30 Mar 2026

रूपेरी पडद्याचे मानकरी- अडूर गोपालकृष्णन

समांतर सिनेमाचे अध्वर्यू
-----------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

अडूर गोपालकृष्णन म्हणजे भारतीय चित्रसृष्टीच्या नभांगणातील एक लखलखतं नक्षत्र. अत्यंत प्रतिभावंत दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते असलेले अडूर गोपालकृष्णन यांना मल्याळम चित्रपटसृष्टीत 'न्यू वेव्ह’ची सुरुवात करण्याचं श्रेय दिलं जातं. केरळी समाजाचे संवेदनशील आणि अतिशय प्रगल्भ चित्रण करणारे  त्यांचे चित्रपट पाहिले, की त्यांच्या प्रतिभेची कल्पना येते.
मौटात्तू गोपालकृष्णन उन्नितन हे त्यांचं मूळ नाव. पुढं त्यांनी त्यांच्या गावाचं नाव घेतलं. त्यांचा जन्म ३ जुलै १९४१ रोजी केरळमधील अडूरजवळ पल्लिकल इथं झाला. त्यांचं कुटुंब कलेची आवड असणारं होतं. त्यांचे वडील स्वयंवंमदत्त माधवन उन्नितन आणि आई गौरी कुंजम्मा यांच्याकडून त्यांना सांस्कृतिक वारसा मिळाला. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.  त्यांनी लहानपणीच अनेक नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं गोष्ट सांगण्याची कला त्यांच्या अंगी विकसित झाली. त्यांचं बालपण केरळमधील पारंपरिक 'कथकली' आणि स्थानिक कलांच्या वातावरणात गेलं. त्यांच्या अनेक चित्रपटांत दिसणारी संथ लय आणि दृश्यात्मकता यावर या बालपणीच्या संस्कारांचा मोठा प्रभाव आहे. अडूर यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्थानिक शाळांमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी गांधीग्राम रुरल इन्स्टिट्यूटमधून पदवी मिळवली आणि काही काळ सरकारी नोकरीही केली.  मात्र, कलेच्या ओढीमुळं ते सिनेमाकडं वळले. केरळच्या मातीतील कला आणि नाटकांची ओढ यामुळंच ते जागतिक दर्जाचे दिग्दर्शक होऊ शकले, असं म्हणावं लागेल.
पुढं चित्रपट कलेचं औपचारिक शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. अडूर गोपालकृष्णन आणि ‘एफटीआयआय’ यांचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. एका अर्थानं गोपालकृष्णन यांच्या भविष्यातील झळाळत्या कारकिर्दीचा पाया आपल्या पुण्यातच रचला गेला. १९६२ मध्ये अडूर यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या विषयांत विशेष प्रावीण्य मिळवलं. पुण्यात शिक्षण घेत असतानाच त्यांनी जागतिक दर्जाचे सिनेमे पाहिले. श्रेष्ठ दिग्दर्शक सत्यजित राय यांनी जेव्हा ‘एफटीआयआय’ला भेट दिली होती, तेव्हा अडूर त्यांच्या कामामुळे प्रचंड प्रभावित झाले होते. पुण्यात शिकत असतानाच त्यांना सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते एक प्रभावी कलात्मक माध्यम असल्याचं उमजलं. त्यांनी १९६५ मध्ये आपली पदवी पूर्ण केली.
गोपालकृष्णन अतिशय तब्येतीत सिनेमे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पाच दशकांहून दीर्घ अशा कारकिर्दीत त्यांनी केवळ १२ पूर्ण लांबीचे चित्रपट तयार केले. त्यांच्या ‘स्वयंवरम’ या १९७२ मध्ये आलेल्या पहिल्याच चित्रपटानं मल्याळी चित्रपटसृष्टीत अक्षरश: क्रांती घडवली. समांतर सिनेमाची ‘नवी लाट’ याच सिनेमापासून मल्याळी चित्रपटसृष्टीत सुरू झाली असं मानलं जातं. यानंतर ‘कोडिअट्टम’, ‘एलिप्पाथायम’, ‘मुखामुखम’, ‘अनंतराम’, ‘मथिलुकल’, ‘विधेयन’,  ‘कथापुरुषन’, ‘निजालुकुथू’, ‘नानू पेन्नुंगल’, ‘ओरू पेन्नुम रंदानम’ आणि ‘पिन्नेयुम’ हे त्यांचे आणखी ११ चित्रपट आले.

‘स्वयंवरम’विषयी बोलायचं तर १९७२ मध्ये आलेला हा चित्रपट 'विस्वम' आणि 'सीता' या प्रेमी युगुलाची कथा आहे. अभिनेता मधू व अभिनेत्री शारदा यांनी यात नायक-नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातील नायक-नायिका आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करून एका नवीन शहरात, म्हणजे तिरुअनंतपुरम इथं आपलं नवं आयुष्य सुरू करण्यासाठी येतात. सुरुवातीला स्वप्नवत वाटणारं त्यांचं आयुष्य हळूहळू गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळं कठीण होत जातं. आदर्शवाद आणि कठोर वास्तव यांच्यातील हा संघर्ष अडूर गोपालकृष्णन यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या चित्रपटाची वैशिष्ट्यं अनेक आहेत. यात अडूर यांनी बरेच तांत्रिक प्रयोग केले. हा 'सिंक साउंड’, म्हणजे' थेट चित्रीकरणाच्या वेळी ध्वनिमुद्रण करणं, या तंत्राचा आणि बाह्य लोकेशन्सचा वापर करणारा पहिला मल्याळी चित्रपट होता. यात व्यावसायिक चित्रपटांप्रमाणे गाणी, नृत्य किंवा उगाच घातलेला विनोद नव्हता. चित्रपटाची सुरुवात एका बस प्रवासाच्या पाच मिनिटांच्या दीर्घ शॉटनं होते. हे दृश्य त्या काळातील चित्रपट निर्मितीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. सुरुवातीला या चित्रपटाला चित्रपटगृहांत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, परंतु राष्ट्रीय पुरस्कारांनंतर तो प्रचंड गाजला. १९७३ च्या विसाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटानं चार प्रमुख पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अडूर गोपालकृष्णन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शारदा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण मंकडा रविवर्मा असे हे चार पुरस्कार होते. हा चित्रपट आजही त्याची कथनशैली आणि मानवी भावभावनांच्या वास्तववादी चित्रणामुळं जगभरातील सिनेप्रेमींच्या अभ्यासाचा विषय आहे.
अडूर यांचा १९८१ मध्ये आलेला.‘एलिप्पथायम’ हा चित्रपट अडूर यांच्या कारकिर्दीतील मास्टरपीस मानला जातो. या शीर्षकाचा शब्दश: अर्थ आहे उंदराचा पिंजरा. केरळमधील तत्कालीन सरंजामशाही व्यवस्थेचा अंत होत असताना, बदलत्या काळाशी जुळवून न घेऊ शकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. या चित्रपटाला लंडन चित्रपट महोत्सवात सर्वांत कल्पक चित्रपट' म्हणून पुरस्कार मिळाला होता. यानंतर अडूर यांनी १९८४ मध्ये ‘मुखमुखम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हा चित्रपट राजकीय विचारसरणी आणि कम्युनिस्ट चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका क्रांतिकारक नेत्याचं एकाकीपण आणि त्याच्याबद्दल समाजात असणाऱ्या प्रतिमांचा संघर्ष यात पाहायला मिळतो. यापुढचा त्यांचा चित्रपट होता १९८७ मध्ये आलेला ‘अनंतराम’. हा चित्रपट मानवी मानसशास्त्र आणि कथानक मांडण्याच्या शैलीवर आधारित आहे. 'सत्य' आणि 'कल्पना' यातील पुसट रेषा यात एका तरुणाच्या दृष्टिकोनातून यात दाखवविण्यात आली आहे. यानंतर अडूर यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे १९९० मध्ये आलेला ‘मथिलुकल’. या शीर्षकाचा अर्थ आहे भिंती. प्रसिद्ध लेखक वैकोम महंमद बशीर यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. यात मल्याळी सुपरस्टार मामुट्टी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तुरुंगातील एका कैद्याचं एका अदृश्य महिला कैद्याशी जडलेलं नातं यात अतिशय हळुवारपणे दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यात त्या महिला कैद्याचा फक्त आवाज ऐकू येतो.
अडूर यांचा पुढचा चित्रपट म्हणजे १९९३ मध्ये आलेला ‘विधेयन’. याचा शब्दश: अर्थ आहे चापलूस. हा चित्रपट सत्ता, अत्याचार आणि गुलामगिरी यांचे चित्रण करतो. एका क्रूर जमीनदाराचा त्याच्या नोकरावर असणारा मानसिक आणि शारीरिक प्रभाव या सिनेमात अंगावर येणाऱ्या वास्तववादाने मांडला आहे. यातही मामुट्टी यांनी साकारलेली खलनायकी भूमिका संस्मरणीय ठरली आहे.
अडूर यांनी २००२ मध्ये ‘निजालुकुथू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. फाशी देणाऱ्या एका जल्लादाची मानसिकता आणि त्याला वाटणारी अपराधीपणाची भावना या चित्रपटात केंद्रस्थानी आहे. अडूर यांचे चित्रपट केवळ कथा सांगत नाहीत, तर ते प्रेक्षकांना त्या काळातील सामाजिक आणि मानसिक स्थितीचा विचार करायला भाग पाडतात. यामुळंच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अडूर गोपालकृष्णन यांचं स्थान केवळ एक दिग्दर्शक एवढंच नसून ते समांतर चित्रपट चळवळीचे एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. जागतिक स्तरावर सत्यजित राय यांच्यानंतर भारतीय सिनेमाची ओळख ज्या मोजक्या दिग्दर्शकांमुळं टिकून आहे, त्यांत अडूर यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
अडूर यांच्या योगदानाचा आढावा घेताना, 'न्यू वेव्ह' सिनेमाची मुहूर्तमेढ ही त्यांची कामगिरी अगदी ठळक म्हणावी लागेल. 'स्वयंवरम'द्वारे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत एका नव्या पर्वाची सुरुवात केली, हे पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं. गाणी, मारामारी आणि अतिरंजित नाटकीपणाला फाटा देऊन, साधेपणा आणि वास्तववादाचा स्वीकार करणारा हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांसाठी नवा होता. अडूर यांच्या चित्रपटांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 'दृकश्राव्य भाषा'. ते संवादांपेक्षा दृश्ये आणि ध्वनी यांच्या माध्यमातून कथा सांगण्यावर भर देतात. पात्रांची शांतता, निसर्गाचे आवाज आणि मानवी हालचालींतून ते चित्रपटाचा आशय समृद्ध करतात. याखेरीज त्यांचे चित्रपट केवळ वरवरची गोष्ट सांगत नाहीत, तर ते मानवी मनाचा आणि सामाजिक व्यवस्थेचा सखोल वेध घेतात. विशेषत: 'एलिप्पथायम'मध्ये त्यांनी सरंजामशाही मानसिकतेचा ऱ्हास कसा होतो, हे प्रभावीपणे दाखवलं आहे. 'विधेयन’मधून सत्ता आणि गुलामगिरीच्या मानसिकतेवर अडूर यांनी भाष्य केलं. त्यांच्या कथांमध्ये केरळचा समाज, तिथलं राजकारण आणि मानवी नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे पदर उलगडतात.
याशिवाय अडूर यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे केरळमधील फिल्म सोसायटी चळवळीचे ते जनक आहेत. चित्रलेखा फिल्म सोसायटीची स्थापना करून, त्यांनी जागतिक सिनेमा सामान्य मल्याळी प्रेक्षकांपर्यंत पोचवला. चित्रपट निर्मितीसोबतच चित्रपट साक्षरता वाढवण्यात त्यांचं योगदान मोलाचे आहे. एफटीआयआयमधून प्रक्षिक्षण घेतल्यामुळं चित्रपटांच्या तांत्रिक बाबींतही ते जागरूक असतात. तांत्रिक शिस्तीबरोबरच छायाचित्रण, संपादन आणि ध्वनिमुद्रण या प्रत्येक बाबतीत ते अत्यंत चोखंदळ असतात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक 'फ्रेम' एखाद्या चित्रासारखी रेखीव असते. थोडक्यात सांगायचं तर अडूर गोपालकृष्णन यांनी भारतीय सिनेमाला केवळ मनोरंजन न मानता 'एक गंभीर कलाप्रकार' म्हणून जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटांनी अनेक पिढ्यांच्या दिग्दर्शकांना प्रेरणा दिली असून, 'कलात्मक सिनेमा' कसा असावा, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.
अडूर यांच्या चित्रपट निर्मितीची शैली अतिशय शिस्तबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक असते. त्यांच्या तंत्राची काही महत्त्वाची वैशिष्ट्यं सांगायची, तर संथ गती आणि 'दीर्घ शॉट’ हे एक ठळक वैशिष्ट्य जाणवतं. त्यांच्या चित्रपटांची गती मुद्दाम संथ ठेवली जाते. प्रेक्षकांना पात्राच्या मानसिक अवस्थेत शिरता यावं, यासाठी ते लांब शॉट वापरतात. घाईघाईनं दृश्यं बदलण्याऐवजी, ते कॅमेरा एका जागी स्थिर ठेवून त्या दृश्यातील नैसर्गिक हालचाली टिपण्यावर भर देतात. त्यांच्या सिनेमांत ध्वनीचा कल्पक वापर दिसून येतो. म्हणून त्यांच्या सिनेमात पार्श्वसंगीत  खूप कमी असतं. त्याऐवजी ते नैसर्गिक ध्वनींचा वापर करतात. उदाहरण द्यायचं तर दारं उघडण्याचा आवाज, पावलांचा आवाज किंवा पक्ष्यांचा चिवचिवाट असे आवाज टिपण्यावर ते भर देतात. 'एलिप्पथायम'मध्ये उंदराचा पिंजरा पडण्याचा आवाज किंवा पात्रांची शांतता ही संवादांपेक्षा जास्त प्रभावी ठरते, हे अनेक प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. 'फ्रेमिंग' आणि रचना याबाबतही अडूर गोपालकृष्णन आपलं वेगळेपण राखून आहेत. अडूर यांचे प्रत्येक दृश्य एखाद्या चित्रासारखं असतं. ते पात्रांना खिडक्या, दारं किंवा खांबांच्या मागे अशा प्रकारे उभे करतात, की त्यातून पात्राची मानसिक कोंडी किंवा एकाकीपण स्पष्टपणे दिसतं. 'क्लोज-अप' शॉट्सचा वापर ते खूप मर्यादित आणि फक्त महत्त्वाच्या क्षणीच करतात. कमीत कमी साधनांतून जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्यावर ते विश्वास ठेवतात. त्यांच्या चित्रपटात भपकेबाज सेट्स नसतात, तर केरळमधील जुनी घरं आणि निसर्गाचा नैसर्गिक वापर केला जातो. पात्रांचे संवादही मोजके आणि अर्थपूर्ण असतात. अडूर स्वतः त्यांच्या चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत पूर्णपणे गुंतलेले असतात. त्यांच्या मते, संकलन म्हणजे केवळ दृश्यं जोडणे नव्हे, तर चित्रपटाला एक लय देणं होय. कथेचा प्रवाह संथ असला तरी तो कधीही कंटाळवाणा होणार नाही, याची काळजी ते संकलनाद्वारे घेतात. त्यांच्या या तांत्रिक शिस्तीमुळंच त्यांचे चित्रपट हे केवळ 'सिनेमा' न राहता एक ‘दृश्य अनुभव’ ठरतात.
अडूर गोपालकृष्णन यांच्या चित्रपटांच्या दृश्यात्मक सौंदर्यामध्ये दिग्गज छायाचित्रकार मंकडा रविवर्मा यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. या दोघांच्या जोडीने मल्याळम सिनेमाला एक जागतिक ओळख मिळवून दिली. मंकडा रविवर्मा आणि अदूर यांचा नैसर्गिक प्रकाशावर खूप विश्वास आहे. त्यांच्या चित्रपटात कृत्रिम प्रकाशाचा वापर कमीत कमी असायचा. घरातील खिडकीतून येणारा उजेड किंवा झाडांच्या सावलीतून पडणारा प्रकाश यांचा वापर करून ते पात्रांच्या मनातील भावना पडद्यावर उतरवत असत. केरळमधील जुन्या वास्तू, हिरवागार निसर्ग आणि पावसाळी वातावरण मंकडा रविवर्मा यांनी अतिशय जिवंतपणे टिपलंय.
'स्वयंवरम' आणि 'एलिप्पथायम'मधील दृश्यं पाहताना प्रेक्षकांना आपण स्वतः त्या वातावरणात आहोत, असा भास होतो. मंकडा यांनी केवळ सुंदर दृश्यं टिपली नाहीत, तर कॅमेरा अँगलच्या माध्यमातून पात्रांचं अंतर्मन मांडलं. उदाहरण द्यायचं तर 'एलिप्पथायम' मध्ये मुख्य पात्राची हतबलता दाखवण्यासाठी ते अनेकदा पात्राला दाराच्या चौकटीत किंवा खांबांच्या अडथळ्यात चित्रित करत, त्यामुळं त्या पात्राचा कोंडमारा प्रेक्षकांना जाणवतो. अडूर यांच्याप्रमाणेच मंकडा यांची शैलीही 'मिनिमलिस्टिक' होती. अनावश्यक कॅमेरा हालचाली करण्याऐवजी ते एका स्थिर शॉटमध्ये जास्तीत जास्त अर्थ भरण्यावर भर देत. यामुळे चित्रपटात एक प्रकारची शांतता आणि गांभीर्य निर्माण होत असे. अडूर गोपालकृष्णन यांनी आपल्या कारकिर्दीतील बहुतांश महत्त्वाचे चित्रपट मंकडा रविवर्मा यांच्यासोबतच केले. या दोघांमधील सामंजस्य इतकं होतं, की अडूर यांना काय अपेक्षित आहे हे मंकडा शब्दांशिवाय ओळखून कॅमेऱ्यात कैद करत असत. मंकडा रविवर्मा यांच्या कॅमेऱ्याने अडूर यांच्या कथांना 'काव्यात्मक वास्तववाद' दिला. त्यांच्या छायाचित्रणामुळंच हे चित्रपट आजही तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य वाटत नाहीत.
अडूर यांनी भारतीय सिनेमाला ‘सिनेमाची भाषा’ शिकवली. त्यांच्या प्रभावामुळं अनेक तरुण दिग्दर्शकांनी व्यावसायिक गणितं सोडून कलात्मक चित्रपट तयार करण्याचं धाडस केलं. अडूर यांची शिस्त आणि त्यांचं सौंदर्यशास्त्र यांचा प्रभाव कन्नड सिनेमांत गिरीश कासारवल्ली, मल्याळी सिनेमांत शाजी एन. करुण आणि जागतिक स्तरावरील अनेक दिग्दर्शकांवर प़डलेला दिसतो. मराठीतील तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्यही कलाकृतींवर अडूर यांच्या शैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. आपली संस्कृती आणि मातीतील कथा प्रामाणिकपणे मांडल्या, तर त्या जागतिक स्तरावर कशा पोहोचवता येतात, याचा वस्तुपाठ अडूर यांनी नव्या पिढीला घालून दिला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महागडे सेट्स नसतानाही केवळ उत्कृष्ट पटकथा आणि तांत्रिक अचूकतेच्या जोरावर दर्जेदार चित्रपट कसे तयार करता येतात, हे अडूर यांनी सिद्ध केलंय.
अडूर गोपालकृष्णन हे केवळ दिग्दर्शक नाहीत, तर ते एक प्रगल्भ लेखक आणि विचारवंतही आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सर्व चित्रपटांच्या पटकथा त्यांनी स्वतः लिहिल्या आहेत. त्या केवळ संवादरूपी नसून, त्यात दृश्यांचं सविस्तर वर्णन असतं. शिवाय त्यांनी चित्रपट या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यातील 'सिनेमायुडे लोकं' (अर्थ : चित्रपटाचे जग) या पुस्तकाला १९८३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाच्या व्याकरणानुसार त्यांनी लिहिलेलं 'दी एक्सपीरियन्स ऑफ सिनेमा' हे पुस्तक चित्रपट अभ्यासाच्या विद्यार्थ्यांसाठी आजही मार्गदर्शक मानलं जातं.
अडूर यांनी सुरू केलेल्या  चित्रलेखा फिल्म सोसायटीमुळं केरळमधील सर्वसामान्य प्रेक्षकांना जागतिक सिनेमा, उदाहरणार्थ कुरोसावा, बर्गमन, गोदार्द यांचे चित्रपट, पाहण्याची संधी मिळाली. आज केरळमध्ये जो सिनेप्रेमी वर्ग आहे, त्याचं मोठं श्रेय अडूर यांच्या या उपक्रमाला जातं. थोडक्यात सांगायचं, तर अडूर गोपालकृष्णन यांनी भारतीय सिनेमाला 'मनोरंजन' या चौकटीतून बाहेर काढून, त्याला 'तात्त्विक आणि राजकीय अधिष्ठान' प्राप्त करून दिलं.
अडूर यांचं व्यक्तिमत्त्व शिस्तप्रिय आहे. चित्रपटाच्या सेटवर शांतता राखणं आणि प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म नियोजन करणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी त्यांच्या कलात्मक प्रवासात त्यांना मोठी साथ दिली. २०१५ मध्ये त्यांच्या निधनानंतर अडूर यांनी काही काळ चित्रपट निर्मितीपासून विश्रांती घेतली होती. इतके मोठे जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक असूनही, अडूर आजही अतिशय साधे आयुष्य जगतात. त्यांना अनावश्यक प्रसिद्धी किंवा झगमगाटात राहणे आवडत नाही. अगदी अलीकडं म्हणजे २०१६ मध्ये त्यांनी 'पिन्नेयुम' हा चित्रपट दिग्दर्शित केला. यात दिलीप आणि काव्या माधवन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट गुन्हेगारी आणि मानवी लोभावर आधारित होता. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही ते स्थानिक चित्रपट महोत्सवांमध्ये सक्रिय असतात. ते आजही नवीन पिढीच्या चित्रपटांचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्यावर परखड मते मांडतात. ते एका चित्रपटासाठी खूप वेळ घेतात. त्यांच्या दोन चित्रपटांमध्ये अनेकदा ४ ते ५ वर्षांचं अंतर असतं; कारण ते पटकथेवर खूप सखोल काम करतात. त्यांच्या चित्रपटांप्रमाणंच त्यांना खऱ्या आयुष्यातही केरळच्या निसर्गाची आणि तिथल्या पारंपरिक वास्तुकलेची खूप ओढ आहे.
अडूर गोपालकृष्णन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘इमेजेस/रिफ्लेक्शन्स', अर्थात बिंब-प्रतिबिंब या शीर्षकाचा एक अप्रतिम माहितीपट प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी ‘एनएफडीसी’साठी तयार केला आहे. हा माहितीपट केवळ अडूर यांच्या आयुष्याचा प्रवास नाही, तर त्यांच्या सिनेमाच्या भाषेचा शोध आहे. कासारवल्लींनी तो अतिशय संथ आणि लयबद्ध पद्धतीने मांडला आहे. या माहितीपटाची रचना पाच भागांत करण्यात आली आहे. कासारवल्लींनी अडूर यांच्या कामाची विभागणी त्यांच्या सिनेमातील प्रतिमांनुसार केली आहे. यात अडूर यांच्या चित्रपटांमधील ध्वनी, शांतता आणि प्रतिमा  यांचा वापर कसा केला जातो, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. अडूर गोपालकृष्णन हे केवळ कथा सांगत नाहीत, तर ते माणसाच्या अस्तित्वाचा, सत्तेचा आणि मानवी स्वभावातील गुंतागुंतीचा शोध घेतात. 'स्वयंवरम'पासून ते त्यांच्या नंतरच्या चित्रपटांपर्यंतचा हा प्रवास यात उलगडतो. अडूर यांच्यावर सत्यजित राय यांच्या सिनेमाचा असलेला प्रभाव आणि त्यातून त्यांनी स्वतःची एक वेगळी, स्वतंत्र 'मल्याळम' सिनेसृष्टी कशी उभी केली, याचं चित्रण या माहितीपटात आहे. केरळची भूमी, तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती त्यांच्या सिनेमात कशी अविभाज्य भाग असते, हे कासारवल्लींनी बारकाईनं टिपलं आहे. अडूर स्वतः त्यांच्या सेटवरचे अनुभव, त्यांची शिस्त आणि कॅमेऱ्यामागचा त्यांचा दृष्टिकोन यावर बोलतात. अस्पष्ट शेवट किंवा ज्याला आपण 'ओपन एंडेड' सिनेमे म्हणतो, तो अडूर यांच्या सिनेमाचा आत्मा आहे. प्रेक्षकांना सगळंच ताटात वाढून न देता, त्यांना विचार करायला लावणं आणि सिनेमा संपल्यावरही तो डोक्यात तसाच चालू राहणं, हे त्यांच्या शैलीचं वैशिष्ट्य. एक दिग्दर्शक प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा कसा आदर करतो, हे कासारवल्लींनी या माहितीपटात खूप प्रभावीपणे मांडलंय. या दोन्ही दिग्दर्शकांनी या माहितीपटात मारलेल्या गप्पा अनेक सिनेमाप्रेमींना पर्वणीसारख्याच वाटतील, यात शंका नाही.
अडूर गोपालकृष्णन यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तयार केलेले माहितीपट. चित्रपटांप्रमाणेच माहितीपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि कलेचं महत्त्वपूर्ण दस्तऐवजीकरण त्यांनी केलं आहे. अडूर यांनी प्रामुख्याने केरळच्या समृद्ध कलापरंपरांवर आधारित दर्जेदार माहितीपट तयार केले आहेत. यात कथकली, कुडियाट्टम आणि मोहिनीअट्टम यांसारख्या शास्त्रीय नृत्य आणि नाट्य प्रकारांचा सखोल अभ्यास पाहायला मिळतो. याशिवाय त्यांनी कथकली कलाकार 'गुरू चेंगन्नूर' आणि 'कलामंडलम गोपी' यांसारख्या थोर कलाकारांच्या जीवनावर आणि कलेवर आधारित माहितीपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या ५४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३० लघुपट आणि माहितीपट तयार केले आहेत. त्यांचे माहितीपट केवळ माहिती देणारे नसून, ते कलात्मक आणि सौंदर्यानुभव देणारे असतात. त्यांनी या माध्यमाचा वापर करून पारंपरिक कलांचे बारकावे जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. सन २००० मध्ये आलेला 'कलामंडलम गोपी' आणि २००२ मध्ये आलेला 'कुडियाट्टम' हे त्यांचे काही गाजलेले माहितीपट आहेत.
एवढी उत्तुंग कामगिरी करणारे अ़डूर गोपालकृष्णन यांना भरपूर पुरस्कार लाभले, यात आश्चर्य नाही. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पुरस्कार विजेत्यांपैकी एक आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकूण १६ वेळा मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना  स्वयंवरम मुखमुखम, अनंतराम, मथिलुकल आणि आणि विधेयन या चित्रपटांसाठी, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून स्वयंवरम, एलिप्पथायम, कथपुरुषन आणि निजालुकुथू या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. केंद्र सरकारतर्फे १९८४ मध्ये पद्मश्री आणि २००६ मध्ये पद्मविभूषण हे नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटचा पुरस्कार आणि फ्रेंच सरकारचा 'लिजन ऑफ ऑनर' हा अत्यंत मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना सन २००४ चा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अशा या श्रेष्ठ दिग्दर्शकाला मानाचा मुजरा…

----

No comments:

Post a Comment