांच्या भूमिकेचा. ही भूमिका मोहन जोशी यांनी कमालीच्या ताकदीनं उभी केली आहे. चित्रपटात हिंसेचे, मारामारीचे अनेक रक्तरंजित प्रसंग आहेत. त्यांची खरंच आवश्यकता होती का, असा प्रश्न पडतो.
काही प्रसंग मात्र जमले आहेत. त्यात क्लायमॅक्सचा प्रसंग, तसंच पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला उपेंद्र लिमये कृतीतून समजावून सांगतो तो प्रसंग असे प्रसंग जमले आहेत. गोवऱ्या थापलेली स्कॉर्पिओ दाखवण्याची आयडिया भन्नाट. सुरुवातीला ड्रोनद्वारे दिसणारं आपलंच शहर अगदी परकं परकं भासतं, हा अनुभव विलक्षण होता.
देवेंद्र गायकवाड आणि रमेश परदेशी यांना ओम भुतकरसमोर पर्यायी गुंड म्हणून उभं करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न पारच फसला आहे.
हा सिनेमा पाहावा तो ओम भुतकरसाठी. हा भविष्यातला मोठा अभिनेता आहे, याची झलक या सिनेमानं दाखविली आहे. ओमच्या टॅलेंटविषयी शंकाच नव्हती. पण त्या गुणवत्तेला न्याय देणारा हा भावखाऊ रोल त्याला मिळाला आणि त्यानंही त्याचं चीज करून दाखवलंय.
या सिनेमात आरारारारारा नावाचं एक गाणं येतं. हा सिनेमा पाहून समाजातल्या वाईट प्रवृत्तींविषयी अशीच भावना मनात निर्माण होते आणि तेच या चित्रपटाचं यश आहे. 

---

(दर्जा - तीन स्टार)

(२८-११-२०१८, फेसबुक)

----

२. दी ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर

(नॉट सो) ‘ॲक्सिडेंटल’ मूव्ही
------------------------------------

‘दी ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर‘ हा सिनेमा मला पाहायचा होता, याचं कारण डॉ. मनमोहनसिंग यांची सगळी दहाही वर्षांची कारकीर्द पत्रकार म्हणून अगदी डोळ्यांसमोर आहे. डॉ. सिंग सत्तेत आले तेव्हा मला पत्रकारितेत येऊन दहा वर्षे झाली होती. माझ्या कारकिर्दीची दहा ते वीस अशी दहा वर्षे डॉ. सिंग देशाचे पंतप्रधान होते. या कालावधीत मी एका पेपरमधून दुसऱ्या पेपरमध्ये रुजू झालो. पण बातम्या भाषांतरित करणे, लेख लिहिणे, स्फुटं लिहिणे, सदरं लिहिणे अशा अनेक माध्यमातून मी त्यांच्या कारकिर्दीविषयी बरी-वाईट मतं मांडली.
डॉ. सिंग यांचं पंतप्रधानपद गेलं, त्याच वर्षी संजय बारू यांचं ‘दी ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे पुस्तक बाजारात आलं. काही कारणानं माझं हे पुस्तक वाचायचं राहून जातंय. अजूनही मी ते वाचलेलं नाही. पण जेव्हा या पुस्तकावर आधारित सिनेमा येतोय, हे कळलं तेव्हाच मी तो पाहायचा निश्चय केला. त्यातही अनुपम खेरसारखा अभिनेता डॉ. सिंग यांचं काम करतोय हे पाहिल्यावर तर तो पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली. नंतर संजय बारू यांचं काम अक्षय खन्ना करतोय हे समजल्यावर तर मी पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहण्याचं ठरवलं. पण काही ना काही कारणानं मला बघायला वेळच होत नव्हता. अखेर काल (रविवारी) मी हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहिल्यावर सर्वांत प्रथम माझ्या मनात दाद उमटली ती अनुपम खेर यांच्यासाठी! खेर यांनी डॉ. सिंग यांची भूमिका फार उत्कृष्टपणे केली आहे, असं माझं मत झालं. अक्षय खन्नाही संजय बारूंच्या भूमिकेत अगदीच शोभून दिसलाय. या दोघांनीही हा सिनेमा नीट तोलून धरलाय. आणखी एक महत्त्वाची व्यक्ती या सिनेमात आहे. सोनिया गांधी यांच्या भूमिकेत सुझान बर्नर्ट या अभिनेत्रीनं सोनियांचं काम आणि दिसणं या दोन्ही गोष्टी चोख केल्या आहेत. राहुल गांधी म्हणून अर्जुन माथूर हा अभिनेता मात्र अजिबात शोभला नाही.
एखादा सिनेमा आपल्याला भिडण्यासाठी, भावण्यासाठी आणखीही बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्या गोष्टींचा या सिनेमात अभाव आहे. विजय रत्नाकर गुट्टे (की गुत्ते?) या नावाच्या व्यक्तीनं हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. मात्र, दिग्दर्शनातला नवखेपणा जाणवतो. मी पुस्तक वाचलेलं नाही, मात्र सिनेमा पुस्तकाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो, असं दिसतं. पण त्यामुळं तो संजय बारू यांच्याच नजरेतून दिसत राहतो. आपल्या देशासाठी डॉ. सिंग यांची दहा वर्षांची कारकीर्द अगदी महत्त्वाची होती. अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारांसह अणुकरार, ‘टू जी’पासून ते कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत अनेक घोटाळे असं बरंच काही या काळात घडलं. मात्र, सिनेमात या सगळ्या गोष्टींना ओझरता स्पर्श करतो आणि पुढं जातो. या सिनेमाचा सगळा भर आहे तो सोनिया आणि राहुल या ‘गांधी’ लोकांनी डॉ. सिंग यांना एखाद्या कठपुतळीसारखं कसं नाचवलं हे सांगण्याचा! अर्थात हे वास्तव नाही असं कुणी म्हणणार नाही. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित होण्याचा काळ आणि त्यातला दिग्दर्शक सांगू पाहत असलेला आशय यांची संगती लावण्याचा प्रयत्न केला, तर हा सिनेमा (‘नॉट सो) ॲक्सिडेंटल मूव्ही’ आहे, असं वाटल्यावाचून राहवत नाही.
या सिनेमानं सर्व राजकारणी लोकांची थेट नावं घेण्याचं धाडस केलंय. मात्र, काही ठिकाणी ‘फॅमिली’ हा शब्द म्यूट करण्यात आला आहे, तर आणखी एका ठिकाणी बारूंच्या तोंडी असलेलं एक संपूर्ण वाक्यच म्यूट केल्याचं जाणवतं. राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा जवळपास खलनायक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न जाणवला आणि सिनेमा ‘ॲक्सिडेंटल’ का नाही, तेही कळलं.
डॉ. सिंग यांच्याविषयी कमालीचा आदर वाटतो. एवढा विद्वान माणूस देशाचा पंतप्रधान झाला, पण त्यांना मनासारखी सत्ता राबवता आली नाही, हे सिनेमात सूचकपणे दाखवलंय. ते काही खोटं नाही. पत्रकार म्हणून यातल्या अनेक गोष्टींच्या बातम्या केल्या होत्या. ते प्रसंग सिनेमात पाहताना पडद्यामागे काय घडलं होतं, हे जाणून घेता आलं.
पण एकूण सिनेमा काही फार प्रभावी वाटत नाही, हेच खरं. त्याचं या वेळेला प्रदर्शित होणं ‘ॲक्सिडेंटल’ वाटत नाही, हेच तो प्रभावहीन वाटण्यामागंच ठळक कारण असावं, असं आता वाटतंय.
पण तरीही ज्यांना बघायचाय, त्यांनी जरूर पाहा. पत्रकार मंडळींनी तर नक्की पाहावा. 

---

(दर्जा - दोन स्टार)

---

(२१-१-२०१९, फेसबुक)

---

8 Jun 2026

मेड इन इंडिया : ए टायटन स्टोरी - रिव्ह्यू

प्रेरणादायी ‘काळा’ची कहाणी
-----------------------------------


‘मेड इन इंडिया - ए टायटन स्टोरी’ ही 'ॲमेझॉन प्राइम’वरची वेब सीरीज ‘बिंज वॉच’ केल्यानंतर दोन गोष्टी आधी सांगितल्या पाहिजेत. एक म्हणजे ही वेब सीरीज प्रत्येक भारतीयाने बघितली पाहिजे. दुसरी गोष्ट, मला झेर्क्सेक्स  देसाई या माणसाविषयी याआधी काहीही माहिती नव्हती. अर्थात, टायटन या ब्रँडविषयी माहिती होती आणि टाटा या नावाचे आकर्षणही होते. या दोन्हींमुळेच कदाचित ही मालिका सलग पाहत गेलो आणि संपल्यावरच थांबलो.
टाटा उद्योगसमूहाविषयी भारतीय माणसाच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा आहे. याला काही कारणे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून टाटा घराण्याचे भारतीय उद्योग क्षेत्रात असलेले अतुलनीय योगदान, टाटा उद्योगसमूहाची कार्यसंस्कृती, टाटा परिवारातील बहुतेक बड्या लोकांची जीवनदृष्टी आणि त्यांचा साधेपणा, ग्राहकांचा कमावलेला विश्वास, केवळ उद्योगांची उभारणी न करता देशाच्या हितासाठी अनेक संस्थांची उभारणी, लोकोपयोगी कामे आणि एकूणच देशप्रेम या सर्वांमुळे सर्वसामान्य भारतीय माणसाला ‘टाटा’ हे नाव प्रिय आहे. या उद्योगसमूहाचा अभिमान आहे. याच टाटांनी ऐंशीच्या दशकात संपूर्णपणे भारतात तयार होणारे घड्याळ निर्मिण्याचा ध्यास घेतला आणि तो तडीसही नेला. या प्रवासात आलेल्या अडचणी, देशाची व जगाची तत्कालीन मानसिकता, परदेशी उद्योगांच्या नजरेतून भारत, कामगार-उद्योगपती संबंध, उद्योगपती-राजकारणी संबंध, लायसन्स राज, काळाबाजार, तस्करी आदी अनेक गोष्टींतून ही कथा उलगडत जाते. या कथेचे नायक आहेत झेर्क्सेक्स देसाई. त्यांनीच ‘मेड इन इंडिया’ घड्याळाचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, देसाई यांचे बॉस आणि मित्र जे. आर. डी. टाटा यांचे त्यांना याबाबत खूप मोलाचे मार्गदर्शन झाले. टाटा मंडळी कसा विचार करतात, त्यांचा उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, यशस्वी लोक यशस्वी का असतात हे देसाई आणि जेआरडी यांच्या संवादांतून समजते. जेआरडींच्या तोंडी असणारे अनेक संवाद तर ‘सुभाषिते’ म्हणून मनावर कोरून ठेवावेत असे आहेत. हे सगळे संवाद मुळातूनच ऐकायला हवेत. एखादा ब्रँड शून्यातून उभा करताना काय काय प्रसंग येतात, त्यावर ही मंडळी आपल्या बुद्धिचातुर्याने कशी मात करतात; कधी चुकतात, तर कधी योग्य ठरतात; त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांतील अडचणीवर कशी मात करतात हे सगळं दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल आपल्याला तपशीलवार दाखवतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देसाई आणि त्यांचे सहकारी कधीही हिंमत हरत नाहीत. चुकांवर मात करून पुढे जाण्याचा मार्ग शोधत राहतात.
या सर्व कथेला ‘मेड इन इंडिया’ची जोड आहे आणि तो प्रवास खूप भावनाशील आहे. खरे तर कुठलाही उद्योग महणजे फायदा-तोट्याची रुक्ष गणिते आणि एकूणच रोखठोक व्यवहार. मात्र, टाटांच्या विचारसरणीत याला जोड असते ती संवेदनशीलतेची. परदेशांतील लोकांकडून अपमान झाला की टाटा मंडळींमधले अस्सल भारतीयत्व जागे होते आणि ते आपल्या कर्तृत्वाने या सर्वांना लक्षात राहील असे उत्तर देतात. मुंबईतील ताजमहाल हॉटेलची उभारणी कशी झाली हे आपल्याला माहिती आहे. टाटांच्या ‘टायटन’चा जन्मही असाच परदेशातून आलेल्या नकारातून झाला. पुढे या ब्रँडने एवढे यश मिळवले, की ज्या फ्रेंच घड्याळ कंपनीने (फावरलुबा) सुरुवातीला या ब्रँडला तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता, तीच कंपनी ‘टायटन’ने नंतर विकत घेतली. भारत सरकारच्या मालकीच्या ‘एचएमटी’ या उपक्रमाची घड्याळे तेव्हा भारतात अतिशय लोकप्रिय होती. मात्र, ती किल्लीची, मेकॅनिकल घड्याळे होती. टाटांनी क्वार्ट्झ तंत्रज्ञान आणून क्रांती केली. काळाच्या पुढचा विचार केला नाही, तर एखादा ब्रँड कसा नामशेष होतो आणि एखादा कसा तगून राहतो, याची ही दोन उदाहरणे. मालिकेत ‘जीएमटी’ नावाने येणाऱ्या एचएमटीची ही बाजूही यात नकळतपणे समोर येते.

टाटांनी ‘टायटन’ ब्रँड कसा उभा केला, याचा हा सर्व प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. तो पाहताना एक भारतीय म्हणून आपल्याला अतिशय अभिमान वाटत राहतो. भारताने १९८३ मध्ये पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला तो प्रसंग, किंवा महिला हॉकीतील यशावर आधारित ‘चक दे इंडिया’सारखा चित्रपट किंवा ‘इस्रो’ने चंद्रावर आपले यान उतरवणे या सर्व घटना आपल्याला जेवढ्या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद वाटतात, त्याच जातकुळीतील ही ‘टायटन’ची ‘मेड इन इंडिया’ कहाणी आहे. सहा भागांच्या या मर्यादित मालिकेत बाजी मारून गेला आहे तो जिम सरभ हा अभिनेता. यापूर्वी ‘रॉकेट बॉइज’मध्ये आपण त्याला होमी भाभांची भूमिका उत्तमरीत्या निभावताना पाहिले आहे. एकूणच आता ऐतिहासिक पारशी वा गुजराती व्यक्तींच्या भूमिका करण्यासाठी जिम एकदम तयार आहे, असे दिसते. जेआरडींच्या भूमिकेत नसीरुद्दीन शहा अगदी शोभून दिसले आहेत. जेआरडींच्या व्यक्तिमत्त्वातला रुबाब, तो पारशी गोडवा आणि अनुभवाने चेहऱ्यावर आलेले शांत-शीतल तेज हे सर्व नसीरुद्दीन शहांसारखे कसलेले अभिनेते व्यवस्थित दाखवतात. (फक्त फ्रेंच उत्तम बोलता येत असलेले जेआरडी फ्रेंच कंपनीच्या मालकाशी दुभाषा घेऊन बोलताना दाखवले आहेत, हे खटकतं.) तीच गोष्ट जिम सरभच्या विगची. तो विग अगदी कृत्रिम दिसतो आणि अजिबात नीट नाही.
यात वैभव तत्त्ववादीने साकारलेली आकाश दीक्षित ही देसाईंच्या मित्राची व्यक्तिरेखा आहे. अशी काही व्यक्ती खरोखर होती की ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे याची कल्पना नाही. विनय कामत यांच्या पुस्तकावर ही वेबसीरीज बेतलेली आहे. त्यांनी पुस्तकात या कथनासाठी हे पात्र निर्मिले आहे का, हे माहिती नाही. याचे कारण मी मूळ पुस्तक वाचलेले नाही. वैभव तत्त्ववादीने त्याची भूमिका व्यवस्थित निभावली आहे. मात्र, त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव आकाश दीक्षित असताना आणि त्याच्या घरातले लोक मराठी बोलत असलेले दिसत असताना क्रेडिटमध्ये मात्र त्याच्या पात्राचे नाव ‘आकाश बन्सल’ असे लिहिलेले दिसते. ही चूक अक्षम्य आहे. यात मेघा म्हात्रे या पात्राच्या रूपाने आणखी एक मराठी पात्र आहे. तिच्या आईच्या छोट्याशा भूमिकेत प्रतीक्षा लोणकर दिसतात. ही मेघा आणि गौरव धर (जे वास्तवातील या कंपनीचे नंतरचे एमडी भास्कर भट आहेत...) यांच्या हळुवार प्रेमकहाणीचा साइड ट्रॅकही आपल्याला यात दिसत राहतो. गौरवचे काम करणाऱ्या अभिनेत्यानेही चांगले काम केले आहे.
‘टायटन’ हे नाव कसे सुचले, ‘टायटन’च्या टीव्हीवरच्या पहिल्या जाहिरातीसाठी मोझार्टची धून वापरण्याची कल्पना कशी सुचली, पहिल्या दोन कर्मचाऱ्यांच्या मुलाखती, तमिळनाडूत जमीन पाहण्यासाठी केलेली कसरत, बॉम्बे हाउसमधले वातावरण, तत्कालीन मुंबईतली नॉस्टॅल्जिक करणारी दृश्ये, चोरबाजारातील घड्याळांचा काळाबाजार, सुरुवातीला उत्तर भारतात घड्याळांचा खप कमी व दक्षिण भारतात जास्त का व त्याचे मिळालेले अनपेक्षित उत्तर, एका अनाहूत लग्नसमारंभात घुसून मार्केटिंग हेडने दाखवलेली ‘वेडिंग गिफ्ट’ म्हणून ‘टायटन’ देण्याची अभिनव कल्पना असे अनेक रंजक प्रसंग मालिकेत आहेत. त्यामुळे आपण सुमारे साडेपाच तासांच्या या प्रवासात चांगलेच गुंतून राहतो.
थोडक्यात, काही चुका वा त्रुटी सोडल्या तर एकूण ही मालिका निश्चित पाहावी अशी आहे. सध्या ‘मेड इन इंडिया’चा बोलबाला असताना, ऐंशीच्या दशकात, उदारीकरणाच्या आधी टाटा समूहातील एक व्यक्ती भारतीय बनावटीचे, काळाच्या पुढचे तंत्रज्ञान वापरणारे मनगटी घड्याळ तयार करण्याचा ध्यास कसा घेते आणि अनेक प्रयत्नांनी तो कसा यशस्वी करून दाखवते, याची ही प्रेरणादायी कहाणी आपण तर बघावीच; शिवाय आपल्या पुढच्या पिढीला, घरातील कुमारवयीन किंवा तरुण मुलांना तर आवर्जून दाखवावी.

---

(ओटीटी - ॲमेझॉन प्राइम)

---