31 Aug 2026

रुपेरी मुकुटाचे मानकरी – मनोजकुमार

देशभक्त ‘भारतकुमार’
----------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)


श्रोते हो, नमस्कार.

'पुणे आकाशवाणी'च्या 'रुपेरी मुकुटाचे मानकरी' या विशेष मालिकेमध्ये सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास हा केवळ मनोरंजनाचा इतिहास नाही, तर तो या देशाच्या बदलत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रवासाचा आरसा आहे. या रुपेरी पडद्याला आपल्या राष्ट्रभक्तीने, सशक्त कथाभागाने आणि अनोख्या दिग्दर्शन शैलीने सजवणारे अनेक मानकरी लाभले. आज आपण अशाच एका ज्येष्ठ कलाकाराच्या प्रवासाला उजाळा देणार आहोत. सर्व जग त्यांना 'भारतकुमार' या नावाने ओळखतं. होय, २०१५ च्या 'दादासाहेब फाळके' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्याविषयीच आपण बोलत आहोत.

श्रोतेहो, २४ जुलै १९३७ रोजी तत्कालीन ब्रिटिश इंडियातील अबोटाबाद (आताचे पाकिस्तान) येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात मनोजकुमार यांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं हरिकृष्ण गिरी गोस्वामी. लहानपणापासूनच शांत, पण डोळ्यात काही तरी वेगळं करून दाखवण्याची चमक असलेला हा मुलगा. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली आणि लाखो कुटुंबांप्रमाणेच गोस्वामी कुटुंबालाही आपलं घरदार सोडून निर्वासित व्हावं लागलं. अवघ्या दहा वर्षांच्या हरिकृष्णने तो रक्तरंजित इतिहास, तो संघर्ष आणि आपल्या माणसांची झालेली परवड अतिशय जवळून पाहिली. दिल्लीच्या किंग्जवे कॅम्पमधील शरणार्थी छावणीत त्यांचं कुटुंब दिवस काढत होतं. बालपणीच्या या अनुभवांनी मनोजकुमार यांच्या संवेदनशील मनावर कधीही न पुसले जाणारे संस्कार केले. त्याचे पडसाद पुढे त्यांच्या सिनेमांमधून देशप्रेमाच्या रूपाने उमटले.
दिल्लीच्या 'हिंदू कॉलेज'मधून पदवी घेत असतानाच, हरिकृष्ण यांच्या मनावर रुपेरी पडद्याची जादू मोहिनी घालत होती. त्या काळात अभिनेते दिलीपकुमार यांचा प्रचंड दबदबा होता. १९४९मध्ये आलेल्या 'शबनम' या चित्रपटात दिलीपकुमार यांनी एका पात्राची भूमिका केली होती, ज्याचे नाव होते 'मनोज'.  तो सिनेमा आणि दिलीपकुमार यांचा अभिनय पाहून १२ वर्षांचा हरिकृष्ण इतका प्रभावित झाला, की  त्यानं मनोमन ठरवून टाकलं, 'मी जर कधी नट झालो, तर माझं नाव मनोजकुमार असेल!' एका सामान्य तरुणाने आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या पात्रावरून स्वतःचं नाव बदलणं, हा केवळ एक बालहट्ट नव्हता, तर तो चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा एक दृढ निश्चय होता.

हाच ध्येयवेडा तरुण खिशात काही रुपये आणि डोळ्यात अथांग स्वप्ने घेऊन मुंबईत दाखल झाला. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. स्टुडिओचे चकरा मारणे, नकारांचा सामना करणे हा संघर्ष सुरूच होता. अखेर १९५७ मध्ये 'फॅशन' या चित्रपटात त्यांना एक अतिशय छोटी भूमिका मिळाली; पण खऱ्या अर्थाने त्यांचा चेहरा लोकांच्या नजरेत आला तो १९६० च्या 'कांच की गुडिया' या चित्रपटातून. या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून मनोजकुमार यांनी रुपेरी पडद्यावर अधिकृतपणे पाऊल ठेवलं. या सिनेमात सइदा खान नामक नटीसमोर नायकाची भूमिका करण्याची संधी मनोजकुमार यांना लाभली. अर्थात हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला, तेही कळलं नाही. मात्र, १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला मनोजकुमार यांनी सिनेसृष्टीत आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. 'कांच की गुडिया'नंतर 'पिया मिलन की आस' आणि 'रेशमी रुमाल' हे चित्रपट आले. मात्र, त्यांनाही फारसं यश मिळालं नाही. त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला तो  १९६२ मध्ये आलेल्या 'हरियाली और रास्ता' या चित्रपटाने. विजय भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात मनोजकुमार आणि माला सिन्हा यांची जोडी रसिकांना प्रचंड आवडली. 'इब्तदा-ए-इश्क में हम सारी रात जागे' किंवा 'लाखो तारे आसमां में' ही गाणी आजही जुन्या पिढीच्या ओठांवर रेंगाळतात. या चित्रपटामुळे मनोजकुमार यांच्याकडे एक 'स्टार रोमँटिक हिरो' म्हणून पाहिलं जाऊ लागलं. सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या सोज्वळ आणि देखण्या रूपामुळे एक रोमँटिक हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली होतीच. पण 'मनोजकुमार' नावाच्या या हिऱ्याला अजून निराळेच पैलू पडायचे होते...
मुळात ते केवळ रोमँटिक भूमिकांमध्ये अडकून राहणारे नट नव्हते. १९६४ मध्ये राज खोसला यांनी त्यांना 'वह कौन थी' या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका दिली. साधना यांच्या गूढ व्यक्तिमत्त्वाला जोड देणारा डॉक्टर आनंद त्यांनी पडद्यावर अप्रतिम जिवंत केला. मदनमोहन यांचं संगीत आणि मनोजकुमार यांचा संयत अभिनय यांनी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. यानंतर १९६५ मध्ये आलेला 'गुमनाम' हाही असाच एक मैलाचा दगड ठरलेला सस्पेन्स सिनेमा. 'हिमालय की गोद में' या चित्रपटातून त्यांनी एका शहरातून आलेल्या डॉक्टरची, ग्रामीण भागातील संघर्षाची कथा मांडली. यातही माला सिन्हा त्यांची नायिका होती. आशा पारेख नायिका असलेला ‘दो बदन’ हा १९६६ मधला चित्रपटही लोकप्रिय ठरला. एकामागून एक येणारे हे हिट चित्रपट मनोजकुमार यांना यशाच्या शिखरावर घेऊन जात होते. पण याच काळात, त्यांच्यातल्या एका खऱ्या देशप्रेमी कलाकाराचा उदय होणार होता...
१९६५ हे वर्ष मनोजकुमार यांच्या आयुष्याला आणि कारकिर्दीला एक संपूर्ण नवीन वळण देणारं ठरलं. देशाभिमानी मनोजकुमार यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित 'शहीद' या चित्रपटाची कथा लिहिली. केवल कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी स्वतः भगतसिंग यांची मध्यवर्ती भूमिका साकारली. लहानपणी फाळणीच्या वेदना सोसलेल्या मनोजकुमार यांनी या भूमिकेत आपले सर्वस्व ओतलं. त्यांची ती करारी नजर, भगतसिंगांची ती देशप्रेमाची ऊर्मी त्यांनी पडद्यावर अशी काही साकारली, की प्रेक्षक चित्रपटगृहात गहिवरले. पं. रामप्रसाद बिस्मिल यांच्या रचना आणि प्रेम धवन यांचं संगीत असलेल्या या चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. या चित्रपटानंतर देशाचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री इतके प्रभावित झाले, की त्यांनी मनोजकुमार यांना एक खास आवाहन केलं... आणि तिथूनच भारतीय चित्रपटसृष्टीला लाभला एक नवा 'भारत'!
श्रोते हो, 'शहीद' चित्रपटाचा विशेष खेळ दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. लालबहादूर शास्त्री यांनी हा चित्रपट पाहिला आणि भारावून गेलेले शास्त्रीजी थेट मनोजकुमार यांच्याजवळ आले. त्यांनी मनोजकुमार यांचे कौतुक तर केलेच; पण सोबतच एक विचार मांडला. ते म्हणाले, 'मनोज, मी नुकताच 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला आहे. या घोषणेवर, आपल्या देशातल्या शेतकरी आणि जवानांवर आधारित एखादा चित्रपट तू बनवू शकलास तर देशहितासाठी ते मोठे योगदान ठरेल.' देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या मनोजकुमार यांच्यासाठी हा केवळ एक सल्ला नव्हता, तर पंतप्रधानांनी दिलेला जणू एक आदेश होता.
दिल्लीहून मुंबईला परतणाऱ्या २४ तासांच्या रेल्वे प्रवासात मनोजकुमार झोपले नाहीत. त्यांच्या डोक्यात शास्त्रीजींचा तो नारा घुमत होता. मुंबईत उतरेपर्यंत त्यांच्या मनात एका नव्या चित्रपटाची संपूर्ण कथा तयार झाली होती, तो चित्रपट म्हणजेच 'उपकार'! या चित्रपटाच्या निमित्ताने मनोजकुमार यांनी केवळ कथा-पटकथा लिहिली नाही, तर पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उपकार' या चित्रपटानं इतिहास रचला. यात मनोजकुमार यांनी 'भारत' नावाच्या एका सुपुत्राची भूमिका साकारली. तो आपल्या भावाच्या शिक्षणासाठी शेतात घाम गाळतो आणि वेळ पडल्यास देशाच्या रक्षणासाठी सीमेवर बंदूकही हाती धरतो. हा सिनेमा इतका गाजला, की इथून पुढे मनोजकुमार यांचं नावच 'भारतकुमार' पडलं!
दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार यांची दृष्टी खूप मोठी होती. 'उपकार'च्या अफाट यशानंतर त्यांनी भारतीय संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना करणारा 'पूरब और पश्चिम' (१९७०) हा चित्रपट आणला. परदेशात जाऊन आपली संस्कृती विसरणाऱ्या तरुण पिढीला 'भारत'ने पुन्हा एकदा आपल्या मातीची थोरवी पटवून दिली. यातलं ‘है प्रीत जहाँ की रीत सदा’ हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी यांचं संगीत होतं. यानंतर १९७४ मध्ये आलेला 'रोटी कपडा और मकान' हा चित्रपट त्या काळातील वाढती बेरोजगारी, गरिबी आणि सामाजिक दुरवस्थेवर अचूक बोट ठेवणारा ठरला. या सामाजिक आशयाच्या चित्रपटासाठी मनोजकुमार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं दुसरं फिल्मफेअर ॲवॉर्ड मिळालं. अमिताभ, शशी कपूर आणि झीनत अमान यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरला. त्यानंतर मनोजकुमार यांची हेमामालिनीबरोबर जोडी जमली. या दोघांचे संन्यासी (१९७५) आणि दस नंबरी (१९७६) हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर काही काळ त्यांच्या कारकि‍र्दीत थोडा खंड पडला. अखेर १९८१ मध्ये मनोजकुमार यांना त्यांचे आदर्श अभिनेते दिलीपकुमार यांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली ती ‘क्रांती’द्वारे. एका अर्थानं त्यांचं स्वप्नच पूर्ण झालं होतं. हाच सिनेमा त्याच्या कारकि‍र्दीतला खऱ्या अर्थाने अखेरचा मोठा हिट सिनेमा ठरला. एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याची कथा सांगणारा हा त्यांचा सिनेमा आणि त्यातली गाणीही गाजली. यातही हेमामालिनी होती. उत्कृष्ट गाणी, तगडी स्टारकास्ट आणि समाजप्रबोधन ही मनोजकुमार यांच्या दिग्दर्शनाची त्रिसूत्री झाली होती. दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार यांनी नेहमीच भव्यता आणि राष्ट्रीय अस्मिता यांचा सुवर्णमध्य साधला.
या देशभक्तिपर चित्रपटांव्यतिरिक्त मनोजकुमार यांचे इतरही काही चित्रपट चांगले चालले. १९७२ मध्ये आलेल्या ‘बेइमान’साठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या वर्षी त्यांचा अभिनेत्री नंदासोबतचा ‘शोर’ आला. हा सिनेमा तेव्हा गाजला नसला, तरी कालांतरानं या सिनेमावर समीक्षक-रसिकांच्या पसंतीची मोहोर उमटली. ‘इक प्यार का नगमा है’ हे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायिलेलं प्रसिद्ध युगुलगीत (संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल) याच चित्रपटातलं.

केवळ हेच नव्हे तर मनोजकुमार यांच्या बहुतांश चित्रपटांतील गाणी चांगलीच गाजली. याचं कारण मनोजकुमार यांना संगीताची उत्तम जाण होती. ते उत्तम कानसेन होते! त्यांच्या सिनेमांमधली गाणी केवळ ऐकण्यासारखी नसून ती पडद्यावर पाहणे हासुद्धा एक डोळ्यांचा उत्सव असायचा. कल्याणजी-आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल या दिग्गज संगीतकारांशी त्यांचं एक वेगळंच नातं होतं. 'दिवानी मस्तानी' गाणी असोत, देशभक्तिपर गीते असोत की विरहाची गाणी; मनोजकुमार यांच्या सिनेमातले संगीत काळाच्या पलीकडं जाणारं ठरलं. मुकेश, महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाचा त्यांनी आपल्या पात्रांसाठी अप्रतिम वापर करून घेतला. उपकार सिनेमातलं गाजलेलं ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे-मोती’ हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गाणं (संगीत कल्याणजी-आनंदजी) आजही २६ जानेवारी, १५ ऑगस्टला वाजवलं जातं. ‘क्रांती’मधलं ‘ज़िंदगी की ना टुटे लड़ी’ हे नितीन मुकेश आणि लतादीदींच्या आवाजातलं गाणंही असंच प्रचंड लोकप्रिय ठरलं.
‘क्रांती’नंतर मात्र मनोजकुमार यांची कारकीर्द उतरणीला लागली. त्यांनी १९८९ मध्ये 'क्लर्क' नावाचा एक सामान्य सिनेमा काढला होता. महंमद अली आणि झेबा बख्तियार या पाकिस्तानी नट-नट्यांना त्यानं या सिनेमातून भारतीय पडद्यावर आणलं होतं, हेच काय ते या सिनेमाचं वैशिष्ट्य. ‘मैदान-ए-जंग’ (१९९५) या सिनेमानंतर मनोजकुमार यांनी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला. नंतर त्यांनी मुलगा कुणाल गोस्वामी याच्यासाठी ‘जयहिंद’ नामक सिनेमा १९९९ मध्ये काढला. मात्र, तोही साफ अपयशी ठरला. त्या वर्षी एक गोष्ट मात्र चांगली झाली. ‘फिल्मफेअर’नं मनोजकुमार यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं.
मनोजकुमार यांना आणखी एक ओळख मिळवून दिली ती ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाने. साईभक्त असलेल्या मनोजकुमार यांनीच हा सिनेमा लिहिला होता आणि त्यात कामही केलं होतं. शिर्डीकरांनीही तेथील एक रस्त्याला मनोजकुमारचे नाव देऊन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीय.
केवळ संगीतच नाही, तर अभिनेता म्हणून त्यांची एक अतिशय वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. संवाद फेकत असताना किंवा विचारात गढलेले असताना चेहऱ्यावर, डोळ्यांवर हात ठेवण्याची त्यांची एक अजब लकब होती. त्याची खूप नक्कलही झाली. २००७ मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुख खाननं मनोजकुमार यांची तशीच नक्कल करणारं एक पात्र दाखवलं होतं. त्यानंतर संतापून मनोजकुमार यांनी हे प्रकरण कोर्टात नेलं. मात्र, नंतर त्यात कोर्टाबाहेर तडजोड झाली आणि ते प्रकरण मिटलं.
भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीचा एक नवा रंग देणाऱ्या, सिनेमाच्या माध्यमातून समाज जोडणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याचा सन्मान करणं म्हणजे एका युगाचा सन्मान करण्यासारखं होतं. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या याच अफाट आणि अजरामर योगदानासाठी भारत सरकारनं २०१५मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'नं सन्मानित केलं. जेव्हा ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आले, तेव्हा संपूर्ण सभागृहाने उभे राहून या 'भारतपुत्रा'ला मानवंदना दिली. हा सन्मान म्हणजे त्यांच्या ध्येयवेड्या प्रवासाला मिळालेला एक सुवर्णमुकुट होता.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या निमित्तानं तेव्हा ७९ वर्षं वय असलेला हा बुजुर्ग अभिनेता पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकला. तोवर ते चित्रपटसृष्टीच्या विस्मरणात गेले होते. त्यांच्या असलेल्या वा नसलेल्या अभिनयगुणांविषयी, ठोकळेबाज अभिनयशैलीविषयी, त्यांच्या देशप्रेमी सिनेमांच्या बाळबोधपणाविषयी चर्चा होत राहील; मतभिन्नताही असेल... पण मनोजकुमार यांचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि हा अभिनेता कधीही गैरकारणांसाठी प्रसिद्धीस आला नाही, या बाबी एक माणूस म्हणून त्याचं मोठेपण सांगणाऱ्या आहेत, हे सर्वच जण मान्य करतील.
चार एप्रिल २०२५ रोजी मनोजकुमार यांचं मुंबईत निधन झालं. ते देहानं आपल्यातून निघून गेले असले, तरी आपल्या अभिनयातून आणि चित्रपटांतून त्यांनी रुपेरी पडद्यावर कोरलेलं 'भारत' हे नाव आणि दिलेला राष्ट्रप्रेमाचा संदेश प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम जिवंत राहील. अशा या थोर देशभक्त कलाकाराला, दिग्दर्शकाला आणि रुपेरी पडद्याच्या खऱ्या मानकर्‍याला 'पुणे आकाशवाणी'चा मानाचा मुजरा.


हा भाग यूट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

सोहराब मोदी यांच्यावरील भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

---

24 Aug 2026

रुपेरी मुकुटाचे मानकरी – रजनीकांत

झगमगता सुपरस्टार, साधा माणूस
-----------------------------------------


(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी मुकुटाचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी अडूर गोपालकृष्णन यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

श्रोते हो, नमस्कार!
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज, महान कलाकार होऊन गेले. अनेक कलाकारांची रुपेरी कारकीर्द थक्क करणारी, अविस्मरणीय अशी आहे. मात्र, फारच थोड्या कलावंतांना त्यांच्या हयातीतच ‘दंतकथा’ होण्याचं भाग्य लाभलं आहे. सुपरस्टार रजनीकांत हे असंच एक नाव. केवळ तमिळच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील मोजक्या महानायकांमध्ये त्यांच्या नावाचा सहज समावेश करता येईल. तमिळमध्ये ‘थलैवा’ (अर्थ नेता किंवा बॉस) या विशेषणाने ओळखले जाणारे रजनीकांत यांची रुपेरी कारकीर्दही त्यांच्या पडद्यावरील प्रतिमेप्रमाणेच भव्यदिव्य, विस्मयचकित करणारी आहे. विशेष म्हणजे पडद्यावर अतिशय ग्लॅमरस, सुपरहिरो असणारे रजनीकांत प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय साधे आहेत. कुठल्याही मेकअपविना ते साधेपणाने सर्वत्र वावरत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी आणखीनच आपुलकी वाटते.
रजनीकांत यांच्या चित्रपट प्रवासाची सफर विलक्षण आहे. एका सामान्य बस कंडक्टरपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जगातील एका अद्वितीय 'सुपरस्टार'च्या रूपाने लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे. ज्यांच्या केवळ एका नजरेने, गॉगल फिरवण्याच्या एका शैलीने आणि पडद्यावरच्या 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर चित्रपटगृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट होतो असा हा सुपरस्टार अभिनेता आहे.

श्रोतेहो, पडद्यावर दिसणारं ग्लॅमर, नयनरम्य रोषणाई आणि लाखो चाहत्यांचं प्रेम यांच्या मागं अनेकदा एका अत्यंत खडतर संघर्षाची कहाणी लपलेली असते. रजनीकांत यांचा प्रवासही असाच संघर्षाने आणि जिद्दीने भरलेला आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय मराठी भाषक कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. होय, रजनीकांत यांचं मूळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड! आईचं नाव जिजाबाई आणि वडील रामोजीराव. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. शिवाजी अवघा पाच वर्षांचा असतानाच त्याच्या आईचं छत्र हरपलं.
वयाच्या अतिशय कोवळ्या टप्प्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, घरातल्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी लहानग्या शिवाजीनं अनेक प्रकारची कामं केली. हमालीकाम करण्यापासून ते सुतारकामापर्यंत अनेक छोटी-मोठी कामं त्यानं केली. मोठा झाल्यावर शिवाजीरावांना बंगळुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली.
बंगळुरूत १०४ नंबरच्या बसमध्ये तिकीट फाडणारा हा तरुण कंडक्टर... पण तो केवळ तिकीट फाडत नव्हता! तिकीट देण्याची त्याची वेगळीच शैली, सुट्टे पैसे देण्याची ढब आणि प्रवाशांशी संवाद साधण्याचं कसब यामुळे त्या बसमधील प्रवासी शिवाजीरावांच्या प्रेमात पडायचे. मित्रांनो, अंगात अभिनयाची आणि कलेची ठिणगी अशी आधीपासूनच पेटलेली होती. बस कंडक्टर म्हणून काम करतानाच ते कन्नड नाटकांमध्ये अभिनय करू लागले. 'दुर्योधन'सारख्या पौराणिक भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारल्या.
अंगातील कलागुणांना अधिक धार यावी म्हणून शिवाजीरावांनी तत्कालीन मद्रास शहरात जाऊन मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचा डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. कंडक्टरची नोकरी सोडून अनोळखी शहरात, अनोळखी भाषेत नशीब आजमावणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण त्यांचा मित्र राजबहादूर याने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि आर्थिक मदतही केली.
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असतानाच, तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक के. बालचंदर यांची नजर या मराठी तरुणावर पडली. शिवाजीराव यांच्या डोळ्यांतील ती विशिष्ट चमक, शरीराची चपळाई आणि संवादफेकीची वेगळी शैली बालचंदर यांनी टिपली. बालचंदर यांनी या तरुणाला तमिळ शिकण्याचा सल्ला दिला आणि १९७५ मध्ये आलेल्या 'अपूर्व रागांगल' या चित्रपटातून त्यांना पहिली संधी दिली. याच चित्रपटादरम्यान के. बालचंदर यांनी 'शिवाजीराव गायकवाड' हे नाव बदलून त्यांना एक नवं नाव दिलं - रजनीकांत! 'अपूर्व रागांगल' चित्रपटात रजनीकांत यांची भूमिका अवघ्या काही मिनिटांची होती. चित्रपटाच्या शेवटी एका दरवाजाची कडी उघडून आत येणारा तो तरुण... प्रेक्षकांना तेव्हा कल्पनाही नव्हती, की दरवाजाची कडी उघडून आत आलेला हा नवा चेहरा पुढे जाऊन भारतीय सिनेसृष्टीचे सर्व दरवाजे स्वतःच्या हिमतीवर उघडणार आहे!
श्रोतेहो, सुरुवातीच्या काळात रजनीकांत यांना मुख्य नायकापेक्षा खलनायकाच्या आणि ग्रे-शेड्स असलेल्या भूमिका मिळाल्या. 'मुन्द्रू मुदिचू', '१६, वायाथिनिले', 'अवरगल' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी साकारलेला नकारात्मक चेहरा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. सिगारेट हवेत उडवून ओठांत धरण्याची त्यांची खास स्टाइल, चष्मा फिरवून डोळ्यांवर चढवणं आणि त्यांची जलद हालचाल प्रेक्षकांना प्रचंड भावू लागली.
पण के. बालचंदर आणि इतर दिग्दर्शकांच्या लवकरच लक्षात आलं, की हा अभिनेता केवळ खलनायक राहण्यासाठी जन्माला आलेला नाही. प्रेक्षक त्यांच्या स्टाइलवर आणि पडद्यावरील वावरावर फिदा होत होते.
'भैरवी' हा १९७८ मध्ये आलेला चित्रपट रजनीकांत यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसले. आणि याच चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान 'भैरवी'चे वितरक कलाईपुली एस. थानू यांनी मद्रासच्या रस्त्यांवर रजनीकांत यांचे ३५ फुटी कटआउट लावून त्यांना पदवी दिली - 'सुपरस्टार'!
तिथून पुढे 'मुथू', 'बाशा', 'अन्नामलाई', 'यजमान', 'पदयाप्पा' अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. 'बाशा' या चित्रपटाने तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत इतिहास घडवला. एका साध्या रिक्षाचालकापासून ते अंडरवर्ल्डच्या डॉनपर्यंतचा रजनीकांत यांचा तो अभिनय प्रेक्षकांच्या कायमचा स्मरणात राहिला.

तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांवर हुकूमत गाजवल्यानंतर रजनीकांत यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. १९८३ मध्ये आलेल्या 'अंधा कानून' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. अमिताभ बच्चन, हेमामालिनी यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीतही रजनीकांत यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली.
त्यानंतर 'गिरफ्तार', 'हम', 'चालबाज', 'इन्स्पेक्टर धनुष', 'फूल बने अंगारे' यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी चांगलं यश मिळवलं. 'हम' चित्रपटातील अमिताभ बच्चन, गोविंदा आणि रजनीकांत या तिघांची जुगलबंदी आजही प्रेक्षकांना पाहायला आवडते.
पण रजनीकांत केवळ ॲक्शन आणि स्टाइलपुरते मर्यादित नव्हते. त्यपलीकडे जाऊन रजनीकांत साकारलेल्या त्यांच्या काही भूमिका भारतीय सिनेमाच्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. 'मुथू'मधील त्यांचा सहजाभिनय, 'तलपती'मधील मणिरत्नम यांच्या दिग्दर्शनाखाली दाखवलेला भावूक आणि सशक्त अभिनय किंवा 'चंद्रमुखी'मधील सायकॉलॉजिकल थ्रिलर ड्रामा... रजनीकांत यांनी सिद्ध केलं, की ते केवळ एक स्टाइल आयकॉन नाहीत, तर एक परिपक्व आणि ताकदीचे अभिनेते आहेत. 'तलपती' या १९९१ मध्ये आलेल्या चित्रपटात रजनीकांत यांनी ‘सूर्या’ हे पात्र साकारले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या या चित्रपटात महाभारतातील कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीचा आधुनिक पट मांडला होता. रजनीकांत यांनी साकारलेला अनाथ आणि स्वाभिमानी 'सूर्या' प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडला. मामुट्टींसोबतची त्यांची जुगलबंदी अद्भुत होती.
'बाशा' या १९९५ मध्ये आलेल्या चित्रपटात त्यांनी माणिक्यम या पात्राची भूमिका केली. एका साध्या, शांत रिक्षाचालकाचे जेव्हा भूतकाळातील भयानक डॉन 'माणिक बाशा'मध्ये रूपांतर होते, तो क्षण पडद्यावर पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. कमर्शियल सिनेमाचा तो एक मानदंड मानला जातो.
रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'मुथू' हा चित्रपट जेव्हा जपानमध्ये 'मुथू: ओदोरू महाराजा' या नावाने प्रदर्शित झाला, तेव्हा जपानी प्रेक्षकांनी रजनीकांत यांना डोक्यावर घेतले! जपानमध्ये रजनीकांत यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. एका भारतीय अभिनेत्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः आशियाई देशांत एवढी लोकप्रियता मिळणे ही एक दुर्मीळ गोष्ट होती.
'चंद्रमुखी' या २००५ मधील चित्रपटातील डॉ. सर्वणन आणि वेत्तय्यान राजा या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात त्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञासोबतच क्रूर राजा 'वेत्तय्यान' अशी दुहेरी भूमिका साकारून आपल्या अभिनयाची अफाट ताकद दाखवून दिली.
काळासोबत रजनीकांत यांनी स्वतःला बदलले. नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत काम करत त्यांनी 'शिवाजी : द बॉस', 'रोबोट' (एंधिरन), 'कबाली', 'कााला' आणि 'जेलर' यांसारखे चित्रपट दिले.
एस. शंकर दिग्दर्शित 'रोबोट' चित्रपटात त्यांनी 'डॉ. वशीकरण' हा शास्त्रज्ञ आणि 'चिट्टी ' हा रोबोट अशा दोन्ही भूमिका ज्या ताकदीने साकारल्या, त्याने भारतीय व्हिज्युअल इफेक्ट्स चित्रपटांना एक नवी दिशा दिली. ‘रोबोट’ चित्रपट तुफान गाजला. पुढं त्याचा सीक्वेलही आला. मात्र, पहिला भाग अतिशय  उत्कृष्ट जमून आलेला होता. ऐश्वर्या राय या चित्रपटात त्यांची नायिका होती. वयाच्या सत्तरीतही जेव्हा रजनीकांत पडद्यावर चालत येतात, तेव्हा ‘कबाली' किंवा 'जेलर'मधील त्यांची एंट्री पाहून चित्रपटगृहाचे छत हादरून जाते! म्हणूनच त्यांना श्रद्धेने आणि प्रेमाने नाव मिळाले - 'थलैवा', म्हणजेच 'नेता' किंवा 'नायक'!
चित्रपटातील अलौकिक यश, अफाट संपत्ती आणि जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे प्रेम मिळूनही रजनीकांत नावाचा हा माणूस जमिनीवरच राहिला. पडद्यावर अतिशय भपकेबाज, रंगीबेरंगी आणि स्टायलिश दिसणारे रजनीकांत वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधे, धोती-कुर्ता परिधान करणारे, पांढऱ्या दाढी-केसांसह आणि कोणत्याही मेकअपशिवाय लोकांसमोर येणारे अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व आहे.
असं म्हटलं जातं, की जगात दोनच प्रकारचे अभिनेते असतात - एक ज्यांना चित्रपट प्रसिद्ध करतो, आणि दुसरे म्हणजे रजनीकांत, जे स्वतः एका संपूर्ण चित्रपटापेक्षा मोठे असतात! रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचे किस्से आणि दंतकथा इतक्या अद्भुत आहेत, की जगातील कोणत्याही अभिनेत्याच्या वाट्याला अशी लोकमान्यता आलेली नाही. इंटरनेटच्या जगात 'रजनीकांत यांचे विनोद' किंवा 'रजनीकांत फॅक्ट्स' हा एक स्वतंत्र प्रकारच झाला. ‘रजनीकांत यांना घड्याळाची गरज नसते, वेळ ठरवते की रजनीकांत कधी काय करतील!’ किंवा ‘सूर्य उगवत नाही, रजनीकांत डोळे उघडतात!’ अशा हलक्या-फुलक्या चटकदार विनोदांमधून प्रेक्षकांनी त्यांच्या अचाट क्षमतेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
पण या केवळ दंतकथा नव्हत्या! जेव्हा त्यांचा एखादा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतो, तेव्हा दक्षिण भारतात अक्षरशः सण साजरा केला जातो. भल्या पहाटे तीन किंवा चार वाजताचे शो हाऊसफुल्ल होतात, त्यांच्या ५०-५० फुटी कटआउट्सना दुधाचा अभिषेक घातला जातो आणि रस्तेच्या रस्ते फटाक्यांच्या आवाजाने दणाणून जातात. अनेक कंपन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना अधिकृत सुट्टी जाहीर करतात! ही नुसती लोकप्रियता नसून, हे प्रेक्षकांनी रजनीकांत यांचं एक प्रकारे केलेलं 'दैवतीकरण’च आहे.
श्रोते हो, रजनीकांत आणि महाराष्ट्र यांच्या नात्याविषयी सांगायलाच हवं. संपूर्ण जगानं जरी त्यांना 'तमिळ सिनेसृष्टीचे सुपरस्टार' म्हणून डोक्यावर घेतलं असलं, तरी रजनीकांत यांचा मूळ पाया आणि संस्कार मराठी मातीतलेच आहेत! छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ज्यांचं नाव 'शिवाजीराव' ठेवलं गेलं, तो हा मराठी मुलगा. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आराध्य दैवत. ते जरी जन्माने बंगळुरूचे असले आणि त्यांची कर्मभूमी चेन्नई असली, तरी आजही रजनीकांत आपल्या कुटुंबात अतिशय स्पष्ट आणि अस्खलित मराठी बोलतात. कोल्हापूर, पुणे आणि मुंबईशी त्यांचा जुना स्नेह आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील आठवणींना उजाळा दिला आहे. एका मूळ मराठी माणसाने दाक्षिणात्य तमिळ सिनेसृष्टीवर गेल्या ५० वर्षांपासून अखंड एकछत्री साम्राज्य गाजवावं, ही प्रत्येक मराठी मनासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
तमिळनाडूतील राजकारणात अभिनेत्यांनी राजकारणात येऊन थेट मुख्यमंत्रिपद मिळविण्याची परंपरा आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता ते आताचे सी. जोसेफ विजय यांच्यापर्यंत ही परंपरा सुरूच आहे. रजनीकांत यांची अफाट लोकप्रियता पाहता, तेही या वाटेने जातील, असं वाटत होतं. मात्र, रजनीकांत यांना राजकारणाची वाट जमली नाही. त्यांनी नंतर त्यापासून दूर राहणंच पसंत केलं. अर्थात त्यांच्या लोकप्रियतेवर याचा अजिबात परिणाम झालेला नाही.
त्यांच्या या प्रदीर्घ, यशस्वी आणि समर्पित चित्रपट प्रवासाचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना २००० मध्ये 'पद्मभूषण' आणि २०१६ मध्ये 'पद्मविभूषण' या नागरी सन्मानानं सन्मानित केलं.  २०१९ मध्ये ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा संपूर्ण सिनेसृष्टीने आणि देशाने उभे राहून या महानायकाला सलाम केला. पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत यांनी अत्यंत नम्रपणे आपले हे यश आपले जुने मित्र राजबहादूर, आपले गुरू के. बालचंदर आणि आपले बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांना समर्पित केलं. एका कंडक्टरपासून सुरू झालेला हा प्रवास फाळके पुरस्काराच्या सुवर्णकमळापर्यंत पोहोचला, हा भारतीय चित्रपट इतिहासातील एक अतिशय प्रेरणादायी अध्याय आहे.
श्रोतेहो, तमिळ चाहत्यांसाठी तर रजनीकांत हे केवळ एक नाव नसून तो एक विचार आहे, एक फिनिक्स पक्ष्यासारखी घेतलेली झेप आहे. 'काहीही अशक्य नाही' हे आपल्या कर्तृत्वाने दाखवून देणारा हा 'रुपेरी मुकुटाचा मानकरी' आजच्या नव्या पिढीसाठीही एक मोठा आदर्श आहे.
अशा या महान कलावंताच्या अभिनय प्रवासाला आणि कलासाधनेला मानाचा मुजरा!

---
हा भाग यूट्यूबवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

सोहराब मोदी यांच्यावरील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----