ऐंशीचं दशक - एक नोंद
------------------------------
सध्या समाजमाध्यमांवर ऐंशीचं दशक ट्रेंडिंग आहे. लोक त्या काळातले फोटो ‘एआय’च्या मदतीने तयार करून आपापल्या भिंतींवर डकवत आहेत. समाजमाध्यमांवरचे असे ट्रेंड अल्पजीवी असतात. नवा ट्रेंड आला, की आधीचा मागे पडतो. विस्मरणातही जातो. मात्र, या निमित्ताने ऐंशीच्या दशकाची एक चांगली नोंद करून ठेवता येईल, असं वाटलं. म्हणून हा लेखप्रपंच... फेसबुकवर शेअर केलेला हा लेख आता जरा विस्तारित, अपडेट स्वरूपात इथे...
ऐंशीच्या दशकाचा ट्रेंड जोरात आहे. मीही माझे दोन-तीन फोटो करून घेतले. ते असो. पण या निमित्ताने या दशकाची जरा गांभीर्यानं उजळणी करावी असं वाटलं. १९८० ते १९८९ हे दशक म्हणजे ऐंशींचं दशक. एटीज. माझा जन्म १९७५ चा. मात्र, माझ्या आठवणी १९८०-८१ पासून सुरू होतात. कॅलेंडरवर १९७८, १९७९ पाहिल्याचं मला आठवत नाही. माझ्या आत्याचं लग्न १९७८ मध्ये झालं. तेव्हा आजोबांच्या जवळ पांढरा कुर्ता व बहुतेक धोती घातलेला तीन वर्षांचा मी बसलो आहे, असा एक फोटो आहे. त्याहूनही लहान असतानाचे, घरच्यांनी हौसेनं काढून घेतलेले फोटो आहेत. मला अर्थातच ते काही आठवत नाही. तेव्हा माझ्या जगण्याची खऱ्या अर्थानं सुरुवातच ऐंशीच्या दशकानं झाली...
मला आमच्या घरात १९८१ असं लिहिलेलं एक इंग्लिश कॅलेंडर बघितल्याचं लख्ख आठवतंय. एवढंच काय, हातात वासरू घेतलेल्या मुलाचा एक ग्लेझ फोटो त्यावर होता, हेही आठवतंय. हे कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय किंवा ‘महालक्ष्मी’सारखं नव्हे. कॉर्पोरेट कंपन्या काढायच्या आणि वाटायच्या, तसं. मी १९८१ मध्ये पहिलीत गेलो. इंदिरा गांधी देशात परत सत्तेवर आल्या होत्या. पंजाब व आसाम धगधगत होतं. रोज पेपरमध्ये त्या बातम्या यायच्या. तेव्हा ‘एक दुजे के लिए’ प्रचंड लोकप्रिय झाला होता. सर्वत्र त्याचीच गाणी वाजत असायची. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणं ऐकलं, की आजही मला जामखेडच्या टुरिंग टॉकीजची आठवण येते. तिथं सिनेमा सुरू होण्याआधी लाऊडस्पीकरवर ही गाणी वाजवली जायची. मी जामखेडच्या जिल्हा परिषदेच्या ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर’ या शाळेत जाऊ लागलो. हेमंत देशमुख हे आमचे गुरुजी होते. पुढची चारही वर्षं तेच आमच्या वर्गाला शिकवायला होते. तेव्हा आमचा वर्ग दर शनिवारी शेणानं सारवला जायचा. त्या दिवशी आम्ही बाहेर पटांगणात बसायचो आणि काही मुलं शेणानं वर्ग सारवून घ्यायची. आपल्यालाही सारवायला मिळावं, असं आम्हाला वाटे. मात्र, आम्हाला गुरुजी ते काम द्यायचे नाहीत. मग निदान शेणानं सारवणाऱ्याला पाणी घालायला तरी मिळावं, असं वाटे. फार आग्रह धरला तर ते काम मिळे. त्या काळात पाकिस्ताननं आपल्या एका विमानाचं अपहरण करून ते कराचीला नेलं होतं. तेव्हा आम्ही चार मित्रांनी वर्गातल्या अझीम नावाच्या मुलाला विनाकारण धरून धोपटलं होतं. ‘आमचं विमान पाकिस्तानला पळवून का नेलंस?’ म्हणून! त्या बिचाऱ्याला आपल्याला का मारलं, हे शेवटपर्यंत कळलं नाही. दुसऱ्या दिवशी त्याची आई शाळेत आली. आम्हा चौघांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली.
पहिली ते चौथी ही चार वर्षं मी शाखेत गेलो. तिथले खेळ मला आवडायचे. ‘नमस्ते सदा वत्सले...’ ही प्रार्थना, तो भगवा ध्वज, ओळीत उभं राहणं, शेवटी ‘संख्या’ घेणं, अग्रेसर, उपविश वगैरै आदेश अजून आठवतात. आमचे शिक्षक चांगले होते. काही काही खेळ खेळताना व तिथं सांगितल्या जाणाऱ्या काही गोष्टींनी मात्र तेव्हाही प्रश्न पडायचे एवढंच आता आठवतंय. चौथीनंतर संघ शाखेशी संबंध संपलाच.
पुढच्या वर्षी, म्हणजे १९८२ मध्ये आपल्याकडं दिल्लीला एशियाड झालं. अप्पू हत्तीचे पुतळे उभारले गेले. टीव्ही रंगीत झाला. पांढरा व हिरवा रंग असलेल्या एशियाड गाड्या आल्या. त्या स्टेशन-दादर मार्गावर धावू लागल्या. त्या काळात या गाड्यांचा अतिशय रुबाब होता. याच वर्षी बंगळूरमध्ये शूटिंग करताना ‘कुली’च्या सेटवर अमिताभला भयंकर अपघात झाला. पुढचे काही महिने तो रुग्णालयात होता आणि देशभर सर्वधर्मीय लोक त्याचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करत होते. माझ्या आठवणीनुसार, पुण्यातील मंजुश्री सारडा हत्या प्रकरणही याच वर्षी घडलं. पुढं कित्येक दिवस त्याच्या बातम्या रोज पेपरमध्ये येत होत्या. मंजुश्रीचा पती शरद सारडा याला कनिष्ठ न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. पुढं राम जेठमलानींनी त्याचं वकीलपत्र घेतलं आणि तो सुप्रीम कोर्टात बहुतेक निर्दोष सुटला. मंजुश्री सारडाचं वकीलपत्र पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील बाबाराव भिडेंनी घेतलं होतं, असं वाचल्याचं आठवतंय. (पुण्यातील प्रसिद्ध बाबा भिडे पूल यांच्याच नावावरून आहे.) मंजुश्री सारडाचं माहेर बीडचं होतं व तिचं माहेरचं आडनाव चितलांगे होतं, हेही आठवतंय.
पुढच्याच वर्षी, म्हणजे १९८३ मध्ये दिल्लीत अलिप्त राष्ट्र संघटनेची (‘नाम’) परिषद झाली. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतात झालेली ती शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय परिषद. याच वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर भारतानं पहिलावहिला वन-डे वर्ल्ड कप जिंकला. याच वर्षी पं. वसंतराव देशपांडे गेले. या काळात रेडिओवर बातम्या ऐकल्या जायच्या. रविवारी दुपारी ‘आपली आवड’ कार्यक्रम असे. एकदा आमच्या नंदूकाकानं (प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख) आमची नावं रेडिओवरून घेतली होती, तेव्हा खूप आश्चर्य व आनंद वाटला होता. याच वर्षी आमच्या शाळेची सहल जामखेडजवळ नरुटं म्हणून ठिकाण आहे, तिथं गेली होती असं आठवतंय. आजी-आजोबांबरोबर पुण्याला आत्याकडं जाणं व्हायचं. त्यामुळं खूप लहानपणापासून पुण्याचा शनिवारवाडा, पर्वती, सारसबाग, लालमहाल ही ठिकाणं बघणं व्हायचं. पुण्याविषयी प्रेम निर्माण झालं ते तेव्हापासून. पुण्यात आल्यावर रिक्षात बसणं हा फार मोठा आकर्षणाचा भाग असायचा. तेव्हा जामखेड ते पुणे एसटीला २३ रुपये १० पैसे एवढं तिकीट असायचं. लातूरलाही बरोबर एवढंच तिकीट होतं. लातूरला आजोळ होतं. मामाकडं जायला छान वाटायचं. लातूरच्या गंजगोलाईचं आकर्षण वाटायचं. एसटीचा प्रवास लांबचा, गर्दीचा आणि तसा त्रासदायक असायचा. आम्हाला मात्र तो कधीही बोअर झाला नाही. असो.
सन १९८४ उजाडताना पंजाबातलं वातावरण स्फोटक झालं होतं. १९८४ मध्ये जूनमध्ये सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ झालं आणि त्यात भिंद्रनवालेला अखेर मारण्यात आलं. मात्र, शीख अतिरेक्यांनी इंदिरा गांधींची भीषण हत्या करून त्याचा बदला घेतला. ३१ ऑक्टोबरला झालेल्या त्या भयावह हत्येनंतर पुढचा आठवडाभर दिल्ली जळत होती. अनेक शिखांचं शिरकाण करण्यात आलं. राजीव गांधी पुढचे पंतप्रधान झाले. डिसेंबरअखेर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा हत्येमुळं उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळं काँग्रेस पक्षाला विक्रमी ४१४ जागा मिळाल्या. राजीव गांधींच्या रूपानं देशाला तरुण नेतृ्त्व मिळालं होतं. १९८५ मध्ये शाहबानो प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल आला. मात्र, मुस्लिमांच्या दबावात येऊन राजीव गांधींनी तो निर्णय फिरवण्याची घोडचूक केली. (मध्येच वैयक्तिक आठवणीची एक नोंद - या वर्षी मला चौथीला स्कॉलरशिप मिळाली. महिना दहा रुपये. आयुष्यातली पहिली कमाई. असो.) सन १९८६ मध्ये बोफोर्स प्रकरण गाजू लागलं. याच वर्षी जानेवारीत आमच्याकडं पहिल्यांदा टीव्ही आला. ‘क्राऊन कॅसल’चा तो शटरवाला ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता. मग ‘बुनियाद’, ‘नुक्कड’, ‘चित्रहार’चा जमाना घरात आला. याच वर्षी एप्रिलमध्ये शारजात जावेद मियाँदादनं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारतीयांच्या मनावर खोल जखम केली. या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यात जिंदा व सुखा या अतिरेक्यांनी जनरल अरुणकुमार वैद्य यांची कॅम्प परिसरात त्यांच्या चालत्या गाडीत गोळ्या घालून हत्या केली.
सन १९८७ मध्ये भारतात पहिलावहिला रिलायन्स वर्ल्ड कप भरला. उपांत्य फेरीत आपण मुंबईत इंग्लंडकडून हरलो. याच वर्षी पाकिस्तानविरुद्ध बंगळूर कसोटीत आपण हरलो; पण सुनील गावसकरची ९६ धावांची अविस्मरणीय खेळी याच कसोटीतली... याच वर्षी शेखर कपूरचा ‘मि. इंडिया’ आला. यात खाण्यात भेसळ करणाऱ्या अजित वाच्छानीच्या पात्राला अनिल कपूर धान्यातले खडे खायला घालतो, या दृश्यावर टाळ्या पडायच्या. आजूबाजूला सगळीकडं हेच तर होतं. गॅस सिलिंडर ही ग्रामीण भागात तरी नवलाईच होती. रेशनवर रॉकेल मिळायचं. त्यासाठी लांबच लांब रांगा असायच्या. ‘केंद्राच्या योजनेतील एक रुपयापैकी केवळ १५ पैसे शेवटच्या घटकापर्यंत पोचतात,’ असं पंतप्रधान राजीव गांधींनीच कबूल केलं. हे वर्ष संपता संपता टीव्हीवर ‘रामायण’ सुरू झालं. किशोरकुमारचं निधन याच वर्षी झालं. व्हीसीआरचं पेव याच दशकात फुटलं. गावोगावी व्हिडिओ पार्लर निघाले. १९८८ मध्ये सोल ऑलिम्पिकमध्ये शायनी अब्राहमचं पदक लेन चुकल्यामुळं हुकलं.
महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं स्थलांतर याच वर्षी घडलं. आम्ही आमचं गाव सोडून नगरला, म्हणजे मोठ्या शहरात राहायला आलो आणि इथून पुढं माझ्या सर्व जाणिवा, संवेदना ‘शहरी’ झाल्या. राज कपूर याच वर्षी गेला. माधुरीचा ‘तेजाब’ सगळीकडं ‘एक दो तीन’ म्हणत धुमाकूळ घालू लागला. १९८९ मध्ये राजीव गांधींची सत्ता गेली. देशभर मंडल आयोगाविरुद्ध आंदोलन पेटलं. त्यातच अयोध्येत शिलापूजनास परवानगी दिल्यानंतर राम मंदिर आंदोलनही भडकलं. अडवानींनी सोमनाथपासून ‘भारत यात्रा’ काढली. ती लालूप्रसादांनी बिहारमध्ये अडवली आणि अडवानींना अटक केली. याच वर्षी ‘चांदनी’ प्रदर्शित झाला आणि श्रीदेवीच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब झालं. हे वर्ष संपताना ‘मैंने प्यार किया’ प्रदर्शित झाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सलमान खानचा उदय झाला. आदल्याच वर्षी ‘कयामत से कयामत तक’मधून आमीर व जूहीनं जोरदार पदार्पण केलं होतं. शाहरुख खान नावाचा दिल्लीचा तरुण ‘फौजी’, ‘सर्कस’ आदी दूरदर्शन मालिकांत काम करत होता... १९८९ मध्ये नेहरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभर ‘अपना उत्सव’ साजरा झाला. ‘मिले सूर मेरा तुम्हारा...’ गाजत होतं. १९८९ मध्ये कराचीतील कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर नावाच्या मुंबईच्या 'वंडर बॉय'नं वयाच्या सोळाव्या वर्षी कसोटी पदार्पण केलं होतं...
हे दशक एकूणच अस्वस्थ दशक होतं. कित्येक जुन्या गोष्टी नष्ट होत होत्या, नव्या येत होत्या. मात्र, एकूण सुमारीकरण वाढलं होतं. राजकारणाचं उघड उघड गुन्हेगारीकरण या काळात वाढलं. मुंबईत गँगवॉर वाढलं. शिवसेनेचं प्रस्थ वाढलं. हिंदुत्वाचा नारा बुलंद झाला. सर्वसामान्यांंचं जगणं खडतर होतं. मध्यमवर्गीयांचे सरासरी पगार तीन-चार हजार रुपये होते. मोबाइल, मल्टिप्लेक्स, मॉल या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. चारचाकी गाडी घेणं श्रीमंतांनाच परवडत होतं. टेलिफोन संचार क्रांतीला नुकतीच सुरुवात झाली होती. एसटीडी, आयएसडीचे पिवळे बूथ सगळीकडं दिसू लागले होते...
१४ नोव्हेंबर १९८९... मी वयाच्या चौदाव्या वर्षातून पंधराव्या वर्षात पदार्पण केलं होतं... थोडक्यात, या क्रूर जगाच्या ‘अंगणात गमले मजला... संपले बालपण माझे...’
पुढे एक-दीड वर्षांनीच भारत आमूलाग्र बदलणार होता... 'पहाटेच्या दारात उभे होते जागतिकीकरणाचे दूत...' त्यानंतर आपलं जगणंच सगळं बदलून जाणार होतं... त्याविषयी पुन्हा कधी तरी... नाइन्टीजचा ट्रेंड आला की...!
---
(विशेष नोंद - सोबतचा फोटो फक्त ‘एआय’कडून तयार करून घेतला आहे. बाकी मजकूर अस्मादिकांच्या मेंदूतूनच तयार झाला आहे. जसं आठवेल तसं लिहिलं आहे. त्यामुळे चु भू दे घे...)
---
