(काही काही सिनेमांचे त्या त्या वेळी फेसबुकवर छोटे रिव्ह्यू लिहिले होते. ते ब्लॉगवर एकत्र असावेत, म्हणून इथे शेअर करतो आहे. फेसबुकवर काही वेळा ते हरवूनही जातात. इथे चांगले दस्तावेजीकरण होते, म्हणूनही...)
---
१. वेटिंग
----------
वाट पाहण्याची जीवघेणी गोष्ट...
--------------------------------------
अनू मेनन हिचा 'वेटिंग' हा ९८ मिनिटांचा नवा हिंग्लिश सिनेमा म्हणजे वाट पाहण्याची एक जीवघेणी गोष्ट आहे. शिव नटराज (नसीरुद्दीन शाह) या कोचीमधल्या प्राध्यापकाची पत्नी आठ महिने तेथील हॉस्पिटलमध्ये कोमात आहे. योगायोगानं मुंबईतल्या रजत देशपांडेला काही कामानिमित्त तो कोचीत आला असताना अपघात होतो आणि तोही याच हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल होतो. त्याची पत्नी तारा (कल्की कोएच्लिन) तातडीनं तिथं येते. तिथं विमनस्क अवस्थेत ती बसलेली असताना तिची भेट शिव नटराजांशी होते. दोघांचीही अवस्था सारखीच असते. दोघांमध्ये अर्थातच अनेक बाबतीत फरक असतात. पिढीचा फरक, भाषेचा फरक, परिस्थितीशी दोन हात करण्यातला फरक... नातेसंबंधांकडं पाहण्याचा दृष्टिकोन सगळं सगळं भिन्न असतं. तरी जगण्याच्या आशेचा एक चिवट धागा दोघांना एका पातळीवर आणतो. या दोघांच्या वाट पाहण्याचीच ही जीवघेणी गोष्ट आहे. अनू मेनननं सटल पातळीवर अनेक जागा छान भरल्या आहेत. नसीरसारखा दमदार कलाकार असल्यानं एरवी अत्यंत संथ वाटणारी ही गोष्ट आपण शेवटपर्यंत इंटरेस्टनं पाहू शकतो. कल्कीनंही छान काम केलंय. अशा जीवघेण्या आजारात आपले जीवलग सापडले, की माणूस पाच स्थितींमधून जातो, हे नसीरुद्दीन शाहनं एका दृश्यात छान सांगितलंय. पहिली अवस्था असते, डिनायल.... हे आपल्याच बाबतीत झालंय हे स्वीकारायलाच आपण तयार नसतो... मग दुसरी अवस्था असते, अँगर... झाल्या गोष्टींबाबत आपल्याला सर्वांचा राग राग येऊ लागतो... मग तिसरी अवस्था असते बार्गेनिंग... इथं आपण आस्तिक असू तर देवाशी वाटाघाटी सुरू करतो... नास्तिक असू तर आस्तिक व्हायला लागतो...चौथी स्थिती असते, डिप्रेशन... काहीच होत नाही म्हटल्यावर आपण नैराश्यग्रस्त होतो.... आणि पाचवी अवस्था असते ॲक्सेप्टन्स.... स्वीकार... जे घडलंय त्याचा आपण शांतपणे स्वीकार करतो. त्यानंतर माणूस माझ्यासारख्या 'झेन' पदाला पोचतो, असं शिव ताराला सांगतो. अशा अनेक छोट्या छोट्या संवादांतून, व्यामिश्र जगण्यातला साधा-सरळ समजूतदारपणा नकळत सांगणारा, शिकवणारा हा सिनेमा आहे.
कदाचित आठवड्यानंतर थिएटरला नसेलच. मी शुक्रवारी सिटीप्राइड अभिरुचीला गेलो. तेव्हा मी एकमेव प्रेक्षक असल्यानं शो झालाच नाही. मग आज सिटीप्राइड कोथरूडला नेटानं जाऊन पाहिलाच. पण समाधान वाटलं. पूर्वीच्या काळी या सिनेमाला कुणी समांतर किंवा आर्ट सिनेमा म्हटलं असतं. पण आज हा मुख्य धारेतलाच सिनेमा आहे. भले त्याची स्ट्रीम खूप छोटीशी असो...
आणि हे खूप छान आहे!
(दर्जा - साडेतीन स्टार) (एक पूर्ण स्टार नसीरसाठी...)
(२-६-२०१६, फेसबुक)
---
२. गली बॉय
--------------
हार्ड लक, बॉय!
-------------------
झोया अख्तर ही माझी आवडती दिग्दर्शिका आहे. तिचे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘दिल धडकने दो’ हे दोन्ही सिनेमे मला आवडले. ‘गली बॉय’ हा तिचा ताजा चित्रपट आता प्रदर्शित झालाय. रणवीरसिंह आणि आलिया भट प्रमुख भूमिकांत आणि झोयाचं दिग्दर्शन यामुळं हा सिनेमा पाहायची उत्सुकता होती. (सिनेमा पाहण्याच्या आधी त्याचा कुठलाच रिव्ह्यू मी वाचत नाही. पण या सिनेमाचे रिव्ह्यू चांगले आलेयत एवढं तर कळतंच...) पण प्रत्यक्षात ‘गली बॉय’ बघितल्यावर माझा भ्रमनिरास झाला. हा सिनेमा आवडून घेण्याचा प्रयत्न मध्यंतरापर्यंत मी केला; पण उत्तरार्धात मात्र मनानं नि:संदिग्ध कौल दिला, की नाही! बात कुछ जमी नहीं! हा सिनेमा आपल्याला भिडत नाही.
म्हणजे झोयाला या सिनेमात काय मांडायचंय ते मला कळलं. सक्सेस स्टोरी पाहायला आपल्याला आवडतेच. पण ती गोष्ट पाहताना त्या पात्रांसोबत आपलाही जो समांतर प्रवास व्हायला हवा ना, तो इथं झाला नाही. मी त्या पात्रांशी कुठलाही जैव संबंध प्रस्थापित करू शकलो नाही. या सिनेमातल्या कथाविषयाशी माझा भावनिक कनेक्ट शून्य होता, म्हणून असं झालं का? पण मग हा निकष इतर अनेक सिनेमांनाही लावला, तर चुकीचा ठरतो. तेव्हा तसं नसावं. मग नक्की काय झालं? रणवीर, आलिया आणि इतर पात्रं ज्या पर्यावरणात वावरतात, ते पर्यावरण (धारावी) इतर अनेक सिनेमांत अनेक वेळा पाहिलं आहे. ‘सलाम बॉम्बे’, ‘स्लमडॉग मिलेनिअर’सारख्या चित्रपटांतून ते प्रभावीपणे दिसलंही आहे. या सिनेमात मात्र रणवीरचा ध्यास आणि त्या ध्येयाकडचा प्रवास मनाची पकड घेतनाही. रणवीरचे मित्र, त्याचं कुटुंब, आलियाबरोबरचा त्याचा रोमान्स यात सिनेमाचा पहिला बराचसा भाग खर्च झाला आहे. या सगळ्यांत त्याची पॅशन, रॅपबद्दलची असोशी थोडी बॅकट्रॅकला जाते. उत्तरार्धातही हा विस्कळितपणा कायम राहतो. मधेच कल्कीचा ट्रॅक येतो. रणवीरच्या कुटुंबातील अडचणी समोर येतात. शेवटी आपलं ध्येय गाठण्यासाठी रणवीर मित्रासोबत गाड्या चोरायला लागतो, तेव्हा तर आणखीच डिस्ट्रॅक्ट व्हायला झालं. शिवाय रॅप संस्कृतीशी कुठलाच कनेक्ट नसल्यानं मला तरी त्याच्या या प्रवासात भावनिकदृष्ट्या गुंतता आलं नाही.
अर्थात, रणवीरनं काम उत्तमच केलंय. आलिया पण बहारदार! रणवीर-आलियाची 'चुंबनकेमिस्ट्री' चांगलीच जमली आहे. एवढं सगळं असलं, तरी बात कुछ जमी नही, असंच वाटत राहिलं... मग स्वत:लाच ‘हार्ड लक, बॉय!’ म्हणावंसं वाटलं...
(२०-२-२०१९, फेसबुक)
---
३. ओह बेबी
---------------------
वयं मोठं खोटम्
--------------------
‘जानू’ पाहिल्यानंतर यातली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा ‘ओह बेबी’ हा आणखी एक तेलगू चित्रपट बघितला. ही एक फँटसी आहे. सत्तर वर्षांच्या एक आजीबाई एका फोटो स्टुडिओत जातात आणि चमत्कार होऊन २४ वर्षांच्या होतात. यात २४ वर्षांच्या तरुणीची भूमिका अर्थातच समंथानं केली आहे. यात तिला मुक्त संचाराला भरपूर वाव आहे आणि तिनं या रोलमध्ये अक्षरश: धमाल केलीय. तिला ती ७० वर्षांची म्हातारी आहे हे माहिती असतं. पण तिचं शरीर २४ वर्षांच्या तरुणीचं झालेलं असतं. अशी ही तरुणी तिच्या घरी परत जाते, तेव्हा काय धमाल येते हे सगळं यात आहे. तिच्या नातवाबरोबर ती रॉक बँड स्पर्धेत भाग घेते. तिथला चॅनेलचा प्रमुख तरुण तिच्या प्रेमात पडतो. मध्यंतरात तिच्या नवऱ्याला मात्र ती कोण आहे हे कळतं. दाक्षिणात्य चित्रपटांत फॅमिली ड्रामात असतो तो सगळा मसाला यात भरलेला आहे. ही अगदीच निखळ व्यावसायिक फिल्म आहे आणि ती आपलं छान मनोरंजन करते. त्या म्हातारीतली ‘आई’ सदैव जागृत असते आणि ती लहान मुलगी दिसत असताना वयानं मोठ्या मुलासाठीची तिची तळमळ हे सगळं यात फार मस्त आलंय. चॅनेलमधल्या हिरोसोबत ती त्याच्या घरी जाते, दारू पिते आणि तिथंच झोपते तो प्रसंग मुळातूनच बघण्यासारखा. तिच्या नवऱ्याला जेव्हा कळतं, ही मुलगी आपलीच सत्तरीतली बायको आहे, तेव्हा ती त्याला एक वाक्य सांगते - ती म्हणते - मी आत्ता तरुण आहे तर सगळ्या तरुणांच्या नजरा माझ्याकडं खिळतात. ते मला सुंदर म्हणतात. ते एक वाक्य ऐकण्यासाठी मी सदैव आतुरलेले असते.... - या आणि अशाच तरल भावनांच्या गुंफणीसाठी, वयाच्या अदलाबदलीतल्या गमतीसाठी नक्की बघावा असा हा चित्रपट आहे. समंथासोबतच लक्ष्मी या ज्येष्ठ अभिनेत्रीनं यातली खमकी म्हातारी फारच जबरदस्त साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन बी. व्ही. नंदिनी रेड्डी यांनी - म्हणजे एका महिलेनंच - केलं आहे, हे सांगितल्यावर यातल्या फँटसी किती झकास सादर झाली असेल, हे वेगळं सांगायला नकोच.
(दर्जा - साडेतीन स्टार)
(२०-७-२०२०, फेसबुक)
------



No comments:
Post a Comment