11 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग ३

राम का गुणगान करिए...
------------------------------

५ एप्रिल २०२६, अयोध्या

आम्ही त्या मुख्य संकुलातून आत गेलो. आता मुख्य राम मंदिर अगदी समोर होतं. ते भव्य मंदिर आणि तिथलं अतिशय सुंदर प्रांगण बघून आनंद झाला. आमची रांग हळूहळू पुढं सरकत होती. पहिल्या पायरीला बहुतेक भाविक वाकून नमस्कार करत होते. मीही केला. एकेक पायरी चढताना आता मंदिराचं सर्व काम नीट दिसू लागलं. तिथले खांब, त्यावरचं कोरीव काम, विटकरी रंगाच्या त्या भिंती कमालीच्या सुंदर दिसत होत्या. एकेक पायरी चढून आम्ही मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश केला, तेव्हा साधारण दोन्ही बाजूंनी चार-चार अशा आठ रांगा होत्या. स्टीलचे बार लावून रांग तयार  केली असल्याने एका वेळी एकच माणूस त्या रांगेत उभा राहू शकत होता. त्यामुळे रांग सुटसुटीत झाली होती व भराभर शिरत होती. जसजसे आम्ही मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने जाऊ लागलो, तसतसा सर्व रांगांतून रामनामाचा मोठमोठ्यांदा गजर होऊ लागला. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी तो परिसर दुमदुमून गेला. अगदी काही क्षणांतच आम्ही ‘रामलल्ला’च्या त्या भव्य मूर्तीसमोर होतो. २२ जानेवारी २०२४ रोजी टीव्हीवर पाहिलेली ती सावळ्यासुंदर बाल श्रीरामाची गोड मूर्ती आता अगदी समोर होती. मनोभावे दर्शन घेतलं. तिथं दोन महिला पोलिस उभ्या होत्या. त्या भाविकांना पुढं ढकलत होत्या. अर्थात रांग मागे बरीच होती. त्यामुळं आम्हीही केवळ क्षण-दोन क्षण समोर उभं राहून दर्शन घेतलं व पुढं सरकलो. जरा पुढं केल्यावर पुन्हा थोडं मागे येऊन परत एकदा डोळे भरून दर्शन घेतलं. तिथंही गर्दी व्हायला लागली तसं आणखी पोलिस आले आणि त्यांनी आम्हाला तिथून बाहेर जायला सांगितलं. एका मिनिटात आम्ही बाहेर होतो. पलीकडच्या बाजूने एक व्हीआयपी एंट्री असावी. शिवाय वरच्या मजल्यावर जाण्याचा रस्ताही तिथूनच होता. वर ‘राम दरबार’ होता, मात्र तिकडं काही आम्हाला जाता आलंच नाही. आम्ही बाहेर पडलो, ते थेट त्या संकुलातूनच बाहेर जाणाऱ्या रस्त्याने. तिथं एक जटायू प्रतिमा असं लिहिलेला बोर्ड होता. मात्र, ते काम पूर्ण व्हायचं असावं. अर्थात मंदिराचं काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला येत्या ३० एप्रिलपर्यंत सगळं काम संपवून बाहेर पडायला सांगितलं आहे, हे मी वाचलं होतं. मात्र, तरीही विस्तारासाठी बराच वाव ठेवल्याचं दिसलं. बाहेर पडल्यावर एक पाणपोई होती. तिथं बहुतेक जण पाणी प्यायला थांबले होते. उन्हामुळं तहान लागलीच होती. मीही तिथं जाऊन पाणी पिऊन आलो. इथून बाहेर जाण्याचा मार्गही वरून छत असलेला होता. त्यामुळं थेट उन्हाचा त्रास नव्हता. पुढे गेल्यावर डावीकडं लगेच स्वच्छतागृहही होतं. एकूण भाविकांच्या सोयीचा बराच विचार केलेला जाणवत होता. आम्ही पुढं जाऊन एका मोठ्या इमारतीत आलो. तिथंही बऱ्याच खुर्च्या होत्या. विमानतळावर किंवा रेल्वे स्थानकावर प्रतीक्षालय असतं, तसा तो हॉल होता. तिथं बरेच भाविक विश्रांती घेत होते. आम्ही फार दमलो नव्हतो. त्यामुळं लगेच लॉकरकडे गेलो. मगाशी समोरून वस्तू आत दिल्या होत्या, आता त्याच ठिकाणी मागील बाजूला असलेल्या खिडकीतून त्या परत घ्यायची सोय केली होती. हे फार चांगलं केलं होतं. वस्तू घेताना फार गर्दी नव्हती. त्यामुळं आमच्या वस्तू लगेच परत मिळाल्या. मग पुढं जाऊन चपलाही ताब्यात घेतल्या. तिथं एक मंडप टाकून सावलीची सोय केली होती. समोरच ‘सीता की रसोई भण्डार’ दिसलं. मग तिथं रांगेत उभं राहून द्रोणात गरमागरम खिचडी व ‘फ्रुटी’सारख्या पॅकिंगमधला ‘ओआरएस’चा पॅक घेतला. तो प्रसाद त्या मंडपात उभे राहूनच आम्ही खाल्ला. आपले लोक ते द्रोण तिथंच फेकत होते. वास्तविक तिथं प्लास्टिकची कचराकुंडी ठेवलेली होती. मात्र, लोक त्या कुंडीच्या खाली द्रोण फेकत होते. दोन बायका सतत ते झाडून तोच कचरा त्या कुंडीत टाकत होत्या. फार वाईट वाटलं ते दृश्य बघून. आपल्या लोकांना स्वच्छतेची ही बेसिक सवय कधी लागणार, राम जाणे!
तिथून बाहेर पडल्यावर लगेचच काही दुकानं होती. तिथं मग रामाचे धागे, फ्रिज मॅग्नेट, काही खाऊ अशी खरेदी केली. तिथं ‘बेंगलोर कॅफे’ दिसलं. मग वरच्या मजल्यावर जाऊन कोल्ड कॉफी घेतली. बरं वाटलं. आता आम्हाला हनुमान गढीला जायचं होतं. चालतच तिथपर्यंत गेलो. राम पथावर डाव्या बाजूला वळून छोट्या गल्लीतून आत जायचं होतं. रस्त्यावरूनच ती ‘गढी’ दिसत होती. इथं थोडं चढून जायचं होतं. खालपासूनच रांगेत गर्दी दिसत होती. आम्ही चपला खालीच एका दुकानदाराकडं काढल्या. वर जाऊ लागलो तसतशी गर्दी वाढू लागली. इथं राम मंदिराच्या अगदी उलट स्थिती होती. आत एक-दोन पोलिस होते; मात्र गर्दी त्यांच्याही नियंत्रणात नव्हती. अत्यंत रेटारेटीत कसंबसं बाजूनंच दर्शन घेऊन त्या रांगेतून बाहेर पडलो. पुन्हा प्रदक्षिणा मारून समोर आलो, तर तिकडं हनुमानाचं मुख आहे, हे कळलं. मग तिथूनच फोटो काढले व खाली उतरलो. मगाशी राम मंदिरात दर्शनाचा आलेला सुखद अनुभव आणि इथं हनुमान गढीला आलेला हा गर्दीचा अनुभव, अगदीच वेगळे होते.

खाली उतरून आता आम्हाला लता मंगेशकर चौकात जायचं होतं. मग मुख्य रस्त्यावर येऊन त्या गोल्फ कार्टमध्ये बसून आम्ही त्या भव्य वीणा असलेल्या चौकात गेलो. तिथं अपेक्षेप्रमाणे बरीच गर्दी होती. सगळ्यांना त्या वीणेबरोबर फोटो काढायचे होते. आम्हीही अर्थात काढले. (एक जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या चौकात कुठेही लता मंगेशकरांच्या नावाचा फलक नव्हता. तो अयोध्येत इतरत्र एकदा दिसला. मात्र, त्या चौकात नव्हता.) तिथं उजव्या बाजूला रामकथा पार्क आणि डाव्या बाजूला राम की पैडी (पैडी की पौडी? पण तिकडं सगळीकडं ‘पैडी’ असंच लिहिलेलं होतं.) होती. रामकथा पार्क बंदच आहे, असं कळलं. तिथंच अलीकडं कोरियन राणी हो हिचं स्मारक दिसलं. तेही बांधकाम अपूर्ण होतं. मग आम्ही पुन्हा त्या ‘पैडी’कडं आलो. तिथं पाण्याच्या दोन्ही बाजूला चांगलं घाटासारखं बांधकाम केलं होतं. पाणी अगदीच घोटाभर होतं. त्यातून लोक इकडून तिकडं चालत जात होते. तिथं सुरुवातीलाच एक पाणीपुरी विकणारा मुलगा होता. मग आम्ही तिथं पाणीपुरी खाल्ली. शेजारी एक स्पेशल चहा देणारं दुकान होतं. त्या दुकानदारानं गुलाब पाकळ्या टाकून उकळलेला फर्मास चहा आम्हाला दिला. मजा आली. पुढं त्या भागाच्या दुसऱ्या टोकापर्यंत आम्ही चालत गेलो. तिथं एक लेसर शो होता. त्याआधी आम्ही पुढं शरयूच्या घाटावर गेलो. तिथं आरती सुरू होती. गर्दीही भरपूर होती. इथल्या नदीत खाली उतरायला नीट सोय नव्हती. मातीचा निसरडा उतार होता. त्यामुळं आम्ही खाली न जाता वरूनच तो सोहळा पाहिला. परत आलो, तर तो लेसर शो सुरू झाला होता. हरीश भिमानींच्या आवाजातलं निवेदन होतं. पाण्यापलीकडं असलेल्या इमारतींवर प्रकाशझोत टाकून हा शो दाखवला जात होता. मात्र, त्याचे स्पीकर लोक जिथं बसले होते, त्याच्यामागे होते. त्यामुळं नीट ऐकू येत नव्हतं. याशिवाय त्या परिसरात इतरत्र लाउडस्पीकर सुरू होते. ते आवाज मिक्स होत होते. त्यामुळं शो चांगला असूनही आम्हाला जरा बोअर झाला. मग आम्ही तिथून उठून आलो. पुन्हा ती चार सीटर ई-रिक्षा करून हनुमान गढीच्या बाजूला आलो. या रिक्षावाल्यांना बहुतेक त्या राम पथावरून जाण्याची परवानगी नाही. मग त्यानं समोरच्या लखलखत्या धर्म पथावरून एका बोळात रिक्षा घातली. बरंच फिरवून फिरवून त्यानं आम्हाला त्या राम पथाच्या बाजूच्या गल्लीत सोडलं. जाताना जुन्या अयोध्या गावाचं दर्शन घडलं. हे गाव इतर चार गावांसारखंच साधं होतं. 
आता आम्हाला दशरथ महाल, कनक भवन बघायला जायचं होतं. पुन्हा हनुमान गढीच्या बाजूनं पुढं गेलो. तिथंच तो दशरथ महाल होता. बाहेरचा दर्शनी भाग भव्य होता व तिथं बरीच लायटिंगही केलेली होती. आतमध्ये बरीच मोकळी जागा होती व पुढं मंदिर होतं. इथं त्या मूर्तींपुढं प्रत्यक्ष कीर्तनासारखं भजन वगैरे सुरू होतं. भाविकांची गर्दीही बरीच होती. तिथं थोडा वेळ थांबून मग चालतच शेजारच्या कनक भवनात गेलो. ही वास्तू म्हणे कैकेयीने सीतेला भेट दिली होती. इथंही साधारण तसंच चित्र होतं. त्या इमारतीचा दर्शनी भाग भव्य होता. शेजारी एक महादेवाचं देऊळ होतं. आत गेल्यावर मोकळी जागा व पुढं मंदिर. त्या वेळी नेमका त्या मूर्तींसमोर पडदा ओढला होता. हा ‘शयन समय’ एक तास होता असं कळलं. त्यानंतरच मूर्ती दिसणार होत्या. आम्हाला तेवढा वेळ नव्हता. बाहेर पडलो. त्या मोकळ्या जागेत एक छोटी देवळी होती. तिथं ‘भरताच्या पादुका’ होत्या असं समजलं. इथं जे दिसेल त्याला आणि चार लोक करतील त्याला नमस्कार करणे हे धोरण मी ठेवलं होतं. त्यानुसार तिथंही त्या पादुकांवर डोकं टेकवून आलो. इथं भिंतींवर बऱ्याच ठिकाणी ‘सीताराम’ अशी अक्षरं कोरली होती आणि बरेच भाविक ती अक्षरं येता-जाता गिरवत होते. विशेषत: महिला! यामागचं लॉजिक काही कळलं नाही. सीतेचं नाव रामाआधी घेतलं जातं, यासंबंधीची एक लोककथा पूर्वी ऐकली होती. आता आठवत नाही. त्याचा काही संदर्भ असू शकेल.
इथून निघालो. आता बराच उशीर झाला होता. आमच्या हॉटेलच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आमचं ठरलं होतं. मग रिक्षा करून हॉटेलवर गेलो. तिथं रेस्टॉरंटला भरपूर गर्दी होती. गार्डन रेस्टॉरंटला फारसं कुणी बसलं नव्हते. तिथले दिवेही सुरू नव्हते. बाहेर भरपूर डास होते. त्यामुळं लोक बाहेर का बसले नसावेत, ते कळलंच. आम्हीही मग आत बसूनच जेवलो. रूमवर येऊन झोपलो. मात्र, ‘रामलल्ला’चं सुखद दर्शन झाल्यामुळं मन अगदी तृप्त होतं!

६ एप्रिल २०२६, अयोध्या/वाराणसी

आज आमच्यापैकी वृषाली काही कामानिमित्त इथूनच इंदूरला व तिथून पुण्याला परत जाणार होती. ब्रेकफास्ट केल्यांतर तिची कॅब आली. तिला बाय बाय करून आम्हीही थोड्या वेळाने पुन्हा राम मंदिर परिसरात निघालो. आमचं ‘चेक आउट’ ११ वाजता होतं. त्यामुळं बॅगा तिथंच ठेवून आम्ही बाहेर पडलो. राम मंदिर परिसरात जाऊन परत थोडी फार खरेदी केली. काल दशरथ महालाकडं जाताना ‘राम - भरत मिलाप’ अशी काही तरी पाटी बघितली होती. त्या छोट्याशा मंदिरात गेलो. तिथल्या पुजारीबुवांनी एकूणच आमच्याविषयी खूपच ममत्व दाखवलं. आम्ही एक किलो शिधा (किंमत फक्त ५०० रुपये) ठेवावा, असा एकूण त्यांचा आग्रह दिसला. आम्ही प्रत्येकी शंभर रुपये दिले व तिथून सुटका करून घेतली. बाहेर आलो तर ‘६ डी’ शोचा बोर्ड दिसला. तिथं एक मुलगा खाली रस्त्यावरच त्या ‘शो’ची जाहिरात करत होता. आधी डेमो पाहा; मग आवडला तरच तिकीट काढा, म्हणाला. आम्ही ते टेकाड थोडं चढून गेलो. तिथं एका काचेच्या मोठ्या खोलीत काही लोक त्या ‘व्हीआर’ इक्विपमेंटमधून शो पाहत होते. आम्हाला त्याने डेमो दिला. आम्हा तिघांनाही आवडला. मग प्रत्येकी दीडशे रुपयांचे तिकीट काढून आम्ही ‘अयोध्या व दीपोत्सव’ हा दहा-बारा मिनिटांचा शो निवडला. (तिथं वेगवेगळ्या देवस्थानांचे असे शो होते व ते साधारण याच कालावधीचे होते.) शो चांगला होता. थ्री डी इफेक्टमुळे अयोध्येतली वेगवेगळी ठिकाणं नीट बघता आली. हनुमान गढीवरचा हनुमान आम्हाला प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळी दिसला नव्हता, तो इथं नीट दिसला. एकूण मजा आली. हा शो संपल्यावर समोरच असलेल्या राजद्वार मंदिरात गेलो. अयोध्या नरेशांनी सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं आहे. इथं रामाचा दरबार अशा स्थितीत सुंदर मूर्ती आहेत. या मंदिराचा कळस अयोध्येत सर्वांत उंच आहे. तिथं पुजारी म्हणून एक बाई होत्या. त्यांच्या परवानगीने मूर्तींचे फोटो काढले. तिथं थोडा वेळ बसलो. नंतर खाली येऊन त्या राम पथावर पुन्हा जरा भटकंती केली, राहिलेली खरेदी केली. तिथं उडुपी ते मुंबई रेस्टॉरंट होतं. ते आम्ही जातानाच हेरून ठेवलं होतं. मग तिकडंच जेवायला गेलो. रसम भात आणि रवा डोसा घेतला. तो भात भरपूर आला. त्यात माझं व साईचं पोट भरलंच. तिथून आम्ही थेट रिक्षा करून हॉटेलला गेलो. त्याला सांगितलं, की आम्हाला तिथून रेल्वे स्टेशनला सोड. मग हॉटेलला जाऊन बॅगा उचलल्या व थेट स्टेशनला गेलो. आमची ‘वंदे भारत’ साडेतीन वाजता होती. आम्ही दोन वाजताच स्टेशनला पोचलो होतो. मग त्या वरच्या प्रतीक्षालयात जाऊन बसलो. तासभर टाइमपास केला. तिथं माकडं भरपूर येत होती. आमच्याकडं खायचं काही नसल्यानं नंतर ती दूर गेली. साडेतीनला आम्ही खाली फलाटावर आलो. ट्रेन वेळेत आली. आमच्या डब्यात मराठी बोलणारे १५-१६ जण होते. त्यांच्यातल्या एक मावशी आमच्याशेजारीच आल्या. चौकशी केली तर त्यांचं माहेर जामखेडचं निघालं. छोटंसं जग! 
गाडी वेळेत निघाली, पण मधे लटकली. कुठं तरी ट्रॅकला आडव्या जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू होतं म्हणे.  त्यामुळं आमची गाडी एक तास एकाच जागी थांबली. त्यामुळं सव्वासहाला पोचणारी गाडी जवळपास सात वीसला वाराणसी स्टेशनला पोचली. मग तिथून पुन्हा रिक्षा करून हॉटेलला गेलो. साडेआठ वाजले होते. आम्हाला खरेदीसाठी आजचाच दिवस होता. मग लगेच आवरून बाहेर पडलो. काशी विश्वेश्वराच्या रस्त्याने पुढं गेलो. जाताना अदितीनं  (जोगळेकर) सांगितलेला तो ‘सरदारजी पापडवाले’ दिसला. मग तिथं जाऊन पापड आणि मिरचीचं लोणचं (अदितीचीच शिफारस) घेतलं. पुढं बनारसी फॅक्टरी साड्या थेट विकणारं एक छोटेखानी दुकान दिसलं. मग तिथून साड्या व जास्त करून ड्रेस मटेरियलची खरेदी झाली. मला काहीच घ्यायचं नव्हतं. हे होईपर्यंत दहा वाजले होते. मग जरा पुढं गेल्यावर ‘फुलवारी’ नावाचं एक हॉटेल आतल्या बाजूला दिसलं. एका वाड्यातच मधल्या मोकळ्या जागेचा वापर करून केलेलं ते घरगुती हॉेटेल आम्हाला आवडलं. तिथलं जेवणही चांगलं होतं. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला स्टीलची ताटं दिली होती, ते आवडलं. जेवून मग बाहेर आलो. तिथं एक रिक्षावाला दिसला. त्याला आमच्या हॉटेलला यायला तयार केलं. थोड्या वेळात हॉटेलला पोचलो. भरपूर दमलो होतो. लगेच झोप आली.

७ एप्रिल २०२६, वाराणसी/पुणे

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला मृत्युंजयेश्वराच्या मंदिरात जायचं होतं. हे आमच्या हॉटेलपासून चालत जाण्याच्या अंतरावर होतं. मग तिकडं गेलो. एवढ्या सकाळीही त्या मंदिरात बरीच गर्दी होती. ते मंदिरांचं एक संकुलच होतं. मग तिथल्या सर्व महादेवांचं, तिथल्या त्या पवित्र पाण्याच्या कुंडाचं दर्शन घेऊन परतलो. येताना आम्ही पहिल्या दिवशी जिथं हिंग कचौडी खाल्ली होती, तिथं जाऊन साईलाही ती खाऊ घातली. त्यानं आमच्या हॉटेलसमोरची ती बागही बघितली नव्हती. मग येताना त्या बागेतून हॉटेलला आलो. तोवर आमच्या हॉटेलमधल्या ब्रेकफास्टची वेळ झाली होती. ब्रेकफास्ट भरपेट केला. आम्हाला अकरा वाजता हॉटेल सोडायचं होतं. मग मी ‘ओला’वरून कॅब बुक केली. ती दहा मिनिटांत आली. चेक-आउट केलं. जाताना कॅबवाल्यानं वाराणसी कँटोन्मेंट परिसरातून गाडी नेल्यानं तोही परिसर बघता आला. साधारण ५० मिनिटांत आम्ही विमानतळावर पोचलो, तेव्हा बरोबर ११.३० झाले होते. आमचं फ्लाइट १.४५ वाजता होतं. मग विमानतळावर टाइमपास केला. सिक्युरिटीत आमचं मिरचीचं लोणचं अडकलं. केबिन बॅगेत मिरची कुठल्याच फॉर्ममध्ये चालत नाही, हे ज्ञान प्राप्त झालं. (चेक-इन बॅगेत चाललं असतं म्हणे. असो.) नाइलाजानं ती बाटली तिथंच सोडली. आमचं गेट पहिल्या मजल्यावर होतं. तिथं एक सुंदर वॉल डिझाइन होतं. मी व साईनं तिथं फोटो काढून घेतले. आमचं गेट आधी ४ नंबरचं होतं. मग ते ६ नंबरला गेलं. मग आमची पालं उठून तिकडं जाऊन बसली. विमान फक्त पाच मिनिटं लेट होतं. मात्र, बरोबर दोन वाजता आम्ही उड्डाण केलं. पुण्यात पहिल्या झटक्यात परवानगी मिळाली नाही. ‘गो अराउंड’ करायला लागलं. त्यामुळं ‘टच्ड डाउन’ला सव्वाचार वाजले. बाहेर येऊन एअरोमॉलला आलो. कॅब आलीच होती. कॅबवाल्याशी कॅश की डिजिटल पेमेंट यावरून किरकिर झाली आणि आपण पुण्यात येऊन पोचल्याची खात्री पटली. साईच्या घरी आमची गाडी ठेवली होती. स्वत:च्या गाडीत बसलो आणि बरं वाटलं. एसी फुल्ल ऑन करून साडेसहाला सुखरूप घरी येऊन पोचलो. 
वाराणसी व अयोध्या ही भारतातली दोन प्रमुख तीर्थस्थळं बघायची खूप दिवसांपासूनची इच्छा अशी पूर्ण झाली होती. काळभैरवनाथाच्या मंदिरात गळ्यात अचानक पुजाऱ्यानं घातलेला हार, नावेत बसल्यावर गंगेच्या पाण्याला झालेला पहिला स्पर्श, काशी विश्वेश्वराचं आणि अयोध्येत ‘रामलल्ला’चं डोळे भरून झालेलं दर्शन, काशी हिंदू विश्वविद्यालयाची ओझरती का होईना, पण झालेली भेट... अशा काही ठळक आठवणी फेर धरून मन:पटलावर दिसत राहिल्या. प्रत्येक प्रवास तुम्हाला काही तरी देतोच. आपण तिथून आल्यानंतर आधीचे राहत नाही. आपल्या धारणा बदलतात, आपण बदलतो! अधिक उदारमतवादी होतो, अधिक शांत होतो... गोष्टी ‘लेट गो’ करायला शिकतो... गंगा व वाराणसीच्या भेटीनंतर तर मला माझ्यातलं ‘भारतीयत्व’ अधिक फुलून आल्याचं फीलिंग आलं आहे. म्हणजे नक्की काय, ते नाही सांगता येणार... गंगेच्या अखंड वाहत्या दिव्य प्रवाहासारखी ही भावनाही पुढल्या आयुष्यभर मनात प्रवाहित होत राहणार एवढं मात्र नक्की!

(समाप्त)

---

No comments:

Post a Comment