9 Apr 2026

वाराणसी-अयोध्या यात्रा - भाग १

काशीस जावे, नित्य वदावे...
---------------------------------


सर्व भारतीयांप्रमाणे आपणही कधी तरी काशीला (म्हणजेच वाराणसी किंवा बनारसला) जावे, गंगा पाहावी, विश्वनाथाचे दर्शन करावे अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मात्र, देवस्थानांबाबत माझा अनुभव असा आहे, की तुमचा योग यावा लागतो. आपण घोकून काहीही होत नाही. त्यामुळं मी शांतपणे या योगाची वाट पाहत राहिलो. पत्रकारितेत येऊन आता मला जवळपास तीन दशकं झाली. भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशचं महत्त्व वेगळं सांगायला नको. गंगा-यमुनेच्या खोऱ्यांत पसरलेला हा विशाल भूभाग म्हणजे खरा भारत, असं अनेक ठिकाणी वाचलं होतं. अनुभवलंही होतं. ‘यूपी नहीं देखा तो क्या इंडिया देखा?’ अशी (जरा आढ्यतेखोर वाटणारी) जाहिरात ‘यूपी टुरिझम’ करतं. अर्थात त्यात तथ्य आहेच. भारताबाहेरच्या अनेक लोकांना भारत म्हणजे ‘ताजमहाल, काशीचे घाट, गंगा, त्रिवेणी संगम’ हेच वाटतं. त्यात महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारत अनेकदा नसतोच. अर्थात ‘गंगा’ म्हणजे भारताची ‌ठ‌ळक ओळख. शिवाय काशी-रामेश्वर या नात्याने दक्षिण भारतीय मंडळीही काशीस येतच असतात. महाराष्ट्राचं आणि काशीचं नातंही फार जुनं. तिथले अनेक घाट अहिल्याबाईंनी, शिंद्यांनी, भोसल्यांनी बांधले. तिथले अनेक धर्मपंडित इकडून तिकडे गेले. तिकडूनही इकडं आले. आपली मुळं, आपला डीएनए एकच आहे, हे वेगळं सांगायचीही गरज नाही. त्यामुळं गंगा पाहणं, दोन की तीन हजार की किती तरी जास्त वर्षांहून अधिक काळ भारतीय संस्कृतीचे साक्षीदार असलेले तिथले ते घाट पाहणं, तब्बल साडेतीन हजार मंदिरं असलेली सर्वांत प्राचीन नगरी वाराणसी तिथल्या त्या तितक्याच प्राचीन गल्ली-बोळांतून फिरून प्रत्यक्ष अनुभवणं हे सगळं ‘बकेट लिस्ट’मध्ये होतं. ‘काशीस जावे नित्य वदावे’ असं आपण म्हणतो. तसं मी जाहीरपणे नाही, पण मनातल्या मनात कितीदा तरी घोकत होतो. आग्रा व ताजमहाल पूर्वीच बघून झाला. त्या अर्थानं उत्तर प्रदेशाला पाय लागले होते. मात्र, वाराणसी, प्रयागराज, लखनौ, कानपूर, अयोध्या, गोरखपूर ही उत्तर प्रदेशातली ‘कोअर’ शहरं पाहिल्याशिवाय आपण खरा भारत पाहिला, असं मला तरी काही वाटत नव्हतं. पत्रकारितेत असताना निदान निवडणुका कव्हर करण्यासाठी तरी या राज्यात जावं, असं अनेकदा वाटलं. मात्र, तोही योग काही आला नाही. अखेर या इच्छेनं तीव्र उचल खाल्ली ती दोन वर्षांपूर्वी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत ‘रामलल्ला’ विराजमान झाले, तेव्हापासून! अयोध्या ही तर गेल्या तीन दशकांतल्या सर्वांत धगधगत्या मुद्द्याची केंद्रबिंदू नगरी होती. मी तो सर्व काळ वृत्तपत्राच्या कार्यालयांतून पाहिला होता. बातम्या केल्या होत्या. अखेर करोडो भारतीयांच्या स्वप्नांची पूर्तता २२ जानेवारी २०२४ रोजी झाली होती आणि बहुतांश भारतीयांत असतं तसं माझ्यातही लपून असलेलं एक ‘भाबडं हिंदू मन’ उचंबळून आलं. रामाला त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास झाला; मात्र कलियुगात तो पाचशेहून अधिक वर्षांचा झाला आणि अखेर त्याला त्याचं न्याय्य ‘घर’ मंदिराच्या रूपानं मिळालं, ही बहुतांश भारतीयांप्रमाणे माझीही भावना होती व आहे. पत्रकार म्हणून अयोध्या पाहण्याची उत्सुकता होतीच; पण त्याहून अधिक ओढ माझ्यातल्या ‘भाबडं हिंदू मन असलेल्या भाविका’ला लागली होती. सुदैवानं मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्या झाल्या पुढच्याच महिन्यात माझ्या आई-वडिलांना अयोध्येला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं आता मी जायला अगदी सज्ज झालो होतो. अर्थात अयोध्येत एवढी कामं सुरू होती, की ती संपूर्ण झाल्यावरच आपण जावं, असंही एक व्यावहारिक मन सांगत होतं. अखेर (वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर) फेब्रुवारीत आमचं अयोध्या व वाराणसीला जायचं ठरलं. आमचे नेहमीचे साथीदार - माझा आत्येभाऊ साईनाथ व त्याची पत्नी वृषाली - आणि आम्ही दोघं - मी व धनश्री - असं चौघांनी जायचं ठरलं. आमची मुलं येणारी नव्हती. त्यांच्या परीक्षा असणार होत्या. परीक्षा झाल्यावर त्या दोघांना (हवं तिथं!) आम्ही ट्रिपला जाऊ देऊ, या अटीवर मुलांनी आम्हाला सोडलं. अर्थात आता आमची ट्रिप तशी सुटसुटीत झाली. मग फेब्रुवारीच्या मध्यालाच आधी विमानाचं बुकिंग करून टाकलं. (तेव्हा आखाती युद्धाचं काहीही वारं नव्हतं.) आता पुण्याहून वाराणसीला ‘इंडिगो’ची थेट फ्लाइट आहे आणि ती फार सोयीची आहे. दोन तासांत थेट वाराणसीला पोचता येतं. तीन ते सात  एप्रिल अशी पाच दिवस ट्रिप ठरली. आधी अयोध्या व वाराणसीच्या जोडीला प्रयागराजही ठरवत होतो; पण ते वेळापत्रकात बसेना. मग फक्त अयोध्या व वाराणसी करू या, असं ठरवलं.
पंधरा दिवसांपूर्वी साईनाथनं दोन्ही ठिकाणची हॉटेल्स बुक केली. वाराणसीवरून अयोध्येला जाण्यासाठी खासगी कॅब करण्यापेक्षा ‘वंदे भारत’ सोयीची आहे, असं संशोधनाअंती समजलं. मग मी त्या ट्रेनचं जातानाचं व येतानाचं बुकिंग करून टाकलं. युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्या इथल्या विमान प्रवासावर काय परिणाम होतोय, अशी जरा धाकधूक होती. तसं थोडं झालंच. आमच्या जातानाच्या फ्लाइटची वेळ बदलून अलीकडं आली. आधी रात्री ११.४० ला निघणारी ही फ्लाइट दुपारी पावणेपाचला झाली. अर्थात हे सोयीचं झालं. मध्यरात्री वाराणसीला पोचण्यापेक्षा आता आम्ही संध्याकाळ पावणेसातला पोचणार होतो हे बरंच झालं. ठरल्याप्रमाणे तीन तारखेला दुपारी आम्ही निघालो. फ्लाइट वेळेत होती व वेळ‌ेत पोचली. मी डाव्या बाजूला खिडकीशी बसलो होतो. वाराणसीच्या अलीकडं  लँडिंगच्या पंधरा मिनिटं आधी एकदम गंगा दिसली. काही हजार फूट उंचीवरूनही आणि काहीशा धुरकट वातावरणातूनही गंगेचं ते विशाल पात्र पाहून मन एकदम रोमांचित झालं. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी उन्मनी अवस्था झाली. मी तरीही पटकन मोबाइल काढून त्या भव्य पात्राचं चित्रीकरण केलं. थोड्याच वेळात अगदी वाराणसी शहर व गंगेचे ते घाटही दिसू लागले. विमान वळताना पुन्हा गंगेचं दर्शन घडलं. फारच छान वाटलं. पुढच्या पाच मिनिटांत आमच्या विमानानं वाराणसीच्या विमानतळावर ‘टच्ड डाउन’ केलं.
मी ‘मेकमायट्रिप’वरून आदल्या दिवशी कॅब बुक केली होती. तिथं ‘विवेक दीक्षित’ असं नाव आल्यावर मी हसून म्हटलं, की ड्रायव्हरचं नाव बघा. वेलकम टु यूपी! अर्थात यूपीत पोचल्यावर कळलं, की हे त्या मालकाचं नाव आहे. प्रत्यक्ष ड्रायव्हर कुणी दुसराच होता. त्यातही आधी एका ड्रायव्हरचा फोन आला. त्यानं आमच्याकडं चार बॅगा आहेत म्हटल्यावर ट्रिप कॅन्सल केली. मग बहुतेक दीक्षितजींनी (जे अर्थात मालक होते) हा दुसरा पाठवला होता म्हणे. मला आधी त्याचं नाव शर्मा वाटलं. पण तो ‘राजेश विश्वकर्मा’ निघाला. हा ड्रायव्हर हुशार होता व बहुतेक ड्रायव्हर असतात तसा बडबड्या होता. आमच्या वृषालीला नेहमी चहा हवा असतो. मलाही हवा असतो म्हणा. मग विमानतळावर ‘काशी का स्वाद’ नावाचं एक छोटेखानी रेस्टॉरंट दिसलं. तिथं गेल्यावर चहा १०० रुपये म्हटल्यावर आम्ही बाहेरच आलो. ड्रायव्हर राजेशला आमची फजिती सांगितल्यावर तो हसला आणि रस्त्यात थांबून आपण चहा घेऊ म्हणाला. वाराणसीचा हा ‘लाल बहादुर शास्त्री अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा’ तसा पुण्याच्या विमानतळापेक्षाही लहान होता. मात्र, टुमदार होता. तिथं प्रांगणातच शास्त्रीजींचा ब्राँझचा भव्य पुतळा  आणि तिरंगा आहे. आम्ही त्याच पुतळ्याच्या खाणाखुणा सांगत कॅबपर्यंत पोचलो होतो. हा विमानतळ बाबतपूर नावाच्या गावात आहे. तो वाराणसीपासून जवळपास ३० किलोमीटर दूर आहे. त्यामुळं मधे थांबून चहा घेणं आवश्यकच होतं. मग विमानतळाबाहेर पडल्या पडल्या लगेच डाव्या हाताला काही टपरीवजा छोटी हॉटेलं लागली, तिथं आमच्या ड्रायव्हरनं कार थांबविली. संध्याकाळचे सात-सव्वासात झाले होते. मात्र, या दिवसांत आपल्याकडं जसा उजेड असतो, तसं तिकडं नसतो. वाराणसी पुण्यापासून ईशान्येला जवळपास १३०० किलोमीटवर आहे. त्यामुळं त्या संधीप्रकाशापेक्षाही जरा अंधारच पडलेल्या वेळेला आम्ही ‘कुल्हड’मधून झकास चहा घेतला. राजेशभाईला पण दिला. मग त्यानं तिथून आमची कॅब भरधाव शहराच्या दिशेनं सोडली. थोड्याच वेळात आम्हाला एक फ्लायओव्हर लागला. उजवीकडं लखनौ (२८१ किलोमीटर) व डावीकडं वाराणसी (२२ किलोमीटर) होतं. तो फ्लायओव्हर बराच मोठा होता. वाराणसीत मी यापूर्वी कधी आलो नव्हतो. त्यामुळ‌ं आधी इथं कसा रस्ता होता, हे मला ठाऊक नव्हतं. मात्र, ड्रायव्हरच्या मते ही सगळी सुधारणा आत्ताची, गेल्या दहा वर्षांतली आहे. त्या भल्या मोठ्या फ्लायओव्हरवरून दीर्घकाळ प्रवास केल्यावर आम्ही वाराणसी शहरात प्रवेश केला. तिथंही नवं शहर व जुनं शहर असे दोन भाग आहेतच. आमचं ‘आनंद काशी’ हे हॉटेल काशी विश्वनाथ मंदिरापासून जेमतेम दोन किलोमीटवर, अर्थात जुन्या शहराच्या मध्यभागी होतं. त्यामुळं कॅब जसजशी जुन्या शहराकडं जाऊ लागली, तसतसं ट्रॅफिक वाढलं. अरुंद रस्ते, भरपूर वाहनं आणि कर्कश्श वाजणारे हॉर्न हे उत्तर भारतातल्या बऱ्याच शहरांत दिसणारं दृश्य तिथंही दिसू लागलं. राजेशभाई म्हणाले, ‘यहाँ ऐसाही होता है!’ आम्ही ‘बरं’ म्हटलं. दुसरं काय म्हणणार होतो? त्या ट्रॅफिकपुढं मला पुण्यातलं ट्रॅफिक फारच शिस्तबद्ध व कमी हॉर्न वाजवणारं वाटायला लागलं. अखेर जवळपास दीड तासानं, म्हणजे साडेआठच्या सुमारास आम्ही त्या हॉटेलमध्ये पोचलो. ते हॉटेल अगदीच जुन्या भागात वसलं होतं. आत जायला एक रॅम्प होता. तिथून कार वर गेली ती थेट रिसेप्शनच्या लॉबीतच जाऊन उभी राहिली. तिथले कर्मचारी लगेच सामान उतरवून घ्यायला तत्परतेनं धावले. पाच मिनिटांत सर्व सोपस्कार करून आम्ही खोल्या ताब्यात घेतल्या. सुदैवानं त्या तळमजल्यावरच होत्या. आम्ही अजिबात फारसे दमलेले नव्हतो. त्यामुळं लगेच आवरून बाहेर पडावं आणि काळभैरवनाथाचं दर्शन घ्यावं असं ठरलं. माझा मेव्हणा हर्षद नेहमी काशीला सहली घेऊन जातो. त्यानं सांगितलं होतं, की हा काळभैरवनाथ म्हणजे काशीचा कोतवाल आहे. त्याचं आधी दर्शन घ्यायचं व मगच ‘काशी विश्वनाथा’ला जायचं. आमच्या हातात वेळ होता व ते मंदिरही तिथून जवळच होतं, म्हणून मग आम्ही तिकडं निघालो.
हे मंदिरही आमच्या हॉटेलपासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर होतं. आम्ही पाच मिनिटांत तिथं पोचलो. तिथं सरळ जाणारा मार्ग बंद केला होता आणि तिथं उभे असणारे पोलिस दुसरीकडून जा, असं सांगत होते. मग आम्ही त्या चौकातच एका दुकानात चपला काढल्या आणि चालत त्या रस्त्याने निघालो. रस्ते म्हणजे सगळे गल्ली-बोळच होते. काशीचा हा अगदी जुना भाग होता. अगदी लागून लागून असलेली घरं, मधून जाणारा बोळवजा रस्ता, तिथं दुचाकी गाड्यांची बेशिस्त ये-जा, जोरजोरात हॉर्न वाजवणं, स्थानिक विरुद्ध पर्यटक यांच्यातली वादावादी, मधेच गोमातांची ये-जा हे सगळं बघून आम्ही तर भेदरूनच गेलो. तरीही आम्ही त्या लाइनीचं शेवटचं टोक शोधलं व तिथं उभे राहिलो. सुमारे दीड तास त्या रांगेत अशक्य असा वैताग सहन केल्यावर आम्हाला ते काळभैरवनाथ मंदिर दिसलं. मला एकदम लक्षात आलं, की आज गुड फ्रायडे, उद्या शनिवार, रविवार. म्हणजे लाँग वीकएंड... त्यामुळंच तिथं एवढी प्रचंड गर्दी झाली होती. त्यात आमच्यासारखे बाहेरच्या राज्यातून आलेले पर्यटक तर होतेच; पण उत्तर प्रदेशच्या अन्य भागांतून एक किंवा दोन दिवसांसाठी काशी दर्शनाला आलेलेही कित्येक लोक होते. आमची वेळच चुकली होती. अर्थात एवढ्या तपश्चर्येनंतर काळभैरवनाथाचं मनोभावे दर्शन झालंच. मी जरा वाकून नमस्कार करत होतो तोवर तिथल्या पुजाऱ्याने तिथं पडलेला एक गुलाबाचा हार माझ्या गळ्यात घातला. शिवाय आणखी एक तुळशीचा हारही दिला. मला खूप आनंद झाला. एवढा वेळ रांगेत थांबल्याचं चीज झालं असं वाटलं. जणू हा प्रसादच! मग बाहेर येऊन मी तो तुळशीचा हार धनश्रीच्या गळ्यात घातला व आमचा फोटो काढून घेतला. नंतर तेच हार साई व वृषालीला दिले आणि त्यांचेही फोटो काढले. आमच्या चपला ठेवल्या होत्या ते दुकानदार दुकान बंद करून गेले होते. दुकानाच्या पायऱ्यांशी आमच्या व इतरही भाविकांच्या चपला तशाच लोळत पडल्या होत्या. त्या घेतल्या आणि निघालो. आता जवळपास दहा वाजून गेले होते. भूक लागली होती. त्याच गल्लीत एक ‘अन्नपूर्णा कॅफे’ नावाचं छोटेखानी हॉटेल दिसलं. तिथं आत बेसमेंटमध्ये काही पर्यटक जेवताना दिसले. मग आम्हीही तिथं गेलो. नंतर लक्षात आलं, की एक बाई, तिचा नवरा व त्यांचा अगदी पाच-सहा वर्षांचा छोटा मुलगा मिळून ते हॉटेल चालवत आहेत. बाकी स्टाफ कुणीच नव्हता. त्या बाई अगदी साध्या होत्या. त्या कुणालाच नाही म्हणत नव्हत्या. सगळ्यांच्या ऑर्डर घेत होत्या. आम्ही ऑर्डर दिल्यावर आमच्या हे लक्षात आलं. पण आता पर्याय नव्हता. वरच्या बाजूला किचन होतं. तिथून कधी त्या, तर कधी नवरा त्या डिशेस खाली घेऊन येत होते. तो लहान मुलगाही बिचारा सतत धावपळ करत होता. आम्हाला तिथून उठून जावंसंही वाटेना. ती फॅमिली गरजू वाटत होती. मग आम्ही प्रचंड भूक लागली असूनही संयमाने आमची डिश येण्याची वाट पाहिली. ती ठीकठाकच होती. पण अत्यंत भूक लागल्यानं तीही गोडच मानून घेतली. तिथून निघून चालतच हॉटेलवर आलो. 
दुसऱ्या दिवशी आता मुख्य सोहळा म्हणजे काशी-विश्वनाथाचं आणि अर्थात गंगेचं दर्शन. सकाळी उठल्यावर शॉवरमधून आलेल्या गंगेत स्नान केलं. आम्ही लवकर उठलो होतो. आमच्या हॉटेलच्या बरोबर समोर एक पार्क होतं. मग धनश्री व मी तिथं चक्कर मारायला गेलो. पार्क छोटेखानी होतं, पण चांगलं होतं. मधोमध एक तळं होतं. त्यात कारजं होतं. आजूबाजूला ‘नगर निगम, वाराणसी’नं छोटेखानी जिम, जॉगिंग ट्रॅक वगैरे सोयी केल्या होत्या. तिथं भरपूर लोक सकाळी चालायला आले होते. आम्ही पार्कच्या दुसऱ्या बाजूला गेलो, तेव्हा त्या पार्कचं नाव ‘भारतेंदू हरिश्चंद्र पार्क’ असं आहे, हे दिसलं. हे हिंदी साहित्यातलं व रंगभूमीवरचं मोठं नाव. त्यांना आधुनिक हिंदी साहित्य व रंगभूमीचचे जनक मानलं जातं. (सन १८५० मध्ये जन्मलेल्या हरिश्चंद्रांना अवघं ३४ वर्षांचं आयुष्य लाभलं. मला आपल्या राम गणेश गडकऱ्यांची आठवण झाली.) तिथं त्यांचा पूर्णाकृती पुतळाही होता. मग आम्ही पार्कच्या दुसऱ्या बाजूने काशी विश्वनाथाकडं जाणाऱ्या चौकाकडं आलो. तिथं रस्ते बंद केलेले दिसले, तेव्हा कळलं, की मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ काशी विश्वनाथाच्या दर्शनाला येत आहेत. थोड्याच वेळात त्यांचा ताफा तिथून गेला. मग रस्ते मोकळे झाले. त्या चौकात शास्त्रीजींचा पांढरा अर्धपुतळा होता. त्याची इतकी दुरवस्था झाली होती, की विचारू नका. खरं तर हे शास्त्रीजींचं गाव. इथं विमानतळाला त्यांचं नाव आहे आणि तिथं व इतरत्रही त्यांचे अनेक पुतळे आहेत. पण या चौकातल्या पुतळ्याकडं काही कुणाचं लक्ष नव्हतं. असो.

तिथंच कोपऱ्यात अनेक स्टॉल होते. तिथं ‘मामा की हिंग कचौंडी’ असा एक स्टॉल दिसला. मग आम्ही एक कचौडी घेतली. मटार उसळीसारख्या हिंग घातलेल्या खमंग सरसरीत मिश्रणात ती कचौडी कुस्करून देत होते. एका कचौडीनं मन तृप्त झालं. मग शेजारीच ‘कुल्हड’मधला चहा घेतला. परत पार्कमधून चालत हॉटेलवर आलो. आमच्या हॉटेलमध्ये आमचा ब्रेकफास्ट होताच. तो इतर सर्व हॉटेलमध्ये असतो तसाच होता. त्यात इडलीपासून पराठ्यापर्यंत आणि वेगवेगळ्या फळांपासून ते चहा-कॉफीपर्यंत सगळं काही होतं. मग रीतीप्रमाणं ते हेवी ब्रेकफास्ट केला. इथं आम्हाला आमचे दोन स्थानिक मित्र भेटणार होते. शिवम व शुभम अशी त्यांची नावं. ते थोड्याच वेळात आमच्या ऑफिसलाच आले. ते इथलेच राहणारे होते. त्यामुळं पुढचा सर्व दिवस त्यांच्याबरोबरच आम्ही फिरणार होतो. मग आम्ही लगेच चालत चालत काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. त्या मगाच्या चौकापासून पुढं ऑटो रिक्षा किंवा मोठ्या वाहनांना परवानगी नाही. ट्रस्टच्या गोल्फ कार्टसारख्या गाड्या येतात. मात्र, त्यांची वाट न पाहता आम्ही सकाळच्या वेळेत तिकडं चालत निघालो. शनिवारचा दिवस होता. त्यामुळं रस्त्यावर भाविकांची भरपूर गर्दी होतीच. बरंच चालल्यावर आम्ही गेट नं. ४ ला पोचलो. इथं शिवमच्या ओळखीच्या एका पोलिस अधिकाऱ्यामुळं आम्हाला पास मिळाला होता. त्यांनी एका कॉन्स्टेबलचा नंबर दिला होता. मग त्याने आम्हाला फोन करून एका ठिकाणी बोलावलं, तिथं आमच्यासारख्या ‘प्रोटोकॉल’च्या पाहुण्यांची बरीच गर्दी होती. अर्थात मुख्य रांग एवढी मोठी होती, की आमची ही गर्दी असली तरी तुलनेनं लवकर आत प्रवेश मिळणार होता. मग त्या कॉन्स्टेबलनं आम्हाला आमचे मोबाइल, बॅगा वगैरे सगळं समोरच्या दुकानांत उपलब्ध लॉकरमध्ये ठेवायला सांगितलं. फक्त एक मोबाइल घेऊन आम्ही आत गेलो. तिथं पुन्हा एका ठिकाणी सगळ्यांची नावं नोंदवून घेत होते. मग जो एक मोबाइल होता, तोही तिथल्या पोलिस लॉकरमध्ये ठेवावा लागला. आतला परिसर भव्य आहे. अगदी समोरच ती ग्यानव्यापी मशीद दिसली. तिला काटेरी कुंपणांनी बंदिस्त केलं आहे. त्याच्या बाजूला सगळा कॉरिडॉर व मंदिर परिसर आहे. हा सगळा अलीकडच्या काळात विकसित झालेला भाग आहे आणि आधी असं नव्हतं. काशी विश्वनाथाच्या मंदिराविषयी माझा जो समज होता, तसं तिथं काही आढळलं नाही. मला वाटत होतं, आपल्याकडच्या पंढरपूर किंवा अंबाबाईच्या देवळासारखं जुनं, पाषाणांचे खांब असलेलं देऊळ असेल. मात्र, तसं काही नव्हतं. आत त्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी एक अगदी छोटंसं मंदिर होतं. त्याचा कळसही जेमतेम पंधरा फूट वगैरे असेल. या जागेत भारतीयाचं सर्वांत महत्त्वाचं श्रद्धास्थान, मोक्षाचं द्वार वास करून होतं. मला त्या वातावरणात फारच भरून आलं. आतल्या संगमरवरी फरशांवरून आम्ही भराभर पुढं चालत होतो. शुभमनं आम्हाला थेट त्या मंदिराच्या आत नेलं. आम्ही आत गेल्यावर पोलिसानं ते दार लावून घेतलं. आम्ही नशीबवान ठरलो. मग अगदी थोड्या वेळात काशी विश्वनाथाच्या शिवलिंगाचं दर्शन झालं. हे शिवलिंग जरा खाली आहे. त्यामुळं सतत ‘नीचे देखो, नीचे देखो’चे घोष ऐकू येत होते. रांगेचा रेटा पुष्कळ होता, तरीही आम्हाला बरंचसं चांगलं दर्शन झालं, असं म्हणता येईल. तिथून बाहेर आल्यावर मग आम्ही त्या आवारातल्या इतर मंदिरांचं दर्शन घेतलं. शेजारी एका ओवरीसारख्या जागेत जरा वेळ बसलो, तिथं एका देवासमोर पुजारी तांदूळ देत होते. ते जवळ ठेवायचे आणि घरच्या धान्यात टाकायचे म्हणे. काशीचे प्रसिद्ध पंडे किंवा तत्सम मंडळींचा मला तरी तिथं कुठेही मागमूस दिसला नाही किंवा त्यांचा काही त्रासही झाला नाही.
आम्ही अगदी लवकरच दर्शन घेऊन बाहेर आलो. आमच्या स्थानिक मित्रांमुळं हे शक्य झालं होतं. आता त्यांनी आम्हाला जुन्या काशीतली सगळी मंदिरं दाखवायचा चंग बांधला. आम्ही आपले त्यांच्या मागोमाग ते गल्लीबोळ फिरू लागलो. असं म्हणतात, की भारतात जितकी प्रसिद्ध शिवालयं आहेत त्यांची एक ब्रँच (काशी खण्ड) वाराणसीत आहेच. पशुपतेश्वराचं मंदिर तर लगेचच दिसलं. एक राधा-रमण मंदिर होतं. तिथं आता वाड्यासारखा भाग होता. आत कुणीच नव्हतं. आम्ही जरा तिथं टेकलो. मग पुन्हा भटकंती सुरू. पिता महेश्वर, सर्व ग्रहांची नावं असलेलं एक संकुल (बुधेश्वर, शुक्रेश्वर वगैरे), पन्नास फूट खोलवर असलेला महादेव अशी अनेक मंदिरं बघत बघत आम्ही आणखी एका मंदिर संकुलात गेलो. तिथून मधल्या रस्त्यानं पुढं गेलो तर तो रस्ता एका घाटावर जात होता. दोन पायऱ्या वर चढून आलो तर समोर एकदम गंगामाई! अहाहा... काल काही हजार फूट उंचावरून पहिल्यांदा गंगेचं दर्शन झालं होतं आणि इथं आता मी तिच्यापासून काही फूट अंतरावर उभा होतो. कुठल्याशा अनामिक आकर्षणानं, ओढीनं, भक्तिभावानं भरलेल्या मनानं मी त्या घाटाच्या पायऱ्या उतरू लागलो... काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं होतं आणि आता गंगामाई बोलावत होती...

(क्रमश:)



-----

(वाराणसी व अयोध्या यात्रेचे आणखी फोटो व रील्स पाहण्यासाठी फेसबुक व इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.)

----





No comments:

Post a Comment