11 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग ३

राम का गुणगान करिए...
------------------------------

५ एप्रिल २०२६, अयोध्या

आम्ही त्या मुख्य संकुलातून आत गेलो. आता मुख्य राम मंदिर अगदी समोर होतं. ते भव्य मंदिर आणि तिथलं अतिशय सुंदर प्रांगण बघून आनंद झाला. आमची रांग हळूहळू पुढं सरकत होती. पहिल्या पायरीला बहुतेक भाविक वाकून नमस्कार करत होते. मीही केला. एकेक पायरी चढताना आता मंदिराचं सर्व काम नीट दिसू लागलं. तिथले खांब, त्यावरचं कोरीव काम, विटकरी रंगाच्या त्या भिंती कमालीच्या सुंदर दिसत होत्या. एकेक पायरी चढून आम्ही मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश केला, तेव्हा साधारण दोन्ही बाजूंनी चार-चार अशा आठ रांगा होत्या. स्टीलचे बार लावून रांग तयार  केली असल्याने एका वेळी एकच माणूस त्या रांगेत उभा राहू शकत होता. त्यामुळे रांग सुटसुटीत झाली होती व भराभर शिरत होती. जसजसे आम्ही मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने जाऊ लागलो, तसतसा सर्व रांगांतून रामनामाचा मोठमोठ्यांदा गजर होऊ लागला. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी तो परिसर दुमदुमून गेला. अगदी काही क्षणांतच आम्ही ‘रामलल्ला’च्या त्या भव्य मूर्तीसमोर होतो. २२ जानेवारी २०२४ रोजी टीव्हीवर पाहिलेली ती सावळ्यासुंदर बाल श्रीरामाची गोड मूर्ती आता अगदी समोर होती. मनोभावे दर्शन घेतलं. तिथं दोन महिला पोलिस उभ्या होत्या. त्या भाविकांना पुढं ढकलत होत्या. अर्थात रांग मागे बरीच होती. त्यामुळं आम्हीही केवळ क्षण-दोन क्षण समोर उभं राहून दर्शन घेतलं व पुढं सरकलो. जरा पुढं केल्यावर पुन्हा थोडं मागे येऊन परत एकदा डोळे भरून दर्शन घेतलं. तिथंही गर्दी व्हायला लागली तसं आणखी पोलिस आले आणि त्यांनी आम्हाला तिथून बाहेर जायला सांगितलं. एका मिनिटात आम्ही बाहेर होतो. पलीकडच्या बाजूने एक व्हीआयपी एंट्री असावी. शिवाय वरच्या मजल्यावर जाण्याचा रस्ताही तिथूनच होता. वर ‘राम दरबार’ होता, मात्र तिकडं काही आम्हाला जाता आलंच नाही. आम्ही बाहेर पडलो, ते थेट त्या संकुलातूनच बाहेर जाणाऱ्या रस्त्याने. तिथं एक जटायू प्रतिमा असं लिहिलेला बोर्ड होता. मात्र, ते काम पूर्ण व्हायचं असावं. अर्थात मंदिराचं काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला येत्या ३० एप्रिलपर्यंत सगळं काम संपवून बाहेर पडायला सांगितलं आहे, हे मी वाचलं होतं. मात्र, तरीही विस्तारासाठी बराच वाव ठेवल्याचं दिसलं. बाहेर पडल्यावर एक पाणपोई होती. तिथं बहुतेक जण पाणी प्यायला थांबले होते. उन्हामुळं तहान लागलीच होती. मीही तिथं जाऊन पाणी पिऊन आलो. इथून बाहेर जाण्याचा मार्गही वरून छत असलेला होता. त्यामुळं थेट उन्हाचा त्रास नव्हता. पुढे गेल्यावर डावीकडं लगेच स्वच्छतागृहही होतं. एकूण भाविकांच्या सोयीचा बराच विचार केलेला जाणवत होता. आम्ही पुढं जाऊन एका मोठ्या इमारतीत आलो. तिथंही बऱ्याच खुर्च्या होत्या. विमानतळावर किंवा रेल्वे स्थानकावर प्रतीक्षालय असतं, तसा तो हॉल होता. तिथं बरेच भाविक विश्रांती घेत होते. आम्ही फार दमलो नव्हतो. त्यामुळं लगेच लॉकरकडे गेलो. मगाशी समोरून वस्तू आत दिल्या होत्या, आता त्याच ठिकाणी मागील बाजूला असलेल्या खिडकीतून त्या परत घ्यायची सोय केली होती. हे फार चांगलं केलं होतं. वस्तू घेताना फार गर्दी नव्हती. त्यामुळं आमच्या वस्तू लगेच परत मिळाल्या. मग पुढं जाऊन चपलाही ताब्यात घेतल्या. तिथं एक मंडप टाकून सावलीची सोय केली होती. समोरच ‘सीता की रसोई भण्डार’ दिसलं. मग तिथं रांगेत उभं राहून द्रोणात गरमागरम खिचडी व ‘फ्रुटी’सारख्या पॅकिंगमधला ‘ओआरएस’चा पॅक घेतला. तो प्रसाद त्या मंडपात उभे राहूनच आम्ही खाल्ला. आपले लोक ते द्रोण तिथंच फेकत होते. वास्तविक तिथं प्लास्टिकची कचराकुंडी ठेवलेली होती. मात्र, लोक त्या कुंडीच्या खाली द्रोण फेकत होते. दोन बायका सतत ते झाडून तोच कचरा त्या कुंडीत टाकत होत्या. फार वाईट वाटलं ते दृश्य बघून. आपल्या लोकांना स्वच्छतेची ही बेसिक सवय कधी लागणार, राम जाणे!
तिथून बाहेर पडल्यावर लगेचच काही दुकानं होती. तिथं मग रामाचे धागे, फ्रिज मॅग्नेट, काही खाऊ अशी खरेदी केली. तिथं ‘बेंगलोर कॅफे’ दिसलं. मग वरच्या मजल्यावर जाऊन कोल्ड कॉफी घेतली. बरं वाटलं. आता आम्हाला हनुमान गढीला जायचं होतं. चालतच तिथपर्यंत गेलो. राम पथावर डाव्या बाजूला वळून छोट्या गल्लीतून आत जायचं होतं. रस्त्यावरूनच ती ‘गढी’ दिसत होती. इथं थोडं चढून जायचं होतं. खालपासूनच रांगेत गर्दी दिसत होती. आम्ही चपला खालीच एका दुकानदाराकडं काढल्या. वर जाऊ लागलो तसतशी गर्दी वाढू लागली. इथं राम मंदिराच्या अगदी उलट स्थिती होती. आत एक-दोन पोलिस होते; मात्र गर्दी त्यांच्याही नियंत्रणात नव्हती. अत्यंत रेटारेटीत कसंबसं बाजूनंच दर्शन घेऊन त्या रांगेतून बाहेर पडलो. पुन्हा प्रदक्षिणा मारून समोर आलो, तर तिकडं हनुमानाचं मुख आहे, हे कळलं. मग तिथूनच फोटो काढले व खाली उतरलो. मगाशी राम मंदिरात दर्शनाचा आलेला सुखद अनुभव आणि इथं हनुमान गढीला आलेला हा गर्दीचा अनुभव, अगदीच वेगळे होते.

खाली उतरून आता आम्हाला लता मंगेशकर चौकात जायचं होतं. मग मुख्य रस्त्यावर येऊन त्या गोल्फ कार्टमध्ये बसून आम्ही त्या भव्य वीणा असलेल्या चौकात गेलो. तिथं अपेक्षेप्रमाणे बरीच गर्दी होती. सगळ्यांना त्या वीणेबरोबर फोटो काढायचे होते. आम्हीही अर्थात काढले. (एक जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या चौकात कुठेही लता मंगेशकरांच्या नावाचा फलक नव्हता. तो अयोध्येत इतरत्र एकदा दिसला. मात्र, त्या चौकात नव्हता.) तिथं उजव्या बाजूला रामकथा पार्क आणि डाव्या बाजूला राम की पैडी (पैडी की पौडी? पण तिकडं सगळीकडं ‘पैडी’ असंच लिहिलेलं होतं.) होती. रामकथा पार्क बंदच आहे, असं कळलं. तिथंच अलीकडं कोरियन राणी हो हिचं स्मारक दिसलं. तेही बांधकाम अपूर्ण होतं. मग आम्ही पुन्हा त्या ‘पैडी’कडं आलो. तिथं पाण्याच्या दोन्ही बाजूला चांगलं घाटासारखं बांधकाम केलं होतं. पाणी अगदीच घोटाभर होतं. त्यातून लोक इकडून तिकडं चालत जात होते. तिथं सुरुवातीलाच एक पाणीपुरी विकणारा मुलगा होता. मग आम्ही तिथं पाणीपुरी खाल्ली. शेजारी एक स्पेशल चहा देणारं दुकान होतं. त्या दुकानदारानं गुलाब पाकळ्या टाकून उकळलेला फर्मास चहा आम्हाला दिला. मजा आली. पुढं त्या भागाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आम्ही चालत गेलो. तिथं एक लेसर शो होता. त्याआधी आम्ही पुढं शरयूच्या घाटावर गेलो. तिथं आरती सुरू होती. गर्दीही भरपूर होती. इथल्या नदीत खाली उतरायला नीट सोय नव्हती. मातीचा निसरडा उतार होता. त्यामुळं आम्ही खाली न जाता वरूनच तो सोहळा पाहिला. परत आलो, तर तो लेसर शो सुरू झाला होता. हरीश भिमानींच्या आवाजातलं निवेदन होतं. पाण्यापलीकडं असलेल्या इमारतींवर प्रकाशझोत टाकून हा शो दाखवला जात होता. मात्र, त्याचे स्पीकर लोक जिथं बसले होते, त्याच्यामागे होते. त्यामुळं नीट ऐकू येत नव्हतं. याशिवाय त्या परिसरात इतरत्र लाउडस्पीकर सुरू होते. ते आवाज मिक्स होत होते. त्यामुळं शो चांगला असूनही आम्हाला जरा बोअर झाला. मग आम्ही तिथून उठून आलो. पुन्हा ती चार सीटर ई-रिक्षा करून हनुमान गढीच्या बाजूला आलो. या रिक्षावाल्यांना बहुतेक त्या राम पथावरून जाण्याची परवानगी नाही. मग त्यानं समोरच्या लखलखत्या धर्म पथावरून एका बोळात रिक्षा घातली. बरंच फिरवून फिरवून त्यानं आम्हाला त्या राम पथाच्या बाजूच्या गल्लीत सोडलं. जाताना जुन्या अयोध्या गावाचं दर्शन घडलं. हे गाव इतर चार गावांसारखंच साधं होतं. 
आता आम्हाला दशरथ महाल, कनक भवन बघायला जायचं होतं. पुन्हा हनुमान गढीच्या बाजूनं पुढं गेलो. तिथंच तो दशरथ महाल होता. बाहेरचा दर्शनी भाग भव्य होता व तिथं बरीच लायटिंगही केलेली होती. आतमध्ये बरीच मोकळी जागा होती व पुढं मंदिर होतं. इथं त्या मूर्तींपुढं प्रत्यक्ष कीर्तनासारखं भजन वगैरे सुरू होतं. भाविकांची गर्दीही बरीच होती. तिथं थोडा वेळ थांबून मग चालतच शेजारच्या कनक भवनात गेलो. ही वास्तू म्हणे कैकेयीने सीतेला भेट दिली होती. इथंही साधारण तसंच चित्र होतं. त्या इमारतीचा दर्शनी भाग भव्य होता. शेजारी एक महादेवाचं देऊळ होतं. आत गेल्यावर मोकळी जागा व पुढं मंदिर. त्या वेळी नेमका त्या मूर्तींसमोर पडदा ओढला होता. हा ‘शयन समय’ एक तास होता असं कळलं. त्यानंतरच मूर्ती दिसणार होत्या. आम्हाला तेवढा वेळ नव्हता. बाहेर पडलो. त्या मोकळ्या जागेत एक छोटी देवळी होती. तिथं ‘भरताच्या पादुका’ होत्या असं समजलं. इथं जे दिसेल त्याला आणि चार लोक करतील त्याला नमस्कार करणे हे धोरण मी ठेवलं होतं. त्यानुसार तिथंही त्या पादुकांवर डोकं टेकवून आलो. इथं भिंतींवर बऱ्याच ठिकाणी ‘सीताराम’ अशी अक्षरं कोरली होती आणि बरेच भाविक ती अक्षरं येता-जाता गिरवत होते. विशेषत: महिला! यामागचं लॉजिक काही कळलं नाही. सीतेचं नाव रामाआधी घेतलं जातं, यासंबंधीची एक लोककथा पूर्वी ऐकली होती. आता आठवत नाही. त्याचा काही संदर्भ असू शकेल.
इथून निघालो. आता बराच उशीर झाला होता. आमच्या हॉटेलच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आमचं ठरलं होतं. मग रिक्षा करून हॉटेलवर गेलो. तिथं रेस्टॉरंटला भरपूर गर्दी होती. गार्डन रेस्टॉरंटला फारसं कुणी बसलं नव्हते. तिथले दिवेही सुरू नव्हते. बाहेर भरपूर डास होते. त्यामुळं लोक बाहेर का बसले नसावेत, ते कळलंच. आम्हीही मग आत बसूनच जेवलो. रूमवर येऊन झोपलो. मात्र, ‘रामलल्ला’चं सुखद दर्शन झाल्यामुळं मन अगदी तृप्त होतं!

६ एप्रिल २०२६, अयोध्या/वाराणसी

आज आमच्यापैकी वृषाली काही कामानिमित्त इथूनच इंदूरला व तिथून पुण्याला परत जाणार होती. ब्रेकफास्ट केल्यांतर तिची कॅब आली. तिला बाय बाय करून आम्हीही थोड्या वेळाने पुन्हा राम मंदिर परिसरात निघालो. आमचं ‘चेक आउट’ ११ वाजता होतं. त्यामुळं बॅगा तिथंच ठेवून आम्ही बाहेर पडलो. राम मंदिर परिसरात जाऊन परत थोडी फार खरेदी केली. काल दशरथ महालाकडं जाताना ‘राम - भरत मिलाप’ अशी काही तरी पाटी बघितली होती. त्या छोट्याशा मंदिरात गेलो. तिथल्या पुजारीबुवांनी एकूणच आमच्याविषयी खूपच ममत्व दाखवलं. आम्ही एक किलो शिधा (किंमत फक्त ५०० रुपये) ठेवावा, असा एकूण त्यांचा आग्रह दिसला. आम्ही प्रत्येकी शंभर रुपये दिले व तिथून सुटका करून घेतली. बाहेर आलो तर ‘६ डी’ शोचा बोर्ड दिसला. तिथं एक मुलगा खाली रस्त्यावरच त्या ‘शो’ची जाहिरात करत होता. आधी डेमो पाहा; मग आवडला तरच तिकीट काढा, म्हणाला. आम्ही ते टेकाड थोडं चढून गेलो. तिथं एका काचेच्या मोठ्या खोलीत काही लोक त्या ‘व्हीआर’ इक्विपमेंटमधून शो पाहत होते. आम्हाला त्याने डेमो दिला. आम्हा तिघांनाही आवडला. मग प्रत्येकी दीडशे रुपयांचे तिकीट काढून आम्ही ‘अयोध्या व दीपोत्सव’ हा दहा-बारा मिनिटांचा शो निवडला. (तिथं वेगवेगळ्या देवस्थानांचे असे शो होते व ते साधारण याच कालावधीचे होते.) शो चांगला होता. थ्री डी इफेक्टमुळे अयोध्येतली वेगवेगळी ठिकाणं नीट बघता आली. हनुमान गढीवरचा हनुमान आम्हाला प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळी दिसला नव्हता, तो इथं नीट दिसला. एकूण मजा आली. हा शो संपल्यावर समोरच असलेल्या राजद्वार मंदिरात गेलो. अयोध्या नरेशांनी सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं आहे. इथं रामाचा दरबार अशा स्थितीत सुंदर मूर्ती आहेत. या मंदिराचा कळस अयोध्येत सर्वांत उंच आहे. तिथं पुजारी म्हणून एक बाई होत्या. त्यांच्या परवानगीने मूर्तींचे फोटो काढले. तिथं थोडा वेळ बसलो. नंतर खाली येऊन त्या राम पथावर पुन्हा जरा भटकंती केली, राहिलेली खरेदी केली. तिथं उडुपी ते मुंबई रेस्टॉरंट होतं. ते आम्ही जातानाच हेरून ठेवलं होतं. मग तिकडंच जेवायला गेलो. रसम भात आणि रवा डोसा घेतला. तो भात भरपूर आला. त्यात माझं व साईचं पोट भरलंच. तिथून आम्ही थेट रिक्षा करून हॉटेलला गेलो. त्याला सांगितलं, की आम्हाला तिथून रेल्वे स्टेशनला सोड. मग हॉटेलला जाऊन बॅगा उचलल्या व थेट स्टेशनला गेलो. आमची ‘वंदे भारत’ साडेतीन वाजता होती. आम्ही दोन वाजताच स्टेशनला पोचलो होतो. मग त्या वरच्या प्रतीक्षालयात जाऊन बसलो. तासभर टाइमपास केला. तिथं माकडं भरपूर येत होती. आमच्याकडं खायचं काही नसल्यानं नंतर ती दूर गेली. साडेतीनला आम्ही खाली फलाटावर आलो. ट्रेन वेळेत आली. आमच्या डब्यात मराठी बोलणारे १५-१६ जण होते. त्यांच्यातल्या एक मावशी आमच्याशेजारीच आल्या. चौकशी केली तर त्यांचं माहेर जामखेडचं निघालं. छोटंसं जग! 
गाडी वेळेत निघाली, पण मधे लटकली. कुठं तरी ट्रॅकला आडव्या जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू होतं म्हणे.  त्यामुळं आमची गाडी एक तास एकाच जागी थांबली. त्यामुळं सव्वासहाला पोचणारी गाडी जवळपास सात वीसला वाराणसी स्टेशनला पोचली. मग तिथून पुन्हा रिक्षा करून हॉटेलला गेलो. साडेआठ वाजले होते. आम्हाला खरेदीसाठी आजचाच दिवस होता. मग लगेच आवरून बाहेर पडलो. काशी विश्वेश्वराच्या रस्त्याने पुढं गेलो. जाताना अदितीनं  (जोगळेकर) सांगितलेला तो ‘सरदारजी पापडवाले’ दिसला. मग तिथं जाऊन पापड आणि मिरचीचं लोणचं (अदितीचीच शिफारस) घेतलं. पुढं बनारसी फॅक्टरी साड्या थेट विकणारं एक छोटेखानी दुकान दिसलं. मग तिथून साड्या व जास्त करून ड्रेस मटेरियलची खरेदी झाली. मला काहीच घ्यायचं नव्हतं. हे होईपर्यंत दहा वाजले होते. मग जरा पुढं गेल्यावर ‘फुलवारी’ नावाचं एक हॉटेल आतल्या बाजूला दिसलं. एका वाड्यातच मधल्या मोकळ्या जागेचा वापर करून केलेलं ते घरगुती हॉेटेल आम्हाला आवडलं. तिथलं जेवणही चांगलं होतं. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला स्टीलची ताटं दिली होती, ते आवडलं. जेवून मग बाहेर आलो. तिथं एक रिक्षावाला दिसला. त्याला आमच्या हॉटेलला यायला तयार केलं. थोड्या वेळात हॉटेलला पोचलो. भरपूर दमलो होतो. लगेच झोप आली.

७ एप्रिल २०२६, वाराणसी/पुणे

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला मृत्युंजयेश्वराच्या मंदिरात जायचं होतं. हे आमच्या हॉटेलपासून चालत जाण्याच्या अंतरावर होतं. मग तिकडं गेलो. एवढ्या सकाळीही त्या मंदिरात बरीच गर्दी होती. ते मंदिरांचं एक संकुलच होतं. मग तिथल्या सर्व महादेवांचं, तिथल्या त्या पवित्र पाण्याच्या कुंडाचं दर्शन घेऊन परतलो. येताना आम्ही पहिल्या दिवशी जिथं हिंग कचौडी खाल्ली होती, तिथं जाऊन साईलाही ती खाऊ घातली. त्यानं आमच्या हॉटेलसमोरची ती बागही बघितली नव्हती. मग येताना त्या बागेतून हॉटेलला आलो. तोवर आमच्या हॉटेलमधल्या ब्रेकफास्टची वेळ झाली होती. ब्रेकफास्ट भरपेट केला. आम्हाला अकरा वाजता हॉटेल सोडायचं होतं. मग मी ‘ओला’वरून कॅब बुक केली. ती दहा मिनिटांत आली. चेक-आउट केलं. जाताना कॅबवाल्यानं वाराणसी कँटोन्मेंट परिसरातून गाडी नेल्यानं तोही परिसर बघता आला. साधारण ५० मिनिटांत आम्ही विमानतळावर पोचलो, तेव्हा बरोबर ११.३० झाले होते. आमचं फ्लाइट १.४५ वाजता होतं. मग विमानतळावर टाइमपास केला. सिक्युरिटीत आमचं मिरचीचं लोणचं अडकलं. केबिन बॅगेत मिरची कुठल्याच फॉर्ममध्ये चालत नाही, हे ज्ञान प्राप्त झालं. (चेक-इन बॅगेत चाललं असतं म्हणे. असो.) नाइलाजानं ती बाटली तिथंच सोडली. आमचं गेट पहिल्या मजल्यावर होतं. तिथं एक सुंदर वॉल डिझाइन होतं. मी व साईनं तिथं फोटो काढून घेतले. आमचं गेट आधी ४ नंबरचं होतं. मग ते ६ नंबरला गेलं. मग आमची पालं उठून तिकडं जाऊन बसली. विमान फक्त पाच मिनिटं लेट होतं. मात्र, बरोबर दोन वाजता आम्ही उड्डाण केलं. पुण्यात पहिल्या झटक्यात परवानगी मिळाली नाही. ‘गो अराउंड’ करायला लागलं. त्यामुळं ‘टच्ड डाउन’ला सव्वाचार वाजले. बाहेर येऊन एअरोमॉलला आलो. कॅब आलीच होती. कॅबवाल्याशी कॅश की डिजिटल पेमेंट यावरून किरकिर झाली आणि आपण पुण्यात येऊन पोचल्याची खात्री पटली. साईच्या घरी आमची गाडी ठेवली होती. स्वत:च्या गाडीत बसलो आणि बरं वाटलं. एसी फुल्ल ऑन करून साडेसहाला सुखरूप घरी येऊन पोचलो. 
वाराणसी व अयोध्या ही भारतातली दोन प्रमुख तीर्थस्थळं बघायची खूप दिवसांपासूनची इच्छा अशी पूर्ण झाली होती. काळभैरवनाथाच्या मंदिरात गळ्यात अचानक पुजाऱ्यानं घातलेला हार, नावेत बसल्यावर गंगेच्या पाण्याला झालेला पहिला स्पर्श, काशी विश्वेश्वराचं आणि अयोध्येत ‘रामलल्ला’चं डोळे भरून झालेलं दर्शन, काशी हिंदू विश्वविद्यालयाची ओझरती का होईना, पण झालेली भेट... अशा काही ठळक आठवणी फेर धरून मन:पटलावर दिसत राहिल्या. प्रत्येक प्रवास तुम्हाला काही तरी देतोच. आपण तिथून आल्यानंतर आधीचे राहत नाही. आपल्या धारणा बदलतात, आपण बदलतो! अधिक उदारमतवादी होतो, अधिक शांत होतो... गोष्टी ‘लेट गो’ करायला शिकतो... गंगा व वाराणसीच्या भेटीनंतर तर मला माझ्यातलं ‘भारतीयत्व’ अधिक फुलून आल्याचं फीलिंग आलं आहे. म्हणजे नक्की काय, ते नाही सांगता येणार... गंगेच्या अखंड वाहत्या दिव्य प्रवाहासारखी ही भावनाही पुढल्या आयुष्यभर मनात प्रवाहित होत राहणार एवढं मात्र नक्की!

(समाप्त)

---

पाँडिचेरी ट्रिपविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


----

10 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग २

ओम नमो गंगायै...
---------------------


४ एप्रिल २०२६, वाराणसी

त्या पायऱ्या उतरून खाली आलो, तर समोर गंगेचं विशाल पात्र. वास्तविक आत्ता एप्रिल महिना असल्यानं हे पाणी कमी होतं. पात्र निम्मं कोरडं होतं. तरीही जी नदी वाहत होती ती पुष्कळ रुंद व मोठीच होती. त्यातून मोठमोठ्या नौका, यॉट सहज ये-जा करत होत्या. त्या गंगादर्शनानं मन संतुष्ट झालं. ‘राम तेरी गंगा मैली हो गयी पापीयों के पाप धोते धोते...’ हे खरं असलं, तरी गंगेचं पावित्र्य व माहात्म्य अबाधित आहे. श्रद्धाळूंसाठी गंगा ही आपले सर्व अपराध पोटात घेणाऱ्या आईसारखी देवी आहे, यात शंका नाही. आम्ही ज्या घाटावर पोचलो, तो शिंदे (सिंधिया) घाट होता. इथं फारशी गर्दी नव्हती. गर्दी असणारे मणिकर्णिका, दशाश्वमेध वगैरे घाट आमच्या उजव्या बाजूला होते. आमच्याकडं वेळ होता. त्यामुळं आत्ताच गंगेतून सैर करावी, असं ठरलं. अभि व शुभम म्हणाले, की इथल्या नावाड्यांशी आम्ही बोलतो. मग त्यांनी त्यांच्या खास ‘यूपी’ भाषेतून नावाड्याशी सौदा ठरवला आणि आम्ही त्या छोट्याशा होडीत बसलो. आम्ही सहा जण होतो. सगळ्यांनी ती लाइफ जॅकेट्स घातली. सीएनजीवर चालणारी ती होडी लगेच उजव्या बाजूला वेगात जाऊ लागली. आम्ही आमच्या उजव्या हाताला वाराणसीचे ते प्रसिद्ध घाट बघू लागलो. काय बघू आणि अन् काय नाही, असं होऊन गेलं. इतके दिवस केवळ माहितीपटांत, सिनेमांत बघितलेले ते भव्य घाट, तिथली जुनी मंदिरं, त्यांचे कळस, सर्वत्र फडफडणारे भगवे झेंडे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या रंगबिरंगी होड्या, घाटांवर लगबगीने धावणारे पुजारी किंवा पंडे, त्यांच्या मागोमाग धावपळ करणारे भाविक, अधूनमधून ऐकू येणारा घंटानाद, दक्षिण भारतीय भाषांपासून ते थेट जपानी, चिनी वा कोरियन भाषांत रंगवलेले फलक, अतिशय मजबूत बांधकाम असणारे व किल्ल्यासारखे भासणारे दरभंगा घाटासारखे अचाट घाट, मणिकर्णिका व हरिश्चंद्र घाटावर सतत जळणारी प्रेतं, त्या आगीच्या लोळांतून डोळ्यांत घुसणारे ‘मृत्यू हेच शाश्वत सत्य’ यासारखे विचार, काशीला गंगेकाठी मरण म्हणजे थेट मोक्ष मानणारी व जुन्या काळी इथं येऊन खरोखरच मृत्यूला कवटाळणारी किती तरी भोळीभाबडी माणसं... सिनेमातली दृश्यं सरकावीत, तशी पुढं जाणाऱ्या होडीबरोबर उजव्या बाजूला ही सगळी दृश्यं काही प्रत्यक्ष, तर काही मन:पटलावर तरळून जात होती. आम्ही गंगेत हात बुडवत होतो, ते पाणी हाताला, डोक्याला, डोळ्यांना लावत होतो. त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शातून आपली सगळी आदिम संस्कृतीच कडकडून भेटायला आली आहे, असं काहीसं वाटून गेलं.
गंगेकाठी एकूण १०४ घाट आहेत. आम्ही त्यातले ५०-६० तरी पाहिले असावेत. अर्थातच नदीतून, धावते असे. बरंच पुढं जाऊन होडीनं यू-टर्न घेतला. दुपारची वेळ असली, तरी सुदैवानं ढगाळ वातावरण होतं. अनेक मोठमोठ्या नौकांतून बरेच भाविक, पर्यटक गंगाविहार करत होते. एखादी होडी जवळून गेली, की ‘हर हर महादेव’, ‘जय भोलेबाबा की’ अशासारखे गजर उठत होते. प्रत्येकाचा चेहरा गंगास्पर्शानं झालेल्या आनंदानं उजळून निघाला होता. आमच्या मित्रांनी नावाड्याला आम्हाला ‘गायघाट’ इथं सोडायला सांगितलं होतं. आम्ही जिथून होडीत बसलो, तिथून पुढं डावीकडं हा घाट होता. त्यामुळं आम्हाला बरीच मोठी चक्कर मिळाली. अखेर आम्ही गायघाट इथं उतरलो. मन आनंदानं भरून गेलं होतं. अनेक वर्षं जी कामना केली होती, ती आज देवाच्या कृपेनं फळाला आली होती. गंगेत घोडं न्हालं एकदाचं!


आता असं ठरलं, की हॉटेलवर जाऊन थोडी विश्रांती घेऊ या आणि दुपारी तीननंतर पुन्हा फिरायला बाहेर पडू या. आम्ही हॉटेलकडं चालत जाताना एके ठिकाणी लस्सी दिसली. आम्हाला भूक लागलीच होती. मग ती मोठा वाडगाभर लस्सी सगळे प्यायलो. अप्रतिम अशी ती लस्सी प्यायल्यावर आमची भूक पूर्ण गेली. आता हेच जेवण असं सगळ्यांनाच वाटून गेलं. तिथून रिक्षा करून हॉटेलवर गेलो. तासभर आराम केला. दुपारी साडेतीन वाजता पुन्हा आमचे मित्र हॉटेलवर आले, मी त्यांना आधीच सांगितलं होतं, की मला बनारस हिंदू विश्वविद्यालय (बीएचयू) बघण्यात अधिक रस आहे. शिवाय तिथंही काशी-विश्वेश्वराचं आणखी एक मंदिर आहे, हे माहिती होतं. तेही बघता आलं असतं. ते बघून पुन्हा गायघाटावर येऊन, गंगेची आरती बघायची असं ठरलं. मग आम्ही सरळ एक कॅब बुक केली. ‘बीएचयू’चं अंतर बरंच, म्हणजे दहा किलोमीटरहून जरा अधिक दाखवत होतं. आम्हाला वाटलं होतं, की आम्ही पाऊण तासात पोचू. मात्र, वाराणसीच्या भयंकर ट्रॅफिकमुळं आम्हाला जवळपास एक ते सव्वा तास लागला. आम्ही तिथं पोचलो, तोवर पाच वाजून गेले होते. जाताना रस्त्यानं रोप-वेचं काम चालू असलेलं दिसलं. इथल्या रेल्वे स्टेशनपासून ते काशी-विश्वनाथ मंदिरापर्यंत हा रोप-वे तयार करण्यात येत आहे. त्यामुळं शहरातल्या वाहतुकीवरचा ताण जरा हलका होईल. आम्ही ‘बीएचयू’च्या प्रवेशद्वारावर पोचलो, तेव्हा दारातच पं. मदनमोहन मालवीय (या विद्यापीठाचे संस्थापक व थोर विद्वान) यांचा पूर्णाकृती पुतळा दिसला. समोर तपकिरी व पिवळसर रंगसंगतीची विद्यापीठाची स्वागत कमान दिसली. त्यावरची ‘काशी हिन्दू विश्वविद्यालय’ हे शब्द व त्याचं लेटरिंग मला फार आवडलं. मला चंद्रमोहन कुलकर्णी यांची आठवण झाली. त्यांनी अशा वैशिष्ट्यपूर्ण लेटरिंगवर, वळणदार अक्षरांवर ‘मटा संवाद’मध्ये एक सदरच लिहिलं होतं, ते आठवणं स्वाभाविक होतं. थोड्या वेळानं आमची कॅब त्या मंदिरासमोर थांबली. इथंही पर्यटकांची भरपूर चहलपहल होती. अर्थात हे मंदिर आधुनिक होतं आणि तुलनेनं गर्दी सुसह्य होती.
आम्ही आत जाऊन शांतपणे ते मंदिर बघितलं. इथं मोबाइल न्यायला परवानगी होती. त्यामुळं भरपूर फोटो काढले. इथल्या महाविद्यालयांच्या इमारतीही देवळाच्या कळसासारख्या आकाराच्या बांधल्या आहेत. हे विद्यापीठ बघण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रा. जयंत नारळीकर. नारळीकरांचे वडील रँग्लर विष्णू नारळीकर या विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळं नारळीकरांचं शालेय जीवन याच विद्यापीठीत व्यतीत झालं. ‘मला लहानपणी मराठीपेक्षा हिंदी चांगली बोलता यायची,’ असं त्यांनी ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात लिहिलं आहे. या चार नगरांतलं एक नगर अर्थातच बनारस होतं. नारळीकरांनी त्या दिवसांचं मोठं मनोज्ञ वर्णन या पुस्तकात केलं आहे. तेव्हापासून मला हे विद्यापीठ पाहायचं होतं. अर्थात ही फारच धावती भेट होती व विद्यापीठाच्या आवारात केवळ मी जाऊन आलो. पण ‘दुधाची तहान ताकावर’ याप्रमाणे मी मनाचं समाधान करून घेतलं.
आता आम्हाला भूक लागली होती. मंदिराच्या बाहेर खाण्याचे स्टॉल होते. तिथं वडापावही मिळत होता. मग आम्ही सगळ्यांनीच तोच घेऊन खाल्ला आणि मग अर्थातच ‘कुल्हड’वाला चहा घेतला. त्यामुळं जरा तरतरी आली. मग पुन्हा कॅब करून ‘गायघाट’ला निघालो. येताना लागलं त्याहून दुप्पट ट्रॅफिक जाताना लागलं. त्यामुळं साडेसातची आरती मिळते की नाही, असं वाटून गेलं. आम्हाला त्या घाटावर पोचायला बराच उशीर झाला. जवळपास सव्वाआठ वाजत आले होते. आम्ही मगाशी इथं येऊन गेलो होतो, त्यामुळे रस्ता माहीत होता. आम्ही पळतच घाटावर निघालो. आमचे मित्र त्यांच्या दुचाकीवरून कधीच घाटावर येऊन बसले होते. आम्ही पायऱ्या उतरत असतानाच मंत्रपुष्पांजली ऐकू आली. मला वाटलं, संपली आरती. आता काही बघायला मिळत नाही. मात्र, आम्ही पोचलो तेव्हा आणखीही मंत्र, आरत्या सुरू झाल्या. त्यामुळं आम्हाला निदान तो भाग तरी बघायला मिळाला. या घाटावर तुलनेनं गर्दी कमी असते. मात्र, नदीतून नौकेत बसून समोरून आरती बघण्याची आमची संधी हुकली. आरती झाल्यावरही आम्ही तिथं जरा रेंगाळलो. तिथं अनेक जण ते दिवे सोडत होते. साई व वृषालीनं आधी तिथून तो एक दिवा विकत घेऊन नदीत सोडला. मग आम्हीही सोडला. गंगेवरून येणाऱ्या वाऱ्यामुळं तिथं बसायला छान वाटत होतं खरं... पण आता आम्हाला भूक पण लागली होती आणि बाजारपेठेत जरा चक्करही मारायची होती. मग तिथून चालत निघालो सगळे. आमच्या मित्रांना आम्हाला प्रसिद्ध काशी चाट भांडारमध्ये न्यायचं होतं. पण तिथं जाईपर्यंत बराच उशीर झाला. मग खरेदीचा मोह टाळून थेट तिकडंच गेलो. जाताना पायाचे तुकडे पडले. काशी-विश्वेश्वराच्या त्या रस्त्यावर फक्त त्या गोल्फ कार्टसारख्या संस्थानच्या गाड्या चालतात. रिक्षांना रात्री १२ नंतरच तिकडून जायला परवानगी आहे. तिथला तो प्रसिद्ध चौक ‘रोप-वे’चं काम सुरू असल्यानं आणखी अरुंद झाला होता.

त्या चाट भांडारच्या दुकानासमोर ही गर्दी होती. आम्हाला वाटलं, की बहुतेक परत जावं लागणार. मात्र, थोड्या वेळात आम्हाला चक्क आत बसायला जागा मिळाली. मग तिथं बसून भरपेट पोटपूजा केली. टमाटर चाट ही तिथली स्पेशालिटी. त्यानंतर आलू टिक्की, फालुदा असं एकेक मागवून हाणलं. भरपूर झालं. आता आम्हाला खरेदीचाही उत्साह नव्हता आणि चालायचाही. मग आमच्या या मित्रांनी चक्क जुगाड करून दोन दुचाकीवाल्यांना पटवलं. ते खरोखर रायडर होते की असेच होते, कुणास ठाऊक. पण त्यांनी आम्हाला चक्क ट्रिपल सीट नेऊन हॉटेलला सोडलं. शंभर रुपयांत फक्त. आम्ही एवढे दमलो होतो, की कसंही करून हॉटेलला पोचायचं होतं. सहज बघितलं तर दिवसभरात आम्ही १५ हजारहून अधिक पावलं चाललो होतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला अयोध्येला जायचं होतं. त्यामुळं आमच्या मित्रांचे आभार मानून, आम्ही त्यांना निरोप दिला आणि रूमवर जाऊन ढाराढूर झोपलो.

रामजन्मभूमीकडे....

५ एप्रिल २०२६, वाराणसी/अयोध्या

सकाळी लवकर उठून आवरलं. ब्रेकफास्ट करून चेकआउट केलं. हॉटेलवाल्याला स्टेशनला सोडायला रिक्षा मागवायला सांगितल्या. इथल्या मुख्य रेल्वे स्टेशनला वाराणसी कँटोन्मेंट असं नाव आहे. आमच्या तिकिटावर लिहिलं होतं, की ‘वंदे भारत’ला फक्त वाराणसी जंक्शन इथूनच बसता येईल. आमच्या मित्रांनी आम्हाला कालच सांगितलं होतं, की इथं त्या स्टेशनला ‘कैंट’ म्हणतात, तर तुम्ही तसंच सांगा. वाराणसी सिटी नावाचंही एक मोठं स्टेशन आहे. आता नवोदित माणसाचा नक्कीच गोंधळ होईल, अशीच ही माहिती होती. अखेर आम्ही स्टेशनची खात्री करून रिक्षात बसलो. दोन्ही रिक्षांनी आम्हाला वीस मिनिटांत स्टेशनवर सोडलं. हे स्टेशन भव्य होतं. आमची ट्रेन सात नंबरच्या फलाटावर लागली होती. मग आम्ही सामान घेऊन ब्रिजवरून तिकडं गेलो. ही गाडी इथूनच सुटत असल्यानं ती फलाटावर उभीच होती. इथून ती मेरठला जाते. साधारण ८०० किलोमीटरच्या अंतरात मध्ये फक्त पाच की सहा स्टेशनं घेते. इथून निघाली, की अडीच तासांनी पहिला स्टॉप अयोध्या धाम हाच होता. गाडी वेळेत निघाली. साधारण ११० किलोमीटर ताशी हा सर्वोच्च वेग तिनं काही वेळा गाठला. मला उत्तर प्रदेशचा बराच मोठा भाग या प्रवासात बघायला मिळाला. सगळा सपाट मैदानी प्रदेश. अनेक ठिकाणी धान्य काढून त्याच्या पेंड्या रचून ठेवल्या होत्या. सगळीकडं कडक उन्हामुळं एक पिवळट-मातकट रंग पसरला होता. ‘वंदे भारत’मध्ये आम्ही एसीत बसलो होतो. बाहेर मात्र रणरणतं ऊन होतं. छोटी छोटी गावं लागली. बाहेर एवढ्या उन्हातही क्रिकेट खेळणारी मुलं... एखाद्या मोठ्या झाडाला पार, त्यावर बसलेले वृद्ध... सगळी घरं विटांची आणि बाहेरून प्लास्टर न करण्याची पद्धत, त्यामुळं त्या विटा अशा उघड्या दिसणाऱ्या... अशीच सगळी एक मजली किंवा जास्तीत जास्त दुमजली घरं. दोन्ही बाजूंनी असाच अफाट व सपाट पसरलेला हा उत्तर प्रदेश! हिंदी हार्टलँड... अनेकदा ‘गायपट्टा’ म्हणून हिणवला जाणारा. मात्र, अगदी पूर्वी ‘स्टार प्लस’वरच्या ‘क्यूं की साँस भी कभी बहू थी’ या आणि अशा अनेक हिंदी मालिकांचा लाखोंच्या संख्येत असलेला ‘कोअर’ प्रेक्षक असलेली ही भूमी. आमच्या प्रवासात जौनपूर हे एकच मोठं शहर लागलं. बाकी छोटी गावं. बऱ्याच गावांची नाव जफराबाद वगैरे मुस्लिम वळणाची. अयोध्येपर्यंतचं १९० किलोमीटरचं अंतर आमच्या ‘वंदे भारत’नं अडीच तासांत कापलं. सकाळी ९.१० ला निघालेली गाडी बरोबर ११.४० वाजता ‘अयोध्या धाम’ असं नव्यानं नामकरण झालेल्या (माझ्या माहितीनुसार आधी या स्टेशनचं नाव फैजाबाद होतं...) त्या भव्य स्थानकात पोचली. गाडीला ठरलेल्या वेळेपेक्षा फक्त सहा मिनिटं उशीर झाला होता.

इथं स्टेशनची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. स्टेशनच्या दोन्ही फलाटांना धरून वरच्या बाजूला पहिल्या मजल्यावर मोठं प्रतीक्षालय व त्यावर मोठा डोम असं बांधलं होतं. आम्ही सरकत्या जिन्यानं वर गेलो. ते भव्य प्रतीक्षालय ओलांडून पलीकडच्या बाजूनं सरकत्या जिन्यानं खाली उतरलो व स्टेशनबाहेर आलो. वृषालीनं कॅब बुक केली होती. सात नंबरच्या गेटपाशी या असं त्यानं सांगितलं. तिकडं गेलो, तर तिथं बऱ्याच कॅब उभ्या होत्या. सुदैवानं आमची कॅब लगेच सापडली. इथून आम्ही बुक केलेलं ‘हॉटेल पंचशील’ सहा किलोमीटरवर होतं.
अयोध्या शहराच्या दिशेनं गाडी निघाली. भगभगत्या उन्हात ते मध्यम आकाराचं गाव अगदीच साधं वाटलं. पूर्वी तर फैजाबाद व अयोध्या ही दोन्ही गावं फारच बकाल होती, असं अनेकांकडून ऐकलं होतं. आता मात्र रस्ते एकदम चांगले दिसले. आमचं हॉटेल हायवेच्या बाजूलाच होतं. तिथं पोचलो तेव्हा फक्त सव्वाबारा वाजले होते. आमचं ‘चेक-इन’ एक वाजता होतं. मात्र, तिथल्या लोकांनी औपचारिकता पूर्ण करून आम्हाला लगेचच खोल्या ताब्यात दिल्या. आम्हाला भूक लागली होती. या हॉटेलच्या प्रांगणात त्यांचंच एक चांगलं गार्डन रेस्टॉरंट होतं. मग तिथं गेलो. हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. अगदी पुण्यात आल्यासारखं वाटलं. जेवण ठीकठाक होतं. पुन्हा अयोध्येत आल्यासारखं वाटलं. नंतर बिल आल्यावर पुन्हा पुण्यात आल्यासारखं वाटलं. असा लंचचा सी-सॉ खेळून झाल्यावर आम्ही तिथूनच बाहेर पडलो. आता श्रीरामजन्मभूमी तीर्थाकडं जाऊन ‘रामलल्ला विराजमान’चं दर्शन घेण्याची अतिशय उत्सुकता होती. आम्ही बाहेर येऊन कॅब बुक करायला लागलो. मात्र, दुपारी दोनच्या त्या रणरणत्या उन्हात एकही कॅबवाला येईना. मग पुन्हा हॉटेलमध्ये येऊन तिथल्या ‘ट्रॅव्हल डेस्क’वर आमच्यासाठी कॅब बुक करायची विनंती केली. त्याने एक हजार रुपये होतील, असं सांगितल्यावर ‘धन्यवाद’ म्हणून पुन्हा बाहेर आलो. आमच्या हॉटेलपासून रामजन्मभूमी तीर्थ सहा-साडेसहा किलोमीटर होतं. त्यामुळं जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे रुपये व्हायला हवे होते. अखेर एक कॅब बुक झाली. तो कॅबवाला चांगला होता. जाताना बरीच माहिती त्यानं दिली. अयोध्येचं बदललेलं रूप जाणवत होतं. उत्तम, रुंद रस्ते, आकर्षक पथदिवे, चित्रांनी सजलेल्या भिंती असं सगळं नवं कोरं होतं. थोड्याच वेळात आम्ही टेढी बाजार नावाच्या चौकात येऊन पोचलो. इथून पुढं कॅब वा रिक्षा जात नाही. इथून पुढं संस्थानच्या गोल्फ कार्टसारख्या गाड्याच आत जातात. तिथून रामजन्मभूमी तीर्थाच्या प्रवेशद्वारापर्यंत २० रुपये तिकीट होतं. आम्ही त्या कार्टमध्ये बसून पाच मिनिटांत त्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. जाताना दोन्ही बाजूंनी विविध दुकानं आणि भाविकांची वाढती गर्दी दिसू लागली. त्या ट्रस्टच्या भव्य कार्यालयाच्या दारात आम्ही उतरलो. ‘जगद्गुरू श्रीरामानन्दाचार्य द्वार’ असं लिहिलेल्या प्रवेशद्वारातून आत गेलो. आम्ही कुठलंही ऑनलाइन बुकिंग केलं नव्हतं. ‘थेट जा, काही प्रॉब्लेम नाही,’ असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. तरी त्या ट्रस्टच्या कार्यालयात ‘स्वागत कक्षा’त जाऊन मी चौकशी करून आलो. तिथं फक्त व्हीलचेअर हवी असेल तर नाव नोंदवायची व्यवस्था आहे. बाकी लॉकर, चपला ठेवायची जागी वगैरे सर्व पुढं आहे, असं सांगण्यात आलं. मग आम्ही बाहेर येऊन रांगेला लागलो. इथं रांगेवर छत बांधलेलं असल्यानं उन्हाचा त्रास नव्हता. स्टीलचे बार उभे करून रांगा केल्या होत्या. त्यामुळं रांग अस्ताव्यस्त होत नव्हती. ही सर्व व्यवस्था अतिशय समाधानकारक होती. रांगेत थोडं पुढं गेल्यावर समोरच राम मंदिराच्या मुख्य कळसाचं व धर्मध्वजाचं दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं. उन्हाचा सगळा ताप गेला. ‘अनुदिनी अनुतापें तापलो रामराया’ ही भावना एकदम नष्ट झाली. अंगात वेगळाच उत्साह संचारला. तिथून साधारण ७०० मीटर अंतरावर आत डाव्या बाजूला बूट-चपला ठेवायची जागा होती. तिथं एका पिशवीत आपापल्या चपला वा बूट ठेवून कुपन घ्यायचं होतं. उन्हामुळं पाय पोळू नयेत म्हणून तिथं कार्पेट टाकण्यात आले होते. त्यामुळं पाय भाजत नव्हते. तिथून मग समोरच्या मोठ्या इमारतीत असलेल्या लॉकरच्या रांगेत उभे राहिलो. इथंही काय आता नेता येतं व काय नेता येत नाही याच्या स्पष्ट सूचना देणारे फलक व्यवस्थित लावले होते. त्यानुसार मोबाइल, स्मार्ट वॉच, कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आत नेता येत नाही. याउलट पैसे, वॉलेट, छोटी पर्स, पारंपरिक घड्याळ, बेल्ट हे सगळं चालत होतं. या इथे मात्र बरीच मोठी रांग होती. सिंगल लाइन करताना आम्हाला बरीच यातायात करावी लागली. लोक ऐकत नव्हते. बेशिस्तीचं दर्शन घडत होतं. अज्ञानामुळं काहींचा वेळ जात होता. मात्र, ही तपश्चर्या पार पाडून आम्ही एकदाचे त्या मुख्य संकुलाकडं निघालो. आता ‘रामलल्ला’चं दर्शन काही मिनिटांतच होणार होतं... ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला तो क्षण असा जवळ येऊन ठेपला होता... १९९२ पासूनच्या सगळ्या घटना डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. त्रेतायुगात १४ वर्षं वनवास सोसाव्या लागलेल्या श्रीरामाला कलियुगात मात्र पाचशे वर्षांचा वनवास सोसावा लागला होता... तो वनवास २२ जानेवारी २०२४ रोजी संपला होता. त्या दिवसापासून इथं येण्याची आस मनात बाळगली होती. त्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ येत चालला होता... डोळे रामाच्या त्या बालकरूपाचं दर्शन घ्यायला आतुर झाले होते...

(क्रमश:)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----



-----------



9 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग १

काशीस जावे, नित्य वदावे...
---------------------------------


३ एप्रिल २०२६, पुणे/वाराणसी


सर्व भारतीयांप्रमाणे आपणही कधी तरी काशीला (म्हणजेच वाराणसी किंवा बनारसला) जावे, गंगा पाहावी, विश्वनाथाचे दर्शन करावे अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मात्र, देवस्थानांबाबत माझा अनुभव असा आहे, की तुमचा योग यावा लागतो. आपण घोकून काहीही होत नाही. त्यामुळं मी शांतपणे या योगाची वाट पाहत राहिलो. पत्रकारितेत येऊन आता मला जवळपास तीन दशकं झाली. भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशचं महत्त्व वेगळं सांगायला नको. गंगा-यमुनेच्या खोऱ्यांत पसरलेला हा विशाल भूभाग म्हणजे खरा भारत, असं अनेक ठिकाणी वाचलं होतं. अनुभवलंही होतं. ‘यूपी नहीं देखा तो क्या इंडिया देखा?’ अशी (जरा आढ्यतेखोर वाटणारी) जाहिरात ‘यूपी टुरिझम’ करतं. अर्थात त्यात तथ्य आहेच. भारताबाहेरच्या अनेक लोकांना भारत म्हणजे ‘ताजमहाल, काशीचे घाट, गंगा, त्रिवेणी संगम’ हेच वाटतं. त्यात महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारत अनेकदा नसतोच. अर्थात ‘गंगा’ म्हणजे भारताची ‌ठ‌ळक ओळख. शिवाय काशी-रामेश्वर या नात्याने दक्षिण भारतीय मंडळीही काशीस येतच असतात. महाराष्ट्राचं आणि काशीचं नातंही फार जुनं. तिथले अनेक घाट अहिल्याबाईंनी, शिंद्यांनी, भोसल्यांनी बांधले. तिथले अनेक धर्मपंडित इकडून तिकडे गेले. तिकडूनही इकडं आले. आपली मुळं, आपला डीएनए एकच आहे, हे वेगळं सांगायचीही गरज नाही. त्यामुळं गंगा पाहणं, दोन की तीन हजार की किती तरी जास्त वर्षांहून अधिक काळ भारतीय संस्कृतीचे साक्षीदार असलेले तिथले ते घाट पाहणं, तब्बल साडेतीन हजार मंदिरं असलेली सर्वांत प्राचीन नगरी वाराणसी तिथल्या त्या तितक्याच प्राचीन गल्ली-बोळांतून फिरून प्रत्यक्ष अनुभवणं हे सगळं ‘बकेट लिस्ट’मध्ये होतं. ‘काशीस जावे नित्य वदावे’ असं आपण म्हणतो. तसं मी जाहीरपणे नाही, पण मनातल्या मनात कितीदा तरी घोकत होतो. आग्रा व ताजमहाल पूर्वीच बघून झाला. त्या अर्थानं उत्तर प्रदेशाला पाय लागले होते. मात्र, वाराणसी, प्रयागराज, लखनौ, कानपूर, अयोध्या, गोरखपूर ही उत्तर प्रदेशातली ‘कोअर’ शहरं पाहिल्याशिवाय आपण खरा भारत पाहिला, असं मला तरी काही वाटत नव्हतं. पत्रकारितेत असताना निदान निवडणुका कव्हर करण्यासाठी तरी या राज्यात जावं, असं अनेकदा वाटलं. मात्र, तोही योग काही आला नाही. अखेर या इच्छेनं तीव्र उचल खाल्ली ती दोन वर्षांपूर्वी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत ‘रामलल्ला’ विराजमान झाले, तेव्हापासून! अयोध्या ही तर गेल्या तीन दशकांतल्या सर्वांत धगधगत्या मुद्द्याची केंद्रबिंदू नगरी होती. मी तो सर्व काळ वृत्तपत्राच्या कार्यालयांतून पाहिला होता. बातम्या केल्या होत्या. अखेर करोडो भारतीयांच्या स्वप्नांची पूर्तता २२ जानेवारी २०२४ रोजी झाली होती आणि बहुतांश भारतीयांत असतं तसं माझ्यातही लपून असलेलं एक ‘भाबडं हिंदू मन’ उचंबळून आलं. रामाला त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास झाला; मात्र कलियुगात तो पाचशेहून अधिक वर्षांचा झाला आणि अखेर त्याला त्याचं न्याय्य ‘घर’ मंदिराच्या रूपानं मिळालं, ही बहुतांश भारतीयांप्रमाणे माझीही भावना होती व आहे. पत्रकार म्हणून अयोध्या पाहण्याची उत्सुकता होतीच; पण त्याहून अधिक ओढ माझ्यातल्या ‘भाबडं हिंदू मन असलेल्या भाविका’ला लागली होती. सुदैवानं मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्या झाल्या पुढच्याच महिन्यात माझ्या आई-वडिलांना अयोध्येला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं आता मी जायला अगदी सज्ज झालो होतो. अर्थात अयोध्येत एवढी कामं सुरू होती, की ती संपूर्ण झाल्यावरच आपण जावं, असंही एक व्यावहारिक मन सांगत होतं. अखेर (वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर) फेब्रुवारीत आमचं अयोध्या व वाराणसीला जायचं ठरलं. आमचे नेहमीचे साथीदार - माझा आत्येभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली - आणि आम्ही दोघं - मी व धनश्री - असं चौघांनी जायचं ठरलं. आमची मुलं येणारी नव्हती. त्यांच्या परीक्षा असणार होत्या. परीक्षा झाल्यावर त्या दोघांना (हवं तिथं!) आम्ही ट्रिपला जाऊ देऊ, या अटीवर मुलांनी आम्हाला सोडलं. अर्थात आता आमची ट्रिप तशी सुटसुटीत झाली. मग फेब्रुवारीच्या मध्यालाच आधी विमानाचं बुकिंग करून टाकलं. (तेव्हा आखाती युद्धाचं काहीही वारं नव्हतं.) आता पुण्याहून वाराणसीला ‘इंडिगो’ची थेट फ्लाइट आहे आणि ती फार सोयीची आहे. दोन तासांत थेट वाराणसीला पोचता येतं. तीन ते सात  एप्रिल अशी पाच दिवस ट्रिप ठरली. आधी अयोध्या व वाराणसीच्या जोडीला प्रयागराजही ठरवत होतो; पण ते वेळापत्रकात बसेना. मग फक्त अयोध्या व वाराणसी करू या, असं ठरवलं.
पंधरा दिवसांपूर्वी साईनाथनं दोन्ही ठिकाणची हॉटेल्स बुक केली. वाराणसीवरून अयोध्येला जाण्यासाठी खासगी कॅब करण्यापेक्षा ‘वंदे भारत’ सोयीची आहे, असं संशोधनाअंती समजलं. मग मी त्या ट्रेनचं जातानाचं व येतानाचं बुकिंग करून टाकलं. युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्या इथल्या विमान प्रवासावर काय परिणाम होतोय, अशी जरा धाकधूक होती. तसं थोडं झालंच. आमच्या जातानाच्या फ्लाइटची वेळ बदलून अलीकडं आली. आधी रात्री ११.४० ला निघणारी ही फ्लाइट दुपारी पावणेपाचला झाली. अर्थात हे सोयीचं झालं. मध्यरात्री वाराणसीला पोचण्यापेक्षा आता आम्ही संध्याकाळ पावणेसातला पोचणार होतो हे बरंच झालं. ठरल्याप्रमाणे तीन तारखेला दुपारी आम्ही निघालो. फ्लाइट वेळेत होती व वेळ‌ेत पोचली. मी डाव्या बाजूला खिडकीशी बसलो होतो. वाराणसीच्या अलीकडं लँडिंगच्या पंधरा मिनिटं आधी एकदम गंगा दिसली. काही हजार फूट उंचीवरूनही आणि काहीशा धुरकट वातावरणातूनही गंगेचं ते विशाल पात्र पाहून मन एकदम रोमांचित झालं. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी उन्मनी अवस्था झाली. मी तरीही पटकन मोबाइल काढून त्या भव्य पात्राचं चित्रीकरण केलं. (हे चित्रीकरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा...) थोड्याच वेळात अगदी वाराणसी शहर व गंगेचे ते घाटही दिसू लागले. विमान वळताना पुन्हा गंगेचं दर्शन घडलं. फारच छान वाटलं. पुढच्या पाच मिनिटांत आमच्या विमानानं वाराणसीच्या विमानतळावर ‘टच्ड डाउन’ केलं.
मी ‘मेकमायट्रिप’वरून आदल्या दिवशी कॅब बुक केली होती. तिथं ‘विवेक दीक्षित’ असं नाव आल्यावर मी हसून म्हटलं, की ड्रायव्हरचं नाव बघा. वेलकम टु यूपी! अर्थात यूपीत पोचल्यावर कळलं, की हे त्या मालकाचं नाव आहे. प्रत्यक्ष ड्रायव्हर कुणी दुसराच होता. त्यातही आधी एका ड्रायव्हरचा फोन आला. त्यानं आमच्याकडं चार बॅगा आहेत म्हटल्यावर ट्रिप कॅन्सल केली. मग बहुतेक दीक्षितजींनी (जे अर्थात मालक होते) हा दुसरा पाठवला होता म्हणे. मला आधी त्याचं नाव शर्मा वाटलं. पण तो ‘राजेश विश्वकर्मा’ निघाला. हा ड्रायव्हर हुशार होता व बहुतेक ड्रायव्हर असतात तसा बडबड्या होता. आमच्या वृषालीला नेहमी चहा हवा असतो. मलाही हवा असतो म्हणा. मग विमानतळावर ‘काशी का स्वाद’ नावाचं एक छोटेखानी रेस्टॉरंट दिसलं. तिथं गेल्यावर चहा १०० रुपये म्हटल्यावर आम्ही बाहेरच आलो. ड्रायव्हर राजेशला आमची फजिती सांगितल्यावर तो हसला आणि रस्त्यात थांबून आपण चहा घेऊ म्हणाला. वाराणसीचा हा ‘लाल बहादुर शास्त्री अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा’ तसा पुण्याच्या विमानतळापेक्षाही लहान होता. मात्र, टुमदार होता. तिथं प्रांगणातच शास्त्रीजींचा ब्राँझचा भव्य पुतळा आणि तिरंगा आहे. आम्ही त्याच पुतळ्याच्या खाणाखुणा सांगत कॅबपर्यंत पोचलो होतो. हा विमानतळ बाबतपूर नावाच्या गावात आहे. तो वाराणसीपासून जवळपास ३० किलोमीटर दूर आहे. त्यामुळं मधे थांबून चहा घेणं आवश्यकच होतं. मग विमानतळाबाहेर पडल्या पडल्या लगेच डाव्या हाताला काही टपरीवजा छोटी हॉटेलं लागली, तिथं आमच्या ड्रायव्हरनं कार थांबविली. संध्याकाळचे सात-सव्वासात झाले होते. मात्र, या दिवसांत आपल्याकडं जसा उजेड असतो, तसं तिकडं नसतो. वाराणसी पुण्यापासून ईशान्येला जवळपास १३०० किलोमीटरवर आहे. त्यामुळं त्या संधीप्रकाशापेक्षाही जरा अंधारच पडलेल्या वेळेला आम्ही ‘कुल्हड’मधून झकास चहा घेतला. राजेशभाईला पण दिला. मग त्यानं तिथून आमची कॅब भरधाव शहराच्या दिशेनं सोडली. थोड्याच वेळात आम्हाला एक फ्लायओव्हर लागला. उजवीकडं लखनौ (२८१ किलोमीटर) व डावीकडं वाराणसी (२२ किलोमीटर) होतं. तो फ्लायओव्हर बराच मोठा होता. वाराणसीत मी यापूर्वी कधी आलो नव्हतो. त्यामुळ‌ं आधी इथं कसा रस्ता होता, हे मला ठाऊक नव्हतं. मात्र, ड्रायव्हरच्या मते ही सगळी सुधारणा आत्ताची, गेल्या दहा वर्षांतली आहे. त्या भल्या मोठ्या फ्लायओव्हरवरून दीर्घकाळ प्रवास केल्यावर आम्ही वाराणसी शहरात प्रवेश केला. तिथंही नवं शहर व जुनं शहर असे दोन भाग आहेतच. आमचं ‘आनंद काशी’ हे हॉटेल काशी विश्वनाथ मंदिरापासून जेमतेम दोन किलोमीटरवर, अर्थात जुन्या शहराच्या मध्यभागी होतं. त्यामुळं कॅब जसजशी जुन्या शहराकडं जाऊ लागली, तसतसं ट्रॅफिक वाढलं. अरुंद रस्ते, भरपूर वाहनं आणि कर्कश्श वाजणारे हॉर्न हे उत्तर भारतातल्या बऱ्याच शहरांत दिसणारं दृश्य तिथंही दिसू लागलं. राजेशभाई म्हणाले, ‘यहाँ ऐसाही होता है!’ आम्ही ‘बरं’ म्हटलं. दुसरं काय म्हणणार होतो? त्या ट्रॅफिकपुढं मला पुण्यातलं ट्रॅफिक फारच शिस्तबद्ध व कमी हॉर्न वाजवणारं वाटायला लागलं. अखेर जवळपास दीड तासानं, म्हणजे साडेआठच्या सुमारास आम्ही त्या हॉटेलमध्ये पोचलो. ते हॉटेल अगदीच जुन्या भागात वसलं होतं. आत जायला एक रॅम्प होता. तिथून कार वर गेली ती थेट रिसेप्शनच्या लॉबीतच जाऊन उभी राहिली. तिथले कर्मचारी लगेच सामान उतरवून घ्यायला तत्परतेनं धावले. पाच मिनिटांत सर्व सोपस्कार करून आम्ही खोल्या ताब्यात घेतल्या. सुदैवानं त्या तळमजल्यावरच होत्या. आम्ही अजिबात फारसे दमलेले नव्हतो. त्यामुळं लगेच आवरून बाहेर पडावं आणि काळभैरवनाथाचं दर्शन घ्यावं असं ठरलं. माझा मेव्हणा हर्षद नेहमी काशीला सहली घेऊन जातो. त्यानं सांगितलं होतं, की हा काळभैरवनाथ म्हणजे काशीचा कोतवाल आहे. त्याचं आधी दर्शन घ्यायचं व मगच ‘काशी विश्वनाथा’ला जायचं. आमच्या हातात वेळ होता व ते मंदिरही तिथून जवळच होतं, म्हणून मग आम्ही तिकडं निघालो.
आम्ही पाच मिनिटांत तिथं पोचलो. तिथं सरळ जाणारा मार्ग बंद केला होता आणि तिथं उभे असणारे पोलिस दुसरीकडून जा, असं सांगत होते. मग आम्ही त्या चौकातच एका दुकानात चपला काढल्या आणि चालत त्या रस्त्याने निघालो. रस्ते म्हणजे सगळे गल्ली-बोळच होते. काशीचा हा अगदी जुना भाग होता. अगदी लागून लागून असलेली घरं, मधून जाणारा बोळवजा रस्ता, तिथं दुचाकी गाड्यांची बेशिस्त ये-जा, जोरजोरात हॉर्न वाजवणं, स्थानिक विरुद्ध पर्यटक यांच्यातली वादावादी, मधेच गोमातांची ये-जा हे सगळं बघून आम्ही तर भेदरूनच गेलो. तरीही आम्ही त्या लाइनीचं शेवटचं टोक शोधलं व तिथं उभे राहिलो. सुमारे दीड तास त्या रांगेत अशक्य असा वैताग सहन केल्यावर आम्हाला ते काळभैरवनाथ मंदिर दिसलं. मला एकदम लक्षात आलं, की आज गुड फ्रायडे, उद्या शनिवार, रविवार. म्हणजे लाँग वीकएंड... त्यामुळंच तिथं एवढी प्रचंड गर्दी झाली होती. त्यात आमच्यासारखे बाहेरच्या राज्यातून आलेले पर्यटक तर होतेच; पण उत्तर प्रदेशच्या अन्य भागांतून एक किंवा दोन दिवसांसाठी काशी दर्शनाला आलेलेही कित्येक लोक होते. आमची वेळ चुकली होती. अर्थात एवढ्या तपश्चर्येनंतर काळभैरवनाथाचं मनोभावे दर्शन झालं. मी जरा वाकून नमस्कार करत होतो तोवर तिथल्या पुजाऱ्याने तिथं पडलेला एक गुलाबाचा हार माझ्या गळ्यात घातला. शिवाय आणखी एक तुळशीचा हारही दिला. मला खूप आनंद झाला. एवढा वेळ रांगेत थांबल्याचं चीज झालं असं वाटलं. जणू हा प्रसादच! मग बाहेर येऊन मी तो तुळशीचा हार धनश्रीच्या गळ्यात घातला व आमचा फोटो काढून घेतला. नंतर तेच हार साई व वृषालीला दिले आणि त्यांचेही फोटो काढले. आमच्या चपला ठेवल्या होत्या ते दुकानदार दुकान बंद करून गेले होते. दुकानाच्या पायऱ्यांशी आमच्या व इतरही भाविकांच्या चपला तशाच लोळत पडल्या होत्या. त्या घेतल्या आणि निघालो. आता जवळपास दहा वाजून गेले होते. भूक लागली होती. त्याच गल्लीत एक ‘अन्नपूर्णा कॅफे’ नावाचं छोटेखानी हॉटेल दिसलं. तिथं आत बेसमेंटमध्ये काही पर्यटक जेवताना दिसले. मग आम्हीही तिथं गेलो. नंतर लक्षात आलं, की एक बाई, तिचा नवरा व त्यांचा अगदी पाच-सहा वर्षांचा छोटा मुलगा मिळून ते हॉटेल चालवत आहेत. बाकी स्टाफ कुणीच नव्हता. त्या बाई अगदी साध्या होत्या. त्या कुणालाच नाही म्हणत नव्हत्या. सगळ्यांच्या ऑर्डर घेत होत्या. आम्ही ऑर्डर दिल्यावर आमच्या हे लक्षात आलं. पण आता पर्याय नव्हता. वरच्या बाजूला किचन होतं. तिथून कधी त्या, तर कधी नवरा त्या डिशेस खाली घेऊन येत होते. तो लहान मुलगाही बिचारा सतत धावपळ करत होता. आम्हाला तिथून उठून जावंसंही वाटेना. ती फॅमिली गरजू वाटत होती. मग आम्ही प्रचंड भूक लागली असूनही संयमाने आमची डिश येण्याची वाट पाहिली. ती ठीकठाक होती; पण अत्यंत भूक लागल्यानं तीही गोडच मानून घेतली. तिथून निघून चालत परत हॉटेलवर आलो. 

४ एप्रिल २०२६, वाराणसी

दुसऱ्या दिवशी आता मुख्य सोहळा म्हणजे काशी-विश्वनाथाचं आणि अर्थात गंगेचं दर्शन. सकाळी उठल्यावर शॉवरमधून आलेल्या गंगेत स्नान केलं. आम्ही लवकर उठलो होतो. आमच्या हॉटेलच्या बरोबर समोर एक पार्क होतं. मग धनश्री व मी तिथं चक्कर मारायला गेलो. पार्क छोटेखानी होतं, पण चांगलं होतं. मधोमध एक तळं होतं. त्यात कारंजं होतं. आजूबाजूला ‘नगर निगम, वाराणसी’नं छोटेखानी जिम, जॉगिंग ट्रॅक वगैरे सोयी केल्या होत्या. तिथं भरपूर लोक सकाळी चालायला आले होते. आम्ही पार्कच्या दुसऱ्या बाजूला गेलो, तेव्हा त्या पार्कचं नाव ‘भारतेंदू हरिश्चंद्र पार्क’ असं आहे, हे दिसलं. हे हिंदी साहित्यातलं व रंगभूमीवरचं मोठं नाव. त्यांना आधुनिक हिंदी साहित्य व रंगभूमीचे जनक मानलं जातं. (सन १८५० मध्ये जन्मलेल्या हरिश्चंद्रांना अवघं ३४ वर्षांचं आयुष्य लाभलं. मला आपल्या राम गणेश गडकऱ्यांची आठवण झाली.) तिथं त्यांचा पूर्णाकृती पुतळाही होता. मग आम्ही पार्कच्या दुसऱ्या बाजूने काशी विश्वनाथाकडं जाणाऱ्या चौकाकडं आलो. तिथं रस्ते बंद केलेले दिसले, तेव्हा कळलं, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काशी विश्वनाथाच्या दर्शनाला येत आहेत. थोड्याच वेळात त्यांचा ताफा तिथून गेला. मग रस्ते मोकळे झाले. त्या चौकात शास्त्रीजींचा पांढरट अर्धपुतळा होता. त्याची इतकी दुरवस्था झाली होती, की विचारू नका. खरं तर हे शास्त्रीजींचं गाव. इथं विमानतळाला त्यांचं नाव आहे आणि तिथं व इतरत्रही त्यांचे अनेक पुतळे आहेत. पण या चौकातल्या पुतळ्याकडं काही कुणाचं लक्ष नव्हतं. असो.

तिथंच कोपऱ्यात अनेक स्टॉल होते. तिथं ‘मामा की हिंग कचौडी’ असा एक स्टॉल दिसला. मग आम्ही एक कचौडी घेतली. मटार उसळीसारख्या हिंग घातलेल्या खमंग सरसरीत मिश्रणात ती कचौडी कुस्करून देत होते. एका कचौडीनं मन तृप्त झालं. मग शेजारीच ‘कुल्हड’मधला चहा घेतला. परत पार्कमधून चालत हॉटेलवर आलो. आमच्या हॉटेलमध्ये आमचा ब्रेकफास्ट होता. तो इतर सर्व हॉटेलमध्ये असतो तसाच होता. त्यात इडलीपासून पराठ्यापर्यंत आणि वेगवेगळ्या फळांपासून ते चहा-कॉफीपर्यंत सगळं काही होतं. मग रीतीप्रमाणं तो ब्रेकफास्ट केला. इथं आम्हाला आमचे दोन स्थानिक मित्र भेटणार होते. अभि व शुभम अशी त्यांची नावं. ते थोड्याच वेळात आमच्या हॉटेलवर आले. ते इथलेच राहणारे होते. त्यामुळं पुढचा सर्व दिवस त्यांच्याबरोबरच आम्ही फिरणार होतो. मग आम्ही लगेच चालत चालत काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. त्या मगाच्या चौकापासून पुढं ऑटो रिक्षा किंवा मोठ्या वाहनांना परवानगी नाही. ट्रस्टच्या गोल्फ कार्टसारख्या गाड्या येतात. मात्र, त्यांची वाट न पाहता आम्ही सकाळच्या वेळेत तिकडं चालत निघालो. शनिवारचा दिवस होता. त्यामुळं रस्त्यावर भाविकांची भरपूर गर्दी होतीच. बरंच चालल्यावर आम्ही गेट नं. ४ ला पोचलो. इथं शिवमच्या ओळखीच्या एका पोलिस अधिकाऱ्यामुळं आम्हाला पास मिळाला होता. त्यांनी एका कॉन्स्टेबलचा नंबर दिला होता. मग त्याने आम्हाला फोन करून एका ठिकाणी बोलावलं, तिथं आमच्यासारख्या ‘प्रोटोकॉल’च्या पाहुण्यांची बरीच गर्दी होती. अर्थात मुख्य रांग एवढी मोठी होती, की आमची ही गर्दी असली तरी तुलनेनं लवकर आत प्रवेश मिळणार होता. मग त्या कॉन्स्टेबलनं आम्हाला आमचे मोबाइल, बॅगा वगैरे सगळं समोरच्या दुकानांत उपलब्ध लॉकरमध्ये ठेवायला सांगितलं. फक्त एक मोबाइल घेऊन आम्ही आत गेलो. तिथं पुन्हा एका ठिकाणी सगळ्यांची नावं नोंदवून घेत होते. मग जो एक मोबाइल होता, तोही तिथल्या पोलिस लॉकरमध्ये ठेवावा लागला. आतला परिसर भव्य आहे. अगदी समोरच ती ग्यानव्यापी मशीद दिसली. तिला काटेरी कुंपणांनी बंदिस्त केलं आहे. त्याच्या बाजूला सगळा कॉरिडॉर व मंदिर परिसर आहे. हा सगळा अलीकडच्या काळात विकसित झालेला भाग आहे आणि आधी असं नव्हतं. काशी विश्वनाथाच्या मंदिराविषयी माझा जो समज होता, तसं तिथं काही आढळलं नाही. मला वाटत होतं, आपल्याकडच्या पंढरपूर किंवा अंबाबाईच्या देवळासारखं जुनं, पाषाणांचे खांब असलेलं देऊळ असेल. मात्र, तसं काही नव्हतं. आत त्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी एक अगदी छोटंसं मंदिर होतं. त्याचा कळसही जेमतेम पंधरा फूट वगैरे असेल. या जागेत भारतीयाचं सर्वांत महत्त्वाचं श्रद्धास्थान, मोक्षाचं द्वार वास करून होतं. मला त्या वातावरणात फारच भरून आलं. आतल्या संगमरवरी फरशांवरून आम्ही भराभर पुढं चालत होतो. शुभमनं आम्हाला थेट त्या मंदिराच्या आत नेलं. आम्ही आत गेल्यावर पोलिसानं ते दार लावून घेतलं. आम्ही नशीबवान ठरलो. मग अगदी थोड्या वेळात काशी विश्वनाथाच्या शिवलिंगाचं दर्शन झालं. हे शिवलिंग जरा खाली आहे. त्यामुळं सतत ‘नीचे देखो, नीचे देखो’चे घोष ऐकू येत होते. रांगेचा रेटा पुष्कळ होता, तरीही आम्हाला बरंचसं चांगलं दर्शन झालं, असं म्हणता येईल. तिथून बाहेर आल्यावर मग आम्ही त्या आवारातल्या इतर मंदिरांचं दर्शन घेतलं. शेजारी एका ओवरीसारख्या जागेत जरा वेळ बसलो, तिथं एका देवासमोर पुजारी तांदूळ देत होते. ते जवळ ठेवायचे आणि घरच्या धान्यात टाकायचे म्हणे. काशीचे प्रसिद्ध पंडे किंवा तत्सम मंडळींचा मला तरी तिथं कुठेही मागमूस दिसला नाही किंवा त्यांचा काही त्रासही झाला नाही.
आम्ही अगदी लवकरच दर्शन घेऊन बाहेर आलो. आमच्या स्थानिक मित्रांमुळं हे शक्य झालं होतं. आता त्यांनी आम्हाला जुन्या काशीतली सगळी मंदिरं दाखवायचा चंग बांधला. आम्ही आपले त्यांच्या मागोमाग ते गल्लीबोळ फिरू लागलो. असं म्हणतात, की भारतात जितकी प्रसिद्ध शिवालयं आहेत त्यांची एक ब्रँच (काशी खण्ड) वाराणसीत आहेच. पशुपतेश्वराचं मंदिर तर लगेचच दिसलं. एक राधा-रमण मंदिर होतं. तिथं आता वाड्यासारखा भाग होता. आत कुणीच नव्हतं. आम्ही जरा तिथं टेकलो. मग पुन्हा भटकंती सुरू. पिता महेश्वर, सर्व ग्रहांची नावं असलेलं एक संकुल (बुधेश्वर, शुक्रेश्वर वगैरे), पन्नास फूट खोलवर असलेला महादेव अशी अनेक मंदिरं बघत बघत आम्ही आणखी एका मंदिर संकुलात गेलो. तिथून मधल्या रस्त्यानं पुढं गेलो तर तो रस्ता एका घाटावर जात होता. दोन पायऱ्या वर चढून आलो तर समोर एकदम गंगामाई! अहाहा... काल काही हजार फूट उंचावरून पहिल्यांदा गंगेचं दर्शन झालं होतं आणि इथं आता मी तिच्यापासून काही फूट अंतरावर उभा होतो. कुठल्याशा अनामिक आकर्षणानं, ओढीनं, भक्तिभावानं भरलेल्या मनानं मी त्या घाटाच्या पायऱ्या उतरू लागलो... काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं होतं आणि आता गंगामाई बोलावत होती...

(क्रमश:)



-----

(वाराणसी व अयोध्या यात्रेचे आणखी फोटो व रील्स पाहण्यासाठी फेसबुक व इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.)

----

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


--------