15 Jul 2026

मटा मैफल लेख

 तिसऱ्या लग्नाची एक गोष्ट
-------------------------------


प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचं तिसरं लग्न नुकतंच पार पडलं. सेलेब्रिटी व्यक्तीच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही बातमी असते, असं पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात फार पूर्वीपासून शिकवलं जातं. त्यामुळं आमिरच्या या लग्नाच्या बातम्या होणारच होत्या. तशा त्या झाल्या. मात्र, आता अलीकडं केवळ बातम्या किंवा गॉसिप-गप्पांपुरतं हे मर्यादित राहिलेलं नाही. मीम्स तयार होणं हेही समजू शकतो. तरीही तारतम्य नावाच्या महत्त्वाच्या बाबीला हल्ली अनेकांनी सुट्टी दिलेली असल्यामुळं कुठली गोष्ट किती ताणायची याला काही धरबंधच राहिलेला नाही. कुठल्याही सेलेब्रिटीचं लग्न, त्यातही तिसरं लग्न याबाबत सर्वसामान्यांना निश्चितच उत्सुकता असू शकते. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ टेलरच्या सात की आठ लग्नांच्या चर्चा आजही रंगतातच की! आमिरच्या बाबतीत त्याच्या पहिल्या दोन्ही पत्नी ‘हिंदू’ आणि तिसरी ख्रिश्चन (थोडक्यात इस्लामेतर) असल्याचा एक कोन जोडला गेल्यानं या उत्सुकतेला वेगळाच धार्मिक रंगही आला. वास्तविक बॉलिवूडमध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न ही काही नवी गोष्ट नाही. अनेक लग्नं झाली, तर अनेक मोडलीही. न झालेल्या लग्नांमध्ये देवआनंद-सुरय्या यांचं उदाहरण सर्वांसमोर आहे. राज कपूर-नर्गिस यांच्या न झालेल्या लग्नाइतकी चर्चा तर अन्य कशाचीही झाली नसेल. यशस्वी आंतरधर्मीय लग्नांत सुनील दत्त-नर्गीस आणि मन्सूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर ही दोन उदाहरणं ठळक सांगता येतील.
स्पष्ट सांगायचं, तर आंतरधर्मीय लग्नांपेक्षा दोन किंवा अधिक लग्नं करणाऱ्या नटांविषयी अधिक चर्चा होते. यात मध्यमवर्गीयांना वाटणाऱ्या सूक्ष्म असूयेचाही भाग आहेच. ‘आपल्याला एकच लग्न करण्याची मुभा किंवा ते टिकवण्याची सक्ती; आणि यांचं पाहा, दोन-दोन, तीन-तीन लग्नं करताहेत,’ असा एक मत्सरयुक्त भाव त्यात असतो. पुरुषांच्या मनात तर हे विचार शंभर टक्के येतातच. आता खरा मुद्दा इथं येतो, की खरोखर हे दुसरं किंवा तिसरं लग्न म्हणजे संबंधित पुरुषासाठी किंवा स्त्रीसाठी ‘मज्जा’ असते का? साधारण तर्कबुद्धी असलेला कोणताही माणूस हे मान्य करणार नाही. लग्न हा विषय आपल्याकडं किती तरी भावभावनांचे गुंते घेऊन येतो. ती आयुष्यभराची बांधिलकी असते असं आपण मानतो. मात्र, या पारंपरिक समजुतींपलीकडं या नात्याचा विचार करणारे अनेक जण आताच्या काळात दिसतील. दोन व्यक्तींचं एकमेकांशी पटत नसेल तर परस्पर समजुतीने वेगळं व्हायचं, हा विचार बळावत चालला आहे. लग्न म्हणजे केवळ एक नव्हे, तर साता जन्मांची गाठ अशी घट्ट समजूत असलेल्या आपल्या समाजात बहुतांश मंडळींना हा विचार अगदी आजच्या काळातही पचनी पडणं जड जातं. त्यामुळं या मनाच्या तळाशी कुठं तरी असलेला हा विरोध आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या निमित्ताने उफाळून येतो, तो वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होऊ लागतो. टिंगलटवाळी करणं हा सर्वांत सोपा उपाय. त्यामुळं अशा लग्नाची मीम्स येतात किंवा लोक सर्रास त्याची चेष्टामस्करी करू लागतात.
नट-नट्यांच्या आयुष्यांबद्दल आपल्याला असलेली नको तेवढी उत्सुकता आणि त्यांच्या आयुष्याविषयी वेगवेगळ्या माध्यमांतून पसरवलेले गेलेले समज-गैरसमज (जास्त करून गैरसमजच) यांचाही वाटा यात मोठा आहे. सिनेमा किंवा नाटकात असलेल्या मंडळींच्या चारित्र्याविषयी आपले अजबगजब समज असतात. पडद्यावर अभिनय करत असताना का होईना, पण वेगवेगळ्या स्त्रियांशी नटाला (आणि वेगवेगळ्या पुरुषांशी नटीला) शारीर जवळीक साधायला मिळते, हे सामान्य प्रेक्षकाला दिसत असतं. आता वास्तविक ज्याने आयुष्यात एकदा तरी शूटिंग पाहिलं आहे त्याला यात किती तथ्य असतं किंवा त्या कथित जवळिकीला संबंधित नट-नटी कसे सामोरे जातात, हे नीटच समजेल. एवढं करूनही खरोखर शारीर जवळीक साधण्याची मुभा या मंडळींना असते, हे मान्य केलं तरी कालांतराने त्यात किती यंत्रवतपणा येत जातो आणि अनेकदा केवळ पाश्चात्त्य शैलीचं अनुकरण म्हणून हलकीशी मिठी मारली जाते किंंवा गालाला गाल लावले जातात हेही आता अनेकांना ठाऊक आहे. मात्र, आपल्या देशाच्या विपुल लोकसंख्येच्या मानाने सिनेमा-नाटकांचं जग फार छोटं. त्यामुळं या क्षेत्रातील लोक अनेक बाबतींत प्रिव्हिलेज्ड आहेत, अशी सर्वसामान्यांची भावना असते आणि ती काही प्रमाणात खरी आहे. याउलट आपल्याकडं लैंगिक उपासमार होत असलेला सर्वसामान्य वर्ग खूपच मोठा. अशी ही दोन परस्परविरोधी विश्वं एकमेकांसमोर येतात, तेव्हा उपेक्षित वर्गाला ‘प्रिव्हिलेज्ड’ वर्गाविषयी समजांपेक्षा गैरसमज अधिक असणार, हे समजण्यासारखं आहे.
एक गोष्ट मात्र समजून घेता येणार नाही आणि ती समाज म्हणून आपण मान्यही करू नये, ती म्हणजे या चेष्टामस्करीत त्या विवाहबंधनात अडकत असलेल्या स्त्रीची निंदा. आपल्या समाजाची घडणच अशी पुरुषप्रधान आहे, की तिसरं लग्न करणाऱ्या पुरुषापेक्षा त्याच्याशी ते लग्न करणाऱ्या महिलेला अधिक ट्रोल केलं जातं. इतकंच काय, त्याच्या आधीच्या पत्नींनाही ट्रोलधाडीला सामोरं जावं लागतं. त्या याच्या लग्नात काय करताहेत, अशा मिठ्या का मारताहेत, त्यांना एवढा कसला आनंद झालाय अशा एक ना दोन हजार शंका शंकासुरांच्या मनात फेर धरून नाचू लागतात. वास्तविक, एखाद्या लग्नातून बाहेर पडताना त्या स्त्रीला (आणि पुरुषालाही) किती आणि काय त्रास झाला असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र, त्यांनी सदोदित दु:खी चेहरा करून जगावं, ही लोकांची अपेक्षा समजण्यापलीकडं आहे. हल्ली ‘मूव्ह ऑन’ होण्याकडं बहुतेकांचा कल असतो आणि तो योग्यच आहे. लग्नासारख्या नातेसंबंधांबाबत ही मंडळी पारंपरिक विचारांपेक्षा वेगळा आणि प्रागतिक विचार करतात, एवढाच त्याचा अर्थ आहे.
हल्लीची पिढी लग्न आणि घटस्फोटांबाबत काय विचार करते, हे जाणून घेण्यासाठी पुण्यातील कुटुंब न्यायालयात अनेक वर्षं प्रॅक्टिस करणाऱ्या ज्येष्ठ वकील ॲड. स्वाती यादवाडकर यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी रोजच्या अनुभवावर आधारित त्यांची निरीक्षणं मांडली. त्या म्हणतात, ‘सध्याच्या काळामध्ये घटस्फोट घेणे ही नवीन बाब राहिलेली नाही. दोन व्यक्तींचे एकमेकांशी पटत नसेल तर शक्यतो सामंजस्याने मोकळे होण्याकडं तरुण पिढीचा कल दिसून येतो. एकदा घटस्फोट झाला म्हणून आयुष्यभर मी एकट्यानेच राहण्याची आवश्यकता नाही, ही पण बाब त्या दोघांना किंवा त्यांच्या घरच्यांना पचनी पडलेली आहे. त्यामुळे घटस्फोटितांचे पुनर्विवाहदेखील लक्षणीय प्रमाणात वाढलेले आहेत. कायद्याचे बऱ्यापैकी ज्ञान म्हणू या अथवा कायद्याबाबतची जागरूकताही लोकांमध्ये आहे. याबाबतीतले कायदे आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून सहज लोकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे न्यायालयातून घटस्फोट मिळवणे ही सगळ्यांत सुरक्षित बाब आहे. हे लोकांना पटलेलं आहे. पुन्हा एकदा लग्न करताना कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करायचा आहे. हेही प्रकर्षाने लक्षात ठेवलं जातं. यापूर्वी आपल्याकडे घटस्फोट होत आहे ही बाब अतिशय न्यूनगंडाची किंवा समाजात वावरताना आपलं काहीतरी मोठं चुकलंय अशी होती. घटस्फोट घेतलाय हे लोक लपवायचे. आता घटस्फोटितांच्या पुनर्विवाहासाठीची पण विवाह मंडळं आहेत.’
‘दुसरा विवाह करताना एक गोष्ट समोर नक्की असते, की या जोडप्याला ‘आपल्याला नक्की काय नको आहे,’ हे आधीच समजलेलं असतं,’ असं नमूद करून ॲड. यादवाडकर सांगतात, “गेल्या २५ वर्षांत कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टिस करताना मला हे लक्षात आलं आहे. की दुसऱ्यांदा झालेला विवाह हा बऱ्यापैकी टिकून राहतो. गंमत म्हणजे घटस्फोट झाला, की अनेक पक्षकार किंवा त्यांचे आई-वडीलच मला ‘तुमच्याकडे असलेल्या पक्षकारांपैकी एखादी घटस्फोटित चांगली मुलगी किंवा मुलगा आम्हाला सुचवा,’ असं म्हणतात. त्यामुळे माणसाच्या नैसर्गिक, सामाजिक, भावनिक गरजा पूर्ण होऊन त्याला चांगल आयुष्य जगायचं असेल तर त्याने त्याच्या इच्छेप्रमाणे जोडीदार निवडून त्याच्यासोबत शांतपणे राहावं, ही गोष्ट घटस्फोटित मुलाचे-मुलीचे आई-वडील, समाज यांनी सहजपणे स्वीकारलेली आहे. अशावे ळी जर आधीच्या लग्नापासून मुलं-मुली असतील तर त्यांचाही विचार सामंजस्याने केला जातो. तितक्याच मोठ्या मनाने नवीन जोडीदार ह्या मुलांबाबत विचार करतात त्यावर मार्ग काढतात.”
“लग्नसंस्था जरी सामाजिक गरजेतून निर्माण झालेली आणि कुटुंबव्यवस्थेला प्राधान्य देणारी बाब असली तरी पुनर्विवाहदेखील सामान्य माणसांसाठी नवीन राहिलेला नाही. घटस्फोट झाल्यानंतर ७० टक्के मुलं-मुली नव्याने संसारात थाटतात दुसरे लग्नही समाजासमोर करतात. त्याबाबतीत कुठलाही गंड बाळगत नाहीत,” असं निरीक्षण नोंदवून ॲड. यादवाडकर सांगतात, “कुटुंबव्यवस्था टिकून राहायची असेल तर घटस्फोटितांचे पुनर्विवाह ही गोष्ट सहज स्वीकारली गेली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्याला हवं तसं जगण्याचा हक्क आहे . त्यालाही त्याचे आयुष्य एकदाच मिळते. जोडीदाराला, इतरांना अथवा समाजाला त्रास होणार नसेल तर व्यक्तिगत आयुष्यात कायदेशीर मार्गाने एखादी व्यक्ती तिच्या वैवाहिक जीवनाचे निर्णय घेत असेल तर त्याबाबत दूषणे देण्याचा अधिकार कायदा कोणालाही देत नाही. नवीन पिढी याबाबत अतिशय स्वच्छपणे, मोकळेपणे ,स्पष्टपणे विचार करते आणि निर्णय घेते, असा माझा अनुभव आहे.”
नव्या पिढीचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. लग्न या विषयाबद्दलचे आपले मूळचे पारंपरिक विचार त्यांनी केव्हाच त्यागले आहेत आणि नव्या, स्वच्छ मनाने या सर्व नात्यांकडं पाहायला सुरुवात केली आहे, हे यातून दिसून येतं. लग्नसंस्थेचं महत्त्व कायम आहे हेही यातून अधोरेखित होतं. कुणाच्या तरी तिसऱ्या लग्नाची चर्चा करता करता आपल्या समाजासमोर हा आरसा धरला तर त्यातूनही काही लग्नं वाचण्याची आणि काही नव्यानं घडण्याची शक्यता आहे. हेही नसे थोडके!

---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, मैफल पुरवणी (पुणे) - ११ जुलै २०२६)

---

No comments:

Post a Comment