भाऊमहाराज बोळातले दिवस - २
----------------------------------------
मी भाऊमहाराज बोळात राहत असतानाचा काळ म्हणजे दोन शतकांच्या सांध्यावरचा काळ होता. आजूबाजूला बरेच काही बदल घडत होते. तेव्हा फार काही जाणवत नव्हतं खरं; आता विचार केल्यावर जाणवतं. काळ फार भराभर बदलत गेला, हे लक्षात येतं.
मी पुण्यात आलो तेव्हा सायकल वापरत होतो. मीच नव्हे तर अनेक जण सायकल वापरत असत. आमच्या ओक वाड्यात चौकात बऱ्याच सायकली लावलेल्या असत. वाड्याला मोठं दार असल्यानं आणि ते रात्री बंद होत असल्यानं सायकली चोरीला जाण्याची भीती नव्हती. उलट रात्री ते भलंमोठं दार उघडून सायकल आत आणण्याची कसरत करावी लागे. माझ्याकडं ‘ॲटलस गोल्डलाइन’ नावाची सायकल होती. ती मी आठवीत असताना, म्हणजे १९८८ मध्ये घेतलेली होती. तीच सायकल मी इथं वापरत होतो. तेव्हा सकाळ ऑफिसमध्ये वॉचमन गेटच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये मोठं सायकल स्टँड होतं. अनेक लोक सायकल वापरत. मी पहिली दोन वर्षं सर्व पुणे शहर सायकलवरूनच फिरलो. मी जिथं जिथं बातमीदारीला गेलो, त्या सर्व ठिकाणी सायकल स्टँड असत आणि बऱ्याच मोठ्या संख्येनं लोकांच्या सायकली तिथं लावलेल्या असत. दोन वर्षं मी सायकल वापरली. पण १९९९ मध्ये मी रानडे इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतल्यावर मला कॉलेजला सायकलवर जायची लाज वाटायला लागली. वर्गातली बहुतेक मुलं स्वत:च्या दुचाकीवर तर येत किंवा बसनं तरी येत. सायकलवरून फार कुणी येत नसे. मग मी माझ्या मित्राची एम-८० गाडी विकत घेतली आणि त्या गाडीवरून ऐटीत सगळीकडं फिरू लागलो. त्यामुळं माझी सायकल वाड्यात पडून राहायला लागली. नंतर नंतर तर ती पार गंजून गेली. मी २००३ मध्ये वाडा सोडून स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. आता सायकलचं काही तरी करायला हवं होतं. खरं तर ती विकणं माझ्या जिवावर आलं होतं; पण पर्याय नव्हता. मग मी रतन सायकल मार्टवाल्याकडं गेलो आणि त्याला ती सायकल विकून टाकली. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी ८०० रुपयांना घेतलेली सायकल ३०० रुपयांना विकली गेली. अर्थात, त्याआधी मला त्या सायकलची मूळ खरेदी पावती द्यावी लागली. ती पावती आमच्याकडं अर्थातच नव्हती. ही सायकल नगरला सेंट्रल बँक रोडवरील धर्माधिकारी सायकल्स यांच्याकडून घेतली होती. मग मी नगरला त्या दुकानात जाऊन त्या सायकलच्या खरेदीची डुप्लिकेट पावती आणली. विशेष म्हणजे त्यांच्याकडे १९८८ च्या विक्रीची नोंद सापडली. ती पावती ‘रतन’वाल्याला देऊन मग मी तो व्यवहार पूर्ण केला.
तेव्हा भारतात मोबाईल अगदीच नवीन होते. पेजर धुमकेतूसारखे आले आणि तसेच गायब झाले. आम्ही लँडलाइनवरून घरी फोन करायचो किंवा चक्क पत्र पाठवायचो. गणपती विसर्जन मिरवणुकीत रक्त सांडल्यानंतर घरी पत्र लिहिताना मी वर ‘झुंजार पत्रकार अनिरुद्ध घाटगे’ असं गमतीनं लिहायचो. तेव्हा एम-८० ची ती जाहिरात फार प्रसिद्ध होती. त्याचा संदर्भ या उल्लेखाला होता. आमच्या वाड्यात राहणाऱ्या बहुतेक मुलांना अशी पत्रं येत. पत्रलेखनाची ही कला पुढच्या दशकभरातच जवळपास नामशेष होणार आहे, याची आम्हाला तेव्हा कल्पनाही नव्हती. वाड्यातली आम्ही सर्व भाडेकरू मुलं एकदिलानं राहायचो. बहुतेक मुलं मध्यमवर्गीय कुटुंबातली आणि शिक्षणासाठी पुण्यात आलेली होती. पुण्यात आलं, की असं कॉट बेसिसवर राहायचं ही फार जुनी प्रथा होती. ‘सकाळ’मध्ये माझा फायनल इंटरव्ह्यू तेव्हाचे संपादक विजय कुवळेकर व मुख्य व्यवस्थापक के. मो. भिडे (हे अलीकडेच निवर्तले...) यांनी घेतला होता. तेव्हा के. मो. भिडे सर माझ्या बाजूलाच बसले होते. कुवळेकर साहेबांनी मला विचारलं, की राहायला कुठे आहात? मी ‘भाऊमहाराज बोळात, ओक वाड्यात,’ असं उत्तर दिल्यावर कुवळेकर साहेब के. मो. भिडे सरांकडं बघून हसले होते. त्याचं कारण मला नंतर कळलं. कुवळेकर साहेब जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आले, तेव्हा तेही याच वाड्यात राहत होते! थोडक्यात, ही जुनी परंपरा होती आणि मी तीच पुढं चालवत होतो. आमच्या वाड्यात राहणारी बहुतेक मुलं शिकणारी होती. नोकरी करणारे काही मोजके होते. मी त्यात होतो. पुढं माझ्याबरोबर ‘सकाळ’मध्ये रुजू झालेले मंदार कुलकर्णी व संजय आवटे हेही काही काळ आमच्या वाड्यात राहून गेले. अभिजित पेंढारकर शेजारच्या ‘ज्ञानेश लॉज’मध्ये की तिथल्या वाड्यात काही काळ राहत होता. आमच्या वाड्यात सांगलीचा सचिन गोखले काही दिवस होता. तो सीएच्या परीक्षा देत होता. एका वर्षी त्यानं माझा रिटर्न भरला आणि मला घसघशीत रिफंडही मिळवून दिला. त्यासाठी आम्ही बरेच उद्योग केले, एवढंच आठवतंय. माझ्याकडं पेपरची भरपूर रद्दी साठायची. ती विकायची आणि पार्टी करायची, असा माझ्या रूम पार्टनरचा, म्हणजे योगेश जोगळेकरचा आग्रह असायचा. अनेकदा तो स्वत:ही ही रद्दी उचलून विकायला न्यायचा. संजय परांजपे हा पण आमचा मित्र होता. (दुर्दैवानं तो आता हयात नाही.) तो आधी ‘सकाळ’मध्येच ऑफिस बॉय होता आणि नंतर ‘साई सर्व्हिस’मध्ये नोकरीला लागला होता. अनेकदा काही मुलं थोड्या काळासाठी यायची आणि निघून जायची. एवढा दीर्घकाळ राहिलेले आम्ही थोडेच मित्र होतो. मात्र, नंतर आम्ही वाडा सोडून गेलो, तरी आमची मैत्री टिकून राहिली. आजही ‘ओक वाडा’ नावाचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. सगळेच जण हुशार होते. बहुतेकांना उत्तम विनोदबुद्धी होती. आमचा योगेश तर यात मेरुमणी होता. एकदा हे सगळे मित्र आमच्या ऑफिसमध्ये मला भेटायला आले. गेटवर वॉचमनला त्यांनी तसं सांगितलं. वॉचमनने संपादकीय विभागात फोन लावला आणि त्यांना कुणी तरी निरोप दिला, की ब्रह्मे जागेवर नाहीत; पान लावताहेत. वॉचमननं तसं सांगताच योगेश पटकन म्हणाला, ‘पान लावतोय? त्याला म्हणावं, आमचंही एक १२०-३०० लाव.’ नंतर हा किस्सा सांगून सगळे तुफान हसायचे. आमच्या वाड्यातच समोर गौरीप्रसाद करंदीकर राहायचा. त्याला सगळे ‘केडी’ म्हणायचे. तो आमच्या वाड्याच्या दारात उभं राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांना विशिष्ट आवाजात, तोंडही न हलवता ‘ओ मामा’, ‘ओ शुक शुक’ अशा हाका मारायचा. चेहरा अगदी सरळ ठेवायचा. त्या बोळातून जाणारे लोक, त्यातही परगावचे-नवखे असे असतील, तर बावरून इकडं-तिकडं बघायचे. आम्हाला हसू आवरायचं नाही. ‘केडी’ मात्र काही झालंच नाही अशा थाटात त्या दारात उभा असायचा. त्याच काळात ‘सत्या’ रिलीज झाला होता. आम्ही सगळ्यांनी तो एकत्र बघितला. ‘केडी’नं पुढं तो अनेकदा बघितला. ‘सत्या’चे संवादच्या संवाद त्याला पाठ होते. तो येता-जाता ते आम्हाला ऐकवायचा. ‘ये सत्या का चीज है रे’ किंवा ‘मुंबई का किंग कौन? भिक्कू म्हात्रे...’ वगैरे डायलॉग तर नेहमीचेच असायचे. काही तरी बिनसलं किंवा फसलं, तर दोन्ही हात गालांना लावून ‘जमखंडीत गेम’ असं म्हणायची त्याला सवय होती. हे कुठून आलं, कुणास ठाऊक. त्याच्या नादाने मीही पुढं तसंच म्हणायला लागलो होतो. बरीच नंतर ती सवय सुटली. हेमंत शिंदे, अश्पाक यांचा उल्लेख पहिल्या भागात आलाच आहे. वाड्यात राहणारी मुलंच नव्हे, तर त्यांच्याकडे येणारे त्यांचे मित्रही आमचे मित्र व्हायचे. प्रमोद पाटील, सचिन भिडे, महाशब्दे, मंदार गोडबोले, आमोद तळवलकर हे सगळे चांगले मित्र झाले होते. मी त्या वाड्यात दोन-तीनदा रूम बदलली. एकदा योगेश, तर एकदा शौनक कुलकर्णी माझा रूम पार्टनर होता. शौनक कऱ्हाडचा होता व सीएची तयारी करत होता. आमच्या वाड्याच्या अगदी सुरुवातीलाच एक छोटी खोली होती. तिथं एकच जण राहायचा. माझा त्या रूमवर डोळा होता. शेवटी मला एकदाची ती रूम मिळाली. त्यानंतर वाडा सोडेपर्यंत मी ती रूम माझ्याकडंच ठेवली. अर्थात योगेश बऱ्याचदा माझ्याच रूममध्ये पडीक असायचा, तो भाग वेगळा. योगेशचे वडील खोपोलीला ‘महिंद्रा यूजीन’मध्ये होते. आम्ही एकदा त्यांच्या घरीही गेलो होतो. योगेशमुळंच एका चांगल्या मित्राची ओळख झाली. तो म्हणजे विक्रांत उर्फ विकी देशमुख. हा विकी अतिशय गोड स्वभावाचा, चांगला मुलगा होता. तोही शिकण्यासाठी पुण्यात होता व आमच्या वाड्यातच राहायला आला. त्याला माझं लिखाण आवडायचं. मी ‘सकाळ’मध्ये कामाला आहे, याचंच त्याला अनेकदा अप्रूप वाटायचं. विकी आता बॉलिवूडमध्ये मोठा दिग्दर्शक आहे आणि मला त्याच्या या प्रगतीचा खूप अभिमान आहे. (‘नजरअंदाज’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट अनेकांना आवडला. ‘नेटफ्लिक्स’वर आहे. यात कुमुद मिश्रानं अंध व्यक्तीची भूमिका केली आहे. अभिषेक बॅनर्जी, दिव्या दत्ता अशा नामवंत कलाकारांना आमच्या विकीनं दिग्दर्शित केलं आहे. असो. हे जरा विषयांतर झालं.)
आम्ही सगळ्या मित्रांनी एकदा ट्रिप काढायची ठरवली आणि ती कल्पना तडीसही नेली. आमच्या वाड्यात कल्पक चितळे राहायचा. म्हणजे त्याची संपूर्ण फॅमिलीच तिथं राहायची. त्याची आणि आमची चांगली मैत्री जमली. या ट्रिपसाठी कल्पकनं बराच पुढाकार घेतला. शौनक, मी, योगेश, आमोद, मंदार, विकी असे सगळे जीप करून किहीमला गेलो. मध्यरात्रीच निघालो. पहाटे पहाटे अलिबागच्या रस्त्याकडे वळलो. फटफटताना किहीम बीचवर पोचलो. आम्ही हॉटेल वगैरे काहीच बुक केलं नव्हतं. आम्ही त्या बीचवर पुष्कळ मस्ती केली. शौनकनं त्या बीचवर पोहे केल्याचं मला चांगलं आठवतंय. पहिल्या भागात या ट्रिपचे दोन-तीन फोटो दिले आहेत. आमच्यातला बाँड घट्ट व्हायला या ट्रिपची चांगली मदत झाली.
आमच्यातले बरेच जण लहान गावांहून आलो होतो आणि पुण्यात येणं, इथं नोकरी करणं, इथल्या लोकांसारखं होऊन राहणं ही आमची माफक महत्त्वाकांक्षा होती. आम्हाला इथं येऊन आमचं वेगळेपण सिद्ध करायचं नव्हतं, तर आम्हाला इथल्यासारखंच होऊन राहायचं होतं. पुण्याकडं, इथल्या लोकांकडं आम्ही मान उंचावून बघत होतो. कौतुकानं, आदरानं बघत होतो. प्रसंगी त्यांचे टोमणे खात होतो, पण त्यातून शिकतही होतो. उगाच चुकीच्या कारणावरून तुम्हाला कोणी बोलत नाही; मात्र चुकलात तर बोलल्याशिवाय राहतही नाहीत, हे कळलं. बघता बघता मुठेचं पाणी आमच्या अंगात चढायला लागलं. इथे टक्केटोणपे खाऊन आम्हीही टोमणे मारायला शिकलो. इथल्या वाडा संस्कृतीत राहून, इथले सांस्कृतिक कार्यक्रम पाहून, इथली नाटकं बघून, सवाई गंधर्व महोत्सव ऐकून आम्ही पुणेकर होण्याची एकेक पायरी आत्मविश्वासानं चढत गेलो. ‘सकाळ’मध्ये कामाला होतो, त्यामुळं तिथं तर हे शिक्षण रोजच होत होतं. त्यामुळं एकविसावं शतक उजाडता उजाडताच मी जवळपास पक्का पुणेकर होऊन गेलो होतो... भाऊमहाराज बोळातील वास्तव्यानं मला हा पुणेकर होण्याचा पासपोर्ट मिळवून दिला होता...
(क्रमश:)
---


No comments:
Post a Comment