18 May 2026

रोहन मैफल लेख - दवणे यांची दोन पुस्तके

आठवणींचा सुरेल अल्बम
------------------------------

ज्येष्ठ कवी, लेखक प्रवीण दवणे यांची ‘शब्द जिवलग’ आणि ‘गाण्यामागच्या गोष्टी’ ही दोन पुस्तके रोहन प्रकाशनातर्फे नुकतीच प्रसिद्ध झाली आहेत. या पुस्तकांविषयी...

-----

शब्द जिवलग - प्रतिभावंत साहित्यिकांच्या सहवासात...
-------------------------------------------------------------

थोरांचा सहवास ही तशी दुर्मीळ आणि अप्राप्य गोष्ट आहे. त्यामुळेच ती ज्यांना भरपूर लाभते त्यांना नशीबवान मानलं जातं. प्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे हे अशाच नशीबवान व्यक्तींपैकी एक म्हणायला हवेत. त्यांना आयुष्यात अनेक थोरमोठ्या साहित्यिकांचा सहवास लाभला. आज जे लेखक वा कवी केवळ आठवणींत उरले आहेत, त्यांच्या सान्निध्यात दवणेंना वावरायला मिळालं. त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्याशी पत्रव्यवहार करता आला आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकताही आलं. अशा एकूण २४ दिग्गज साहित्यिकांबद्दल २० लेख दवणे यांनी लिहिले आहेत. त्यात कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर, पु. भा. भावे, दत्तो वामन पोतदार व लक्ष्मणशास्त्री जोशी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दुर्गा भागवत, बा. भ. बोरकर, गंगाधर गाडगीळ, द. मा. मिरासदार, माधव मनोहर, प्राचार्य राम शेवाळकर, शं. ना. नवरे, सुरेश भट, यशवंत देव, शान्ता शेळके, मंगेश पाडगावकर, कविवर्य शंकर वैद्य, व. पु. काळे आणि अमृता प्रीतम, नारायण सुर्वे, रवींद्र पिंगे व अटलबिहारी वाजपेयी या थोरांचा समावेश आहे. ही सर्व व्यक्तिचित्रे दवणे यांनी अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावाने रेखाटली आहेत. त्यामुळे त्यांची शीर्षकेही तशीच आहेत. पु. ल. देशपांडे यांच्यावरील लेखाला त्यांनी ‘माझं ‘पुलदैवत’’ असं म्हटलं आहे, तर शंकर वैद्य यांच्यावरील लेखाचं शीर्षक ‘मायेची शाल’ असं आहे. प्राचार्य राम शेवाळकर यांना लेखकाने ‘सरस्वती विद्यापीठाचे कुलगुरू’ म्हटलं आहे, तर दुर्गा भागवत यांच्यावरील लेखाला ‘साहित्ययोगिनी’ असं शीर्षक दिलं आहे.
हे लेख लिहिण्यामागची आपली प्रांजळ भूमिकाही दवणे यांनी मनोगतात मांडली आहे. ते लिहितात, ‘या साहित्यिकांची वाङ्मयीन थोरवी वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ती आहेच; पुन्हा पुन्हा त्यावर लिहिलं गेलं आहे. मात्र, ‘शब्द जिवलग’मध्ये त्यांच्या-माझ्या वैयक्तिक संवादाचा, सहवासातील वेगळ्या घटनांचा, त्यांच्या थोर असण्याच्या कारणांचा प्रवास आहे. ह्या दिग्गजांच्या भेटीतले हे क्षण केवळ व्यासपीठावरील कुणाच्या साक्षीने घडले नाहीत; तर कधी पत्रलेखन, कधी घरगुती भेटी, कधी साहित्यिक कार्यक्रमांचे निमित्त यातून अनेक दीपक्षण अवचित हाती आले. साहित्य रसिकांना तर ते वाचताना अनोखा आनंद मिळेलच; पण नव्या पिढीतील लेखकांना, अध्यापकांनाही त्यातून आता प्रत्यक्ष न भेटता येणाऱ्या ह्या वाङ्मयीन दीपस्तंभांची भेट होणार आहे.’
यातून दवणे यांची या थोर साहित्यिकांकडे पाहण्याची भक्तिभावाची दृष्टी अधोरेखित होते. हे लेख वाचताना या थोर मंडळींच्या आयुष्यातले लेखकाने अनुभवलेले मोजके क्षण व किस्सेवजा आठवणी पाहून आपणही त्या काळात जातो. पु. भा. भावे यांच्या सान्निध्यातल्या दवणे यांच्या आठवणी रंजक व रोचक आहेत. दत्तो वामन पोतदार यांना केवळच एकदाच भेटूनही त्यांचा कसा प्रभाव लहानग्या वयात पडला, हेही दवणे यांनी प्रभावीपणे मांडले आहे. विंदांसारख्या ज्येष्ठ कवीने दवणे यांच्या निवेदनातील चूक जाहीररीत्या कशी सांगितली होती, हेही लेखकाने आडपडदा न ठेवता मोकळेपणाने लिहिले आहे. एका दिवाळी अंकासाठी साहित्य देण्यास नकार देण्यासाठी दुर्गा भागवतांनी पोस्टकार्डवर केवळ ‘ना दु’ एवढंच लिहिल्याची गमतीशीर आठवणही त्यांच्यावरील लेखात आहे. ‘चांदण्याची मधुशाला’ हा बा. भ. बोरकरांवरचा रसाळ लेख तर मुळातूनच वाचण्यासारखा. माधव मनोहर यांचे लेखनिक म्हणून काम करताना दवणे यांना आलेले अनुभवही असेच वाचनीय आणि गमतीशीर आहेत.
सुमारे १७२ पानांच्या या पुस्तकात इतरही सर्व ज्येष्ठ साहित्यिकांच्या आठवणी दवणे यांनी आत्मीयतेनं सांगितल्या आहेत. त्या वाचताना महाराष्ट्राचा साहित्यसमृद्ध असा काळ डोळ्यांसमोरून झरझर जातो. त्यामुळे हे पुस्तक निश्चितच वाचनीय व रंजक झाले आहे.


-----


गाण्यामागच्या गोष्टी - माझ्या गाजलेल्या गाण्यांच्या सुरेल कहाण्या...
--------------------------------------------------------------------------

प्रवीण दवणे यांनी या पुस्तकात शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या गाजलेल्या गाण्यांविषयीचे किस्से लिहिले आहेत. हे पुस्तक त्यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना अर्पण केले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची आहे. दवणे यांनी मनोगतात या पुस्तकाच्या लेखनामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘गाणी प्रसारित होतात; मात्र साडेतीन-चार मिनिटांच्या गाण्यामागे दडलेल्या गोष्टी केवळ आठवणींच्या अल्बममध्येच उरतात, पुढे त्या विरतात. गीतरचना करताना सोबत कवीच्या तरलता आणि ललित लेखकाच्या संवेदनांचा टिपकागद मनात होता. म्हणूनच गाण्यामागच्या त्या अदृश्य गोष्टींना दृश्य रूप आलं. अर्थात, शब्दरूप! रसिकाला अशा कधी रंजक, तर कधी त्यातील अनवट वाटा जाणताना अंतर्मुख करणारा प्रयासही जाणवेल अशा ह्या खुद्द गीतकारानेच सांगितलेल्या घटना आहेत.’
एकूण सुमारे १५ प्रकरणांत लेखकाने या पुस्तकाची रचना केली आहे. दवणे १९८५ पासून चित्रपटांसाठी गीतलेखन करत आहेत. ‘ठकास महाठक’ हा त्यांचा पहिला चित्रपट. अगदी लहानपणापासून त्यांना कविता आणि गीतलेखनाचं वेड कसं लागलं आणि मराठी व हिंदी चित्रपट पाहून, त्यातील लोकप्रिय गीते ऐकून आपणही असं गीतकार व्हावं, हे स्वप्न कसं रुजलं आणि फुललं हे लेखक अगदी रंजकतेनं सांगतात. अगदी उमेदवारीच्या काळात शान्ता शेळके, शंकर वैद्य, श्रीनिवास खळे किंवा यशवंत देव यांच्यासारख्या दिग्गजांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलं. चित्रपटातील गाणी लिहिणं हे एक वेगळंच कौशल्य आहे. चित्रपटातील प्रसंगानुसार, कथेच्या मागणीनुसार गीत लिहावं लागतं. अशा वेळी गीत म्हणून असलेला दर्जा टिकवणं आणि त्या प्रसंगालाही न्याय देणं ही दुहेरी कसरत गीतकाराला करावी लागते. त्यातून अनेकदा मजेशीर किस्से घडतात. अशा अनेक गमतीशीर गोष्टी, किस्से दवणे यांनी या पुस्तकात लिहिल्या आहेत. पहिल्या चित्रपट गीताची संधी कशी मिळाली, विश्वनाथ मोरेंसारख्या मनस्वी संगीतकाराने कशी परीक्षा पाहिली, लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्याच्या वेळीच निरोप न मिळाल्यानं फोटोची संधी कशी चुकली, उषा मंगेशकरांनी पहिल्यांदा गाणं का नाकारलं या आणि अशा अनेक किस्सेवजा हकीकतींनी दवणे यांनी या पुस्तकात रंगत आणली आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या यशाच्या प्रसंगांबरोबरच अपयशाच्या, संघर्षाच्या, फसवणुकीच्या, अन्यायाच्या, गैरवागणुकीच्याही गोष्टी त्यांनी निर्मळपणे वाचकांसमोर ठेवल्या आहेत. चित्रपटसृष्टीसारख्या मोहमयी दुनियेत, डोंबिवलीसारख्या गावात, निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात राहून कविता व गीतलेखनाचे वेड अंगात भिनवणारा तरुण केवढी मोठी मजल मारू शकतो, हे दवणे यांच्या या प्रांजळ कथनातून आपल्यासमोर येते. याशिवाय गेल्या ४० वर्षांत मराठी सिनेमांत आपण ऐकलेल्या अनेक लोकप्रिय, गाजलेल्या गीतांचे गीतकार प्रवीण दवणे आहेत, याचा सुखद साक्षात्कारही होतो. त्यासाठी तरी हे रंजक पुस्तक वाचायलाच हवे.

---