30 Sept 2026

भाऊमहाराज बोळातले दिवस - १

भाऊमहाराज बोळातले दिवस - १
-----------------------------------------



मी भाऊमहाराज बोळातील एका वाड्यात १९९७ के २००३ अशी सहा वर्षं राहिलो. शुक्रवार पेठेत, मंडईच्या शेजारी, तुळशीबागेच्या समोर असलेल्या या ऐतिहासिक बोळात राहण्याचं भाग्य मला लाभलं. या सहा वर्षांनी मला कायमस्वरूपी ‘पुणेकर’ म्हणवून घेण्याचा पासपोर्ट बहाल केला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अलीकडं त्या भागात गेलं, की सगळं बदललेलं दिसतं. आमचा वाडा केव्हाच पडला. तिथली दुकानं गेली. आता मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत. चालायचंच. मला मात्र त्या भागात गेलं की माहेरी आल्यासारखं वाटतं...
...आम्ही राहत होतो त्या वाड्याला करंदीकर वाडा असं नाव होतं. खरं तर ओक, करंदीकर व आणखी एक (नाव विसरलो) असे तीन मालक त्या वाड्याला होते. मात्र, जास्तकरून तो करंदीकर वाडा म्हणूनच ओळखला जात असे. भाऊमहाराज बोळात प्रवेश करताना जिलब्या मारुतीचं स्थान आहे. तिथून आत शिरलं, की मेडिकल दुकानाच्या मागे एक मोकळी जागा होती. तिथं संघाची सायंशाखा कधी कधी भरल्याचं दिसे. पुढं गेलं, की उजव्या हाताला ज्ञानेश लॉज होता. खरं तर तोही एक जुना वाडाच होता. मात्र, त्याला ‘ज्ञानेश लॉज’ म्हणूनच ओळखलं जायचं. पुढं गेलं, की मधे आणखी एक-दोन घरं होती आणि मग उजव्या हाताला आमचा वाडा. वाड्याला रीतसर मोठं लाकडी दार होतं. ते दार रात्री बंद व्हायचं. मग दिंडी दरवाजातून आत यायचं. माझी ड्युटी बहुतेक रात्रीच संपायची. रात्री लवकर ड्युटी संपली, तरी आम्ही मित्र कुठे तरी बोकाळायचो आणि रात्रीच घरी, म्हणजे रूमवर यायचो. आत एक छोटा चौक होता. उजव्या बाजूला करंदीकरांचे भाडेकरू राहायचे. समोरही काही भाडेकरू राहायचे. डाव्या हाताला आमच्या मालकांची, म्हणजे ओकांची जागा होती. तिथं पाच ते सहा छोट्या रूम होत्या. त्या कॉट बेसिसवर दिलेल्या असायच्या. इथेच आम्ही राहायचो. मी जुलै १९९७ मध्ये पुण्यात आलो, तेव्हा ‘लोकसत्ता’त प्रूफरीडर म्हणून काम करत होतो. विनायक लिमये तिथं नगर आवृत्तीला उपसंपादक म्हणून काम पाहायचे. मला जागा मिळवून द्यायची जबाबदारी आमच्या गुरुजींनी - म्हणजे सतीश कुलकर्णींंनी - लिमयेंवर टाकली होती. लिमये पूर्वी तिथं राहायचे. त्यामुळं त्यांच्या ओळखीनं मीही ओक वाड्यात राहायला लागलो. आमच्या मालकांचं नाव जयंत ओक. ते मर्चंट्स नेव्हीत होते. त्यामुळे सहा महिने ते बोटीवरच असायचे. आमच्या आणि त्यांच्या भेटी क्वचित व्हायच्या. पण व्हायच्या तेव्हा ते चांगल्या गप्पा मारायचे. आमच्या इथे बहुतेक सगळे विद्यार्थी असायचे. त्यामुळे ते ओकांना ‘काका’ अशीच हाक मारायचे. वास्तविक तेव्हा ते फार तर पस्तिशीचे असावेत. मात्र, त्यांना सगळ्यांनी काका करून टाकलं होतं. त्यामुळं त्यांच्या पत्नीला आम्ही सगळे ओककाकू म्हणायला लागलो. त्यांचं नाव बहुतेक वर्षा होतं. त्यातही आमच्यातल्या काहींनी त्यांना ‘आँटी’ म्हणायला सुरुवात केली. आमचा सगळा व्यवहार त्यांच्याशीच व्हायचा. माझा संबंध तर फक्त एक तारखेला भाडे देण्यापुरता यायचा. एरवी माझं रुटीन फारच वेगळं असल्यानं काकूंची व माझी गाठ पडणं अवघडच असे. त्यांच्याकडं एक पामेरियन कुत्रा होता. तो सतत भुंकायचा. मला कुत्र्यांची प्रचंड भीती वाटायची. म्हणजे अजूनही वाटते. भाडं द्यायचा प्रसंग म्हणजे त्या कुत्र्याशी सामना म्हणून नको वाटायचा. आमच्या रूम खाली होत्या आणि काकू वर राहायच्या. लाकडी जिन्यानं वर जायचं. डाव्या हाताला काकूंचं घर आणि बरोबर समोर संडास होता. तो भाडेकरूंचा संडास होता. थोडक्यात, आम्हाला कितीही घाईची लागली, तरी जिना चढून वर जाईपर्यंत दम धरावा लागे. तर, कुत्रा... दार उघडून काकू माझ्या हातून पैसे घेईपर्यंत त्यांचा कुत्रा भुंकून जीव काढायचा. दाराच्या फटीतून तो जीव तोडून बाहेर यायला बघायचा. आम्ही त्या अर्धवट उघडलेल्या दारातून पैसे द्यायचो आणि लगेच खाली पळायचो. मी सहा वर्षं तिथं राहिलो; पण फक्त एकच जयंत ओक आले असताना त्यांच्या घरात गेलो होतो. तेव्हा ते कुत्रं कुठं होतं, कुणास ठाऊक.
आमच्या वाड्यात मागे हौद होता. पूर्वी पेशवाईत कात्रज तलावापासून ते शनिवारवाड्यापर्यंत पाण्याची लाइन होती. त्यातलेच हे हौद होते. हे हौद कधीही रिकामे झाले नाहीत. हौदाच्या समोर एक बाथरूम होती. सर्व मुलांना मिळून ती एकच बाथरूम होती. त्यामुळं सकाळी मुलांची खूप धावपळ आणि क्वचित भांडणं व्हायची. सुदैवानं माझा दिनक्रम पूर्ण वेगळा असल्यामुळं मी दुपारी अंघोळ करायचो. त्यामुळं मला कधी कुणाशी भांडायची वेळ आली नाही. आठवड्यातून एकदा धुणं धुवायचं. बोळाच्या दारातच इस्त्रीचं दुकान होतं. तिथं कपडे इस्त्री करून आणायचो. मी वाड्यात राहायला आल्यानंतर केवळ दीडच महिन्यात माझी ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली आणि मी एक सप्टेंबर १९९७ रोजी ‘सकाळ’मध्ये रुजू झालो. तोवर मी सायकलवरून कॅम्पमधील अरोरा टॉवर्समध्ये असलेल्या ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात जात असे. माझी ड्युटी ४ ते ११.२० अशीच होती. सुरुवातीला एक दिवसाची ड्युटीही असे. मात्र, तिथल्या एका आगाऊ प्रूफरीडरशी माझं पहिल्याच दिवशी भांडण झालं आणि मी आमचे तेव्हाचे बॉस दयानंद ठोंबरे यांना सांगितलं, की हा ज्या शिफ्टला असेल त्या शिफ्टला मी नसेन. हवं तर मी कायम रात्री येत जाईन. मला एकूणच रात्रीची ड्युटी पथ्यावर पडायची. अर्थात हा सिलसिला केवळ दीड महिनाच चालला आणि ‘सकाळ’मध्ये मी रुजू झाल्यावर माझं ऑफिस अगदीच जवळ आलं. अनेकदा तर मी समोर तुळशीबाग क्रॉस करून, लक्ष्मी रोड ओलांडून, जोगेश्वरीच्या बोळातून पूना बेकरीवरून शालूकराच्या बोळातून सकाळ ऑफिसला चालतच जात असे. रात्री येताना बरेच सहकारी मंडईत जमायचे. त्यांच्याबरोबर त्यांच्या दुचाकीवरून यायचं. नंतर तिथून रूम अगदीच जवळ असायची. बॅचलर आयुष्य असल्यामुळं रूमवर येण्याला काळ-वेळ नसे. मंडई विद्यापीठातलं ज्ञान जास्त महत्त्वाचं असे. तिथल्या मार्केट उपाहारगृहात रात्री मिसळपाव, सँपल पाव, भजीपाव खाणं आणि सिगारेटी ओढत बाहेर गप्पा मारत उभं राहणं हा अनेकांचा छंद असे. मंडईच्या पलीकडं ‘प्यासा’ हा पुण्यातला अजरामर बार होता. तिथून चुकून बाहेर पडलेलं किंवा ज्यांना गाव फिरून काहीही खायला कुठं मिळालेलं नाही असं कुठलंही पब्लिक ‘मार्केट’मध्ये येत असे. मंडई विद्यापीठ हा किशोर खन्ना अंकल यांचा अड्डा होता. पुण्याचे माजी उपमहापौर रमेश खन्ना यांचे हे बंधू. त्यांचा दुधाचा धंदा होता. पहाटे चार वाजता त्यांची लाइन सुरू व्हायची. त्यामुळं तोवर जागं राहणं त्यांना भागच असायचं. पुण्यातल्या पत्रकारांनाही ते पथ्यावर पडायचं. मंडईत प्लास्टिकच्या खुर्च्या गोल मांडून तो अड्डा रंगलेला असे. क्वचित तिथं काही राजकारणी मंडळीही येत. सुधीर गाडगीळ नियमित यायचे. तिथं सर्व वृत्तपत्रांतल्या बातमीदारांच्या गप्पा रंगत. या गप्पा नुसत्या ऐकणं हेही आमच्यासारख्या नव्या पोरांना शिक्षण असे. तेव्हा मंडईबरोबरच कर्वे रोडवर अनिल पानवाल्याजवळही एक अड्डा रंगे. काही मंडळी दोन्हींकडं उपस्थिती लावत. आम्ही मात्र मंडई विद्यापीठाचेच विद्यार्थी होतो. तिथून माझी रूम अगदी जवळ होती, हे स्वाभाविक कारण होतं. 

आमच्या वाड्यासमोर एका अपार्टमेंटमध्ये जहागीरदार काका राहायचे. आम्ही सुरुवातीला त्यांची मेस लावली होती. सगळे जण तिथंच जायचो. हे काका फार प्रेमळ होते. आम्ही त्यांच्या घरात फारच दंगा घालायचो. विशेषत: क्रिकेट मॅच असली, की आम्ही तिथंच पडीक असायचो. काही वेळानं काकांना कुणी तरी म्हणायचं, ‘अहो काका, उभे का? बसा ना... ’ काका स्वत:च्याच घरात चोरून मधल्या खोलीच्या दाराशी उभे राहायचे. आम्ही त्यांच्या सोफ्यावर ऐसपैस बसायचो. सचिनची शारजातील ती प्रसिद्ध ‘डेझर्ट स्टॉर्म’ खेळी आम्ही इथंच बघितली. काकांच्या बिल्डिंगच्या खालीच अंबिका अमृततुल्य होतं. आमचा पहिला चहा तिथंच व्हायचा. माझा रूम पार्टनर योगेश जोगळेकरला सकाळी सकाळी उठून पहिला चहा तिथं घ्यायची सवय होती. अंबिकावाला पहिला चहा रस्त्यावर ओतून द्यायचा आणि मग माझे व योगेशचे कप भरायचा. आमच्या वाड्यातली सगळीच पोरं एक से एक होती. हेमंत शिंदे इंजिनीअरिंगला होता. तो आणि त्याचा अश्पाक मुजावर नावाचा एक गोरटेला रूम पार्टनर होता. तो सांगलीचा होता. हे दोघं इंजिनीअरिंगची सगळी पोरं करतात तसं रात्री जागून अभ्यास करत बसलेले असायचे. नाइट मारणे, मधेच मंडईत जाऊन काही तरी खाणे हे सतत चाललेलं असायचं. मी अनेकदा रात्री दोन वाजता ऑफिस संपवून रूमवर यायचो तेव्हा हे दोघं जागे असायचे. मी येताना ताजा पेपर घेऊन यायचो. तो यांना वाचायचा असायचा. एकदा हेमंतनं मला चूक दाखवली. ‘सकाळ’च्या पान १ वर तारीखच चुकली होती. १३ एप्रिल लिहायच्या ऐवजी १३ मार्च झालं होतं. मग मी पुन्हा सायकल काढून ऑफिसला गेलो आणि ती चूक दुरुस्त केली. दुसऱ्या दिवशी वृत्तसंपादकांनी माझं कौतुक केलं; पण ते सगळं श्रेय हेम्याचं होतं. 
आमच्याकडं पेपर टाकायला जे गृहस्थ यायचे ते ब्रह्मेच होते. अतिशय कृश, काळेसावळे असे ते होते. मी तेव्हाही रूमवर मटा, सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया व लोकसत्ता हे चार पेपर घ्यायचो. १९९७ साली आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव दणक्यात साजरा झाला. मी त्या वाड्यात राहायला येऊन जेमतेम महिना-दीड महिनाच झाला होता. त्या पंधरा ऑगस्टला आम्ही वाड्याच्या मधल्या चौकात झेंडावंदन केलं. वाड्यातल्या मुलींनी रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. सगळे नटून आले होते. बऱ्याच जणांच्या ओळखी त्या दिवशी झाल्या. त्या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं तब्बल १०० पानांचा अंक काढला होता. एवढा मोठा अंक मी प्रथमच पाहत होतो. तो अंक मी कित्येक दिवस जपून ठेवला होता. 
आमच्या त्या परिसरात खाण्यापिण्याची चैन होती. रात्री फक्त मंडईतलं उपाहारगृह असायचं; दिवसा मात्र खाण्यासाठी भरपूर चॉइस असायचे. आमच्या बोळात जरा पुढं खाडिलकरांचं पांडुरंग संस्थान होतं. तिथून उजव्या हाताला एक बोळ बाजीराव रोडकडं जायचा. तिथं डाव्या हाताला एक मंगल कार्यालय होतं व पुढं बँक ऑफ इंडिया. त्या बँकेत मी खातं काढलं होतं. खाडिलकरांच्या वाड्यावरून पुढं गेलो, की रतन सायकल मार्ट हे सायकलचं प्रसिद्ध दुकान होतं. तिथून पुढं तो रस्ता बदामी हौद, शिंदे हौद असं करत बाफना पेट्रोल पंपावरून चिंचेच्या तालमीकडं जायचा. रतन सायकल मार्टकडून डाव्या हाताला मंडईला रस्ता होता. त्या रस्त्यावर किसनमहाराज साखरेंचा मठ आहे. त्या मठाशेजारी सोमणांचं ‘पुणेरी’ हे उपाहारगृह होतं. त्यांचं नाव सोमण हे मला खूप नंतर कळलं. आम्ही त्यांना अण्णाच म्हणायचो. तिथं उपवासाची मिसळ फार भारी मिळायची. ती एकदा खाल्ली की दिवसभर भूक लागायची नाही. मंडईत कांबळे यांचा बासुंदीसारखा गोड चहा मला फार आवडायचा. तुळशीबागेत श्रीकृष्ण उपाहारगृहातील मिसळ खायला नेहमी जायचो. पुढं कावरे आइस्क्रीम होतं. (इथं एक स्पष्ट करतो. यातली काही दुकानं अजूनही आहेत व रस्ते, ठिकाणं अर्थातच तशीच आहेत. मात्र, माझ्या आठवणी तीस वर्षांपूर्वीच्या असल्यामुळं आपोआप सगळीकडं भूतकाळवाचक उल्लेख येतोय, तेवढं समजून घ्यावं...) तिथून पुढं तुळशीबागेच्या लक्ष्मी रोडच्या बाजूला आरोग्य मंदिर नावाचं छोटेखानी उपाहारगृह होतं. लक्ष्मी रोडवर पूना गेस्ट हाऊस होतं, तिथं नेहमी जेवायला जायचो. तुळशीबागेतच पुढं काकाकुवा मॅन्शनच्या इथं दारात सकाळी सकाळी पोहे, पॅटिस, वडा मिळायचा. तिथं कायम गर्दी असायची. मंडईकडून शनिपाराकडं जाताना अनोखा केंद्र म्हणून दुकान होतं, तिथले डोसे आणि समोसे प्रसिद्ध होते. शिवाय इंद्रायणी व मुरलीधर ही दोन प्रसिद्ध रसवंतीगृहं शेजारीच होती. थोडं आजूबाजूला गेलं, की बाजीराव रोडवर नातूबागेत ‘वाडेश्वर’ची अप्रतिम इडली-चटणी होतीच. (इथली हिरवी चटणी अप्रतिम असायची, पण ती कधीच पुरायची नाही. लोक मागून घ्यायचे. म्हणून बहुतेक नंतर त्यांनी एक्स्ट्रा वाटीला जादा पैसे लावायला सुरुवात केली.) शनिपाराकडून गायआळीकडं जाताना गाडगीळ पथावर श्री उपाहारगृह होतं. तिथली झणझणीत मिसळ आवडायची. छोट्याशा जागेत कायम गर्दी असायची. कुमठेकर रोडवर स्वीट होम होतं. तिथली साबुदाणा खिचडी प्रसिद्ध असायची. बाजीराव रोडवर नूमविच्या अलीकडं अक्षता साडीच्या शेजारी संतोष भुवन नावाचं हॉटेल होतं. तिथंही जाणं व्हायचं. पुष्करिणी भेळ प्रसिद्ध होती. चितळेंच्या दुकानाच्या मागं बिझीलँड कॉम्प्लेक्समध्ये ते दुकान होतं. या सर्व ठिकाणी जाऊन कधी ना कधी खादाडी व्हायचीच.

जहागीरदारकाकांनी कालांतराने मेस बंद केली आणि आम्ही गंजीवालेंच्या मेसमध्ये जायला लागलो. गंजीवाले काकू माहेरच्या ‘ब्रह्मे’च होत्या, हे कळलं. त्या कुटुंबाशी चांगला घरोबा निर्माण झाला व तो आजतागायत टिकून आहे. काकूंसाठी मी माहेरचा माणूस होतो. माझ्यासाठी घरी केलेली भाजी यायची. ताकाचा ग्लास असाच मिळायचा. काकूंनी माझे फार लाड केले. काकाही फार प्रेमळ होते. (अगदी अलीकडं ते गेले...) दिसायला धिप्पाड, अक्कडबाज मिशा असलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रथमदर्शनी घाबरवणारं होतं. मात्र, माझ्याशी ते फारच प्रेमाने वागायचे. तिथं नुसतं जेवण नसायचंच. जगातल्या सर्व विषयांवर गप्पा व्हायच्या. मी कितीही उशिरा उठलो, उशिरा गेलो, तरी माझ्यासाठी गरम जेवण तयार असायचं. तिथं रेवण नावाचा मुलगा कामाला होता. त्याच्याकडून मी थोडं कन्नड शिकलो होतो. ‘रेवण, नीर कुडरी’, ‘अन्न कुडरी’ असं आमचं बोलणं चालायचं. नंतर नंतर तर आमच्या वाड्यातली बहुतेक सगळी मुलं इथंच जेवायला यायची. 
गणपतीत आमच्या परिसरात धामधूम असायची. जिलब्या मारुती मंडळाला आम्ही आमचं मंडळ घोषित करून टाकलं होतं. विसर्जन मिरवणुकीत आम्ही या गणपतीपुढं नाचायचो. पहिल्याच वर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत रक्त सांडायची वेळ माझ्यावर आली होती. ती हकीकत मी इतरत्र ब्लॉगवर लिहिली असल्यानं इथं पुनरुक्ती करत नाही. गणपतीत रात्रभर हिंडण्याची हौस मात्र मी त्या काळात पुरेपूर भागवून घेतली होती. आमचे सगळे मित्र उत्साही होते. त्यामुळे पूर्व पुण्यातले बहुतेक महत्त्वाचे देखावे बघून रात्री नातूबाग व चिमण्या गणपतीसमोरची लाइटिंग व त्यातही ‘होठों पे ऐसी बात’ हे गाणं बघत बसायचो. 
गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दगडूशेठ गणपतीतर्फे कोतवाल चावडी (आता जिथं दगडूशेठ गणपतीचा मंदिराचा देखावा असतो, ती जागा) परिसरात गाण्यांचे कार्यक्रम असायचे. त्यात शेवटी पं. हृदयनाथ मंगेशकरांचं ‘भावसरगम’ असायचं. तेव्हा रात्री दहाची मर्यादा नव्हती. उशिरापर्यंत कार्यक्रम चालत. बुधवार चौकापर्यंत (मजूर अड्डा) गर्दी बसलेली असायची. पंडितजी रात्री दोननंतर विशेष मूडमध्ये असायचे. ‘ज्यांना घरी जायचंय त्यांनी जा, बाकीचे पुढं सरकून बसा,’ असं म्हणायचे. मग बरेच लोक पुढं सरकून बसायचे. बुधवार चौकातील गर्दी बेलबाग चौकापर्यंत कमी व्हायची. पंडितजी चष्मा काढून ठेवायचे. मग आम्ही ओळखायचो, की आता खरं गाणं सुरू होणार. आम्ही मंडईकडून येणाऱ्या रस्त्यावर कराची स्वीट्सच्या पायऱ्यांवर बसलेले असायचो. समोर पेठांमधील सुंदर मुली असायच्या. कुणी चित्रं काढतंय, कुणी कलाकारांच्या सह्या घ्यायला धडपडतंय... कुणाची तल्लीन लाइन सुरू आहे... असं ते सगळं फार मस्त सुरू असायचं. पंडितजींचं एक ‘दयाघना’च अर्धा अर्धा तास चालायचं. आधी ‘रसूलल्लाह’ ही मूळ बंदिश व मग ‘दयाघना’... पहाटे चारला कधी तरी कार्यक्रम संपायचा. त्या धुंदीतच मंडईत चहा घेऊन रूमवर येऊन झोपायचो...

(क्रमश:)

(नोंद - या लेखात वापरलेले जुने फोटो, आम्ही वाड्यातले सगळे मित्र एकदा किहीमला ट्रिपला गेलो होतो, तेव्हाचे आहेत. भाऊमहाराज बोळातले किंवा तिथल्या लोकांबरोबरचे फोटो नाहीत. गंजीवाले काका-काकूंबरोबरचा फोटो अगदी अलीकडचा आहे. फोटोतल्या मित्रांविषयी व भाऊमहाराज बोळातील व्यक्ती आणि वल्लींविषयी पुढच्या भागात...)

---


10 Sept 2026

ऐंशीचं दशक - लेख

 ऐंशीचं दशक - एक नोंद
------------------------------

सध्या समाजमाध्यमांवर ऐंशीचं दशक ट्रेंडिंग  (#1980's) आहे. लोक त्या काळातले फोटो ‘एआय’च्या मदतीने तयार करून आपापल्या भिंतींवर डकवत आहेत. समाजमाध्यमांवरचे असे ट्रेंड अल्पजीवी असतात. नवा ट्रेंड आला, की आधीचा मागे पडतो. विस्मरणातही जातो. मात्र, या निमित्ताने ऐंशीच्या दशकाची एक चांगली नोंद करून ठेवता येईल, असं वाटलं. म्हणून हा लेखप्रपंच... फेसबुकवर शेअर केलेला हा लेख आता जरा विस्तारित, अपडेट स्वरूपात इथे...


ऐंशीच्या दशकाचा ट्रेंड जोरात आहे. मीही माझे दोन-तीन फोटो करून घेतले. ते असो. पण या निमित्ताने या दशकाची जरा गांभीर्यानं उजळणी करावी असं वाटलं. १९८० ते १९८९ हे दशक म्हणजे ऐंशींचं दशक. एटीज. माझा जन्म १९७५ चा. मात्र, माझ्या आठवणी १९८०-८१ पासून सुरू होतात. कॅलेंडरवर १९७८, १९७९ पाहिल्याचं मला आठवत नाही. माझ्या आत्याचं लग्न १९७८ मध्ये झालं. तेव्हा आजोबांच्या जवळ पांढरा कुर्ता व बहुतेक धोती घातलेला तीन वर्षांचा मी बसलो आहे, असा एक फोटो आहे. त्याहूनही लहान असतानाचे, घरच्यांनी हौसेनं काढून घेतलेले फोटो आहेत. मला अर्थातच ते काही आठवत नाही. तेव्हा माझ्या जगण्याची खऱ्या अर्थानं सुरुवातच ऐंशीच्या दशकानं झाली...
मला आमच्या घरात १९८१ असं लिहिलेलं एक इंग्लिश कॅलेंडर बघितल्याचं लख्ख आठवतंय. एवढंच काय, हातात वासरू घेतलेल्या मुलाचा एक ग्लेझ फोटो त्यावर होता, हेही आठवतंय. हे कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय किंवा ‘महालक्ष्मी’सारखं नव्हे. कॉर्पोरेट कंपन्या काढायच्या आणि वाटायच्या, तसं. मी १९८१ मध्ये पहिलीत गेलो. इंदिरा गांधी देशात परत सत्तेवर आल्या होत्या. पंजाब व आसाम धगधगत होतं. रोज पेपरमध्ये त्या बातम्या यायच्या. तेव्हा ‘एक दुजे के लिए’ प्रचंड लोकप्रिय झाला होता. सर्वत्र त्याचीच गाणी वाजत असायची. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’ हे गाणं ऐकलं, की आजही मला जामखेडच्या टुरिंग टॉकीजची आठवण येते. तिथं सिनेमा सुरू होण्याआधी लाऊडस्पीकरवर ही गाणी वाजवली जायची. मी आमच्या गावातल्या, जिल्हा परिषदेच्या ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर’ या शाळेत जाऊ लागलो. हेमंत देशमुख हे आमचे गुरुजी होते. पुढची चारही वर्षं तेच आमच्या वर्गाला शिकवायला होते. तेव्हा आमचा वर्ग दर शनिवारी शेणानं सारवला जायचा. त्या दिवशी आम्ही बाहेर पटांगणात बसायचो आणि काही मुलं शेणानं वर्ग सारवून घ्यायची. आपल्यालाही सारवायला मिळावं, असं आम्हाला वाटे. मात्र, आम्हाला गुरुजी ते काम द्यायचे नाहीत. मग निदान शेणानं सारवणाऱ्याला पाणी घालायला तरी मिळावं, असं वाटे. फार आग्रह धरला तर ते काम मिळे. त्या काळात पाकिस्ताननं आपल्या एका विमानाचं अपहरण करून ते कराचीला नेलं होतं. तेव्हा आम्ही चार मित्रांनी वर्गातल्या अझीम नावाच्या मुलाला विनाकारण धरून धोपटलं होतं. ‘आमचं विमान पाकिस्तानला पळवून का नेलंस?’ म्हणून! त्या बिचाऱ्याला आपल्याला का मारलं, हे शेवटपर्यंत कळलं नाही. दुसऱ्या दिवशी त्याची आई शाळेत आली. आम्हा चौघांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली.

पहिली ते चौथी ही चार वर्षं मी शाखेत गेलो. तिथले खेळ मला आवडायचे. ‘नमस्ते सदा वत्सले...’ ही प्रार्थना, तो भगवा ध्वज, ओळीत उभं राहणं, शेवटी ‘संख्या’ घेणं, अग्रेसर, उपविश वगैरै आदेश अजून आठवतात. आमचे शिक्षक चांगले होते. काही काही खेळ खेळताना व तिथं सांगितल्या जाणाऱ्या काही गोष्टींनी मात्र तेव्हाही प्रश्न पडायचे एवढंच आता आठवतंय. चौथीनंतर संघ शाखेशी संबंध संपलाच. 

पुढच्या वर्षी, म्हणजे १९८२ मध्ये आपल्याकडं दिल्लीला एशियाड झालं. अप्पू हत्तीचे पुतळे उभारले गेले. टीव्ही रंगीत झाला. पांढरा व हिरवा रंग असलेल्या एशियाड गाड्या आल्या. त्या स्टेशन-दादर मार्गावर धावू लागल्या. त्या काळात या गाड्यांचा अतिशय रुबाब होता. याच वर्षी बंगळूरमध्ये शूटिंग करताना ‘कुली’च्या सेटवर अमिताभला भयंकर अपघात झाला. पुढचे काही महिने तो रुग्णालयात होता आणि देशभर सर्वधर्मीय लोक त्याचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करत होते. माझ्या आठवणीनुसार, पुण्यातील मंजुश्री सारडा हत्या प्रकरणही याच वर्षी घडलं. पुढं कित्येक दिवस त्याच्या बातम्या रोज पेपरमध्ये येत होत्या. मंजुश्रीचा पती शरद सारडा याला कनिष्ठ न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. पुढं राम जेठमलानींनी त्याचं वकीलपत्र घेतलं आणि तो सुप्रीम कोर्टात बहुतेक निर्दोष सुटला. मंजुश्री सारडाचं वकीलपत्र पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील बाबाराव भिडेंनी घेतलं होतं, असं वाचल्याचं आठवतंय. (पुण्यातील प्रसिद्ध बाबा भिडे पूल यांच्याच नावावरून आहे.) मंजुश्री सारडाचं माहेर बीडचं होतं व तिचं माहेरचं आडनाव चितलांगे होतं, हेही आठवतंय.

पुढच्याच वर्षी, म्हणजे १९८३ मध्ये दिल्लीत अलिप्त राष्ट्र संघटनेची (‘नाम’) परिषद झाली. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतात झालेली ती शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय परिषद. याच वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर भारतानं पहिलावहिला वन-डे वर्ल्ड कप जिंकला. याच वर्षी पं. वसंतराव देशपांडे गेले. या काळात रेडिओवर बातम्या ऐकल्या जायच्या. रविवारी दुपारी ‘आपली आवड’ कार्यक्रम असे. एकदा आमच्या नंदूकाकानं (प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख) आमची नावं रेडिओवरून घेतली होती, तेव्हा खूप आश्चर्य व आनंद वाटला होता. याच वर्षी आमच्या शाळेची सहल जामखेडजवळ नरुटं म्हणून ठिकाण आहे, तिथं गेली होती असं आठवतंय. आजी-आजोबांबरोबर पुण्याला आत्याकडं जाणं व्हायचं. त्यामुळं खूप लहानपणापासून पुण्याचा शनिवारवाडा, पर्वती, सारसबाग, लालमहाल ही ठिकाणं बघणं व्हायचं. पुण्याविषयी प्रेम निर्माण झालं ते तेव्हापासून. पुण्यात आल्यावर रिक्षात बसणं हा फार मोठा आकर्षणाचा भाग असायचा. तेव्हा जामखेड ते पुणे एसटीला २३ रुपये १० पैसे एवढं तिकीट असायचं. लातूरलाही बरोबर एवढंच तिकीट होतं. लातूरला आजोळ होतं. मामाकडं जायला छान वाटायचं. लातूरच्या गंजगोलाईचं आकर्षण वाटायचं. एसटीचा प्रवास लांबचा, गर्दीचा आणि तसा त्रासदायक असायचा. आम्हाला मात्र तो कधीही बोअर झाला नाही. असो.

सन १९८४ उजाडताना पंजाबातलं वातावरण स्फोटक झालं होतं. १९८४ मध्ये जूनमध्ये सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ झालं आणि त्यात भिंद्रनवालेला अखेर मारण्यात आलं. मात्र, शीख अतिरेक्यांनी इंदिरा गांधींची भीषण हत्या करून त्याचा बदला घेतला. ३१ ऑक्टोबरला झालेल्या त्या भयावह हत्येनंतर पुढचा आठवडाभर दिल्ली जळत होती. अनेक शिखांचं शिरकाण करण्यात आलं. राजीव गांधी पुढचे पंतप्रधान झाले. डिसेंबरअखेर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा हत्येमुळं उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळं काँग्रेस पक्षाला विक्रमी ४१४ जागा मिळाल्या. राजीव गांधींच्या रूपानं देशाला तरुण नेतृ्त्व मिळालं होतं.  १९८५ मध्ये शाहबानो प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल आला. मात्र, मुस्लिमांच्या दबावात येऊन राजीव गांधींनी तो निर्णय फिरवण्याची घोडचूक केली. (मध्येच वैयक्तिक आठवणीची एक नोंद - या वर्षी मला चौथीला स्कॉलरशिप मिळाली. महिना दहा रुपये. आयुष्यातली पहिली कमाई. असो.) सन १९८६ मध्ये बोफोर्स प्रकरण गाजू लागलं. याच वर्षी जानेवारीत आमच्याकडं पहिल्यांदा टीव्ही आला. ‘क्राऊन कॅसल’चा तो शटरवाला ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता. मग ‘बुनियाद’, ‘नुक्कड’, ‘चित्रहार’चा जमाना घरात आला. याच वर्षी एप्रिलमध्ये शारजात जावेद मियाँदादनं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारतीयांच्या मनावर खोल जखम केली. या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यात जिंदा व सुखा या अतिरेक्यांनी जनरल अरुणकुमार वैद्य यांची कॅम्प परिसरात त्यांच्या चालत्या गाडीत गोळ्या घालून हत्या केली.
सन १९८७ मध्ये भारतात पहिलावहिला रिलायन्स वर्ल्ड कप भरला. उपांत्य फेरीत आपण मुंबईत इंग्लंडकडून हरलो. याच वर्षी पाकिस्तानविरुद्ध बंगळूर कसोटीत आपण हरलो; पण सुनील गावसकरची ९६ धावांची अविस्मरणीय खेळी याच कसोटीतली... याच वर्षी शेखर कपूरचा ‘मि. इंडिया’ आला. यात खाण्यात भेसळ करणाऱ्या अजित वाच्छानीच्या पात्राला अनिल कपूर धान्यातले खडे खायला घालतो, या दृश्यावर टाळ्या पडायच्या. आजूबाजूला सगळीकडं हेच तर होतं. गॅस सिलिंडर ही ग्रामीण भागात तरी नवलाईच होती. रेशनवर रॉकेल मिळायचं. त्यासाठी लांबच लांब रांगा असायच्या. ‘केंद्राच्या योजनेतील एक रुपयापैकी केवळ १५ पैसे शेवटच्या घटकापर्यंत पोचतात,’ असं पंतप्रधान राजीव गांधींनीच कबूल केलं. हे वर्ष संपता संपता टीव्हीवर ‘रामायण’ सुरू झालं. किशोरकुमारचं निधन याच वर्षी झालं. व्हीसीआरचं पेव याच दशकात फुटलं. गावोगावी व्हिडिओ पार्लर निघाले. १९८८ मध्ये सोल ऑलिम्पिकमध्ये शायनी अब्राहमचं पदक लेन चुकल्यामुळं हुकलं.
महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं स्थलांतर याच वर्षी घडलं. आम्ही आमचं गाव सोडून नगरला, म्हणजे मोठ्या शहरात राहायला आलो आणि इथून पुढं माझ्या सर्व जाणिवा, संवेदना ‘शहरी’ झाल्या. राज कपूर याच वर्षी गेला. माधुरीचा ‘तेजाब’ सगळीकडं ‘एक दो तीन’ म्हणत धुमाकूळ घालू लागला. १९८९ मध्ये राजीव गांधींची सत्ता गेली. देशभर मंडल आयोगाविरुद्ध आंदोलन पेटलं. त्यातच अयोध्येत शिलापूजनास परवानगी दिल्यानंतर राम मंदिर आंदोलनही भडकलं. अडवानींनी सोमनाथपासून ‘भारत यात्रा’ काढली. ती लालूप्रसादांनी बिहारमध्ये अडवली आणि अडवानींना अटक केली. याच वर्षी ‘चांदनी’ प्रदर्शित झाला आणि श्रीदेवीच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब झालं. हे वर्ष संपताना ‘मैंने प्यार किया’ प्रदर्शित झाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सलमान खानचा उदय झाला. आदल्याच वर्षी ‘कयामत से कयामत तक’मधून आमीर व जूहीनं जोरदार पदार्पण केलं होतं. शाहरुख खान नावाचा दिल्लीचा तरुण ‘फौजी’, ‘सर्कस’ आदी दूरदर्शन मालिकांत काम करत होता... १९८९ मध्ये नेहरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभर ‘अपना उत्सव’ साजरा झाला. ‘मिले सूर मेरा तुम्हारा...’ गाजत होतं. १९८९ मध्ये कराचीतील कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर नावाच्या मुंबईच्या 'वंडर बॉय'नं वयाच्या सोळाव्या वर्षी कसोटी पदार्पण केलं होतं...
हे दशक एकूणच अस्वस्थ दशक होतं. कित्येक जुन्या गोष्टी नष्ट होत होत्या, नव्या येत होत्या. मात्र, एकूण सुमारीकरण वाढलं होतं. राजकारणाचं उघड उघड गुन्हेगारीकरण या काळात वाढलं. मुंबईत गँगवॉर वाढलं. शिवसेनेचं प्रस्थ वाढलं. हिंदुत्वाचा नारा बुलंद झाला. सर्वसामान्यांंचं जगणं खडतर होतं. मध्यमवर्गीयांचे सरासरी पगार तीन-चार हजार रुपये होते. मोबाइल, मल्टिप्लेक्स, मॉल या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. चारचाकी गाडी घेणं श्रीमंतांनाच परवडत होतं. टेलिफोन संचार क्रांतीला नुकतीच सुरुवात झाली होती. एसटीडी, आयएसडीचे पिवळे बूथ सगळीकडं दिसू लागले होते...
१४ नोव्हेंबर १९८९... मी वयाच्या चौदाव्या वर्षातून पंधराव्या वर्षात पदार्पण केलं होतं... थोडक्यात, या क्रूर जगाच्या ‘अंगणात गमले मजला... संपले बालपण माझे...’
पुढे एक-दीड वर्षांनीच भारत आमूलाग्र बदलणार होता... 'पहाटेच्या दारात उभे होते जागतिकीकरणाचे दूत...' त्यानंतर आपलं जगणंच सगळं बदलून जाणार होतं... त्याविषयी पुन्हा कधी तरी... नाइन्टीजचा ट्रेंड आला की...!

---

(विशेष नोंद - सोबतचा फोटो फक्त ‘एआय’कडून तयार करून घेतला आहे. बाकी मजकूर अस्मादिकांच्या मेंदूतूनच तयार झाला आहे. जसं आठवेल तसं लिहिलं आहे. त्यामुळे चु भू दे घे...)

---